व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

खंडणीमुळे आपले जीवन वाचते —ते कसे?

खंडणीमुळे आपले जीवन वाचते —ते कसे?

खंडणीमुळे आपले जीवन वाचते —ते कसे?

“जो पुत्रावर विश्‍वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे; परंतु जो पुत्राचे ऐकत नाही त्याच्या दृष्टीस जीवन पडणार नाही; पण देवाचा क्रोध त्याच्यावर राहतो.”—योहा. ३:३६.

१, २. कोणत्या एका कारणासाठी मुळात झायन्स वॉच टॉवर छापण्यात आले होते?

 “ख्रिस्ताचा मृत्यू किती महत्त्वपूर्ण आहे हे बायबलचा काळजीपूर्वक अभ्यास करणाऱ्‍या कोणत्याही व्यक्‍तीच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही,” असे ऑक्टोबर १८७९ मध्ये प्रकाशित झालेल्या या नियतकालिकाच्या चौथ्या अंकात म्हटले होते. त्या लेखाच्या शेवटी एक अत्यंत महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आली होती: “ख्रिस्ताचा मृत्यू हा बलिदान आणि पापांचे प्रायश्‍चित्त नाही, असे सुचवणाऱ्‍या कोणत्याही गोष्टीपासून आपण दूरच राहिले पाहिजे.”१ योहान २:१, २ वाचा.

जुलै १८७९ मध्ये पहिल्यांदा झायन्स वॉच टॉवर प्रकाशित करण्यात आले. ते प्रकाशित करण्यामागचे एक कारण होते बायबलमधील खंडणीच्या शिकवणीचे समर्थन करणे. त्यातील लेखांतून “यथाकाळी” आध्यात्मिक अन्‍न पुरवण्यात आले असे म्हणता येईल. कारण, ख्रिस्ती असण्याचा दावा करणारे अनेक जण १८०० च्या अखेरीस, ख्रिस्ताचा मृत्यू कसा काय आपल्या पापांसाठी खंडणी असू शकतो याबद्दल प्रश्‍न उपस्थित करू लागले होते. (मत्त. २४:४५) त्या वेळी, कितीतरी जण उत्क्रांतिवादाच्या सिद्धान्तावर विश्‍वास ठेवू लागले होते. या सिद्धान्तावर विश्‍वास ठेवणारे लोक, मानवाने आपली परिपूर्ण स्थिती गमावली आहे ही वस्तुस्थिती मान्य करत नाहीत. उत्क्रांतिवादी अशी शिकवण देतात की मनुष्य हा नैसर्गिक रीत्या सुधारणा करत आहे, त्यामुळे त्याला खंडणीची गरज नाही. म्हणूनच, प्रेषित पौलाने तीमथ्याला दिलेला सल्ला अगदी उचित आहे: “तुझ्या स्वाधीन केलेली ठेव संभाळ; अधर्माच्या रिकाम्या वटवटीपासून आणि जिला ‘विद्या’ हे नाव चुकीने दिले गेले आहे तिच्या विरोधी मतापासून दूर राहा. ती विद्या स्वीकारून कित्येक विश्‍वासापासून ढळले आहेत.”—१ तीम. ६:२०, २१.

३. आपण आता कोणत्या प्रश्‍नांची चर्चा करणार आहोत?

तुम्ही विश्‍वासापासून न ‘ढळण्याचा’ निर्धार केला आहे यात कोणतीही शंका नाही. पण, आपला विश्‍वास टिकवून ठेवण्यासाठी या प्रश्‍नांवर विचार करणे उचित ठरेल: मला खंडणीची गरज का आहे? खंडणी देण्यासाठी यहोवाला व येशूला कोणती किंमत मोजावी लागली? यहोवाच्या क्रोधापासून मला वाचवू शकणाऱ्‍या खंडणीच्या या बहुमोल तरतुदीपासून मला कशा प्रकारे लाभ होऊ शकतो?

देवाच्या क्रोधापासून वाचणे

४, ५. देवाचा क्रोध सध्याच्या दुष्ट जगावर आहे हे कशावरून सिद्ध होते?

