व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती सभा प्रोत्साहनदायक बनवण्यासाठी तुम्ही योगदान करता का?

ख्रिस्ती सभा प्रोत्साहनदायक बनवण्यासाठी तुम्ही योगदान करता का?

ख्रिस्ती सभा प्रोत्साहनदायक बनवण्यासाठी तुम्ही योगदान करता का?

“तुम्ही उपासनेकरिता एकत्र जमता तेव्हा . . . सर्व काही उन्‍नतीसाठी असावे.”—१ करिंथ. १४:२६.

१. करिंथकरांना लिहिलेल्या पहिल्या पत्राच्या १४ व्या अध्यायानुसार ख्रिस्ती सभांचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट काय आहे?

 “खरंच, कित्ती छान होती आजची मिटिंग!” राज्य सभागृहात एखाद्या सभेला उपस्थित राहिल्यानंतर तुमच्या तोंडून कधी असे उद्‌गार निघालेत का? नक्कीच निघाले असतील! मंडळीच्या सभा खरोखरच उत्तेजनाचा स्रोत आहेत. पण, त्यात आश्‍चर्य वाटण्याचे कारण नाही. शेवटी, सुरुवातीच्या ख्रिश्‍चनांच्या काळात होते त्याचप्रमाणे आजसुद्धा आपल्या सभांचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. ते म्हणजे उपस्थित असलेल्या सर्वांना आध्यात्मिक रीत्या दृढ करणे. या विशिष्ट उद्दिष्टावर, करिंथकरांना लिहिलेल्या पहिल्या पत्रात प्रेषित पौल कशा प्रकारे जोर देतो याकडे लक्ष द्या. सबंध १४ व्या अध्यायात तो वारंवार हेच सांगतो, की ख्रिस्ती सभांमध्ये सादर केल्या जाणाऱ्‍या प्रत्येक भागाचे एकच उद्दिष्ट असले पाहिजे. ते म्हणजे, ‘मंडळीची उन्‍नती’ करणे.—१ करिंथकर १४:३, १२, २६ वाचा. *

२. (क) प्रोत्साहनदायक ख्रिस्ती सभा कशामुळे शक्य होतात? (ख) आपण कोणत्या प्रश्‍नाची चर्चा करणार आहोत?

आपल्याला हे माहीत आहे, की उन्‍नतीकारक किंवा प्रोत्साहनदायक सभा या मुळात देवाच्या पवित्र आत्म्याच्या प्रभावामुळे शक्य होतात. म्हणूनच, मंडळीच्या प्रत्येक सभेची सुरुवात आपण यहोवाला मनःपूर्वक प्रार्थना करण्याद्वारे करतो आणि आपल्या स्वर्गीय पित्याने त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे ख्रिस्ती सभेवर आशीर्वाद द्यावा अशी प्रार्थनेत त्याला विनंती करतो. असे असले, तरी ख्रिस्ती सभा शक्य तितक्या प्रोत्साहनदायक व्हाव्यात म्हणून मंडळीतील सर्व सदस्य हातभार लावू शकतात हे आपण जाणतो. तर मग, राज्य सभागृहात भरवल्या जाणाऱ्‍या साप्ताहिक सभा नेहमी आध्यात्मिक रीत्या तजेला देणाऱ्‍या व प्रोत्साहनदायक आहेत याची खातरी करण्यासाठी आपण वैयक्‍तिकपणे कोणती पावले उचलू शकतो?

३. ख्रिस्ती सभा किती महत्त्वाच्या आहेत?

