बायबलमधील सत्यात किती सामर्थ्य असतं ते मी पाहिलं आहे
बायबलमधील सत्यात किती सामर्थ्य असतं ते मी पाहिलं आहे
वीटो फ्राएजे यांच्याद्वारे कथित
कदाचित तुम्ही ट्रेन्टीनारा हे नाव कधीही ऐकलं नसेल. हे छोटंसं नगर इटलीतील नेपल्स या शहराच्या दक्षिणेला आहे. माझ्या आईबाबांचा आणि माझा थोरला भाऊ आन्जेलो याचा जन्म इथंच झाला होता. आन्जेलोच्या जन्मानंतर, माझे आईबाबा अमेरिकेत राहायला गेले आणि ते न्यू यॉर्क राज्यातील रोचेस्टर या शहरात स्थायिक झाले. इथंच १९२६ मध्ये माझा जन्म झाला. १९२२ मध्ये माझे बाबा पहिल्यांदा बायबल विद्यार्थ्यांच्या संपर्कात आले. त्या काळात यहोवाच्या साक्षीदारांना बायबल विद्यार्थी या नावानं ओळखलं जायचं. लवकरच बाबा व आई दोघंही बायबल विद्यार्थी बनले.
बाबा विचारशील व शांत स्वभावाचे होते. पण, त्यांना अन्याय सहन होत नसे. पाळकांनी लोकांना अंधकारात ठेवलं आहे हे पाहून त्यांना खूप राग यायचा. त्यामुळे, इतरांना बायबलमधील सत्यांबद्दल सांगण्याची संधी त्यांनी कधीही सोडली नाही. निवृत्त झाल्यावर, त्यांनी पूर्ण वेळची सेवा सुरू केली आणि वयाच्या ७४ व्या वर्षापर्यंत ते ही सेवा करत राहिले. ढासळतं आरोग्य व तीव्र हिवाळा यांमुळे त्यांना पूर्ण वेळची सेवा थांबवावी लागली. तरीसुद्धा, वयाची नव्वद वर्षे पार करूनही ते दर महिन्याला ४० ते ६० तास प्रचार कार्यात घालवू लागले. बाबांच्या उदाहरणाचा माझ्यावर गहिरा प्रभाव पडला. अधूनमधून ते विनोद करत असले, तरी ते एक धीरगंभीर पुरुष होते. ते म्हणायचे, “बायबलमधील सत्य खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे त्याकडे गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे.”
आम्हा पाचही भावंडांना देवाचं वचन शिकवण्यासाठी आईबाबांनी खूप मेहनत घेतली. १९४३ मध्ये, २३ ऑगस्ट रोजी माझा बाप्तिस्मा झाला, आणि १९४४ च्या जून महिन्यात मी एक पायनियर या नात्यानं सेवा करायला सुरुवात केली. माझी मोठी बहीण कारमेला, न्यू यॉर्क राज्यातल्या जिनीवा शहरात फर्न नावाच्या एका उत्साही बहिणीबरोबर पायनियर सेवा करत होती. मी माझं उरलेलं आयुष्य ज्या मुलीसोबत घालवणार होतो ती मुलगी फर्न हीच आहे याची जाणीव व्हायला मला जास्त काळ लागला नाही. म्हणून, १९४६ च्या ऑगस्ट महिन्यात आम्ही लग्नं केलं.
मिशनरी सेवा
खास पायनियर या नात्यानं आमच्या पहिल्या दोन नेमणुका न्यू यॉर्कमधल्या जिनीवा आणि नॉर्विक या शहरांत होत्या. १९४८ च्या ऑगस्ट महिन्यात आम्हाला गिलियड प्रशालेच्या १२ व्या वर्गाला उपस्थित राहण्याचा विशेषाधिकार लाभला. त्यानंतर, आम्हाला कार्ल आणि जोॲन रिजवे या मिशनरी दांपत्यासोबत इटलीतल्या नेपल्स इथं पाठवण्यात आलं. त्या काळात, नेपल्स शहर युद्धाच्या विध्वंसकारी परिणामांतून सावरत होतं. तिथं घर मिळणं फार कठीण होतं, म्हणून काही महिने आम्ही दोन खोल्यांच्या एका छोट्याशा अपार्टमेंटमध्ये राहिलो.
