देवाने दिलेल्या विवाहाच्या देणगीचा आदर करा
देवाने दिलेल्या विवाहाच्या देणगीचा आदर करा
“यास्तव पुरुष आपल्या आईबापास सोडून आपल्या स्त्रीशी जडून राहील; ती दोघे एकदेह होतील.”—उत्प. २:२४.
१. यहोवा आपल्या आदरास पात्र का आहे?
विवाहाची सुरुवात करणारा, यहोवा देव नक्कीच आपल्या आदरास पात्र आहे. आपला निर्माणकर्ता, सार्वभौम अधिपती आणि स्वर्गीय पिता या नात्याने, त्याचे वर्णन उचितपणे “प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान” देणारा असे केले आहे. (याको. १:१७; प्रकटी. ४:११) यातून त्याचे अपार प्रेम दिसून येते. (१ योहा. ४:८) त्याने आपल्याला जे काही शिकवले आहे, आपल्याकडून त्याने जे काही अपेक्षिले आहे आणि आपल्याला त्याने जे काही दिले आहे ते सर्व आपल्या कल्याणाकरता व भल्याकरताच आहे.—यश. ४८:१७.
२. यहोवाने सर्वात पहिल्या विवाहित जोडप्याला कोणत्या सूचना दिल्या?
२ देवाने दिलेल्या या “उत्तम” देणग्यांपैकी विवाह एक आहे असे बायबलमध्ये सांगितले आहे. (रूथ १:९; २:१२) यहोवाने सर्वप्रथम आदाम व हव्वा या जोडप्याचा विवाह लावून दिला, तेव्हा त्याने त्यांना वैवाहिक जीवनात यशस्वी होण्यासाठी विशिष्ट सूचना दिल्या. (मत्तय १९:४-६ वाचा.) त्यांनी देवाच्या मार्गदर्शनाचे पालन केले असते, तर ते सदासर्वकाळ सुखी राहिले असते. पण, त्यांनी देवाच्या आज्ञा तुच्छ लेखण्याचा मूर्खपणा केला आणि त्याचे भयंकर परिणाम त्यांना भोगावे लागले.—उत्प. ३:६-१३, १६-१९, २३.
३, ४. (क) आज बहुतेक लोक कशा प्रकारे विवाहाचा व यहोवा देवाचा अनादर करत आहेत? (ख) या लेखात आपण कोणती उदाहरणे पाहणार आहोत?
३ त्या पहिल्या जोडप्याप्रमाणेच, आजदेखील अनेक लोक वैवाहिक जीवनात निर्णय घेताना यहोवाच्या मार्गदर्शनाबद्दल कमी आदर दाखवतात किंवा मुळीच आदर दाखवत नाहीत. काही जण लग्न न करताच सर्रासपणे एकत्र राहतात. इतर काही जण लग्न करतात, पण आपण वाटेल तेव्हा विवाहबंधनातून बाहेर पडू शकतो या दृष्टिकोनातून ते विवाहाकडे पाहतात. तर, असेही काही जण आहेत जे आपल्या वासना तृप्त करण्यासाठी समलिंगी विवाह करतात. अशा रीतीने, त्यांनी विवाहाची मूळ व्याख्याच बदलून टाकली आहे. (रोम. १:२४-३२; २ तीम. ३:१-५) विवाह ही देवाने दिलेली देणगी आहे या गोष्टीकडे ते दुर्लक्ष करतात, आणि त्या देणगीचा अनादर करण्याद्वारे, ती देणगी देणाऱ्या यहोवा देवाचादेखील ते अनादर करतात.
४ कधीकधी, देवाचे लोकदेखील विवाहाकडे यहोवाच्या दृष्टिकोनातून पाहण्यास चुकतात. काही ख्रिस्ती जोडपी विभक्त होण्याचा निर्णय घेतात किंवा कोणत्याही शास्त्रवचनीय आधाराविना ते घटस्फोट घेण्याचे ठरवतात. हे कसे टाळता येईल? उत्पत्ति २:२४ मधील देवाचे मार्गदर्शन ख्रिस्ती जोडप्यांना त्यांचे वैवाहिक बंधन मजबूत करण्यास कसे साहाय्य करू शकते? आणि जे विवाह करण्याच्या विचारात आहेत त्यांना हा सल्ला कसा उपयुक्त ठरू शकतो? यशस्वी वैवाहिक जीवनासाठी यहोवाबद्दल आदर असणे किती महत्त्वाचे आहे हे दाखवणाऱ्या बायबल काळातील तीन यशस्वी विवाहांची आता आपण चर्चा करू या.