या प्रश्‍नाचे उत्तर पाहण्यासाठी, आपण ख्रिस्ती सभांच्या काही पैलूंचे परीक्षण करणार आहोत. सभा संचालित करणाऱ्‍या बांधवांनी हे पैलू नेहमी लक्षात ठेवावेत. तसेच, उपस्थित असलेल्या सर्वांना ख्रिस्ती सभा उभारणीकारक वाटाव्यात म्हणून मंडळीतील प्रत्येक जण कशा प्रकारे योगदान करू शकतो हेदेखील आपण पाहणार आहोत. हा आपल्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे, कारण ख्रिस्ती सभा वास्तवात पवित्र मेळावे आहेत. सभांना उपस्थित राहणे व सभांमध्ये सहभाग घेणे ही खरोखरच आपल्या उपासनेची महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये आहेत.—स्तो. २६:१२; १११:१; यश. ६६:२२, २३.

बायबलचा अभ्यास करण्यासाठी रचलेली एक सभा

४, ५. टेहळणी बुरूज अभ्यासाचे उद्दिष्ट काय आहे?

आपण सर्व जण आपल्या साप्ताहिक टेहळणी बुरूज अभ्यासाचा पुरेपूर लाभ घेऊ इच्छितो. तेव्हा, या सभेचे प्रमुख उद्दिष्ट स्पष्टपणे समजून घेण्यासाठी टेहळणी बुरूज नियतकालिकात व अभ्यास लेखांत करण्यात आलेल्या काही फेरबदलांची आपण उजळणी करू या.

टेहळणी बुरूजच्या जानेवारी १५, २००८ अंकाच्या पहिल्या अभ्यास आवृत्तीपासून सदर नियतकालिकाच्या मुखपृष्ठावर एक महत्त्वपूर्ण गोष्ट समाविष्ट करण्यात आली होती. तुम्ही त्याची दखल घेतली का? तुमच्या हातात असलेले नियतकालिक पुन्हा एकदा न्याहाळून पाहा. या नियतकालिकाच्या मुखपृष्ठावरील बुरुजाच्या पायथ्याशी तुम्हाला एक उघडलेले बायबल दिसेल. हे नवीन वैशिष्ट्य, आपण टेहळणी बुरूज अभ्यास का करतो याचे कारण अधोरेखित करते. ते म्हणजे या नियतकालिकाच्या साहाय्याने बायबल अभ्यास करणे. होय, आपल्या साप्ताहिक टेहळणी बुरूज अभ्यासात देवाचे वचन लोकांना समजेल अशा रीतीने ‘उलगडून सांगितले’ जाते आणि प्राचीन काळच्या नहेम्याच्या दिवसांत केले जायचे त्याप्रमाणेच आजही देवाच्या वचनाचा ‘अर्थ स्पष्ट करून’ सांगितला जातो.—नहे. ८:८, ईझी टू रीड व्हर्शन; यश. ५४:१३.

६. (क) टेहळणी बुरूज अभ्यासात कोणता फेरबदल करण्यात आला होता? (ख) “वाचा” असे चिन्हित असलेल्या शास्त्रवचनांसंबंधी कोणती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे?

बायबल हे आपले मुख्य पाठ्यपुस्तक असल्यामुळे, टेहळणी बुरूज अभ्यासात एक फेरबदल करण्यात आला होता. अभ्यास लेखांत उल्लेखित अनेक शास्त्रवचने “वाचा” अशी चिन्हित करण्यात आली आहेत. आपल्या सर्वांना असे प्रोत्साहन देण्यात येते, की सभेदरम्यान ही वचने वाचली जातात तेव्हा आपण आपापल्या बायबलमध्ये ही वचने पाहावीत. (प्रे. कृत्ये १७:११) का बरे? कारण देवाचा सल्ला आपण आपल्या स्वतःच्या बायबलमध्ये वाचतो तेव्हा आपल्या मनावर त्याचा आणखी गहिरा प्रभाव पडतो. (इब्री ४:१२) तेव्हा मंडळीत ही वचने मोठ्याने वाचण्याआधी, सभा चालवणाऱ्‍या बांधवाने उपस्थित असलेल्या सर्वांना ही वचने उघडण्यासाठी व ती वाचली जात असताना आपापल्या बायबलमध्ये पाहण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा.