माझे आईबाबा निॲपॉलिटन बोली (नेपल्सची बोलीभाषा) बोलत असल्यामुळे, मी ही भाषा ऐकतच लहानाचा मोठा झालो होतो. त्यामुळे, माझ्या बोलण्याची ढब अमेरिकन असूनही मी इटालियन बोलायचो तेव्हा लोकांना ते समजायचं. फर्नला मात्र सुरुवातीला थोडंसं कठीण गेलं. पण, मला हे मान्य करावं लागेल की तिनं इटालियन भाषा शिकून घेतली आणि नंतर ती माझ्याहीपेक्षा चांगलं बोलू लागली.
सुरुवातीला, नेपल्समध्ये बायबल सत्यांविषयी आवड दाखवणारं केवळ एक कुटुंब आम्हाला भेटलं. त्या कुटुंबात चार जण होते. ते बेकायदेशीर रीत्या सिगारेट विकायचे. प्रत्येक कामाच्या दिवशी, त्या कुटुंबातील एका सदस्यात म्हणजे टेरेसात विलक्षण बदल पाहायला मिळायचा. सकाळी, ती आपल्या
स्कर्टच्या अनेक खिशांमध्ये सिगारेट भरायची आणि त्यामुळे ती लठ्ठ दिसायची. पण, संध्याकाळी मात्र ती काठीसारखी अगदी बारीक दिसायची. बायबलमधील सत्यानं या कुटुंबाचं पूर्णपणे परिवर्तन केलं. कालांतरानं, या कुटुंबातील १६ जण यहोवाचे साक्षीदार बनले. आता नेपल्स शहरात जवळजवळ ३,७०० साक्षीदार आहेत.प्रचार कार्याचा विरोध
नेपल्समध्ये फक्त नऊ महिने राहिल्यानंतर, तिथल्या सरकारी अधिकाऱ्यांनी आम्हा चौघांना शहर सोडण्यास भाग पाडलं. आम्ही एका महिन्याकरता स्वित्झरलँडला गेलो आणि पर्यटन व्हिसावर इटलीला परतलो. मला आणि फर्नला ट्युरिनमध्ये नेमण्यात आलं. सुरुवातीला एका स्त्रीनं आम्हाला एक खोली भाड्यानं दिली आणि आम्ही तिचंच नाहणीघर व स्वयंपाकघर वापरायचो. जेव्हा रिजवे दांपत्य ट्युरिनला आलं तेव्हा आम्ही एक अपार्टमेंट भाड्यानं घेतलं. पुढे, त्या घरात पाच मिशनरी दांपत्ये राहू लागली.
सन १९५५ पर्यंत सरकारी अधिकाऱ्यांनी आम्हाला ट्युरिन सोडायला लावलं. पण, तोपर्यंत चार नवीन मंडळ्यांचा पाया घालण्यात आला होता. आता त्या मंडळ्यांची देखरेख करण्यासाठी कार्यक्षम स्थानिक बांधव होते. अधिकाऱ्यांनी आम्हाला म्हटलं, “आम्हाला खातरी आहे, एकदा का तुम्ही अमेरिकन लोक इथून गेलात, की तुम्ही सुरू केलेलं हे कार्य उद्ध्वस्त होईल.” पण, त्यानंतर झालेल्या वाढीवरून दिसून येतं की आपल्या कार्याचं यश हे देवाच्या हातात आहे. आज, ट्युरिनमध्ये ४,६०० च्या वर साक्षीदार आणि ५६ मंडळ्या आहेत.