एकनिष्ठा विकसित करा
५, ६. जखऱ्या व अलीशिबा यांच्यासमोर कोणती परीक्षा होती आणि त्यांच्या एकनिष्ठेचे त्यांना कोणते प्रतिफळ मिळाले?
५ जखऱ्या आणि अलीशिबा या जोडप्याने जीवनात नेहमी योग्य तेच केले होते. ते दोघेही आध्यात्मिक मनोवृत्तीचे होते. जखऱ्याने विश्वासूपणे आपली याजकीय सेवा पार पाडली आणि त्या दोघांनीही देवाच्या नियमांचे मनापासून पालन केले. देवाचे आभार मानण्याची त्यांच्याजवळ कितीतरी कारणे होती. तरीसुद्धा, तुम्ही यहूदातील त्यांच्या घरी गेला असता, तर त्या घरात कशाची तरी उणीव असल्याचे लगेच तुमच्या लक्षात आले असते. होय, त्यांना मुलेबाळे नव्हती. अलीशिबा वांझ होती; शिवाय त्या दोघांचे वयदेखील झाले होते.—लूक १:५-७.
६ प्राचीन इस्राएल राष्ट्रात, मुलांना जन्म देणे मोठ्या सन्मानाची गोष्ट मानली जायची आणि कुटुंबे सहसा बरीच मोठी असायची. (१ शमु. १:२, ६, १०; स्तो. १२८:३, ४) एखाद्या स्त्रीला मुले होत नसतील, तर त्या काळी काही इस्राएली पुरुष विश्वासघात करून आपल्या पत्नीला घटस्फोट द्यायचे. पण, जखऱ्या मात्र अलीशिबेला एकनिष्ठ राहिला. त्याने किंवा त्याच्या पत्नीने विवाहबंधनातून बाहेर पडण्याचा सोपा मार्ग शोधला नाही. मुलेबाळे नसल्यामुळे त्यांना दुःख होत असले, तरी ते दोघे एकमेकांना एकनिष्ठ राहून विश्वासूपणे यहोवाची सेवा करत राहिले. कालांतराने, यहोवाने चमत्कारिक रीत्या त्यांना म्हातारपणी एक पुत्र देऊन समृद्धपणे आशीर्वादित केले.—लूक १:८-१४.
७. अलीशिबेने आणखी कोणत्या एका मार्गाने आपल्या पतीला एकनिष्ठा दाखवली?
७ अलीशिबेने आणखी एका प्रशंसनीय मार्गाने आपल्या पतीला एकनिष्ठा दाखवली. योहानाचा जन्म झाल्यावर जखऱ्या बोलू शकत नव्हता, कारण देवदूताने सांगितलेल्या गोष्टीवर त्याने शंका व्यक्त केली होती. तरीसुद्धा, देवदूताने सांगितल्याप्रमाणे, मुलाचे नाव “योहान” ठेवले जावे हे त्याने कोणत्यातरी मार्गाने आपल्या पत्नीला सांगितले असावे. त्यांचे शेजारी व नातेवाईक मुलाचे नाव जखऱ्याच्या नावावरून ठेवू इच्छित होते. पण, अलीशिबेने आपल्या पतीने सांगितलेल्या गोष्टीचे समर्थन करून एकनिष्ठा दाखवली. तिने म्हटले: “ते नको, ह्याचे नाव योहान ठेवावयाचे आहे.”—लूक १:५९-६३.
८, ९. (क) एकनिष्ठेमुळे कशा प्रकारे विवाहबंधन मजबूत होते? (ख) कोणत्या काही विशिष्ट मार्गांनी पती-पत्नी दाखवू शकतात की ते एकमेकांना एकनिष्ठ आहेत?
