व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

विलक्षण वाढीच्या काळात सेवा करणे

विलक्षण वाढीच्या काळात सेवा करणे

विलक्षण वाढीच्या काळात सेवा करणे

हार्ली हॅरीस यांच्याद्वारे कथित

अमेरिकेच्या मिझूरी येथील केनट या ठिकाणी २ सप्टेंबर, १९५० रोजी घडलेली घटना. आम्ही एका विभागीय संमेलनाला उपस्थित होतो. तिथं आम्हाला विरोधकांच्या एका जमावानं घेरलं. या दंगेखोर जमावापासून आमचं संरक्षण करण्यासाठी तिथल्या महापौरांनी राष्ट्रीय सुरक्षा दलाला बोलावलं. दलाचे सैनिक संगिनी असलेल्या रायफली ताणून रस्त्याच्या कडेला उभे होते. विरोधक आमचा अपमान करत होते. अशा वातावरणात आम्ही आमच्या गाड्यांपर्यंत चालत गेलो आणि संमेलनाच्या उर्वरित भागांसाठी मिझूरीतील केप गेरार्डोकडं रवाना झालो. तिथंच वयाच्या १४ व्या वर्षी माझा बाप्तिस्मा झाला. पण, अशा उलथापालथीच्या काळात मी यहोवाची सेवा करायला कशी सुरुवात केली ते मी तुम्हाला सांगू इच्छितो.

सन १९३० च्या दशकाच्या सुरुवातीला, माझ्या आजीआजोबांनी व त्यांच्या आठ मुला-मुलींनी बंधू रदरफर्ड यांची काही ध्वनिमुद्रित भाषणं ऐकली होती आणि हेच सत्य असल्याची त्यांची खातरी पटली होती. माझे आईबाबा, बे आणि मिल्ड्रड हॅरीस यांनी १९३५ मध्ये वॉशिंग्टन, डी.सी. इथं भरलेल्या प्रांतीय अधिवेशनात बाप्तिस्मा घेतला होता. त्या अधिवेशनात “मोठा लोकसमुदाय” कोण आहे हे सांगण्यात आलं होतं. नुकतीच ओळख करून देण्यात आलेल्या त्या मोठ्या लोकसमुदायाचा भाग असल्याबद्दल माझ्या आईबाबांना खरोखर किती आनंद झाला होता!—प्रकटी. ७:९, १४.

याच्या पुढच्या वर्षी माझा जन्म झाला. आणि एका वर्षानंतर, आईबाबा मिसिसिपीतल्या एका दुर्गम भागात राहायला गेले. त्या भागात, कोणी प्रवासी पर्यवेक्षकदेखील भेट देत नव्हते. आईबाबा बेथेलशी पत्रव्यवहार करायचे व संमेलनांना जायचे. आणि काही काळापर्यंत, बंधुभगिनींचा एवढाच काय तो सहवास आम्हाला लाभला.

छळाचा सामना करणे

यहोवाच्या साक्षीदारांना दुसऱ्‍या महायुद्धादरम्यान आपल्या तटस्थ भूमिकेमुळे खूप छळ सहन करावा लागला. एव्हाना, आम्ही आर्केन्झस येथील माऊंटन होम इथं राहायला आलो होतो. एकदा, मी व बाबा रस्त्यावर साक्षकार्य करत होतो. एका माणसानं बाबांच्या हातातून मासिकं हिसकावून घेतली आणि तिथंच ती जाळून टाकली. आम्ही युद्धात भाग घेत नाही म्हणून आम्ही भित्रे आहोत असं तो आम्हाला म्हणाला. मी फक्‍त पाच वर्षांचा होतो. मी रडू लागलो. पण, बाबा एकही शब्द न उच्चारता शांतपणे त्या माणसाकडे फक्‍त पाहत राहिले आणि तो माणूस तिथून निघून गेला.

पण, असेही काही लोक होते जे आमच्याशी चांगलं वागले. एकदा विरोधकांच्या एका जमावानं आमच्या गाडीला घेरलं असल्याचं एका स्थानिक सरकारी वकिलानं पाहिलं, तेव्हा त्यानं विचारलं: “इथं काय चाललंय?” त्यावर एक माणूस म्हणाला: “हे यहोवाचे साक्षीदार देशासाठी कधीच लढत नाहीत!” हे ऐकताच, तो वकील लगेच आमच्या गाडीच्या पायफळीवर चढून उभा राहिला व मोठ्यानं म्हणाला: “पहिल्या महायुद्धात मी लढलो आणि या युद्धातही मी लढेन! तुम्ही यांना जाऊ द्या. ते कोणाला त्रास देत नाहीत!” जमाव शांतपणे तिथून निघून गेला. आमच्याप्रती माणुसकी दाखवणाऱ्‍या अशा चांगल्या लोकांचे आम्ही किती आभारी होतो!—प्रे. कृत्ये २७:३.

