व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वक्‍तशीर का असावे?

वक्‍तशीर का असावे?

वक्‍तशीर का असावे?

वक्‍तशीर असणे किंवा एखाद्या ठिकाणी वेळेवर पोहचणे नेहमीच सोपे नसते. लांबचा प्रवास, वाहतूक कोंडी व धावपळीचे जीवन यांमुळे वेळेवर पोहचणे मुश्‍कील होऊ शकते. असे असले, तरी कोठेही वेळेवर पोहचणे अत्यंत महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ, कामावर नेहमी वेळेवर पोहचणारी व्यक्‍ती भरवशालायक व मेहनती आहे असे समजले जाते. याउलट, कामावर सहसा उशिरा येणारी व्यक्‍ती इतरांच्या कामात अडथळा निर्माण करू शकते. इतकेच नव्हे, तर तिच्या उशिरा येण्याचा कामावर व सेवेच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम होऊ शकतो. शाळा-कॉलेजात उशिरा गेल्यामुळे मुलांचे काही तास बुडू शकतात आणि यामुळे साहजिकच मुले अभ्यासात मागे पडतात. डॉक्टरांनी दिलेल्या अपॉइन्टमेन्टला वेळेवर न पोहचल्यास योग्य उपचार मिळण्याची शक्यता कमी असते.

पण, काही ठिकाणी मात्र वक्‍तशीरपणाला इतके महत्त्व दिले जात नाही. अशा वातावरणात राहणाऱ्‍या व्यक्‍तीला कोठेही उशिरा पोहचण्याची सवय सहज लागू शकते. अशी सवय आपल्याला असल्यास, नेहमी वेळेवर पोहचण्याची इच्छा स्वतःमध्ये उत्पन्‍न करणे अत्यंत जरुरीचे आहे. वक्‍तशीर असणे किती महत्त्वाचे आहे हे जाणून घेतल्याने वेळेवर पोहचण्यास आपल्याला नक्कीच मदत होऊ शकते. आपण वक्‍तशीर का असले पाहिजे? वक्‍तशीर असण्याच्या आव्हानावर आपण मात कशी करू शकतो? आणि वक्‍तशीर असल्यामुळे आपल्याला कोणते फायदे होऊ शकतात?

यहोवा—वक्‍तशीर देव

वक्‍तशीर असण्याचे सगळ्यात प्रमुख कारण म्हणजे आपण ज्या देवाची उपासना करतो त्याचे आपण अनुकरण करू इच्छितो. (इफिस. ५:१) वक्‍तशीरपणाच्या बाबतीत यहोवा सर्वोत्तम उदाहरण मांडतो. तो केव्हाही उशीर करत नाही. आपला उद्देश साध्य करण्यासाठी तो आपल्या वेळापत्रकाचे अगदी काटेकोर पालन करतो. उदाहरणार्थ, यहोवाने दुष्ट लोकांचा जलप्रलयाद्वारे नाश करण्याचे ठरवले तेव्हा त्याने नोहाला म्हटले: “तू आपल्यासाठी गोफेर लाकडाचे तारू कर.” नाशाचा दिवस जवळ आला तेव्हा यहोवाने नोहाला तारवात जाण्यास सांगितले व म्हटले: “अजून सात दिवसांचा अवकाश आहे; मग मी चाळीस दिवस व चाळीस रात्री पृथ्वीवर पर्जन्य पाडणार, आणि मी केलेले सर्व काही भूतलावरून नाहीसे करणार.” मग, अगदी उचित समयी, “सात दिवसांनंतर प्रलयाचे पाणी पृथ्वीवर आले.” (उत्प. ६:१४; ७:४, १०) नोहा व त्याचे कुटुंब वेळेवर तारवात गेले नसते, तर त्यांचे काय झाले असते याचा विचार करा. ते ज्या देवाची उपासना करत होते त्याच्याप्रमाणेच त्यांनीही वक्‍तशीर असणे जरुरीचे होते.

जलप्रलयाच्या सुमारे ४५० वर्षांनंतर, यहोवाने कुलपिता अब्राहामाला असे सांगितले, की त्याला एक पुत्र होईल आणि त्याच्याद्वारे पुढे प्रतिज्ञात संततीचा जन्म होईल. (उत्प. १७:१५-१७) देवाने म्हटले, “पुढल्या वर्षी याच वेळी” इसहाकाचा जन्म होईल. असे घडले का? बायबल आपल्याला सांगते: “सारा गर्भवती झाली; देवाने सांगितलेल्या समयी अब्राहामाला म्हातारपणी तिजपासून मुलगा झाला.”—उत्प. १७:२१; २१:२.

