व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाच्या संघटनेत स्वतःला व्यस्त ठेवणे

यहोवाच्या संघटनेत स्वतःला व्यस्त ठेवणे

यहोवाच्या संघटनेत स्वतःला व्यस्त ठेवणे

वर्नन झुब्को यांच्याद्वारे कथित

कॅनडाच्या सॅस्केचिवन प्रांतात, स्टेनन नावाच्या एका खेड्याजवळील शेतमळ्यावर मी लहानाचा मोठा झालो. मला ऑरेल्या नावाची एक थोरली बहीण आणि ॲल्वीन, ॲलेग्रा व डॅरल ही लहान भावंडं होती. आध्यात्मिक व भौतिक रीत्या आमचं भरणपोषण करण्यासाठी माझे आईवडील फ्रेड आणि ॲडेला यांनी खूप कष्ट केले. त्यांनी आम्हाला सत्य शिकवलं याबद्दल त्यांचे उपकार आम्ही कधीच विसरू शकत नाही.

माझे वडील एक अभिषिक्‍त ख्रिस्ती असून धाडसी सुवार्तिक होते. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ते खूप कष्ट करायचे. पण, त्याच वेळी आपण एक साक्षीदार आहोत ही गोष्ट ते आवर्जून इतरांना सांगायचे. ते नेहमी सत्याबद्दल भरभरून बोलायचे. त्यांचा आवेश आणि धैर्य यांची माझ्या मनावर अमिट छाप पडली. ते नेहमी मला म्हणायचे, “यहोवाच्या संघटनेत व्यस्त राहिलास, तर बऱ्‍याच समस्या टाळशील.”

आम्ही नेहमी स्टेननमध्ये व जवळपासच्या गावांमध्ये रस्त्यावरचं साक्षकार्य करायचो. पण, मला हे फार कठीण वाटायचं. कारण प्रत्येक गावात दांडगाई करणारी काही मुलं असायची आणि आम्ही गावात जायचो तेव्हा ती आम्हा लहान मुलांना अडवून आमची टिंगल करायची. मी आठ वर्षांचा असताना एकदा टेहळणी बुरूजसावध राहा! मासिकं घेऊन रस्त्याच्या कोपऱ्‍यावर उभा होतो तेव्हा काही मुलांनी मला घेरलं. त्यांनी माझी नवीकोरी हॅट हिसकावून घेतली आणि जवळच्या खांबावर लावली. पण, माझ्यावर लक्ष ठेवून असलेल्या एका वयस्कर बांधवानं ते पाहिलं. ते जवळ आले आणि म्हणाले: “वर्न, सगळं काही ठीक आहे ना?” हे ऐकताच मुलं तिथून पसार झाली. या अनुभवामुळे मी थोडाफार निराश झालो असलो, तरी त्यातून मी एक धडा शिकलो. तो म्हणजे, रस्त्यावरचं साक्षकार्य करताना खांबासारखं एकाच ठिकाणी उभा न राहता सतत जागा बदलत राहावी. लहानाचा मोठा होत असताना मला मिळालेल्या अशा प्रशिक्षणामुळे घरोघरचं साक्षकार्य करण्याचं धैर्य मला मिळालं.

सन १९५१ च्या मे महिन्यात माझा आणि ॲल्वीनचा बाप्तिस्मा झाला. त्या वेळी मी अवघ्या १३ वर्षांचा होतो. मला अजूनही आठवतं, बंधू जॅक नेथन यांनी बाप्तिस्म्याच्या भाषणात आम्हाला असं आर्जवलं, की आपण यहोवाविषयी काहीच बोललो नाही असा एकही महिना जाऊ देऊ नये. * पायनियर सेवा म्हणजे सगळ्यात चांगलं करियर असं आमच्या कुटुंबात मानलं जायचं. त्यामुळे १९५८ मध्ये शालेय शिक्षण संपल्यानंतर पायनियर सेवा करण्यासाठी मी मॅनिटोबातील विनिपेगला गेलो. आमचा स्वतःचा एक व्यवसाय होता आणि त्यात मी लाकडाला रंधा मारण्याचं काम करायचो. माझ्या या कामामुळे वडिलांना माझी मदत होत असली, तरी त्यांनी आणि आईनंदेखील मला पूर्ण वेळचं सेवाकार्य करण्याचं खूप प्रोत्साहन दिलं व विनिपेगला जाण्याच्या माझ्या निर्णयाला पाठिंबा दिला.

