व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

‘यहोवाचे मन कोणी ओळखले आहे?’

‘यहोवाचे मन कोणी ओळखले आहे?’

‘यहोवाचे मन कोणी ओळखले आहे?’

“प्रभूचे [“यहोवाचे,” NW] मन असे कोणी ओळखले आहे की त्याने त्याला शिकवावे? आपल्याला तर ख्रिस्ताचे मन आहे.”—१ करिंथ. २:१६.

१, २. (क) अनेकांना कोणती गोष्ट कठीण वाटते? (ख) आपली विचारसरणी व यहोवाची विचारसरणी याविषयी कोणती गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे?

 एक व्यक्‍ती कशा प्रकारे विचार करते हे समजून घेणे तुम्हाला कधी कठीण गेले आहे का? कदाचित, तुमचे नुकतेच लग्न झाले असेल आणि तुमच्या विवाहसोबत्याला पूर्णपणे समजून घेण्याचा कोणताच मार्ग नाही असे तुम्हाला वाटत असेल. खरेतर, स्त्री-पुरुष दोघेही वेगवेगळ्या पद्धतीने विचार करतात व वेगवेगळ्या प्रकारे आपली मते व्यक्‍त करतात. इतकेच काय, काही संस्कृतींमध्ये तर स्त्री-पुरुष एकाच भाषेच्या वेगवेगळ्या बोली बोलतात. शिवाय, निरनिराळ्या संस्कृती व भाषांची परिणती निरनिराळ्या विचारसरणीत व वर्तनात होते. तरीसुद्धा, तुम्ही जितके अधिक दुसऱ्‍यांना जाणून घेण्याचा प्रयत्न कराल, तितकी अधिक त्यांची विचारसरणी तुम्हाला समजू लागते.

त्यामुळे, आपली विचारसरणी व यहोवाची विचारसरणी यात खूप फरक आहे याचे आपल्याला आश्‍चर्य वाटू नये. यहोवाने आपला संदेष्टा यशया याच्याद्वारे इस्राएल लोकांना सांगितले: “माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नव्हत; माझे मार्ग तुमचे मार्ग नव्हत.” मग ही गोष्ट उदाहरण देऊन सांगताना यहोवाने पुढे असे म्हटले: “कारण आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे तसे माझे मार्ग तुमच्या मार्गांहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनांहून उंच आहेत.”—यश. ५५:८, ९.

३. कोणत्या दोन मार्गांनी आपण यहोवाशी जवळीक साधू शकतो?

पण, याचा अर्थ यहोवाची विचारसरणी समजून घेण्याचा आपण प्रयत्नच करू नये असा होतो का? नाही. आपण केव्हाही यहोवाचे सर्व विचार पूर्णपणे समजू शकत नसलो, तरी बायबल आपल्याला असे उत्तेजन देते की आपण ‘परमेश्‍वराशी सख्य’ करण्याचा किंवा जवळीक साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. (स्तोत्र २५:१४ वाचा.) यहोवाशी जवळचा नातेसंबंध जोडण्याचा एक मार्ग म्हणजे त्याचे वचन, बायबल यात नमूद असलेल्या यहोवाच्या कार्यांचा आदर करणे व त्यांकडे लक्ष देणे. (स्तो. २८:५) तर, “अदृश्‍य देवाचे प्रतिरूप” असलेल्या “ख्रिस्ताचे मन” जाणून घेणे हा यहोवाशी जवळीक साधण्याचा दुसरा मार्ग आहे. (१ करिंथ. २:१६; कलस्सै. १:१५) आपण बायबलमधील वृत्तान्तांचा अभ्यास करण्यासाठी व त्यांच्यावर मनन करण्यासाठी वेळ काढतो तेव्हा यहोवाचे गुण व त्याची विचारसरणी आपण समजू लागतो.

एका चुकीच्या प्रवृत्तीपासून सावध राहा

४, ५. (क) आपण कोणती चुकीची प्रवृत्ती टाळली पाहिजे? स्पष्ट करा. (ख) इस्राएल लोक कोणत्या चुकीच्या विचारसरणीला बळी पडले?

