व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

येशू कशा प्रकारे देवाचे नीतिमत्त्व उंचावतो?

येशू कशा प्रकारे देवाचे नीतिमत्त्व उंचावतो?

येशू कशा प्रकारे देवाचे नीतिमत्त्व उंचावतो?

“[ख्रिस्ताच्या] रक्‍ताने विश्‍वासाच्या द्वारे प्रायश्‍चित्त होण्यास देवाने त्याला पुढे ठेवले, ह्‍यासाठी की, . . . त्याने आपले नीतिमत्त्व व्यक्‍त करावे.”—रोम ३:२५.

१, २. (क) मानवजातीच्या स्थितीबद्दल बायबल काय शिकवते? (ख) या लेखात कोणत्या प्रश्‍नांची चर्चा केली जाईल?

 बायबलमध्ये नमूद असलेल्या एदेन बागेतील बंडखोरीच्या वृत्तान्ताशी आपण सर्वच परिचित आहोत. शिवाय, बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे आदामाच्या पापाचे दुष्परिणामही आपल्या सर्वांना जाणवतात: “एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले; आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले.” (रोम ५:१२) त्यामुळे, जीवनात योग्य ते करण्याचा आपण कितीही प्रयत्न केला तरी आपल्या हातून चुका या होतातच. आणि म्हणूनच आपल्याला देवाच्या क्षमेची अतिशय गरज आहे. प्रेषित पौलाने देखील अत्यंत दुःखी होऊन म्हटले: “जे चांगले करावेसे मला वाटते ते मी करीत नाही; तर करावेसे वाटत नाही असे जे वाईट ते मी करितो. किती मी कष्टी माणूस!”—रोम ७:१९, २४.

आपण सर्व जन्मतःच पापी आहोत. त्यामुळे साहजिकच पुढील महत्त्वपूर्ण प्रश्‍न उपस्थित होतात: नासरेथच्या येशूचा जन्म, वारशाने मिळणाऱ्‍या पापाशिवाय कसा झाला, आणि त्याने बाप्तिस्मा का घेतला? येशूने आपल्या जीवनक्रमाद्वारे यहोवाचे नीतिमत्त्व कसे उंचावले? आणि सगळ्यात मुख्य म्हणजे, येशूच्या मृत्यूमुळे काय साध्य झाले?

देवाच्या नीतिमत्तेवर सवाल

३. सैतानाने हव्वेची फसवणूक कशी केली?

आपले मूळ पालक आदाम आणि हव्वा यांनी देवाचे सार्वभौमत्व नाकारण्याचा मूर्खपणा केला व त्याऐवजी ‘दियाबल व सैतान म्हटलेल्या जुनाट सापाची’ शासनपद्धती स्वीकारली. (प्रकटी. १२:९) हे कसे घडले ते लक्षात घ्या. यहोवा देवाची शासनपद्धती कितपत नीतिमान आहे यावर सैतानाने सवाल उपस्थित केला. त्याने हे कशा प्रकारे केले? त्याने हव्वेला विचारले: “तुम्ही बागेतल्या कोणत्याहि झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हास सांगितले हे खरे काय?” त्यावर देवाने दिलेल्या सुस्पष्ट आज्ञेचा उल्लेख करत हव्वेने म्हटले, की बागेतील एका विशिष्ट झाडाच्या फळाला त्यांनी स्पर्शही करायचा नव्हता, केल्यास ते आपला जीव गमावणार होते. सैतानाने मग देवावर खोटे बोलण्याचा आरोप लावला. “तुम्ही खरोखर मरणार नाही” असे दियाबलाने म्हटले. देव हव्वेच्या फायद्याचे काहीतरी तिच्यापासून लपवत आहे आणि मना केलेले फळ खाल्ल्यास जीवनात कोणताही निर्णय घेण्यासाठी तिला देवावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही, ती देवासारखी होईल असा विश्‍वास करण्याइतपत सैतानाने तिची फसवणूक केली.—उत्प. ३:१-५.