अधिवेशनांतून आम्हाला बळ मिळतं

मिझूरीतल्या सेंट लुईस इथं १९४१ मध्ये भरलेलं अधिवेशन आमच्याकरता अगदी समयोचित होतं. एका अंदाजानुसार, त्या अधिवेशनाला १,१५,००० पेक्षा जास्त लोक हजर होते आणि ३,९०३ जणांचा बाप्तिस्मा झाला होता. ही नक्कीच मोठी संख्या होती! मला अजूनही बंधू रदरफर्ड यांनी दिलेलं “राजाची मुले” हे भाषण आठवतं. ते थेट आम्हा लहान मुलांशीच बोलले. आणि आम्हा सर्व मुलांना चिल्ड्रन नावाच्या एका सुंदर निळ्या पुस्तकाची एकेक प्रत मिळाली. पुढच्या वर्षी म्हणजे जेव्हा मी प्राथमिक शाळेत जाणार होतो त्या वर्षी जे घडलं त्याचा सामना करण्यास या अधिवेशनामुळे मला बळ मिळालं. शाळेत झेंडावंदन केलं नाही म्हणून मला व माझ्या चुलत बहिणींना शाळेतून काढू टाकण्यात आलं. शाळा संचालकांचं मन बदललं असेल का हे पाहण्यासाठी आम्ही दररोज शाळेला जायचो. आम्ही दरदिवशी सकाळी जंगलातून चालत शाळेला जायचो आणि ते रोज आम्हाला शाळेतून घरी पाठवून द्यायचे. पण, देवाच्या राज्याप्रती आमची एकनिष्ठा दाखवण्याचा हा एक मार्ग असल्याचं मला वाटायचं.

पण, त्यानंतर लवकरच, झेंडावंदन करणं आवश्‍यक नसल्याचा निर्णय अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं दिला. शेवटी, आम्हाला पुन्हा एकदा शाळेत जाणं शक्य झालं. शिक्षक आमच्याशी प्रेमळपणे वागले आणि बुडलेला अभ्यास पूर्ण करण्यास आम्हाला मदत केली. आमचे शाळासोबतीदेखील आमच्याशी आदरानं वागले.

सन १९४२ मध्ये ओहायोतल्या क्लीवलँड इथं भरलेलं अधिवेशनदेखील मला आठवतं, जिथं बंधू नेथन एच. नॉर यांनी “शांती—ती टिकू शकेल का?” हे भाषण दिलं होतं. प्रकटीकरण पुस्तकातल्या १७ व्या अध्यायाच्या परीक्षणातून हे सूचित झालं होतं की दुसऱ्‍या महायुद्धानंतर काही काळ शांती असेल. यावरून, सेवा कार्यात आणखी वाढ होण्याची अपेक्षा करण्यात आली होती. त्याची पूर्वतयारी म्हणून १९४३ मध्ये गिलियड प्रशाला सुरू करण्यात आली. या गोष्टीचा भविष्यात माझ्या जीवनावर प्रभाव पडेल याची मी जराही कल्पना केली नव्हती. युद्धानंतर खरोखर शांतीचा काळ आला आणि साक्षीदारांचा छळही थांबला. पण, १९५० मध्ये कोरियन युद्ध सुरू झालं, आणि लेखाच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे, पुन्हा एकदा प्रचार कार्याचा विरोध होऊ लागला.

वाढत्या सेवा कार्यात पूर्ण सहभाग

सन १९५४ मध्ये मी हायस्कूलमधून पदवीधर झालो आणि त्याच्या एक महिन्यानंतर पायनियर सेवा सुरू केली. १९५० मध्ये जमावानं आम्हाला घेरलं होतं त्या मिझूरीतल्या केनट इथं मी काही काळ सेवा केली. त्यानंतर, १९५५ सालच्या मार्च महिन्यात मला बेथेलमध्ये सेवा करण्यास बोलावण्यात आलं. मला ज्या मंडळीसोबत सहवास करण्यासाठी नियुक्‍त करण्यात आलं होतं त्या मंडळीच्या क्षेत्रात, न्यू यॉर्क सिटीच्या मध्यभागी असलेला टाईम्स स्क्वेरचा भागदेखील होता. गावातल्या जीवनापेक्षा किती वेगळं जीवन! न्यू यॉर्कमधील व्यस्त लोकांचं लक्ष आकर्षित करण्यासाठी मासिकातला एक विचारप्रवर्तक लेख दाखवून मी त्यांना विचारायचो, “तुम्ही स्वतःला कधी हा प्रश्‍न विचारला का?” अशा प्रकारे, पुष्कळ जणांनी मासिकं घेतली.