आपण यहोवाच्या कार्यांवर मनन करतो तेव्हा मानवी स्तरांच्या आधारावर देवाविषयी मत बनवण्याची प्रवृत्ती आपण टाळली पाहिजे. या प्रवृत्तीचा, यहोवाने स्तोत्र ५०:२१ मध्ये उल्लेख केला आहे. तेथे यहोवा म्हणतो: “मी तुझ्यासारखाच आहे असे तुला वाटले.” मानवांची ही प्रवृत्ती, सुमारे १७५ वर्षांपूर्वी एका बायबल विद्वानाने म्हटल्याप्रमाणे आहे: “लोक सहसा स्वतःच्या स्तरांनुसार देवाविषयी मत बनवण्याचा प्रयत्न करतात, आणि मानवांनी ज्या नियमांचे अनुपालन केले पाहिजे त्याच नियमांना देवसुद्धा बांधील आहे असा ते विचार करतात.”

आपण आपल्या स्वतःच्या स्तरांनुसार व इच्छेनुसार यहोवाविषयी आपले मत न बनवण्याची काळजी घेतली पाहिजे. हे इतके महत्त्वपूर्ण का आहे? आपण शास्त्रवचनांचा अभ्यास करतो तेव्हा आपल्या मर्यादित, अपरिपूर्ण दृष्टिकोनातून पाहता यहोवाची काही कार्ये आपल्याला फारशी योग्य वाटणार नाहीत. प्राचीन काळचे इस्राएल लोक अशाच विचारसरणीला बळी पडले आणि यहोवाने त्यांच्याशी केलेल्या व्यवहारांबद्दल त्यांनी चुकीचा निष्कर्ष काढला. यहोवाने त्यांना काय म्हटले त्याकडे लक्ष द्या: “तुम्ही म्हणता, प्रभूचा मार्ग न्याय्य नाही. हे इस्राएल घराण्या ऐक, माझा मार्ग न्याय्य नाही काय? तुमचेच मार्ग न्याय्य नाहीत, असे नव्हे काय?”—यहे. १८:२५.

६. ईयोब कोणता धडा शिकला आणि त्याच्या अनुभवावरून आपण काय शिकू शकतो?

आपल्या स्वतःच्या स्तरांनुसार यहोवाविषयी मत बनवण्याच्या पाशात न पडण्याचा एक मार्ग म्हणजे आपला दृष्टिकोन मर्यादित आणि कधीकधी सर्वस्वी चुकीचा असतो ही गोष्ट मान्य करणे. ईयोबाला हा धडा शिकण्याची गरज होती. त्याच्या दुःखाच्या काळात त्याला निराशेने ग्रासून टाकले, तो काहीसा आत्मकेंद्रित बनला आणि अधिक महत्त्वाच्या विषयांकडे त्याने दुर्लक्ष केले. पण, यहोवाने त्याला प्रेमळपणे त्याचा दृष्टिकोन रुंदावण्यास मदत केली. यहोवाने ईयोबाला ७० पेक्षा अधिक निरनिराळे प्रश्‍न विचारले ज्यांपैकी एकाही प्रश्‍नाचे उत्तर तो देऊ शकला नाही. अशा रीतीने, ईयोबाची समज किती मर्यादित आहे हे यहोवाने ठळकपणे दाखवून दिले. ईयोबाने नम्रपणे प्रतिसाद दिला आणि आपला दृष्टिकोन सुधारला.ईयोब ४२:१-६ वाचा.

“ख्रिस्ताचे मन” आत्मसात करणे

७. येशूच्या कार्यांचे परीक्षण केल्याने आपल्याला यहोवाची विचारसरणी समजणे का शक्य होते?

येशू जे काही बोलला व त्याने जे काही केले त्या प्रत्येक बाबतीत त्याने आपल्या पित्याचे तंतोतंत अनुकरण केले. (योहा. १४:९) त्यामुळे, आपण येशूच्या कार्यांचे परीक्षण करतो तेव्हा आपल्याला यहोवाची विचारसरणी समजणे शक्य होते. (रोम. १५:५; फिलिप्पै. २:५) तर मग, आपण शुभवर्तमानातील दोन वृत्तान्तांचे बारकाईने परीक्षण करू या.

८, ९. योहान ६:१-५ मध्ये नमूद केल्याप्रमाणे कोणती परिस्थिती निर्माण झाल्यामुळे येशूने फिलिप्पाला प्रश्‍न विचारला आणि येशूने असे का केले?

