व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

दुःखितांच्या हाकेकडे यहोवा कान देतो

दुःखितांच्या हाकेकडे यहोवा कान देतो

दुःखितांच्या हाकेकडे यहोवा कान देतो

प्राचीन इस्राएलचा बुद्धिमान राजा शलमोन याने म्हटल्याप्रमाणे, “समय व प्रसंग हे [आपणा] सर्वांना घडतात.” (उप. ९:११, पं.र.भा.) एखाद्या शोकांतिक घटनेमुळे किंवा दुःखद प्रसंगामुळे आपले जीवन सर्वस्वी विस्कटले जाऊ शकते. उदाहरणार्थ, कुटुंबातील एका प्रिय व्यक्‍तीच्या अकाली मृत्यूमुळे आपण भावनिक रीत्या उद्‌ध्वस्त होऊ शकतो. त्यानंतरच्या कित्येक आठवड्यांदरम्यान व महिन्यांदरम्यान आपण दुःखाच्या आणि निराशेच्या भावनेने ग्रासले जाऊ शकतो. अशा परिस्थितीत एक व्यक्‍ती इतक्या गोंधळलेल्या मनस्थितीत असू शकते, की आपण यहोवाला प्रार्थना करण्यास लायक नाही असे तिला वाटते.

अशा वेळी एका व्यक्‍तीला गरज असते ती उत्तेजनाची, सहानुभूतीची व प्रेमाची. म्हणूनच दाविदाने गायिलेले स्तोत्र खूप आश्‍वासक आहे: “पतन पावणाऱ्‍या सर्वांना परमेश्‍वर आधार देतो, व वाकलेल्या सर्वांना उभे करितो.” (स्तो. १४५:१४) बायबल आपल्याला सांगते, की “परमेश्‍वराचे नेत्र अखिल पृथ्वीचे निरीक्षण करीत असतात, जे कोणी सात्विक चित्ताने त्याच्याशी वर्ततात त्यांचे साहाय्य करण्यात तो आपले सामर्थ्य प्रगट करितो.” (२ इति. १६:९) तो ‘दुःखी आणि लीन यांच्याबरोबर असतो. मनाने नम्र असलेल्यांना आणि दुःखी लोकांना तो नवजीवन देतो.’ (यश. ५७:१५, ईझी टू रीड व्हर्शन) यहोवा दुःखितांना व निराश झालेल्यांना कशा प्रकारे उभारी देतो व त्यांचे सांत्वन करतो?

“समयोचित बोल”

आज यहोवा अनेक मार्गांनी अगदी उचित समयी आपल्याला साहाय्य करतो. त्यांपैकी एक मार्ग म्हणजे आपला ख्रिस्ती बंधुसमाज. “जे अल्पधीराचे आहेत त्यांना धीर द्या,” असा सल्ला ख्रिश्‍चनांना देण्यात आला आहे. (१ थेस्सलनी. ५:१४) संकटाच्या व दुःखाच्या काळात, विचारशील बंधुभगिनींनी व्यक्‍त केलेली कळकळ व प्रेमाचे दोन शब्द एखाद्याचे मनोबल वाढवू शकतात. जाता जाता बोललेले सांत्वनपर शब्ददेखील निराश मनाला उभारी देण्यास पुरेसे असू शकतात. असे विचारपूर्वक शब्द सहसा अशाच मनःस्थितीतून गेलेल्या किंवा भावनिक यातना सोसलेल्या व्यक्‍तीच्या तोंडून निघू शकतात. किंवा दुःखावर मात करण्यासाठी एखाद्या अनुभवी मित्राने सुचवलेल्या लहानसहान गोष्टीदेखील खूप उपयुक्‍त ठरू शकतात. अशा व्यावहारिक मार्गांद्वारे यहोवा दुःखितांना संजीवन देऊ शकतो.

