व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“प्रेमदयेचा नियम” तुमच्या जिभेचे रक्षण करो

“प्रेमदयेचा नियम” तुमच्या जिभेचे रक्षण करो

“प्रेमदयेचा नियम” तुमच्या जिभेचे रक्षण करो

“तिच्या मुखातून सुज्ञतेचे बोल निघतात, आणि प्रेमदयेचा नियम तिच्या जिभेवर असतो.”—नीति. ३१:२६, NW.

१, २. (क) यहोवाच्या उपासकांना कोणता गुण विकसित करण्याचे उत्तेजन दिले जाते? (ख) या लेखात कशाची चर्चा केली जाईल?

 प्राचीन काळच्या लमुएल राजाला आपल्या आईकडून मिळालेल्या देववाणीत, एक आदर्श पत्नी कशी असावी याविषयी एक महत्त्वाची गोष्ट सांगण्यात आली होती: “तिच्या मुखातून सुज्ञतेचे बोल निघतात, आणि प्रेमदयेचा नियम तिच्या जिभेवर असतो.” (नीति. ३१:१, १०, २६) केवळ सुज्ञ स्त्रीच्या मुखालाच नव्हे, तर यहोवाचे मन आनंदी करू इच्छिणाऱ्‍या सर्वांच्याच मुखाला प्रेमदया शोभा देते. म्हणूनच, यहोवाच्या सर्व उपासकांच्या बोलण्यातून प्रेमदया व्यक्‍त झाली पाहिजे.

पण, प्रेमदया आहे तरी काय? प्रेमदया कोणाला दाखवली पाहिजे? कोणती गोष्ट “प्रेमदयेचा नियम” आपल्या जिभेवर ठेवण्यास आपली मदत करू शकते? असे केल्याने आपल्या कुटुंबातील सदस्यांशी व मंडळीतील बंधुभगिनींशी सुसंवाद साधण्यास आपल्याला कशी मदत होऊ शकते? या प्रश्‍नांची चर्चा या लेखात केली जाईल.

एकनिष्ठ प्रेमापोटी दाखवलेली दया

३, ४. (क) प्रेमदया म्हणजे काय? (ख) माणुसकीच्या भावनेने दाखवलेली दया आणि प्रेमदया यात काय फरक आहे?

प्रेमदया या शब्दावरूनच समजते, की त्यात प्रेम आणि दया हे दोन गुण समाविष्ट आहेत. दया दाखवणे म्हणजे इतरांमध्ये वैयक्‍तिक आस्था घेणे आणि त्यांना मदत करण्याद्वारे व त्यांच्याशी विचारपूर्वक बोलण्याद्वारे त्यांच्याबद्दल वाटणारी कळकळ व्यक्‍त करणे. प्रेमदया यात प्रेमाचा गुणही समाविष्ट असल्यामुळे प्रेमदया दाखवणे म्हणजे इतरांबद्दल वाटणाऱ्‍या प्रेमामुळे प्रवृत्त होऊन त्यांच्या हिताचा विचार करणे. पण, प्रेमदया असे भाषांतर केलेल्या इब्री शब्दाचा अर्थ केवळ प्रेमभावनेने प्रवृत्त होऊन दया दाखवणे इतकाच होत नाही. तर प्रेमदया दाखवण्याचा अर्थ, एका व्यक्‍तीसंबंधी असलेला उद्देश पूर्ण होईपर्यंत तिला एकनिष्ठ राहून स्वखुशीने दया दाखवत राहणे.

प्रेमदया आणि दया यात आणखीनही एक फरक आहे. माणुसकीच्या भावनेने व्यक्‍त केलेली दया अगदी अनोळखी व्यक्‍तींनासुद्धा दाखवली जाऊ शकते. अशा दयेचा, प्रेषित पौलाला आणि त्याच्यासोबत असलेल्या २७५ जणांना अनुभव आला होता. मिलिता बेटावर त्यांचे तारू फुटले तेव्हा काहीएक ओळख नसलेल्या त्या बेटावरील रहिवाशांनी त्यांना ही दया दाखवली होती. (प्रे. कृत्ये २७:३७–२८:२) दुसरीकडे पाहता, प्रेमदया ही एकमेकांशी घनिष्ठ नातेसंबंध असलेल्या व्यक्‍तींमधील एकनिष्ठेच्या भावनेपोटी दाखवली जाते. * अशा प्रकारची दया, “इस्राएल लोक मिसरातून आले तेव्हा” केनी लोकांनी त्यांना दाखवली होती.—१ शमु. १५:६.

