व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाच्या संघटनेशी परिचित होण्यास मुलांना मदत करा

यहोवाच्या संघटनेशी परिचित होण्यास मुलांना मदत करा

यहोवाच्या संघटनेशी परिचित होण्यास मुलांना मदत करा

मुले नवनवीन गोष्टी जाणून घेण्यास उत्सुक असतात. पहिल्या वल्हांडणाच्या रात्री इजिप्तमधील इस्राएल लोकांच्या मुलांना कोणते प्रश्‍न पडले असतील त्यांचा विचार करा: ‘कोकऱ्‍याला का मारलं?’ ‘वडील दाराला रक्‍त का लावत आहेत?’ ‘आपण कुठं चाललोय?’ यहोवाने अशा प्रश्‍नांचे स्वागत केले होते हे त्याने इस्राएली पित्यांना जी आज्ञा दिली होती त्यावरून दिसून येते. भविष्यात साजरे केल्या जाणाऱ्‍या वल्हांडण सणांविषयी यहोवाने त्यांना असे सांगितले: “तुमची मुलेबाळे तुम्हाला विचारतील की, ‘ह्‍या सेवेचा अर्थ काय?’ तेव्हा तुम्ही सांगा, की ‘हा परमेश्‍वराच्या वल्हांडणाचा यज्ञ आहे; त्याने मिसरी लोकांना मारिले व आमच्या घरांचा बचाव केला त्या समयी तो मिसरातील इस्राएलांची घरे ओलांडून गेला.’” (निर्ग. १२:२४-२७) नंतर, यहोवाने दिलेले “विधी व नियम” यांबद्दल मुलांनी विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे देणे किती महत्त्वाचे आहे याची त्याने इस्राएली आईवडिलांना आठवण करून दिली.—अनु. ६:२०-२५.

यावरून हे स्पष्ट होते, की खऱ्‍या उपासनेविषयी मुलांना असलेल्या प्रश्‍नांची उत्तरे त्यांनी जाणून घ्यावीत अशी यहोवाची इच्छा होती. या उत्तरांमुळे मुलांना, यहोवाला आपला देव आणि तारणकर्ता म्हणून त्याच्यावर प्रेम करण्याची प्रेरणा मिळणार होती. आजही, आपल्या लहानग्यांबद्दल यहोवाची हीच इच्छा आहे. आईवडील एका मार्गाने आपल्या मुलांच्या मनात देवाबद्दल आणि त्याच्या लोकांबद्दल मनस्वी प्रेम निर्माण करू शकतात. तो मार्ग म्हणजे, त्यांना यहोवाच्या संघटनेशी परिचित होण्यास व ही संघटना आपल्यासाठी जे काही करते त्यापासून त्यांना कशा प्रकारे फायदा होतो हे जाणून घेण्यास मदत करणे. तेव्हा, मुलांना देवाच्या संघटनेबद्दल आणखी जास्त जाणून घेण्यास मदत करता येईल अशा काही मार्गांची आपण चर्चा करू या.

स्थानिक मंडळी

तुमचे कुटुंब ज्या मंडळीसोबत सहवास करते त्यास तुमच्या मुलांनी जाणून घेणे गरजेचे आहे. याकरता, पालक या नात्याने तुम्ही तुमच्या मुलांना मंडळीच्या सर्व ख्रिस्ती सभांना आपल्यासोबत नेले पाहिजे. तुम्ही असे करता तेव्हा तुम्ही यहोवाने इस्राएल लोकांना घालून दिलेल्या नमुन्याचे पालन करत असता. यहोवाने त्यांना अशी आज्ञा दिली: “सर्व लोकांना म्हणजे पुरुष, स्त्रिया, बालके . . . ह्‍यांना जमव म्हणजे ते ऐकून शिकतील आणि तुमचा देव परमेश्‍वर ह्‍याचे भय धरतील आणि ह्‍या नियमशास्त्रातली सर्व वचने काळजीपूर्वक पाळतील; त्यांच्या ज्या पुत्रपौत्रांना ही वचने माहीत नाहीत, तीहि ऐकतील आणि . . . तुमचा देव परमेश्‍वर ह्‍याचे भय धरावयाला ती शिकतील.”—अनु. ३१:१२, १३.

