व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कारणे सांगणे याकडे यहोवा कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो?

कारणे सांगणे याकडे यहोवा कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो?

कारणे सांगणे याकडे यहोवा कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो?

“जी स्त्री तू मला सोबतीस दिली तिने त्या झाडाचे फळ मला दिले आणि ते मी खाल्ले,” असे पुरुषाने म्हटले. “सर्पाने मला भुरळ घातली म्हणून ते मी खाल्ले,” असे स्त्रीने उत्तर दिले. आपले पहिले मानवी पालक, आदाम व हव्वा यांनी देवाशी केलेल्या या संभाषणावरून, कारणे सांगण्याच्या मानवाच्या प्रदीर्घ इतिहासाची सुरुवात झाली.—उत्प. ३:१२, १३.

आदाम व हव्वेने यहोवाच्या आज्ञेचे जाणूनबुजून उल्लंघन केल्यामुळे त्याने त्यांच्यावर न्यायदंड बजावला. त्यावरून दिसून आले, की त्यांनी सांगितलेली कारणे देवाला मान्य नव्हती. (उत्प. ३:१६-१९) तर मग, आपण असा निष्कर्ष काढावा का, की मानवांनी दिलेली कोणतीच कारणे देवाला मान्य नसतात? की काही सबळ कारणे त्याला मान्य असतात? तसे असल्यास, सबळ कारणे आणि उडवाउडवीची कारणे यांतील फरक आपण कसा समजू शकतो? याचे उत्तर पाहण्यासाठी कारण सांगणे म्हणजे नेमके काय ते आधी आपण पाहू या.

कारण सांगणे म्हणजे आपण अमुक एक गोष्ट का केली, का केली नाही किंवा का करू शकत नाही यासाठी देण्यात आलेले स्पष्टीकरण. एखाद्या चुकीबद्दल देण्यात आलेले खरे स्पष्टीकरण व केलेल्या चुकीबद्दल प्रदर्शित केलेला मनस्वी खेद असा कारण सांगण्याचा अर्थ होऊ शकतो, ज्याच्या आधारावर एखाद्याला दया दाखवली जाऊ शकते किंवा क्षमा केले जाऊ शकते. पण, आदाम व हव्वा यांनी केले त्याप्रमाणे कारण सांगणे याचा अर्थ बहाणा करणे किंवा सत्यावर पांघरूण घालण्यासाठी सबब देणे असादेखील होऊ शकतो. बहुतेक वेळा, दिली जाणारी कारणे अशाच स्वरूपाची असतात, त्यामुळे कारणे सांगणे ही सर्वसामान्य बाब समजली जाते आणि म्हणूनच त्यांच्याकडे सहसा संशयाने पाहिले जाते.

कारणे सांगताना आणि खासकरून उपासनेच्या संदर्भात कारणे सांगताना “खोट्या तर्काद्वारे स्वतःची फसवणूक” होऊ नये म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे. (याको. १:२२, NW) तेव्हा, ‘प्रभूला काय संतोषकारक आहे हे पारखून घेण्यास’ आपल्याला साहाय्य करतील अशा काही बायबल उदाहरणांची व तत्त्वांची आपण चर्चा करू या.—इफिस. ५:१०.

देव आपल्याकडून काय अपेक्षा करतो

देवाच्या वचनात विशिष्ट आज्ञा दिलेल्या आहेत आणि यहोवाचे उपासक या नात्याने आपण त्यांचे पालन करावे अशी तो आपल्याकडून अपेक्षा करतो. उदाहरणार्थ, “तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा,” ही ख्रिस्ताने दिलेली आज्ञा आजही त्याच्या सर्व खऱ्‍या अनुयायांना लागू होते. (मत्त. २८:१९, २०) खरे पाहता, ही आज्ञा पूर्ण करणे इतके महत्त्वाचे आहे की प्रेषित पौलाने म्हटले: “मी सुवार्ता सांगितली नाही तर माझी केवढी दुर्दशा होणार!”—१ करिंथ. ९:१६.

पण, आपल्यासोबत बऱ्‍याच काळापासून बायबलचा अभ्यास करणारे काही जण अजूनही देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्यापासून अंग चोरतात. (मत्त. २४:१४) तर, एके काळी प्रचार कार्यात सहभाग घेणाऱ्‍या इतर काहींनी हे कार्य करण्याचे सोडून दिले आहे. आणि त्यासाठी ते कोणती कारणे देतात? गतकाळात आपल्या विशिष्ट आज्ञांचे पालन करण्यापासून कुचराई करणाऱ्‍यांप्रती यहोवाची काय प्रतिक्रिया होती?

