व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुमच्या अविवाहित स्थितीचा पुरेपूर फायदा घ्या

तुमच्या अविवाहित स्थितीचा पुरेपूर फायदा घ्या

तुमच्या अविवाहित स्थितीचा पुरेपूर फायदा घ्या

“ज्याला हे स्वीकारिता येते त्याने स्वीकारावे.”—मत्त. १९:१२.

१, २. (क) अविवाहित स्थितीबद्दल येशू, पौल व इतरांनी काय मत व्यक्‍त केले? (ख) अविवाहित स्थिती एक वरदान आहे असे कदाचित काहींना का वाटणार नाही?

 मानवजातीला देवाकडून मिळालेल्या अनेक देणग्यांपैकी विवाह नक्कीच एक मौल्यवान देणगी आहे. (नीति. १९:१४) असे असले, तरी अनेक अविवाहित ख्रिस्तीसुद्धा समृद्ध व समाधानकारक जीवन जगतात. आयुष्यभर अविवाहित राहिलेले हॅरल्ड नामक ९५ वर्षांचे एक बंधू म्हणतात: “मला इतरांचा सहवास आवडत असला आणि इतरांचा पाहुणचार करायला आवडत असलं, तरी मी एकटा असतो तेव्हासुद्धा मला कधीच एकटेपणा जाणवत नाही. मला असं वाटतं, की अविवाहित स्थिती खरोखरच मला देवाकडून मिळालेलं एक वरदान आहे.”

खरेतर, विवाहाप्रमाणेच अविवाहित स्थितीदेखील देवाकडून मिळालेली देणगी आहे असे येशू ख्रिस्त व प्रेषित पौल या दोघांनी म्हटले. (मत्तय १९:११, १२; १ करिंथकर ७:७ वाचा.) पण, अविवाहित राहणारी प्रत्येक व्यक्‍ती स्वेच्छेने अविवाहित राहण्याचा निर्णय घेते असे नाही. काही वेळा, परिस्थितीमुळे अनुरूप जोडीदार मिळणे कठीण जाते. किंवा काही जण लग्नाच्या अनेक वर्षांनंतर, एकतर घटस्फोटामुळे अथवा विवाहसोबत्याच्या मृत्यूमुळे एकाएकी एकटे पडतात. तर मग, कोणत्या अर्थी अविवाहित स्थिती एक वरदान ठरू शकते? आणि अविवाहित ख्रिस्ती आपल्या अविवाहित स्थितीचा जास्तीत जास्त फायदा कसा घेऊ शकतात?

एक खास देणगी

३. अविवाहित ख्रिश्‍चनांना सहसा कोणते फायदे अनुभवायला मिळतात?

एका विवाहित व्यक्‍तीच्या तुलनेत अविवाहित व्यक्‍तीजवळ सहसा जास्त वेळ व अधिक स्वातंत्र्य असते. (१ करिंथ. ७:३२-३५) या खास फायद्यांमुळे एका अविवाहित व्यक्‍तीला आपले सेवाकार्य वाढवण्याची, प्रेमळ मैत्रीसंबंध जोडण्याची आणि यहोवाच्या आणखी जवळ येण्याची संधी मिळते. त्यामुळे, अनेक ख्रिश्‍चनांनी अविवाहित राहण्याचे फायदे जाणून निदान काही काळासाठी तरी अविवाहित राहण्याचे ‘स्वीकारले’ आहे. इतर काहींनी सुरुवातीला अविवाहित राहण्याचा विचार केला नसेल. पण, परिस्थिती बदलल्यामुळे त्यांनी आपल्या स्थितीचा प्रार्थनापूर्वक विचार केला आणि आपणसुद्धा यहोवाच्या मदतीने अविवाहित राहू शकतो हे त्यांना जाणवले. अशा प्रकारे, बदललेली परिस्थिती स्वीकारून त्यांनी अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला.—१ करिंथ. ७:३७, ३८.

४. अविवाहित ख्रिस्ती आनंदाने देवाची सेवा करू शकतात असे आपण का म्हणू शकतो?

