व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कोणत्याही परीक्षेवर मात करण्यासाठी समर्थ केलेले

कोणत्याही परीक्षेवर मात करण्यासाठी समर्थ केलेले

कोणत्याही परीक्षेवर मात करण्यासाठी समर्थ केलेले

“मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्‍तिमान आहे.”—फिलिप्पै. ४:१३.

१. यहोवाच्या लोकांना अनेक संकटांचा सामना का करावा लागतो?

 यहोवाच्या लोकांना बरेचदा कोणत्या ना कोणत्या संकटाचा किंवा परीक्षेचा सामना करावा लागला आहे. काही परीक्षा आपल्या स्वतःच्या अपरिपूर्णतेमुळे किंवा आपण ज्या जगात राहत आहोत त्यामुळे आपल्यावर येतात. इतर काही परीक्षा, देवाची सेवा करणाऱ्‍यांमध्ये व त्याची सेवा न करणाऱ्‍यांमध्ये असलेल्या शत्रुत्वामुळे येतात. (उत्प. ३:१५) मानव इतिहासाच्या सुरुवातीपासूनच देवाने आपल्या विश्‍वासू सेवकांना धार्मिक छळाचा सामना करण्यास, साथीदारांच्या घातक दबावाचा प्रतिकार करण्यास आणि इतर सर्व प्रकारच्या संकटांना धीराने तोंड देण्यास साहाय्य केले आहे. त्याचा पवित्र आत्मा आपल्यालाही तसे करण्याचे सामर्थ्य देऊ शकतो.

धार्मिक छळाचा सामना करण्यास साहाय्य

२. धार्मिक छळाचा उद्देश काय असतो, आणि छळ कोणकोणत्या रूपात येऊ शकतो?

धार्मिक छळ करणे म्हणजे लोकांच्या विशिष्ट धार्मिक विश्‍वासांबद्दल जाणूनबुजून त्यांना त्रास देणे किंवा इजा पोहचवणे. या छळामागचा उद्देश अशा प्रकारच्या विश्‍वासांचा समूळ नाश करणे, त्यांचा प्रसार होण्यापासून रोखणे किंवा असा विश्‍वास बाळगणाऱ्‍यांची एकनिष्ठा भंग करणे हा असतो. छळ वेगवेगळ्या रूपात येऊ शकतो. कधी उघडपणे, तर कधी लपूनछपून. बायबल, सैतानाच्या हल्ल्यांची तुलना तरुण सिंह व नाग यांच्या हल्ल्यांशी करते.स्तोत्र ९१:१३ वाचा.

३. सैतान कशा प्रकारे सिंहाप्रमाणे व नागाप्रमाणे हल्ले करतो?

सैतानाने अनेकदा एका हिंस्र सिंहाप्रमाणे देवाच्या लोकांवर उघडपणे हल्ला केला आहे. त्यांच्याविरुद्ध हिंसेचा वापर करण्याद्वारे, त्यांना तुरुंगात टाकण्याद्वारे, किंवा त्यांच्यावर बंदी आणण्याद्वारे त्याने असे केले आहे. (स्तो. ९४:२०) सैतानाने वापरलेल्या अशा कुयुक्त्यांबद्दलचे अनेक अहवाल आधुनिक काळातील यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यांचे वर्णन करणाऱ्‍या त्यांच्या वार्षिकपुस्तकात आढळतात. अनेक ठिकाणी चर्च पाळकांच्या किंवा धर्मवेड्या राजकीय नेत्यांच्या नेतृत्वाखाली अराजक जमावांनी देवाच्या लोकांना वाईट वागणूक दिली आहे. हिंस्र सिंहाप्रमाणे केलेल्या अशा उघड हल्ल्यांमुळे काहींनी देवाची सेवा करण्याचे सोडून दिले आहे. सैतान त्यांच्यावर एखाद्या नागाप्रमाणे लपूनछपूनदेखील घातक हल्ला करतो. लोकांच्या मनात विष कालवण्यासाठी आणि त्यांना आपल्या इच्छेप्रमाणे करण्यास भुलवण्यासाठी तो असे हल्ले करतो. अशा प्रकारचे हल्ले आपल्याला आध्यात्मिक रीत्या कमजोर किंवा भ्रष्ट करण्यासाठी केले जातात. पण, देवाच्या पवित्र आत्म्याच्या मदतीने आपण या दोन्ही प्रकारच्या छळाचा सामना करू शकतो.

