व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

खऱ्‍या ख्रिश्‍चनांमधील ऐक्यामुळे देवाचा गौरव होतो

खऱ्‍या ख्रिश्‍चनांमधील ऐक्यामुळे देवाचा गौरव होतो

खऱ्‍या ख्रिश्‍चनांमधील ऐक्यामुळे देवाचा गौरव होतो

‘आत्म्याच्याद्वारे घडून आलेले ऐक्य राखावयास झटा.’—इफिस. ४:३.

१. पहिल्या शतकातील इफिस मंडळीतील ख्रिश्‍चनांनी कशा प्रकारे देवाचा गौरव केला?

 प्राचीन इफिस शहरातील ख्रिस्ती मंडळीने त्यांच्यातील ऐक्याद्वारे खरा देव, यहोवा याचा गौरव केला होता. भरभराटीचे व्यापारी केंद्र असलेल्या त्या शहरात राहणाऱ्‍या काही ख्रिस्ती बांधवांजवळ बहुधा त्यांचे स्वतःचे गुलाम असून ते श्रीमंत होते, तर इतर बांधव खुद्द गुलाम असून अतिशय गरीब होते. (इफिस. ६:५, ९) या मंडळीतील काही जण यहुदी होते आणि पौलाने तीन महिने सभास्थानात शिक्षण दिले त्यादरम्यान ते सत्यात आले होते. इतर काही जण पूर्वी अर्तमी देवीचे उपासक व जादूटोणा करणारे होते. (प्रे. कृत्ये १९:८, १९, २६) यावरून स्पष्टपणे दिसून येते, की खऱ्‍या ख्रिस्ती धर्माने निरनिराळी पार्श्‍वभूमी असलेल्या लोकांना एकत्र आणले होते. इफिस मंडळीतील या ऐक्यामुळे यहोवाचा गौरव झाला होता याची पौलाला जाणीव होती. म्हणूनच पौलाने लिहिले: ‘त्याला मंडळीमध्ये गौरव असो.’—इफिस. ३:२१.

२. इफिस मंडळीतील ऐक्य कशामुळे धोक्यात आले होते?

पण, इफिस मंडळीतील हे ऐक्य धोक्यात आले होते. त्यामुळे पौलाने त्या मंडळीतील वडिलांना इशारा दिला: “तुम्हापैकीहि काही माणसे उठून शिष्यांना आपल्यामागे ओढून घेण्यासाठी विपरीत गोष्टी बोलतील.” (प्रे. कृत्ये २०:३०) शिवाय, ‘आज्ञा मोडणाऱ्‍या लोकांत कार्य करणाऱ्‍या’ ज्या प्रवृत्तीबद्दल पौलाने ताकीद दिली होती, ती फुटी निर्माण करणारी प्रवृत्ती काही बांधवांनी अजूनही पूर्णपणे सोडून दिली नव्हती.—इफिस. २:२; ४:२२.

ऐक्यावर भर देणारे पत्र

३, ४. पौलाने इफिसकरांस लिहिलेल्या पत्रात कशा प्रकारे ऐक्यावर भर दिला?

पौलाला याची जाणीव होती, की एकमेकांशी सहकार्य करत राहण्यासाठी प्रत्येक ख्रिश्‍चनाने मंडळीतील ऐक्य वाढीस लावण्याकरता झटून प्रयत्न केला पाहिजे. देवाने पौलाला एक पत्र लिहिण्यास प्रेरित केले, ज्याचा संपूर्ण रोख मंडळीतील एकतेवर होता. उदाहरणार्थ, ‘ख्रिस्तामध्ये सर्व एकत्र करण्याच्या’ देवाच्या उद्देशाविषयी पौलाने लिहिले. (इफिस. १:१०) तसेच, त्याने ख्रिश्‍चनांची तुलना इमारतीच्या बांधकामात वापरण्यात येणाऱ्‍या निरनिराळ्या शिलांशी केली. त्याने लिहिले: “त्याच्यामध्ये सबंध इमारत जोडून रचली असता प्रभूच्या ठायी वाढत वाढत पवित्र मंदिर होते.” (इफिस. २:२०, २१) त्याच पत्रात पुढे पौलाने, यहुदी व यहुदीतर ख्रिश्‍चनांमधील ऐक्यावर भर दिला आणि त्या सर्वांचा निर्माणकर्ता एकच असल्याची त्यांना आठवण करून दिली. त्याने आपल्या पत्रात यहोवाचा उल्लेख एक पिता असा केला ज्याच्यावरून ‘स्वर्गातील व पृथ्वीवरील प्रत्येक वंशास नाव देण्यात येते.’—इफिस. ३:५, ६, १४, १५.