नुकतेच लग्न झालेल्या ॲलेक्स नावाच्या एका ख्रिस्ती वडिलाचे उदाहरण विचारात घ्या. एका दुर्धर व्याधीमुळे त्यांच्या पत्नीचा अचानक मृत्यू झाला होता. एका सहानुभूतीशील प्रवासी पर्यवेक्षकाने ॲलेक्सशी सांत्वनाचे दोन शब्द बोलण्याचा विचार केला. या प्रवासी पर्यवेक्षकाच्या पत्नीचाही मृत्यू झाला होता, पण तिच्या मृत्यूनंतर त्यांनी पुनर्विवाह केला होता. त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला तेव्हा त्यांच्या नाजूक भावनांनी कशा प्रकारे त्यांना ग्रासून टाकले होते ते त्यांनी सांगितले. सेवाकार्यात व मंडळीच्या सभांमध्ये इतरांच्या सहवासात असताना ते आपले दुःख विसरून जायचे. पण, आपल्या खोलीत शिरल्यानंतर व खोलीचे दार लावून घेतल्यानंतर मात्र त्यांना एकटेपणा खायला उठायचा. ॲलेक्स म्हणतो, “माझ्या भावना स्वाभाविक आहेत व इतर जणसुद्धा अशाच भावनांतून गेले आहेत हे जाणून किती हायसं वाटतं.” दुःखाच्या काळातील “समयोचित बोल” नक्कीच खूप दिलासा देणारे ठरू शकतात.—नीति. १५:२३.

आणखी एका ख्रिस्ती वडिलांना ॲलेक्सशी धीर देणारे शब्द बोलण्याची प्रेरणा मिळाली. या वडिलांना, आपले विवाहसोबती गमावलेल्या अनेकांविषयी माहीत होते. त्यांनी सहानुभूती दाखवून प्रेमळपणे ॲलेक्सला याची जाणीव करून दिली की आपल्याला नेमके कसे वाटते आणि आपल्याला कशाची गरज आहे याची यहोवाला पूर्ण कल्पना आहे. त्या बांधवाने म्हटले: “पुढे काही महिन्यांनंतर व वर्षांनंतर तुम्हाला एका सोबत्याची गरज भासली तर यहोवानं पुनर्विवाहाची प्रेमळ तरतूद केली आहे.” अर्थात, ज्यांच्या विवाहसोबत्याचा मृत्यू होतो आणि ज्यांना पुढे पुन्हा विवाह करण्याची इच्छा असते अशा सर्वांनाच ते शक्य होते असे नाही. पण, त्या बांधवाने जे म्हटले त्यावर विचार करून ॲलेक्स म्हणतो: “ही तरतूद खुद्द यहोवानं केलेली आहे याची आठवण करून दिल्यामुळे, भविष्यात तुम्ही पुन्हा विवाह केला, तर तुम्ही आपल्या विवाहसोबत्याचा किंवा यहोवानं घालून दिलेल्या विवाहाच्या व्यवस्थेचा विश्‍वासघात कराल अशा नकारार्थी भावनांपासून तुम्ही मुक्‍त होता.”—१ करिंथ. ७:८, ९, ३९.

स्तोत्रकर्त्या दाविदाने स्वतः आपल्या जीवनात अनेक खडतर प्रसंगांचा सामना केला होता. अनुभवावरून तो असे म्हणू शकला: “परमेश्‍वराचे नेत्र नीतिमानांकडे असतात; त्याचे कान त्यांच्या हाकेकडे असतात.” (स्तो. ३४:१५) यहोवा नक्कीच, सहानुभूतीशील व प्रौढ ख्रिस्ती बंधुभगिनींच्या विचारशील व सुज्ञ शब्दांद्वारे अगदी उचित समयी दुःखितांच्या हाकेचे उत्तर देऊ शकतो. ही एक अमूल्य व व्यावहारिक तरतूद आहे.

ख्रिस्ती सभांद्वारे मदत

मनाने खचून गेलेली व्यक्‍ती सहजासहजी नकारार्थी भावनांच्या आहारी जाऊन एकलकोंडी बनू शकते. पण, नीतिसूत्रे १८:१ सावधगिरीचा असा सल्ला देते: “जो फटकून राहतो तो आपली इच्छा पुरवू पाहतो, व त्याला सगळ्या सुज्ञतेचा संताप येतो.” ॲलेक्सने आपल्या स्वतःच्या अनुभवावरून म्हटले: “तुमच्या विवाहसोबत्याचा मृत्यू होतो तेव्हा तुमच्या मनात नकारात्मक विचारांचे काहूर माजते.” त्याला आठवते, तो नेहमी स्वतःला विचारायचा: “मी काही वेगळं करू शकलो असतो का? मला आणखी विचारशीलपणे व समंजसपणे वागता आलं असतं का? मला एकाकी जीवन जगायचं नव्हतं. मला अविवाहित राहायचं नव्हतं. विचारांची ही साखळी तोडणं खरोखर खूप कठीण आहे, कारण तुम्ही एकटे आहात या गोष्टीची तुम्हाला दररोज आठवण होत राहते.”