सा.यु. ३२ च्या वल्हांडण सणाच्या काही दिवसांपूर्वी घडलेला प्रसंग डोळ्यांसमोर आणा. येशूचे प्रेषित नुकतेच संपूर्ण गालीलातील उल्लेखनीय प्रचार दौरा संपवून परतले होते. या कार्यामुळे ते खूप थकले होते, त्यामुळे येशू त्यांना विश्रांती घेण्यासाठी गालील समुद्राच्या उत्तरपूर्व किनाऱ्‍याला असलेल्या एका एकांत ठिकाणी घेऊन गेला. पण, तेथे हजारो लोक त्यांच्या मागे आले. येशूने त्या जमावातील लोकांचे रोग बरे केले आणि त्यांना अनेक गोष्टी शिकवल्या. त्यानंतर एक मोठा प्रश्‍न उपस्थित झाला. एवढ्या लोकांना पुरेल इतके अन्‍न या अतिदुर्गम भागात कोठून मिळेल? ही गरज लक्षात घेऊन त्याच भागाचा रहिवासी असलेल्या फिलिप्पाला येशूने विचारले: “ह्‍यांना खावयाला आपण भाकरी कोठून विकत आणाव्या?”—योहा. ६:१-५.

येशूने फिलिप्पाला हा प्रश्‍न का विचारला? आता काय करावे असा प्रश्‍न येशूला पडला होता का? नाही. तो नेमका काय विचार करत होता? याचे स्पष्टीकरण, त्या प्रसंगी उपस्थित असलेला प्रेषित योहान देतो: “हे तर [येशूने] त्याची परीक्षा पाहण्याकरिता म्हटले; कारण आपण काय करणार आहो, हे त्याला ठाऊक होते.” (योहा. ६:६) येशूने या ठिकाणी आपल्या शिष्यांचा विश्‍वास किती वाढला आहे याची परीक्षा पाहिली. हा प्रश्‍न विचारून येशूने त्यांचे लक्ष वेधून घेतले आणि तो काय करू शकत होता त्यावरील त्यांचा विश्‍वास शब्दांत व्यक्‍त करण्याची संधी त्याने त्यांना दिली. पण, त्यांनी ही संधी हुकवली आणि त्याद्वारे आपला दृष्टिकोन खरोखर किती मर्यादित आहे हे दाखवले. (योहान ६:७-९ वाचा.) येशू काय करू शकतो याची प्रेषितांनी कल्पनाही केली नसेल असे काहीतरी त्याने करून दाखवले. त्याने हजारो भुकेल्या लोकांना चमत्कारिक रीत्या जेवू घातले.—योहा. ६:१०-१३.

१०-१२. (क) येशूने एका ग्रीक स्त्रीची मागणी लगेच पूर्ण का केली नसावी? स्पष्ट करा. (ख) आता आपण काय पाहणार आहोत?

१० आणखी एका प्रसंगी येशूने जे केले त्यावरून त्याची विचारसरणी समजून घेण्यास हा वृत्तान्त आपल्याला मदत करू शकतो. मोठ्या लोकसमुदायाला जेवू घातल्यानंतर येशू व त्याचे प्रेषित लगेच उत्तरेच्या दिशेने इस्राएलाच्या सरहद्दींपलीकडे निघाले आणि सोर व सिदोनाच्या परिसरात गेले. तेथे असताना त्यांना एक ग्रीक स्त्री भेटली. येशूने आपल्या मुलीला बरे करावे अशी ती त्याच्यापुढे गयावया करू लागली. सुरुवातीला येशूने तिच्याकडे दुर्लक्ष केले. पण, तिने त्याच्या मागे तगादा लावला तेव्हा तो तिला म्हणाला: “पहिल्याने मला माझ्या स्वतःच्या लोकांना मदत केली पाहिजे. मुलांचे जेवण कुत्र्याच्या पिलांना घालणे केव्हाही योग्य होणार नाही.”—मार्क ७:२४-२७, सुबोध भाषांतर.

११ येशूने सुरुवातीला त्या स्त्रीला मदत करण्याचे का बरे नाकारले? येशू फिलिप्पाप्रमाणेच तिलाही आपला विश्‍वास व्यक्‍त करण्याची संधी देऊन ती कशा प्रकारे प्रतिसाद देईल हे पाहण्यासाठी तिची परीक्षा पाहत होता का? येशू तिच्याशी कोणत्या स्वरात बोलला हे शास्त्रवचनांत स्पष्टपणे सांगितले नसले, तरी त्याचे बोलणे तिने मनाला लावून घेतले नाही. त्याने तिच्या लोकांची तुलना ‘कुत्र्याच्या पिलांशी’ करून त्या तुलनेची तीव्रता कमी केली. ज्याप्रमाणे मूल आपल्या पालकांकडे एखाद्या गोष्टीची मागणी करते तेव्हा पालकाला ती पूर्ण करण्याची इच्छा असते, पण आपल्या मुलाची जिद्द पाहण्यासाठी ते आपली इच्छा चेहऱ्‍यावर दाखवत नाहीत. अशाच प्रकारे, येशू कदाचित त्या स्त्रीशी एका पालकाप्रमाणे वागत असावा. ते काहीही असो, त्या स्त्रीने आपला विश्‍वास शब्दांतून व्यक्‍त केला तेव्हा येशूने स्वेच्छेने तिची मागणी पूर्ण केली.मार्क ७:२८-३० वाचा.