बायबलमधून व मानवजातीच्या इतिहासात घडलेल्या भयंकर घटनांवरून दिसून येते की आदामाने पाप केले तेव्हापासून देवाचा क्रोध मानवजातीवर ‘राहिला आहे.’ (योहा. ३:३६) आजवर कोणताही मनुष्य मृत्यूपासून सुटलेला नाही यावरून हे सिद्ध होते. मानवांवर एकापाठोपाठ एक येणाऱ्‍या संकटांपासून त्यांचे संरक्षण करण्यास सैतानाचे प्रतिस्पर्धी शासन पूर्णपणे असमर्थ ठरले आहे. आणि कोणतेही मानवी सरकार आपल्या सर्व नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यास समर्थ नाही. (१ योहा. ५:१९) म्हणूनच, आजपर्यंत मानवजात युद्ध, गुन्हेगारी आणि गरिबी यांनी पिडलेली आहे.

तर मग, हे स्पष्टच आहे की सध्याच्या दुष्ट जगावर यहोवाचा आशीर्वाद नाही. पौलाने म्हटले की सर्व ‘अभक्‍तीवर देवाचा क्रोध स्वर्गातून प्रगट होतो.’ (रोम. १:१८-२०) तेव्हा, जे लोक अपश्‍चात्तापीपणे, देवाला आवडत नाही अशा प्रकारचे जीवन जगतात, ते त्यांच्या आचरणाच्या वाईट परिणामांपासून सुटणार नाहीत. आज देवाचा क्रोध, सैतानाच्या जगावर ओतल्या जाणाऱ्‍या पिडांप्रमाणे न्यायदंडाच्या संदेशांतून प्रकट केला जात आहे. ही माहिती बायबलवर आधारित असलेल्या आपल्या अनेक प्रकाशनांत आढळते.—प्रकटी. १६:१.

६, ७. अभिषिक्‍त ख्रिस्ती कोणत्या कार्यात पुढाकार घेत आहेत, आणि सैतानाच्या जगाचा भाग असलेल्या लोकांकरता आजही कोणती संधी उपलब्ध आहे?

तर मग, जे सैतानाच्या आधिपत्याखाली आहेत ते त्यातून कधीही मुक्‍त होणार नाहीत आणि त्यांना देवाची स्वीकृती प्राप्त करणे शक्य नाही असा याचा अर्थ होतो का? नाही, कारण यहोवासोबत समेट करण्याची संधी अजूनही उपलब्ध आहे. “ख्रिस्ताच्या वतीने वकिली” करणारे अभिषिक्‍त ख्रिस्ती अशा एका जाहीर सेवा कार्यात पुढाकार घेत आहेत, ज्याद्वारे सर्व राष्ट्रांतील लोकांना ‘देवाबरोबर समेट करा’ असे आमंत्रण दिले जात आहे.—२ करिंथ. ५:२०, २१.

प्रेषित पौलाने म्हटले की येशू “आपल्याला भावी क्रोधापासून सोडविणारा आहे.” (१ थेस्सलनी. १:१०) यहोवा शेवटच्या वेळी आपला क्रोध व्यक्‍त करेल तेव्हा पश्‍चात्ताप न करणाऱ्‍या पापी लोकांचा सदासर्वकाळासाठी नाश होईल. (२ थेस्सलनी. १:६-९) या क्रोधापासून कोण वाचेल? बायबल म्हणते: “जो पुत्रावर विश्‍वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे; परंतु जो पुत्राचे ऐकत नाही त्याच्या दृष्टीस जीवन पडणार नाही; पण देवाचा क्रोध त्याच्यावर राहतो.” (योहा. ३:३६) होय, सध्याच्या दुष्ट जगाचा अंत जवळ येईल, तेव्हा जिवंत असलेल्यांपैकी जे येशूवर व खंडणी बलिदानावर विश्‍वास ठेवतात अशा सर्वांचा देवाच्या क्रोधापासून बचाव होईल.

खंडणी कशा प्रकारे कार्य करते?

८. (क) आदाम व हव्वा यांच्यासमोर कोणते उज्ज्वल भवितव्य होते? (ख) यहोवा परिपूर्ण न्यायाचा देव असल्याचे त्याने कसे दाखवले?

