परीक्षांमध्येसुद्धा यहोवाची सेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल आभारी
परीक्षांमध्येसुद्धा यहोवाची सेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल आभारी
मार्चे ड यॉन्ग-वॉन डेन हॉवल यांच्याद्वारे कथित
मी सध्या ९८ वर्षांची आहे. त्यांपैकी ७० वर्षं यहोवाची सेवा केल्याचा आनंद मला होतो. पण त्या ७० वर्षांच्या काळात माझ्या विश्वासाची कधी परीक्षाच झाली नाही असं नाही. दुसऱ्या महायुद्धादरम्यान मला एका छळ छावणीत डांबण्यात आलं. तिथं असताना एकदा मी इतकी निराश झाले होते की मी एक चुकीचा निर्णय घेऊन बसले, ज्याचा नंतर मला खूप पस्तावा झाला. काही वर्षांनंतर मला आणखी एका दुःखद परीक्षेला तोंड द्यावं लागलं. असं असलं, तरी परीक्षांमध्येसुद्धा यहोवाची सेवा करण्याची संधी मला मिळाल्याबद्दल मी त्याची खूप आभारी आहे.
सन १९४० च्या ऑक्टोबर महिन्यात माझं जीवन पार बदलून गेलं. मी नेदरलँड्झमधील ॲमस्टरडॅमच्या दक्षिणपूर्वेला २४ किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या हिल्वरसम या गावात राहत होते. त्या वेळी नेदरलँड्झ देश नात्झींच्या शासनाखाली होता. यॉप ड यॉन्ग यांच्याशी माझं लग्न होऊन पाच वर्षं झाली होती; माझे पती अतिशय प्रेमळ होते. आम्हाला विली नावाची तीन वर्षांची एक गोंडस मुलगी होती. आम्ही एका गरीब कुटुंबाच्या शेजारी राहत होतो. ते कुटुंब कसंबसं आपल्या आठ मुलामुलींचं संगोपन करत होतं. अशातच, आणखी एका तरुणाला आपल्या घरी आसरा देऊन ते त्याच्या खाण्यापिण्याचीही सोय करत होते. ‘इतकी हलाखीची परिस्थिती असताना, ते हा जास्तीचा भार का ओढवून घेत असतील?’ असा प्रश्न मला पडला. एकदा मी त्यांच्या घरी काही जेवण घेऊन गेले तेव्हा मला समजलं की तो तरुण एक पायनियर होता. त्यानं मला देवाच्या राज्याबद्दल आणि त्या राज्यात आपल्याला कोणकोणते आशीर्वाद मिळतील ते सांगितलं. ते सगळं ऐकून मी इतकी हेलावून गेले की मी लगेच सत्य स्वीकारलं. त्याच वर्षी मी यहोवाला माझं जीवन समर्पित करून बाप्तिस्मा घेतला. माझ्या बाप्तिस्म्याच्या एका वर्षांनंतर माझ्या पतीनंही सत्य स्वीकारून बाप्तिस्मा घेतला.
मला बायबलचं फारसं ज्ञान नसलं, तरी एक गोष्ट मला पक्की ठाऊक होती. ती म्हणजे, साक्षीदार बनल्यामुळे मी अशा एका संघटनेचा भाग बनले होते जिच्यावर बंदी घालण्यात आली होती. तसंच, राज्याच्या संदेशाचा प्रचार केल्यामुळे कितीतरी साक्षीदारांची तुरुंगात रवानगी करण्यात आली होती हेसुद्धा मला ठाऊक होतं. असं असलं, तरी मी लगेच घरोघरचं प्रचार कार्य करायला सुरुवात केली आणि पायनियर बंधुभगिनींना व प्रवासी पर्यवेक्षकांना आम्ही आमच्या घरी आश्रय दिला. त्यासोबतच, ॲमस्टरडॅमचे बंधुभगिनी जे बायबल साहित्य घेऊन यायचे ते साहित्यसुद्धा आमच्याच घरी लपवून ठेवलं जायचं. ते बंधुभगिनी आपल्या सायकलींवर भरमसाठ पुस्तकं ताडपत्रीनं झाकून आणायचे. अशा प्रकारे त्यांनी आपल्या बांधवांसाठी आपला जीव धोक्यात घातला होता. त्यांच्या प्रेमाची व धाडसाची खरोखर दाद दिली पाहिजे!—१ योहा. ३:१६.
