व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

लोकमताला बळी पडू नका

लोकमताला बळी पडू नका

लोकमताला बळी पडू नका

उचित काय किंवा अनुचित काय, प्रशंसनीय काय किंवा निंदनीय काय यांविषयीच्या कल्पना निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळ्या असतात. शिवाय, काळाच्या ओघात या कल्पना बदलतही जातात. तेव्हा, पुरातन काळात घडलेल्या घटनांविषयीचे वृत्तान्त बायबलमध्ये वाचत असताना त्यांवर स्वतःचे दर्जे लादण्याऐवजी, बायबलच्या काळात प्रचलित असलेली मते व मूल्ये लक्षात घेणे आवश्‍यक आहे.

उदाहरणार्थ, ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांमध्ये वारंवार उल्लेख करण्यात आलेल्या सन्मान आणि अपमान या दोन संकल्पनांचा विचार करा. या संकल्पनांचा उल्लेख असलेले बायबल वृत्तान्त आणखी चांगल्या प्रकारे समजून घ्यायचे असतील, तर या संकल्पनांकडे त्या काळातील लोक कोणत्या दृष्टिकोनातून पाहायचे याचा विचार करणे जरुरीचे आहे.

पहिल्या शतकातील मूल्ये

एका विद्वानाने असे म्हटले, की “ग्रीक, रोमन आणि यहुदी लोकांच्या संस्कृतींत सन्मान आणि अपमान ही अत्यंत महत्त्वाची मूल्ये मानली जायची. सन्मान, नावलौकिक, कीर्ती, मान्यता आणि आदरसत्कार मिळवण्यासाठीच लोक जगायचे आणि वेळ प्रसंगी प्राणांची आहुती द्यायलाही तयार असायचे.” अशा मूल्यांमुळे ते सहज इतरांच्या मताला बळी पडायचे.

अमीर-उमराव ते गुलाम असे निरनिराळे वर्ग असलेल्या समाजात प्रतिष्ठा, हुद्दा आणि सन्मान या गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या मानल्या जायच्या. एक व्यक्‍ती किती सन्मानित आहे हे केवळ तिच्या स्वतःच्या मतावरून नव्हे, तर तिच्याबद्दल असलेल्या समाजाच्या मतावरून देखील ठरत असे. एका व्यक्‍तीचा सन्मान करण्याचा अर्थ, ती व्यक्‍ती अपेक्षा केल्याप्रमाणे वागली ही गोष्ट सार्वजनिक रीत्या मान्य करणे असा होत असे. एखाद्या व्यक्‍तीची धनसंपत्ती, हुद्दा, किंवा कुलीनता या गोष्टींमुळे प्रभावित होऊन, त्या काळातील वहिवाटीप्रमाणे तिला महत्त्व देणे असाही सन्मान करण्याचा अर्थ होता. तसेच, सत्कर्मे करण्याद्वारे किंवा एखाद्या गोष्टीत इतरांपेक्षा वरचढ ठरण्याद्वारे सन्मान मिळवला जाऊ शकत होता. याउलट, एका व्यक्‍तीचा अपमान करण्यासोबतच, सार्वजनिक रीत्या तिची अवहेलना किंवा निंदा केली जायची. त्यामुळे, स्वतःच्या भावनांमुळे किंवा स्वतःचा विवेक दोषी ठरवत असल्यामुळे नव्हे, तर समाज तिची निंदा करत असल्यामुळे तिला अपमानित वाटायचे.