अविवाहित ख्रिश्‍चनांना याची जाणीव आहे, की यहोवाला व त्याच्या संघटनेला आपल्याबद्दल कदर वाटावी म्हणून आपण लग्न केलेच पाहिजे असे नाही. देव आपल्यापैकी प्रत्येक व्यक्‍तीवर प्रेम करतो. (मत्त. १०:२९-३१) कोणतीही व्यक्‍ती किंवा कोणतीही गोष्ट आपल्याला देवाच्या प्रेमापासून दूर करू शकत नाही. (रोम. ८:३८, ३९) आपण विवाहित असू किंवा अविवाहित, कमीपणाची भावना न बाळगता आनंदाने देवाची सेवा करण्याची अनेक कारणे आपल्याजवळ आहेत.

५. अविवाहित स्थितीचा पुरेपूर लाभ घेण्यासाठी काय करणे आवश्‍यक आहे?

पण, तरी ज्याप्रमाणे संगीताची किंवा एखाद्या खेळाची देणगी लाभलेल्यांना आपले कौशल्य विकसित करावे लागते, त्याचप्रमाणे अविवाहित स्थितीच्या देणगीचा पुरेपूर लाभ घेण्यासाठी ती स्थिती विकसित करावी लागते. तर मग, आज अविवाहित ख्रिस्ती—मग ते बंधू असोत किंवा बहिणी, तरुण असोत किंवा वयाने मोठे, स्वेच्छेने अविवाहित असोत किंवा परिस्थितीमुळे—आपल्या अविवाहित स्थितीचा पुरेपूर फायदा कसा घेऊ शकतात? आपण सुरुवातीच्या ख्रिस्ती मंडळीतील काही प्रोत्साहनदायक उदाहरणे विचारात घेऊ या आणि त्यांपासून आपण काय शिकू शकतो ते पाहू या.

तरुण असताना अविवाहित राहणे

६, ७. (क) फिलिप्पाच्या चार अविवाहित मुलींना देवाच्या सेवेत कोणता विशेषाधिकार मिळाला होता? (ख) तीमथ्याने आपल्या अविवाहित स्थितीचा कशा प्रकारे सदुपयोग केला, आणि तारुण्यात देवाची सेवा करण्याची तयारी दाखवल्याबद्दल त्याला कोणकोणते आशीर्वाद लाभले?

सुवार्तिक फिलिप्प याला चार अविवाहित मुली होत्या आणि आपल्या वडिलांप्रमाणेच त्यादेखील मोठ्या आवेशाने सुवार्ता सांगण्याचे कार्य करत होत्या. (प्रे. कृत्ये २१:८, ९) भविष्यवाद करणे हे पवित्र आत्म्याच्या चमत्कारिक दानांपैकी एक दान होते आणि योएल २:२८, २९ मधील भविष्यवाणीत सांगितल्यानुसार या तरुण मुलींनी त्या दानाचा उपयोग केला.

आपल्या अविवाहित स्थितीचा सदुपयोग करणारा एक तरुण होता तीमथ्य. त्याची आई युनीके व आजी लोईस यांनी बालपणापासून त्याला “पवित्र शास्त्राची माहिती” दिली होती. (२ तीम. १:५; ३:१४, १५) पण, इ.स. ४७ च्या सुमारास पौलाने पहिल्यांदा लुस्त्र या त्यांच्या नगराला भेट दिली त्यादरम्यानच त्यांनी बहुधा ख्रिस्ती विश्‍वासाचा स्वीकार केला असावा. याच्या दोन वर्षांनंतर पौलाने दुसऱ्‍यांदा लुस्त्राला भेट दिली तेव्हा तीमथ्य कदाचित वीसेक वर्षांचा असावा. तो वयाने लहान असून सत्यातही नवीनच होता. तरीसुद्धा, लुस्त्र व जवळच्या इकुन्या मंडळीतील वडील त्याला “नावाजीत” होते. (प्रे. कृत्ये १६:१, २) त्यामुळे पौलाने तीमथ्याला आपला प्रवासी सोबती बनण्याचे आमंत्रण दिले. (१ तीम. १:१८; ४:१४) तीमथ्याने कधीच लग्न केले नाही असे आपण निश्‍चितपणे म्हणू शकत नाही. पण, एक गोष्ट आपण निश्‍चितपणे सांगू शकतो, की पौलाने दिलेले आमंत्रण त्याने स्वखुषीने स्वीकारले व त्यानंतर कित्येक वर्षे त्याने एक अविवाहित मिशनरी व पर्यवेक्षक म्हणून आनंदाने सेवा केली.—फिलिप्पै. २:२०-२२.