४, ५. छळाचा सामना करण्यास तयार असण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता, आणि का? एक उदाहरण सांगा.

भविष्यात आपला कशा प्रकारे छळ होण्याची शक्यता आहे याची कल्पना करत बसणे हा नक्कीच छळाचा सामना करण्याचा सर्वोत्तम मार्ग नाही. खरेतर, भविष्यात आपला नेमका कशा प्रकारे छळ होईल हे आपण मुळीच जाणू शकत नाही. म्हणून, जे घडणारच नाही त्याबद्दल चिंता करत बसल्याने आपल्याला काहीएक फायदा होणार नाही. पण, असे काहीतरी आहे जे आपण करू शकतो. अनेकांनी छळाचा यशस्वी रीत्या सामना केला आहे. त्यांना हे कसे शक्य झाले? बायबलमध्ये नमूद असलेल्या यहोवाच्या विश्‍वासू सेवकांच्या उदाहरणांवर आणि सोबतच येशूच्या शिकवणींवर व त्याच्या उदाहरणावर मनन केल्याने त्यांना असे करणे शक्य झाले आहे. यामुळे त्यांना यहोवाबद्दल असलेले त्यांचे प्रेम आणखी गहिरे करण्यास मदत मिळाली आहे. आणि या प्रेमामुळेच, त्यांना त्यांच्या वाटेत येणाऱ्‍या परीक्षांचा प्रतिकार करण्यास साहाय्य मिळाले आहे.

मलावीतील आपल्या दोन बहिणींचेच उदाहरण विचारात घ्या. राजकीय पक्षाचे कार्ड विकत घेण्यास त्यांना भाग पाडण्यासाठी, एका हिंसक जमावाने त्यांना मारले, त्यांचे कपडे फाडले आणि त्यांच्यावर बलात्कार करण्याची त्यांना धमकी दिली. त्या जमावाने बहिणींना असे खोटे सांगितले, की बेथेल कुटुंबाच्या सदस्यांनीही पार्टीचे कार्ड विकत घेतले आहेत. त्यावर बहिणींची प्रतिक्रिया काय होती? बहिणींनी म्हटले: “आम्ही केवळ यहोवा देवाची सेवा करतो. म्हणून, शाखा कार्यालयातील बांधवांनी जरी कार्ड विकत घेतले असतील, तरी त्याच्याशी आम्हाला काही घेणं-देणं नाही. तुम्ही आम्हाला मारून टाकलं तरी चालेल, आम्ही तडजोड करणार नाही!” बहिणींनी अशी खंबीर भूमिका घेतल्यानंतर, जमावाने त्यांना सोडून दिले.

६, ७. छळाचा सामना करण्यासाठी यहोवा आपल्या सेवकांना कशा प्रकारे सामर्थ्यवान करतो?

थेस्सलनीका येथील ख्रिश्‍चन ‘फार संकटात होते,’ तरीही त्यांनी “पवित्र आत्म्याच्या आनंदाने” सत्याचा संदेश स्वीकारला असा उल्लेख प्रेषित पौलाने केला. (१ थेस्सलनी. १:६) होय, गतकाळात व सध्याच्या काळात छळ सोसलेले व छळावर मात केलेले अनेक ख्रिस्ती सांगतात, की आपल्या सहनशक्‍तीच्या बाहेर आपला छळ होत आहे असे त्यांना वाटले, तेव्हा त्यांनी देवाच्या पवित्र आत्म्याच्या फळाचा एक पैलू म्हणजे आंतरिक शांती अनुभवली. (गलती. ५:२२) परिणामस्वरूप, या शांतीने त्यांना आपल्या अंतःकरणांचे व विचारशक्‍तीचे रक्षण करण्यास मदत केली. होय, देवाच्या सेवकांवर संकटे येतात तेव्हा त्यांचा सामना करण्यास व बुद्धिमानीने पाऊल उचलण्यास त्यांना समर्थ करण्यासाठी यहोवा आपल्या क्रियाशील शक्‍तीचा वापर करतो. *