आदाम व हव्वा यांना परिपूर्ण असे निर्माण करण्यात आले होते. ते जर देवाला आज्ञाधारक राहिले असते, तर आज सबंध पृथ्वी नंदनवन असती आणि आदाम आणि हव्वेचे वंशज आनंदाने त्यांच्यासोबत या नंदनवनात राहिले असते. पण, दुःखाची गोष्ट म्हणजे, आपल्या पहिल्या पालकांनी जाणूनबुजून देवाच्या आज्ञेचे उल्लंघन केले. परिणामस्वरूप, त्यांना कायमचा मृत्यूदंड सुनावण्यात आला आणि मूळ नंदनवनातून बाहेर घालवून देण्यात आले. आदाम व हव्वा यांना मुले झाली तोपर्यंत मानवांमध्ये पापाचा शिरकाव झाला होता. कालांतराने, आदाम व हव्वा वृद्ध झाले आणि मरण पावले. यावरून हे सिद्ध होते की यहोवा आपल्या शब्दाला खरा ठरतो. शिवाय, तो परिपूर्ण न्यायाचा देव आहे. यहोवाने आदामाला ताकीद दिली होती की मना केलेले फळ खाल्ल्यास तो मरेल. आणि तसेच झाले.

९, १०. (क) आदामाचे वंशज का मरतात? (ख) आपण कायमच्या मृत्यूपासून कसे वाचू शकतो?

आपण आदामाचे वंशज असल्यामुळे, आपल्याला वारशाने एक अपरिपूर्ण शरीर मिळाले आहे. त्यामुळे आपला कल पाप करण्याकडे असतो आणि शेवटी आपण मरण पावतो. आदामाने पाप केले तेव्हा आपण जणू त्याच्या पोटी होतो. त्यामुळे, आदामाला देण्यात आलेला मृत्यूदंड आपल्यावरही आला. यहोवाने जर खंडणीचे मोल न चुकवता मृत्यू नाहीसा केला असता, तर तो आपल्या शब्दाला खरा ठरला नसता. त्यामुळेच, पौलाने आपल्या सर्वांच्या वतीने असे म्हटले: “आपणाला ठाऊक आहे की, नियमशास्त्र आध्यात्मिक स्वरूपाचे आहे; मी तर दैहिक, पापाला विकलेला असा आहे, किती मी कष्टी माणूस! मला ह्‍या मरणाधीन असलेल्या देहापासून कोण सोडवील?”—रोम. ७:१४, २४.

१० केवळ यहोवा देवच एका न्यायिक आधारावर आपल्या पापांची उचितपणे क्षमा करू शकत होता आणि कायमच्या मृत्यूदंडापासून आपली सुटका करू शकत होता. त्यासाठी त्याने आपल्या प्रिय पुत्राला एक परिपूर्ण मानव या नात्याने जन्म घेण्यासाठी स्वर्गातून पाठवले, जो आपल्याकरता खंडणी म्हणून आपल्या जीवनाचे बलिदान देऊ शकत होता. आदामाच्या उलट, येशू शेवटपर्यंत परिपूर्ण राहिला. होय, “त्याने पाप केले नाही.” (१ पेत्र २:२२) येशूमध्ये परिपूर्ण मानवांना जन्म देण्याची कुवत होती. पण, त्याने देवाच्या शत्रूंच्या हाती मृत्यू सोसला, ज्यामुळे तो आदामाच्या पापी मुलांना दत्तक घेऊ शकत होता आणि त्याच्यावर विश्‍वास ठेवणाऱ्‍यांना तो सार्वकालिक जीवन मिळवून देऊ शकत होता. बायबल सांगते: “एकच देव आहे, आणि देव व मानव ह्‍यांमध्ये ख्रिस्त येशू मनुष्य हा एकच मध्यस्थ आहे. त्याने सर्वांसाठी मुक्‍तीचे मोल म्हणून स्वतःला दिले.”—१ तीम. २:५, ६.

११. (क) खंडणीचे काय फायदे आहेत हे एका उदाहरणावरून सांगा. (ख) खंडणीचे फायदे किती व्यापक आहेत?

११ खंडणी कशा प्रकारे कार्य करते हे समजण्यासाठी आपण एक उदाहरण विचारात घेऊ या. असे समजा की एका बँकेने आपल्या गुंतवणूकदारांचे सर्व पैसे बुडवले आहेत आणि त्यामुळे गुंतवणूकदार कर्जात बुडाले आहेत. गुंतवणूकदारांचे पैसे बुडवल्यामुळे बँकेच्या मालकांना अनेक वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात येते. पण, बँकेत पैसे गुंतवणाऱ्‍या त्या निरपराध लोकांबद्दल काय? जोपर्यंत एक दयाळू व श्रीमंत मनुष्य या बँकेला ताब्यात घेऊन कंगाल झालेल्या गुंतवणूकदारांचे सर्व पैसे परत करत नाही व त्यांना कर्जातून मुक्‍त करत नाही, तोपर्यंत त्यांना आपल्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा कोणताच मार्ग नाही. त्याच प्रकारे, यहोवा देवाने आणि त्याच्या प्रिय पुत्राने आदामाच्या वंशजांना विकत घेतले आणि येशूच्या सांडलेल्या रक्‍ताच्या आधारावर त्यांच्या पापाचे कर्ज माफ केले. म्हणूनच, बाप्तिस्मा देणारा योहान येशूबद्दल असे म्हणू शकला: “हा पाहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा!” (योहा. १:२९) ज्यांचे पाप हरण करण्यात येते, त्यांमध्ये केवळ सध्या जिवंत असणाऱ्‍यांचाच नव्हे, तर मरण पावलेल्यांचा देखील समावेश होतो.

