देवाच्या आत्म्याने मार्गदर्शित असलेल्या राजाद्वारे आशीर्वाद मिळवा!
देवाच्या आत्म्याने मार्गदर्शित असलेल्या राजाद्वारे आशीर्वाद मिळवा!
‘परमेश्वराचा आत्मा त्याजवर राहील.’—यश. ११:२.
१. जगातील समस्यांबद्दल काहींनी कोणती चिंता व्यक्त केली आहे?
“राजकीय, सामाजिक व पर्यावरणाच्या दृष्टीने पाहता सध्याचे जग पूर्णपणे गोंधळलेल्या अवस्थेत आहे. अशा अवस्थेत आणखी १०० वर्षे मानवजातीचा टिकाव कसा लागेल?” हा प्रश्न खगोल भौतिकशास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंग यांनी २००६ मध्ये उपस्थित केला. न्यू स्टेट्समन या नियतकालिकातील एका लेखात म्हटले होते: “आपण जगातून गरिबी नाहिशी करू शकलो नाही किंवा जगात शांती प्रस्थापित करू शकलो नाही. त्याच्या अगदी उलट आपण केले आहे. आपण मुळीच प्रयत्न केले नाहीत असे नाही. साम्यवादापासून ते भांडवलशाहीपर्यंत; तसेच, युद्धे रोखण्यासाठी राष्ट्र संघाची स्थापना करण्यापासून ते आण्विक शस्त्रे साठवण्यापर्यंत आपण सर्व प्रयोग करून पाहिले आहेत. युद्धाचा अंत करणे आपल्याच हातात आहे असा विश्वास बाळगून ‘युद्ध संपुष्टात आणण्यासाठी’ आपण अनेक ‘युद्धे लढली’ आहेत.”
२. यहोवा कशा प्रकारे लवकरच या पृथ्वीवर आपले आधिपत्य गाजवेल?
२ अशा प्रकारची विधाने ऐकून यहोवाच्या सेवकांना आश्चर्य वाटत नाही. मानवांना स्वतःवर शासन करण्यासाठी निर्माण करण्यात आले नव्हते असे बायबलमध्ये सांगितले आहे. (यिर्म. १०:२३) केवळ यहोवालाच या विश्वावर आधिपत्य गाजवण्याचा हक्क आहे. त्यामुळे, आपल्याकरता स्तर बनवण्याचा, आपल्या जीवनाचा उद्देश ठरवण्याचा आणि तो उद्देश पूर्ण करण्याकरता आपले मार्गदर्शन करण्याचा अधिकार केवळ त्यालाच आहे. शिवाय, स्वतःवर शासन करण्याचे मानवांचे फसलेले सर्व प्रयत्न नष्ट करण्यासाठी यहोवा लवकरच आपल्या अधिकाराचा वापर करेल. त्याच वेळी, जे लोक त्याच्या सार्वभौम आधिपत्याचा विरोध करून मानवांना पापाच्या, अपरिपूर्णतेच्या आणि ‘ह्या युगाच्या दैवताच्या’ म्हणजे दियाबल सैतानाच्या गुलामगिरीत जखडून ठेवतात अशा सर्वांचा तो नाश करेल.—२ करिंथ. ४:४.
३. मशीहाविषयी यशयाने काय पूर्वभाकीत केले होते?
३ नंदनवन बनलेल्या नवीन जगात, यहोवा आपल्या मशीही राज्याद्वारे मानवजातीवर प्रेमळपणे आधिपत्य गाजवेल. (दानी. ७:१३, १४) या राज्याच्या राजाबद्दल यशयाने असे भाकीत केले: “इशायाच्या बुंधाला धुमारा फुटेल; त्याच्या मुळांतून फुटलेली शाखा फळ देईल; परमेश्वराचा आत्मा, सुज्ञानाचा व समंजसपणाचा आत्मा, सुसंकल्पाचा व सामर्थ्याचा आत्मा, परमेश्वराच्या ज्ञानाचा व भयाचा आत्मा त्याजवर राहील.” (यश. ११:१, २) ‘इशायाच्या बुंधाच्या धुमाऱ्याला’ म्हणजे येशू ख्रिस्ताला, मानवजातीवर शासन करण्यासाठी देवाच्या पवित्र आत्म्याने कोणत्या विशिष्ट मार्गांनी पात्र बनवले? त्याच्या शासनामुळे आपल्याला कोणते आशीर्वाद लाभतील? आणि ते आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपण काय केले पाहिजे?