मनन आणि प्रार्थना अत्यावश्‍यक

५. कोणती गोष्ट आपल्या जिभेवर लगाम घालण्यास आपली मदत करू शकते?

बोलण्यातून प्रेमदया व्यक्‍त करणे वाटते तितके सोपे नाही. याचे कारण, शिष्य याकोबाने जिभेविषयी जे लिहिले त्यावरून समजते: “मनुष्यांपैकी कोणीहि जिभेला वश करावयास समर्थ नाही; ती शांतिरहित असून दुष्ट आहे व प्राणघातक विषाने भरलेली आहे.” (याको. ३:८) तर मग, काबूत ठेवण्यास अतिशय मुश्‍कील असलेल्या या अवयवाला लगाम घालण्यास कोणती गोष्ट आपली मदत करू शकते? याचे उत्तर, येशूने त्याच्या काळातील धर्मगुरूंना जे म्हटले होते त्यातून आपल्याला मिळते. त्याने म्हटले: “अंतःकरणात जे भरून गेले आहे तेच मुखावाटे निघणार.” (मत्त. १२:३४) प्रेमदयेने आपल्या जिभेचे रक्षण करावे असे वाटत असल्यास आपण हा गुण आपल्या हृदयात अर्थात आपल्या अंतर्मनात रुजवला पाहिजे. असे करण्यास मनन आणि प्रार्थना कशा प्रकारे आपली मदत करू शकतात ते आता आपण पाहू या.

६. यहोवाने दाखवलेल्या प्रेमदयेच्या कृत्यांवर आपण कृतज्ञ भावनेने मनन का केले पाहिजे?

यहोवा देवाची ‘प्रेमदया उदंड’ आहे असे बायबल म्हणते. (निर्ग. ३४:६, पं.र.भा.) स्तोत्रकर्त्याने देखील असे गायिले: “हे यहोवा तुझ्या प्रेमदयेने पृथ्वी भरली आहे.” (स्तो. ११९:६४, पं.र.भा.) यहोवाने आपल्या उपासकांना प्रेमदया कशी दाखवली याची असंख्य उदाहरणे बायबलमध्ये आढळतात. यहोवाच्या ‘सर्व कृत्यांवर’ कृतज्ञ भावनेने मनन केल्यास देवाचा हा गुण स्वतःमध्ये विकसित करण्याची प्रेरणा आपल्याला मिळेल.स्तोत्र ७७:१२ वाचा.

७, ८. (क) यहोवाने लोट आणि त्याच्या कुटुंबाप्रती प्रेमदया कशी दाखवली? (ख) यहोवाची प्रेमदया स्वतः अनुभवल्यानंतर दाविदाला कसे वाटले?

उदाहरणार्थ, अब्राहामाचा पुतण्या लोट आणि त्याचे कुटुंब राहत असलेल्या सदोम शहरावर यहोवाने आणलेल्या विनाशातून त्याने त्यांना कसे वाचवले याचा विचार करा. नाश आणण्याची वेळ जवळ आली तेव्हा लोटाकडे आलेल्या देवदूतांनी त्याला आपल्या कुटुंबासह लगेच नगराबाहेर पडण्यास आर्जवले. “पण तो दिरंगाई करू लागला, तेव्हा परमेश्‍वराची करुणा त्याजवर होती म्हणून त्या [देवदूतांनी] त्याच्या, त्याच्या बायकोच्या आणि त्याच्या दोघी मुलींच्या हातास धरून त्यांना ओढून बाहेर काढिले आणि नगराबाहेर आणून सोडिले,” असे बायबल म्हणते. त्यांचे जीवन वाचवण्यासाठी यहोवाने केलेल्या या कृत्यावर आपण मनन करतो तेव्हा आपले अंतःकरण कृतज्ञ भावनेने दाटून येत नाही का? आणि यहोवाने आपल्या प्रेमदयेपोटीच हे कृत्य केले होते हे मान्य करण्यास आपण प्रवृत्त होत नाही का?—उत्प. १९:१६, १९.