देवाला मान्य नसलेली कारणे

“हे खूप कठीण आहे.” खासकरून स्वभावाने लाजरेबुजरे असलेल्यांना प्रचार कार्यात सहभाग घेणे खूप कठीण वाटू शकते. पण, योनाच्या उदाहरणावरून काय शिकण्यासारखे आहे त्याचा विचार करा. यहोवाने योनावर एक कामगिरी सोपवली होती. देवाने त्याला निनवे शहरावर येणाऱ्‍या न्यायदंडाची घोषणा करण्यास सांगितले. योनाला ही कामगिरी अतिशय कठीण वाटली. त्याला असे का वाटले हे आपण समजू शकतो. निनवे हे अश्‍शूरचे राजधानी शहर होते आणि तेथील रहिवासी लोकांचा अमानुष छळ करण्यासाठी कुख्यात होते. योनाने कदाचित असा विचार केला असेल: ‘असल्या लोकांमध्ये आपला काय टिकाव लागेल? त्यांनी माझं काही बरंवाईट केलं तर!’ या विचाराने त्याने लगेच पळ काढला. पण, योनाची कारणे यहोवाला मान्य नव्हती. उलट, यहोवाने त्याला पुन्हा निनवे शहरात जाऊन प्रचार करण्यास सांगितले. या वेळी मात्र योनाने त्याच्यावर सोपवलेली कामगिरी निर्भीडपणे पूर्ण केली आणि यहोवाने त्याचे प्रयत्न आशीर्वादित केले.—योना १:१-३; ३:३, ४, १०.

प्रचार करण्याची नेमणूक खूप कठीण आहे असे तुम्हाला वाटत असल्यास, एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्या, ती म्हणजे “देवाला सर्व काही शक्य आहे.” (मार्क १०:२७) तुम्ही मदतीसाठी नेहमी यहोवाला याचना केल्यास तो तुम्हाला बळ देईल याची खातरी तुम्ही बाळगू शकता. तसेच, तुमचे सेवाकार्य पार पाडण्यासाठी तुम्ही धैर्य एकवटता तेव्हा तो तुमचे प्रयत्न आशीर्वादित करेल याचीही तुम्ही खातरी बाळगू शकता.—लूक ११:९-१३.

“मला इच्छाच नाही.” ख्रिस्ती सेवाकार्य करण्याची इच्छाच तुमच्या मनात नसेल तर तुम्ही काय करू शकता? यहोवा तुमच्यामध्ये कार्य करून तुमच्या इच्छांवर प्रभाव पाडू शकतो हे केव्हाही विसरू नका. पौलाने म्हटले: “कारण स्वतः देवच तुमच्याठायी कार्य करीत आहे. त्याच्या सत्संकल्पानुसार तो तुम्हाला प्रेरणा देत आहे व ते कार्य तुमच्या हातून पार पाडीत आहे.” (फिलिप्पै. २:१३, मराठी कॉमन लँग्वेज भाषांतर) त्यामुळे, यहोवाची इच्छा पूर्ण करण्याची प्रेरणा त्याने तुम्हाला द्यावी अशी प्रार्थना तुम्ही त्याला करू शकता. दावीद राजाने नेमके हेच केले. त्याने यहोवाला अशी विनवणी केली: “मला तुझ्या सन्मार्गाने चालव.” (स्तो. २५:४, ५, सुबोध भाषांतर) तुम्हीदेखील असे करू शकता. यहोवाला आनंदी करण्यास प्रवृत्त करेल अशी इच्छा तुमच्या मनात उत्पन्‍न करण्यासाठी तुम्ही प्रार्थनेत त्याला विनवणी करू शकता.

हे कबूल आहे, की आपण दमलेले किंवा मनाने खचून गेलेले असतो तेव्हा राज्य सभागृहातील सभेला उपस्थित राहण्यासाठी अथवा सेवाकार्यात सहभाग घेण्यासाठी आपल्याला काही वेळा स्वतःला अक्षरशः भाग पाडावे लागते. तसे असल्यास, यहोवावर आपले खरे प्रेम नाही असा निष्कर्ष आपण काढावा का? मुळीच नाही. प्राचीन काळातील यहोवाच्या अनेक विश्‍वासू सेवकांनादेखील देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी पराकाष्ठेचा प्रयत्न करावा लागला होता. उदाहरणार्थ, देवाच्या आज्ञांचे पालन करण्यासाठी पौलाने जणू ‘आपले शरीर कुदलले’ असे त्याने म्हटले. (१ करिंथ. ९:२६, २७) तर मग, सेवाकार्य पार पाडण्यासाठी आपल्याला स्वतःला भाग पाडावे लागले, तरी यहोवा आपल्या प्रयत्नांवर आशीर्वाद देईल अशी खातरी आपण बाळगू शकतो. का बरे? कारण आपण एका योग्य कारणामुळे अर्थात यहोवावरील प्रेमामुळे त्याची इच्छा पूर्ण करण्यास स्वतःला भाग पाडत असतो. आपण असे करतो तेव्हा सैतानाने देवाच्या सेवकांवर लावलेल्या आरोपाला—देवाच्या सेवकांवर परीक्षा आल्यास ते त्याला नाकारतील—आपण प्रत्युत्तर देतो.—ईयो. २:४.