बेथेलमधील माझा आवडता वेळ म्हणजे सकाळच्या उपासनेचा वेळ. त्या वेळी, सकाळची उपासना बंधू नॉर घ्यायचे. ते बायबल वचनांत जिवंतपणा आणायचे आणि ती वचने व्यावहारिक रीत्या लागू करण्यास आम्हाला मदत करायचे. ते आम्हा तरुण अविवाहित बांधवांशी एका पित्याप्रमाणे बोलायचे. आणि विरुद्धलिंगी व्यक्‍तींशी कसे वागावे याबद्दल नेहमी प्रेमळपणे सल्ला द्यायचे.

सन १९६० पर्यंत, मी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे बेथेल सोडण्याची पूर्वसूचना मी ३० दिवसांआधी दिली, पण मला काहीच उत्तर मिळालं नाही. स्वभावानं लाजरा असूनही, ३० दिवसांच्या शेवटी, बेथेल सोडण्याबद्दल विचारण्यासाठी मी धैर्य एकवटलं आणि फोन केला. बंधू रॉबर्ट वॉलन यांच्याशी मी फोनवर बोललो आणि मी जिथं काम करत होतो तिथं ते स्वतः आले. खास पायनियरिंग किंवा विभागीय सेवा करण्याबद्दल विचार केला आहे का असं त्यांनी मला विचारलं. मी त्यांना म्हणालो: “पण बॉब, मी फक्‍त २४ वर्षांचा आहे, आणि मला अनुभवदेखील नाही.”

विभागीय कार्यात

त्या रात्री, माझ्या खोलीत एक मोठा लिफाफा ठेवला होता. त्यात दोन अर्ज होते; एक खास पायनियर सेवेसाठी आणि दुसरा विभागीय सेवेसाठी. मला तर विश्‍वासंच बसत नव्हता! विभागीय पर्यवेक्षक म्हणून मिझूरीच्या दक्षिण-पश्‍चिम भागातील व पूर्व कॅन्झसमधील बांधवांची सेवा करण्याची अनमोल संधी मला लाभली होती. पण बेथेल सोडण्याआधी, प्रवासी पर्यवेक्षकांसाठी असलेल्या एका सभेला मी उपस्थित राहिलो. बंधू नॉर यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी म्हटलं: “तुम्ही विभागीय पर्यवेक्षक आणि प्रांतीय पर्यवेक्षक या नात्यानं सेवा करता याचा अर्थ हा नाही की तुम्हाला स्थानिक बांधवांपेक्षा जास्त ज्ञान आहे. काही जण तर तुमच्यापेक्षा कितीतरी जास्त अनुभवी आहेत. पण, परिस्थितीमुळे ते तुमच्याप्रमाणे विभागीय कार्य करू शकत नाहीत. तुम्ही त्यांच्याकडून खूप काही शिकू शकता.”

त्यांचे शब्द किती खरे होते! बंधू फ्रेड मोलहान व त्यांची पत्नी आणि कॅन्झसमधल्या पार्सन इथं राहणारे त्यांचे भाऊ चार्ली माझ्यासाठी उत्तम उदाहरण होते. ते १९०० च्या सुरुवातीला सत्याबद्दल शिकले होते. माझा जन्मदेखील झाला नव्हता त्या काळातील अनुभवांबद्दल त्यांच्याकडून ऐकणं किती आनंददायक होतं! आणखी एक बांधव म्हणजे मिझूरीतल्या जॉप्लीन या भागात राहणारे प्रेमळ वृद्ध बांधव जॉन रिस्टन. त्यांनी कित्येक दशके पायनियर सेवा केली होती. या प्रिय बांधवांना ईश्‍वरशासित व्यवस्थेबद्दल गाढ आदर होता. मी त्यांच्यापेक्षा वयानं लहान असलो, तरी मी त्यांचा विभागीय पर्यवेक्षक असल्यामुळे त्यांनी माझी कदर केली.