८ जखऱ्या व अलीशिबा यांच्याप्रमाणे, आजदेखील विवाहित जोडप्यांना निराशेचा व समस्यांचा सामना करावा लागतो. पती-पत्नी एकमेकांस एकनिष्ठ नसले, तर विवाहबंधन टिकून राहणे शक्य नाही. विवाह साथीदाराव्यतिरिक्त इतरांमध्ये आस्था घेणे, पोर्नोग्राफी (अश्लील साहित्य) पाहणे किंवा वाचणे, व्यभिचार आणि अशा इतर घातक गोष्टींमुळे सुखी विवाहाला धोका निर्माण होऊ शकतो व यांमुळे एकमेकांवरील विश्वासाला कायमचा तडा जाऊ शकतो. आणि एकदा का असे झाले, की मग पती-पत्नीच्या नात्यातील ओलावा कमी होतो. एकनिष्ठा एक प्रकारे, घराभोवती सुरक्षेसाठी घातलेल्या कुंपणाप्रमाणे आहे. त्यामुळे घरात असणाऱ्यांचे शत्रूंपासून आणि विविध धोक्यांपासून संरक्षण होते. तशाच प्रकारे, पती-पत्नी एकमेकांना एकनिष्ठ असतात तेव्हा एकमेकांच्या सान्निध्यात सुरक्षित असतात आणि एकमेकांजवळ आपले मन मोकळे करू शकतात व एकमेकांप्रती असलेले आपले प्रेम वाढवू शकतात. होय, पती-पत्नीने एकमेकांना एकनिष्ठ राहणे अत्यावश्यक आहे.
९ यहोवाने आदामाला सांगितले: “यास्तव पुरुष आपल्या आईबापास सोडून आपल्या स्त्रीशी जडून राहील.” (उत्प. २:२४) याचा काय अर्थ होतो? पती-पत्नीला आपल्या पूर्वीच्या मित्रमैत्रिणींसोबत व नातेवाइकांसोबत असलेल्या नातेसंबंधांत थोडाफार फेरबदल करावा लागेल. पती-पत्नीने एकमेकांना आवश्यक तो वेळ व लक्ष दिले पाहिजे. आपल्या नवीन कुटुंबाला धोक्यात घालून पती-पत्नीने मित्रांना किंवा नातेवाइकांना प्राधान्य देऊ नये. तसेच, कुटुंबात काही निर्णय घ्यायचे असतात किंवा पती-पत्नीमध्ये काही मतभेद होतात तेव्हा त्यांनी आपल्या पालकांना आपल्या वैवाहिक जीवनात ढवळाढवळ करू देऊ नये. एक विवाहित जोडपे या नात्याने त्यांनी एकमेकांना जडून राहिले पाहिजे. हेच देवाचे मार्गदर्शन आहे.
१०. विवाहित जोडप्यांना एकनिष्ठा विकसित करण्यास कोणती गोष्ट मदत करेल?
१० धार्मिक रीत्या विभाजित असलेल्या कुटुंबामध्येदेखील, पती-पत्नी एकमेकांना एकनिष्ठ राहिल्यामुळे अनेक आशीर्वाद मिळतात. एक बहीण जिचा पती सत्यात नाही ती म्हणते: “माझ्या पतीच्या अधीन कसे राहावे व त्यांना कशा प्रकारे गहिरा आदर दाखवावा हे यहोवानं मला शिकवल्याबद्दल मी त्याचे खूप आभार मानते. एकनिष्ठ राहिल्यामुळे गेल्या ४७ वर्षांपासून आमच्या वैवाहिक जीवनात आम्ही प्रेम व आदर अनुभवला आहे.” (१ करिंथ. ७:१०, ११; १ पेत्र ३:१, २) म्हणून तुमच्या सोबत्याला सुरक्षित वाटावे यासाठी परिश्रम घ्या. तुमच्याकरता तुमचा साथीदार हा पृथ्वीवरील सर्वात महत्त्वाची व्यक्ती आहे याचे शब्दांतून किंवा कार्यांतून आश्वासन देण्याचे नवनवीन मार्ग शोधा. कोणतीही व्यक्ती किंवा गोष्ट तुमच्या दोघांच्या मध्ये येऊ नये म्हणून होता होईल तितके प्रयत्न करा. (नीतिसूत्रे ५:१५-२० वाचा.) गेल्या ३५ पेक्षा जास्त वर्षांपासून सुखी संसाराचा आनंद अनुभवत असलेले रॉन आणि जनेट म्हणतात, “देव आमच्याकडून अपेक्षित असलेल्या गोष्टी आम्ही एकनिष्ठपणे करतो, त्यामुळे आमचं वैवाहिक जीवन सुखी-समाधानी आहे.”