आपला विश्‍वास व्यक्‍त करण्यासाठी जास्त वेळ मिळतो

७. टेहळणी बुरूज अभ्यासादरम्यान आपल्याला काय करण्याची संधी मिळते?

टेहळणी बुरूज अभ्यास लेखांत करण्यात आलेला आणखी एक फेरबदल अभ्यास लेखांच्या लांबीसंबंधी आहे. अलीकडील वर्षांत, अभ्यास लेखांची लांबी कमी करण्यात आली आहे. यामुळे, टेहळणी बुरूज अभ्यासादरम्यान परिच्छेद वाचण्यात कमी वेळ खर्च होतो आणि उत्तरे देण्यासाठी जास्त वेळ मिळतो. या फेरबदलामुळे आता मंडळीत जास्तीत जास्त लोकांना छापील प्रश्‍नाचे उत्तर देण्याची, एखादे शास्त्रवचन व्यावहारिक रीत्या कसे लागू करता येईल हे सांगण्याची, बायबल तत्त्वांचे पालन करणे किती बुद्धिमानीचे आहे हे दाखवणारा एखादा संक्षिप्त अनुभव सांगण्याची किंवा इतर मार्गांनी आपला विश्‍वास शब्दांत व्यक्‍त करण्याची संधी मिळते. तसेच, अभ्यास लेखांतील चित्रांवर चर्चा करण्यासाठीदेखील थोडा वेळ दिला जावा.स्तोत्र २२:२२; ३५:१८; ४०:९ वाचा.

८, ९. टेहळणी बुरूज अभ्यास संचालकाची भूमिका काय आहे?

पण, विश्‍वास व्यक्‍त करण्यासाठी हा अतिरिक्‍त वेळ तेव्हाच मिळू शकतो जेव्हा उत्तरे देणारे संक्षिप्त उत्तरे देतात आणि सभा चालवणारा बांधव टेहळणी बुरूज अभ्यासादरम्यान स्वतः जास्त बोलण्याचे टाळतो. तर मग, उपस्थित असलेल्या सर्वांसाठी मंडळीची ही सभा प्रोत्साहनदायक व्हावी म्हणून कोणती गोष्ट अभ्यास चालवणाऱ्‍या बांधवाला त्याच्या स्वतःच्या टिपण्या आणि मंडळीतील इतरांची उत्तरे यांमध्ये योग्य समतोल राखण्यास मदत करू शकेल?

या प्रश्‍नाच्या उत्तरासाठी आपण एक उदाहरण विचारात घेऊ या. उत्तम प्रकारे संचालित केलेला टेहळणी बुरूज अभ्यास एका सुंदरशा पुष्पगुच्छासारखा आहे. ज्याप्रमाणे एका मोठ्या पुष्पगुच्छात अनेक निरनिराळ्या प्रकारची फुले असतात, त्याचप्रमाणे टेहळणी बुरूज अभ्यासादरम्यानही अनेक निरनिराळी उत्तरे दिली जातात. पुष्पगुच्छातील फुले वेगवेगळ्या आकाराची व रंगांची असतात. त्याच प्रकारे सभेमध्ये दिली जाणारी उत्तरेही वेगवेगळी असतात; काही छोटी, तर काही मोठी. शिवाय, उत्तरे देण्याची प्रत्येकाची पद्धतदेखील वेगळी असते. मग, अभ्यास संचालकाची भूमिका काय असते? संचालकाने अधूनमधून केलेल्या टिपण्या, पुष्पगुच्छात विचारपूर्वक खोचलेल्या तुरळक हिरव्यागार पानांसारख्या असतात. ही पाने, फुलांना व्यापून टाकत नाहीत. उलट, ती फुलांना आधार देतात व त्यांस सुशोभितपणे एकत्र गुंफण्यास मदत करतात. त्याच प्रकारे, अभ्यास चालवणाऱ्‍या बांधवाने ही गोष्ट लक्षात ठेवणे जरुरीचे आहे, की संचालक या नात्याने त्याची भूमिका मंडळीतील बंधुभगिनींना भारावून टाकणे नव्हे, तर त्यांनी केलेल्या स्तुतीपर शब्दांची प्रशंसा करणे ही आहे. होय, मंडळीतील बंधुभगिनींनी दिलेली अनेक निरनिराळी उत्तरे आणि संचालकाने उचित वेळी केलेल्या तुरळक टिपण्या कुशलतापूर्वक गुंफल्या जातात तेव्हा उपस्थित असलेल्या सर्वांनाच भावणारा शब्दांचा एक सुंदर गुच्छ तयार होतो.