८. कोणत्या गोष्टीने योहान मार्कला आध्यात्मिक ध्येये गाठण्यास मदत केली, आणि त्याबद्दल त्याला कोणकोणते आशीर्वाद लाभले?

तरुण असताना, योहान मार्कनेदेखील आपल्या अविवाहित स्थितीचा सदुपयोग केला. तो व त्याची आई मरीया, तसेच त्याचा चुलत भाऊ बर्णबा हे जेरूसलेममधील सुरुवातीच्या मंडळीचे सदस्य होते. मार्कच्या कुटुंबाचे शहरात आपले स्वतःचे घर होते व त्यांना एक दासीदेखील होती. यावरून असे दिसते, की त्याचे कुटुंब कदाचित एक आरामदायी जीवन जगत होते. (प्रे. कृत्ये १२:१२, १३) पण, इतके सगळे असूनसुद्धा तरुण मार्क चैनबाजी करणारा किंवा स्वार्थी वृत्तीचा नव्हता. किंवा मग, स्वतःचा संसार थाटून एक आरामदायी जीवन जगण्यातही त्याने समाधान मानले नाही. लहान वयापासून प्रेषितांच्या सहवासात राहिल्यामुळे बहुधा त्याच्या मनात मिशनरी सेवा करण्याची इच्छा निर्माण झाली. म्हणून, त्याने मोठ्या उत्साहाने पौल आणि बर्णबा यांच्या पहिल्या मिशनरी दौऱ्‍यादरम्यान त्यांच्यासोबत प्रवास केला व एक साहाय्यक या नात्याने त्याने त्यांची सेवा केली. (प्रे. कृत्ये १३:५) त्यानंतर, तो बर्णबासोबत आणि आणखी पुढे बॅबिलोनमध्ये पेत्रासोबत सेवा करत असल्याचे आपण पाहतो. (प्रे. कृत्ये १५:३९; १ पेत्र ५:१३) मार्क किती काळ अविवाहित राहिला हे आपल्याला माहीत नाही. पण, इतरांची सेवा करण्यास उत्सुक असलेला व देवाची अधिकाधिक सेवा करण्यास इच्छुक असलेला असा उत्तम नावलौकिक त्याने कमावला.

९, १०. सेवाकार्यातील आपला सहभाग वाढवण्याच्या कोणकोणत्या संधी आज तरुण अविवाहित ख्रिश्‍चनांपुढे आहेत? उदाहरण द्या.

आजदेखील ख्रिस्ती मंडळीतील अनेक तरुण देवाच्या सेवेत जास्तीत जास्त सहभाग घेण्यासाठी आनंदाने आपल्या अविवाहित स्थितीचा उपयोग करतात. मार्क आणि तीमथ्य यांच्याप्रमाणेच तेदेखील याची जाणीव बाळगतात की त्यांच्या अविवाहित स्थितीमुळे त्यांना “प्रभूची सेवा एकाग्रतेने” करणे शक्य होते. (१ करिंथ. ७:३५) हा खरोखरच एक मोठा फायदा आहे. पायनियर सेवा करणे, राज्य प्रचारकांची अधिक गरज असलेल्या क्षेत्रात सेवा करणे, नवीन भाषा शिकणे, राज्य सभागृहे किंवा शाखा कार्यालयांच्या बांधकामात मदत करणे, सेवा प्रशिक्षण प्रशालेला उपस्थित राहणे व बेथेलमध्ये सेवा करणे अशा अनंत संधी आज अविवाहित ख्रिश्‍चनांपुढे आहेत. तुम्ही तरुण असून अविवाहित असल्यास तुमच्यासमोर असलेल्या संधींचा तुम्ही सर्वतोपरी फायदा घेत आहात का?