बायबलमध्ये अशी असंख्य उदाहरणे आहेत ज्यांतून देवाचा वक्‍तशीरपणा दिसून येतो. (यिर्म. २५:११-१३; दानी. ४:२०-२५; ९:२५) आपण पुढे येणाऱ्‍या यहोवाच्या न्यायाच्या दिवसाची वाट पाहत राहावी असे बायबल आपल्याला सांगते. मानवी दृष्टिकोनातून त्यास “विलंब” होत आहे असे वाटत असले, तरी आपल्याला अशी खातरी देण्यात आली आहे, की “त्याला, विलंब लागावयाचा नाही.”—हब. २:३.

उपासनेत वक्‍तशीरपणा महत्त्वाचा

सर्व इस्राएल लोकांना, ‘पवित्र मेळ्याच्या दिवशी’ ठरलेल्या ठिकाणी व नियुक्‍त वेळी उपस्थित राहणे आवश्‍यक होते. (लेवी. २३:२, ४) कोणत्या वेळी, कोणती अर्पणे दिली जावीत हे देखील देवाने आधीच ठरवले होते. (निर्ग. २९:३८, ३९; लेवी. २३:३७, ३८) यावरून, आपल्या उपासकांनी उपासनेसाठी वेळेवर उपस्थित राहावे अशी यहोवा त्यांच्याकडून अपेक्षा करतो हे दिसून येत नाही का?

पहिल्या शतकात, ख्रिस्ती सभा कशा भरवल्या जाव्यात याबद्दल करिंथकरांना मार्गदर्शन देताना, प्रेषित पौलाने त्यांना असे आर्जवले: “सर्व काही शिस्तवार व व्यवस्थितपणे होऊ द्या.” (१ करिंथ. १४:४०) या सल्ल्यानुसार, उपासनेसाठी भरवल्या जाणाऱ्‍या ख्रिस्ती सभा नियुक्‍त वेळी सुरू होणे आवश्‍यक होते. वक्‍तशीरपणाच्या बाबतीत आजही यहोवाचा तोच दृष्टिकोन आहे. (मला. ३:६) तर मग, ख्रिस्ती सभांना वेळेवर उपस्थित राहण्यासाठी आपण कोणती पावले उचलली पाहिजेत?

वक्‍तशीर असण्याच्या आव्हानावर मात करणे

पूर्वनियोजन करणे किती फायदेकारक असू शकते हे अनेकांनी अनुभवले आहे. उदाहरणार्थ, अमुक एका ठिकाणी, अमुक वेळी पोहचण्यासाठी आपल्याला दूरचा प्रवास करावा लागणार असेल, तर त्या ठिकाणी आपण अगदी ऐन वेळी पोहचू अशा रीतीने आपण प्रवासाचे नियोजन करणार का? थोडे लवकर निघणे बुद्धिमानीचे ठरणार नाही का? त्यामुळे प्रवासात एखादा अनपेक्षित “प्रसंग” उद्‌भवला तरी त्यातून सावरून वेळेवर इच्छित स्थळी पोहचणे आपल्याला शक्य होईल. (उप. ९:११, पं.र.भा) होसे नावाचा एक वक्‍तशीर तरुण म्हणतो: “कोठेही वेळेवर पोहचायचे असल्यास, प्रवासाला किती वेळ लागेल याचा अंदाज बांधून पुरेशा वेळेआधी प्रवासाला निघणे केव्हाही चांगले.” *

ख्रिस्ती सभा सुरू होण्याआधी राज्य सभागृहात पोहचणे शक्य व्हावे म्हणून काहींना कामावरून पुरेशा वेळेआधी निघण्यासाठी काही योजना करणे आवश्‍यक असेल. इथियोपियातील एका साक्षीदार बांधवाने नेमके हेच केले. शिफ्ट ड्युटीमुळे आपण मंडळीच्या सभांना ४५ मिनिटे उशिरा पोहचू असे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे, सभांच्या दिवशी कामावरून लवकर निघता यावे म्हणून आपल्या सहकर्मचाऱ्‍याने लवकर कामावर येण्याची व्यवस्था बांधवाने केली. बदल्यात या कर्मचारी मित्रासाठी बांधवाने सात तासाची जादा शिफ्ट करण्याची तयारी दाखवली.

घरात लहान मुले असल्यास सभांना वेळेवर पोहचणे मुश्‍कील होऊ शकते. मुलांना तयार करण्याची जबाबदारी सहसा आईवर पडत असली, तरी कुटुंबातील इतर सदस्यही मदत करू शकतात. किंबहुना, त्यांनी मदत केलीच पाहिजे. मेक्सिकोतील एस्परान्झा नावाच्या एका स्त्रीने एकटीने आठ मुलांना वाढवले आहे. आता तिची मुले ५ ते २३ वर्षे वयोगटातील आहेत. आपल्या कुटुंबाला वेळेवर ख्रिस्ती सभांना पोहचणे कसे शक्य होते याविषयी ती सांगते: “माझ्या मोठ्या मुली लहान भावंडांना सभांसाठी तयार करतात. यामुळे मला घरातली कामं उरकण्यासाठी आणि तयार होण्यासाठी वेळ मिळतो, जेणेकरून आम्हाला ठरलेल्या वेळी घरातून निघणं शक्य होतं.” या कुटुंबाने सभांसाठी ठरलेल्या वेळी घरातून बाहेर पडण्याचे ठरवले आहे आणि घरातील सगळेच जण याबाबतीत सहकार्य करतात.