ऐक्य—विवाहबंधनास बळकट करते
११, १२. अक्विल्ला व प्रिस्किल्ला यांनी (क) घरकामात, (ख) व्यवसायात, आणि (ग) ख्रिस्ती सेवा कार्यात कशा प्रकारे एकमेकांना सहकार्य केले?
११ आपले जवळचे मित्र अक्विल्ला व प्रिस्किल्ला यांच्याबद्दल बोलताना प्रेषित पौलाने कधीही त्यांचा वेगवेगळा उल्लेख केला नाही. पती व पत्नी “एकदेह” होतील असे देवाने जे म्हटले त्याचा काय अर्थ होतो हे या विवाहित जोडप्यातील ऐक्यावरून दिसून येते. (उत्प. २:२४) त्या दोघांनी नेहमी सोबत मिळून काम केले, मग ते घरकाम असो, व्यवसाय असो, किंवा ख्रिस्ती सेवाकार्य असो. उदाहरणार्थ, पौल पहिल्यांदा करिंथमध्ये गेला, तेव्हा अक्विल्ला व प्रिस्किल्ला यांनी त्याला आपल्या घरी राहण्याचे प्रेमळ आमंत्रण दिले. पौलाने काही काळ बहुधा त्यांच्या घरी राहूनच आपले सेवाकार्य पुढे चालू ठेवले. नंतर, अक्विल्ला व प्रिस्किल्ला इफिससमध्ये राहत असताना त्यांनी मंडळीच्या सभा भरवण्याकरता आपल्या घराचा उपयोग केला आणि अपोल्लोसारख्या नवीन लोकांना आध्यात्मिक उन्नती करण्यासाठी त्या दोघांनी मिळून साहाय्य केले. (प्रे. कृत्ये १८:२, १८-२६) हे आवेशी जोडपे नंतर रोमला गेले. तेथेदेखील त्यांनी मंडळीच्या सभांसाठी आपल्या घराचा उपयोग केला. त्यानंतर, ते इफिससला परत आले आणि तेथील बांधवांना त्यांनी आध्यात्मिक रीत्या मजबूत केले.—रोम. १६:३-५.
१२ अक्विल्ला व प्रिस्किल्ला आणि पौल या तिघांचा एकच व्यवसाय होता. तो म्हणजे तंबू बनवण्याचा व्यवसाय. काही काळ या तिघांनी मिळून हे काम केले. या वेळीसुद्धा हे जोडपे चढाओढ किंवा भांडणतंटा न करता एकमेकांना सहकार्य करत असल्याचे दिसून येते. (प्रे. कृत्ये १८:३) पण, ख्रिस्ती कार्यांत सोबत वेळ घालवल्यामुळे ते यहोवाला आपल्या जीवनात प्रथम स्थानी ठेवू शकले आणि त्यामुळे त्यांचे वैवाहिक जीवन यशस्वी झाले. करिंथ असो, इफिसस असो किंवा रोम असो, त्या दोघांना सर्वत्र ‘ख्रिस्त येशूमध्ये सहकारी’ म्हणून ओळखले जायचे. (रोम. १६:३) राज्य प्रचाराचे कार्य पुढे नेण्यासाठी त्यांनी जेथे कोठे सेवा केली, तेथे त्यांनी नेहमी एकमेकांच्या सोबतीने कार्य केले.
१३, १४. (क) कोणत्या गोष्टी विवाहातील ऐक्याला घातक ठरू शकतात? (ख) “एकदेह” या नात्याने आपले विवाहबंधन मजबूत करण्यासाठी विवाहसाथीदार सोबत मिळून कोणत्या गोष्टी करू शकतात?