१० मार्क नावाच्या एका बांधवाने सतरा-अठरा वर्षांचा असताना पायनियर सेवा सुरू केली, सेवा प्रशिक्षण प्रशालेला उपस्थित राहिला आणि जगभरात अनेक निरनिराळ्या नेमणुका पार पाडल्या. आपल्या २५ वर्षांच्या पूर्ण-वेळ सेवेकडे मागे वळून पाहताना ते म्हणतात: “बंधुभगिनींसोबत सेवाकार्य करण्याद्वारे, ख्रिस्ती मेंढपाळ या नात्यानं त्यांना भेटी देण्याद्वारे, त्यांना आपल्या घरी जेवणाचं आमंत्रण देण्याद्वारे आणि आध्यात्मिक रीत्या उभारणीकारक सोहळ्यांचे आयोजन करण्याद्वारे मी मंडळीतील प्रत्येकाला उत्तेजन देण्याचा प्रयत्न केला आहे. बंधुभगिनींसाठी या सर्व गोष्टी केल्यामुळे मला खूप आनंद होतो.” मार्कच्या बोलण्यावरून दिसून येते, की जीवनात सगळ्यात मोठा आनंद मिळतो तो इतरांना देण्याद्वारे. आणि देवाची सेवा करण्यात उभे आयुष्य खर्च केल्याने इतरांना देण्याच्या अनेक संधी आपल्याला लाभतात. (प्रे. कृत्ये २०:३५) तुमच्या वैयक्‍तिक आवडीनिवडी, तुमची कलाकौशल्ये किंवा जीवनातील अनुभव काहीही असो, आज तरुण लोकांना प्रभूच्या सेवेत खूप काही करण्याचा वाव आहे.—१ करिंथ. १५:५८.

११. लग्नाची घाई न करण्याचे कोणते काही फायदे आहेत?

११ अनेक तरुणांना कालांतराने लग्न करण्याची इच्छा असली, तरी त्यांनी लग्न करायची घाई करू नये. निदान “तारुण्याचा बहर” ओसरेपर्यंत अर्थात लैंगिक इच्छा सगळ्यात प्रबळ असतात तो काळ ओसरेपर्यंत तरुणांनी थांबून राहावे असे उत्तेजन पौल तरुणांना देतो. (१ करिंथ. ७:३६, NW) स्वतःला समजून घेण्यासाठी, तसेच एक अनुरूप जोडीदार निवडण्यास आवश्‍यक असलेला अनुभव मिळवण्यासाठी वेळ लागतो. विवाहाची शपथ घेणे हा एक गंभीर निर्णय असून तो आयुष्यभर निभवावा लागतो.—उप. ५:२-५.

उतारवयात अविवाहित राहणे

१२. (क) विधवा असलेल्या हन्‍नाने आपल्या जीवनातील बदललेल्या परिस्थितीचा कसा सामना केला? (ख) तिला कोणता विशेषाधिकार लाभला?

१२ लूकच्या शुभवर्तमानात उल्लेखिलेल्या हन्‍ना हिच्या पतीचे, लग्नाच्या अवघ्या सात वर्षांनंतर अचानक निधन झाले तेव्हा ती साहजिकच खूप दुःखी झाली असावी. त्यांना मुलेबाळे होती की नाही किंवा हन्‍नाने पुन्हा लग्न करण्याचा कधी विचार केला की नाही हे आपल्याला माहीत नाही. पण, बायबल आपल्याला असे सांगते की वयाच्या ८४ व्या वर्षीही हन्‍ना विधवा होती. बायबल जे काही सांगते त्यावरून आपण असा निष्कर्ष काढू शकतो, की हन्‍नाने आपल्या बदललेल्या परिस्थितीचा यहोवाशी जवळीक साधण्यासाठी उपयोग केला. ती “मंदिर सोडून न जाता उपास व प्रार्थना करून रात्रंदिवस सेवा करीत असे.” (लूक २:३६, ३७) होय, तिने यहोवाच्या उपासनेला आपल्या जीवनात प्राधान्य दिले. त्यासाठी तिला खरोखर दृढनिश्‍चय व प्रयास करावा लागला. पण, त्याचे मोठे प्रतिफळ तिला मिळाले. तिला बाळ येशूला पाहण्याचा विशेषाधिकार लाभला आणि येणाऱ्‍या या मशीहाद्वारे लवकरच जी मुक्‍ती मिळणार होती त्याची तिने इतरांना साक्ष दिली.—लूक २:३८.

