व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आपल्या बंधुभगिनींचा आदर करण्यात तुम्ही पुढाकार घेता का?

आपल्या बंधुभगिनींचा आदर करण्यात तुम्ही पुढाकार घेता का?

आपल्या बंधुभगिनींचा आदर करण्यात तुम्ही पुढाकार घेता का?

“बंधुप्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा; एकमेकांना आदर दाखवण्यात पुढाकार घ्या.”—रोम. १२:१०, NW.

१, २. (क) रोमकरांना लिहिलेल्या पत्रात पौल कोणता सल्ला देतो? (ख) आपण कोणत्या प्रश्‍नांची चर्चा करणार आहोत?

 ख्रिस्ती या नात्याने मंडळीत एकमेकांना प्रेम दाखवणे किती महत्त्वाचे आहे यावर प्रेषित पौल रोमकरांना लिहिलेल्या पत्रात भर देतो. आपल्या प्रेमामध्ये “ढोंग नसावे” याची तो आपल्याला आठवण करून देतो. तसेच, तो ‘बंधुप्रेमाचा’ देखील उल्लेख करतो आणि असे प्रेम ‘खऱ्‍या स्नेहभावाने’ दाखवले पाहिजे असे तो सांगतो.—रोम. १२:९, १०क.

अर्थात, बंधुप्रेमाचा अर्थ इतरांबद्दल मनात प्रेमळ भावना असणे इतकेच नाही. तर, या भावना कृतींतून व्यक्‍त झाल्या पाहिजेत. नाहीतर, इतरांबद्दल आपल्याला प्रेम आणि स्नेहभाव आहे हे त्यांना कसे कळेल? म्हणूनच, पौल पुढे असा सल्ला देतो: “एकमेकांना आदर दाखवण्यात पुढाकार घ्या.” (रोम. १२:१०ख) आदर दाखवणे म्हणजे नेमके काय? आपल्या बंधुभगिनींना आदर दाखवण्यात पुढाकार घेणे का महत्त्वाचे आहे? आपण हे कसे करू शकतो?

आदर दाखवणे म्हणजे नेमके काय?

३. बायबलच्या मूळ भाषांमध्ये “आदर” या शब्दाचा काय अर्थ होतो?

“आदर” असे भाषांतर केलेल्या मूळ हिब्रू शब्दाचा शब्दशः अर्थ “वजनदारपणा” असा होतो. ज्या व्यक्‍तीचा आदर केला जातो तिचे चारलोकांत वजन असते किंवा तिला महत्त्व असते असे मानले जाते. शास्त्रवचनांमध्ये, याच हिब्रू शब्दाचे अनेकदा “वैभव” असेही भाषांतर केले जाते, ज्यावरून आदर केल्या जाणाऱ्‍या व्यक्‍तीला किती महत्त्व दिले जाते हे सूचित होते. (उत्प. ४५:१३) बायबलमध्ये, “आदर” असे भाषांतर केलेल्या ग्रीक शब्दातून मान, महत्त्व, मौल्यवान असा अर्थ सूचित होतो. (लूक १४:१०) होय, आपण ज्यांचा आदर करतो ते आपल्याकरता मौल्यवान असतात, महत्त्वाचे असतात.

४, ५. आदराने पाहणे आणि आदराने वागणे यांचा एकमेकांशी काय संबंध आहे? उदाहरण द्या.

इतरांना आदर दाखवण्यात काय समाविष्ट आहे? आपण सहसा इतरांकडे ज्या दृष्टिकोनातून पाहतो त्याप्रमाणे त्यांच्याशी वागतोदेखील. तेव्हा, इतरांना आदर दाखवण्यासाठी आपण प्रथम त्यांच्याकडे आदरभावाने पाहिले पाहिजे, जेणेकरून त्यांच्याशी आदराने वागणे आपल्याला शक्य होईल.