सन १९६२ मध्ये, क्लॉरिस क्नोके या आवेशी पायनियरशी माझं लग्न झालं. मी व क्लॉरिस पुढेही विभागीय कार्य करत राहिलो. बांधवांसोबत त्यांच्या घरी राहताना, आम्हाला त्यांना जवळून जाणून घेता आलं. तरुण बंधुभगिनींना पूर्ण वेळ सेवा सुरू करण्याचं प्रोत्साहन देणं आम्हाला शक्य झालं. आमच्या विभागातील ज्ये कोसिन्स्‌की आणि जोॲन क्रेसमन या दोन किशोरवयीनांना अशाच प्रोत्साहनाची गरज होती. सेवा कार्यात त्यांच्यासोबत काम केल्यानं व स्वार्थत्यागी जीवन जगल्यामुळे मिळणाऱ्‍या आनंदाबद्दल त्यांच्याशी बोलल्यानं त्यांना जीवनात ध्येयं ठेवण्याची प्रेरणा मिळाली. जोॲन खास पायनियर म्हणून सेवा करू लागली आणि ज्ये बेथेलमध्ये सेवा करू लागला. नंतर, त्या दोघांनी लग्न केलं आणि ते मागील ३० वर्षांपेक्षा जास्त काळापासून विभागीय कार्य करत आहेत.

मिशनरी सेवा

सन १९६६ मध्ये, बंधू नॉर यांनी आम्हाला परदेशात सेवा करण्याबद्दल विचारलं. आम्ही म्हणालो: “आम्ही सध्या आमच्या सेवेत आनंदी आहोत, पण इतर ठिकाणी जास्त गरज असेल, तर आम्ही जाण्यास तयार आहोत.” एक आठवड्यानंतर, आम्हाला गिलियड प्रशालेला उपस्थित राहण्यासाठी बोलावण्यात आलं. गिलियड प्रशालेच्या निमित्तानं पुन्हा एकदा बेथेलमध्ये जाण्याचा आणि ज्यांच्याबद्दल मला प्रेम व आदर होता त्या बांधवांच्या सहवासात राहण्याचा मला किती आनंद झाला होता! आमच्यासोबत गिलियड प्रशालेत असलेल्या इतर विद्यार्थ्यांशीही आमची मैत्री जुळली आणि ते सर्व आजही विश्‍वासूपणे देवाची सेवा करत आहेत.

मला व क्लॉरिसला दक्षिण अमेरिकेतील एक्वाडॉर या देशात पाठवण्यात आलं. आमच्यासोबत डेनिस आणि एडविना क्रिस्ट, ॲना रॉड्रीगस आणि डेलिया सांचेस यांनादेखील तिथं पाठवण्यात आलं. क्रिस्ट दांपत्य किटो या राजधानी शहराला गेले. ॲना आणि डेलिया यांना आमच्यासोबत एक्वाडॉरचं तिसरं मोठं शहर असलेल्या क्वेंकाला पाठवण्यात आलं. आम्हाला नेमण्यात आलेल्या भागात दोन प्रांत होते. क्वेंकाची पहिली मंडळी आमच्या घरातूनच सुरू झाली. सभांना आम्हा चौघांव्यतिरिक्‍त आणखी दोन जण उपस्थित राहायचे. इतकं मोठं क्षेत्र उरकणं आम्हाला शक्य होईल का, असं कधीकधी आम्हाला वाटायचं.

क्वेंका शहरात अनेक चर्चेस होती आणि सणांच्या दिवशी शहरात सर्वत्र धार्मिक मिरवणुका निघायच्या. तरीसुद्धा, क्वेंकातल्या लोकांच्या मनात अनेक प्रश्‍न होते. उदाहरणार्थ, क्वेंकातला सायकलपटू मारयो पोलो याला मी पहिल्यांदा भेटलो, तेव्हा “प्रकटीकरण पुस्तकात सांगितलेली कलावंतीण कोण आहे?” असा प्रश्‍न विचारून त्यानं मला चकितच केलं.