इफिसकरांस लिहिलेल्या पत्राच्या चौथ्या अध्यायाचे बारकाईने परीक्षण करताना आपण पुढील गोष्टी पाहणार आहोत: मंडळीत एकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे का जरुरीचे आहे? यहोवा आपल्याला एकत्र राहण्यास कशा प्रकारे मदत करतो? आणि कोणते गुण आपल्यातील ऐक्य टिकवून ठेवण्यास आपली मदत करतील? या अभ्यासातून अधिक फायदा मिळवण्यासाठी तुम्ही तो संपूर्ण अध्याय वाचून काढू शकता.

ऐक्यासाठी झटणे का गरजेचे?

५. देवदूतांना ऐक्याने देवाची सेवा करणे कसे शक्य होते, पण आपल्याला एकोप्याने राहणे अधिक कठीण का जाऊ शकते?

पौलाने इफिसच्या बांधवांना अशी कळकळीची विनंती केली: ‘आत्म्याच्याद्वारे घडून आलेले ऐक्य राखावयास झटा.’ (इफिस. ४:३) ऐक्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे का जरुरीचे आहे हे समजण्यासाठी देवदूतांचे उदाहरण विचारात घ्या. पृथ्वीवर जिवंत असलेल्या कोणत्याही दोन गोष्टी तंतोतंत एकसारख्या नाहीत. यावरून आपण उचितपणे असा निष्कर्ष काढू शकतो, की देवाने निर्माण केलेल्या लाखो देवदूतांपैकी प्रत्येक देवदूत वेगळा आहे. (दानी. ७:१०) असे असले, तरी ते सर्व ऐक्याने यहोवाची सेवा करू शकतात कारण ते सर्व त्याचे ऐकतात व त्याची इच्छा पूर्ण करतात. (स्तोत्र १०३:२०, २१ वाचा.) या विश्‍वासू देवदूतांमध्ये निरनिराळे गुण आहेत. त्याचप्रमाणे, ख्रिश्‍चनांमध्ये निरनिराळे गुण तर पाहायला मिळतातच, पण त्यासोबतच त्यांच्यात अनेक दोषही पाहायला मिळतात. त्यामुळे एकोप्याने राहणे आपल्याला अधिक कठीण जाऊ शकते.

६. आपल्यापेक्षा वेगळे दोष असलेल्या बांधवांशी आनंदाने सहकार्य करण्यासाठी कोणते गुण आपली मदत करू शकतात?