‘आपण देवाला स्तुतीचा यज्ञ नित्य अर्पण करू या’

१०. सुरुवातीचे ख्रिस्ती, मंडळीच्या सभांकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहायचे?

१० पौलाने १ करिंथकर १४:२६-३३ मध्ये केलेल्या ख्रिस्ती सभांचे वर्णन वाचून, पहिल्या शतकात सभा कशा भरवल्या जायच्या याची आणखी चांगली समज आपल्याला प्राप्त होते. या वचनांवर आपले विचार मांडताना एका बायबल विद्वानाने लिहिले: “सुरुवातीच्या काळातील चर्च सभेची सगळ्यात उल्लेखनीय गोष्ट ही असावी की तेथे उपस्थित राहणारा प्रत्येक जण सभेला काहीतरी योगदान करण्याचा आपल्याला केवळ सन्मानच नाही, तर असे करणे आपले कर्तव्य आहे या भावनेने येत असे. तेथे येणारा प्रत्येक जण फक्‍त ऐकण्याच्या उद्देशाने येत नसे; तो केवळ काही मिळवण्यासाठी नव्हे, तर योगदान करण्यासाठीही यायचा.” खरोखर, ख्रिस्ती सभा म्हणजे आपला विश्‍वास व्यक्‍त करण्याचे प्रसंग आहेत या दृष्टिकोनातून सुरुवातीचे ख्रिस्ती, मंडळीच्या सभांकडे पाहायचे.—रोम. १०:१०.

११. (क) ख्रिस्ती सभा प्रोत्साहनदायक बनवण्यात कोणती गोष्ट मोठा हातभार लावते, आणि का? (ख) कोणत्या सूचनांचे पालन केल्याने आपण सभांमधील उत्तरांचा आपला दर्जा सुधारू शकतो? (तळटीप पाहा.)

११ सभांमध्ये आपण आपला विश्‍वास शब्दांत व्यक्‍त करतो तेव्हा ‘मंडळीच्या उन्‍नतीला’ मोठा हातभार लागतो. आपण अनेक वर्षांपासून सभांना उपस्थित राहत असलो, तरी आजही आपल्या बंधुभगिनींची उत्तरे ऐकणे हा आपल्यासाठी एक सुखद अनुभव आहे हे तुम्ही नक्कीच मान्य कराल. एखाद्या वयोवृद्ध विश्‍वासू बंधू किंवा भगिनीने मनापासून दिलेले उत्तर आपल्या हृदयाला भिडून जाते; एखाद्या प्रेमळ ख्रिस्ती वडिलांनी केलेल्या सूक्ष्म निरीक्षणामुळे आपल्या मनाला उभारी मिळते; तसेच एका लहानग्याने स्वतःहून, यहोवावर त्याचे किती प्रेम आहे हे दाखवणारे उत्तर दिल्यावर आपल्या चेहऱ्‍यावर स्मितहास्य उमटल्याशिवाय राहत नाही. यावरून हे स्पष्टपणे दिसून येते, की सभांमध्ये उत्तरे दिल्याने आपण सर्व जण ख्रिस्ती सभा प्रोत्साहनदायक बनवण्यास हातभार लावतो. *

१२. (क) मोशे आणि यिर्मया यांच्या उदाहरणांवरून काय शिकण्यासारखे आहे? (ख) सभांमध्ये उत्तरे देण्यात प्रार्थना कशा प्रकारे मदत करू शकते?