सभांना वेळेवर पोहचण्याचे फायदे

ख्रिस्ती सभांना वेळेवर पोहचल्यामुळे किती फायदे होतात याचा विचार केल्याने, काहीही झाले तरी सभांना वेळेवर उपस्थित राहण्याची आपली इच्छा व निर्धार आणखी दृढ होऊ शकतो. सॅन्ड्रा नावाच्या एका तरुणीने सभांना पुरेशा वेळेआधी पोहचण्याची स्वतःला सवय लावली आहे. त्याविषयी ती म्हणते, “सभांना लवकर जाण्याविषयी एक गोष्ट मला खूप आवडते. ती म्हणजे मला मंडळीतील बंधुभगिनींना भेटण्याची, त्यांच्याशी बोलण्याची व त्यांना आणखी चांगल्या प्रकारे जाणून घेण्याची संधी मिळते.” आपण राज्य सभागृहात लवकर पोहचतो तेव्हा तेथे उपस्थित असलेले बंधुभगिनी कशा प्रकारे देवाची सेवा चिकाटीने व विश्‍वासूपणे करत आले आहेत याविषयी ऐकून आपल्याला खूप लाभ होऊ शकतो. सभांमधील आपल्या उपस्थितीमुळे व उभारणीकारक संभाषणामुळे आपण स्वतः देखील आपल्या बंधुभगिनींना “प्रीति व सत्कर्मे करावयास उत्तेजन” देऊन त्यांच्यावर सकारात्मक प्रभाव पाडू शकतो.—इब्री १०:२४, २५.

आपल्या उपासनेचा एक अविभाज्य भाग म्हणजे गीत आणि प्रार्थना. त्यामुळे प्रत्येक ख्रिस्ती सभेची सुरुवात गीत व प्रार्थनेने होते. (स्तो. १४९:१) सभांमध्ये आपण जी गीते गातो त्यांमुळे यहोवाची स्तुती होते. तसेच, आपण आपल्या व्यक्‍तिमत्त्वात कोणते गुण विकसित केले पाहिजेत याची आपल्याला आठवण करून दिली जाते. इतकेच नव्हे, तर सेवाकार्यात उत्साहाने सहभाग घेण्याची प्रेरणाही गीतांमुळे आपल्याला मिळते. पण, सभांच्या सुरुवातीला केल्या जाणाऱ्‍या प्रार्थनेविषयी काय? यहोवाने प्राचीन काळच्या मंदिराला “प्रार्थनामंदिर” असे म्हटले होते. (यश. ५६:७) आज, देवाला प्रार्थना करण्यासाठी आपण सभांमध्ये एकत्र येतो. सभांच्या सुरुवातीला केल्या जाणाऱ्‍या प्रार्थनेत केवळ यहोवाच्या मार्गदर्शनासाठी व पवित्र आत्म्यासाठीच विनंती केली जात नाही, तर सभांमध्ये जी माहिती सादर केली जाणार आहे ती ग्रहण करण्यास आपल्या मनाची तयारी करण्यासाठी देखील विनंती केली जाते. तेव्हा, सुरुवातीचे गीत व प्रार्थना यांसाठी वेळेवर सभांना येण्याचा आपण दृढनिश्‍चय केला पाहिजे.

तेवीस वर्षांची हेलन सभांना लवकर का येते याचे कारण सांगताना ती म्हणते: “मला असं वाटतं, की यहोवावर माझं किती प्रेम आहे हे दाखवण्याचा हा एक मार्ग आहे. कारण सभांमध्ये पुरवली जाणारी सर्व माहिती यहोवाच पुरवतो. यात गीत आणि सुरुवातीच्या प्रार्थनेचा देखील समावेश होतो.” याबाबतीत आपलाही दृष्टिकोन असाच असू नये का? नक्कीच असला पाहिजे. तर मग, सर्व बाबतीत आणि विषेशकरून खऱ्‍या देवाच्या उपासनेच्या बाबतीत नेहमी वक्‍तशीर असण्याचा आपण सतत प्रयत्न करू या.

[तळटीप]

^ परि. 12 नावे बदलण्यात आली आहेत.

[२६ पानांवरील चित्र]

पूर्वनियोजन करा

[२६ पानांवरील चित्र]

अनपेक्षित ‘प्रसंगातून’ सावरण्यासाठी पुरेसा वेळ द्या

[२६ पानांवरील चित्रे]

सभांना लवकर येण्याचे फायदे अनुभवा