“आई, तू लवकर येशील ना?”
माझा बाप्तिस्मा झाल्याच्या सहा महिन्यांनंतर तीन पोलीस अधिकारी आमच्या घरी आले. त्यांनी घरात शिरून घराची झडती घेतली. ज्या कपाटात साहित्य ठेवलं होतं ते त्यांना दिसलं नसलं, तरी आमच्या बिछान्याखाली लपवून ठेवलेली काही पुस्तकं त्यांना सापडली. त्यांनी लगेच मला त्यांच्यासोबत हिल्वरसमच्या पोलीस ठाण्यात येण्यास सांगितलं. जाण्याआधी माझ्या मुलीचा निरोप घेण्यासाठी मी तिला मायेनं जवळ घेतलं तेव्हा तिनं मला विचारलं, “आई, तू लवकर
येशील ना?” मी म्हटलं, “हो बाळा, आई लवकरच येईल.” पण, तिला पुन्हा आपल्या कवेत घेण्यासाठी मला तब्बल १८ महिने वाट पाहावी लागली. ते १८ महिने माझ्यासाठी फार कठीण होते.एका पोलीस अधिकाऱ्यानं माझी उलटतपासणी करण्यासाठी मला ट्रेननं ॲमस्टरडॅमला नेलं. माझी चौकशी करणाऱ्यांनी मला हिल्वरसमच्या तीन बांधवांना ओळखण्यास सांगितलं. मी म्हणाले: “मी फक्त एकालाच ओळखते. तो आमचा दूधवाला आहे.” आणि ते खरं होतं; तो बांधव खरंच आमच्या घरी दूध घालायचा. “पण तो यहोवाचा साक्षीदार आहे की नाही, ते त्यालाच विचारा,” असं मी म्हणाले. मी आणखी काही बोलण्याचं नाकारलं तेव्हा त्यांनी माझ्या थोबाडीत मारली आणि दोन महिन्यांपर्यंत मला एका कोठडीत डांबून ठेवलं. मी कुठं आहे याचा माझ्या पतीला पत्ता लागला तेव्हा ते माझ्यासाठी काही कपडे व खाण्यापिण्याच्या वस्तू घेऊन आले. मग, १९४१ च्या ऑगस्ट महिन्यात मला रावन्सब्रूक या छळ छावणीत हलवण्यात आलं. जर्मनीतील बर्लीनच्या उत्तरेकडे सुमारे ८० किलोमीटर अंतरावर असलेली ही छळ छावणी, स्त्रियांचा अमानुष छळ करण्यासाठी कुख्यात होती.
“धीर धर, सगळं ठीक होईल”
तिथं पोहचल्यावर आम्हाला असं सांगण्यात आलं, की आम्ही आमचा विश्वास त्याग करत आहोत असं लिहिलेल्या दस्तऐवजावर जर आम्ही सही केली तर आम्हाला सोडून दिलं जाईल. अर्थातच, मी तसं काही केलं नाही. त्यामुळे मला माझ्या सगळ्या वस्तू त्यांच्या हवाली कराव्या लागल्या आणि बाथरूममध्ये जाऊन मला माझे कपडे काढावे लागले. तिथंच मला नेदरलँड्झच्या काही ख्रिस्ती बहिणी भेटल्या. आम्हाला जांभळा त्रिकोण शिवलेले छावणीचे कपडे घालायला देण्यात आले. सोबतच एक ताट, पेला व चमचा देण्यात आला. पहिल्या रात्री आम्हाला तात्पुरत्या बराकींत ठेवण्यात आलं. माझी अटक झाली त्यानंतर पहिल्यांदाच मला रडू कोसळलं. “आता काय होणार? किती दिवस इथं राहावं लागणार?” या विचारानं मी रडू लागले. खरंतर, तोपर्यंत यहोवासोबत माझा नातेसंबंध इतका घनिष्ठ नव्हता, कारण केवळ काही महिन्यांपूर्वीच मी सत्य स्वीकारलं होतं. मला अजूनही खूप काही शिकायचं होतं. दुसऱ्या दिवशी हजेरीच्या वेळी एका डच बहिणीनं कदाचित माझा दुःखी चेहरा पाहिला असेल. ती मला म्हणाली: “धीर धर, सगळं ठीक होईल, ते आपलं काहीच वाईट करू शकणार नाहीत.”