शासन करण्यास देवाने पात्र ठरवले
४-६. कोणते महत्त्वपूर्ण ज्ञान असल्यामुळे येशूला खऱ्या अर्थाने बुद्धिमान व दयाळू राजा, महायाजक आणि न्यायाधीश या नात्याने कार्य करणे शक्य होईल?
४ यहोवाची अशी इच्छा आहे, की खऱ्या अर्थाने बुद्धिमान आणि दयाळू असलेला राजा, महायाजक आणि न्यायाधीश याच्या मार्गदर्शनाखाली त्याच्या प्रजेने परिपूर्णता प्राप्त करावी. म्हणूनच देवाने येशू ख्रिस्ताची निवड केली आणि या सर्वात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्याकरता आपल्या पवित्र आत्म्याद्वारे त्याला पात्र केले. देवाकडून मिळालेल्या या भूमिका येशू अगदी चोखपणे निभावेल असे आपण का म्हणू शकतो याची काही कारणे पाहा.
५ देवाला सगळ्यात चांगल्या प्रकारे केवळ येशूच ओळखतो. देवाचा एकुलता एक पुत्र आपल्या पित्याला कोट्यवधी वर्षांपासून ओळखतो. इतक्या काळापासून इतर कोणीही देवाला ओळखलेले नाही. त्या कोट्यवधी वर्षांच्या काळादरम्यान, येशूने यहोवाला इतके जवळून ओळखले की तो “अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे” असे त्याचे वर्णन करता येऊ शकते. (कलस्सै. १:१५) येशूने स्वतः म्हटले: “ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे.”—योहा. १४:९.
६ यहोवानंतर, केवळ येशूलाच मानवजातीसहित इतर सर्व सृष्टीबद्दल सगळ्यात व्यापक ज्ञान आहे. कलस्सैकर १:१६, १७ मध्ये असे म्हटले आहे: ‘आकाशात व पृथ्वीवर असलेले, दृश्य व अदृश्य असलेले, सर्व काही त्याच्याद्वारे [देवाच्या पुत्राद्वारे] निर्माण झाले आहे; तो सर्वांच्या पूर्वीचा आहे व त्याच्यामध्ये सर्व काही अस्तित्वात आहे.’ विचार करा! देवाचा “कुशल कारागीर” या नात्याने येशूने सृष्टिकार्याच्या इतर सर्व पैलूंत भाग घेतला. त्यामुळे, येशूला संपूर्ण विश्वाची म्हणजे सूक्ष्म अणुरेणूंपासून ते अद्भुत मानवी मेंदूपर्यंत प्रत्येक गोष्टीची तपशीलवार माहिती आहे. होय, ख्रिस्त खऱ्या अर्थाने बुद्धीचे रूप आहे.—नीति. ८:१२, २२, ३०, ३१.
७, ८. देवाच्या पवित्र आत्म्याने येशूला सेवाकार्यात कशा प्रकारे मदत केली?
७ येशूला देवाच्या पवित्र आत्म्याद्वारे अभिषिक्त करण्यात आले होते. येशूने म्हटले: “परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण दीनांस सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला; त्याने मला पाठविले आहे, ते अशासाठी की, धरून नेलेल्यांची सुटका व अंधळ्यांस पुन्हा दृष्टीचा लाभ ह्यांची घोषणा करावी, ठेचले जात आहेत त्यांस सोडवून पाठवावे; परमेश्वराच्या प्रसादाच्या वर्षाची घोषणा करावी.” (लूक ४:१८, १९) येशूचा बाप्तिस्मा झाला तेव्हा पवित्र आत्म्याने बहुधा त्याला मानव म्हणून पृथ्वीवर येण्याआधी त्याने शिकलेल्या गोष्टींची, तसेच मशीहा या नात्याने पृथ्वीवरील त्याच्या सेवाकार्यादरम्यान देव त्याच्याकडून काय साध्य करण्याची अपेक्षा करतो याची आठवण करून दिली.—यशया ४२:१; लूक ३:२१, २२; योहान १२:५० वाचा.