नवीन ठिकाणी, नवीन साथीदारासोबत

सन १९५९ मध्ये शाखा कार्यालयाद्वारे असं आमंत्रण देण्यात आलं, की ज्या कोणाला शक्य असेल तो सुवार्तिकांची नितांत गरज असलेल्या क्विबेकमध्ये साक्षकार्य करण्यासाठी जाऊ शकतो. त्यामुळे पायनियर सेवा करण्यासाठी मी माँट्रिऑलला गेलो. किती मोठा बदल! मी फ्रेंच भाषा शिकत होतो व एका नवीन संस्कृतीशी जुळवून घेत होतो; हा माझ्या आयुष्याचा जणू एक नवीन अध्यायच होता. आमच्या विभागीय पर्यवेक्षकांनी मला म्हटलं, “‘आमच्या इथं आम्ही हे असं करायचो’ असं कधीच म्हणू नकोस.” तो खरोखरच एक उत्तम सल्ला होता.—१ करिंथ. ९:२२, २३.

मी क्विबेकमध्ये पायनियर सेवा करायला गेलो तेव्हा मला कोणीच पायनियर साथीदार नव्हता. पण, मी विनिपेगमध्ये असताना माझी ओळख शर्ली टरकॉट नावाच्या एका तरुण बहिणीशी झाली होती, आणि १९६१ च्या फेब्रुवारी महिन्यात आमचं लग्न झालं तेव्हा तीच माझी कायमची साथीदार बनली. शर्लीदेखील एका आध्यात्मिक कुटुंबातली होती. येणाऱ्‍या अनेक वर्षांदरम्यान तिच्याकडून मला किती बळ आणि प्रोत्साहन मिळणार होतं याची त्या वेळी मला पूर्ण जाणीव नव्हती!

गॅस्पेचा प्रचार दौरा

आमच्या लग्नाच्या दोन वर्षांनंतर आम्हाला खास पायनियर म्हणून क्विबेकमधील रिमूस्की इथं पाठवण्यात आलं. पुढच्याच वसंत ऋतूत, शाखा कार्यालयानं आम्हाला कॅनडाच्या पूर्व किनारपट्टीवरील गॅस्पे द्विपकल्पाचा प्रचार दौरा करण्यास सांगितलं. शक्य तितकं सत्याचं बी पेरणं ही आमची नेमणूक होती. (उप. ११:६) आम्ही १,००० पेक्षा जास्त मासिकं व जवळजवळ ४०० पुस्तकं, तसंच काही खाण्यापिण्याच्या वस्तू व कपडे हे सगळं सामान कारमध्ये घातलं व आमच्या महिन्याभराच्या प्रचार दौऱ्‍यावर निघालो. आम्ही अगदी पद्धतशीरपणे गॅस्पेतील छोट्या-छोट्या खेड्यांतून प्रचार कार्य केलं. तिथल्या स्थानिक रेडिओवरून साक्षीदारांच्या येण्याचा इशारा लोकांना देण्यात आला आणि त्यांनी आमचं साहित्य घेऊ नये असं त्यांना सांगण्यात आलं. पण, रेडिओवरून केलेल्या या घोषणेचा लोकांना गैरसमज झाला आणि ते आपल्या प्रकाशनांची जाहिरात करत आहेत असं वाटून अनेकांनी आमच्याकडून साहित्य स्वीकारलं.

त्या काळी, प्रचार कार्य करण्याच्या स्वातंत्र्याबद्दल अद्यापही क्विबेकमधील काही भागांतील लोकांना माहीत नव्हतं. त्यामुळे पोलिसांकडून अडवलं जाणं ही नवीन गोष्ट नव्हती. अशीच एक घटना, एका शहरात प्रत्येक घरी साहित्य देत असताना घडली. एका पोलीस अधिकाऱ्‍यानं आम्हाला त्याच्यासोबत पोलीस स्टेशनला येण्यास सांगितलं आणि आम्ही गेलो. तिथं गेल्यानंतर मला समजलं, की त्या शहराच्या वकिलानं आमचं प्रचार कार्य थांबवण्याचा हुकूम जारी केला होता. त्या दिवशी प्रमुख पोलीस अधिकारी कामावर नसल्यामुळे मी त्या वकिलाला टोरंटो शाखा कार्यालयाकडून मला मिळालेलं एक तपशीलवार पत्र सादर केलं. त्या पत्रात, प्रचार करण्याच्या आपल्या हक्काचा खुलासा करण्यात आला होता. पत्र वाचल्यानंतर वकील पटकन म्हणाला: “हे पाहा, मला कोणत्याही भानगडीत पडायचं नाही. चर्चच्या पाळकांच्या सांगण्यावरून मी तुम्हाला अडवलं होतं.” आम्ही करत असलेलं कार्य बेकायदेशीर नाही हे क्षेत्रातील लोकांना कळावं म्हणून, पोलिसानं आम्हाला अडवलं होतं त्याच क्षेत्रात आम्ही लगेच गेलो व आमचं सेवाकार्य चालू ठेवलं.