अपरिपूर्ण मानव एकमेकांना सहयोग करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांच्यात सहज समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ, यहोवाची सेवा करणाऱ्‍या दोन बांधवांचा विचार करा. एक स्वभावाने अतिशय सौम्य आहे, पण त्याला कोठेही उशिरा पोहचण्याची सवय आहे. तर दुसरा, नेहमी वेळेवर पोहचतो, पण कोणत्याही गोष्टीवरून त्याला पटकन राग येतो. या दोघा बांधवांना एकमेकांच्या आचरणात काहीतरी खोट दिसते. पण, त्याच वेळी आपण स्वतःही कोठेतरी चुकत आहोत हे मात्र ते विसरतात. मग हे दोघे बांधव एकोप्याने यहोवाची सेवा कशी करू शकतात? अशा वेळी कोणते गुण प्रदर्शित करावेत याबद्दल पौलाने दिलेला पुढील सल्ला या बांधवांना कसा साहाय्यक ठरू शकतो याकडे लक्ष द्या. मग, तेच गुण आपल्या व्यक्‍तिमत्त्वात विकसित करण्याद्वारे आपण मंडळीतील ऐक्य कसे वाढीस लावू शकतो याचा विचार करा. पौलाने लिहिले: “मी तुम्हाला विनवून सांगतो की, तुम्हाला . . . शोभेल असे चाला; पूर्ण नम्रता, सौम्यता व सहनशीलता दाखवून एकमेकांना प्रीतीने वागवून घ्या; आत्म्याच्याद्वारे घडून आलेले ऐक्य शांतीच्या बंधनाने राखावयास झटत जा.”—इफिस. ४:१-३.

७. आपले ख्रिस्ती बांधव अपरिपूर्ण असले तरी त्यांच्यासोबत ऐक्याने राहण्याचा प्रयत्न करणे अत्यंत महत्त्वाचे का आहे?

आपले बंधुभगिनी अपरिपूर्ण असले तरी त्यांच्यासह एकजुटीने देवाची सेवा करण्यास शिकणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण सर्व खरे उपासक एका शरीराप्रमाणे आहेत. पौलाने लिहिले: “तुम्हास झालेल्या पाचारणापासून निर्माण होणारी आशा जशी एकच आहे, तसे शरीरहि एकच व आत्मा एकच आहे. प्रभू एकच, विश्‍वास एकच, बाप्तिस्मा एकच, सर्वांवर आणि सर्वांमधून आणि सर्वांच्या ठायी असलेला देव जो सर्वांचा पिता तोहि एकच आहे.” (इफिस. ४:४-६) आज यहोवा केवळ एकाच बंधुसमाजाचा उपयोग करत आहे आणि या एकाच बंधुसमाजावर देवाचा आत्मा व आशीर्वाद आहे. तेव्हा, मंडळीतील एखाद्या सदस्याने आपले मन दुखावले तर आपण जाणार तरी कोठे? आणखी कोठे जाण्याचा प्रश्‍नच उरत नाही, कारण सार्वकालिक जीवनाची वचने दुसरीकडे कोठेही ऐकायला मिळणार नाहीत.—योहा. ६:६८.

मानवरूपी “देणग्या” मंडळीतील ऐक्य वाढीस लावतात

८. मंडळीत फुटी निर्माण करणाऱ्‍या प्रभावांचा प्रतिकार करण्यास आपल्याला समर्थ करण्यासाठी ख्रिस्त कोणाचा उपयोग करतो?

मंडळीत ऐक्य निर्माण करण्यासाठी येशूने कशा प्रकारे मंडळीला मानवरूपी “देणग्या” दिल्या हे दाखवण्यासाठी पौलाने प्राचीन काळी योद्ध्‌यांमध्ये प्रचलित असलेल्या एका प्रथेचा उपयोग केला. युद्धात विजयी ठरलेला योद्धा घरी परतताना, आपल्या पत्नीला घरगुती कामात मदत करण्यासाठी एखाद्या बंदीवानाला दास म्हणून आपल्यासोबत आणू शकत होता. (स्तो. ६८:१, १२, १८) त्याचप्रमाणे, येशू ख्रिस्तानेही या जगावर विजय मिळवून स्वेच्छेने सेवा करणारे अनेक दास मिळवले आहेत. (इफिसकर ४:७, ८ वाचा.) मग, या लाक्षणिक बंदीवानांचा त्याने कशा प्रकारे उपयोग केला? पौलाने म्हटले: ‘त्यानेच कोणी प्रेषित, कोणी संदेष्टे, कोणी सुवार्तिक, कोणी पाळक व शिक्षक असे नेमून दिले; ते ह्‍यासाठी की, आपण सर्व विश्‍वासाच्या एकत्वाप्रत येऊन पोहचेपर्यंत त्यांनी पवित्र जनांस सेवेच्या कार्याकरिता व ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णतेस नेण्याकरिता सिद्ध करावे.’—इफिस. ४:११-१३.