हजेरी घेतल्यानंतर आम्हाला दुसऱ्या बराकींत घेऊन जाण्यात आलं. तिथं आम्हाला जर्मनी व नेदरलँड्झच्या अनेक ख्रिस्ती बहिणी भेटल्या. त्यांतल्या काही जर्मन बहिणी एका वर्षापेक्षा जास्त काळापासून तिथं राहत होत्या. त्यांच्या सहवासात मला बळ मिळालं—खरंच धीर मिळाला. आपल्या बहिणी राहत होत्या त्या बराकी, छावणीतल्या इतर बराकींपेक्षा किती स्वच्छ होत्या हे पाहूनही मी थक्क झाले. आमच्या बराकी केवळ स्वच्छच नव्हत्या, तर तिथं कधी चोरी, शिवीगाळ किंवा भांडणंही होत नव्हती. छावणीत आम्हाला अतिशय क्रूर वागणूक दिली जायची. पण, याच्या अगदी उलट आमच्या बराकी मात्र गलिच्छ समुद्राने वेढलेल्या स्वच्छ बेटासारख्या होत्या.
छावणीतलं दैनंदिन जीवन
छळ छावणीतलं जीवन म्हणजे खूप मेहनत करणं आणि कमी जेवणं. आम्हाला रोज पहाटे पाच वाजता उठावं लागायचं आणि काही वेळानंतर लगेच आमची हजेरी घेतली जायची. ऊन असो, पाऊस असो, छावणीचे रक्षक आम्हाला तासभर बाहेर उभं ठेवायचे. मग, दिवसभर ढोर मेहनत केल्यानंतर, नेहमीप्रमाणे संध्याकाळी पाच वाजता पुन्हा एकदा हजेरी घेतली जायची. त्यानंतर, आम्ही थोडं सूप व पाव खाऊन अगदी थकूनभागून झोपी जायचो.
रविवार सोडून इतर सर्व दिवस मी शेतात काम करायचे. शेतात मी विळ्यानं गव्हाची कापणी करायचे, नाले खोदायचे किंवा डुकरांची खुराडी साफ करायचे. काम खूप मेहनतीचं व घाणेरडं होतं; पण, मी अजूनही तरुण आणि दणकट
असल्यामुळे मला ते काम जमत होतं. तसंच, काम करता करता बायबलच्या संदेशावर आधारित गाणी गाऊन मी स्वतःला बळ देत असे. तरीसुद्धा, मला राहून राहून माझ्या पतीची व लेकराची आठवण यायची.आम्हाला खूप कमी जेवण मिळायचं. पण, आम्ही सर्व बहिणी त्यातला एक तुकडा दररोज वाचवून ठेवायचो आणि रविवारच्या दिवशी बायबलच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी आम्ही एकत्र यायचो तेव्हा ते वाचवून ठेवलेलं जेवण वाटून खायचो. आमच्याजवळ काहीच बायबल साहित्य नव्हतं, पण वयोवृद्ध जर्मन बहिणी आध्यात्मिक विषयांवर चर्चा करायचे, तेव्हा मी उत्सुकतेनं ती चर्चा ऐकायचे. छळ छावणीत आम्ही ख्रिस्ताच्या मृत्यूचा स्मारक विधीदेखील साजरा केला.
मनस्ताप, पस्तावा आणि उत्तेजन
काही वेळा, आम्हाला असं काम करायला सांगितलं जायचं ज्याचा थेट संबंध नात्झींच्या युद्धाशी असायचा. राजकीय गोष्टींच्या बाबतीत तटस्थ भूमिका राखण्यासाठी सर्व बहिणींनी ते काम करण्यास नकार दिला, आणि मीही त्यांच्या धाडसी उदाहरणाचं अनुकरण केलं. त्यासाठी शिक्षा म्हणून आम्हाला कितीतरी दिवस उपाशी ठेवलं जायचं व हजेरीच्या वेळी तासन् तास बाहेर ताटकळत उभं केलं जायचं. हिवाळ्याच्या दिवसांत एकदा आम्हाला, उबेची काहीएक सोय नसलेल्या बराकीत ४० दिवस कोंडून ठेवण्यात आलं.