१२ शुभवर्तमानातील या दोन वृत्तान्तांतून “ख्रिस्ताचे मन” चांगल्या प्रकारे समजून घेणे आपल्याला शक्य होते. हे दोन वृत्तान्त आपल्याला यहोवाचे मन अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेण्यास कशी मदत करू शकतात ते आता आपण पाहू या.

यहोवाने मोशेसोबत केलेला व्यवहार

१३. येशूची विचारसरणी जाणून घेतल्याने आपल्याला काय करणे शक्य होते?

१३ ख्रिस्ताची विचारसरणी चांगल्या प्रकारे समजून घेतल्याने शास्त्रवचनांतील जे उतारे समजण्यास अवघड आहेत ते समजणे आपल्याला शक्य होते. उदाहरणार्थ, इस्राएल लोकांनी उपासनेसाठी एक सोन्याचे वासरू बनवले तेव्हा यहोवाने मोशेला काय म्हटले त्याकडे लक्ष द्या. देवाने म्हटले: “या लोकांना मी पाहिले आहे; ते फार ताठमानेचे लोक आहेत; ते नेहमी मजविरुद्ध उठतात. तर आता मला त्यांना माझ्या रागाच्या तडाख्याने नष्ट करू दे! नंतर मी तुझ्यापासून एक महान राष्ट्र निर्माण करीन.”—निर्ग. ३२:९, १०, ईझी टू रीड व्हर्शन.

१४. मोशेने यहोवाच्या म्हणण्याला काय प्रतिक्रिया व्यक्‍त केली?

१४ तो वृत्तान्त पुढे असे म्हणतो: “मोशेने आपला देव यहोवा, याची विनंती करून म्हटले, हे यहोवा, तुझ्या लोकांवर, ज्यांना तू आपल्या मोठ्या बळाने व पराक्रमी हाताने मिसर देशातून बाहेर काढून आणले त्यांच्यावर तुझा राग का भडकला? आणि मिसऱ्‍यांनी बोलून का म्हणावे की त्याने त्यांना डोंगरामध्ये जिवे मारून भूमीच्या पाठीवरून त्यांचा नाश करायला त्यांच्या वाइटासाठी त्यांना काढून आणले आहे? तू आपल्या उग्र संतापासून फीर, आणि आपल्या लोकांचे वाईट करण्याविषयी तू अनुताप कर. तू आपले सेवक अब्राहाम, इसहाक आणि इस्राएल यांची आठवण कर; त्यांच्याशी तू स्वतःचीच शपथ वाहून त्यांना म्हटले की मी तुमचे संतान आकाशातील ताऱ्‍यांसारखे पुष्कळपट करीन, आणि ज्या देशाविषयी मी सांगितले तो सर्व देश मी तुमच्या संतानाला देईन आणि तो सर्वकाळ त्यांचे वतन होईल. तेव्हा यहोवाने आपण आपल्या लोकांचे जे वाईट करू म्हणून म्हटले होते त्याविषयी अनुताप केला.”—निर्ग. ३२:११-१४, पं.र.भा. *

१५, १६. (क) यहोवाने जे म्हटले त्यामुळे मोशेला काय करण्याची संधी मिळाली? (ख) यहोवाने “अनुताप केला” याचा काय अर्थ होतो?