४. कशा प्रकारे सबंध मानवजात सैतानाच्या प्रतिस्पर्धी शासनाखाली आली?

मुळात सैतानाने असे सुचवले, की मानवजात देवापासून स्वतंत्र राहिल्यास जास्त सुखसमाधानी होऊ शकते. आदामाने देवाच्या सार्वभौमत्वाच्या नीतिमत्तेचे समर्थन करण्याऐवजी आपल्या पत्नीचे ऐकले आणि तिच्यासोबत त्यानेसुद्धा मना केलेले फळ खाल्ले. परिणामस्वरूप, आदामाने यहोवासमोरील आपली परिपूर्ण स्थिती गमावली आणि आपल्या सर्वांना पाप आणि मृत्यूच्या जुलमी ओझ्याखाली आणले. आदामाच्या पापाचा आणखी एक परिणाम म्हणजे सबंध मानवजात, ‘या जगाचा देव’ असलेल्या सैतानाच्या प्रतिस्पर्धी शासनाखाली आली.—२ करिंथ. ४:४, पं.र.भा.; रोम. ७:१४.

५. (क) यहोवा आपल्या शब्दाला कसा खरा ठरला? (ख) देवाने आदाम आणि हव्वेच्या वंशजांना कोणती आशा दिली?

यहोवा आपल्या शब्दाला खरा ठरला. त्याने आदाम आणि हव्वेवर मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली. (उत्प. ३:१६-१९) पण, याचा अर्थ देवाचा उद्देश निष्फळ ठरला होता असा नाही. उलट, यहोवाने आदाम आणि हव्वेला शिक्षा ठोठावली तेव्हा त्याने त्यांच्या वंशजांना आशेचा एक तेजस्वी किरण दाखवला. तो कसा? त्याने एक “संतति” निर्माण करण्याचा आपला उद्देश जाहीर केला. पुढे सैतान या संततीच्या टाचेवर घाव करणार होता. पण, प्रतिज्ञा केलेल्या या संततीचा घाव भरून येणार होता आणि नंतर ही संतती ‘[सैतानाचे] डोके फोडणार होती.’ (उत्प. ३:१५) येशू ख्रिस्ताविषयी पुढील माहिती देऊन बायबल या विषयावर अधिक प्रकाश टाकते: “सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र प्रगट झाला.” (१ योहा. ३:८) पण, येशूने आपल्या आचरणाद्वारे व मृत्यूद्वारे देवाचे नीतिमत्त्व कसे उंचावले?

येशूच्या बाप्तिस्म्याचा अर्थ

६. येशूला आदामापासून वारशाने पाप मिळाले नाही हे आपल्याला कसे समजते?

येशू एक प्रौढ पुरुष झाल्यानंतर, एके काळी परिपूर्ण असलेल्या आदामाच्या अगदी समतुल्य असणार होता. (रोम. ५:१४; १ करिंथ. १५:४५) त्यासाठी एक परिपूर्ण व्यक्‍ती म्हणून येशूचा जन्म होणे आवश्‍यक होते. पण, हे कसे शक्य होणार होते? गब्रीएल देवदूताने येशूची आई मरीया हिला अगदी स्पष्टपणे सांगितले: “पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करील; ह्‍या कारणाने ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र, देवाचा पुत्र, असे म्हणतील.” (लूक १:३५) येशू लहान असताना मरीयेने बहुधा त्याला त्याच्या जन्मासंबंधीच्या विशिष्ट गोष्टी सांगितल्या असाव्यात. त्यामुळेच, एकदा मरीया व येशूचा पिता, योसेफ यांना येशू देवाच्या मंदिरात सापडला तेव्हा त्या बालकाने त्यांना म्हटले: “माझ्या पित्याच्या घरात मी असावे हे तुमच्या ध्यानात आले नाही काय?” (लूक २:४९) यावरून स्पष्टच आहे, की आपण देवाचे पुत्र आहोत हे अगदी कोवळ्या वयापासून येशूला माहीत होते. म्हणूनच, देवाची नीतिमत्ता उंचावणे ही गोष्ट त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाची होती.