एका ख्रिस्ती व्यक्‍तीला आपल्या बंधुभगिनींबद्दल मनापासून आदर वाटत नसेल, तर ती त्यांना आदर कसा दाखवू शकेल? (३ योहा. ९, १०) एखादे रोपटे चांगल्या मातीत लावले तरच त्याची वाढ होऊ शकते व ते जास्त काळ तग धरून राहते. त्याच प्रकारे, आदरदेखील मनापासून दाखवला तरच तो टिकून राहू शकतो. आपण जर इतरांना मनापासून आदर दाखवला नाही, तर वाईट मातीत लावलेले रोप ज्याप्रमाणे सुकून जाते, त्याचप्रमाणे आपला आदरदेखील आज ना उद्या नाहीसा होईल. म्हणूनच, पौलाने आदर दाखवण्याबाबत सल्ला देण्याआधी अगदी स्पष्ट शब्दांत जे सांगितले त्याचे आपल्याला आश्‍चर्य वाटत नाही. त्याने म्हटले: “प्रीतीमध्ये ढोंग नसावे.”—रोम. १२:९; १ पेत्र १:२२ वाचा.

“देवाच्या प्रतिमेप्रमाणे” निर्माण केलेल्यांचा आदर करा

६, ७. आपण इतरांना आदर का दाखवला पाहिजे?

इतरांना आदर दाखवण्यासाठी त्यांच्याबद्दल मनात आदर असणे महत्त्वाचे असल्यामुळे सर्व बंधुभगिनींना आदर दाखवण्याच्या शास्त्रवचनीय कारणांकडे आपण कधीही दुर्लक्ष करू नये. तेव्हा, त्यांपैकी दोन कारणे आपण पाहू या.

मानवांना पृथ्वीवरील इतर प्राण्यांप्रमाणे नव्हे, तर “देवाच्या प्रतिमेप्रमाणे” बनवण्यात आले होते. (याको. ३:९) त्यामुळे प्रेम, बुद्धी आणि न्याय यांसारखे देवाचे गुण आपल्यामध्ये आहेत. आपल्या सृष्टिकर्त्याकडून आपल्याला आणखी काय मिळाले आहे याकडे लक्ष द्या. स्तोत्रकर्ता असे म्हणतो: “हे परमेश्‍वरा, . . . तू आपले वैभव आकाशभर पसरिले आहे. . . . तू [मानवाला] देवापेक्षा किंचित्‌ कमी असे केले आहे; त्याला गौरव व थोरवी [“मान,” पं.र.भा.] ह्‍यांनी मुकुटमंडित केले आहे.” (स्तो. ८:१, ४, ५; १०४:१) * देवाने सर्व मानवांना काही प्रमाणात मान, गौरव आणि आदर यांनी मुकुटमंडित किंवा सुशोभित केले आहे. त्यामुळे, आपण इतर व्यक्‍तीला आदर दाखवतो, तेव्हा खरेतर, आपण मानवांना आदर दाखवणाऱ्‍या यहोवाला मान देतो. जर, सर्वसाधारण लोकांना आदर दाखवण्याची आपल्याजवळ ठोस कारणे आहेत, तर आपल्या सहविश्‍वासू बंधुभगिनींना आपण आणखी किती जास्त आदर दाखवला पाहिजे!—योहा. ३:१६; गलती. ६:१०.

आपण एकाच कुटुंबाचे सदस्य आहोत

८, ९. आपल्या सहविश्‍वासू बांधवांना आदर दाखवण्याच्या कोणत्या कारणाचा पौल उल्लेख करतो?

आपण एकमेकांना आदर का दाखवला पाहिजे याच्या आणखी एका कारणाचा पौलाने उल्लेख केला. आदर दाखवण्याबद्दल सल्ला देण्याच्या आधी, तो म्हणतो: “बंधुप्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा.” “स्नेहभाव” असे भाषांतर केलेला ग्रीक शब्द, एकमेकांबद्दल प्रेम असलेल्या व एकमेकांचा आधार असलेल्या कुटुंबातील सदस्यांना एकत्र जोडणाऱ्‍या मजबूत बंधनाला सूचित करतो. त्यामुळे, हा शब्द वापरून पौल या गोष्टीवर भर देतो, की ज्याप्रमाणे कुटुंबातील सदस्यांना एकमेकांबद्दल जिव्हाळा वाटतो व त्यांच्यामध्ये ऐक्य असते, त्याचप्रमाणे मंडळीतील सदस्यांमधील नातेसंबंधदेखील तितकेच प्रेमळ व घट्ट असले पाहिजे. (रोम. १२:५) शिवाय, हेही आठवणीत ठेवा की पौलाने वरील शब्द अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना लिहिले होते, ज्यांना एकाच पित्याने म्हणजे यहोवाने मुले या नात्याने दत्तक घेतले होते. म्हणून, एका खास अर्थाने, ते एक कुटुंब होते. त्यामुळे, पौलाच्या दिवसांतील अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांजवळ एकमेकांना आदर दाखवण्याचे खरोखरच एक सबळ कारण होते. हीच गोष्ट आजच्या काळातील अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांबद्दलही खरी आहे.