“माझ्याजवळ वेळच नाही.” अतिशय व्यस्त असल्यामुळे तुम्ही सेवाकार्यात सहभाग घेऊ शकत नाही असे तुम्हाला वाटत असल्यास, जीवनात तुम्ही कोणत्या गोष्टींना सगळ्यात महत्त्वाचे स्थान देता याचा आवर्जून फेरविचार करा. येशूने म्हटले: ‘तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य मिळविण्यास झटा.’ (मत्त. ६:३३) या मार्गदर्शक तत्त्वाचे पालन करण्यासाठी तुम्हाला कदाचित साधेसुधे जीवन जगावे लागेल किंवा तुम्ही मनोरंजनासाठी खर्च करत असलेल्या वेळातून काही वेळ काढून तो सेवाकार्यात उपयोग करावा लागेल. अर्थात, मनोरंजन व इतर वैयक्‍तिक बाबींना आपल्या जीवनात स्थान असले, तरी सेवाकार्याकडे दुर्लक्ष करण्याचे ते सबळ कारण असू शकत नाही. देवाचा सेवक नेहमी राज्याशी संबंधित कार्यांना आपल्या जीवनात पहिले स्थान देतो.

“ते करण्यास मी पात्र नाही.” सुवार्तेचा प्रचारक बनण्याची आपली पात्रता नाही असे कदाचित तुम्हाला वाटू शकते. यहोवाने आपल्यावर सोपवलेली कार्ये पूर्ण करण्यास आपण पात्र नाहीत असे बायबलच्या काळात देवाच्या काही सेवकांनादेखील वाटले. मोशेचेच उदाहरण विचारात घ्या. यहोवाने त्याच्यावर एक खास कामगिरी सोपवली तेव्हा त्याने म्हटले: “हे प्रभू, मी बोलका नाही; पूर्वीहि नव्हतो, व तू आपल्या दासापाशी बोललास तेव्हापासूनहि नाही; मी तर मुखाचा जड व जिभेचाहि जड आहे.” यहोवाने मोशेला मदतीचे आश्‍वासन दिले तरीसुद्धा तो म्हणाला: “हे प्रभू, तुझ्या मर्जीस येईल त्याच्या हस्ते त्यांस संदेश पाठीव.” (निर्ग. ४:१०-१३) त्यावर यहोवाची काय प्रतिक्रिया होती?

यहोवाने मोशेला त्याच्या जबाबदारीतून मुक्‍त केले नाही. पण, ती पार पाडण्यास त्याला मदत करण्यासाठी यहोवाने अहरोनाची नेमणूक केली. (निर्ग. ४:१४-१७) शिवाय, पुढे कितीतरी वर्षे यहोवा मोशेच्या पाठीशी उभा राहिला व त्याच्यावर सोपवण्यात आलेल्या जबाबदाऱ्‍या यशस्वीपणे पूर्ण करण्यास त्याने त्याला आवश्‍यक मदत पुरवली. आज तुमचे सेवाकार्य पूर्ण करण्यास तुम्हालाही मदत करण्यासाठी यहोवा अनुभवी बंधुभगिनींना प्रवृत्त करेल असा विश्‍वास तुम्ही बाळगू शकता. सर्वात मुख्य म्हणजे, यहोवाने आपल्याला जे कार्य करण्याची आज्ञा दिली आहे ते पूर्ण करण्यास तो आपल्याला पात्र करेल असे आश्‍वासन देवाचे वचन आपल्याला देते.—२ करिंथ. ३:५; “माझ्या आयुष्यातले सगळ्यात आनंदी वर्षं,” ही चौकट पाहा.