७. येशूजवळ कोणत्या अतिशय बहुमोल गोष्टी होत्या?

येशू नियमितपणे उपासनेच्या सभांना उपस्थित राहत असे. यावरून त्याला आध्यात्मिक गोष्टींविषयी किती आस्था होती हे दिसून येते. येशूजवळ परिपूर्ण बुद्धी होती. त्यामुळे, इब्री शास्त्रवचनांतून त्याने जे काही ऐकले, जे काही वाचले त्यातील शब्द न्‌ शब्द त्याने आत्मसात केला असावा. (लूक ४:१६) याशिवाय, त्याच्याजवळ आणखी एक अतिशय बहुमोल गोष्ट होती. ती म्हणजे, सबंध मानवजातीसाठी बलिदान म्हणून अर्पण करण्याजोगे एक परिपूर्ण मानवी शरीर. आपल्या बाप्तिस्म्याच्या वेळी प्रार्थना करत असताना येशू कदाचित स्तोत्र ४०:६-८ यातील भविष्यसूचक शब्दांचा विचार करत असावा.—लूक ३:२१; इब्री लोकांस १०:५-१० वाचा. *

८. बाप्तिस्मा देणाऱ्‍या योहानाने येशूला बाप्तिस्मा घेण्यापासून रोखण्याचा प्रयत्न का केला?

बाप्तिस्मा देणाऱ्‍या योहानाने सुरुवातीला बाप्तिस्मा घेण्यापासून येशूला रोखण्याचा प्रयत्न केला. का बरे? कारण योहान यहुदी लोकांना जो बाप्तिस्मा देत होता तो खरेतर त्यांनी नियमशास्त्राविरुद्ध केलेल्या पापाच्या पश्‍चात्तापाचे प्रतीक होता. योहान हा येशूचा जवळचा नातेवाईक होता. त्यामुळे येशू नीतिमान असून त्याला पश्‍चात्तापाची गरज नाही हे योहानाला माहीत होते. पण, बाप्तिस्मा घेणे आपल्यासाठी योग्य असल्याचे येशूने योहानाला पटवून दिले. येशूने त्याला समजावले: “ह्‍या प्रकारे सर्व धर्माचरण पूर्णपणे करणे हे आपणाला उचित आहे.”—मत्त. ३:१५.

९. येशूचा बाप्तिस्मा कशाचे प्रतीक होता?

एक परिपूर्ण मानव या नात्याने, आदामाप्रमाणेच आपल्यामध्ये देखील एका परिपूर्ण मानवजातीचा पिता बनण्याची कुवत आहे असा विचार येशू करू शकला असता. पण, अशा भवितव्याची येशूने केव्हाही इच्छा बाळगली नाही कारण त्याच्याबाबतीत यहोवाची अशी मुळीच इच्छा नव्हती. खरेतर, देवाने येशूला, प्रतिज्ञात संततीची अर्थात मशीहाची भूमिका पार पाडण्यासाठी पृथ्वीवर पाठवले होते. त्यासाठी येशूला आपल्या परिपूर्ण मानवी शरीराचे बलिदान द्यावे लागणार होते. (यशया ५३:५, ६, १२ वाचा.) अर्थात, आपल्या बाप्तिस्म्यामध्ये व येशूने घेतलेल्या बाप्तिस्म्यामध्ये फरक आहे. येशू आधीपासूनच, देवाला समर्पित असलेल्या इस्राएल राष्ट्राचा भाग होता. त्यामुळे बाप्तिस्मा घेण्याआधी यहोवाला समर्पण करण्याची त्याला गरज नव्हती. या उलट येशूचा बाप्तिस्मा, शास्त्रवचनांत सांगितल्याप्रमाणे मशीहासंबंधी देवाची जी इच्छा होती ती पूर्ण करण्यासाठी स्वतःला सादर करण्याचे प्रतीक होता.