१५ मोशेला खरोखर यहोवाची विचारसरणी बदलण्याची गरज होती का? मुळीच नाही. आपण काय करणार आहोत याविषयी यहोवाने आपला विचार व्यक्‍त केला असला, तरी हा त्याचा अखेरचा न्यायदंड नव्हता. या ठिकाणी, यहोवा खरेतर मोशेची परीक्षा पाहत होता; येशूने फिलिप्पाची व त्या ग्रीक स्त्रीची परीक्षा पाहिली अगदी त्याप्रमाणे. यहोवाने मोशेला त्याचे मत व्यक्‍त करण्याची संधी दिली होती. * यहोवाने मोशेला त्याच्या व इस्राएल लोकांच्या मध्ये मध्यस्थ म्हणून नेमले होते आणि मोशेच्या या भूमिकेचा यहोवाने आदर केला. मोशे इस्राएल लोकांना वैतागून निर्णय घेणार होता का? यहोवाने इस्राएल लोकांना विसरून आपल्या वंशजांपासून एक बलाढ्य राष्ट्र निर्माण करावे म्हणून यहोवाचे मन वळवण्यासाठी मोशे या संधीचा फायदा घेणार होता का?

१६ मोशेच्या प्रतिक्रियेवरून त्याचा यहोवाच्या न्याय्यपणावर किती विश्‍वास व भरवसा होता हे दिसून आले. त्याने दाखवलेल्या प्रतिक्रियेतून त्याचा स्वार्थ नव्हे, तर यहोवाच्या नावाविषयी त्याला असलेली कळकळ व्यक्‍त झाली. देवाचे नाव कलंकित व्हावे अशी त्याची इच्छा नव्हती. अशा प्रकारे, मोशेने दाखवून दिले की सदर विषयावर “यहोवाचे मन” किंवा विचारसरणी काय आहे याची त्याला जाणीव होती. (१ करिंथ. २:१६) याचा परिणाम काय झाला? यहोवा विशिष्ट प्रकारे व्यवहार करण्यास बांधील नव्हता, त्यामुळे त्याने “अनुताप केला” असे बायबल म्हणते. हिब्रू भाषेत “अनुताप केला” या वाक्यांशाचा अर्थ असा होतो की, सबंध इस्राएल राष्ट्रावर यहोवा जे संकट आणण्याचा विचार करत होता ते त्याने आणले नाही.

यहोवाने अब्राहामासोबत केलेला व्यवहार

१७. यहोवाने कशा प्रकारे अब्राहामाच्या चिंतांसंबंधी अमाप धीर दाखवला?

१७ यहोवा आपल्या सेवकांना त्यांचा विश्‍वास व भरवसा व्यक्‍त करण्याची संधी कशी देतो याचे आणखी एक उदाहरण अब्राहामाने सदोम नगराविषयी यहोवाकडे केलेल्या विनंतीसंबंधी आहे. त्या वृत्तान्तात पाहायला मिळते, की यहोवाने अब्राहामाला एकापाठोपाठ एक असे आठ प्रश्‍न विचारण्याची संधी देऊन अमाप धीर दाखवला. एके प्रसंगी अब्राहाम अतिशय कळकळीने अशी विनवणी करतो: “या प्रकारची कृति तुजपासून दूर राहो. नीतिमानाची आणि दुष्टाची सारखीच गत होईल असा दुर्जनाबरोबर नीतिमानाचा वध करणे तुजपासून दूर राहो; सर्व जगाचा न्यायाधीश योग्य न्याय करणार नाही काय?”—उत्प. १८:२२-३३.

१८. यहोवाने अब्राहामासोबत केलेल्या व्यवहारातून आपण काय शिकतो?

१८ या वृत्तान्तावरून आपण यहोवाच्या विचारसरणीविषयी काय शिकतो? यहोवाला योग्य निर्णय घेता यावा म्हणून अब्राहामाने त्याच्याशी तर्कवितर्क करण्याची गरज होती का? नाही. अर्थात, आपण हा निर्णय का घेत आहोत याची कारणे यहोवा सुरुवातीलाच सांगू शकत होता. पण अब्राहामाला प्रश्‍न विचारण्याची अनुमती देण्याद्वारे, आपण घेतलेला निर्णय स्वीकारण्यासाठी व आपली विचारसरणी समजून घेण्यासाठी यहोवाने त्याला वेळ दिला. तसेच यामुळे, यहोवा किती दयाळू व न्यायी आहे हे जाणून घेण्याची संधीही अब्राहामाला मिळाली. होय, यहोवा अब्राहामाशी एका मित्राप्रमाणे वागला.—यश. ४१:८; याको. २:२३.

आपल्याकरता धडे

१९. आपण ईयोबाचे अनुकरण कसे करू शकतो?