१२ स्वभावाने लाजरेबुजरे असलेल्यांना सभांमध्ये उत्तरे देणे खूप कठीण वाटू शकते. तुम्हालाही असे वाटत असल्यास, असे वाटणारे तुम्ही एकटेच नाहीत ही गोष्ट लक्षात ठेवणे साहाय्यक ठरू शकते. खरेतर, मोशे आणि यिर्मया यांच्यासारख्या देवाच्या विश्‍वासू सेवकांनीदेखील चारचौघांत बोलण्यास आपण असमर्थ आहोत असे म्हटले होते. (निर्ग. ४:१०; यिर्म. १:६) पण, यहोवाने या सेवकांना सार्वजनिक रीत्या आपली स्तुती करण्यास साहाय्य केले. त्याचप्रमाणे तो तुम्हालाही स्तुतीचा यज्ञ अर्पण करण्यास साहाय्य करेल. (इब्री लोकांस १३:१५ वाचा.) मग, सभांमध्ये उत्तरे देण्याच्या भीतीवर मात करण्यासाठी तुम्ही यहोवाची मदत कशी मिळवू शकता? पहिली गोष्ट म्हणजे, सभांची चांगली तयारी करा. मग, सभेला निघण्यापूर्वी यहोवाला प्रार्थना करा आणि सभेत उत्तर देण्याचे धैर्य त्याने तुम्हाला द्यावे अशी त्याला खास विनंती करा. (फिलिप्पै. ४:६) तुम्ही केलेली ही विनंती “त्याच्या इच्छेप्रमाणे” असल्यामुळे तुम्ही हा भरवसा बाळगू शकता, की यहोवा नक्कीच तुमच्या प्रार्थनेचे उत्तर देईल.—१ योहा. ५:१४; नीति. १५:२९.

सभांचे उद्दिष्ट—“उन्‍नति” करणे, “उत्तेजन व सांत्वन” देणे

१३. (क) उपस्थित असलेल्या सर्वांवर आपल्या सभांचा काय प्रभाव पडला पाहिजे? (ख) ख्रिस्ती वडिलांनी स्वतःला कोणता महत्त्वाचा प्रश्‍न विचारला पाहिजे?

१३ ख्रिस्ती सभांचे एक महत्त्वपूर्ण उद्दिष्ट आहे असे पौल म्हणतो. ते उद्दिष्ट म्हणजे उपस्थित असलेल्या सर्वांची “उन्‍नति” करणे आणि त्यांना “उत्तेजन व सांत्वन” देणे. * (१ करिंथ. १४:३) सभांमध्ये आपण जे भाग हाताळतो त्यांमुळे आपल्या बंधुभगिनींना उत्तेजन मिळते व त्यांच्या मनाला सांत्वन मिळते याची खातरी आज ख्रिस्ती वडील कशी करू शकतात? याचे उत्तर पाहण्यासाठी, येशूने त्याचे पुनरुत्थान झाल्यानंतर काही दिवसांनी भरवलेल्या एका सभेची आपण चर्चा करू या.

१४. (क) येशूने आयोजित केलेल्या एका सभेआधी कोणकोणत्या घटना घडल्या? (ख) ‘येशू जवळ येऊन शिष्यांशी बोलला’ तेव्हा त्यांना दिलासा का मिळाला असावा?