खंडणीची किंमत

१२, १३. इसहाकाचे बलिदान देण्याच्या अब्राहामाच्या तयारीवरून आपण काय शिकू शकतो?

१२ खंडणी देण्यासाठी आपल्या स्वर्गीय पित्याला व त्याच्या प्रिय पुत्राला किती मोठी किंमत मोजावी लागली हे आपण कधीच पूर्णपणे समजू शकणार नाही. पण, बायबलमधील काही उदाहरणे या विषयावर मनन करण्यासाठी आपली मदत करू शकतात. अब्राहामाचे उदाहरण घ्या. देवाने त्याला अशी आज्ञा दिली: “तुझा पुत्र, तुझा एकुलता एक प्रिय इसहाक यास घेऊन मोरिया देशात जा आणि मी तुला सांगेन त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर.” (उत्प. २२:२-४) या आज्ञेनुसार अब्राहाम तीन दिवसांचा प्रवास करून मोरिया पर्वतावर जात असताना त्याला कसे वाटले असेल याची कल्पना करा.

१३ देवाने सांगितलेल्या ठिकाणी शेवटी अब्राहाम पोहचला. आपण स्वतः बनवलेल्या वेदीवर, इसहाकाचे हातपाय बांधून त्याला झोपवताना अब्राहामाचे अंतःकरण किती पिळवटून निघाले असेल याची कल्पना करा. आपल्या मुलाचा वध करण्यासाठी अब्राहामाने सुरा उचलला तेव्हा त्याला किती यातना झाल्या असतील! तसेच, वेदीवर झोपलेल्या इसहाकाच्या भावनांचाही विचार करा. तो धारदार सुरा आपल्याला भेदून आपल्याला प्रचंड वेदना होतील व शेवटी आपला मृत्यू होईल या विचाराने इसहाकाला कसे वाटले असेल याचा विचार करा. यहोवाच्या देवदूताने वेळीच अब्राहामाला रोखले. त्या प्रसंगी अब्राहामाने व इसहाकाने जे केले, त्यावरून सैतानाच्या प्रतिनिधींच्या हाती आपल्या पुत्राचा मृत्यू होऊ देताना यहोवाला कोणती किंमत मोजावी लागली होती हे समजण्यास आपल्याला मदत होते. इसहाकाने ज्या प्रकारे अब्राहामाला सहकार्य केले, त्यावरून येशूची आपल्याकरता त्रास सहन करून मरण पत्करण्याची तयारी दिसून येते.—इब्री ११:१७-१९.

१४. खंडणी देण्यासाठी यहोवाला कोणती किंमत मोजावी लागली हे याकोबाच्या जीवनातील कोणत्या घटनेवरून समजते?