अतिशय क्रूर छळाचा सामना करूनही देवाचे लोक आपली एकनिष्ठा टिकवून ठेवण्यासाठी दृढनिश्‍चयी आहेत हे पाहून इतर जण आश्‍चर्यचकित झाले आहेत. त्यांच्या मते साक्षीदारांमध्ये जणू अलौकिक शक्‍ती संचारली होती, आणि ते खरेही होते. प्रेषित पेत्र आपल्याला असे आश्‍वासन देतो: “ख्रिस्ताच्या नावामुळे तुमची निंदा होत असल्यास तुम्ही धन्य आहा; कारण गौरवाचा आत्मा म्हणजे देवाचा आत्मा तुम्हावर येऊन राहिला आहे.” (१ पेत्र ४:१४) नीतिमान स्तरांचे पालन केल्यामुळे आपला छळ होत आहे यावरून देवाची आपल्यावर कृपापसंती आहे हे दिसून येते. (मत्त. ५:१०-१२; योहा. १५:२०) हा यहोवाच्या आशीर्वादांचाच पुरावा आहे हे पाहून आपल्याला किती आनंद होतो!

साथीदारांच्या दबावाचा प्रतिकार करण्यास साहाय्य

८. (क) साथीदारांच्या दबावाचा प्रतिकार करण्यास यहोशवा व कालेब यांना कोणत्या गोष्टीने समर्थ केले? (ख) यहोशवा व कालेब यांच्या उदाहरणावरून आपण काय शिकू शकतो?

ख्रिश्‍चनांना सामना करावा लागणारा अधिक धूर्त प्रकारचा छळ म्हणजे साथीदारांचा नकारात्मक दबाव. पण, यहोवाचा आत्मा या जगाच्या आत्म्यापेक्षा जास्त शक्‍तिशाली असल्यामुळे, आपली थट्टा करणाऱ्‍या, आपल्याबद्दल खोटी माहिती पसरवणाऱ्‍या, किंवा त्यांच्या स्तरांनुसार चालण्यास आपल्याला भाग पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्‍या लोकांचा आपण प्रतिकार करू शकतो. एक उदाहरण विचारात घ्या. कनान देश हेरण्यासाठी गेलेल्या इतर दहा जणांच्या दृष्टिकोनाशी सहमत न होण्यास यहोशवा व कालेब यांना कोणत्या गोष्टीने समर्थ केले होते? पवित्र आत्म्याने त्यांच्यामध्ये एक निराळी “वृत्ति” जागृत केली होती.गणना १३:३०; १४:६-१०, २४ वाचा.

९. जगातील बहुतेक लोकांपेक्षा वेगळे असण्याची खऱ्‍या ख्रिश्‍चनांची तयारी का असली पाहिजे?

त्याच प्रकारे, पवित्र आत्म्याने प्रेषितांनादेखील त्यांच्या काळातील खऱ्‍या धर्माचे शिक्षक म्हणून सर्वसामान्यपणे मानल्या जाणाऱ्‍या धर्मगुरूंच्या आज्ञांचे पालन करण्याऐवजी देवाच्या आज्ञांचे पालन करण्याचे सामर्थ्य दिले. (प्रे. कृत्ये ४:२१, ३१; ५:२९, ३२) विरोध किंवा वादविवाद टाळण्यासाठी अनेक जण इतर सर्व लोक जे करतात तेच करण्याचे पसंत करतात. पण, खऱ्‍या ख्रिश्‍चनांना मात्र जे योग्य आहे त्यासाठी सहसा खंबीर भूमिका घ्यावी लागते. असे असले, तरी देवाची क्रियाशील शक्‍ती त्यांना बळ देत असल्यामुळे, इतरांपासून वेगळे असण्यास ते घाबरत नाहीत. (२ तीम. १:७) आपण कोणत्या एका बाबतीत साथीदारांच्या दबावाला बळी पडू नये ते आता पाहू या.