१३ होय, पती-पत्नीची ध्येये समान असल्यास व त्यांनी एकत्र मिळून इतर कार्यांत भाग घेतल्यास त्यांचे वैवाहिक बंधन मजबूत होते. (उप. ४:९, १०) दुःखाची गोष्ट म्हणजे, आज अनेक जोडपी एकमेकांच्या सहवासात जास्त वेळ न घालवता आपापल्या नोकरी-व्यवसायात जास्त वेळ घालवतात. इतर जण कामानिमित्त वारंवार प्रवास करत असतात किंवा कामानिमित्त एकटेच परदेशात राहायला जातात आणि तेथून घरी पैसे पाठवतात. काही विवाहसाथीदार टीव्ही पाहण्यात, आपले छंद जोपासण्यात, व्हीडिओ गेम्स खेळण्यात किंवा इंटरनेटवर इतका वेळ घालवतात की ते एकमेकांना वेळ देत नाहीत. तुमच्या कुटुंबातही असेच काहीसे होते का? असल्यास, आपल्या साथीदारासोबत जास्त वेळ घालवता यावा म्हणून तुम्ही तुमच्या परिस्थितीत काही बदल करू शकता का? सोबत मिळून स्वयंपाक करणे, भांडी घासणे किंवा बागेत काम करणे, यांसारख्या दैनंदिन गोष्टींबद्दल काय म्हणता येईल? मुलांची किंवा वयोवृद्ध आईवडिलांची काळजी घेणे, यांसारख्या गोष्टी तुम्ही सोबत मिळून करू शकता का?
१४ सर्वात महत्त्वाचे म्हणजे, यहोवाच्या उपासनेशी संबंधित कार्यांत एकत्र वेळ घालवा. सोबत मिळून दैनिक वचनावर चर्चा केल्याने आणि कौटुंबिक उपासनेत सहभाग घेतल्याने, एकमेकांची विचारसरणी व ध्येये समान ठेवण्याची सर्वोत्तम संधी मिळते. तसेच, सेवाकार्यात एकत्र जा. शक्य झाल्यास, तुमच्या परिस्थितीनुसार पायनियर सेवा करण्याचा प्रयत्न करा, मग ती केवळ एक महिन्यासाठी असो किंवा वर्षभरासाठी असो. (१ करिंथकर १५:५८ वाचा.) आपल्या पतीसोबत पायनियर सेवा केलेली एक बहीण म्हणते: “सेवाकार्यात एकत्र गेल्यामुळे आम्ही एकमेकांसोबत वेळ घालवू शकलो व खऱ्या अर्थाने संवाद साधू शकलो. आम्हा दोघांचं एकच ध्येयं होतं. ते म्हणजे इतरांना देवाबद्दल जाणून घेण्यास मदत करणं. त्यामुळे खऱ्या अर्थानं आम्ही संघभावनेनं कार्य करत असल्याचं मला जाणवलं. मला माझ्या पतीच्या आणखी जवळ आल्यासारखं वाटतं, केवळ एक पती म्हणूनच नव्हे, तर एक चांगला मित्र म्हणूनही.” अक्विल्ला व प्रिस्किल्ला यांच्याप्रमाणेच, तुम्ही महत्त्वाची कार्ये सोबत मिळून केल्यास, तुमच्या व तुमच्या साथीदाराच्या आवडीनिवडी, जीवनातील प्राधान्यक्रम आणि तुमच्या सवयी हळूहळू एकसमान होतील. आणि त्यामुळे जणू तुम्ही “एकदेह” असल्यासारखे तुमचे विचार, तुमच्या भावना व तुमची कार्येदेखील अधिकाधिक एकसारखी होतील.
देवाचे मार्गदर्शन घेत राहा
१५. यशस्वी विवाहासाठी कोणती गोष्ट महत्त्वाची आहे? स्पष्ट करा.
१५ विवाहबंधनात देवाला प्रथम स्थान देणे किती महत्त्वाचे आहे हे येशूला माहीत होते. यहोवा देवाने लावून दिलेला पहिला विवाह त्याने पाहिला होता. आदाम व हव्वा यांनी देवाच्या मार्गदर्शनाचे पालन केले तोपर्यंत ते किती सुखी होते हे त्याने पाहिले होते. आणि त्यांनी देवाचे मार्गदर्शन नाकारले तेव्हा त्यांच्यावर ओढवलेले संकट त्याने स्वतः पाहिले होते. म्हणूनच, येशूने इतरांना शिकवताना उत्पत्ति २:२४ मध्ये असलेल्या आपल्या पित्याच्या शब्दांचा पुन्हा उल्लेख केला. त्यासोबतच त्याने हेदेखील म्हटले: “देवाने जे जोडले आहे ते माणसाने तोडू नये.” (मत्त. १९:६) त्यामुळे, वैवाहिक जीवन सुखी व यशस्वी होण्यासाठी, आजही यहोवाबद्दल गाढ आदर असणे महत्त्वाचे आहे. याबाबतीत, येशूचे पृथ्वीवरील आईवडील, योसेफ व मरीया यांनी एक उल्लेखनीय उदाहरण मांडले.
