तुमचे मूल काय उत्तर देईल?
तुमचे मूल काय उत्तर देईल?
पालकांना: जानेवारी १५, २०१० अंकात, पृष्ठे १६-२० वर तुमच्या मुलांसोबत सराव करण्याचा उल्लेख आम्ही केला होता. शाळेतील आव्हानांना तोंड देण्यास तुम्ही तुमच्या मुलाला कसे तयार करू शकता याविषयी काही कल्पना या लेखात सुचवल्या आहेत. यांचा तुमच्या कौटुंबिक उपासनेत सराव करण्याचा तुम्ही विचार करू शकता.
यहोवाचे साक्षीदार असलेल्या मुलांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते. ते झेंडावंदन का करत नाहीत, वाढदिवस का साजरे करत नाहीत किंवा शाळेतील विशिष्ट कार्यक्रमांत सहभाग का घेत नाहीत याविषयी त्यांचे शाळेतील मित्र सहसा त्यांना प्रश्न विचारतात. असा एखादा प्रश्न तुमच्या मुलाला किंवा मुलीला विचारल्यास ते काय उत्तर देतील?
अशा वेळी काही ख्रिस्ती मुलांनी केवळ असे उत्तर दिले आहे: “आमच्यात हे करत नाही.” अशी ठाम भूमिका घेणाऱ्या मुलांची आपण नक्कीच प्रशंसा केली पाहिजे. त्यांनी दिलेल्या उत्तरामुळे कदाचित पुढचे प्रश्न टाळले जातील. पण, बायबल आपल्याला असा सल्ला देते, की आपल्या धार्मिक विश्वासांसंबंधी “विचारपूस करणाऱ्या प्रत्येकाला उत्तर देण्यास [आपण] नेहमी सिद्ध” असले पाहिजे. (१ पेत्र ३:१५) याचा अर्थ, केवळ “आमच्यात हे करत नाही” असे म्हणणे पुरेसे नाही. इतरांना आपले म्हणणे पटले नाही, तरी आपण अशी भूमिका का घेतली आहे हे जाणून घेण्यास कदाचित काही जण इच्छुक असतील.
यहोवाचे साक्षीदार असलेल्या अनेक मुलांनी, थोर शिक्षकाकडून शिका (इंग्रजी) यासारख्या प्रकाशनांतून आपल्या शाळेतील मित्रांना बायबलमधील वृत्तान्त सांगितले आहेत. यहोवाचे साक्षीदार असलेली मुले अमुक एक गोष्ट का करतात किंवा का करत नाहीत हे स्पष्ट करण्यास हे वृत्तान्त मदत करू शकतात. काही विद्यार्थी लक्ष देऊन अशा बायबल कथा ऐकतात आणि अशा रीतीने कितीतरी बायबल अभ्यास सुरू करण्यात आले आहेत. इतर काही विद्यार्थ्यांना बायबलची पूर्ण कथा ऐकण्याचा धीर नसेल. बायबलमधील काही वृत्तान्तांचे पूर्ण स्पष्टीकरण दिल्याशिवाय शाळकरी मुलांना ते समजणे कठीण जाऊ शकते. मिन्ही नावाच्या एका ११ वर्षांच्या मुलीला तिच्या मैत्रिणीने वाढदिवसाच्या पार्टीचे आमंत्रण दिले तेव्हा तिने आपल्या मैत्रिणीला म्हटले: “बायबल आम्हाला वाढदिवस साजरा करण्यास सांगत नाही. बाप्तिस्मा देणाऱ्या योहान नावाच्या बायबलमधील एका व्यक्तीला एका वाढदिवसाच्याच दिवशी मारून टाकण्यात आलं होतं.” पण, मिन्हीला आठवते, की तिच्या मैत्रिणीला तिचे हे उत्तर फारसे समजले नव्हते.
काही वेळा, एखाद्या विद्यार्थ्याला आपल्या पुस्तकांतील एखादे चित्र किंवा वृत्तान्त दाखवणे लाभदायक ठरते. पण, मुलांनी इतर विद्यार्थ्यांना धार्मिक पुस्तके दाखवू नयेत असे शाळा अधिकाऱ्यांचे म्हणणे असेल तर काय? अशा वेळी आपली मुले कोणत्याही प्रकाशनाचा उपयोग न करता चांगली साक्ष देऊ शकतात का? आपल्या धार्मिक विश्वासांचे समर्थन करण्यास तुम्ही तुमच्या मुलांना कशी मदत करू शकता?
मुलांसोबत सराव करा
पालक, शाळकरी मित्रांची भूमिका निभावून घरातल्या घरात आपल्या मुलांसोबत सराव करू शकतात. अशी सराव सत्रे खूप उपयोगी आहेत. मुले आपल्या धार्मिक विश्वासांचे समर्थन करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा पालक त्यांची प्रशंसा करू शकतात. तसेच, मुले आणखी चांगल्या प्रकारे कसा तर्क करू शकतात व असे करणे का महत्त्वाचे आहे हेदेखील ते आपल्या मुलांना दाखवू शकतात. उदाहरणार्थ, एकाच वयाच्या मुलांना समजतील असे शब्द वापरण्यास १ करिंथ. १४:९.