१०. काही ख्रिश्‍चन कोणत्या द्विधा मनस्थितीत असू शकतात?

१० आपल्या एखाद्या मित्राने बायबलच्या विरोधात असलेले गंभीर कृत्य केले आहे हे तरुणांना कळते, तेव्हा काय करावे याबाबत काही जण द्विधा मनस्थितीत असू शकतात. त्यांना असे वाटू शकते की आपल्या मित्रासाठी आध्यात्मिक मदत मागणे म्हणजे मित्राचा भरवसा तोडण्यासारखे आहे; म्हणून, एकनिष्ठेचा चुकीचा अर्थ लावून ते त्याविषयी बोलण्याचे नाकारतात. पाप करणारी व्यक्‍ती कदाचित आपले पाप लपवून ठेवण्याचा दबावदेखील आपल्या मित्रांवर आणू शकते. अर्थात, अशा प्रकारची समस्या केवळ तरुणांपुरतीच मर्यादित नाही. काही प्रौढ व्यक्‍तींनादेखील आपल्या एखाद्या मित्राने किंवा कुटुंबातील सदस्याने केलेल्या गंभीर पापाबद्दल मंडळीतील वडिलांना कळवणे कदाचित कठीण जाऊ शकते. पण, अशा प्रकारच्या दबावाला खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी कशी प्रतिक्रिया दाखवली पाहिजे?

११, १२. मंडळीच्या एखाद्या सदस्याने आपले गैरकृत्य उघड न करण्याचा तुम्हाला आर्जव केला तर तुमची प्रतिक्रिया काय असली पाहिजे, आणि का?

११ अशी कल्पना करा, की मंडळीतील सुमीत नावाच्या एका तरुणाला अश्‍लील चित्रे पाहण्याची (पोर्नोग्राफी) सवय लागली आहे आणि याबद्दल मंडळीतील अमित नावाच्या त्याच्या मित्राला कळते. याबद्दल आपल्याला खूप काळजी वाटते असे अमित सुमीतला सांगतो. पण, सुमीत त्याच्याकडे मुळीच लक्ष देत नाही. आपल्या या सवयीबद्दल सुमीतने मंडळीतील वडिलांशी बोलावे असे अमित त्याला आर्जवतो, तेव्हा सुमीत त्याला म्हणतो की, ‘तू जर माझा खरा मित्र असशील, तर तू याबद्दल मुळीच वडिलांना सांगणार नाहीस.’ अमितला आपला मित्र गमावण्याची भीती वाटली पाहिजे का? हे सर्व खोटे आहे असे जर सुमीतने वडिलांना सांगितले, तर वडील कोणावर विश्‍वास ठेवतील असा प्रश्‍न कदाचित अमितला पडेल. पण, शांत बसूनसुद्धा स्थिती सुधारणार नाही. उलट, यामुळे सुमीत यहोवसोबतचा आपला नातेसंबंध गमावून बसेल. अमितने ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की “मनुष्याची भीति पाशरूप होते; पण जो परमेश्‍वरावर भाव ठेवितो त्याचे संरक्षण होते.” (नीति. २९:२५) अमित आणखी काय करू शकतो? त्याने पुन्हा एकदा सुमीतला भेटून त्याच्याशी याबद्दल प्रेमळपणे व मोकळेपणाने चर्चा केली पाहिजे. असे करण्यासठी धैर्याची गरज असेल. या वेळी कदाचित सुमीत आपल्या समस्येबद्दल बोलण्याची तयारी दाखवेल. अमितने पुन्हा एकदा सुमीतला मंडळीच्या वडिलांशी बोलण्याचे प्रोत्साहन दिले पाहिजे आणि त्याने जर एका ठरावीक कालावधित असे केले नाही, तर आपण स्वतः ही गोष्ट वडिलांच्या कानावर घालू असे त्याला सांगितले पाहिजे.—लेवी. ५:१.