१०. मशीहा या नात्याने देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी येशूला काय करणे गरजेचे होते आणि त्याबद्दल येशूला कसे वाटले?

१० यहोवाची इच्छा पूर्ण करण्यास स्वतःला सादर करण्याकरता येशूला देवाच्या राज्याचा प्रचार करणे, शिष्य बनवणे आणि शिष्य बनवण्याच्या कार्यासाठी आपल्या अनुयायांना प्रशिक्षित करणे गरजेचे होते. तसेच, यहोवा देवाच्या नीतिमान सार्वभौमत्वाचे समर्थन करण्यासाठी छळ सोसण्याची व यातनामय मरण पत्करण्याची तयारी दाखवणे देखील येशूला गरजेचे होते. येशूचे आपल्या स्वर्गीय पित्यावर खरे प्रेम असल्यामुळे त्याची इच्छा पूर्ण करण्यात त्याला आनंद वाटला व आपल्या शरीराचे बलिदान देण्यात त्याला मनस्वी समाधान वाटले. (योहा. १४:३१) तसेच, खंडणी म्हणून आपण देवाला आपल्या परिपूर्ण जीवनाचे मोल देऊन मानवजातीला पाप आणि मृत्यूच्या दास्यत्वातून सोडवू शकतो या जाणिवेमुळे देखील येशूला खूप आनंद झाला. या अत्यंत महत्त्वाच्या जबाबदाऱ्‍या पेलण्यासाठी येशूने स्वतःला सादर केले तेव्हा देवाने त्याचा स्वीकार केला का? नक्कीच केला!

११. प्रतिज्ञा केलेला मशीहा किंवा ख्रिस्त म्हणून यहोवाने येशूचा स्वीकार केला हे त्याने कसे दाखवले?

११ येशूचा यार्देन नदीत बाप्तिस्मा झाल्यानंतर तो पाण्यातून वर येत असताना, यहोवा देवाने अगदी सुस्पष्ट शब्दांत त्याच्याबद्दल आपली स्वीकृती दर्शवली. या गोष्टीला शुभवर्तमान लिहिणारे चारही लेखक पुष्टी देतात. बाप्तिस्मा देणाऱ्‍या योहानाने साक्ष दिली: “आत्मा कबुतरासारखा आकाशातून उतरत असताना आणि [येशूवर] स्थिर राहिलेला मी पाहिला. . . . मी स्वतः पाहिले आहे व साक्ष दिली आहे की, हा देवाचा पुत्र आहे.” (योहा. १:३२-३४) तसेच, त्या प्रसंगी खुद्द यहोवाने असे जाहीर केले: “हा माझा पुत्र, मला परमप्रिय आहे, ह्‍याच्याविषयी मी संतुष्ट आहे.”—मत्त. ३:१७; मार्क १:११; लूक ३:२२.

मृत्यूपर्यंत विश्‍वासू

१२. बाप्तिस्मा घेतल्यानंतर पुढील साडेतीन वर्षांदरम्यान येशूने काय केले?