पण, जे ‘दुसऱ्‍या मेंढरांपैकी’ आहेत त्यांच्याबद्दल काय म्हणता येईल? (योहा. १०:१६) देवाने अद्याप त्यांना आपली मुले या नात्याने दत्तक घेतले नसले, तरीही एका जगव्याप्त ख्रिस्ती कुटुंबाचे सदस्य असल्यामुळे, ते उचितपणे एकमेकांना बंधू किंवा बहीण म्हणू शकतात. (१ पेत्र २:१७; ५:९) त्यामुळे, आपण एकमेकांना “बंधू” किंवा “बहीण” असे का संबोधतो याचे महत्त्व दुसऱ्‍या मेंढरांतील सदस्यांनी पूर्णपणे समजून घेतले, तर त्यांच्याजवळदेखील आपल्या सहविश्‍वासू बांधवांना मनापासून आदर दाखवण्याचे एक सबळ कारण असेल.१ पेत्र ३:८ वाचा.

आदर दाखवणे महत्त्वाचे का आहे?

१०, ११. इतरांबद्दल मनात आदर बाळगणे व तो कृतींतून दाखवणे इतके महत्त्वाचे का आहे?

१० इतरांबद्दल मनात आदर बाळगणे व तो कृतींतून दाखवणे इतके महत्त्वाचे का आहे? आपण आपल्या बंधुभगिनींना आदर दाखवतो तेव्हा आपण संपूर्ण मंडळीच्या कल्याणाला व ऐक्याला मोठ्या प्रमाणात हातभार लावतो. त्यामुळे, इतरांना आदर दाखवणे महत्त्वाचे आहे.

११ अर्थात, आपल्याला याची जाणीव आहे की यहोवासोबत असलेला घनिष्ठ नातेसंबंध आणि त्याच्या आत्म्याची मदत, खरे ख्रिस्ती या नात्याने बळ मिळवण्याचे सगळ्यात प्रभावशाली मार्ग आहेत. (स्तो. ३६:७; योहा. १४:२६) पण त्याच वेळी, आपल्या सहविश्‍वासू बंधुभगिनींना आपल्याबद्दल वाटणारी कदर ते प्रदर्शित करतात तेव्हा आपल्याला प्रोत्साहन मिळते. (नीति. २५:११) एखाद्या व्यक्‍तीला आपल्याबद्दल कदर व आदर आहे हे ती आपल्या शब्दांतून किंवा कृतींतून व्यक्‍त करते तेव्हा आपल्याला उत्तेजन मिळते. त्यामुळे आपल्याला आनंदाने व दृढनिश्‍चयाने जीवनाच्या मार्गावर टिकून राहण्यास अतिरिक्‍त बळ मिळते. कदाचित तुम्हाला स्वतःला हा अनुभव आला असेल.

१२. आपल्यापैकी प्रत्येक जण मंडळीतील प्रेमळ वातावरणाला कशा प्रकारे हातभार लावू शकतो?

१२ आपल्याला आदर मिळवण्याची जन्मतःच गरज आहे हे यहोवाला माहीत आहे आणि त्यामुळे तो उचितपणे आपल्याला त्याच्या वचनाद्वारे असे आर्जवतो: “एकमेकांविषयी आदरभाव दाखवण्यास तत्पर असा.” (रोम. १२:१०, मराठी कॉमन लँग्वेज; मत्तय ७:१२ वाचा.) सर्वच ख्रिस्ती, या अढळ सल्ल्याचे मनापासून पालन करतात, तेव्हा ते ख्रिस्ती बंधुसमाजातील प्रेमळ वातावरणाला हातभार लावतात. त्यामुळे, एक क्षणभर थांबून आपण स्वतःला असे विचारले पाहिजे: ‘आपल्या शब्दांतून व कृतींतून मंडळीतील एखाद्या बंधू किंवा भगिनीबद्दल मला मनापासून आदर वाटत असल्याचे मी शेवटचे केव्हा व्यक्‍त केले होते?’—रोम. १३:८.