मुले अगदी बाल्यावस्थेपासूनच यहोवाच्या वचनाविषयी शिकायला सुरू करू शकतात. प्रेषित पौलाने तीमथ्याबद्दल म्हटले: “बालपणापासूनच तुला पवित्र शास्त्राची माहिती आहे.” (२ तीम. ३:१५) अगदी लहान मुलेदेखील राज्य सभागृहातील सभांमध्ये सादर केली जाणारी माहिती ग्रहण करायला सुरुवात करतात आणि राज्य गीतांशी परिचित होतात. तेथे ते बायबलचा व बायबल आधारित साहित्याचा वापर व आदर करायला शिकतात. शिवाय, ज्या गुणावरून ख्रिस्ताच्या खऱ्‍या अनुयायांची ओळख होते तो गुण म्हणजे खरे प्रेम ते आपल्या सभांमध्ये प्रत्यक्ष अनुभवतात. येशूने म्हटले: “मी तुम्हास नवी आज्ञा देतो की, तुम्ही एकमेकांवर प्रीति करावी; जशी मी तुम्हावर प्रीति केली तशी तुम्हीहि एकमेकांवर प्रीति करावी. तुमची एकमेकांवर प्रीति असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहा.” (योहा. १३:३४, ३५) राज्य सभागृहात पाहायला मिळणारे प्रेमळ वातावरण व खरी सुरक्षा मुलांना हवीहवीशी वाटेल आणि त्यामुळे ते ख्रिस्ती सभांना नियमितपणे उपस्थित राहण्याची स्वतःला सवय लावून घेतील.

तुम्ही राज्य सभागृहात नेहमी लवकर आल्यास आणि सभा संपल्यावर थोडा वेळ थांबल्यास, तुमच्या मुलांना इतरांसोबत मैत्री करण्याची संधी मिळेल. त्यांना केवळ इतर मुलांशी सहवास करू देण्याऐवजी, तुम्ही त्यांना सर्व वयोगटातील बंधुभगिनींची ओळख करून देऊ शकता. तुमची मुले, वयाने त्यांच्यापेक्षा मोठे असलेल्यांशी मैत्री करतात, तेव्हा अनुभव व बुद्धी यांचा उत्साहवर्धक खजिनाच त्यांना सापडेल. ज्याप्रमाणे, ‘देवाचे भय बाळगायला शिकवणाऱ्‍या’ प्राचीन काळच्या जखऱ्‍याने लहान उज्जियावर म्हणजे यहुदाच्या राजावर उत्तम प्रभाव पाडला होता, त्याचप्रमाणे अनेक वर्षे यहोवाची विश्‍वासूपणे सेवा केलेले त्याचे सेवक आज लहान मुलांवर चांगला प्रभाव पाडतात. (२ इति. २६:१, ४, ५, मराठी कॉमन लँग्वेज भाषांतर) तुम्ही राज्य सभागृहात असता तेव्हा तुमच्या लहान मुलांना ग्रंथालय, माहितीफलक यांच्या कार्याबद्दल आणि सभागृहातील इतर वैशिष्ट्यांबद्दलही माहिती देऊ शकता.

जगव्याप्त संघटना

स्थानिक मंडळी ही जगभरातील १,००,००० पेक्षा जास्त मंडळ्यांनी मिळून बनलेल्या एका जगव्याप्त संघटनेचा भाग आहे हे लहान मुलांनी जाणून घेणे आवश्‍यक आहे. तेव्हा संघटनेच्या वैशिष्ट्यांबद्दल, संघटना कशा प्रकारे कार्य करते, आणि संघटनेच्या कार्याला मुले कसा हातभार लावू शकतात यांविषयी मुलांना माहिती द्या. तुम्ही विभागीय संमेलनांची, प्रांतीय अधिवेशनांची, आणि विभागीय पर्यवेक्षकांच्या भेटीची आतुरतेने वाट का पाहता हे त्यांना सांगा.—पृष्ठ २८ वरील “कौटुंबिक उपासनेच्या वेळी चर्चा करण्याजोगे विषय,” ही चौकट पाहा.