१६. योसेफ व मरीया हे आध्यात्मिक वृत्तीचे असल्याचे त्यांनी आपल्या वैवाहिक जीवनातून कशा प्रकारे दाखवले?
१६ योसेफ मरीयेशी दयाळूपणे व आदराने वागला. मरीया गर्भवती असल्याचे त्याला पहिल्यांदा समजले तेव्हा, हे कसे घडले याबद्दल देवदूताने त्याला सांगण्याआधीच तो तिच्याशी दयाळूपणे वागू इच्छित होता. (मत्त. १:१८-२०) एक जोडपे या नात्याने त्यांनी कैसराच्या आज्ञेचे पालन केले आणि मोशेच्या नियमशास्त्रात सांगितलेल्या गोष्टींचे बारकाईने पालन केले. (लूक २:१-५, २१, २२) जेरूसलेममधील धार्मिक सणांना केवळ पुरुषांना उपस्थित राहणे आवश्यक असले, तरी योसेफ आणि मरीया आपल्या कुटुंबातील इतरांसोबत दरवर्षी त्या सणांना उपस्थित राहायचे. (अनु. १६:१६; लूक २:४१) या आणि अशा इतर मार्गांनी या देवभीरू जोडप्याने यहोवाचे मन आनंदित करण्याचा प्रयत्न केला व आध्यात्मिक गोष्टींप्रती गाढ आदर दाखवला. त्यामुळे, येशू पृथ्वीवर असताना त्याच्या जीवनाच्या पहिल्या टप्प्यादरम्यान त्याचा सांभाळ करण्यासाठी यहोवाने त्यांची निवड केली होती याचे आपल्याला नवल वाटू नये.
१७, १८. (क) एक विवाहित जोडपे आपल्या कौटुंबिक जीवनात कशा प्रकारे आध्यात्मिक गोष्टींना पहिल्या स्थानी ठेवू शकते? (ख) यामुळे त्यांना कशा प्रकारे फायदा होईल?
१७ योसेफ व मरीया यांच्याप्रमाणेच तुम्हीदेखील आपल्या वैवाहिक जीवनात देवाच्या मार्गदर्शनाचे पालन करता का? उदाहरणार्थ, तुम्ही जीवनात महत्त्वाचे निर्णय घेता, तेव्हा त्याबाबतीत तुम्ही सर्वात आधी बायबलमधील तत्त्वांबद्दल संशोधन करता का? त्याविषयी प्रार्थना करता का? आणि मग एखाद्या प्रौढ ख्रिश्चनाचा सल्ला घेता का? की, तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबीयांना व मित्रांना जे योग्य वाटते त्यानुसार करण्याची तुमची प्रवृत्ती आहे? विवाह व कौटुंबिक जीवनाबद्दल विश्वासू व बुद्धिमान दासाने प्रकाशित केलेल्या अनेक व्यवहारोपयोगी सूचना आपल्या वैवाहिक जीवनात लागू करण्याचा तुम्ही प्रयत्न करता का? की, स्थानिक रीतिरिवाज किंवा जगात प्रचलित असलेल्या सल्ल्याचे तुम्ही पालन करता? तुम्ही पती-पत्नी नियमितपणे एकत्र प्रार्थना व अभ्यास करता का? तुम्ही आध्यात्मिक ध्येये ठेवता का, आणि कुटुंबासाठी सर्वात महत्त्वाच्या गोष्टी काय आहेत त्याबद्दल चर्चा करता का?