१२ पुढील साडेतीन वर्षांदरम्यान येशूने, लोकांना आपल्या पित्याबद्दल व देवाच्या सार्वभौमत्वाच्या नीतिमत्तेबद्दल शिकवण्याच्या कार्यात स्वतःला झोकून दिले. प्रतिज्ञात देशाच्या कानाकोपऱ्‍यात पोहचण्यासाठी पायी प्रवास करत असताना तो खूप दमला. पण, सत्याबद्दल पूर्ण साक्ष देण्यापासून कोणतीही गोष्ट त्याला रोखू शकली नाही. (योहा. ४:६, ३४; १८:३७) येशूने लोकांना देवाच्या राज्याविषयी शिकवले. चमत्कारिक रीत्या लोकांचे रोग बरे करणे, भुकेल्या लोकसमुदायाला जेवू घालणे, इतकेच नव्हे तर मृतांना जिवंत करणे यांसारख्या कार्यांद्वारे, देवाचे राज्य भविष्यात मानवजातीसाठी काय साध्य करेल हे त्याने दाखवले.—मत्त. ११:४, ५.

१३. प्रार्थनेच्या बाबतीत येशूने काय शिकवले?

१३ लोकांना शिकवण्याचे व रोग्यांना बरे करण्याचे श्रेय येशूने स्वतः न घेता, आपण साध्य केलेल्या कार्यांबद्दल त्याने यहोवाची स्तुती केली. असे करण्याद्वारे, नम्रतेच्या बाबतीत त्याने एक उत्कृष्ट उदाहरण मांडले. (योहा. ५:१९; ११:४१-४४) तसेच, प्रार्थनेत आपण कोणत्या विषयांना सगळ्यात जास्त महत्त्व दिले पाहिजे हे देखील त्याने दाखवले. आपल्या प्रार्थनेत, देवाचे नाव यहोवा हे “पवित्र मानिले जावो” ही विनंती समाविष्ट असली पाहिजे. शिवाय, ‘जसे स्वर्गांत तसेच पृथ्वीवरही त्याच्या इच्छेप्रमाणे व्हावे’ म्हणून सैतानाचे दुष्ट शासन नाहीसे होऊन त्याऐवजी देवाची नीतिमान शासनपद्धती यावी अशीही विनंती आपण केली पाहिजे. (मत्त. ६:९, १०) अशा प्रार्थनांच्या अनुषंगाने आपण कार्यसुद्धा केले पाहिजे असे येशूने आर्जविले आणि त्यासाठी आपण ‘पहिल्याने [देवाचे] राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्यास झटले’ पाहिजे.—मत्त. ६:३३.

१४. येशू परिपूर्ण असला तरी देवाच्या उद्देशात असलेली त्याची भूमिका पूर्ण करण्यासाठी त्याला प्रयत्न का करावे लागले?

१४ येशूचा बलिदानरूपी मृत्यू जवळ येऊ लागला तसतशी, त्याच्यावर सोपवण्यात आलेल्या अत्यंत महत्त्वाच्या जबाबदारीची त्याला अधिकाधिक जाणीव होऊ लागली. पित्याचा उद्देश पूर्ण होण्यासाठी व त्याच्या नावाचे पवित्रीकरण होण्यासाठी येशूचा काहीएक दोष नसताना त्याला न्यायचौकशीला सामोरे जावे लागणार होते व शेवटी अत्यंत क्रूर मरण पत्करावे लागणार होते. आपल्या मृत्यूच्या पाच दिवसांआधी येशूने प्रार्थना केली: “आता माझा जीव व्याकुळ झाला आहे; मी काय बोलू? हे बापा, ह्‍या घटकेपासून माझे रक्षण कर; परंतु मी ह्‍यासाठीच ह्‍या घटकेत आलो आहे.” अशा स्वाभाविक मानवी भावना व्यक्‍त केल्यानंतर येशूने स्वतःवरून आपले लक्ष वळवून एका अधिक महत्त्वपूर्ण विषयावर केंद्रित केले. त्याने प्रार्थनेत पुढे म्हटले: “हे बापा, तू आपल्या नावाचे गौरव कर.” यावर यहोवाने लगेच उत्तर दिले: “मी ते गौरविले आहे आणि पुन्हाहि गौरवीन.” (योहा. १२:२७, २८) होय, आजवर कोणत्याही मानवाने सोसली नाही व पुढेही सोसू शकणार नाही अशी एकनिष्ठेची सगळ्यात मोठी परीक्षा सहन करण्यास येशू तयार होता. पण, आपल्या स्वर्गीय पित्याचे ते शब्द ऐकून येशूला या गोष्टीची पक्की खातरी पटली असेल की यहोवाचे सार्वभौमत्व उंचावण्यात व त्याचे समर्थन करण्यात आपण नक्कीच यशस्वी होऊ. आणि यात तो निश्‍चितच यशस्वी ठरला!