फ्लॉरेन्स—एक अद्भुत शहर
आम्हाला नंतर फ्लॉरेन्समध्ये पाठवण्यात आलं. माझी बहीण कारमेला आणि तिचा पती मर्लन हॉर्टस्ला यांना मिशनरी म्हणून इथं नियुक्त करण्यात आलं होतं. त्यामुळे, या शहराबद्दल आम्ही अनेकदा ऐकलं होतं. तिथं राहणं खरोखर एक विलक्षण अनुभव होता! तेथील पीआत्सा डेला सीनयोरिआ, पोन्टे वेक्यो, प्यात्साले मीकेलान्जलो आणि पालात्सो पीट्टी अशा ठिकाणांमुळे या शहराला अनोखंपण प्राप्त झालं होतं. तेथील काही स्थानिक लोकांनी सुवार्तेबद्दल दाखवलेली सकारात्मक प्रतिक्रिया पाहून आम्हाला खूप आनंद झाला.
आम्ही एका कुटुंबासोबत बायबल अभ्यास करायचो. नंतर, या कुटुंबातील आईवडिलांनी बाप्तिस्मा घेतला. पण, वडिलांना धुम्रपानाचं व्यसन होतं. १९७३ च्या टेहळणी बुरूज नियतकालिकात स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं की धुम्रपान करणं ही एक वाईट सवय आहे आणि वाचकांनी ही सवय सोडून द्यावी असा आर्जवही त्यात करण्यात आला होता. त्यामुळे या कुटुंबातील मोठ्या मुलांनी त्यांच्या वडिलांना धुम्रपान सोडून देण्याची विनंती केली. वडिलांनी तसं करण्याचं वचन दिलं, पण ते हे वचन पाळू शकले नाही. एकदा रात्री, त्यांच्या पत्नीनं आपल्या नऊ वर्षांच्या जुळ्या मुलांसोबत रात्रीची प्रार्थना न करताच
त्यांना झोपायला पाठवलं. नंतर, तिला खूप वाईट वाटलं व ती त्यांच्या खोलीत गेली. पण, तोपर्यंत मुलांनी स्वतःच प्रार्थना केली होती. “तुम्ही काय प्रार्थना केली?” असं तिनं विचारलं. ते म्हणाले: “यहोवा, आमच्या बाबांना धुम्रपान सोडण्यास मदत कर.” हे ऐकून तिनं आपल्या पतीला बोलावलं, “अहो इकडं या जरा, तुमच्या मुलांनी काय प्रार्थना केली ती ऐका.” ते आले आणि मुलांनी केलेली प्रार्थना त्यांनी ऐकली तेव्हा ते अक्षरशः रडू लागले. ते म्हणाले, “मी यापुढं कधीच धुम्रपान करणार नाही!” त्यांनी ते वचन निभावलं. आणि आज त्या कुटुंबातील १५ पेक्षा जास्त जण यहोवाचे साक्षीदार आहेत.आफ्रिकेतील सेवाकार्य
सन १९५९ मध्ये आम्हाला, आर्टूरो लेवरिस आणि माझा भाऊ आन्जेलो या दोन मिशनऱ्यांसोबत सोमालियातील मोगादिशू या शहरात पाठवण्यात आलं. आम्ही तिथं पोहचलो त्या वेळी तिथलं राजकीय वातावरण तणावग्रस्त होतं. संयुक्त राष्ट्राच्या आदेशानुसार इटलीचे सरकार सोमालियाला स्वातंत्र्य मिळवण्यास मदत करणार होते. पण, परिस्थिती अधिकाधिक बिकट होत चालल्याची दिसत होती. ज्या इटालियन लोकांसोबत आम्ही बायबल अभ्यास केला होता त्यांच्यापैकी काही जण देश सोडून गेले आणि त्यामुळे तिथं मंडळीची व्यवस्था करणं शक्य नव्हतं.