प्राचीन काळच्या दावीद राजाचेही उदाहरण विचारात घ्या. आपल्या एका गीतात त्याने म्हटले: “[यहोवा] तुझ्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करितो; तो तुझे सर्व रोग बरे करितो.” दाविदाने बथशेबाशी केलेल्या पापाबद्दल त्याला क्षमा करण्यात आली तेव्हा त्याला किती कृतज्ञ वाटले असेल! म्हणूनच त्याने यहोवाबद्दल असे उद्‌गार काढले: “जशी पृथ्वीच्या वर आकाशे अतिउंच आहेत तशी त्याची प्रेमदया त्याचे भय धरणाऱ्‍यांवर विपुल आहे.” (स्तो. १०३:३, ११, पं.र.भा.) बायबलमध्ये नमूद असलेल्या या व अशा इतर वृत्तान्तांवर मनन केल्याने यहोवाच्या प्रेमदयेबद्दल आपल्या अंतःकरणात कृतज्ञता दाटून येते आणि त्याची स्तुती व आभार मानण्यास आपण प्रवृत्त होतो. तसेच सत्य देव, यहोवा याच्या प्रेमदयेबद्दल आपल्याला जितकी अधिक कृतज्ञता वाटेल तितके अधिक त्याचे अनुकरण करण्याची प्रेरणा आपल्याला मिळेल.—इफिस. ५:१.

९. यहोवाच्या उपासकांसाठी दैनंदिन जीवनात प्रेमदया व्यक्‍त करण्याचे एक सबळ कारण कोणते?

बायबलमधील उदाहरणे दाखवतात की ज्यांनी यहोवासोबत एक घनिष्ठ नातेसंबंध जोडला आहे अशांवर तो आपल्या प्रेमदयेचा अर्थात एकनिष्ठ प्रेमाचा वर्षाव करतो. पण, ज्यांचा जिवंत देवासोबत घनिष्ठ नातेसंबंध नाही अशा लोकांविषयी काय म्हणता येईल? तो त्यांच्याशी कठोरपणे किंवा निर्दयीपणे वागतो का? मुळीच नाही. उलट, लूक ६:३५ म्हणते: “[देव] कृतघ्न व दुर्जन ह्‍यांच्यावरहि उपकार करणारा आहे.” तो कसा? “तो वाइटांवर व चांगल्यांवर आपला सूर्य उगवितो आणि नीतिमानांवर व अनीतिमानांवर पाऊस पाडितो.” (मत्त. ५:४५) देव सर्व मानवजातीला दाखवत असलेल्या या दयेचा, सत्य शिकण्यापूर्वी व त्यानुसार जीवन व्यतीत करण्यापूर्वी आपण अनुभव घेतला होता. पण, त्याचे उपासक बनल्यानंतर आता आपण त्याच्या एकनिष्ठ प्रेमाचा अर्थात अढळ प्रेमदयेचा अनुभव घेत आहोत. (यशया ५४:१० वाचा.) याबद्दल आपण त्याचे किती आभारी आहोत! तसेच, आपल्या बोलण्यातून व जीवनाच्या प्रत्येक पैलूतून प्रेमदया व्यक्‍त करण्याचे किती हे सबळ कारण!

१०. आपल्या व्यक्‍तिमत्त्वात प्रेमदया विकसित करण्यात प्रार्थना अत्यंत महत्त्वाची आहे असे का म्हणता येईल?

१० प्रेमदया विकसित करण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे प्रार्थना करणे. प्रेमदयेमध्ये समाविष्ट असलेले गुण अर्थात प्रेम आणि दया हे यहोवाच्या पवित्र आत्म्याच्या प्रतिफळाचे पैलू आहेत. (गलती. ५:२२, NW) आपल्या अंतःकरणात प्रेमदया रुजवण्यासाठी आपण त्या आत्म्याचे मार्गदर्शन स्वीकारले पाहिजे. यहोवाच्या पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन मिळवण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे त्याच्यासाठी प्रार्थना करणे. (लूक ११:१३) किंबहुना, देवाच्या पवित्र आत्म्यासाठी व त्याच्या मार्गदर्शनासाठी आपण वारंवार प्रार्थना केली पाहिजे. होय, आपल्या जिभेवर प्रेमदयेचा नियम असण्यासाठी मनन व प्रार्थना करणे अत्यावश्‍यक आहे.