९. (क) मानवरूपी “देणग्या” कशा प्रकारे मंडळीतील ऐक्य टिकवून ठेवण्यास मदत करतात? (ख) मंडळीतील प्रत्येक सदस्याने आपल्यातील ऐक्य टिकवून ठेवण्यासाठी हातभार का लावला पाहिजे?

प्रेमळ मेंढपाळ या नात्याने मानवरूपी “देणग्या” मंडळीतील ऐक्य टिकवून ठेवण्यास मदत करतात. उदाहरणार्थ, मंडळीत दोन बांधव चढाओढ करून ‘एकमेकांना चीड आणण्याचा’ प्रयत्न करत असल्याचे एखाद्या ख्रिस्ती वडिलांच्या लक्षात आल्यास, ‘[अशांना] सौम्य वृत्तीने ताळ्यावर आणण्यासाठी’ ते त्यांना खासगीत सल्ला देऊन मंडळीतील ऐक्याला मोठ्या प्रमाणात हातभार लावू शकतात. (गलती. ५:२६–६:१) शिक्षक या नात्याने मानवरूपी “देणग्या,” बायबलच्या शिकवणींच्या आधारावर आपला विश्‍वास बळकट करण्यासाठी आपल्याला साहाय्य करतात. अशा प्रकारे ते मंडळीतील ऐक्य वाढीस लावतात व आध्यात्मिक रीत्या प्रौढ होण्यास आपली मदत करतात. पौलाने लिहिल्याप्रमाणे हे “ह्‍यासाठी की, आपण ह्‍यापुढे बाळांसारखे असू नये, म्हणजे माणसांच्या धूर्तपणाने, भ्रांतीच्या मार्गास नेणाऱ्‍या युक्‍तीने, प्रत्येक शिकवणरूपी वाऱ्‍याने हेलकावणारे व फिरणारे असे होऊ नये.” (इफिस. ४:१३, १४) ज्या प्रकारे आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव इतर अवयवांच्या वाढीसाठी आवश्‍यक मदत पुरवतो, त्याचप्रमाणे मंडळीतील प्रत्येक व्यक्‍तीने आपल्या बंधुसमाजातील ऐक्य वाढीस लावण्यासाठी हातभार लावला पाहिजे.इफिसकर ४:१५, १६ वाचा.

नवीन गुण विकसित करा

१०. अनैतिक आचरणामुळे कशा प्रकारे आपल्या एकतेवर गदा येऊ शकते?