१८ आपल्या ५० वर्षांच्या सुखी संसाराबद्दल बोलताना रे नावाचे बंधू म्हणतात: “आमच्या वैवाहिक जीवनात जितक्या समस्या आल्या त्यांचा आम्ही यशस्वीपणे सामना करू शकलो, कारण आमच्या विवाहातील ‘तीनपदरी दोरीत’ यहोवादेखील होता.” (उपदेशक ४:१२ वाचा.) डॅनी आणि ट्रीना यांचेदेखील असेच म्हणणे आहे. ते म्हणतात: “एकत्र देवाची सेवा केल्यामुळे आमचं विवाहबंधन आणखी मजबूत झालं आहे.” आज त्यांच्या लग्नाला ३४ वर्षे झाली असून, ते खूप आनंदी आहेत. तुमच्या वैवाहिक जीवनात तुम्ही जर यहोवाला पहिले स्थान दिले, तर तो तुमचा विवाह यशस्वी होण्यास तुम्हाला मदत करेल आणि तुम्हाला भरपूर आशीर्वाद देईल.—स्तो. १२७:१.
देवाने दिलेल्या देणगीचा आदर करत राहा
१९. देवाने मानवांना विवाहाची देणगी का दिली?
१९ आज बहुतेक लोकांना केवळ आपल्या वैयक्तिक सुखाची सर्वात जास्त काळजी वाटते. पण, याबाबतीत देवाचे सेवक वेगळा दृष्टिकोन बाळगतात. त्यांना माहीत आहे की देवाने आपल्या उद्देशाची पूर्तता करण्यासाठी मानवांना विवाहाची देणगी दिली. (उत्प. १:२६-२८) आदाम आणि हव्वा यांनी जर त्या देणगीचा आदर केला असता, तर संपूर्ण पृथ्वी एक नंदनवन बनली असती व त्यात देवाचे सुखी व नीतिमान सेवक राहिले असते.
२०, २१. (क) विवाह पवित्र आहे असे आपण का मानले पाहिजे? (ख) पुढच्या आठवड्यात आपण कोणत्या देणगीबद्दल अभ्यास करणार आहोत?
२० सर्वात महत्त्वाचे म्हणजे, विवाहामुळे यहोवाच्या सेवकांना त्याचा गौरव करण्याची संधी मिळते या दृष्टिकोनातून ते विवाहाकडे पाहतात. (१ करिंथकर १०:३१ वाचा.) आपण आधीच पाहिल्याप्रमाणे, एकनिष्ठा, ऐक्य आणि आध्यात्मिकता या गुणांमुळे विवाहबंधन मजबूत होते. तेव्हा, आपण विवाहाची तयारी करत असू, विवाहबंधन मजबूत करण्याचा प्रयत्न करत असू किंवा विवाह वाचवण्याचा प्रयत्न करत असू, विवाह ही देवाने सुरू केलेली पवित्र संस्था आहे या दृष्टिकोनातून आपण विवाहाकडे पाहिले पाहिजे. विवाहाबद्दलचे हे सत्य नेहमी लक्षात ठेवल्यास, वैवाहिक जीवनात देवाच्या वचनाच्या आधारावर निर्णय घेण्यास आपल्याकडून होता होईल तितके प्रयत्न करण्याची आपल्याला प्रेरणा मिळेल. असे करण्याद्वारे आपण केवळ देवाने दिलेल्या विवाहाच्या देणगीचाच नव्हे, तर ती देणगी देणाऱ्या यहोवा देवाचाही आदर करू.
२१ अर्थातच, विवाह ही यहोवाने आपल्याला दिलेली एकमात्र देणगी नाही. आणि केवळ विवाहामुळेच आपण जीवनात सुखी होतो असे नाही. देवाने दिलेल्या आणखी एका मौल्यवान देणगीबद्दल आपण आपल्या पुढच्या लेखात पाहणार आहोत. ती म्हणजे, अविवाहित असण्याची देणगी.
तुमचे उत्तर काय असेल?
• विवाहित ख्रिस्ती जोडप्यांवर एकनिष्ठेचा कोणता प्रभाव पडला पाहिजे?
• पती-पत्नी ऐक्याने कार्य करतात तेव्हा विवाहबंधन मजबूत होते असे का म्हणता येईल?
• विवाहित जोडपे कोणकोणत्या मार्गांनी आध्यात्मिक मार्गदर्शन घेऊ शकतात?
• विवाहाची स्थापना करणाऱ्या यहोवा देवाबद्दल आपण आदर कसा दाखवू शकतो?
[अभ्यासाचे प्रश्न]
[१५ पानांवरील चित्रे]
सोबत मिळून कार्य केल्याने विवाहित जोडप्यांना ऐक्याने राहणे शक्य होते