वैवाहिक जीवनात प्रेमदया दाखवणे

११. (क) पतींनी आपापल्या पत्नीला प्रेमदया दाखवावी असे यहोवा त्यांच्याकडून अपेक्षितो हे कशावरून समजते? (ख) प्रेमदयेचा नियम कशा प्रकारे पतींना आपल्या जिभेचे रक्षण करण्यास मदत करू शकतो?

११ प्रेषित पौल पतींना असे प्रोत्साहन देतो: “जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीति केली तशी तुम्हीहि आपआपल्या पत्नीवर प्रीति करा, ख्रिस्ताने मंडळीवर प्रीति केली आणि स्वतःस तिच्यासाठी समर्पण केले.” (इफिस. ५:२५) यहोवाने आदाम व हव्वेला जे सांगितले होते त्याचीही पौल पतींना आठवण करून देतो. पौल म्हणतो: “म्हणून पुरुष आपल्या आईबापांना सोडून आपल्या पत्नीला जडून राहील, आणि ती उभयता एकदेह होतील.” (इफिस. ५:३१) यावरून हे स्पष्ट होते, की पतींनी आपापल्या पत्नीला एकनिष्ठ राहून त्यांना सतत प्रेमदया दाखवावी अशी अपेक्षा यहोवा पतींकडून करतो. ज्या पतीच्या जिभेवर प्रेमदयेचा नियम असतो तो चारचौघांत आपल्या पत्नीच्या उणिवा उघड करत नाही किंवा तिला घालूनपाडून बोलत नाही. उलट, चारचौघांत तो आनंदाने तिची प्रशंसा करतो. (नीति. ३१:२८) काही कारणामुळे त्यांच्या नातेसंबंधात समस्या निर्माण झाल्यास, आपल्या पत्नीशी अपमानास्पद रीतीने बोलण्यापासून प्रेमदया पतीला आवर घालते.

१२. पत्नीच्या जिभेवर प्रेमदयेचा नियम असतो हे ती कसे दाखवते?

१२ पत्नीच्या जिभेवर देखील प्रेमदयेचा नियम असला पाहिजे. तिच्या बोलण्यातून जगाचा आत्मा व्यक्‍त होऊ नये. तिला “आपल्या पतीची भीड” असल्यामुळे ती चारचौघांत त्याच्याविषयी नेहमी चांगलेच बोलते आणि असे करण्याद्वारे इतरांना त्याच्याविषयी असलेला आदर आणखी वाढवते. (इफिस. ५:३३) आपल्या मुलांना त्यांच्या पित्याबद्दल वाटणारा आदर कमी होऊ नये म्हणून पतीने घेतलेला एखादा निर्णय तिला पटत नसला, तरी मुलांच्या देखत ती त्याला विरोध करत नाही. तर, अशा विषयांवर ती खासगीत त्याच्याशी बोलते. “प्रत्येक सुज्ञ स्त्री आपले घर बांधिते,” असे बायबल म्हणते. (नीति. १४:१) अशा स्त्रीचे घर, कुटुंबातील सर्वांसाठीच सुखावह व आरामदायी असते.

१३. प्रेमदयेचा नियम विशेषकरून कोठे दिसून आला पाहिजे आणि आपल्याला हे कसे करता येईल?

१३ पतीपत्नींनी घराच्या चार भिंतींच्या आड देखील एकमेकांशी नेहमी आदराने बोलले पाहिजे. पौलाने लिहिले: “क्रोध, संताप, दुष्टपण, निंदा व मुखाने शिवीगाळ करणे, ही सर्व आपणापासून दूर करा.” त्याने पुढे म्हटले: “करुणायुक्‍त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा; . . . पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीति ती ह्‍या सर्वांवर धारण करा.” (कलस्सै. ३:८, १२-१४) कुटुंबात मुलांच्या कानावर सतत प्रेमळ व दयाळू शब्द पडतात तेव्हा त्यांचा सर्वांगीण विकास तर होतोच, शिवाय बोलण्यात ते आपल्या पालकांचे अनुकरण करण्याची जास्त शक्यता असते.