१९ ‘यहोवाच्या मनाविषयी’ आपण काय शिकलो आहोत? यहोवाचे मन जाणून घेण्यासाठी आपण देवाच्या वचनानुसार आपल्या समजबुद्धीला आकार दिला पाहिजे. आपण केव्हाही आपल्या मर्यादा यहोवावर लादू नयेत आणि आपल्या स्तरांच्या व विचारसरणीच्या आधारावर यहोवाविषयी मत बनवू नये. ईयोबाने म्हटले: “मी [देवाशी] वाद करावा, आम्ही एकमेकांत लढा माजवावा, असा तो माझ्यासारखा मानव नाही.” (ईयो. ९:३२) ईयोबाप्रमाणे आपल्याला यहोवाचे मन समजू लागते तेव्हा आपणही असे म्हणण्यास प्रवृत्त होतो: “पाहा; ह्‍या त्याच्या कार्यक्षेत्राच्या केवळ सीमा आहेत; त्याची केवळ चाहूल आपल्या कानी येते; पण त्याच्या प्रभावाच्या गर्जनेचा अंत कोणाला लागेल?”—ईयो. २६:१४.

२०. बायबलमधील एखादा उतारा आपल्याला समजण्यास कठीण वाटत असल्यास आपण काय केले पाहिजे?

२० बायबलचे वाचन करत असताना त्यातील एखादा उतारा, खासकरून यहोवाच्या विचारसरणीसंबंधी असलेला उतारा समजण्यास आपल्याला कठीण वाटत असल्यास आपण काय केले पाहिजे? त्या विषयावर संशोधन केल्यानंतरसुद्धा आपल्याला त्याचे स्पष्ट उत्तर मिळाले नाही, तर ही जणू यहोवावरील आपल्या भरवशाची कसोटीच आहे असे आपण समजू शकतो. नेहमी लक्षात असू द्या, काही वेळा बायबलमधील काही विधाने यहोवाच्या गुणांवर आपला किती विश्‍वास आहे हे दाखवण्याची संधी आपल्याला देतात. यहोवा जे काही करतो त्याबद्दल आपण सर्व काही समजू शकत नाही हे आपण नम्रपणे मान्य करू या. (उप. ११:५) असे केल्यास, प्रेषित पौलाच्या या शब्दांशी आपण नक्कीच सहमत होऊ: “अहाहा, देवाच्या बुद्धीची व ज्ञानाची संपत्ति किती अगाध आहे! त्याचे निर्णय किती गहन आणि त्याचे मार्ग किती अगम्य आहेत! ‘प्रभूचे मन कोणी ओळखिले आणि त्याचा मंत्री कोण होता? त्याला प्रथम देऊन त्याची फेड करून घेईल असा कोण आहे?’ कारण सर्व काही त्याच्याचपासून, त्याच्याच द्वारे व त्याच्याच प्रीत्यर्थ आहे. त्याला युगानुयुग गौरव असो. आमेन.”—रोम. ११:३३-३६.

[तळटीपा]

^ परि. 14 असाच वृत्तान्त गणना १४:११-२० मध्येसुद्धा आढळतो.

^ परि. 15 काही विद्वानांच्या म्हणण्यानुसार, निर्गम ३२:१० मध्ये (ईझी टू रीड व्हर्शन) ‘मला करू दे’ असे भाषांतरित केलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ, यहोवा आणि इस्राएल राष्ट्र यांच्यामध्ये मध्यस्थी करण्यासाठी मोशेला जणू आमंत्रित करण्यात आले किंवा सुचवण्यात आले असा लावला जाऊ शकतो. (स्तो. १०६:२३; यहे. २२:३०) काहीही असो, यहोवापुढे मनमोकळेपणे आपले मत व्यक्‍त करण्यात मोशेला कोणताही संकोच वाटला नाही हे स्पष्टच आहे.

तुम्हाला आठवते का?

• आपल्या स्वतःच्या स्तरांच्या आधारावर यहोवाविषयी मत बनवण्याची प्रवृत्ती टाळण्यास कोणती गोष्ट आपल्याला मदत करेल?

• येशूने इतरांशी केलेले व्यवहार समजून घेतल्याने यहोवाशी जवळीक साधणे आपल्याला कसे शक्य होते?

• यहोवाने मोशे व अब्राहाम यांच्याशी केलेल्या संभाषणांतून तुम्ही कोणते धडे शिकलात?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[५ पानांवरील चित्रे]

मोशे व अब्राहाम यांच्यासोबत यहोवाने केलेल्या व्यवहारांतून आपण त्याच्या विचारसरणीविषयी काय शिकतो?