त्यांना सुचवा. नऊ वर्षांचा जोशूआ म्हणतो, की त्याच्या शाळासोबत्यांना, “विवेक” व “निष्ठा” यांसारखे शब्द समजत नाहीत. त्यामुळे, त्यांच्याशी तर्क करताना त्याला साधेसोपे शब्द वापरावे लागले होते.—काही शाळकरी मुले एखादा प्रश्न विचारतात, पण त्यावर त्यांना लांबलचक उत्तर दिल्यास त्यांची उत्सुकता नाहीशी होण्याची शक्यता आहे. अशांना संभाषणात गुंतवण्याद्वारे व त्यांच्याशी तर्क करण्याद्वारे साक्षीदार असलेली मुले त्यांची उत्सुकता टिकवून ठेवू शकतात. दहा वर्षांची हान्यूल म्हणते, “माझ्या शाळासोबत्यांना बोलायला आवडतं, स्पष्टीकरण दिलेलं आवडत नाही.” त्यामुळे इतर मुलांशी संवाद साधण्यासाठी त्यांना प्रश्न विचारा, आणि मग ती आपली मते व्यक्त करतात तेव्हा लक्षपूर्वक ऐका.
ख्रिस्ती मुले कशा प्रकारे आपल्या शाळासोबत्यांशी तर्क करू शकतात हे खाली दिलेल्या संभाषणांवरून दिसून येते. ही संभाषणे तोंडपाठ करायची गरज नाही. सगळीच मुले एकसारखी असतात असे नाही. शिवाय, परिस्थितीनुसार उत्तरेदेखील वेगवेगळी असू शकतात. तेव्हा, ख्रिस्ती मुलांनी मुद्दा लक्षात घ्यावा व तो आपल्या स्वतःच्या शब्दांत मांडावा. मग परिस्थिती व शाळासोबती विचारात घेऊन तो मुद्दा
उचितपणे व्यक्त करावा. तुमची मुले शाळेला जाणारी असल्यास, त्यांच्यासोबत या संभाषणांचे नाट्यरूपांतर करण्याचा प्रयत्न करा.मुलांना तालीम देण्यास वेळ द्यावा लागतो व परिश्रम घ्यावे लागतात. ख्रिस्ती पालक आपल्या मुलांच्या मनात बायबलची तत्त्वे बिंबवण्यास व त्यांनुसार जीवन व्यतीत करणे किती सुज्ञतेचे आहे हे त्यांना पटवून देण्यास प्रयत्नशील असतात.—अनु. ६:७; २ तीम. ३:१४.
तुमच्या पुढील कौटुंबिक उपासनेच्या दिवशी तुमच्या मुलांसोबत या लेखात दिलेल्या संभाषणांचा सराव करण्याचा प्रयत्न करा. हे किती परिणामकारक असू शकते हे तुमच्या लक्षात येईल. लक्षात असू द्या, की उत्तरे किंवा शब्द तोंडपाठ करणे हा त्यामागचा उद्देश नसावा. खरेतर, एखाद्या प्रसंगाचे तुम्ही वारंवार नाट्यरूपांतर करून प्रत्येक वेळी वेगवेगळी उत्तरे देऊ शकता व तुमची मुले तो प्रसंग कसा हाताळतात हे तुम्ही पाहू शकता. आपल्या धार्मिक विश्वासांच्या बाबतीत मुले स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांना समजबुद्धी व व्यवहारकुशलता विकसित करण्यास मदत करा. काही काळानंतर, तुम्ही तुमच्या मुलांना त्यांचे वर्गमित्र, शेजारी व शिक्षक यांच्यासमोर त्यांच्या धार्मिक विश्वासांचे समर्थन करण्यास शिकवू शकाल.
[४ पानांवरील चौकट/ चित्रे]
वाढदिवस साजरा करण्यासंबंधी
मेरी: ए जॉन, मी माझ्या वाढदिवसाची पार्टी ठेवलीय, तू यायलाच पाहिजे.
जॉन: तू आठवणीनं मला बोलवलंस त्याबद्दल थँक्स मेरी. पण मला एक सांग, वाढदिवसासाठी पार्टी ठेवायची काय गरज आहे?
मेरी: अरे माझा वाढदिवस साजरा करण्यासाठी! का, तू नाही करत तुझा वाढदिवस साजरा?
जॉन: नाही मेरी, मी नाही करत साजरा.
मेरी: काय बोलतोस, पण का नाही? माझा जन्म झाला तेव्हा माझ्या घरच्यांना तर खूप आनंद झाला होता.
जॉन: आनंद तर माझ्याही घरच्यांना खूप झाला होता. पण, त्यासाठी मी दरवर्षी माझा वाढदिवस साजरा करावा असं नाही वाटत मला. बऱ्याच जणांना असं वाटतं, की त्यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत तेच सगळ्यात महत्त्वाचे आहेत. पण, देव अधिक महत्त्वाचा आहे असं नाही वाटत तुला? त्यानंच आपल्याला जीवन दिलंय, तर मग आपण त्याचे आभार मानू नये का?