१४ खंडणी देण्याकरता यहोवाला व येशू ख्रिस्ताला किती मोठी किंमत मोजावी लागली हे याकोबाच्या जीवनातील एका घटनेवरून देखील चित्रित केले जाऊ शकते. याकोबाचे आपल्या सर्व पुत्रांपैकी योसेफावर सगळ्यात जास्त प्रेम होते. दुःखाची गोष्ट म्हणजे योसेफाचे भाऊ त्याचा हेवा व द्वेष करायचे. तरीसुद्धा, त्याच्या पित्याने त्याला आपल्या भावांचे क्षेमकुशल पाहण्यासाठी जाण्यास सांगितले तेव्हा त्याने जाण्याची तयारी दाखवली. त्या वेळी, त्याचे भाऊ हेब्रोनमधील आपल्या घरापासून १०० किलोमीटर दूर उत्तरेला याकोबाच्या कळपाची देखभाल करत होते. नंतर, याकोबाचे पुत्र योसेफाचे रक्‍ताने माखलेले कपडे घेऊन घरी परतले तेव्हा याकोबाला कसे वाटले असेल याची कल्पना करा! तो म्हणाला: “हा माझ्या मुलाचाच झगा! हिंस्र पशूने त्यास खाल्ले, योसेफाला फाडून टाकिले यात संशय नाही.” या घटनेचा याकोबाच्या मनावर खूप गहिरा परिणाम होऊन त्याने कितीतरी दिवस योसेफासाठी शोक केला. (उत्प. ३७:३३, ३४) एखाद्या परिस्थितीत अपरिपूर्ण मानव जशी प्रतिक्रिया व्यक्‍त करतात अगदी तशीच प्रतिक्रिया यहोवा व्यक्‍त करत नाही. तरीसुद्धा, याकोबाच्या जीवनातील या घटनेवर मनन केल्याने, पृथ्वीवर असताना आपल्या प्रिय पुत्राला वाईट वागणूक देण्यात आली आणि क्रूरपणे मारण्यात आले, तेव्हा देवाला कसे वाटले असेल याची थोडीफार तरी कल्पना आपल्याला येऊ शकते.

खंडणीचे लाभ

१५, १६. (क) यहोवाने खंडणीचे मोल स्वीकारले असल्याचे कसे दाखवले? (ख) खंडणीपासून तुम्हाला कशा प्रकारे लाभ मिळाले आहेत?

१५ यहोवा देवाने आपल्या विश्‍वासू पुत्राला एक वैभवी आत्मिक शरीर देऊन त्याचे पुनरुत्थान केले. (१ पेत्र ३:१८) पुनरुत्थानानंतर येशू आपल्या शिष्यांना विश्‍वासात बळकट करण्यासाठी आणि भविष्यातील एका मोठ्या प्रचार कार्याकरता तयार करण्यासाठी ४० दिवसांपर्यंत त्यांना दिसत राहिला. त्यानंतर तो स्वर्गात गेला. तेथे त्याने, खंडणी बलिदानावर विश्‍वास ठेवणाऱ्‍या आपल्या खऱ्‍या अनुयायांच्या वतीने वापरले जाण्यासाठी आपल्या रक्‍ताचे मोल देवाला सादर केले. यहोवा देवाने येशूला सा.यु. ३३ पेन्टेकॉस्टच्या दिवशी जेरूसलेममध्ये एकत्र जमलेल्या त्याच्या शिष्यांवर पवित्र आत्मा ओतण्याची जबाबदारी देऊन ख्रिस्ताची खंडणी स्वीकारली असल्याचे दाखवले.—प्रे. कृत्ये २:३३.

१६ ख्रिस्ताचे हे अभिषिक्‍त अनुयायी लगेच इतरांना आर्जवू लागले की देवाच्या क्रोधापासून वाचण्यासाठी व आपल्या पापांची क्षमा मिळवण्यासाठी त्यांनी येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्यावा. (प्रेषितांची कृत्ये २:३८-४० वाचा.) इतिहासातील त्या महत्त्वाच्या दिवसापासून आजपर्यंत, सर्व राष्ट्रांतील लाखो लोकांनी येशूच्या खंडणी बलिदानावरील आपल्या विश्‍वासाच्या आधारावर देवासोबत जवळचा नातेसंबंध जोडला आहे. (योहा. ६:४४) ही सर्व माहिती जाणून घेतल्यावर, आणखी दोन प्रश्‍नांविषयी जाणून घेणे आवश्‍यक आहे: आपल्यापैकी कोणालाही आपल्या स्वतःच्या चांगल्या कार्यांमुळे सार्वकालिक जीवनाची आशा देण्यात आली आहे का? एकदा ही अद्‌भुत आशा मिळाल्यानंतर आपण ती गमावण्याची शक्यता आहे का?

१७. देवाचे मित्र असण्याच्या अद्‌भुत आशीर्वादाकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनाने पाहिले पाहिजे?