१३. (क) ख्रिस्ती मंडळीत दुर्कस अतिशय क्रियाशील होती हे कशावरून सूचित होते? (ख) दुर्कसने दाखवलेल्या चांगुलपणाचे व प्रेमळपणाचे तिला कोणते प्रतिफळ मिळाले?

१३ दुर्कस ऊर्फ टबीथा नावाची एक स्त्री जेरूसलेमच्या उत्तरपश्‍चिमेस असलेल्या यापो नावाच्या एका प्राचीन बंदराजवळ राहत होती. बायबलमध्ये तिच्या पतीचा उल्लेख आढळत नाही, त्याअर्थी त्या वेळी ती बहुधा अविवाहित असावी. दुर्कस “सत्कृत्ये व दानधर्म करण्यात तत्पर” होती. ती बहुधा अनेक गरजू विधवांसाठी व इतरांसाठीदेखील वस्त्रे तयार करत असे आणि त्यामुळे अनेक जण तिच्यावर भरभरून प्रेम करायचे. म्हणूनच, ती अचानक आजारी पडून मरण पावली तेव्हा सबंध मंडळीने पेत्राला बोलावणे पाठवून आपल्या या प्रिय बहिणीचे पुनरुत्थान करण्याची त्याला विनंती केली. तिच्या पुनरुत्थानाची वार्ता संपूर्ण यापोमध्ये पसरली तेव्हा अनेक जण ख्रिस्ती बनले. (प्रे. कृत्ये ९:३६-४२) यांपैकी काहींना, दुर्कसने स्वतः आपल्या असामान्य दयाळू वृत्तीमुळे मदत केली असावी.

१४. कोणती गोष्ट अविवाहित ख्रिश्‍चनांना देवाशी जवळीक साधण्यास प्रवृत्त करते?

१४ हन्‍ना आणि दुर्कसप्रमाणेच आजसुद्धा मंडळीतील अनेकांना उतारवयात एकटे पडल्याचे जाणवते. काहींना अनुरूप विवाहसोबती मिळाला नसेल, तर इतर काही जण घटस्फोटामुळे किंवा विवाहसोबत्याच्या मृत्यूमुळे एकटे पडले असतील. मनातील भावना व्यक्‍त करण्यासाठी विवाहसोबती नसल्यामुळे अविवाहित ख्रिस्ती सहसा यहोवावर अधिक विसंबून राहण्यास शिकतात. (नीति. १६:३) ३८ पेक्षा अधिक वर्षे बेथेलमध्ये सेवा केलेल्या सिल्विया नावाच्या एका अविवाहित बहिणीला वाटते, की तिची अविवाहित स्थिती एक वरदान आहे. ती कबूल करते: “इतरांना उत्तेजन देता देता मी स्वतः इतकी थकून जाते, की ‘मला कोण उत्तेजन देईल?’ असा प्रश्‍न कधीकधी मला पडतो.” पण, ती पुढे म्हणते: “मला नेमकं काय हवंय हे माझ्यापेक्षा जास्त यहोवाला माहीत आहे असा भरवसा बाळगल्यामुळे मला त्याच्याशी जवळीक साधायला मदत होते. आणि मला कुठून ना कुठून उत्तेजन मिळतंच. कधीकधी तर सर्वस्वी अनपेक्षित मार्गानं.” आपण जेव्हा जेव्हा यहोवाशी जवळीक साधतो तेव्हा तेव्हा तो सगळ्यात प्रेमळ व आश्‍वासक मार्गाने आपल्याला प्रतिसाद देतो.

१५. अविवाहित ख्रिस्ती कशा प्रकारे आपले “अंतःकरण विशाल करू” शकतात?