“कोणीतरी माझं मन दुखावलंय.” काही जण त्यांच्या भावना दुखावल्यामुळे सेवाकार्यात सहभाग घेण्याचे किंवा मंडळीच्या सभांना उपस्थित राहण्याचे बंद करतात, आणि असा तर्क करतात, की आध्यात्मिक रीत्या निष्क्रिय होण्यामागचे हे कारण यहोवा नक्कीच स्वीकारेल. हे खरे आहे, की आपल्या भावना दुखावल्या गेल्यामुळे आपण अस्वस्थ होतो. पण, ख्रिस्ती कार्यांमध्ये सहभाग घेणे सोडून देण्याचे हे उचित कारण आहे का? पौल आणि त्याचा सहविश्‍वासू बांधव बर्णबा यांच्यात “तीव्र मतभेद उपस्थित” झाल्यामुळे त्यांच्या भावना दुखावल्या असतील. (प्रे. कृत्ये १५:३९) पण, या कारणावरून त्या दोघांपैकी कोणीही सेवाकार्यात सहभाग घेण्याचे सोडून दिले का? मुळीच नाही!

त्याचप्रमाणे, मंडळीतील एखाद्या बंधू किंवा बहिणीने तुमच्या भावना दुखावल्या, तर नेहमी लक्षात असू द्या की तुमचा शत्रू मुळात, तुमचा अपरिपूर्ण ख्रिस्ती बंधू किंवा बहीण नव्हे, तर तुम्हाला गिळंकृत करण्याची वाट पाहणारा सैतान आहे. पण, तुम्ही ‘त्याच्याविरुद्ध विश्‍वासात दृढ असे उभे राहिलात,’ तर तो केव्हाही यशस्वी होऊ शकणार नाही. (१ पेत्र ५:८, ९; गलती. ५:१५) तुमचा विश्‍वास दृढ असल्यास तुमच्यावर कधीच ‘फजित होण्याची’ वेळ येणार नाही.—रोम. ९:३३.

मर्यादांमुळे जास्त सहभाग घेणे शक्य नसते तेव्हा . . .

वर उल्लेखिलेल्या काही कारणांवरून हे स्पष्ट होते, की सुवार्तेचा प्रचार करण्याच्या आज्ञेचे व यहोवाच्या इतर विशिष्ट आज्ञांचे पालन न करण्याची कोणतीही उचित शास्त्रवचनीय कारणे नाहीत. पण, आपण सेवाकार्यात जास्त सहभाग का घेऊ शकत नाही याची काही उचित कारणेही असू शकतात. उदाहरणार्थ, इतर शास्त्रवचनीय जबाबदाऱ्‍यांमुळे आपण प्रचार कार्याला कदाचित पूर्वीइतका वेळ देऊ शकत नाही. शिवाय, अधूनमधून आपण खरोखरच इतके दमून जाऊ शकतो किंवा इतके आजारी पडू शकतो, की इच्छा असूनही आपण यहोवाच्या सेवेत जास्त करू शकत नाही. पण, देवाचे वचन आपल्याला आश्‍वासन देते, की देवाला आपली मनस्वी इच्छा ठाऊक आहे आणि तो आपल्या मर्यादा विचारात घेतो.—स्तो. १०३:१४; २ करिंथ. ८:१२.

म्हणून, याबाबतीत आपला स्वतःचा किंवा इतरांचा कठोरपणे न्याय न करण्याची काळजी आपण घेतली पाहिजे. प्रेषित पौलाने लिहिले: “दुसऱ्‍याच्या चाकराला दोष लावणारा तू कोण आहेस? तो स्थिर राहिला काय किंवा त्याचे पतन झाले काय, तो त्याच्या धन्याचा प्रश्‍न आहे.” (रोम. १४:४) इतरांशी आपल्या परिस्थितीची तुलना करण्याऐवजी आपण हे आठवणीत ठेवले पाहिजे की, “आपणातील प्रत्येक जण आपआपल्यासंबंधी [देवाला] हिशेब देईल.” (रोम. १४:१२; गलती. ६:४, ५) म्हणून, आपण प्रार्थनेत यहोवापुढे आपली कारणे मांडतो तेव्हा आपल्यापैकी प्रत्येकाने ते ‘चांगल्या विवेकभावाने’ करावे.—इब्री १३:१८.

यहोवाची सेवा केल्याने आपल्याला आनंद का मिळतो?

आपल्या प्रत्येकाची परिस्थिती काहीही असली, तरी आपण सर्व जण मोठ्या आनंदाने यहोवाची सेवा करू शकतो, कारण त्याच्या अपेक्षा नेहमी वाजवी व पूर्ण करता येण्याजोग्या असतात. असे का म्हणता येईल?

