वाचकांचे प्रश्न
वाचकांचे प्रश्न
उत्पत्ति ६:३ मध्ये आपण वाचतो: “माझ्या आत्म्याची [मनुष्याच्या] ठायी सर्वकाळ सत्ता राहणार नाही; तो देहधारी आहे; तथापि मी त्याला एकशेवीस वर्षांचा काळ देईन.” याचा अर्थ, यहोवा मानवांचे वयोमान १२० वर्षांपर्यंत मर्यादित करत होता का, आणि नोहाने येणाऱ्या जलप्रलयाबद्दल १२० वर्षांपर्यंत प्रचार केला का?
या प्रश्नाच्या दोन्ही भागांचे उत्तर नाही असे आहे.
जलप्रलयाच्या आधी, अनेक मानव शेकडो वर्षे जगले. उदाहरणार्थ, जलप्रलय आला तेव्हा नोहा ६०० वर्षांचा होता, आणि तो एकंदर ९५० वर्षे जगला. (उत्प. ७:६; ९:२९) जलप्रलयानंतर जन्मलेले काही जणदेखील १२० वर्षांपेक्षा अधिक काळ जगले. जसे की, अर्पक्षद वयाच्या ४३८ व्या वर्षी मरण पावला, तर शेलह ४३३ वर्षांचा असताना मरण पावला. (उत्प. ११:१०-१५) पण, मोशेच्या काळापर्यंत मानवांचे सर्वसामान्य जीवनमान ७० किंवा ८० वर्षे इतके कमी झाले होते. (स्तो. ९०:१०) यावरून स्पष्टच आहे की, उत्पत्ति ६:३ मध्ये देवाने जे म्हटले त्यावरून दिसून येते, की तो मानवांचे जास्तीत जास्त वयोमान किंवा सर्वसामान्य जीवनमान १२० वर्षांपर्यंत निश्चित करत नव्हता.
तर मग, त्या वचनात देव नोहाला असे सांगत होता का, की १२० वर्षांनी येणार असलेल्या विनाशाबद्दल त्याने लोकांना ताकीद द्यावी? नाही. हे खरे, की देव अनेक प्रसंगी नोहाशी बोलला. त्याच वृत्तान्तात पुढे दहा वचनांनंतर आपण असे वाचतो: “देव नोहाला म्हणाला, सर्व प्राण्यांचा अंत करण्याचे माझ्या मनात आले आहे, कारण त्यांच्यामुळे पृथ्वीवर जाचजुलूम माजला आहे.” त्यानंतरच्या वर्षांत, नोहाने तारू बांधण्याचे प्रचंड मोठे काम पूर्ण केले, आणि त्या वेळी: “परमेश्वराने नोहाला सांगितले, तू आपल्या सगळ्या कुटुंबासह तारवात चल.” (उत्प. ६:१३; ७:१) याशिवाय, आणखीनही काही प्रसंग आहेत जेव्हा यहोवाने नोहाला काही विशिष्ट गोष्टी सांगितल्या.—उत्प. ८:१५; ९:१, ८, १७.
पण, उत्पत्ति ६:३ मध्ये नोहाचा किंवा देव नोहाला उद्देशून बोलत असल्याचा उल्लेख आढळत नाही. त्या वचनात जे म्हटले आहे त्यावरून असे समजते, की देव निव्वळ आपला उद्देश किंवा मनोदय व्यक्त करत होता. (उत्पत्ति ८:२१ पडताळून पाहा.) विशेष लक्षात घेण्याजोगी गोष्ट म्हणजे, आदामाच्या काळाच्या कितीतरी आधी घडलेल्या घटनांमध्ये, “देव बोलला” असे वाक्यांश आपल्याला वाचायला मिळतात. (उत्प. १:६, ९, १४, २०, २४) तर मग स्पष्टच आहे, की उत्पत्ति ६:३ मध्ये यहोवा पृथ्वीवरील कोणत्याही मानवाशी बोलत नव्हता, कारण तोपर्यंत मानवाची निर्मितीच झाली नव्हती.
तेव्हा, आपण असा तर्कशुद्ध निष्कर्ष काढू शकतो, की उत्पत्ति ६:३ हे वचन पृथ्वीवरील भ्रष्ट व्यवस्थेचा अंत करण्याच्या देवाच्या संकल्पाविषयी बोलते. यहोवाने १२० वर्षांनी असे करण्याचा हुकूमनामा जाहीर केला, ज्याची नोहाला कल्पनाही नव्हती. पण, यहोवाने एक विशिष्ट कालावधी का ठरवला? इतकी वर्षे वाट पाहण्याची गरजच काय होती?
प्रेषित पेत्र याची कारणे देतो: “पूर्वी नोहाच्या दिवसांत तारू तयार होत असता देव सहन करीत वाट पाहत होता त्यावेळी . . . त्या तारवात केवळ आठ जण पाण्यातून वाचविण्यात आले.” (१ पेत्र ३:२०) होय, देवाने १२० वर्षांसंबंधी जो संकल्प केला होता त्या वेळी आणखी बऱ्याच गोष्टी करणे अद्याप बाकी होते. सुमारे २० वर्षांनंतर, नोहा व त्याच्या पत्नीला मुले झाली. (उत्प. ५:३२; ७:६) त्यांची तिन्ही मुले मोठी होऊन त्यांचे लग्न झाले आणि अशा रीतीने ‘आठ जणांचे’ कुटुंब बनले. त्यानंतर त्यांना एक प्रचंड मोठे तारू बांधायचे होते. पण, त्या मानाने नोहाचे कुटुंब फार लहान होते. त्यामुळे त्यांच्यासाठी हे काही साधेसुधे काम नव्हते. होय, देवाने १२० वर्षांपर्यंत वाट पाहिल्यामुळे हे काम पूर्ण करण्यास वेळ मिळाला आणि आठ विश्वासू मानवांना ‘पाण्यातून वाचणे’ शक्य झाले.
जलप्रलय केव्हा येईल हे देवाने नोहाला नेमके कोणत्या वर्षी सांगितले हे बायबल सांगत नाही. पण, नोहाच्या मुलांचा जन्म झाला व ती मोठी होऊन त्यांचे लग्न होईपर्यंत जलप्रलय येण्यास बहुधा ४० किंवा ५० वर्षे राहिली होती. तेव्हा यहोवा नोहाला म्हणाला: “सर्व प्राण्यांचा अंत करण्याचे माझ्या मनात आले आहे.” त्यासोबतच, नोहाने एक प्रचंड मोठे तारू बांधावे व आपल्या कुटुंबासह त्या तारवात जावे असेही देवाने त्याला सांगितले. (उत्प. ६:१३-१८) उरलेल्या दशकांदरम्यान, नोहाने आपल्या जीवनक्रमावरून नीतिमत्तेच्या बाबतीत केवळ एक उत्तम उदाहरणच मांडले नाही, तर “नीतिमत्त्वाचा उपदेशक” या नात्यानेदेखील त्याने सेवा केली. त्याने अगदी सडेतोड शब्दांत लोकांना एक इशारेवजा संदेश—देवाच्या स्तरांनुसार न वागणाऱ्या त्या काळातील लोकांचा नाश करण्याचा देवाचा संकल्प घोषित केला. हे नक्की केव्हा घडेल याची नोहाला पूर्वकल्पना नव्हती, पण नाश नक्की येईल हे त्याला माहीत होते. आणि आपल्याला माहीत आहे, की नेमके तसेच घडले.—२ पेत्र २:५.