सर्वांकरता एक विशिष्ट नेमणूक

१३. (क) इतरांना आदर दाखवण्यात कोणी पुढाकार घेतला पाहिजे? (ख) रोमकर १:१ मधील पौलाच्या शब्दांतून काय सूचित होते?

१३ इतरांना आदर दाखवण्यात कोणी पुढाकार घेतला पाहिजे? बायबल दाखवून देते की याबाबतीत ख्रिस्ती वडिलांनी मंडळीकरता “कित्ते” असले पाहिजे. (१ पेत्र ५:३) हे खरे आहे की मंडळीतील वडील अनेक कार्यांतून मंडळीकरता कित्ता किंवा आदर्श घालून देतात. असे असले, तरी कळपाचे पालनपोषण करणारे या नात्याने, सहविश्‍वासू बंधुभगिनींना—ज्यात इतर वडिलांचादेखील समावेश होतो—आदर दाखवण्यात त्यांनी नक्कीच पुढाकार घेतला पाहिजे. उदाहरणार्थ, मंडळीच्या आध्यात्मिक गरजांबद्दल विचार करण्याकरता वडील एकत्र येतात, तेव्हा इतर वडिलांनी व्यक्‍त केलेले विचार काळजीपूर्वक ऐकून घेण्याद्वारे ते एकमेकांना आदर दाखवतात. सोबतच, एखादा निर्णय घेण्याआधी, सर्व वडिलांनी व्यक्‍त केलेली मते व विचार लक्षात घेण्याद्वारे ते इतर वडिलांना आदर दाखवतात. (प्रे. कृत्ये १५:६-१५) पण, आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की पौलाने रोमकरांना लिहिलेले पत्र केवळ वडिलांना उद्देशून लिहिले नव्हते, तर संपूर्ण मंडळीला लिहिले होते. (रोम. १:१) त्यामुळे, इतरांना आदर दाखवण्यात पुढाकार घेण्याबद्दलचा सल्ला, वडिलांसोबतच आज आपल्या सर्वांना लागू होतो.

१४. (क) आदर दाखवणे आणि आदर दाखवण्यात पुढाकार घेणे यात कोणता फरक आहे हे उदाहरण देऊन सांगा. (ख) आपण कोणते प्रश्‍न विचारले पाहिजेत?

१४ पौलाने दिलेल्या सल्ल्याचा आणखी एक पैलू लक्षात घ्या. त्याने रोममधील आपल्या सहविश्‍वासू बंधुभगिनींना केवळ आदर दाखवण्यास आर्जवले नाही, तर आदर दाखवण्यात पुढाकार घ्या असे आर्जवले. असे करणे इतके महत्त्वाचे का आहे? हे उदाहरण पाहा. एक शिक्षक, लिहायला-वाचायला येत असलेल्या विद्यार्थ्यांना वाचायला शिकण्याचा आर्जव करेल का? नाही. कारण, कसे वाचायचे ते त्यांना आधीपासूनच माहीत आहे. त्याऐवजी, विद्यार्थ्यांना आणखी चांगल्या प्रकारे वाचता यावे म्हणून शिक्षक त्यांना मदत करेल. त्याचप्रमाणे, प्रेम हे आधीपासूनच आपले ओळखचिन्ह असल्यामुळे आपण एकमेकांना प्रेम व आदर दाखवतो. (योहा. १३:३५) तरीसुद्धा, ज्याप्रमाणे साक्षर विद्यार्थी आपले वाचन कौशल्य सुधारण्याद्वारे आणखी प्रगती करू शकतात, त्याचप्रमाणे आदर दाखवण्यात पुढाकार घेण्याद्वारे आपण आदर दाखवण्याच्या बाबतीत आणखी प्रगती करू शकतो. (१ थेस्सलनी. ४:९, १०) इतरांना आदर दाखवण्यात पुढाकार घेण्याची ही विशिष्ट नेमणूक आपल्या प्रत्येकाला देण्यात आली आहे. तर मग, आपण स्वतःला असे विचारू शकतो, ‘मी ही नेमणूक पूर्ण करत आहे का? म्हणजे, मंडळीतील बंधुभगिनींना आदर दाखवण्यात मी पुढाकार घेत आहे का?’

‘दरिद्र्‌यांचा’ आदर करा

१५, १६. (क) इतरांना आदर दाखवताना आपण कोणाकडे दुर्लक्ष करू नये, आणि का? (ख) आपल्या सर्वच बंधुभगिनींबद्दल आपल्याला मनापासून आदर वाटतो हे कशावरून दिसून येईल?