संधी मिळेल तेव्हा तेव्हा प्रवासी पर्यवेक्षकांना, मिशनऱ्‍यांना, बेथेल कुटुंबातील सदस्यांना, आणि इतर पूर्ण वेळच्या सेवकांना आपल्या घरी जेवणासाठी बोलवा. त्यांच्याजवळ तुमच्या मुलांकरता वेळ नाही असा विचार करू नका. हे पूर्ण वेळचे सेवक येशूचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात, ज्याने नेहमी मुलांना आपल्याजवळ येऊ दिले आणि त्यांच्यासोबत वेळ घालवला. (मार्क १०:१३-१६) यहोवाच्या या सेवकांचे अनुभव ऐकून आणि यहोवाच्या सेवेतील त्यांचा आनंद पाहून तुमची मुलेदेखील कदाचित पूर्ण वेळ सेवेचे ध्येय ठेवू शकतील.

तुमच्या मुलांनी यहोवाच्या संघटनेला आणखी चांगल्या प्रकारे जाणून घ्यावे म्हणून कुटुंब या नात्याने तुम्ही आणखी काय करू शकता? येथे काही गोष्टी सुचवल्या आहेत: संपूर्ण कुटुंब मिळून जेहोवास विटनेसेस—प्रोक्लेमर्स ऑफ गॉड्‌स किंगडम या पुस्तकाचा किंवा यहोवाचे साक्षीदार कोण आहेत? त्यांचा काय विश्‍वास आहे? या माहितीपत्रकाचा अभ्यास करण्याची योजना करा. यहोवाच्या साक्षीदारांनी प्रदर्शित केलेली समर्पित वृत्ती, नम्रता, आणि एकनिष्ठा यांच्यावर भर द्या. संपूर्ण जगभरात सुवार्तेचा प्रसार करण्यासाठी यहोवाने कशा प्रकारे त्यांचा उपयोग केला हे दाखवा. गतकाळातील व आजच्या काळातील महत्त्वाचे धडे शिकवण्याकरता यहोवाच्या संघटनेने तयार केलेल्या व्हीडिओंचा उपयोग करा. शक्य असल्यास, तुमच्या देशातील किंवा कदाचित इतर देशांतील शाखा कार्यालयाला आणि बेथेलला भेट द्या. अशा भेटींमुळे, सा.यु. पहिल्या शतकाप्रमाणेच आजही विश्‍वासू व बुद्धिमान दासवर्गाद्वारे जगभरातील बंधुभगिनींना आध्यात्मिक अन्‍न व मार्गदर्शन पुरवण्यासाठी यहोवाच्या संघटनेचा पृथ्वीवरील भाग कशा प्रकारे संघटित आहे हे तुमच्या मुलांच्या मनावर बिंबवले जाईल.—मत्त. २४:४५-४७; प्रे. कृत्ये १५:२२-३१.

प्रत्येक मुलाच्या ग्रहणशक्‍तीनुसार त्याला माहिती द्या

तुमच्या मुलांना शिकवताना, येशूने आपल्या प्रेषितांना कशा प्रकारे शिकवले ते नेहमी लक्षात ठेवा. त्याने एकदा त्यांना असे सांगितले: “मला अद्याप तुम्हाला पुष्कळ गोष्टी सांगावयाच्या आहेत, परंतु आताच तुमच्याने त्या सोसवणार नाहीत.” (योहा. १६:१२) येशूने आपल्या शिष्यांवर माहितीचा भडिमार केला नाही. त्याउलट, त्याने त्यांच्या ग्रहणशक्‍तीनुसार हळूहळू त्यांना महत्त्वाची सत्ये शिकवली. तशाच प्रकारे, आपल्या मुलांवर वाजवीपेक्षा जास्त माहितीचा भडिमार करू नका. त्यांना संघटनेबद्दल नियमितपणे, थोडी थोडी माहिती देण्याद्वारे तुम्ही त्यांची आवड टिकवून ठेवू शकता आणि ख्रिस्ती मंडळीबद्दल शिकणे आनंददायी बनवू शकता. मुलांच्या वाढत्या वयानुसार, त्यांना आधी शिकवलेल्या गोष्टी तुम्ही आणखी खुलासा करून सांगू शकता.