१४ प्रथम, या सभेच्या आधी कोणकोणत्या घटना घडल्या त्यांचा विचार करा. येशूला जिवे मारण्याच्या काही वेळाआधीच त्याचे प्रेषित “त्याला सोडून पळून गेले” आणि भाकीत केल्याप्रमाणे, त्यांची ‘दाणादाण होऊन ते सर्व आपआपल्या घरी गेले.’ (मार्क १४:५०; योहा. १६:३२) मग, आपल्या पुनरुत्थानानंतर येशूने, खचून गेलेल्या आपल्या प्रेषितांना एका खास सभेला बोलावले. * त्यानुसार, “अकरा शिष्य गालीलात जो डोंगर येशूने सांगून ठेविला होता त्यावर गेले.” शिष्य तेथे पोहचल्यानंतर, ‘येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलला.’ (मत्त. २८:१०, १६, १८) येशूने घेतलेल्या या पुढाकारामुळे प्रेषितांना किती दिलासा मिळाला असेल याची कल्पना करा! या सभेत येशूने कोणत्या विषयावर त्यांच्याशी चर्चा केली?

१५. (क) सभेत येशूने प्रेषितांसोबत कोणत्या विषयांवर चर्चा केली, पण कोणत्या गोष्टीची चर्चा त्याने केली नाही? (ख) त्या सभेचा प्रेषितांवर काय परिणाम झाला?

१५ येशूने, “सर्व अधिकार मला दिलेला आहे,” अशी घोषणा करून त्या सभेची सुरुवात केली. मग, त्याने त्यांच्यावर एक कामगिरी सोपवली: ‘तेव्हा तुम्ही जाऊन लोकांस शिष्य करा.’ शेवटी, त्याने त्यांना हे प्रेमळ आश्‍वासन दिले: “युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.” (मत्त. २८:१८-२०) पण, या सभेत येशूने काय केले नाही याकडे तुम्ही लक्ष दिले का? त्याने आपल्या प्रेषितांची कानउघाडणी केली नाही. काही क्षणांसाठी त्यांचा विश्‍वास डगमगला या गोष्टीचा पुन्हा उल्लेख करून त्याने त्यांच्या हेतूंवर शंका घेतली नाही किंवा त्यांच्या जखमेवर मीठ चोळले नाही. उलट, त्यांच्यावर एक महत्त्वाची जबाबदारी सोपवण्याद्वारे त्याचे व त्याच्या पित्याचे त्यांच्यावर किती प्रेम आहे याचे आश्‍वासन त्याने त्यांना दिले. येशूच्या या वागण्याचा त्याच्या प्रेषितांवर काय परिणाम झाला? त्यांना इतके बळ, उत्तेजन आणि सांत्वन मिळाले की त्या सभेच्या काही समयानंतर ते पुन्हा एकदा ‘शिकविण्याचे व सुवार्ता गाजविण्याचे’ कार्य करू लागले.—प्रे. कृत्ये ५:४२.

१६. सभा प्रोत्साहनदायक बनवण्यासाठी आज ख्रिस्ती वडील येशूच्या उदाहरणाचे अनुकरण कसे करतात?

१६ येशूचे अनुकरण करून आज ख्रिस्ती वडील सभांमधून आपल्या बंधुभगिनींना यहोवाचे त्याच्या लोकांवर असलेल्या अढळ प्रेमाचे आश्‍वासन देतात. (रोम. ८:३८, ३९) त्यामुळे सभांमध्ये कोणतेही भाग हाताळताना वडील आपल्या बंधुभगिनींच्या कमतरतांवर नव्हे, तर त्यांच्या चांगल्या गुणांवर लक्ष केंद्रित करतात. ते बांधवांच्या हेतूंवर शंका घेत नाहीत. उलट, आपल्या बंधुभगिनींचे यहोवावर प्रेम आहे व त्याच्या इच्छेनुसार वागण्याचा ते प्रयत्न करतात हे ते आपल्या बोलण्यातून दाखवतात. (१ थेस्सलनी. ४:१, ९-१२) अर्थात, काही वेळा ख्रिस्ती वडिलांना मंडळीच्या सुधारणेकरता संपूर्ण मंडळीला काही सल्ला देण्याची गरज भासेल. पण, मंडळीतील केवळ काहींनाच अशा सल्ल्याची गरज असेल, तर अशांना तो खासगीत देणे सगळ्यात चांगले. (गलती. ६:१; २ तीम. २:२४-२६) मंडळीशी बोलताना शक्य तेव्हा मंडळीची प्रशंसा करण्यास वडील प्रयत्नशील असतात. (यश. ३२:२) सभा संपल्यानंतर उपस्थित असलेल्या सर्वांनाच आध्यात्मिकदृष्ट्या ताजेतवाने व दृढ झाल्यासारखे वाटेल अशा रीतीने बोलण्याचा ते प्रयत्न करतात.—मत्त. ११:२८; प्रे. कृत्ये १५:३२.