१० पौलाने इफिसकरांस लिहिलेल्या पत्राच्या चौथ्या अध्यायातून तुमच्या लक्षात आलेच असेल, की प्रौढ ख्रिस्ती या नात्याने मंडळीत एकता राखण्यासाठी आपल्या आचरणातून प्रेम व्यक्‍त करणे किती महत्त्वाचे आहे. आचरणातून प्रेम व्यक्‍त करण्यात कोणकोणत्या गोष्टी गोवल्या आहेत हे त्याने आपल्या पत्रात पुढे सांगितले आहे. त्यांपैकी एक गोष्ट म्हणजे व्यभिचार व स्वैराचार पूर्णपणे टाळणे. पौलाने आपल्या बांधवांना आर्जवले, की ‘परराष्ट्रीय भ्रष्ट मनाने चालतात त्याप्रमाणे त्यांनी चालू नये.’ परराष्ट्रीय लोक “कोडगे झाल्यामुळे त्यांनी स्वतःला कामातुरपणास वाहून घेतले होते.” (इफिस. ४:१७-१९) आज जगातील अनैतिक वातावरणामुळे आपल्यातील ऐक्यावर गदा येऊ शकते. लोक सर्रासपणे जारकर्माच्या विषयावर विनोद करतात, गाणी गातात, जारकर्माचे चित्रण असलेल्या गोष्टी पाहून स्वतःचे मनोरंजन करतात आणि गुप्तपणे किंवा उघडपणे जारकर्म करतात. इतकेच नव्हे, तर निव्वळ प्रणयचेष्टा केल्यामुळेदेखील तुम्ही यहोवापासून व ख्रिस्ती मंडळीपासून दूर जाऊ शकता. अशा प्रकारच्या वागण्यात, लग्नाचा काहीएक विचार नसताना एखाद्या व्यक्‍तीबद्दल तुम्हाला शारीरिक आकर्षण वाटते असे दाखवून तिच्या भावनांशी खेळणे सामील आहे. पण, प्रणयचेष्टेमुळे तुम्ही यहोवापासून व ख्रिस्ती मंडळीपासून दूर जाऊ शकता असे का म्हणता येईल? कारण प्रणयचेष्टेची परिणती जारकर्मात होण्यात फार वेळ लागत नाही. तसेच, अशा आचरणामुळे एक विवाहित व्यक्‍ती व्यभिचार करून बसते तेव्हा मुलांची पालकांपासून आणि निरपराध जोडीदारांची आपल्या विवाहसोबत्यांपासून निष्ठुरपणे ताटातूट होते. अशी कृत्ये खरोखर फुटी पाडतात! म्हणूनच पौलाने जे लिहिले त्याचे आपल्याला आश्‍चर्य वाटू नये. त्याने म्हटले: “तुम्ही अशा प्रकारे ख्रिस्ताविषयी शिकला नाही.”—इफिस. ४:२०, २१.

११. बायबल आपल्याला कोणता बदल करण्याचे उत्तेजन देते?

११ आपण मंडळीतील एकता भंग करणाऱ्‍या विचारसरणीचा त्याग केला पाहिजे आणि त्याऐवजी इतरांसोबत मिळूनमिसळून राहण्यास आपल्याला मदत करतील असे नवीन गुण विकसित केले पाहिजेत यावर पौलाने भर दिला. त्याने म्हटले: “तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना मनुष्य त्याचा तुम्ही त्याग करावा, तो कपटाच्या वासनांनी युक्‍त असून त्याचा नाश होत आहे; तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे केले जावे, आणि सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्त्व व पवित्रता ह्‍यांनी युक्‍त असा देवसदृश निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करावा.” (इफिस. ४:२२-२४) आपण “आपल्या मनोवृत्तीत नवे” कसे केले जाऊ शकतो? देवाच्या वचनातून तसेच अनुभवी ख्रिश्‍चनांच्या उत्तम उदाहरणावरून आपण जे काही शिकतो त्यावर कृतज्ञतेने मनन केले व त्यास प्रयत्नांची जोड दिली तर “देवसदृश निर्माण केलेला” नवा मनुष्य धारण करणे आपल्याला शक्य होईल.

खरे बोलण्याचे नवीन मार्ग विकसित करा

१२. खरे बोलल्यामुळे मंडळीतील ऐक्य कसे वाढीस लागते, आणि खरे बोलणे काहींना कठीण का जाऊ शकते?

१२ एकाच कुटुंबाचे किंवा मंडळीचे सदस्य असलेल्यांनी एकमेकांशी नेहमी खरे बोलणे अतिशय महत्त्वाचे आहे. कोणताही आडपडदा न ठेवता, मनमोकळेपणे व प्रेमळपणे बोलणारे लोक सहसा एकमेकांच्या जवळ येतात. (योहा. १५:१५) पण, एक व्यक्‍ती आपल्या भावाशी खोटे बोलते तेव्हा काय? आपला भाऊ आपल्याशी खोटे बोलला हे त्या भावाच्या लक्षात आल्यावर त्यांच्यातील भरवशाला तडा जातो. म्हणूनच, पौलाने असे का लिहिले ते समजण्याजोगे आहे: “लबाडी सोडून देऊन तुम्ही प्रत्येक जण आपआपल्या शेजाऱ्‍याबरोबर खरे बोला, कारण आपण एकमेकांचे अवयव आहो.” (इफिस. ४:२५) एखाद्या व्यक्‍तीला खोटे बोलण्याची सवय असेल आणि कदाचित लहानपणापासूनच तिला ही सवय लागली असेल, तर तिला खरे बोलायला शिकणे कठीण जाऊ शकते. पण, त्या व्यक्‍तीने खरे बोलण्याचा प्रयत्न केला तर यहोवा तिच्या प्रयत्नांची दखल घेऊन तिला बदल करण्यास नक्कीच साहाय्य करेल.