आणखी एकदा, रात्रीच्या वेळी मारयो आमच्या घरी आला, तेव्हा तो खूप चिंतित दिसत होता. चर्चच्या एका पाळकांनी त्याला काहीतरी साहित्य दिलं होतं, ज्यात यहोवाच्या साक्षीदारांवर गंभीर आरोप लावण्यात आले होते. मी मारयोशी तर्क केला की ज्यांच्यावर आरोप लावण्यात आले आहेत त्यांनादेखील आपली बाजू मांडण्याची संधी मिळाली पाहिजे. लावलेले आरोप सिद्ध करण्यासाठी मारयोनं दुसऱ्‍या दिवशी मला व त्या पाळकांना आपल्या घरी बोलावलं. त्या दिवशी झालेल्या बैठकीत, आपण त्रैक्याबद्दल बोलू या असं मी सुचवलं. पाळकांनी योहान १:१ वाचून दाखवलं, तेव्हा मारयोनं स्वतःच त्या वचनाचा खरा अर्थ काय आहे ते स्पष्ट करून सांगितलं. अशाच प्रकारे बायबलमधील इतर वचनांचा अर्थदेखील मारयोनं स्वतःच उलगडून सांगितला. साहजिकच, त्रैक्य सिद्ध न करताच पाळक तिथून निघून गेले. यामुळे, आम्ही जे शिकवतो ते सत्य असल्याची मारयोची व त्याच्या पत्नीची खातरी पटली आणि ते बायबलमधील शिकवणींचे खंदे समर्थक बनले. कालांतरानं, क्वेंकातल्या मंडळ्यांची संख्या वाढत गेली आणि आज त्या शहरात ३३ मंडळ्या आहेत. आम्हाला पहिल्यांदा मिशनरी म्हणून पाठवण्यात आलं होतं त्या विस्तृत क्षेत्रातल्या मंडळ्यांची संख्या आज एकूण ६३ आहे. ही विलक्षण वाढ पाहून खरोखर खूप आनंद होतो!

शाखा कार्यालयातून घेतलेला वाढीचा वेध

सन १९७० मध्ये मला व अल स्कूलो या बांधवाला ग्वायाकिल इथं असलेल्या शाखा कार्यालयात जाण्यास सांगण्यात आलं. आम्ही दोघं शाखेतील कार्य पाहायचो. ज्यो सेकरॅक हा बांधव देशभरातल्या ४६ मंडळ्यांकरता अर्ध-वेळ साहित्य पॅक करायचा. मी बेथेलमध्ये काम करत असताना क्लॉरिसनं काही काळापर्यंत क्षेत्रात मिशनरी सेवा केली. तिनं ५५ जणांना बाप्तिस्मा घेण्यास मदत केली आहे. प्रत्येक संमेलनात तिचे तीन ते पाच विद्यार्थी तरी बाप्तिस्मा घ्यायचे.

उदाहरणार्थ, लुक्रेसिया नावाच्या एका स्त्रीसोबत क्लॉरिस बायबलचा अभ्यास करायची, पण त्या स्त्रीचा पती तिला विरोध करायचा. तरीसुद्धा, लुक्रेसियानं शेवटी बाप्तिस्मा घेतला आणि सामान्य पायनियर सेवा करण्यास सुरुवात केली. तिनं आपल्या मुलांना यहोवाच्या मार्गांचं शिक्षण दिलं. आज तिची दोन मुलं वडील या नात्यानं, तर एक मुलगा खास पायनियर म्हणून सेवा करत आहे. तिची मुलगीदेखील पायनियर सेवा करत आहे. तिच्या नातीनं आध्यात्मिक रीत्या प्रौढ असलेल्या एका बांधवाशी लग्न केलं आणि ते दोघंही खास पायनियर सेवा करत आहेत. या कुटुंबानं अनेक जणांना सत्य शिकण्यास मदत केली आहे.

सन १९८० पर्यंत एक्वाडॉरमध्ये ५,००० प्रचारक होते. कार्यालयाची जागा आता आम्हाला कमी पडत होती. एका बांधवानं ग्वायाकिलच्या बाहेर असलेली आपली ८० एकर जागा आम्हाला दिली. या जागेवर १९८४ मध्ये आम्ही एक नवीन शाखा कार्यालय व एक संमेलनगृह बांधण्यास सुरुवात केली आणि १९८७ मध्ये त्यांचं समर्पण करण्यात आलं.

