देवाची सेवा करायला वयाचे बंधन नसते
देवाची सेवा करायला वयाचे बंधन नसते
दक्षिण स्पेनमधील, मालागा या ठिकाणी १९ डिसेंबर २००९ रोजी एका आईने व तिच्या मुलीने बाप्तिस्मा घेतला. या दोघींचीही नावे ॲना होती. स्पेनमध्ये २००९ साली बाप्तिस्मा घेणाऱ्या २,३५२ जणांपैकी त्या होत्या. पण, या आई व मुलीविषयी काहीतरी खास असे होते. ते म्हणजे त्यांचे वय. आई चक्क १०७ वर्षांची, तर मुलगी ८३ वर्षांची होती!
कोणत्या गोष्टीने त्यांना यहोवाला केलेल्या आपल्या समर्पणाचे प्रतीक म्हणून बाप्तिस्मा घेण्यास प्रवृत्त केले? १९७० च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात, यहोवाची साक्षीदार असलेली एक शेजारीण, ॲना या मुलीला आपल्या घरात होत असलेल्या मंडळीच्या पुस्तक अभ्यासाला येण्याचे आमंत्रण देत असे. अधूनमधून ॲना त्या अभ्यासाला जायची. पण, नोकरीमुळे ती पुढे प्रगती करू शकली नाही.
सुमारे दहा वर्षांनंतर, ॲनाची काही मुले बायबल अभ्यास करू लागली व काही काळानंतर यहोवाचे साक्षीदार बनली. त्यांच्यापैकी, मारी कार्मन ही मुलगी आपल्या आईच्या मनात बायबल सत्याविषयीचे प्रेम पुन्हा जागृत करण्यात यशस्वी झाली व तिने तिला बायबल अभ्यास स्वीकारण्यास मदत केली. नंतर, ॲना नावाची मारी कार्मनची आजीदेखील बायबलविषयी आस्था दाखवू लागली. कालांतराने, या कुटुंबातील दहा जणांनी बाप्तिस्मा घेतला.
बाप्तिस्म्याच्या दिवशी, दोन्ही ॲना म्हणजे आई व मुलगी अतिशय आनंदी होत्या. १०७ वर्षांची ॲना म्हणाली: “यहोवानं मला त्याच्याविषयी जाणून घेण्याची संधी दिली; खरोखर यहोवाचे माझ्यावर खूप उपकार आहेत.” तर तिच्या मुलीने म्हटले: “नंदनवन येण्याआधी मला यहोवाची सेवा करायची आहे, त्याची इच्छा पूर्ण करायची आहे आणि माझ्याच्यानं होईल तितकं प्रचार कार्य करायचं आहे.”
या दोघ्या विधवा बहिणींना सभांना उपस्थित राहिल्याने खास आनंद मिळतो. त्यांच्या मंडळीतील एक वडील सांगतात: “त्या एकही सभा चुकवत नाहीत. टेहळणी बुरूज अभ्यासात उत्तरं देण्यास त्या नेहमी उत्सुक असतात.”
त्यांच्या विश्वासू उदाहरणावरून आपल्याला बायबलमधील हन्ना नावाच्या एका विधवा स्त्रीची आठवण होते. ती “मंदिर सोडून न जाता उपास व प्रार्थना करून रात्रंदिवस सेवा करीत असे.” यामुळे तिला बाळ येशूला पाहण्याचा विशेषाधिकार मिळाला. (लूक २:३६-३८) हन्ना ८४ वर्षांची होती तरी यहोवाची सेवा करण्यासाठी ती वृद्ध नव्हती, आणि वर उल्लेख केलेल्या दोन ॲनादेखील नाहीत.
तुमचे असे काही नातेवाईक आहेत का जे बायबलचा संदेश ऐकण्यासाठी तयार असतील? किंवा घरोघरचे कार्य करताना, तुमचा संदेश ऐकून घेण्यास उत्सुक असलेली एखादी आस्थेवाईक वृद्ध व्यक्ती तुम्हाला कधी भेटली का? तसे असल्यास, तेदेखील या लेखात उल्लेख केलेल्या दोन ॲनांप्रमाणेच बनू शकतात. कारण, खरा देव यहोवा याची सेवा सुरू करण्यासाठी वयाचे बंधन नसते.
[२५ पानांवरील संक्षिप्त आशय]
“खरोखर यहोवाचे माझ्यावर खूप उपकार आहेत”
[२५ पानांवरील संक्षिप्त आशय]
“नंदनवन येण्याआधी मला यहोवाची सेवा करायची आहे”