१३. अपमानास्पद बोलणे टाळण्यासाठी आपण काय केले पाहिजे?

१३ कुटुंबात व मंडळीत आदराची भावना व ऐक्य वाढीस लावण्यासाठी आपल्या बोलण्याकडे गांभीर्याने लक्ष देण्यास यहोवा आपल्याला शिकवतो. बायबल म्हणते: “तुमच्या मुखातून कसलेच कुजके भाषण न निघो, . . . सर्व प्रकारचे कडूपण, संताप, क्रोध, गलबला व निंदा ही, अवघ्या दुष्टपणासह तुम्हापासून दूर करण्यात येवोत.” (इफिस. ४:२९, ३१) अपमानास्पद बोलणे टाळण्याचा एक मार्ग म्हणजे इतरांशी अधिक आदराने वागणे. उदाहरणार्थ, आपल्या पत्नीला टाकून बोलणाऱ्‍या मनुष्याने तिच्याप्रती असलेली आपली मनोवृत्ती बदलण्याचा झटून प्रयत्न केला पाहिजे. खासकरून यहोवा स्त्रियांना किती मान देतो ही गोष्ट जाणून घेतल्यानंतर त्याने असे करणे आवश्‍यक आहे. देव स्त्रियांना इतका मान देतो की त्याने काही स्त्रियांना पवित्र आत्म्याद्वारे अभिषिक्‍त करून त्यांना शासक या नात्याने ख्रिस्तासोबत राज्य करण्याचा बहुमान दिला आहे. (गलती. ३:२८; १ पेत्र ३:७) त्याचप्रमाणे, आपल्या पतीशी नेहमी खेकसून बोलणाऱ्‍या स्त्रीने येशूच्या उदाहरणावर मनन करून आपल्या मनोवृत्तीत बदल करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण लोकांनी येशूला चिथावण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने नेहमी संयम बाळगला.—१ पेत्र २:२१-२३.

१४. राग व्यक्‍त करणे घातक का आहे?

१४ अपमानास्पद बोलण्याशी जवळचा संबंध असलेली आणखी एक गोष्ट म्हणजे आपल्या रागावर नियंत्रण नसणे. यामुळेदेखील नात्यांमध्ये दरी निर्माण होऊ शकते. रागाची तुलना, पाहता पाहता हाताबाहेर जाऊन सर्वकाही भस्मसात करणाऱ्‍या अग्नीशी करण्यात आली आहे. (नीति. २९:२२) एखाद्याला आपला राग व्यक्‍त करण्याचे सबळ कारण असले, तरी मौल्यवान नातेसंबंधांना तडा जाऊ नये म्हणून त्याने आपल्या रागावर जाणीवपूर्वक नियंत्रण ठेवले पाहिजे. ख्रिश्‍चनांनी मनात अढी न बाळगता आणि पुन्हा पुन्हा तो विषय न काढता एकमेकांना क्षमा करण्याचा सतत प्रयत्न केला पाहिजे. (स्तो. ३७:८; १०३:८, ९; नीति. १७:९) पौलाने इफिसकरांना सल्ला दिला: “तुम्ही रागावा, परंतु पाप करू नका, तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये, आणि सैतानाला वाव देऊ नका.” (इफिस. ४:२६, २७) आपण आपल्या रागावर नियंत्रण ठेवले नाही तर मंडळीत फुटी व भांडणतंटा निर्माण करण्याची आयती संधी दियाबलाला मिळू शकते.