८ येशूला पवित्र आत्म्याद्वारे सामर्थ्य मिळाले होते आणि तो शरीराने व मनाने परिपूर्ण होता. त्यामुळेच, तो केवळ सर्व काळातील सर्वश्रेष्ठ मनुष्यच नव्हता, तर तो सर्वश्रेष्ठ शिक्षकही होता. खरेतर, त्याचे श्रोते “त्याच्या शिक्षणावरून थक्क झाले.” (मत्त. ७:२८) याचे एक कारण म्हणजे मानवजातीच्या समस्यांची मूळ कारणे पाप, अपरिपूर्णता आणि आध्यात्मिक अज्ञान ही आहेत हे तो सांगू शकत होता. तसेच, लोकांच्या मनात काय आहे हे तो पाहू शकत होता आणि त्यानुसार तो त्यांच्याशी व्यवहार करू शकत होता.—मत्त. ९:४; योहा. १:४७.
९. पृथ्वीवर असताना येशूला आलेल्या अनुभवांवर मनन केल्याने राजा या नात्याने त्याच्यावर तुमचा भरवसा कसा वाढला आहे?
९ येशू एका मनुष्याप्रमाणे पृथ्वीवर राहिला. राजा बनण्यास पात्र ठरण्यासाठी, येशूने मानव या नात्याने अनुभवलेल्या गोष्टींचा आणि अपरिपूर्ण लोकांच्या निकट सहवासाचा मोठा हातभार लागला. प्रेषित पौलाने लिहिले: “[येशूला] सर्व प्रकारे ‘आपल्या बंधूंसारखे’ होणे अगत्याचे होते, ह्यासाठी की, लोकांच्या पापाबद्दल प्रायश्चित्त करण्याकरिता त्याने स्वतः देवासंबंधीच्या गोष्टींविषयी दयाळू व विश्वसनीय प्रमुख याजक व्हावे. कारण ज्याअर्थी त्याने स्वतः परीक्षा होत असता दुःख भोगिले त्याअर्थी ज्यांची परीक्षा होत आहे त्यांना साहाय्य करावयास तो समर्थ आहे.” (इब्री २:१७, १८) येशूने ‘स्वतः परीक्षांचा’ सामना केला असल्यामुळे, परीक्षांचा सामना करणाऱ्या इतरांना तो सहानुभूती दाखवू शकतो. येशूच्या पृथ्वीवरील सेवाकार्यादरम्यान त्याचा कनवाळूपणा स्पष्टपणे दिसून आला. रोग्यांना, अपंगांना, गांजलेल्यांना, इतकेच काय तर लहान मुलांनादेखील त्याच्याजवळ येण्यास संकोच वाटला नाही. (मार्क ५:२२-२४, ३८-४२; १०:१४-१६) नम्र आणि देवाबद्दल जाणून घेण्याची तीव्र इच्छा असलेले लोकदेखील त्याच्याकडे आकर्षित झाले. याच्या अगदी उलट, जे गर्विष्ठ व उद्धट होते आणि ज्यांच्या “ठायी देवाची प्रीति” नव्हती अशा लोकांनी त्याला नाकारले, त्याचा द्वेष आणि विरोध केला.—योहा. ५:४०-४२; ११:४७-५३.
१०. येशूचे आपल्यावर प्रेम आहे हे त्याने कोणत्या सर्वश्रेष्ठ मार्गाने दाखवून दिले?
१० येशूने आपल्याकरता त्याचे जीवन बलिदाने केले. येशूशिवाय इतर कोणीही आपला शासक असू शकत नाही याचा कदाचित सर्वश्रेष्ठ पुरावा म्हणजे आपल्याकरता मरण पत्करण्याची त्याने दाखवलेली तयारी. (स्तोत्र ४०:६-१० वाचा.) ख्रिस्ताने म्हटले: “आपल्या मित्रांकरिता आपला प्राण द्यावा ह्यापेक्षा कोणाची प्रीति मोठी नाही.” (योहा. १५:१३) होय, जे सहसा आपल्या प्रजेच्या पैशावर ऐशआरामाचे जीवन जगतात अशा अपरिपूर्ण मानवी शासकांच्या अगदी उलट, येशूने मानवजातीकरता आपले जीवन बलिदान केले.—मत्त. २०:२८.
खंडणीचे फायदे लागू करण्याचे सामर्थ्य येशूला मिळाले आहे
११. आपला खंडणीदाता या नात्याने आपण येशूवर पूर्ण भरवसा का ठेवू शकतो?