एक सुरक्षित आश्रयस्थान

१७. (क) आपल्या सभा एक सुरक्षित आश्रयस्थान असणे पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाचे का आहे? (ख) ख्रिस्ती सभा प्रोत्साहनदायक बनवण्यासाठी तुम्ही वैयक्‍तिकपणे काय करू शकता? (“स्वतःसाठी व इतरांसाठी ख्रिस्ती सभा प्रोत्साहनदायक बनवण्याचे दहा मार्ग” ही चौकट पाहा.)

१७ सैतानाचे जग दिवसेंदिवस अधिकाधिक जुलमी, अत्याचारी होत आहे. तेव्हा, आपले ख्रिस्ती मेळावे सुरक्षित आश्रयस्थान अर्थात सांत्वनाचा स्रोत आहेत याची आपण खातरी केली पाहिजे. (१ थेस्सलनी. ५:११) काही वर्षांपूर्वी एका बहिणीला व तिच्या पतीला एका अतिशय खडतर प्रसंगाचा सामना करावा लागला. त्या काळाची आठवण काढून बहीण म्हणते: “आमच्यासाठी राज्य सभागृहात असणं म्हणजे यहोवाच्या प्रेमळ कुशीत असण्यासारखं होतं. सभागृहात आपल्या ख्रिस्ती बंधुभगिनींच्या सहवासात घालवलेल्या त्या वेळादरम्यान आम्ही आमचा भार यहोवावर टाकू शकतो असं आम्हाला वाटलं आणि आम्हाला आंतरिक शांती मिळाली.” (स्तो. ५५:२२) आपल्या सभांना उपस्थित राहणाऱ्‍या प्रत्येक व्यक्‍तीला असेच उत्तेजन व सांत्वन मिळो. तेव्हा, आपल्या ख्रिस्ती सभा प्रोत्साहनदायक बनवण्यासाठी आपण सतत योगदान करत राहू या.

[तळटीपा]

^ परि. 1 पहिल्या शतकातील ख्रिस्ती सभांची काही वैशिष्ट्ये संपुष्टात येतील असे भाकीत करण्यात आले होते. उदाहरणार्थ, पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांप्रमाणे आज आपण अन्य “भाषा” बोलत नाही किंवा “संदेश” भाकीत करत नाही. (१ करिंथ. १३:८; १४:५) असे असले, तरी आज ख्रिस्ती सभा कशा चालवल्या जाव्यात हे आणखी चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी पौलाने दिलेल्या सूचना आपल्याला मदत करतात.

^ परि. 11 आपण सभांमधील आपल्या उत्तरांचा दर्जा कसा सुधारू शकतो यावरील सूचनांसाठी टेहळणी बुरूज, सप्टेंबर १, २००३, पृष्ठे १९-२२ पाहा.

^ परि. 13 “उत्तेजन” आणि “सांत्वन” या दोन शब्दांतील फरक सांगताना, व्हाइन्स एक्सपोझिटरी डिक्शनरी ऑफ ओल्ड ॲण्ड न्यू टेस्टामेन्ट वर्ड्‌स म्हणते, की “सांत्वन” असे भाषांतरित केलेल्या ग्रीक शब्दातून, “[उत्तेजनापेक्षा] कितीतरी अधिक पटीने कोमलता” सूचित होते.—योहान ११:१९ पडताळून पाहा.