दुःखाच्या काळात एका व्यक्‍तीला सगळ्यात जास्त गरज असते ती आनंददायक सहवासाची. असा सहवास मंडळीच्या सभांमध्ये सहज मिळू शकतो. अशा वातावरणात आल्यानंतर आपण देवाच्या वचनातील सकारात्मक व उभारणीकारक विचार ग्रहण करण्यास उत्सुक असतो.

ख्रिस्ती सभा आपल्याला आपल्या परिस्थितीकडे योग्य दृष्टिकोनातून पाहण्यास मदत करतात. आपण बायबलमधील उतारे ऐकतो व त्यांवर मनन करतो तेव्हा आपण केवळ स्वतःच्याच दुःखावर लक्ष केंद्रित करत नाही, तर खऱ्‍या अर्थाने महत्त्वपूर्ण असलेल्या विषयांवर अर्थात यहोवाचे सार्वभौमत्व उंचावण्याच्या व त्याच्या नावाचे पवित्रीकरण करण्याच्या विषयांवर आपण आपले लक्ष केंद्रित करतो. शिवाय, ख्रिस्ती सभांमध्ये आपल्याला यहोवाकडून शिक्षण मिळते, तेव्हा दुसऱ्‍या कोणालाही आपल्या दुःखाची जाणीव नसली व आपल्याला नेमके कसे वाटते हे इतर कोणीही समजू शकले नाही, तरी यहोवाला मात्र नक्कीच आपल्या दुःखाची कल्पना आहे व तो आपल्या भावना समजतो या जाणिवेमुळे आपल्याला बळ मिळते. “मनातील खेदाने हृदय भंग पावते,” हे यहोवा जाणतो. (नीति. १५:१३) आपला खरा देव आपल्याला मदत करण्यास सदैव उत्सुक आहे आणि हीच गोष्ट, समोर आलेल्या परिस्थितीचा सामना करण्याचे बळ व उत्तेजन आपल्याला देते.—स्तो. २७:१४.

दावीद राजावर त्याच्या शत्रूंकडून प्रचंड दबाव आला तेव्हा त्याने देवाचा धावा केला: “माझा आत्मा माझ्या ठायी व्याकुळ झाला आहे; माझे अंतर्याम घाबरे झाले आहे.” (स्तो. १४३:४) जीवनात संकटे येतात तेव्हा एक व्यक्‍ती सहसा शारीरिक व भावनिक रीत्या कमजोर होऊ शकते, तिचे मन घाबरे होऊ शकते. आपल्यावर आजाराच्या किंवा दुर्धर व्याधीच्या स्वरूपात संकटे येऊ शकतात. पण, त्यांत टिकून राहण्यास यहोवा आपली मदत करेल याची खातरी आपण बाळगू शकतो. (स्तो. ४१:१-३) आज देव चमत्कारिक रीत्या कोणाचे रोग बरे करत नसला, तरी दुःखाने पीडित असलेल्या व्यक्‍तीला समस्येचा सामना करण्यास आवश्‍यक असलेली बुद्धी व बळ तो नक्कीच देतो. हे लक्षात घ्या, की दाविदावर संकटे आली तेव्हा त्याने यहोवाचा धावा केला. त्याने म्हटले: “मी प्राचीन काळचे दिवस मनात आणितो, तुझ्या सर्व कृत्यांचे मनन करितो; तुझ्या हातच्या कृतीचे चिंतन करितो.”—स्तो. १४३:५.