११ महायाजक या नात्याने येशू त्याच्या खंडणी बलिदानाचे फायदे लागू करण्यात पुढाकार घेणारा आहे हे किती योग्य आहे! खरेतर, येशू आपल्या हजार वर्षांच्या शासनादरम्यान आपला खंडणीदाता या नात्याने काय करणार आहे याची पूर्वझलक, त्याने पृथ्वीवरील त्याच्या सेवाकार्यादरम्यान दिली. आपण विश्वासू राहिल्यास आपल्याला त्याचा लाभ होऊ शकतो. येशूने रोग्यांना आणि अपंगांना बरे केले, मेलेल्यांना पुन्हा जिवंत केले, लोकसमुदायाला जेवू घातले आणि नैसर्गिक संकटांवरही नियंत्रण केले. (मत्त. ८:२६; १४:१४-२१; लूक ७:१४, १५) शिवाय, त्याने या सर्व गोष्टी त्याचा अधिकार व सामर्थ्य यांचा दिखावा करण्यासाठी नव्हे, तर त्याला लोकांबद्दल असलेला दयाळूपणा आणि प्रेम दाखवण्यासाठी केले. आपल्याला बरे करावे अशी एका कुष्ठरोग्याने येशूला विनंती केली तेव्हा येशूने म्हटले: “माझी इच्छा आहे.” (मार्क १:४०, ४१) येशूच्या हजार वर्षांच्या शासनादरम्यान तो तसाच दयाळूपणा जगव्याप्त स्तरावर दाखवेल.
१२. यशया ११:९ मधील शब्द कशा प्रकारे पूर्ण होतील?
१२ ख्रिस्ताने २,००० वर्षांपूर्वी देवाबद्दल लोकांना शिकवण्याचे जे कार्य सुरू केले होते ते कार्य, तो आणि त्याचे सहशासक पुढेही चालू ठेवतील. अशा प्रकारे, यशया ११:९ मधील शब्द पूर्ण होतील: “सागर जसा जलपूर्ण आहे तशी परमेश्वराच्या ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण होईल.” आदामावर सुरुवातीला पृथ्वीची आणि पृथ्वीवरील प्राण्यांची देखभाल करण्याचे काम सोपवले होते. त्याचप्रमाणे, देवाबद्दलच्या त्या शिक्षणात, पृथ्वीची आणि पृथ्वीवरील अगणित प्राण्यांची देखभाल कशी केली जावी याची माहिती असेल यात शंका नाही. हजार वर्षांच्या शेवटी, उत्पत्ति १:२८ मध्ये नमूद असलेला देवाचा मूळ उद्देश पूर्ण झालेला असेल आणि खंडणी बलिदान पूर्णपणे लागू करण्यात आलेले असेल.
येशूला न्याय करण्याचे सामर्थ्य मिळाले आहे
१३. येशूला धार्मिकता प्रिय असल्याचे त्याने कशा प्रकारे दाखवले?
१३ ख्रिस्त हा “देवाने नेमलेला असा जिवंतांचा व मेलेल्यांचा न्यायाधीश” आहे. (प्रे. कृत्ये १०:४२) तर मग, येशू हा अविनाशी आहे आणि धार्मिकता व सत्यता त्याच्या कमरबंदासारखे आहेत हे जाणून आपल्याला किती सांत्वन मिळते! (यश. ११:५) त्याला लोभ, ढोंगीपणा आणि इतर वाईट गोष्टींचा द्वेष असल्याचे त्याने दाखवले. तसेच, ज्या लोकांना इतरांच्या दुःखांचे काहीच वाटत नाही अशांचा त्याने धिक्कार केला. (मत्त. २३:१-८, २५-२८; मार्क ३:५) शिवाय, “मनुष्यात काय आहे हे त्याला स्वतःला ठाऊक होते,” त्यामुळे इतरांचे बाह्यस्वरूप पाहून तो फसला नाही.—योहा. २:२५.
१४. येशूला धार्मिकता व न्यायीपण प्रिय असल्याचे आजही तो कोणत्या मार्गांनी दाखवत आहे आणि आपण स्वतःला काय विचारले पाहिजे?