१७ आपण खरेतर खंडणीचे फायदे मिळवण्यास मुळीच पात्र नाहीत. पण, खंडणीवर विश्‍वास ठेवल्यामुळे, आज लाखो लोक पृथ्वीवरील नंदनवनात सर्वकाळ जगण्याच्या आशेने देवाचे मित्र बनले आहेत. तरीसुद्धा, केवळ यहोवाचे मित्र बनल्यामुळे, त्याच्यासोबतचा आपला नातेसंबंध कायम टिकून राहील याची खातरी देता येत नाही. भविष्यात येणाऱ्‍या देवाच्या क्रोधाच्या दिवसापासून वाचण्यासाठी, ‘ख्रिस्त येशूने भरलेल्या खंडणीबद्दल’ आपण सतत कृतज्ञता व्यक्‍त करत राहिले पाहिजे.—रोम. ३:२४; फिलिप्पैकर २:१२ वाचा.

खंडणीवर निरंतर विश्‍वास ठेवा

१८. खंडणीवर विश्‍वास व्यक्‍त करत राहण्यामध्ये कशाचा समावेश होतो?

१८ या लेखाचे मुख्य वचन असलेल्या योहान ३:३६ यातून दिसते की प्रभू येशू ख्रिस्तावर विश्‍वास ठेवत राहण्यात त्याच्या आज्ञांचे पालन करण्याचाही समावेश होतो. खंडणीबद्दल आपल्याला कदर असल्यामुळे, आपण येशूने शिकवलेल्या गोष्टींनुसार जीवन जगले पाहिजे, ज्यात नैतिकतेबद्दल त्याने शिकवलेल्या गोष्टींचे पालन करण्याचाही समावेश होतो. (मार्क ७:२१-२३) “देवाचा कोप” अशा सर्व लोकांवर येईल, जे अपश्‍चात्तापीपणे जारकर्म, अश्‍लील विनोद यांसारखी कृत्ये करतात आणि ‘सर्व प्रकारचे अशुद्ध’ कार्य करतात ज्यात सतत पोर्नोग्राफी (अश्‍लील चित्र किंवा व्हीडिओ) पाहण्याचाही समावेश होतो.—इफिस. ५:३-६.

१९. खंडणीवर आपला विश्‍वास असल्याचे आपण कोणकोणत्या चांगल्या मार्गांनी दाखवू शकतो?

१९ खंडणीबद्दल आपल्याला कदर असल्यामुळे आपण ‘सुभक्‍तीची’ कार्ये करण्यात व्यस्त असले पाहिजे. (२ पेत्र ३:११) तेव्हा, नियमितपणे व मनापासून प्रार्थना करण्यासाठी, बायबलचा अभ्यास करण्यासाठी, सभांना उपस्थित राहण्यासाठी, कौटुंबिक उपासना करण्यासाठी, आणि आवेशाने राज्याचा प्रचार करण्यासाठी आपण पुरेसा वेळ काढला पाहिजे. तसेच, आपण कधीही ‘चांगले करण्यास व दान करण्यास विसरू नये; कारण अशा यज्ञांनी देव संतुष्ट होतो.’—इब्री १३:१५, १६.

२०. खंडणीवर निरंतर विश्‍वास ठेवणारे सर्व लोक भविष्यात कोणत्या आशीर्वादांची अपेक्षा करू शकतात?

२० अखेरीस यहोवाचा क्रोध या दुष्ट जगावर भडकेल तेव्हा, आपण खंडणीवर विश्‍वास ठेवला आणि त्याबद्दल निरंतर कृतज्ञता बाळगली याचा आपल्याला किती आनंद होईल! आणि देवाच्या प्रतिज्ञात नवीन जगात प्रवेश केल्यानंतर, त्याच्या क्रोधापासून वाचण्यासाठी त्याने केलेल्या खंडणीच्या अद्‌भुत तरतुदीबद्दल आपण सदासर्वकाळ त्याचे आभार मानत राहू.योहान ३:१६; प्रकटीकरण ७:९, १०, १३, १४ वाचा.

तुमचे उत्तर काय असेल?

• आपल्याला खंडणीची गरज का आहे?

• खंडणीकरता यहोवाला व येशू ख्रिस्ताला कोणती किंमत मोजावी लागली?

• खंडणीमुळे आपल्याला कोणते फायदे होतात?

• येशूच्या खंडणी बलिदानावर आपण कशा प्रकारे निरंतर विश्‍वास ठेवू शकतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१३ पानांवरील चित्र]

यहोवासोबत समेट करण्याची संधी अजूनही उपलब्ध आहे

[१५ पानांवरील चित्रे]

अब्राहाम, इसहाक, आणि याकोब यांच्या अनुभवांवर मनन केल्याने खंडणीसाठी किती मोठी किंमत देण्यात आली हे समजण्यास मदत होते