हे ईश्‍वरप्रेरित शब्द देवाच्या वचनात नमूद करण्यात आले आहेत, त्याअर्थी यहोवाला आपल्या भावनांची कल्पना आहे हे दिसून येते. अशा शब्दांवरून आपल्याला याची खातरी मिळते की तो आपल्या विनवण्या ऐकतो. आपण त्याची मदत स्वीकारली, तर तो आपला सांभाळ करेल.—स्तो. ५५:२२.

“निरंतर प्रार्थना करा”

याकोब ४:८ म्हणते: “देवाजवळ या म्हणजे तो तुम्हाजवळ येईल.” देवाजवळ येण्याचा एक मार्ग म्हणजे प्रार्थना. प्रेषित पौल आपल्याला सल्ला देतो: “निरंतर प्रार्थना करा.” (१ थेस्सलनी. ५:१७) प्रार्थनेत आपल्याला आपल्या भावना शब्दांत मांडणे कठीण असले तरी “आत्मा स्वतः अनिर्वाच्य कण्हण्याने मध्यस्थी करितो.” (रोम. ८:२६, २७) होय, यहोवा नक्कीच आपल्या भावना समजतो.

मोनिका नावाच्या एका बहिणीचा यहोवासोबत असाच घनिष्ठ नातेसंबंध आहे. त्याबद्दल ती म्हणते: “प्रार्थना, बायबल वाचन आणि वैयक्‍तिक अभ्यास यांद्वारे यहोवा माझा सगळ्यात जवळचा मित्र बनल्याचं मला जाणवलं आहे. तो माझ्यासाठी इतका खराखुरा आहे, की त्याच्या काळजीचा मला पावलोपावली अनुभव येतो. मला नेमकं कसं वाटतं हे व्यक्‍त करणं कठीण असलं, तरी तो माझ्या भावना जाणतो ही अत्यंत दिलासा देणारी गोष्ट आहे. त्याच्या प्रेमळपणाला व आशीर्वादांना सीमा नाहीत हे मला माहीत आहे.”

तर मग, आपण आपल्या सहविश्‍वासू बंधुभगिनींचे प्रेमळ, सांत्वनपर शब्द स्वीकारू या, ख्रिस्ती सभांमध्ये दिल्या जाणाऱ्‍या प्रेमळ सल्ल्याचे व विश्‍वास दृढ करणाऱ्‍या सूचनांचे पालन करू या आणि प्रार्थनेद्वारे यहोवाजवळ आपले मन मोकळे करू या. अशा समयोचित तरतुदींद्वारे यहोवा दाखवून देतो की त्याला आपली काळजी आहे. स्वानुभवावरून ॲलेक्स असे म्हणतो: “आध्यात्मिक रीत्या दृढ राहण्यासाठी यहोवानं आपल्यासाठी केलेल्या सर्व तरतुदींचा आपण पुरेपूर लाभ घेतला, तर कोणत्याही संकटाचा सामना करण्याकरता आपल्याजवळ ‘पराकोटीचे सामर्थ्य’ असेल.”—२ करिंथ. ४:७.

[१८ पानांवरील चौकट/चित्र]

दुःखितांना सांत्वन

बायबलमधील स्तोत्रांमध्ये मानवी भावभावनांचे उत्तम रेखाटन केले आहे. तसेच, दुःखसागरात बुडालेल्या व्यक्‍तीच्या हाकेकडे यहोवाचे कान असतात हे आश्‍वासन वारंवार त्या स्तोत्रांतून आपल्याला मिळते. अशी काही स्तोत्रे विचारात घ्या:

“मी आपल्या संकटात परमेश्‍वराचा धावा केला, माझ्या देवाला मी हाक मारिली; त्याने आपल्या मंदिरातून माझी वाणी ऐकली, माझी हाक त्याच्या कानी गेली.”—स्तो. १८:६.

“परमेश्‍वर भग्नहृदयी लोकांच्या सन्‍निध असतो; अनुतप्त मनाच्या लोकांचा तो उद्धार करितो.”—स्तो. ३४:१८.

“भग्नहृदयी जनांना तो [यहोवा] बरे करितो; तो त्यांच्या जखमांना पट्ट्या बांधितो.”—स्तो. १४७:३.

[१७ पानांवरील चित्र]

दुःखाच्या काळात “समयोचित बोल” मनाला किती उभारी देऊ शकतात!