१५ अविवाहित असल्यामुळे “अंतःकरण विशाल” करण्याची अर्थात अनेक प्रेमळ मैत्रीसंबंध जोडण्याची खास संधी मिळते. (२ करिंथकर ६:११-१३ वाचा.) गेली ३४ वर्षे पूर्ण-वेळची सेवा केलेली जोलीन नावाची एक अविवाहित बहीण म्हणते: “मी केवळ माझ्याच वयाच्या लोकांसोबत मैत्री करते असं नाही, तर मी सर्व प्रकारच्या लोकांसोबत मैत्री करण्याचा प्रयत्न करते. अविवाहित असल्यामुळे तुम्हाला खऱ्‍या अर्थानं यहोवाला, तुमच्या कुटुंबाला, तुमच्या बंधुभगिनींना, इतकंच नव्हे तर तुमच्या शेजाऱ्‍यांनादेखील काहीतरी देण्याची संधी मिळते. जसजसं माझं वय वाढत जातं तसतसा अविवाहित राहण्याचा माझा आनंदही वाढत जातो.” मंडळीतील वयोवृद्धांना, आजारी असलेल्यांना, एकट्या पालकांना, युवकांना व इतरांना अविवाहित बंधुभगिनींकडून जो निःस्वार्थ आधार मिळतो त्याबद्दल नक्कीच त्यांना कृतज्ञता वाटते. खरेच, आपण इतरांना प्रेम दाखवतो तेव्हा आपल्या स्वतःलाच खूप बरे वाटते. तर मग, तुम्हीसुद्धा आपले “अंतःकरण विशाल” करून इतरांशी प्रेमळ नातेसंबंध जोडू शकता का?

आयुष्यभर अविवाहित राहणे

१६. (क) येशू आयुष्यभर अविवाहित का राहिला? (ख) पौलाने आपल्या अविवाहित स्थितीचा सुज्ञपणे कसा उपयोग केला?

१६ येशूने लग्न केले नाही; त्याला त्याच्यावर सोपवलेल्या कार्याची तयारी करायची होती व ते कार्य यशस्वीपणे पार पाडायचे होते. त्याने खूप खूप प्रवास केला, दिवसरात्र एक करून कार्य केले आणि शेवटी आपले जीवन बलिदान केले. तो अविवाहित असल्यामुळे त्याला हे कार्य पूर्ण करता आले. प्रेषित पौलाने हजारो मैल प्रवास केला व सेवाकार्यात अनेक संकटांना तोंड दिले. (२ करिंथ. ११:२३-२७) पौलाचे कदाचित आधी लग्न झाले असावे. पण, प्रेषित म्हणून त्याची नेमणूक झाल्यानंतर त्याने अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला. (१ करिंथ. ७:७, ८; ९:५) सेवाकार्यासाठी, शक्य असल्यास इतरांनी आपल्या उदाहरणाचे अनुकरण करावे असे उत्तेजन येशू व पौल या दोघांनीही दिले. पण, सेवाकार्यासाठी एखाद्याने आयुष्यभर अविवाहित राहावे असा नियम या दोघांपैकी कोणीही घालून दिला नाही.—१ तीम. ४:१-३.

१७. आज काहींनी कशा प्रकारे येशूच्या व पौलाच्या पदचिन्हांचे अनुसरण केले आहे आणि अशा प्रकारचे त्याग करणाऱ्‍यांची यहोवा कदर करतो असे आपण खातरीने का म्हणू शकतो?