त्या वेळी, परिमंडळ पर्यवेक्षकांनी (झोन ओव्हरसियर) मला सुचवलं की मी त्यांचा सहायक या नात्यानं काम करावं. म्हणून, आम्ही आसपासच्या देशांना भेटी देऊ लागलो. आम्ही ज्यांच्यासोबत अभ्यास केला होता त्यांच्यापैकी काही जणांनी चांगली प्रगती केली, पण विरोधामुळे त्यांना आपला मायदेश सोडावा लागला. इतर काही जणांना बराच विरोध सहन करावा लागूनही ते तिथंच राहिले. * यहोवावरील त्यांचे प्रेम आणि विश्वासू राहण्यासाठी त्यांनी जे काही सहन केलं त्याचा विचार करून आजही आमच्या डोळ्यांत पाणी येतं.
सोमालिया व एरिट्रियाचं हवामान सहसा भयंकर उष्ण व दमट असायचं. तिथलं स्थानिक जेवण खाऊन तर आम्हाला आणखीनच गरम व्हायचं. आमच्या एका बायबल विद्यार्थीनीच्या घरी आम्ही पहिल्यांदा अशा प्रकारचं जेवण केलं तेव्हा माझी पत्नी गमतीनं म्हणाली की त्या झणझणीत जेवणामुळे तिचे कान ट्रॅफिकच्या लाल दिव्यांप्रमाणं उघडले!
जेव्हा आन्जेलो व आर्टूरो यांना दुसरीकडं पाठवण्यात आलं, तेव्हा आम्ही एकटे पडलो. आम्हाला प्रोत्साहन देणारं कोणीही नसल्यामुळे एकटं राहणं सोपं नव्हतं. तरीसुद्धा, या परिस्थितीमुळे आम्हाला यहोवाच्या आणखी जवळ येण्यास व त्याच्यावर पूर्णपणे भरवसा ठेवण्यास मदत मिळाली. ज्या देशांमध्ये प्रचार कार्यावर बंदी होती त्या देशांना भेटी दिल्यानं, खरंतर आम्हाला खूप उत्तेजन मिळालं होतं.
सोमालियात आमच्यापुढे विविध अडचणी होत्या. आमच्याकडे फ्रिज नव्हता, त्यामुळे आम्ही फक्त त्या दिवसाला पुरेल इतक्याच खाण्याच्या वस्तू विकत घ्यायचो. मग, ते मासे असोत अथवा आंबा, पपई, द्राक्षे, नारळ, केळी अशी स्थानिक फळे असोत. आम्हाला अनेकदा, उडणाऱ्या किटकांचा त्रास सहन करावा लागायचा. कधीकधी आम्ही बायबल अभ्यास घेत असताना ते आमच्या मानेवर येऊन बसायचे. आमच्याकडं निदान
एक स्कूटर तरी होती. त्यामुळे, आम्हाला भर उन्हात तासन् तास चालावं लागत नसे.इटलीला परतणं
सन १९६१ मध्ये इटलीतील ट्युरिनमध्ये आंतरराष्ट्रीय अधिवेशन भरवण्यात आलं होतं. त्या अधिवेशनाला जाण्यासाठी आमच्या मित्रांनी, केळी वाहून नेणाऱ्या एका जहाजानं इटलीला जाण्याची आमची व्यवस्था केली. त्यांनी दाखवलेल्या या उदारतेबद्दल आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत. तिथं गेल्यावर, आमची नेमणूक बदलणार असल्याचं आम्हाला समजलं. १९६२ च्या सप्टेंबर महिन्यात इटलीला परतल्यावर, मी एक प्रवासी पर्यवेक्षक या नात्यानं सेवा करू लागलो. आम्ही एक छोटीशी कार विकत घेतली. पाच वर्षांपर्यंत दोन विभागांना भेटी देण्यासाठी आम्ही या कारचा उपयोग केला.