१४ इतिहासातील सर्वात मोठ्या प्रचाराच्या व शिकवण्याच्या मोहिमेची देखरेख करण्याद्वारे येशू दाखवून देत आहे, की त्याला धार्मिकता व न्यायीपण प्रिय आहे. जोपर्यंत हे कार्य देवाच्या मनाप्रमाणे पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणताही मानव, कोणतेही सरकार आणि कोणताही दुष्ट आत्मा या कार्याला रोखू शकत नाही. त्यामुळे, आपण पूर्ण भरवसा बाळगू शकतो की हर्मगिदोनानंतर, देवाच्या न्यायाचा विजय होईल. (यशया ११:४; मत्तय १६:२७ वाचा.) तेव्हा स्वतःला विचारा: ‘मी सेवाकार्यात लोकांप्रती येशूसारखी मनोवृत्ती प्रदर्शित करतो का? आरोग्य समस्यांमुळे किंवा माझ्या वैयक्तिक परिस्थितीमुळे मला सेवेत जास्त करता येत नसले, तरी मी यहोवाची सेवा पूर्ण मनाने करत आहे का?’
१५. कोणती गोष्ट लक्षात ठेवल्याने देवाची सेवा पूर्ण मनाने करण्यास आपल्याला मदत मिळू शकते?
१५ प्रचाराचे कार्य हे देवाचे कार्य आहे हे आपण लक्षात ठेवल्यास, पूर्ण मनाने देवाची सेवा करण्यास आपल्याला मदत मिळेल. हे कार्य करण्याची आज्ञा त्यानेच आपल्याला दिली आहे; त्याच्या पुत्राद्वारे तो या कार्याचे मार्गदर्शन करत आहे; आणि या कार्यात सहभाग घेणाऱ्यांना तोच त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे समर्थ करत आहे. देवाचे सहकारी या नात्याने, देवाच्या आत्म्याद्वारे मार्गदर्शित असलेल्या त्याच्या पुत्रासोबत सेवा करण्याचा बहुमान लाभल्याबद्दल तुम्ही त्याची कदर करता का? आज २३६ देशांमध्ये सत्तर लाखांहून अधिक लोक राज्याचा संदेश सांगत आहेत. त्यांच्यापैकी अनेक जणांना “निरक्षर व अज्ञानी” असल्याचे समजले जाते. यहोवाशिवाय इतर कोणीही या लोकांना राज्याचा हा संदेश इतरांपर्यंत पोहचवण्यास प्रेरित करू शकत नाही.—प्रे. कृत्ये ४:१३.
ख्रिस्ताद्वारे तुम्ही आशीर्वादित व्हा!
१६. उत्पत्ति २२:१८ मधून देवाच्या आशीर्वादांबद्दल काय सूचित होते?
१६ यहोवाने अब्राहामाला असे सांगितले: “तू माझा शब्द ऐकला म्हणून पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे आशीर्वादित होतील.” (उत्प. २२:१८) यातून असे सूचित होते की जे लोक देवाची व त्याच्या पुत्राची सेवा करणे सन्मानाची गोष्ट आहे असे मानतात ते मशीही संततीद्वारे अनेक आशीर्वाद मिळण्याचा भरवसा बाळगू शकतात. भविष्यात मिळणाऱ्या या आशीर्वादांवर लक्ष केंद्रित करून आज देवाचे सेवक त्याच्या सेवेत स्वतःला व्यस्त ठेवतात.
१७, १८. अनुवाद २८:२ मध्ये आपण यहोवाच्या कोणत्या अभिवचनाविषयी वाचतो, आणि आज आपल्याकरता त्याचा काय अर्थ होतो?
१७ देवाने अब्राहामाच्या संततीला अर्थात प्राचीन इस्राएल राष्ट्राला एकदा असे म्हटले: “तू आपला देव परमेश्वर ह्याची वाणी ऐकशील तर हे सर्व आशीर्वाद [नियमशास्त्रात सांगितलेले] तुझ्याकडे धावत येतील.” (अनु. २८:२) हीच गोष्ट आज देवाच्या सेवकांनाही लागू होते. तुम्हाला यहोवाचे आशीर्वाद मिळवण्याची इच्छा असल्यास त्याची ‘वाणी ऐकत’ राहा. मग, त्याचे आशीर्वाद ‘तुमच्याकडे धावत येतील.’ पण, देवाची ‘वाणी ऐकणे’ म्हणजे नेमके काय?