वाढीला आणखी अनेक जणांचा हातभार

गेल्या अनेक वर्षांपासून, राज्य प्रचारकांची जास्त गरज असलेल्या ठिकाणी सेवा करण्यासाठी इतर देशांतून अनेक प्रचारक व पायनियर एक्वाडॉरमध्ये येत असल्याचं पाहून आम्हाला खूप आनंद होतो. एक उल्लेखनीय उदाहरण मला आठवतं आणि ते म्हणजे कॅनडातले सेवानिवृत्त शिक्षक ॲन्डी किड यांचं. ते १९८५ मध्ये वयाच्या ७० व्या वर्षी एक्वाडॉरला आले आणि २००८ मध्ये वयाच्या ९३ व्या वर्षी आपल्या मृत्यूपर्यंत विश्‍वासूपणे ते देवाची सेवा करत राहिले. मी पहिल्यांदा त्यांना पाहिलं होतं, तेव्हा ते एका छोट्याशा मंडळीत एकमात्र पर्यवेक्षक होते. त्यांना स्पॅनिश भाषा चांगली येत नसली, तरी त्यांनी जाहीर भाषण दिलं आणि टेहळणी बुरूज अभ्यास घेतला. त्यांनी ईश्‍वरशासित सेवा प्रशालादेखील घेतली आणि सेवा सभेतील बहुतेक भाग हाताळले. आज त्या भागात, जवळजवळ २०० प्रचारक असलेल्या दोन मंडळ्या असून प्रचारकांची संख्या वेगानं वाढत आहे.

आणखी एक बांधव, अर्नेस्टो डियस हे आपल्या कुटुंबासोबत अमेरिकेहून एक्वाडॉरला आले. इथं आठ महिने राहिल्यानंतर त्यांनी म्हटलं: “आमच्या तीन मुलांनी इथली भाषा शिकून घेतली आहे आणि ते उत्तम शिक्षक बनले आहेत. एक पिता या नात्यानं, या जगात अशक्य वाटणारं एक ध्येयं मी साध्य केलं आहे. ते म्हणजे, माझ्या कुटुंबासह सामान्य पायनियर सेवा अर्थात पूर्ण वेळ सेवा करणं. आम्ही सर्व जण मिळून २५ बायबल अभ्यास चालवत आहोत. यामुळे आमच्या कुटुंबातील ऐक्य आणखी वाढलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, मी आधीपेक्षा जास्त यहोवाच्या जवळ आलो आहे.” या प्रिय बंधुभगिनींची आम्ही मनापासून कदर करतो.

सन १९९४ मध्ये शाखा कार्यालयाचा आणखी एकदा दुपटीनं विस्तार करण्यात आला. २००५ मध्ये प्रचारकांची संख्या ५०,००० च्या वर पोहचली, त्यामुळे शाखा कार्यालयाचा आणखी विस्तार करण्याची गरज निर्माण झाली. यात एक विस्तारित संमेलनगृह व राहण्यासाठी एक नवीन इमारत, तसेच भाषांतर कार्यासाठी कार्यालये यांचा समावेश होता. या नवीन इमारती ३१ ऑक्टोबर, २००९ रोजी समर्पित करण्यात आल्या.

सन १९४२ मध्ये मला जेव्हा शाळेतून काढण्यात आलं होतं तेव्हा अमेरिकेत जवळजवळ ६०,००० साक्षीदार होते. आता तिथं दहा लाखांपेक्षा जास्त साक्षीदार आहेत. १९६६ मध्ये आम्ही एक्वाडॉरला आलो तेव्हा या ठिकाणी सुमारे १,४०० राज्य प्रचारक होते. आता इथं ६८,००० च्या वर प्रचारक आहेत. आणि बायबलचा अभ्यास करणाऱ्‍या १,२०,००० विद्यार्थ्यांपैकी, तसेच २००९ मध्ये ख्रिस्ताच्या मृत्यूच्या स्मारक विधीला उपस्थित असलेल्या २,३२,००० जणांपैकी आणखी बरेच जण पुढे प्रचारक बनण्याची दाट शक्यता आहे. यहोवानं नक्कीच आपल्या कल्पनेपलीकडे त्याच्या लोकांना आशीर्वादित केलं आहे. विलक्षण वाढीच्या काळात व उल्लेखनीय वाढ होत असलेल्या ठिकाणी जगणं खरोखर किती रोमांचक आहे! *

[तळटीप]

^ परि. 34 हा लेख प्रकाशनासाठी तयार केला जात असताना बंधू हार्ली हॅरीस यांचा मृत्यू झाला. ते शेवटपर्यंत यहोवाला विश्‍वासू राहिले.

[५ पानांवरील चित्रे]

खुल्या मैदानात भरवलेले संमेलन (१९८१) आणि त्याच जागी बांधलेले ग्वायाकिल संमेलनगृह (२००९)