१७ आजदेखील काहींनी सेवाकार्यात अधिक सहभाग घेता यावा म्हणून अविवाहित राहण्याचा जाणीवपूर्वक निर्णय घेतला आहे. लेखाच्या सुरुवातीला उल्लेखिलेले हॅरल्ड यांनी ५६ हून अधिक वर्षे बेथेलमध्ये सेवा केली आहे. ते म्हणतात: “बेथेलमध्ये मला दहा वर्षं पूर्ण होईपर्यंत मी कितीतरी विवाहित जोडप्यांना आजारपणामुळे किंवा वृद्ध आईवडिलांची काळजी घेण्यासाठी बेथेल सोडून जाताना पाहिलं आहे. माझे आईवडील वारले होते. पण, मला बेथेल इतकं आवडायचं, की लग्न करून मला तो विशेषाधिकार धोक्यात घालायचा नव्हता.” त्याचप्रमाणे, कित्येक वर्षे पायनियर सेवा करणाऱ्‍या मार्गरेट नावाच्या एका बहिणीने अनेक वर्षांपूर्वी असे म्हटले: “माझ्या जीवनात लग्न करण्याच्या कितीतरी संधी चालून आल्या होत्या, पण मी लग्न केलं नाही. त्याउलट, अविवाहित असल्यामुळे मला मिळणाऱ्‍या अतिरिक्‍त स्वातंत्र्याचा मी सेवाकार्यात व्यस्त राहण्यासाठी उपयोग केला आणि त्यामुळे मी खूप आनंदी आहे.” खरेच, खऱ्‍या उपासनेसाठी निःस्वार्थपणे त्याग करणाऱ्‍या कोणाही व्यक्‍तीला यहोवा कधीही विसरणार नाही.यशया ५६:४, ५ वाचा.

तुमच्या परिस्थितीचा पुरेपूर फायदा घ्या

१८. मंडळीतील इतर जण अविवाहित ख्रिश्‍चनांना उत्तेजन व पाठबळ कसे देऊ शकतात?

१८ यहोवाची सेवा करण्यासाठी मनापासून झटणारे सर्व अविवाहित ख्रिस्ती आपली मनस्वी प्रशंसा व प्रोत्साहन मिळवण्यास पात्र आहेत. त्या प्रत्येक व्यक्‍तीवर आपण जिवापाड प्रेम करतो, त्यांच्या उत्कृष्ट गुणांची कदर करतो आणि मंडळीसाठी ते जे काही योगदान करतात त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आपण जर खऱ्‍या अर्थाने त्यांचे आध्यात्मिक “बहीणभाऊ, आईबाप, मुलेबाळे” बनलो, तर त्यांना कधीच एकटेपणा वाटणार नाही.मार्क १०:२८-३० वाचा.

१९. तुमच्या अविवाहित स्थितीचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी तुम्ही काय करू शकता?

१९ तुम्ही स्वेच्छेने अविवाहित राहण्याचा निर्णय घेतलेला असो अथवा परिस्थितीमुळे, तुम्हीसुद्धा एक आनंदी व फलदायक जीवन जगू शकता याचे आश्‍वासन बायबलमधील व आधुनिक काळातील या उदाहरणांवरून तुम्हाला मिळो. काही भेटवस्तूंची आपण आतुरतेने वाट पाहतो, तर काही भेटवस्तू अगदी अनपेक्षितपणे आपल्याला मिळतात. काही भेटवस्तूंची लगेच कदर केली जाते, तर काहींचे मोल काही काळानंतरच आपल्याला जाणवते. तेव्हा, बरेच काही आपल्या मनोवृत्तीवर अवलंबून आहे. तर मग, तुमच्या अविवाहित स्थितीचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी तुम्ही काय करू शकता? यहोवाशी जवळीक साधा, देवाच्या सेवेत व्यस्त राहा आणि इतरांशी प्रेमळ मैत्रीसंबंध जोडा. आपल्या अविवाहित स्थितीकडे आपण यहोवाच्या दृष्टिकोनातून पाहिले व त्याचा सुज्ञपणे उपयोग केला, तर विवाहाप्रमाणेच अविवाहित स्थितीदेखील एक वरदान ठरू शकते.

तुम्हाला आठवते का?

• कोणत्या अर्थी अविवाहित स्थिती एक वरदान ठरू शकते?

• तरुणपणी अविवाहित राहिल्यामुळे कोणते आशीर्वाद मिळू शकतात?

• अविवाहित ख्रिश्‍चनांजवळ यहोवाशी जवळीक साधण्याच्या व इतरांशी प्रेमळ मैत्रीसंबंध जोडण्याच्या कोणत्या संधी आहेत?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१८ पानांवरील चित्रे]

देवाच्या सेवेत उपलब्ध असलेल्या सुसंधींचा तुम्ही पुरेपूर फायदा घेत आहात का?