१८ देवाची ‘वाणी ऐकणे’ याचा अर्थ, त्याच्या वचनात जे काही सांगितले आहे त्याकडे गांभीर्याने लक्ष देणे आणि तो पुरवत असलेल्या आध्यात्मिक अन्नाचा फायदा घेणे. (मत्त. २४:४५) तसेच, देवाच्या व त्याच्या पुत्राच्या आज्ञांचे पालन करणे असादेखील त्याचा अर्थ होतो. येशूने म्हटले: “मला ‘प्रभुजी, प्रभुजी,’ असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही; तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल.” (मत्त. ७:२१) आणि देवाची वाणी ऐकणे म्हणजे त्याने लावून दिलेल्या व्यवस्थेला अर्थात ख्रिस्ती मंडळीला, तसेच, मानवरूपी ‘देणग्यांना’ अर्थात नियुक्त वडिलांना स्वेच्छेने अधीनता दाखवणे.—इफिस. ४:८.
१९. आपण कशा प्रकारे देवाकडून आशीर्वाद मिळवू शकतो?
१९ देवाने दिलेल्या मानवरूपी ‘देणग्यांमध्ये’ नियमन मंडळाचे सदस्य समाविष्ट आहेत, जे जगव्याप्त ख्रिस्ती मंडळीचे प्रतिनिधीत्व करतात. (प्रे. कृत्ये १५:२, ६) खरेतर, मोठे संकट येईल तेव्हा ख्रिस्ताच्या या अभिषिक्त बांधवांप्रती आपण कोणती मनोवृत्ती दाखवतो त्याच्या आधारावर प्रामुख्याने आपला न्याय करण्यात येईल. (मत्त. २५:३४-४०) तेव्हा, देवाचे आशीर्वाद मिळवण्याचा एक मार्ग म्हणजे देवाच्या अभिषिक्त जनांना एकनिष्ठपणे पाठबळ देणे.
२०. (क) मानवरूपी ‘देणग्यांची’ मुख्य जबाबदारी काय आहे? (ख) आपण या बांधवांप्रती कृतज्ञ आहोत हे कसे दाखवू शकतो?
२० मानवरूपी ‘देणग्यांमध्ये’ शाखा समितीचे सदस्य, प्रवासी पर्यवेक्षक आणि मंडळीतील वडीलदेखील समाविष्ट आहेत. या सर्वांना पवित्र आत्म्याद्वारे नियुक्त करण्यात आले आहे. (प्रे. कृत्ये २०:२८) या बांधवांची मुख्य जबाबदारी, “देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या व तत्संबंधी परिपूर्ण ज्ञानाच्या एकत्वाप्रत, प्रौढ मनुष्यपणाप्रत, ख्रिस्ताची पूर्णता प्राप्त होईल अशा बुद्धीच्या मर्यादेप्रत आपण सर्व येऊन पोहचू तोपर्यंत” देवाच्या लोकांना विश्वासात दृढ करणे ही आहे. (इफिस. ४:१३) हे मान्य आहे की आपल्या सर्वांसारखेच तेदेखील अपरिपूर्ण आहेत. तरीसुद्धा, त्यांच्या प्रेमळ मार्गदर्शनाला आपण कृतज्ञतापूर्वक प्रतिसाद देतो तेव्हा आपण आशीर्वादित होतो.—इब्री १३:७, १७.
२१. देवाच्या पुत्राच्या आज्ञांचे पालन करणे इतके निकडीचे का आहे?
२१ ख्रिस्त लवकरच सैतानाच्या दुष्ट जगाविरुद्ध पाऊल उचलेल. असे घडेल तेव्हा, आपले जीवन येशूच्या हातात असेल. कारण, पूर्वभाकीत ‘मोठ्या लोकसमुदायाला’ “जीवनाच्या पाण्याच्या झऱ्यांजवळ” नेण्याचा अधिकार देवाने त्याला दिला आहे. (प्रकटी. ७:९, १६, १७) तेव्हा, आपण स्वेच्छेने व कृतज्ञतेने, देवाच्या आत्म्याद्वारे मार्गदर्शित असलेल्या राजाच्या अधीन होण्यासाठी आपल्याकडून होता होईल तितके प्रयत्न करू या.
पुढील शास्त्रवचनांतून तुम्ही काय शिकलात?
• यशया ११:१-५.
[अभ्यासाचे प्रश्न]
[१७ पानांवरील चित्र]
येशूने याईराच्या मुलीचे पुनरुत्थान केले तेव्हा त्याचा दयाळूपणा दिसून आला
[१८ पानांवरील चित्रे]
येशू ख्रिस्त इतिहासातील सर्वात मोठ्या प्रचार मोहिमेची देखरेख करत आहे