येशूच्या मृत्यूमुळे काय साध्य झाले?

१५. अखेरचा श्‍वास घेत असताना येशूने, “पूर्ण झाले आहे” असे का म्हटले?

१५ येशू वधस्तंभावर खिळलेला होता तेव्हा अखेरचा वेदनादायक श्‍वास घेताना त्याने म्हटले: “पूर्ण झाले आहे.” (योहा. १९:३०) येशूने आपल्या बाप्तिस्म्यापासून मृत्यूपर्यंत साडेतीन वर्षांदरम्यान देवाच्या मदतीने कितीतरी महान कार्ये पूर्ण किंवा साध्य केली होती. येशूचा मृत्यू झाला तेव्हा एक भयंकर भूकंप झाला आणि त्याला मृत्यूदंड देण्यासाठी नियुक्‍त केलेला रोमी शताधिपती असे म्हणण्यास प्रवृत्त झाला: “खरोखर हा देवाचा पुत्र होता.” (मत्त. २७:५४) आपण देवाचे पुत्र आहोत असे येशूने म्हटल्यामुळे लोकांनी कशा प्रकारे त्याची थट्टा केली होती हे बहुधा या शताधिपतीने स्वतः पाहिले होते. पण, सर्व काही सोसूनसुद्धा येशू शेवटपर्यंत देवाला एकनिष्ठ राहिला आणि असे करण्याद्वारे त्याने सैतान एक भयंकर लबाडखोर असल्याचे सिद्ध केले. देवाच्या सार्वभौमत्वाचे समर्थन करणाऱ्‍या प्रत्येक व्यक्‍तीविषयी सैतानाने असा दावा केला होता: “एक मनुष्य आपला जीव वाचवण्यासाठी आपले सर्वस्व देईल.” (ईयो. २:४, कंप्लीट ज्यूइश बायबल) शेवटपर्यंत देवाला विश्‍वासू राहून येशूने दाखवून दिले, की तुलनेने अतिशय सोप्या परीक्षेत आदाम व हव्वा विश्‍वासू राहू शकले असते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे येशूने आपल्या जीवनक्रमाद्वारे व मृत्यूपर्यंत विश्‍वासू राहण्याद्वारे यहोवाच्या सार्वभौमत्वाचे नीतिमत्त्व उंचावले व त्याचे समर्थन केले. (नीतिसूत्रे २७:११ वाचा.) येशूच्या मृत्यूमुळे आणखीनही काही साध्य झाले का? नक्कीच झाले!

१६, १७. (क) ख्रिस्तपूर्व काळातील साक्षीदारांना यहोवाच्या नजरेत नीतिमान असणे का शक्य झाले? (ख) यहोवाने आपल्या पुत्राच्या विश्‍वासूपणाबद्दल त्याला कोणते प्रतिफळ दिले आणि आज प्रभू येशू ख्रिस्त काय करत आहे?