ख्रिस्ती मंडळी आध्यात्मिक शक्‍तीचा एक स्रोत आहे, आणि जी मुले मंडळीच्या कार्यांत आवेशाने भाग घेतात ती सैतानाच्या जगाच्या प्रभावांचा प्रतिकार करण्यास सुसज्ज असतात. (रोम. १२:२) आम्हाला याची खातरी आहे की तुमच्या मुलांना यहोवाच्या संघटनेशी परिचित होण्यास मदत करण्यात तुम्हाला नक्कीच खूप आनंद होईल. यहोवाच्या आशीर्वादाने, तुमची मुले नेहमी त्याच्या संघटनेला व आपल्या प्रेमळ देवाला एकनिष्ठ राहोत.

[२८ पानांवरील चौकट/ चित्र]

कौटुंबिक उपासनेच्या वेळी चर्चा करण्याजोगे विषय

यहोवाच्या संघटनेसंबंधी काही विषय येथे दिलेले आहेत. तुमच्या कौटुंबिक उपासनेच्या वेळी तुम्ही या विषयांवर चर्चा करू शकता.

▪ स्थानिक मंडळीच्या इतिहासाची उजळणी करा. मंडळीची सुरुवात कधी व कशा प्रकारे झाली? मंडळीने कोणकोणत्या राज्य सभागृहांचा उपयोग केला? याची चर्चा करण्यासाठी व मुलांच्या अशा प्रश्‍नांची उत्तरे देण्यासाठी दीर्घ काळापासून मंडळीचा सदस्य असलेल्या बंधू किंवा भगिनीला तुम्ही घरी बोलावू शकता.

▪ मंडळीत होणाऱ्‍या विविध सभांचा व मोठ्या संमेलनांचा उद्देश काय आणि यांपासून मुलांना कसा फायदा होऊ शकतो हे स्पष्ट करून सांगा.

▪ यहोवाच्या संघटनेद्वारे स्थापन करण्यात आलेल्या विविध प्रशालांचा काय उद्देश आहे याची चर्चा करा. या प्रशालांतून पदवीधर झालेले किती परिणामकारक रीत्या सेवा करत आहेत याचे काही अनुभव सांगा.

▪ सुवार्तेचे नियमित प्रचारक बनणे किती महत्त्वाचे आहे हे मुलांना पटवून द्या. यहोवाच्या साक्षीदारांच्या वार्षिक पुस्तकात (इंग्रजी) प्रकाशित होणाऱ्‍या जागतिक अहवालास ते कसा हातभार लावू शकतात हे त्यांना दाखवा.

▪ यहोवाच्या संघटनेत तरुणांकरता पूर्ण वेळ सेवेच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत त्यांची चर्चा करा. यावरील अधिक माहितीसाठी आमची राज्य सेवा, मार्च २००७, पृष्ठे ३-६ पाहा.

▪ मंडळीत काही कार्ये विशिष्ट पद्धतीने का केली जातात हे समजण्यास मुलांना मदत करा. मुलांनी अगदी छोट्या गोष्टींतही यहोवाच्या संघटनेपासून स्वतंत्र राहून कार्य का करू नये हे समजावून सांगा. मंडळीतील वडिलांच्या मार्गदर्शनाचे अनुसरण करण्याद्वारे मंडळीतील सुव्यवस्थेला ते कसा हातभार लावू शकतात हे त्यांना दाखवून द्या.

[चित्र]

अनेक वर्षांपासून यहोवाची सेवा करणाऱ्‍यांशी मैत्री केल्याने तुमच्या मुलांना फायदाच होईल

[२६ पानांवरील चित्रे]

प्राचीन इस्राएलातील पालकांप्रमाणेच, आजचे पालकही यहोवाच्या संघटनेबद्दल मुलांनी विचारलेल्या प्रश्‍नांची समाधानकारक उत्तरे देण्याचा प्रयत्न करतात