व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

पाप करणारी म्हणून बदनाम असलेल्या एका स्त्रीला, “तुझ्या पापांची क्षमा झाली आहे” असे येशू का म्हणू शकला?—लूक ७:३७, ४८.

शिमोन नावाच्या एका परूश्‍याच्या घरी येशू जेवायला बसला असताना एक स्त्री “त्याच्या पायाशी मागे रडत उभी राहिली.” तिने त्याचे पाय आपल्या अश्रूंनी भिजवले आणि आपल्या डोक्याच्या केसांनी ते पुसले. नंतर, तिने त्याच्या पायांचे मुके घेतले आणि त्यांना सुगंधी तेल लावले. ती एक “पापी स्त्री” असल्याचे गावातील लोकांना माहीत होते असे शुभवर्तमानात सांगितले आहे. अर्थात, प्रत्येक अपरिपूर्ण मनुष्य हा पापी आहे. पण, बायबलमध्ये सहसा पापी हा शब्द अशा व्यक्‍तीचे वर्णन करण्याकरता वापरण्यात आला आहे जिचे पाप सर्वांना माहीत असतात किंवा जी पाप करणारी म्हणून बदनाम असते. बहुधा, ती स्त्री एक वेश्‍या होती. अशा स्त्रीला येशू म्हणाला: “तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.” (लूक ७:३६-३८, ४८) येशू जे म्हणाला त्याचा काय अर्थ होता? तोपर्यंत खंडणी बलिदान दिले गेले नव्हते, तर मग तिच्या पापांची क्षमा होणे कसे शक्य होते?

त्या स्त्रीने येशूचे पाय धुवून त्यांस तैलाभ्यंग केल्यानंतर, पण येशूने तिला क्षमा करण्याआधी त्याने आपल्या यजमानाला अर्थात शिमोनाला एक महत्त्वाचा मुद्दा समजावण्यासाठी एक उदाहरण दिले. त्याने पापाची तुलना, परतफेड करणे अशक्य असलेल्या एका मोठ्या कर्जाशी करत शिमोनाला म्हटले: “एका सावकाराचे दोन कर्जदार होते; एकाला पाचशे रुपये देणे होते व एकाला पन्‍नास होते. देणे फेडावयास त्याच्याजवळ काही नव्हते म्हणून त्याने त्या दोघांस ते सोडले. तर त्यातून कोणता त्याच्यावर अधिक प्रीति करील?” शिमोनाने उत्तर दिले: “ज्याला अधिक सोडले तो, असे मला वाटते.” त्यावर येशू म्हणाला: “बरोबर ठरविले.” (लूक ७:४१-४३) आपल्यालाही देवाचे काही देणे आहे आणि ते म्हणजे आज्ञाधारकता. त्यामुळे आपण त्याची अवज्ञा करतो व पाप करतो, तेव्हा आपण त्याचे कर्ज बुडवतो. अशा प्रकारे आपल्यावरचे कर्ज वाढत जाते. पण, यहोवा अशा एका सावकाराप्रमाणे आहे जो आपले कर्ज माफ करण्यास तयार असतो. म्हणूनच, येशूने आपल्या अनुयायांना प्रार्थनेत देवाला अशी विनंती करण्यास सांगितले: “जसे आम्ही आपल्या ऋण्यांस ऋण सोडिले आहे तशी तू आमची ऋणे आम्हास सोड.” (मत्त. ६:१२) ही ऋणे म्हणजेच पाप असल्याचे लूक ११:४ मध्ये सांगितले आहे.

गतकाळात देवाने कोणत्या अटींवर पापांची क्षमा केली होती? देवाच्या परिपूर्ण न्यायानुसार पापाचा दंड मृत्यू आहे. म्हणूनच आदामाने पाप केले तेव्हा त्याने आपले जीवन गमावले. पण, देवाने इस्राएल राष्ट्राला दिलेल्या नियमशास्त्रानुसार एक अपराधी व्यक्‍ती प्राण्यांचे अर्पण देऊन आपल्या पापांची क्षमा मिळवू शकत होती. प्रेषित पौलाने सांगितले: “नियमशास्त्राप्रमाणे रक्‍ताने बहुतेक सर्व काही शुद्ध होते, आणि रक्‍त ओतल्यावाचून पापक्षमा होत नाही.” (इब्री ९:२२) देवाकडून आपल्या पापांची क्षमा मिळवण्याचा हाच एक मार्ग यहुदी लोकांना माहीत होता. म्हणूनच येशूने त्या स्त्रीला उद्देशून जे काही म्हटले त्यावर तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी आक्षेप घेतला याचे आपल्याला आश्‍चर्य वाटू नये. त्याच्याबरोबर भोजनास बसलेले आपसात म्हणू लागले: “पापांची क्षमा देखील करणारा हा कोण?” (लूक ७:४९) तर मग, कशाच्या आधारावर अतिशय पापी असलेल्या त्या स्त्रीच्या पापांची क्षमा होणे शक्य होते?