१५ इतरांना आदर दाखवताना आपण मंडळीतील कोणाकडे दुर्लक्ष करू नये? देवाचे वचन म्हणते: “जो दरिद्र्‌यावर दया करितो तो परमेश्‍वराला उसने देतो; त्याच्या सत्कृत्याची फेड तो करील.” (नीति. १९:१७) आदर दाखवण्यात पुढाकार घेण्याचा कसोशीने प्रयत्न करत असताना, वरील शब्दांतील तत्त्वाचा आपल्यावर कोणता प्रभाव पडला पाहिजे?

१६ बहुतेक लोक आपल्या वरिष्ठांचा आदर करण्यास तयार असतात हे तुम्हीदेखील मान्य कराल. पण, हेच लोक ज्यांना आपल्यापेक्षा कनिष्ठ समजतात त्यांच्याशी कमी आदराने वागतात किंवा त्यांचा मुळीच आदर करत नाहीत. यहोवा मात्र तसा नाही. तो म्हणतो: “जे माझा आदर करितात त्यांचा मी आदर करीन.” (१ शमु. २:३०; स्तो. ११३:५-७) यहोवाची सेवा करणाऱ्‍या व त्याचा आदर करणाऱ्‍या सर्वांना तो आदर दाखवतो. तो ‘दरिद्र्‌याकडे’ दुर्लक्ष करत नाही. (१ शमुवेल २:८ वाचा; २ इति. १६:९) अर्थात, आपणही यहोवाचे अनुकरण करू इच्छितो. त्यामुळे, आपण इतरांना मनापासून किती आदर दाखवत आहोत हे जाणून घ्यायचे असल्यास, आपण स्वतःला हा प्रश्‍न विचारला पाहिजे: ‘मंडळीत सहसा इतरांच्या नजरेत न येणाऱ्‍यांशी, किंवा जबाबदार पदावर नसलेल्यांशी मी कशा प्रकारे वागतो?’ (योहा. १३:१४, १५) या प्रश्‍नाच्या उत्तरातून, इतरांबद्दल आपल्याला मनापासून किती आदर वाटतो याबद्दल खूप काही दिसून येते.फिलिप्पैकर २:३, ४ वाचा.

वेळ देण्याद्वारे आदर दाखवणे

१७. मंडळीतील सर्वांना आदर दाखवण्यात आपण कोणत्या एका प्रमुख मार्गाने पुढाकार घेऊ शकतो, आणि असे का म्हणता येईल?

१७ मंडळीतील सर्वांना आदर दाखवण्यात आपण कोणत्या एका प्रमुख मार्गाने पुढाकार घेऊ शकतो? इतरांना वेळ देण्याद्वारे आपण असे करू शकतो. असे का म्हणता येईल? ख्रिस्ती असल्यामुळे आपण नेहमी व्यस्त असतो आणि मंडळीतील अनेक महत्त्वाची कार्ये पूर्ण करण्यातच आपला बहुतेक वेळ खर्च होतो. त्यामुळे, साहजिकच वेळ आपल्याकरता अनमोल आहे. शिवाय, आपल्या बंधुभगिनींनी आपल्याला भरपूर वेळ द्यावा अशी मागणी आपण करू नये ही जाणीवदेखील आपण बाळगली पाहिजे. त्याच प्रकारे, मंडळीतील इतर जण आपल्याकडून भरपूर वेळेची मागणी न करण्याची जाणीव राखतात तेव्हा आपण त्यांची कदर करतो.

१८. पृष्ठ १८ वरील चित्रात दाखवल्याप्रमाणे, आपल्या सहविश्‍वासू बांधवांना थोडा वेळ देण्यास आपण इच्छुक आहोत हे आपण कसे दाखवू शकतो?