देवाचे वचन म्हणते: “एखाद्याचे बरे करणे उचित असून ते करण्याचे तुझ्या अंगी सामर्थ्य असल्यास, ते करण्यास माघार घेऊ नको.” (नीति. ३:२७) या नीतिसूत्रात देवाच्या अपेक्षांसंबंधी एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का? देवाच्या सेवेत जितके तुमच्या बांधवाला जमते तितकेच करण्यासाठी तुम्हीदेखील झटावे अशी आज्ञा यहोवा देत नाही, तर तुम्ही ‘तुमच्या अंगी असलेल्या सामर्थ्याने’ त्याची सेवा करावी अशी आज्ञा तो देतो. होय, आपण दुबळे असू किंवा शक्‍तीशाली असू, आपल्यापैकी प्रत्येकाला यहोवाची जिवेभावे सेवा करणे शक्य आहे.—लूक १०:२७; कलस्सै. ३:२३.

[१४ पानांवरील चौकट/ चित्र]

“माझ्या आयुष्यातले सगळ्यात आनंदी वर्षं”

आपण शारीरिक किंवा भावनिक रीत्या अतिशय कमजोर असलो, तरी आपण तडकाफडकी असा निष्कर्ष काढू नये, की सेवाकार्यात पूर्णार्थाने सहभाग घेणे आपल्याला जमणार नाही. याबाबतीत कॅनडातील अर्नस्ट नावाच्या एका ख्रिस्ती बांधवाचे उदाहरण विचारात घ्या.

अर्नस्ट यांना एक प्रकारचा वाचा-दोष होता. शिवाय, स्वभावानेही ते फार बुजरे होते. त्यांच्या पाठीला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना बांधकाम कर्मचाऱ्‍याची नोकरी सोडून द्यावी लागली होती. त्यांच्या हालचालींवर मर्यादा आल्या असल्या, तरी नव्याने उद्‌भवलेल्या या परिस्थितीमुळे त्यांना सेवाकार्यातील आपला सहभाग वाढवणे शक्य झाले. मंडळीच्या संभांमध्ये साहाय्यक पायनियर सेवा करण्यासाठी देण्यात आलेल्या उत्तेजनामुळे ही सेवा करण्याची प्रबळ इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली. पण, या सेवेसाठी आपण पात्र नाहीत असे त्यांना वाटले.

साहाय्यक पायनियर सेवा करणे आपल्या क्षमतेपलीकडे आहे हे सिद्ध करण्यासाठी या बांधवाने एका महिन्यासाठी साहाय्यक पायनियर सेवा करण्याचा अर्ज केला. ही नेमणूक त्यांनी यशस्वी रीत्या पूर्ण केली तेव्हा त्याचे त्यांनाच आश्‍चर्य वाटले. मग त्यांनी विचार केला, ‘मला नाही वाटत मी पुन्हा कधी हे करू शकेन.’ ही गोष्ट सिद्ध करण्यासाठी त्यांनी दुसऱ्‍यांदा साहाय्यक पायनियर सेवेसाठी अर्ज केला आणि पुन्हा एकदा ते यशस्वी झाले.

अर्नस्ट यांनी वर्षभर साहाय्यक पायनियर सेवा केली. पण त्यांनी विचार केला, “मला पक्कं ठाऊक आहे, मी सामान्य पायनियर बनूच शकणार नाही.” पुन्हा एकदा हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी सामान्य पायनियर सेवेकरता अर्ज केला. त्यांनी सामान्य पायनियर सेवेचे पहिले वर्ष यशस्वीपणे पूर्ण केले तेव्हा त्याचे त्यांनाच आश्‍चर्य वाटले. त्यांनी ही सेवा चालू ठेवण्याचे ठरवले आणि तब्बल दोन वर्षे म्हणजे त्यांच्या पाठीच्या दुखण्यामुळे त्यांचा मृत्यू होईपर्यंत त्यांनी सामान्य पायनियर सेवा केली. पण, त्यांच्या मृत्यूच्या आधी, त्यांना भेटायला येणाऱ्‍या सर्वांना ते अश्रूपूर्ण नेत्रांनी नेहमी हे सांगायचे, “पायनियर या नात्यानं मी यहोवाची सेवा केली ते माझ्या आयुष्यातले सगळ्यात आनंदी वर्षं होते.”

[१३ पानांवरील चित्र]

सेवाकार्यात सहभाग घेण्यापासून आपल्याला रोखू शकणाऱ्‍या कोणत्याही अडथळ्यांवर आपण मात करू शकतो

[१५ पानांवरील चित्र]

आपल्या परिस्थितीनुसार आपण जिवेभावे यहोवाची सेवा करतो तेव्हा त्याला आनंद होतो