१२ अशी एखादी परिस्थिती तुमच्यासमोर आल्यास, तुमच्या मित्राला मदत करण्यासाठी तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांची कदाचित तो सुरुवातीला कदर करणार नाही. पण, तुम्ही त्याच्याच भल्याकरता असे करत आहात हे कदाचित नंतर त्याला कळून येईल. पाप करणाऱ्‍याने तुमची मदत स्वीकारल्यास, त्याला मदत करण्यासाठी तुम्ही दाखवलेली हिम्मत आणि एकनिष्ठा यांबद्दल तो कदाचित नेहमीच कृतज्ञ असेल. त्याउलट, तुम्ही वडिलांना सांगितल्यामुळे तो तुमच्यावर रागावला, तर तो खरोखर तुमचा मित्र असू शकतो का? आणि तुम्हाला अशा प्रकारचा मित्र हवा आहे का? आपल्या सर्वश्रेष्ठ मित्राचे म्हणजे यहोवाचे मन आनंदित करणे केव्हाही चांगले. आपण आपल्या जीवनात यहोवाला पहिले स्थान देतो, तेव्हा त्याच्यावर प्रेम करणारे इतर जण आपल्या एकनिष्ठेबद्दल आपला आदर करतील आणि आपले खरे मित्र बनतील. ख्रिस्ती मंडळीत आपण दियाबलाला मुळीच स्थान देऊ नये. आपण जर दियाबलाला मंडळीत स्थान दिले, तर आपण वास्तवात यहोवाच्या पवित्र आत्म्याला खिन्‍न करणारे बनू. याउलट, आपण पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन स्वीकारले पाहिजे आणि ख्रिस्ती मंडळीला शुद्ध ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.—इफिस. ४:२७, ३०.

सर्व प्रकारच्या संकटांमध्ये टिकून राहण्यास समर्थ केलेले

१३. यहोवाचे लोक कोणत्या प्रकारच्या संकटांचा सामना करत आहेत, आणि या गोष्टी इतक्या मोठ्या प्रमाणात का घडत आहेत?

१३ संकटे निरनिराळ्या स्वरूपात येऊ शकतात. जसे की आर्थिक मंदी, नौकरी सुटणे, नैसर्गिक आपत्ती, प्रियजनाचा मृत्यू, गंभीर आजार, इत्यादी इत्यादी. आपण ‘कठीण दिवसांत’ राहत असल्यामुळे, आज ना उद्या आपल्या सर्वांनाच कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या संकटाला तोंड द्यावे लागेल. (२ तीम. ३:१) असे घडल्यास, आपण मुळीच घाबरू नये. पवित्र आत्मा आपल्याला कोणत्याही प्रकारच्या संकटाला तोंड देण्याचे सामर्थ्य देऊ शकतो.

१४. संकटांमध्ये टिकून राहण्यास ईयोबाला कोणत्या गोष्टीने समर्थ केले?

१४ ईयोबावर एकापाठोपाठ एक अनेक संकटे कोसळली. त्याने आपल्या उपजीविकेचे साधन, आपली मुले, मित्र व आरोग्य गमावले. त्याच्या पत्नीचा यहोवावरून भरवसा उडाला. (ईयो. १:१३-१९; २:७-९) पण, ईयोबासाठी अलीहू एक खरा सांत्वनकर्ता ठरला. त्याच्याकरता अलीहूच्या आणि यहोवाच्या संदेशाचा सारांश हा होता: “स्तब्ध राहून देवाच्या अद्‌भुत कृत्यांचे मनन कर.” (ईयो. ३७:१४) कोणत्या गोष्टीने ईयोबाला संकटांमध्ये टिकून राहण्यास मदत केली? आणि कोणती गोष्ट संकटांमध्ये टिकून राहण्यास आपल्याला साहाय्य करू शकते? यहोवा ज्या वेगवेगळ्या मार्गांनी आपला पवित्र आत्मा व आपले सामर्थ्य प्रदर्शित करतो ते आठवून त्यावर मनन केल्याने आपल्याला साहाय्य मिळू शकते. (ईयो. ३८:१-४१; ४२:१, २) आपल्या जीवनातील असे काही प्रसंग आपण आठवू शकतो जेव्हा देवाने आपल्याबद्दल वैयक्‍तिक आस्था दाखवली होती. आजही त्याला आपल्याबद्दल तितकीच आस्था आहे.