१८ पण त्याच वेळी, आपल्याला (खासकरून मंडळीत मेंढपाळ या नात्याने सेवा करणाऱ्‍यांना) याचीदेखील जाणीव असते की आपल्या सहविश्‍वासू बंधुभगिनींना थोडासा वेळ देण्यासाठी हातचे काम बाजूला ठेवण्याच्या तयारीतूनही आपल्याला त्यांच्याबद्दल आदर आहे हे दिसून येते. ते कसे? आपल्या बांधवांना थोडा वेळ देण्यासाठी आपण आपले काम थांबवतो तेव्हा आपण त्यांना जणू असे म्हणत असतो, ‘माझ्या नजरेत तुम्ही इतके मौल्यवान आहात की मी जे काम करत आहे त्याच्यापेक्षा तुमच्यासोबत थोडा वेळ घालवणे जास्त महत्त्वाचे आहे.’ (मार्क ६:३०-३४) पण, याच्या उलटदेखील घडू शकते. आपल्या बांधवाला थोडा वेळ देण्यासाठी आपण करत असलेले काम थांबवण्यास इच्छुक नसलो, तर आपण त्याला असे भासवू शकतो की आपल्या नजरेत त्याची किंमत नाही. अर्थात, काही वेळा एखादे जरुरीचे काम आपण थांबवू शकत नाही हे समजण्याजोगे आहे. तरीसुद्धा, आपल्या वेळेतून इतरांना थोडासा वेळ देण्याची आपली तयारी किंवा अनिच्छा यातून आपल्या बंधुभगिनींबद्दल आपल्या मनात किती आदर आहे हे दिसून येते.—१ करिंथ. १०:२४.

पुढाकार घेण्यास दृढनिश्‍चयी असा

१९. इतरांना वेळ देण्याव्यतिरिक्‍त आणखी कोणत्या मार्गाने आपण आपल्या सहविश्‍वासू बांधवांना आदर दाखवू शकतो?

१९ इतर अनेक महत्त्वाच्या मार्गांनीदेखील आपण आपल्या सहविश्‍वासू बांधवांना आदर दाखवू शकतो. उदाहरणार्थ, आपल्या बांधवांना वेळ देण्यासोबतच, आपण त्यांच्याकडे लक्ष दिले पाहिजे. याबाबतीतही यहोवा उत्तम उदाहरण मांडतो. स्तोत्रकर्त्या दाविदाने असे म्हटले: “परमेश्‍वराचे नेत्र नीतिमानांकडे असतात; त्याचे कान त्यांच्या हाकेकडे असतात.” (स्तो. ३४:१५) आपल्या बांधवांकडे, खासकरून मदतीसाठी आपल्याकडे येणाऱ्‍या बांधवांकडे आपले डोळे व कान अर्थात आपले संपूर्ण लक्ष लावण्याद्वारे आपण यहोवाचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो. असे करण्याद्वारे, आपण त्यांना आदर दाखवतो.

२०. आदर दाखवण्याच्या बाबतीत कोणत्या काही गोष्टी आपण आठवणीत ठेवू इच्छितो?

२० आपण आतापर्यंत पाहिल्याप्रमाणे, आपल्या सहविश्‍वासू बांधवांबद्दल आपल्या मनात आदर का असला पाहिजे हे आपण नेहमी लक्षात ठेवू इच्छितो. तसेच, सर्वांना, म्हणजे दरिद्र्‌यांनादेखील आदर दाखवण्याच्या बाबतीत आपण पुढाकार घेऊ इच्छितो. असे करण्याद्वारे, आपण मंडळीतील बंधुप्रेमाला व ऐक्याच्या बंधनाला आणखी मजबूत करू. म्हणून, आपण एकमेकांना केवळ आदर दाखवत राहू नये, तर आदर दाखवण्यात आपण पुढाकार घेत राहू या. असे करण्याचा तुम्ही दृढनिश्‍चय केला आहे का?

[तळटीप]

^ परि. 7 ८ व्या स्तोत्रातील दाविदाचे शब्द भविष्यसूचकदेखील आहेत. ते परिपूर्ण मनुष्य असलेल्या येशू ख्रिस्ताकडे निर्देश करतात.—इब्री २:६-९.

तुम्हाला आठवते का?

• मनात आदर असणे आणि तो कृतींतून दाखवणे यांचा एकमेकांशी काय संबंध आहे?

• आपल्या सहविश्‍वासू बांधवांना आदर दाखवण्याची कोणती कारणे आपल्याजवळ आहेत?

• एकमेकांना आदर दाखवणे का महत्त्वाचे आहे?

• आपल्या सहविश्‍वासू बांधवांना आपण कोणत्या मार्गांनी आदर दाखवू शकतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१८ पानांवरील चित्र]

आपण कशा प्रकारे आपल्या सहविश्‍वासू बांधवांना आदर दाखवू शकतो?