१६ येशू पृथ्वीवर येण्याआधी यहोवाचे अनेक सेवक होऊन गेले. देवाच्या नजरेत ते नीतिमान होते आणि त्यांना पुनरुत्थानाची आशा देण्यात आली होती. (यश. २५:८; दानी. १२:१३) पण, पवित्र देव यहोवा कोणत्या न्यायिक आधारावर पापी मानवांना इतके अद्‌भुत आशीर्वाद बहाल करू शकत होता? याचे उत्तर बायबल असे देते: “[ख्रिस्ताच्या] रक्‍ताने विश्‍वासाच्या द्वारे प्रायश्‍चित्त होण्यास देवाने त्याला पुढे ठेवले, ह्‍यासाठी की, पूर्वी झालेल्या पापांची देवाच्या सहनशीलतेने उपेक्षा झाल्यामुळे त्याने आपले नीतिमत्त्व व्यक्‍त करावे; म्हणजे आपले नीतिमत्त्व सांप्रतकाळी असे व्यक्‍त करावे की, आपण नीतिमान्‌ असावे आणि येशूवर विश्‍वास ठेवणाऱ्‍याला नीतिमान्‌ ठरविणारे असावे.”—रोम. ३:२५, २६. *

१७ येशूने दाखवलेल्या एकनिष्ठेबद्दल यहोवाने त्याचे पुनरुत्थान केले व पृथ्वीवर येण्याआधी त्याचे जे अधिकारपद होते त्यापेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ असे अधिकारपद त्याला बहाल केले. सध्या एक गौरवशाली आत्मिक प्राणी या नात्याने येशूला अमर जीवन प्राप्त झाले आहे. (इब्री १:३) महायाजक व राजा या नात्याने प्रभू येशू ख्रिस्त आजही आपल्या अनुयायांना देवाची नीतिमत्ता उंचावण्यास मदत करतो. आणि जे आपला स्वर्गीय पिता यहोवा याचे नीतिमत्त्व उंचावतात व त्याच्या पुत्राप्रमाणे एकनिष्ठपणे त्याची उपासना करतात अशांना तो नक्कीच प्रतिफळ देईल याबद्दल आपण किती आभारी आहोत!स्तोत्र ३४:३; इब्री लोकांस ११:६ वाचा.

१८. पुढील लेखात कशाची चर्चा केली जाईल?

१८ हाबेलापासून आतापर्यंतच्या सर्व विश्‍वासू मानवांनी, प्रतिज्ञा केलेल्या संततीवर विश्‍वास व भरवसा ठेवल्यामुळे त्यांना यहोवासोबत एक निकटचा नातेसंबंध जोडणे शक्य झाले. आपला पुत्र शेवटपर्यंत आपल्याला एकनिष्ठ राहील व मृत्यूद्वारे “जगाचे पाप” पूर्णपणे झाकून टाकेल हे यहोवाला माहीत होते. (योहा. १:२९) येशूच्या मृत्यूमुळे आज हयात असलेल्या लोकांना देखील अनेक लाभ होतात. (रोम. ३:२६) तर मग, ख्रिस्ताच्या खंडणीमुळे तुम्हाला कोणते आशीर्वाद मिळू शकतात? याची चर्चा पुढील अभ्यास लेखात केली जाईल.

[तळटीपा]

^ परि. 7 या ठिकाणी प्रेषित पौल स्तोत्र ४०:६-८ या वचनांचा ग्रीक सेप्ट्यूजिन्ट अनुवादानुसार जसाच्या तसा उल्लेख करतो, ज्यात “तू माझ्यासाठी शरीर तयार केले” हे शब्द देखील आहेत. सध्या उपलब्ध असलेल्या प्राचीन इब्री शास्त्रवचनांच्या हस्तलिखितांमध्ये हा वाक्यांश आढळत नाही.

^ परि. 16 पृष्ठे ६ व ७ वरील “वाचकांचे प्रश्‍न” पाहा.

तुमचे उत्तर काय असेल?

• कशा प्रकारे देवाच्या नीतिमत्तेवर सवाल करण्यात आला?

• येशूचा बाप्तिस्मा कशाचे प्रतीक होता?

• येशूच्या मृत्यूमुळे काय साध्य झाले?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[९ पानांवरील चित्र]

येशूचा बाप्तिस्मा कशाचे प्रतीक होता हे तुम्हाला माहीत आहे का?