१५. परीक्षांचा सामना करण्याचे सामर्थ्य पौलाला कसे मिळाले?

१५ प्रेषित पौलाला त्याच्या धार्मिक विश्‍वासासाठी अनेक जीवघेण्या संकटांना तोंड द्यावे लागले. (२ करिंथ. ११:२३-२८) या संकटमय स्थितीत तो आपला समतोल आणि भावनिक स्थैर्य कशा प्रकारे टिकवून ठेवू शकला? यहोवावर प्रार्थनापूर्वक भरवसा ठेवण्याद्वारे. या परीक्षांच्या शेवटी पौलाला बहुधा हुतात्मिक मरण पत्करावे लागले. त्यादरम्यान त्याने असे लिहिले: “प्रभु माझ्याजवळ उभा राहिला; माझ्याकडून घोषणा पूर्णपणे व्हावी आणि ती सर्व परराष्ट्रीयांनी ऐकावी म्हणून त्याने मला शक्‍ति दिली; आणि त्याने मला सिंहाच्या जबड्यांतून मुक्‍त केले.” (२ तीम. ४:१७) म्हणूनच, पौल स्वतःच्या अनुभवावरून आपल्या सहविश्‍वासू बांधवांना असे आश्‍वासन देऊ शकला: “कशाविषयीहि चिंताक्रांत होऊ नका.”फिलिप्पैकर ४:६, ७, १३ वाचा.

१६, १७. संकटांचा सामना करण्यासाठी यहोवा आपल्या लोकांना कशा प्रकारे समर्थ करत आहे याचे एक उदाहरण द्या.

१६ यहोवा आपल्या लोकांच्या गरजा कशा प्रकारे पूर्ण करतो याचा अनुभव रोक्साना नावाच्या एका पायनियर बहिणीला आला. अधिवेशनाला उपस्थित राहता यावे म्हणून तिने आपल्या मॅनेजरला काही दिवसांची सुटी मागितली. त्यावर मॅनेजर तिच्यावर भडकला व त्याने सुटी देण्यास नकार दिला. ती अधिवेशनाला गेल्यास तिला कामावरून काढून टाकण्यात येईल असेही तो तिला म्हणाला. रोक्सानाने आपली नोकरी जाऊ नये अशी यहोवाला कळकळीची विनंती केली आणि ती अधिवेशनाला गेली. प्रार्थना केल्यानंतर तिला खूप बरे वाटले. अधिवेशनावरून परतल्यानंतर सोमवारी ती कामाला गेली तेव्हा मॅनेजरने धमकी दिल्याप्रमाणे तिला नोकरीवरून काढून टाकले. रोक्साना खूप चिंतित झाली. नोकरी कमी पगाराची असली, तरी आपल्या कुटुंबाचे भरणपोषण करण्यासाठी तिला ती नोकरी हवी होती. तिने पुन्हा एकदा यहोवाला प्रार्थना केली आणि या वस्तुस्थितीवर मनन केले की अधिवेशनात देवाने आपली आध्यात्मिक गरज पूर्ण केली, तर तो आपली भौतिक गरजदेखील नक्कीच पूर्ण करेल. घराकडे जात असताना, औद्योगिक शिलाई मशीनसाठी अनुभवी “कारागीर पाहिजेत” असे लिहिलेली एक पाटी रोक्सानाने पाहिली, आणि तिने त्या कामासाठी अर्ज केला. रोक्सानाला मशीन चालवण्याचा अनुभव नाही हे जाणूनसुद्धा मॅनेजरने तिला ही नोकरी दिली आणि आधीच्या नोकरीपेक्षा जवळजवळ दुप्पट पगार देऊ केला. देवाने नक्कीच आपली प्रार्थना ऐकली असे रोक्सानाला वाटले. पण, याहीपेक्षा मोठा आशीर्वाद तिला मिळाला. तो म्हणजे तिला आपल्या अनेक सहकाऱ्‍यांना सुवार्ता सांगण्याची संधी मिळाली. परिणामस्वरूप, मॅनेजरसह पाच जणांनी सत्य स्वीकारून बाप्तिस्मा घेतला.