^ परि. 14 येशू “पाचशेपेक्षा अधिक बंधूंना दिसला,” असा पौलाने नंतर जो उल्लेख केला तोच हा प्रसंग असावा.—१ करिंथ. १५:६.

तुमचे उत्तर काय असेल?

• ख्रिस्ती सभा किती महत्त्वाच्या आहेत?

• सभेत दिलेल्या उत्तरांमुळे ‘मंडळीच्या उन्‍नतीला’ कसा हातभार लागतो?

• येशूने आपल्या अनुयायांसोबत घेतलेल्या सभेतून आपण काय शिकू शकतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२२, २३ पानांवरील चौकट/ चित्रे]

स्वतःसाठी व इतरांसाठी ख्रिस्ती सभा प्रोत्साहनदायक बनवण्याचे दहा मार्ग

पूर्वतयारी करा. सभागृहात चर्चा केल्या जाणाऱ्‍या साहित्याचा आधीच चांगला अभ्यास केल्याने तुम्हाला सभा अधिक अर्थपूर्ण वाटतील व सभांचा तुमच्या मनावर गहिरा प्रभाव पडेल.

नियमितपणे उपस्थित राहा. सभांमध्ये मोठ्या संख्येने लोक उपस्थित असतात तेव्हा प्रत्येकाला खूप उत्तेजन मिळते. त्यामुळे, सभांमध्ये तुमची उपस्थिती महत्त्वाची आहे.

वेळेवर या. सभा सुरू होण्यापूर्वी तुम्ही आपल्या जागेवर बसल्यास, यहोवाच्या उपासनेचा अविभाज्य भाग असलेल्या सुरुवातीच्या गीत व प्रार्थनेत तुम्ही सहभाग घेऊ शकता.

आवश्‍यक साहित्य घेऊन या. सभेला येताना बायबल व सभेत लागणारे आवश्‍यक साहित्य घेऊन या. यामुळे सभेत त्या साहित्याची चर्चा केली जात असताना तुम्ही आपल्या स्वतःच्या साहित्यात ते पाहू शकता व चर्चा केला जाणारा विषय अधिक चांगल्या प्रकारे समजू शकता.

विकर्षणे टाळा. उदाहरणार्थ, मोबाईलवरील मेसेजेस सभेदरम्यान वाचू नका, तर सभेनंतर वाचा. असे करण्याद्वारे तुम्ही आपल्या खासगी बाबींना त्यांच्या जागी ठेवता.

सहभाग घ्या. सभेत अधिकाधिक लोक उत्तरे देतात तेव्हा अनेकांना उत्तेजन मिळते व आपला विश्‍वास व्यक्‍त करणारी वेगवेगळी उत्तरे ऐकून उपस्थितांचा विश्‍वास दृढ होतो.

संक्षिप्त उत्तरे द्या. छोटी-छोटी उत्तरे दिल्याने जास्तीत जास्त लोकांना उत्तरे देण्याची संधी मिळते.

दिलेल्या नेमणुका पूर्ण करा. ईश्‍वरशासित सेवा प्रशालेत किंवा सेवा सभेत काही नेमणूक मिळाल्यास त्याची चांगली तयारी करा, चांगला सराव करा आणि शक्यतो आपली नेमणूक रद्द न करण्याचा कसोशीने प्रयत्न करा.

सहभाग घेणाऱ्‍यांची प्रशंसा करा. सभांमध्ये निरनिराळे भाग हाताळणाऱ्‍यांनी किंवा उत्तरे देणाऱ्‍यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांची प्रशंसा करा.

एकमेकांशी सहवास करा. सभेच्या आधी व नतंर एकमेकांना प्रेमळपणे अभिवादन केल्याने व त्यांच्याशी उत्तेजनपर संभाषण केल्याने, सभेला उपस्थित राहिल्याचा आपला आनंद द्विगुणित होतो व आपल्याला अनेक फायदे होतात.