दुसऱ्‍या दिवशी सकाळी आम्ही प्रमुख पोलीस अधिकाऱ्‍याला भेटायला गेलो तेव्हा आम्हाला अडवण्यात आलं होतं हे ऐकून त्याला राग आला. त्यानं फोनवरून वकिलाची चांगलीच खरडपट्टी काढली. त्या पोलीस अधिकाऱ्‍यानं आम्हाला सांगितलं की पुन्हा काही त्रास झाला तर आम्ही थेट त्याच्याशी संपर्क साधावा म्हणजे तो सर्व काही सांभाळून घेईल. त्या ठिकाणी आम्ही परके असलो आणि मोडकीतोडकी फ्रेंच भाषा बोलत असलो, तरी तिथले लोक अतिशय प्रेमळ व आतिथ्यशील असल्याचं आम्हाला जाणवलं. पण, आम्हाला विचार पडायचा, ‘हे लोक कधी सत्य शिकतील का?’ याचं उत्तर, अनेक वर्षांनंतर राज्य सभागृहे बांधण्यासाठी आम्ही पुन्हा गॅस्पेमध्ये गेलो तेव्हा आम्हाला मिळालं. आम्हाला समजलं, की आम्ही ज्यांना साक्ष दिली होती त्यांच्यापैकी अनेक जण आता आपले बंधुभगिनी आहेत. खरंच, वाढवणारा यहोवाच आहे.—१ करिंथ. ३:६, ७.

आम्हाला एक वारसा लाभतो

सन १९७० मध्ये आमची मुलगी लीसा हिचा जन्म झाला. यहोवाकडून मिळालेल्या या वारशामुळे आमच्या आनंदात आणखीनच भर पडली. शर्ली आणि लीसा या दोघी माझ्यासोबत राज्य सभागृह बांधकाम प्रकल्पांवर काम करायच्या. लीसाचं शालेय शिक्षण संपल्यानंतर ती म्हणाली: “आईबाबा! तुम्हा दोघांना माझ्यामुळे काही काळ पूर्ण वेळची सेवा सोडून द्यावी लागली होती, त्यामुळे मी स्वतः एक पायनियर बनून ती उणीव भरून काढण्याचा प्रयत्न करीन.” त्या गोष्टीला आज २० हून अधिक वर्षं उलटली आहेत, तरीसुद्धा आजही लीसा एक पायनियर म्हणून आपला पती सिल्वान याच्यासोबत सेवा करत आहे. त्या दोघांनाही अनेक आंतरराष्ट्रीय बांधकाम प्रकल्पांवर एकत्र काम करण्याची सुसंधी लाभली आहे. कुटुंब या नात्यानं आमचं एकच ध्येय आहे. ते म्हणजे, साधंसुधं जीवन जगणं आणि यहोवाची सेवा करण्यासाठी सदैव तयार असणं. लीसानं पायनियर सेवा सुरू केली तेव्हा तिनं उद्‌गारलेले शब्द मी अजूनही विसरलेलो नाही. खरंतर, सन २००१ मध्ये तिनंच मला पुन्हा एकदा पूर्ण वेळचं सेवाकार्य सुरू करण्याची प्रेरणा दिली आणि तेव्हापासून मी पायनियर सेवा करत आहे. पायनियर सेवा मला आजही सर्व बाबतीत यहोवावर विसंबून राहण्यास आणि साधंसुधं पण सुखीसमाधानी जीवन जगण्यास शिकवते.

बांधकाम प्रकल्पांवर काम करणाऱ्‍यांमध्ये प्रेम, निष्ठा आणि विश्‍वासूपणा आवश्‍यक

यहोवानं मला एक गोष्ट शिकवली आहे. ती म्हणजे आपण त्याच्या सेवेसाठी सदैव तयार असलो व त्यानं दिलेलं कोणतंही काम स्वीकारलं, तर अनेक आशीर्वाद आपल्या पदरी पडतील. प्रादेशिक बांधकाम समितीवर, तसंच सबंध क्विबेकमध्ये व इतर अनेक ठिकाणी बंधुभगिनींसोबत बांधकाम प्रकल्पांवर काम करणं हा माझ्यासाठी एक मोठा विशेषाधिकार आहे.