आफ्रिकेतील उष्णतेनंतर, आता आम्हाला कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागणार होता. तिथल्या पहिल्या हिवाळ्यात, आम्ही आल्प्स पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या एका मंडळीला भेट दिली त्या वेळी आम्ही गवत साठवणाऱ्या एका माळ्यावर झोपलो. त्या खोलीत उबेसाठी कोणतीही सोय नव्हती. इतकी कडाक्याची थंडी होती की आम्ही अंगावरचे कोट घालूनच झोपलो. त्या रात्री, थंडीमुळे त्या परिसरात चार कोंबड्या आणि दोन कुत्री मेली!
नंतर, मी प्रांतीय पर्यवेक्षक या नात्यानंदेखील सेवा केली. त्या वर्षांदरम्यान, आम्ही संपूर्ण इटलीचा दौरा केला. कॅलब्रिया आणि सिसिली यांसारख्या काही ठिकाणांना आम्ही अनेकदा भेटी दिल्या. आम्ही मंडळीतील मुलांना आध्यात्मिक रीत्या प्रगती करण्याचं व मंडळीतील पर्यवेक्षक, प्रवासी सेवक, किंवा बेथेल सदस्य म्हणून सेवा करण्याचं उत्तेजन दिलं.
यहोवाची जिवेभावे सेवा करणाऱ्या विश्वासू मित्रांकडून आम्हाला खूप काही शिकायला मिळालं. यहोवाबद्दल त्यांची एकनिष्ठा, उदारता, बांधवांप्रती असलेलं त्यांचं प्रेम, परिस्थितीशी जुळवून घेण्याची त्यांची वृत्ती व त्यांचा स्वार्थत्याग या गुणांबद्दल आम्हाला त्यांची मनापासून कदर वाटते. आम्ही राज्य सभागृहांत होणाऱ्या लग्नसमारंभांना उपस्थित राहिलो. हे लग्न, धार्मिक सेवक या नात्यानं लग्न लावण्याचा अधिकार मिळालेल्या साक्षीदारांमार्फत लावण्यात आले होते. या गोष्टीचा काही वर्षांपूर्वी आम्ही विचारसुद्धा करू शकत नव्हतो. ट्युरिनमध्ये, पूर्वी बांधवांच्या स्वयंपाकघरांत मंडळीच्या सभा व्हायच्या किंवा बांधवांना बाकांवर बसावं लागायचं, तसं आता होत नाही. त्याऐवजी, बऱ्याच मंडळ्यांची आपली स्वतःची सुंदर राज्य सभागृहे आहेत ज्यांमुळे यहोवाचा सन्मान होतो. आता आम्ही कमी दर्जाच्या व अपुऱ्या आसन क्षमता असलेल्या प्रेक्षागृहांमध्ये नव्हे, तर स्वतःच्या प्रशस्त संमेलनगृहांमध्ये संमेलने भरवतो. आम्ही इटलीत आलो होतो तेव्हा तिथं केवळ ४९० प्रचारक होते. पण, आता तिथं २,४३,००० पेक्षा अधिक प्रचारक असल्याचं पाहून आम्हाला किती आनंद होतो!