यहोवाचे साक्षीदार असल्यामुळे आम्हाला वारंवार एक गोष्ट सांगितली जायची. ती म्हणजे, आम्ही आमचा विश्वास त्याग करत आहोत असं लिहिलेल्या दस्तऐवजावर आम्ही सही केली, तर आम्हाला सोडून दिलं जाईल आणि आम्ही आपापल्या घरी जाऊ शकतो. एका वर्षाहून अधिक काळ रावन्सब्रूकमध्ये राहिल्यानंतर मी खूप खचून गेले होते. माझ्या पतीला व मुलीला भेटण्याची मला इतकी अनावर इच्छा झाली, की मी छावणीच्या रक्षकांकडे गेले आणि इथूनपुढे मी एक बायबल विद्यार्थी राहणार नाही असं जाहीर करणारा फॉर्म त्यांच्याकडून मागून घेतला व त्यावर सही केली.
मी काय केलं होतं हे इतर बहिणींना समजलं तेव्हा काही जणी मला टाळू लागल्या. पण, हेटविक आणि गरट्रूट नावाच्या दोन वयस्कर जर्मन बहिणी माझ्याजवळ आल्या आणि त्यांचं अजूनही माझ्यावर प्रेम असल्याचं त्यांनी मला आश्वासन दिलं. डुकरांच्या खुराड्यांमध्ये एकत्र काम करताना त्यांनी मला यहोवाशी एकनिष्ठ राहणं किती महत्त्वाचं आहे आणि आपण कोणतीही तडजोड करत नाही तेव्हा आपण त्याच्यावरील आपलं प्रेम कसं दाखवून देतो ते त्यांनी मला सांगितलं. त्यांच्या अतीव मायेमुळे व प्रेमामुळे मी फार हेलावून गेले. * मी जे काही केलं होतं ते चुकीचं आहे हे मला माहीत होतं. त्यामुळे, मी सही केलेला जाहीरनामा मला रद्द करायचा होता. एके दिवशी संध्याकाळी, जाहीरनामा रद्द करण्याचा माझा विचार मी एका बहिणीजवळ बोलून दाखवला. छावणीच्या एका अधिकाऱ्यानं कदाचित आमचं बोलणं ऐकलं असावं, कारण त्याच दिवशी संध्याकाळी अचानक माझी छावणीतून सुटका करण्यात आली आणि मला एका ट्रेननं पुन्हा नेदरलँड्झला पाठवण्यात आलं. तिथल्या एका महिला अधिकारीचा चेहरा मला अजूनही आठवतो. ती मला म्हणाली: “तू अजूनही एक बीबलफोर्शर (बायबल विद्यार्थी) आहेस आणि नेहमीच राहशील.” मी तिला म्हणाले: “हो, यहोवाची इच्छा असल्यास मी नेहमी एक बायबल विद्यार्थी राहीन.” तरीसुद्धा, ‘तो जाहीरनामा रद्द कसा करता येईल?’ हा विचार मला भेडसावत राहिला.
जाहीरनाम्यातला एक मुद्दा असा होता: “यावरून मी हे निश्चयपूर्वक सांगते, की मी पुन्हा कधीच आंतरराष्ट्रीय बायबल विद्यार्थ्यांच्या संस्थेसाठी कार्य करणार नाही.” आता काय करायचं ते मला माहीत होतं! १९४३ च्या जानेवारी महिन्यात घरी परतल्यानंतर, मी लगेच पुन्हा एकदा प्रचार कार्य करू लागले. अर्थातच, देवाच्या राज्याबद्दल प्रचार करताना नात्झी अधिकाऱ्यांनी जर मला दुसऱ्यांदा पकडलं असतं, तर मला खूप कडक शिक्षा झाली असती.
मला यहोवाची एक निष्ठावान सेवक बनण्याची मनस्वी इच्छा आहे हे त्याला आणखी चांगल्या प्रकारे दाखवण्यासाठी मी आणि माझ्या पतीनं बायबल साहित्य घेऊन येणाऱ्या बांधवांना व प्रवासी पर्यवेक्षकांना पुन्हा एकदा आमच्या घरात आश्रय दिला. यहोवावर व त्याच्या लोकांवर माझं प्रेम आहे हे सिद्ध करण्याची आणखी एक संधी मिळाल्याबद्दल मी किती आभारी होते!