१७ कधीकधी आपल्याला असे वाटू शकते, की देव आपल्या प्रार्थनांचे लगेच उत्तर देत नाही किंवा आपण अपेक्षा केल्याप्रमाणे आपल्याला उत्तर मिळत नाही. तसे असल्यास, त्यामागे नक्कीच काहीतरी उचित कारण असेल. यहोवाला ते कारण माहीत आहे, पण आपल्याला कदाचित ते भविष्यात कळू शकेल. तरीही, आपण एका गोष्टीची पक्की खातरी बाळगू शकतो. ती म्हणजे देव आपल्या विश्‍वासू सेवकांचा कधीही त्याग करत नाही.—इब्री ६:१०.

परीक्षांवर आणि प्रलोभनांवर मात करण्यास साहाय्य

१८, १९. (क) आपण संकटांची व प्रलोभनांची अपेक्षा का करू शकतो? (ख) तुम्ही यशस्वीपणे संकटांचा सामना कसा करू शकता?

१८ यहोवाच्या लोकांना प्रलोभन, निराशा, छळ, आणि साथीदारांचा दबाव यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते याचे त्यांना आश्‍चर्य वाटत नाही. मुळात हे जग आपला द्वेष करते. (योहा. १५:१७-१९) तरीसुद्धा, देवाची सेवा करत असताना आपल्यावर येणाऱ्‍या कोणत्याही संकटावर मात करण्यास पवित्र आत्मा आपल्याला मदत करू शकतो. यहोवा आपल्या सहनशक्‍तीच्या पलीकडे कोणतेही प्रलोभन किंवा परीक्षा आपल्यावर येऊ देणार नाही. (१ करिंथ. १०:१३) तो कधीही आपल्याला टाकणार नाही किंवा सोडून देणार नाही. (इब्री १३:५) देवाच्या प्रेरित वचनाचे पालन केल्याने आपले संरक्षण होते व आपल्याला बळ मिळते. शिवाय, आपल्याला मदतीची सगळ्यात जास्त गरज असते तेव्हा ती पुरवण्यासाठी देवाचा आत्मा आपल्या सहविश्‍वासू बांधवांना प्रवृत्त करू शकतो.

१९ तर मग, आपण सर्व जण प्रार्थना करण्याद्वारे आणि बायबल अभ्यासाद्वारे निरंतर पवित्र आत्म्यासाठी विनंती करत राहू या. तसेच, ‘सर्व प्रकारचा धीर व सहनशक्‍ति ही आपल्याला आनंदासह प्राप्त व्हावी म्हणून [देवाच्या] गौरवाच्या पराक्रमानुसार आपण सर्व प्रकारच्या सामर्थ्याने समर्थ होत’ राहू या.—कलस्सै. १:११.

[तळटीप]

तुमचे उत्तर काय असेल?

• छळाचा सामना करण्यासाठी तुम्ही स्वतःला कसे तयार करू शकता?

• आपण केलेले गैरकृत्य इतरांपुढे उघड करू नये असे एखाद्याने तुम्हाला आर्जवल्यास तुमची प्रतिक्रिया काय असली पाहिजे?

• तुमच्यावर कोणत्याही प्रकारचे संकट आल्यास तुम्ही कोणता भरवसा बाळगू शकता?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२८ पानांवरील चित्र]

यहोशवा आणि कालेब यांच्यापासून आपण काय शिकू शकतो?

[२९ पानांवरील चित्र]

तुमच्या मित्राने एखादे गैरकृत्य केल्यास तुम्ही त्याला मदत कशी करू शकता?