मेजवाणीच्या ठिकाणी एखाद्या व्यक्‍तीला “मुख्य आसनावर” किंवा “अगदी खालच्या जागेवर” बसवण्याबद्दल येशूने जे म्हटले, ते सन्मान किंवा अपमानाच्या बाबतीत त्या काळी अस्तित्वात असलेली संस्कृती लक्षात घेऊन म्हटले होते. (लूक १४:८-१०) कमीत कमी दोन प्रसंगी, “आपणामध्ये कोण मोठा मानला जात आहे” या विषयावरून येशूच्या शिष्यांमध्ये वाद झाला होता. (लूक ९:४६; २२:२४) ते खरेतर, त्या काळच्या समाजात प्रचलित असलेली मनोवृत्ती प्रदर्शित करत होते. त्याच काळादरम्यान, गर्विष्ठ व चढाओढ करण्याची प्रवृत्ती असलेल्या यहुदी धर्मगुरूंना, येशूचे प्रचार कार्य त्यांच्या सन्मानाला व अधिकारपदाला आव्हान देणारे वाटले. पण, लोकसमुदायासमोर त्याच्याशी वाद घालून आपला वरचढपणा सिद्ध करण्याचे त्यांचे सर्व प्रयत्न नेहमीच फोल ठरले.—लूक १३:११-१७.

पहिल्या शतकातील यहुदी, ग्रीक व रोमन समाजात आणखी एक विचारधारा प्रचलित होती. ती म्हणजे, ‘अपराध केल्याबद्दल एका व्यक्‍तीला ताब्यात घेऊन सार्वजनिक रीत्या दोषी ठरवल्यामुळे’ तिचा होणारा अपमान. एखाद्या व्यक्‍तीला पकडून तिला कैद करणे ही गोष्ट मानहानीकारक समजली जायची. अशा वागणुकीमुळे त्या व्यक्‍तीचा आपल्या मित्रांच्या, कुटुंबीयांच्या व एकूणच संपूर्ण समाजाच्या देखत अपमान व्हायचा; मग तिचा गुन्हा शाबीत झालेला असो अथवा नसो. अशा रीतीने तिच्या नावावर काळिमा फासल्यानंतर तिचा आत्मसन्मान चक्काचूर होऊन लोकांशी असलेले तिचे नातेसंबंध उद्‌ध्वस्त होण्याची शक्यता होती. पण, याहून अपमानास्पद समजली जाणारी गोष्ट म्हणजे एखाद्या व्यक्‍तीला सर्वांसमोर विवस्त्र करणे किंवा फटके मारणे. अशी वागणूक मिळणाऱ्‍या व्यक्‍तीला समाज पाण्यात पाहायचा, तिची थट्टा करायचा जेणेकरून तिचा मानसन्मान धुळीस मिळायचा.

वधस्तंभावर मारले जाणे ही सगळ्यात लज्जास्पद गोष्ट मानली जायची. मार्टिन हेन्गेल या विद्वानाच्या म्हणण्यानुसार, वधस्तंभावरील मरण ही “एका गुलामाला दिली जाणारी शिक्षा होती. म्हणूनच, अशा प्रकारच्या मरणातून घोर अपमान, मानहानी व छळ सूचित होत असे.” समाजाने अपमानित केलेल्या अशा व्यक्‍तीचा त्याग करण्याचा जबरदस्त दबाव समाज तिच्या कुटुंबीयांवर व मित्रांवर आणत असे. ख्रिस्ताला अशाच प्रकारे मारण्यात आले होते. त्यामुळे, पहिल्या शतकात त्याचे अनुयायी बनू इच्छिणाऱ्‍यांना लोकांची थट्टा सहन करावी लागली. आपण वधस्तंभावर मरण सोसलेल्या व्यक्‍तीचे अनुयायी आहोत असा कोणी दावा केल्यास बहुतेक लोकांना हे मूर्खपणाचे वाटायचे. प्रेषित पौलाने लिहिले: “आम्ही तर वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवितो; हा यहूद्यास अडखळण व हेल्लेण्यास मूर्खपणा असा आहे.” (१ करिंथ. १:२३) मग, या आव्हानाला सुरुवातीच्या ख्रिश्‍चनांनी कसे तोंड दिले?