आम्ही योग्य निर्णय घेतले
आम्हाला काही समस्यांचादेखील सामना करावा लागला. त्यात घरची ओढ आणि आजारपण या समस्या होत्या. समुद्र पाहिल्यावर फर्नला नेहमी घरची आठवण येत असे. तिच्यावर
तीन मोठ्या शस्त्रक्रियादेखील करण्यात आल्या होत्या. एकदा ती बायबल अभ्यास चालवण्यासाठी जात असताना एका विरोधकानं तिच्यावर शेतीच्या टोकदार हत्यारानं वार केला. त्यामुळेदेखील तिला इस्पितळात न्यावं लागलं होतं.कधीकधी आम्ही निराश व्हायचो, पण विलापगीत ३:२४ मध्ये म्हटल्यानुसार आम्ही यहोवावर आपली ‘आशा ठेवली.’ तो सांत्वन देणारा देव आहे. एकदा आम्ही निराशेच्या भावनेनं ग्रासलेलो असताना, बंधू नेथन नॉर यांच्याकडून फर्नला एक छान पत्र मिळालं. पत्रात त्यांनी म्हटलं होतं, की फर्ननं तिची पायनियर सेवा सुरू केली त्या पेन्सिल्व्हेनियातील बेथलेहेमजवळच त्यांचा जन्म झाला असल्यामुळे तिथल्या डच स्त्रिया फर्नप्रमाणेच अतिशय कणखर व दणकट असल्याचं त्यांना माहीत आहे. त्यांचं म्हणणं अगदी बरोबर होतं. आजपर्यंत, आम्हाला अनेक मार्गांनी आणि अनेक जणांकडून प्रोत्साहन मिळालं आहे.
आमच्यापुढे अनेक समस्या येऊनही, सेवाकार्यातील आमचा आवेश टिकवून ठेवण्याचा आम्ही नेहमी प्रयत्न केला. आमच्या आवेशाची तुलना, लाम्ब्रुस्को नावाच्या एका स्वादिष्ट चकाकत्या इटालियन मद्याशी करत फर्न विनोदानं म्हणते, “आपण आपल्या आवेशाची चकाकी कधीही कमी होऊ देऊ नये.” ४० पेक्षा जास्त वर्षं विभागीय व प्रांतीय कार्य केल्यानंतर, आम्हाला एक नवीन विशेषाधिकार लाभला. तो म्हणजे, इटालियन भाषा सोडून इतर भाषिक समूहांना व मंडळ्यांना भेटी देणं व त्यांस संघटित करणं. हे भाषासमूह बांग्लादेश, चीन, एरिट्रिया, इथियोपिया, घाना, भारत, नायजेरिया, फिलिप्पाईन्स, श्रीलंका आणि इतर देशांतून आलेल्या लोकांना प्रचार करतात. ज्यांनी यहोवाची दया अनुभवली आहे अशांचं जीवन देवाच्या वचनातील सामर्थ्यामुळे अनेक अद्भुत मार्गांनी कसं बदललं हे आम्ही प्रत्यक्ष पाहिलं आहे. या सर्व अनुभवांविषयी सांगायचं झाल्यास एक पुस्तकदेखील अपुरं पडेल.—मीखा ७:१८, १९.
आम्हाला आमच्या सेवाकार्यात टिकून राहता यावं म्हणून यहोवानं आम्हाला भावनिक व शारीरिक बळ द्यावं यासाठी आम्ही दररोज त्याला प्रार्थना करतो. प्रभूच्या सेवेतील आनंदच आमचं बलस्थान आहे. बायबलमधील सत्ये इतरांना सांगण्यासाठी आम्ही जीवनात जे काही निर्णय घेतले ते योग्यच होते याची खातरी पटल्यामुळे आम्हाला अतिशय आनंद होतो.—इफिस. ३:७; कलस्सै. १:२९.
[तळटीप]
^ परि. 18 १९९२ यहोवाच्या साक्षीदारांचे वार्षिक पुस्तक (इंग्रजी), पृष्ठे ९५-१८४ पाहा.
[२७-२९ पानांवरील तक्ता/ चित्रे]
(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)
न्यू यॉर्कमधील रोचेस्टरमध्ये माझे आईबाबा
१९४८
गिलियडच्या १२ व्या वर्गासाठी साउथ लॅन्सिंगमध्ये
१९४९
इटलीला जाण्याआधी फर्नसोबत
कॅप्री, इटली
१९५२
इतर मिशनऱ्यांसोबत ट्युरिन आणि नेपल्समध्ये
१९६३
फर्न तिच्या काही बायबल विद्यार्थ्यांसोबत
“आपण आपल्या आवेशाची चकाकी कधीही कमी होऊ देऊ नये”