१४. कुटुंबातील सदस्यांचे सांत्वन करण्यासाठी कुटुंबप्रमुख कशा प्रकारे आपल्या जिभेचा उपयोग करू शकतात?

१४ स्तोत्रकर्त्याने यहोवाविषयी लिहिले: “तुझी प्रेमदया माझ्या सांत्वनासाठी असावी अशी मी तुला विनंती करतो.” (स्तो. ११९:७६, पं.र.भा.) यहोवा एका उल्लेखनीय मार्गाने आपल्या लोकांचे सांत्वन करतो, तो म्हणजे त्यांना प्रोत्साहन व मार्गदर्शन देण्याद्वारे. (स्तो. ११९:१०५) आपल्या स्वर्गीय पित्याच्या उदाहरणावरून कुटुंबप्रमुखांना कसा लाभ होऊ शकतो? आणि कुटुंबातील सदस्यांचे सांत्वन करण्यासाठी ते आपल्या जिभेचा उपयोग कसा करू शकतात? कुटुंबातील सदस्यांना आवश्‍यक मार्गदर्शन व उत्तेजन देण्याद्वारे ते असे करू शकतात. कौटुंबिक उपासनेच्या वेळी, बायबलमध्ये असलेले आध्यात्मिक धन शोधून काढण्याची एक उत्तम संधी कुटुंबांना मिळते.—नीति. २४:४.

आपल्या बांधवांना एकनिष्ठ प्रेम दाखवणे

१५. मंडळीतील बांधवांचे रक्षण करण्यासाठी ख्रिस्ती वडील व इतर प्रौढ जन कशा प्रकारे आपल्या जिभेचा उपयोग करू शकतात?

१५ “तुझी प्रेमदया आणि तुझे सत्य मला नित्य राखोत,” अशी दावीद राजाने प्रार्थना केली. (स्तो. ४०:११, पं.र.भा.) प्रेमदया दाखवण्याच्या बाबतीत मंडळीतील ख्रिस्ती वडील व इतर प्रौढ जन यहोवाचे अनुकरण कसे करू शकतात? आपण आपल्या जिभेचा उपयोग, देवाच्या वचनातील माहितीकडे लक्ष वेधण्यासाठी करतो तेव्हा आपण नक्कीच प्रेमदया दाखवतो.—नीति. १७:१७

१६, १७. आपल्या जिभेवर प्रेमदयेचा नियम असतो हे दाखवण्याचे काही मार्ग कोणते?

१६ एखादी ख्रिस्ती व्यक्‍ती बायबल तत्त्वांचे उल्लंघन करत असल्याचे आपल्या लक्षात आल्यास आपण काय केले पाहिजे? अशा वेळी प्रेमदयेने प्रवृत्त होऊन तिची चूक सुधारण्यासाठी आपण आपल्या जिभेचा उपयोग करणार नाही का? (स्तो. १४१:५) एखाद्या ख्रिस्ती व्यक्‍तीने गंभीर पाप केल्याचे आपल्या लक्षात आल्यास, मंडळीतील वडिलांनी प्रभूच्या नावाने तिला तेल लावावे व तिच्यावर ओणवून प्रार्थना करावी म्हणून तिने “मंडळीच्या वडिलांना बोलवावे” असे प्रोत्साहन तिला देण्यास एकनिष्ठ प्रेम आपल्याला प्रवृत्त करेल. (याको. ५:१४) पण, पाप करणाऱ्‍या व्यक्‍तीने वडिलांना कळवले नसेल, आणि आपणही ती गोष्ट वडिलांच्या कानावर घातली नाही, तर त्या व्यक्‍तीबद्दल आपल्याला प्रेम व दया असल्याचे दिसून येणार नाही. आपल्यातील काही जण हताश किंवा एकाकी असतील, तर काही जण कमीपणाच्या भावनेने अथवा निराशेने ग्रासलेले असतील. अशा वेळी, आपल्या जिभेवर प्रेमदयेचा नियम आहे हे दाखवण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे ‘जे अल्पधीराचे आहेत त्यांच्याशी धीराने’ बोलणे.—१ थेस्सलनी. ५:१४.