१५. जी वस्तू आपल्या मालकीची नाही ती आपण घेतली तर काय होऊ शकते?

१५ इतरांच्या मालमत्तेचा आदर करण्याद्वारे आपण मंडळीतील ऐक्याला हातभार लावतो. “चोरी करणाऱ्‍याने पुन्हा चोरी करू नये,” असे बायबल म्हणते. (इफिस. ४:२८) यहोवाचे लोक सहसा एकमेकांवर भरवसा ठेवतात. तेव्हा, जी वस्तू आपल्या मालकीची नाही ती घेऊन एखाद्या ख्रिश्‍चनाने या भरवशाचा गैरफायदा घेतला, तर मंडळीतील आनंदाला व एकतेला तडा जाऊ शकतो.

देवावरील प्रेम आपल्यात एकता निर्माण करते

१६. आपल्यातील एकता आणखी बळकट करण्यासाठी आपण उभारणीकारक शब्दांचा उपयोग कसा करू शकतो?

१६ ख्रिस्ती मंडळीत एकता असण्याचे एक कारण म्हणजे मंडळीतील सर्व सदस्य देवावर प्रेम करतात आणि त्यामुळे ते एकमेकांशी प्रेमाने वागण्यास प्रवृत्त होतात. यहोवाने दाखवलेल्या प्रेमाबद्दल आपल्याला कृतज्ञता असल्यामुळे पुढील सल्ल्याचे मनापासून पालन करण्याची प्रेरणा आपल्याला मिळते: ‘तुमच्या मुखातून गरजेप्रमाणे उन्‍नतीकरिता जे चांगले तेच भाषण निघो, ह्‍यासाठी की, तेणेकडून ऐकणाऱ्‍यांना कृपादान प्राप्त व्हावे. एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा, जशी देवाने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हाला क्षमा केली आहे तशी तुम्हीहि एकमेकांना क्षमा करा.’ (इफिस. ४:२९, ३२) आपल्यासारख्या अपरिपूर्ण मानवांना यहोवा मोठ्या मनाने क्षमा करतो. मग, इतरांचे दोष आपल्याला दिसतात तेव्हा आपणही त्यांना क्षमा करू नये का?

१७. मंडळीतील ऐक्य वाढीस लावण्यासाठी आपण का झटले पाहिजे?

१७ देवाच्या लोकांमधील ऐक्यामुळे यहोवाचा गौरव होतो. आपल्यातील ऐक्य वाढीस लावण्यासाठी देवाचा आत्मा निरनिराळ्या मार्गांनी आपल्याला प्रेरणा देतो. आपण केव्हाही आत्म्याचे हे मार्गदर्शन नाकारू नये. पौलाने लिहिले: “देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्‍न करू नका.” (इफिस. ४:३०) आपल्यातील एकता ही जपून ठेवण्याजोग्या मौल्यवान धनासारखी आहे. या एकतेमुळे खरे उपासक आनंदी असतात व त्यामुळे यहोवाचा गौरव होतो. “तर मग देवाची प्रिय मुले ह्‍या नात्याने तुम्ही त्याचे अनुकरण करणारे व्हा, आणि प्रीतीने चाला.”—इफिस. ५:१, २.

तुमचे उत्तर काय असेल?

• कोणते गुण ख्रिस्ती मंडळीतील ऐक्य वाढीस लावतात?

• आपल्या आचरणामुळे मंडळीतील ऐक्य कसे वाढीस लागते?

• कशा प्रकारे आपले बोलणे इतरांशी सहकार्य करण्यास आपली मदत करू शकते?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१७ पानांवरील चित्र]

निरनिराळ्या पार्श्‍वभूमीच्या लोकांमध्ये ऐक्य आहे

[१८ पानांवरील चित्र]

एखाद्याच्या भावनांशी खेळणे किती धोकेदायक असू शकते याची तुम्हाला कल्पना आहे का?