सर्वस्वी निराळी मूल्ये

पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांनी कायद्याचे पालन केले व वाईट आचरण केल्यामुळे होणारा अपमान टाळण्याचा प्रयत्न केला. प्रेषित पेत्राने लिहिले: “खून करणारा, चोर, दुष्कर्मी, किंवा दुसऱ्‍याच्या कामात ढवळाढवळ करणारा असे होऊन कोणी दुःख भोगू नये.” (१ पेत्र ४:१५) पण, आपल्या अनुयायांना आपल्या नावामुळे छळ सहन करावा लागेल हे येशूने आधीच सांगितले होते. (योहा. १५:२०) पेत्राने लिहिले: ‘ख्रिस्ती ह्‍या नात्याने कोणाला दुःख सहन करावे लागत असेल तर त्याला लाज वाटू नये; तर त्याने देवाचे गौरव करावे.’ (१ पेत्र ४:१६) ख्रिस्ताचे अनुयायी असल्यामुळे सोसाव्या लागणाऱ्‍या छळाबद्दल लाज न वाटण्याचा अर्थ त्या काळातील प्रस्थापित मूल्ये झुगारून देणे असा होता.

आपण इतर लोकांच्या दर्जांनुसार वागत नाही म्हणून लोक काय म्हणतील याचा खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी विचार केला नाही. वधस्तंभावर मरण सोसलेल्या व्यक्‍तीला मशीहा मानणे पहिल्या शतकातील समाजात मूर्खपणाचे मानले जायचे. समाजाच्या या दृष्टिकोनामुळे, त्या काळी प्रचलित असलेल्या सर्वसामान्य विचारसरणीनुसार वागण्याचा दबाव खऱ्‍या ख्रिश्‍चनांवर आला असावा. पण, येशू हाच मशीहा असल्याचा आपला विश्‍वास व्यक्‍त करण्यासाठी त्यांना त्याचे अनुसरण करणे आवश्‍यक होते; मग त्यासाठी लोकांनी त्यांची कितीही थट्टा केली तरी असे करणे जरुरीचे होते. येशूने म्हटले: “ह्‍या व्यभिचारी व पापी पिढीमध्ये ज्या कोणाला माझी व माझ्या वचनांची लाज वाटेल, त्याची लाज मनुष्याचा पुत्र पवित्र देवदूतांसहित आपल्या पित्याच्या गौरवाने येईल तेव्हा त्यालाहि वाटेल.”—मार्क ८:३८.

आपण आपल्या ख्रिस्ती विश्‍वासाचा त्याग करावा म्हणून आज आपल्यालाही अनेक दबावांना तोंड द्यावे लागू शकते. हे दबाव, आपल्याला अनैतिक, अप्रामाणिक किंवा इतर अनुचित कृत्यांत गोवण्याचा प्रयत्न करणाऱ्‍या शाळेतील मित्रांकडून, शेजाऱ्‍यांकडून किंवा सहकर्मचाऱ्‍यांकडून येऊ शकतात. पण, याबाबतीत आपण बायबल तत्त्वांना अनुसरून खंबीर भूमिका घेतो तेव्हा असे लोक आपल्याला अपमानित करण्याचा प्रयत्न करू शकतात. अशा वेळी आपली प्रतिक्रिया काय असावी?

लज्जा तुच्छ मानणाऱ्‍यांचे अनुकरण करा

यहोवाला एकनिष्ठ राहण्याकरता येशूने सगळ्यात अपमानास्पद मरण सोसले. “त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला.” (इब्री १२:२) येशूच्या शत्रूंनी त्याला चपडाका मारल्या, त्याच्यावर थुंकले, त्याचे वस्त्र काढले, त्याला फटके मारले, त्याला वधस्तंभावर खिळले व त्याची निंदा केली. (मार्क १४:६५; १५:२९-३२) अशा रीतीने शत्रूंनी त्याला लज्जित करण्याचा व इतरांच्या नजरेत त्याला अपमानित करण्याचा प्रयत्न केला. पण, त्याने ही सर्व लज्जा तुच्छ मानली. ती कशी? त्याला दिलेल्या वागणुकीमुळे खचून न जाण्याद्वारे. देवाच्या नजरेत आपला सन्मान किंचितही कमी झाला नाही हे येशूला माहीत होते आणि त्याने लोकांकडून गौरव मिळवण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. येशूला एका गुलामासारखे मरण सोसावे लागले, तरी यहोवाने त्याचे पुनरुत्थान करून व त्याला आपल्याशेजारी सर्वात मानाचे स्थान देऊन सन्मानित केले. फिलिप्पैकर २:८-११ म्हणते: “[ख्रिस्त येशूने] मरण, आणि तेहि वधस्तंभावरचे मरण सोसले; येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. ह्‍यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले, आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले; ह्‍यात हेतु हा की, स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा, आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभु आहे असे कबूल करावे.”