१७ देवाच्या लोकांचा विरोध करणारे आपल्या बंधुभगिनींविषयी अफवा पसरवतात तेव्हा आपली प्रतिक्रिया कशी असली पाहिजे? आपल्या बांधवांच्या एकनिष्ठेवर शंका घेण्याऐवजी अशा खोट्या बातम्यांकडे आपण एकतर दुर्लक्ष केले पाहिजे, किंवा मग अफवा पसरवणारी व्यक्‍ती समंजस असल्यास, ती व्यक्‍ती पसरवत असलेली माहिती कितपत खरी आहे याविषयी आपण तिला विचारले पाहिजे. आपल्या बांधवांना हानी पोचवण्याच्या हेतूने विरोधकांनी आपल्याकडून त्यांच्याबद्दलची माहिती काढण्याचा प्रयत्न केल्यास, बांधवांवरील एकनिष्ठ प्रेमापोटी अशी कोणतीही माहिती आपण त्यांना देणार नाही.—नीति. १८:२४.

‘प्रेमदया अनुसरणाऱ्‍याला जीवन प्राप्त होईल’

१८, १९. आपल्या ख्रिस्ती बांधवांशी व्यवहार करताना प्रेमदयेचा नियम नेहमी आपल्या जिभेवर का असला पाहिजे?

१८ ख्रिस्ती बांधवांसोबतच्या आपल्या सर्व व्यवहारांतून आपले एकनिष्ठ प्रेम दिसून आले पाहिजे. अगदी वाइटातल्या वाईट परिस्थितीतसुद्धा प्रेमदयेचा नियम नेहमी आपल्या जिभेवर असला पाहिजे. इस्राएल लोकांची प्रेमदया “लवकर उडून जाणाऱ्‍या दहिवराप्रमाणे” झाली तेव्हा यहोवाचे मन खूप दुखावले. (होशे. ६:४, ६) याउलट, आपण सातत्याने प्रेमदया दाखवतो तेव्हा यहोवाचे मन आनंदित होते. दैनंदिन जीवनात निरंतर प्रेमदया दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्‍यांना यहोवा कशा प्रकारे आशीर्वादित करतो ते पाहा.

१९ नीतिसूत्रे २१:२१ (पं.र.भा.) म्हणते: “जो न्यायीपण व प्रेमदया यांना अनुसरतो त्याला जीवन, न्यायीपण व सन्मान प्राप्त होतील.” अशा व्यक्‍तीला मिळणाऱ्‍या अनेक आशीर्वादांपैकी एक म्हणजे तिला अल्पकाळाचे नव्हे, तर अनंतकाळाचे जीवन प्राप्त होईल. अशा व्यक्‍तीला यहोवा, “जे खरे जीवन ते बळकट धरण्यास” मदत करतो. (१ तीम. ६:१२, १९) तेव्हा, सर्व प्रसंगी “एकमेकांना प्रेमदया” दाखवण्याचा आपण नेहमी प्रयत्न करू या.—जख. ७:९, NW.

[तळटीप]

^ परि. 4 प्रेमदया कशा प्रकारे एकनिष्ठा, प्रेम आणि दया यांपासून वेगळी आहे याबद्दल अधिक माहितीसाठी टेहळणी बुरूज, मे १५, २००२ अंकातील पृष्ठे १२-१३, १८-१९ पाहा.

तुम्ही स्पष्ट करू शकता का?

• प्रेमदया म्हणजे काय?

• प्रेमदयेचा नियम नेहमी आपल्या जिभेवर असावा म्हणून कोणती गोष्ट आपली मदत करेल?

• विवाहसोबती आपल्या बोलण्यातून एकनिष्ठ प्रेम कसे व्यक्‍त करू शकतात?

• आपल्या ख्रिस्ती बांधवांशी व्यवहार करताना प्रेमदयेचा नियम आपल्या जिभेवर असतो हे कशावरून दिसून येईल?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२३ पानांवरील चित्र]

दाविदाने यहोवाच्या प्रेमदयेची प्रशंसा केली

[२४ पानांवरील चित्र]

तुम्ही नियमितपणे कौटुंबिक उपासना करता का?