पहिल्या मानवी जोडप्याने यहोवाविरुद्ध बंड केले तेव्हा त्याने सर्वात पहिली भविष्यवाणी केली. त्या भविष्यवाणीत यहोवाने एक “संतति” उत्पन्‍न करण्याचा आपला उद्देश जाहीर केला. या संततीची टाच, सैतान व त्याच्या ‘संततीद्वारे’ फोडली जाणार होती. (उत्प. ३:१५) देवाच्या शत्रूंनी येशूचा वध केला तेव्हा संततीची टाच फोडण्यात आली. (गलती. ३:१३, १६) ख्रिस्ताचे सांडलेले रक्‍त खंडणी असून तिच्याद्वारे पाप आणि मृत्यूपासून मानवजातीची सुटका होते. यहोवाला आपला उद्देश पूर्ण करण्यापासून कोणतीही गोष्ट रोखू शकत नाही. त्यामुळे, यहोवाने उत्पत्ति ३:१५ मधील शब्द उच्चारले त्याच क्षणी जणू त्याच्या दृष्टिकोनातून खंडणीची किंमत देण्यात आली होती. म्हणूनच, देवाच्या अभिवचनांवर विश्‍वास ठेवणाऱ्‍यांना तो क्षमा करू शकत होता.

यहोवाने ख्रिस्तपूर्व काळातील अनेक व्यक्‍तींना नीतिमान गणले होते. हनोख, नोहा, अब्राहाम, राहाब, आणि ईयोब हे त्यांपैकी काही जण आहेत. आपल्या विश्‍वासामुळेच देवाने दिलेली अभिवचने पूर्ण होण्याची ते वाट पाहत होते. शिष्य याकोबाने लिहिले: “अब्राहामाने देवावर विश्‍वास ठेवला, आणि ते त्याला नीतिमत्त्व असे गणण्यात आले.” राहाबेबद्दल याकोब म्हणाला: ‘तसेच राहाब वेश्‍या देखील आपल्या क्रियांनी नीतिमान्‌ ठरली नाही काय?’—याको. २:२१-२५.

प्राचीन इस्राएलच्या दावीद राजानेसुद्धा अनेक गंभीर पाप केले होते. पण त्याचा खऱ्‍या देवावर दृढ विश्‍वास होता आणि त्याने पाप केले त्या प्रत्येक वेळी त्याने मनापासून पश्‍चाताप केला. शिवाय, बायबल म्हणते: “[येशूच्या] रक्‍ताने विश्‍वासाच्या द्वारे प्रायश्‍चित्त होण्यास देवाने त्याला पुढे ठेवले, ह्‍यासाठी की, पूर्वी झालेल्या पापांची देवाच्या सहनशीलतेने उपेक्षा झाल्यामुळे त्याने आपले नीतिमत्त्व व्यक्‍त करावे; म्हणजे आपले नीतिमत्त्व सांप्रतकाळी असे व्यक्‍त करावे की, आपण नीतिमान्‌ असावे आणि येशूवर विश्‍वास ठेवणाऱ्‍याला नीतिमान्‌ ठरविणारे असावे.” (रोम. ३:२५, २६) भविष्यात दिल्या जाणाऱ्‍या येशूच्या खंडणी बलिदानाच्या आधारावर, यहोवा आपल्या परिपूर्ण न्यायाशी तडजोड न करता दाविदाच्या पापांची क्षमा करू शकला.

येशूच्या पायांना तैलाभ्यंग केलेल्या त्या स्त्रीची स्थिती बहुधा अशीच होती. पूर्वी ती अनैतिक जीवन जगत होती, पण तिने पश्‍चाताप केला होता. तिने पापापासून सुटका मिळवण्याची गरज ओळखली आणि यहोवाने ज्या व्यक्‍तीद्वारे या सुटकेची तरतूद केली होती तिच्याबद्दल तिला मनस्वी कृतज्ञता वाटते हे तिने आपल्या कार्यांतून दाखवले. भविष्यात दिले जाणारे खंडणी बलिदान इतके निश्‍चित होते की, खंडणी देण्याआधीच त्याचे मोल या स्त्रीसारख्या व्यक्‍तींना लागू केले जाऊ शकत होते. म्हणूनच येशू तिला म्हणाला: “तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.”

या वृत्तान्तावरून स्पष्टपणे दिसून येते की, येशूने पापी व्यक्‍तींना टाळले नाही. उलट त्याने त्यांचे भले केले. इतकेच नव्हे, तर यहोवासुद्धा पश्‍चात्ताप दाखवणाऱ्‍या पापी व्यक्‍तींना क्षमा करण्यास तयार असतो. आपल्यासारख्या अपरिपूर्ण मानवांसाठी हे किती अद्‌भुत व दिलासादायक आश्‍वासन आहे!

[७ पानांवरील चित्र]

यहोवाच्या नजरेत हे सर्व नीतिमान होते