आपल्या मृत्यूमुळे होणाऱ्‍या अपमानाची येशूला जाणीव नव्हती असे नाही. देवाची निंदा केल्याच्या आरोपामुळे त्याच्या पित्याचा किती अपमान होणार होता याची देवाच्या पुत्राला सगळ्यात जास्त चिंता होती. अशा अपमानापासून यहोवाने आपल्याला वाचवावे अशी विनंती त्याने केली. त्याने प्रार्थना केली: “हा प्याला माझ्यापासून दूर कर.” पण, त्याच्यासंबंधी देवाची जी इच्छा होती ती त्याने स्वीकारली. (मार्क १४:३६) असे असले, तरी त्याच्यावर आणलेल्या दबावांचा त्याने यशस्वीपणे प्रतिकार करून लज्जा तुच्छ मानली. शेवटी, त्या काळातील मूल्यांशी पूर्णपणे समरूप झालेल्या लोकांनाच अशा वागणुकीमुळे अपमानित झाल्यासारखे वाटू शकत होते. पण, येशू मात्र त्याच्या काळातील मूल्यांशी समरूप झाला नाही हे स्पष्टपणे दिसून येते.

येशूच्या शिष्यांनाही अटक करून त्यांना मारहाण करण्यात आली होती. अशा वागणुकीमुळे ते बहुतेक लोकांच्या नजरेत अपमानित झाले. त्यांना पाण्यात पाहिले गेले व त्यांना तुच्छ लेखले गेले. पण, ते खचून गेले नाहीत. उलट, लोक काय म्हणतील या दबावाचा प्रतिकार करून येशूच्या खऱ्‍या शिष्यांनी लज्जा तुच्छ मानली. (मत्त. १०:१७; प्रे. कृत्ये ५:४०; २ करिंथ. ११:२३-२५) आपल्याला ‘आपला वधस्तंभ उचलून निरंतर येशूचे अनुसरण’ करावे लागेल हे त्यांना माहीत होते.—लूक ९:२३, २६.

आज आपल्याबद्दल काय? जगाच्या दृष्टिकोनात ज्या गोष्टी मूर्खपणाच्या, दुर्बळ किंवा क्षुद्र आहेत, त्या देवाच्या नजरेत मात्र सुज्ञपणाच्या, शक्‍तीशाली व सन्माननीय आहेत. (१ करिंथ. १:२५-२८) तेव्हा, लोकमतामुळे पूर्णपणे प्रभावित होणे मूर्खपणाचे व अदूरदर्शीपणाचे ठरणार नाही का?

लोकांनी आपला सन्मान करावा अशी इच्छा बाळगणारे लोक, इतर जण काय म्हणतील याचाच सगळ्यात जास्त विचार करतात. याउलट, येशू व पहिल्या शतकातील त्याचे अनुयायी यांच्याप्रमाणे आपण यहोवाशी मैत्री करू इच्छितो. तेव्हा, सन्मान व अपमान यांच्या बाबतीत यहोवाचा जो दृष्टिकोन आहे तोच दृष्टिकोन आपणही बाळगू या.

[४ पानांवरील चित्र]

येशूने अपमानाच्या बाबतीत असलेल्या जगाच्या दृष्टिकोनाचा स्वतःवर प्रभाव पडू दिला नाही