मेरी: म्हणजे तुला असं म्हणायचंय का, की मी माझा वाढदिवस साजराच करू नये?
जॉन: तो तुझा वैयक्तिक प्रश्न आहे मेरी. पण, याचा विचार कर. अनेकांना बक्षिसं घेण्यात खूप आनंद वाटतो, पण बायबल असं म्हणते, की घेण्यापेक्षा देण्यात जास्त आनंद असतो. आपल्या वाढदिवसाच्या दिवशी स्वतःचाच विचार करण्याऐवजी देवाचे आभार मानणे, इतरांचा विचार करणे आणि इतरांशी चांगले वागणे योग्य नाही का?
मेरी: मी खरंतर त्याचा विचारच केला नव्हता. याचा अर्थ, तुला तुझ्या आईबाबांकडून बक्षिसंच मिळत नाहीत का?
जॉन: मिळतात ना, का नाही. पण, त्यासाठी माझे आईबाबा माझ्या वाढदिवसाची वाट पाहत नाहीत. ते अधूनमधून मला बक्षिसं देतच असतात. पण मेरी, वाढदिवस साजरे करण्याची पद्धत नेमकी कशी सुरू झाली हे तुला माहीतंय का?
मेरी: नाही रे, तू सांगशील का मला?
जॉन: ठीक आहे. मी तुला उद्या एक गोष्ट सांगेन. फार पूर्वी साजरा केलेल्या एका वाढदिवसाची ती गोष्ट आहे.
राष्ट्रगीत
स्मिता: ज्योती एक विचारू तुला, शाळेतली सगळी मुलं राष्ट्रगीत गातात, मग तू का गात नाहीस?
ज्योती: स्मिता, चांगला प्रश्न विचारलास तू. पण, मला एक सांग, तू का राष्ट्रगीत गातेस?
स्मिता: मला माझ्या देशाचा अभिमान आहे म्हणून.
ज्योती: स्मिता, या देशात राहायला मलाही आवडतं. पण, एक देश दुसऱ्या देशापेक्षा चांगला आहे असं नाही वाटत मला.
स्मिता: मला तर माझाच देश सगळ्यात चांगला वाटतो.
ज्योती: मी प्रत्येक गोष्टीकडे देवाच्या नजरेनं पाहण्याचा प्रयत्न करते. आणि बायबल असे सांगते की देव लोकांमध्ये भेदभाव करत नाही. तो सर्व लोकांवर प्रेम करतो, मग ते कोणत्याही देशाचे असोत. म्हणूनच, मी माझ्या देशाचा आदर करत असले, तरी मी राष्ट्रगीत गात नाही आणि झेंडावंदनसुद्धा करत नाही.
स्मिता: या बाबतीत तू जरा अतिशयोक्ती करते असं नाही वाटत तुला?
ज्योती: नाही स्मिता, मी एकटीच तसा विचार करते असं नाही. बायबलमध्ये अशा काही युवकांबद्दल सांगितलं आहे ज्यांना नेमकं असंच वाटलं होतं. त्यांना, देशाचं प्रतिक असलेल्या एका राजकीय चिन्हापुढे नमन करायला सांगितलं होतं. पण, या युवकांनी जिवाला धोका असूनही तसं करण्यास साफ नकार दिला.
स्मिता: असं का? मी तर हे कधीच ऐकलं नव्हतं.
ज्योती: स्मिता, तुला याविषयी आणखी जाणून घ्यायचं असेल, तर त्याबद्दल मी तुला मधल्या सुटीत सांगेन.
मतदान
विजय: सचिन, तू जर मत द्यायच्या वयाचा असतास, तर तू कुणाला मत दिलं असतं?
सचिन: कुणालाच नाही.
विजय: का रे?
सचिन: मी तर केव्हाच माझं मत देऊन टाकलंय.
विजय: ते कसं शक्य आहे? तू तर अजून मत द्यायच्या वयाचासुद्धा नाहीस.
सचिन: ते खरंय, पण याबाबतीत मात्र मी मत देऊ शकतो. मी माझं मत एका सगळ्यात चांगल्या सरकारला दिलं आहे.
विजय: ते कोणतं सरकार आहे?
सचिन: ते येशूचं सरकार आहे. आणि त्यासाठी तोच सगळ्यात योग्य आहे असं मला वाटतं. मला असं का वाटतं हे तुला जाणून घ्यायचंय का?
विजय: नको रे, असू दे.
सचिन: ठीक आहे. पण, पुढंमागं कधी तुला जाणून घ्यावंसं वाटलं तर मला जरूर विचार.
[चित्र]
“ए जॉन, मी माझ्या वाढदिवसाची पार्टी ठेवलीय, तू यायलाच पाहिजे”
[३ पानांवरील चित्र]
‘तू का राष्ट्रगीत गात नाहीस?’