काही स्वयंसेवक व्यासपीठावरून जोरदार भाषणे देत नसले, तरी राज्य सभागृह बांधकाम प्रकल्पांवर मात्र ते आपल्या उत्तम कामगिरीमुळे चमकतात. हे प्रिय बांधव जीव ओतून काम करतात आणि त्यामुळे त्यांच्यातील कौशल्ये दिसून येतात. याचा परिणाम सहसा एका सुंदर इमारतीत होतो जिचा उपयोग यहोवाच्या उपासनेसाठी केला जातो.

मला सहसा असं विचारलं जातं, “राज्य सभागृह प्रकल्पावर काम करणाऱ्‍या स्वयंसेवकांमध्ये कोणते महत्त्वपूर्ण गुण असले पाहिजेत?” अनुभवावरून मी सांगू शकतो, की सर्वात प्रथम एका व्यक्‍तीचं यहोवावर आणि त्याच्या पुत्रावर, तसंच आपल्या बंधुसमाजावर प्रेम असलं पाहिजे. (१ करिंथ. १६:१४) दुसरी गोष्ट म्हणजे, प्रकल्पावर काम करणाऱ्‍यांमध्ये एकनिष्ठा आणि विश्‍वासूपणा असला पाहिजे. जेव्हा काही गोष्टी आपल्या इच्छेनुसार होत नाहीत—आणि असं होणं साहजिकच आहे—तेव्हा एकनिष्ठेचा गुण एका व्यक्‍तीला ईश्‍वरशासित व्यवस्थेला सहकार्य करत राहण्यास मदत करेल. विश्‍वासूपणा त्या व्यक्‍तीला भावी प्रकल्पांवर सेवा करण्यासाठी स्वतःला सादर करण्यास प्रवृत्त करेल.

यहोवाचे मनःपूर्वक आभार

सन १९८५ मध्ये माझ्या वडिलांचा मृत्यू झाला असला, तरी यहोवाच्या संघटनेत स्वतःला व्यस्त ठेवण्याविषयी त्यांनी दिलेला सल्ला आजही माझ्या मनावर कोरलेला आहे. ज्यांना यहोवाच्या संघटनेच्या स्वर्गीय भागात आपली नेमणूक मिळाली आहे अशा इतरांप्रमाणेच माझे वडीलदेखील आपल्या नेमणुकीत नक्कीच व्यस्त असतील. (प्रकटी. १४:१३) आई सध्या ९७ वर्षांची आहे. पक्षाघातामुळे ती व्यवस्थित बोलू शकत नसली, तरी ती बायबलचा खूप उपयोग करते. तिच्या पत्रांत ती शास्त्रवचनांचा उल्लेख करते आणि यहोवाची विश्‍वासूपणे सेवा करत राहण्याचं प्रोत्साहन आम्हाला देते. असे प्रेमळ आईवडील मिळाल्याबद्दल आम्ही सर्व मुलं किती आभारी आहोत!

यहोवानं मला शर्लीच्या रूपात एक विश्‍वासू पत्नी आणि साथीदार दिल्याबद्दलही मी त्याचा खूप आभारी आहे. शर्लीच्या आईनं तिला दिलेला सल्ला ती नेहमी लक्षात ठेवते, “देवाच्या सेवेत वर्न नेहमी खूप व्यस्त राहील, आणि तुझ्याशिवाय त्याला इतरांनाही वेळ द्यावा लागेल ही गोष्ट तुला स्वीकारावी लागेल.” ४९ वर्षांपूर्वी आमचं लग्न झालं तेव्हा आम्ही ठरवलं होतं, की आम्ही यहोवाची सेवा करत एकमेकांच्या सोबतीनं वयोवृद्ध होऊ, आणि या जगाच्या अंतातून दोघं वाचलो, तर एकमेकांच्या सोबतीनं तरुण होऊन अनंतकाळ देवाची सेवा करत राहू. होय, आम्ही ‘प्रभूच्या कामात अधिकाधिक तत्पर’ राहिलो आहोत. (१ करिंथ. १५:५८) यहोवानं आमचा सांभाळ करण्याची त्याची जबाबदारी निभावल्यामुळे आम्हाला कुठल्याच गोष्टीची उणीव भासली नाही.

[तळटीप]

^ परि. 6 टेहळणी बुरूज, सप्टेंबर १, १९९० (इंग्रजी), पृष्ठे १०-१४ वर दिलेली जॅक हॅलिडे नेथन यांची जीवनकथा पाहा.

[३१ पानांवरील चित्र]

“कुटुंब या नात्यानं आमचं एकच ध्येय आहे. ते म्हणजे, साधंसुधं जीवन जगणं आणि यहोवाची सेवा करण्यासाठी सदैव तयार असणं”