एक दुःखद प्रसंग
युद्ध संपण्याच्या काही महिन्यांपूर्वी, मी आणि माझे पती एका अतिशय दुःखद प्रसंगाला सामोरे गेलो. १९४४ च्या ऑक्टोबर महिन्यात आमची मुलगी विली एकाएकी आजारी पडली. तिला घटसर्प झाला होता. तिची तब्येत झपाट्यानं
ढासळत गेली आणि तीनच दिवसांनंतर तिचा मृत्यू झाला. ती अवघी सात वर्षांची होती.आमच्या एकुलत्या एका लेकराच्या मृत्यूमुळे आम्हाला जबरदस्त धक्का बसला होता. खरंतर, आमच्या लेकराचा मृत्यू झाला तेव्हा मी इतकी दुःखी झाले होते की त्या दुःखापुढे मी रावन्सब्रूकमध्ये सोसलेल्या परीक्षा काहीच नव्हत्या. पण, आमच्या दुःखाच्या काळात आम्ही नेहमी स्तोत्र १६:८ या वचनातील शब्दांतून दिलासा मिळवला: “मी आपल्यापुढे परमेश्वराला नित्य ठेविले आहे; तो माझ्या उजवीकडे आहे, म्हणून मी ढळणार नाही.” पुनरुत्थानाबद्दल यहोवानं दिलेल्या अभिवचनावर माझा व माझ्या पतीचा पक्का विश्वास होता. आम्ही सत्यात टिकून राहिलो आणि नेहमी आवेशाने सुवार्तेचा प्रचार करत राहिलो. १९६९ मध्ये माझ्या पतीचा मृत्यू झाला तोपर्यंत त्यांनी मला कृतज्ञ भावनेनं यहोवाची सेवा करण्यास खऱ्या अर्थानं मदत केली.
आशीर्वाद आणि आनंद
गेल्या अनेक दशकांदरम्यान, पूर्ण-वेळच्या सेवकांचा सहवास हा नेहमीच माझ्यासाठी आनंदाचा एक मोठा स्रोत राहिला आहे. युद्धाच्या काळादरम्यान आम्ही केलं होतं, त्याचप्रमाणे आतासुद्धा आमच्या मंडळीला भेट देणाऱ्या कितीतरी प्रवासी पर्यवेक्षकांना व त्यांच्या पत्नींना आम्ही आमच्या घरात आश्रय दिला. प्रवासी कार्य करणारे मार्टन व नेल काप्टाइन नावाचे एक दांपत्य तर १३ वर्षं आमच्या घरात राहिले! नेलला अतिशय गंभीर स्वरूपाचा आजार झाला तेव्हा मला तीन महिने म्हणजे तिच्या मृत्यूपर्यंत आमच्याच घरात तिची देखभाल करण्याची संधी मिळाली. त्यांच्या व प्रिय स्थानिक बंधुभगिनींच्या सहवासामुळेच, आपण सध्या राहत असलेल्या आध्यात्मिक नंदनवनाचा आनंद घेण्यास मला मदत मिळाली.
सन १९९५ मध्ये माझ्या जीवनात एक अविस्मरणीय घटना घडली. त्या वर्षी, रावन्सब्रूक छळ छावणीत यातना सोसलेल्या लोकांना एका संस्मरण कार्यक्रमाचं आमंत्रण देण्यात आलं होतं. त्यांपैकी मीदेखील एक होते. छळ छावणीत मी ज्या बहिणींबरोबर राहिले होते आणि ज्यांना मी ५० हून अधिक वर्षं पाहिलं नव्हतं त्या बहिणी मला तिथं भेटल्या! पुन्हा एकदा त्यांना भेटणं हा माझ्यासाठी एक अविस्मरणीय व हृदयस्पर्शी अनुभव होता. तसंच, आपले मृत प्रियजन पुन्हा जिवंत होतील त्या दिवसाची वाट पाहत राहण्यास एकमेकांना उत्तेजन देण्याचीही ती एक उत्तम संधी होती.
प्रेषित पौल रोमकर १५:४ मध्ये म्हणतो, की “धीराच्या व शास्त्रापासून मिळणाऱ्या उत्तेजनाच्या योगे आपण आशा धरावी.” यहोवानं आपल्याला ही आशा दिल्याबद्दल मी त्याची आभारी आहे. त्या आशेमुळेच परीक्षांमध्येसुद्धा त्याची सेवा करत राहणं मला शक्य झालं.
[तळटीप]
^ त्या काळात मुख्यालयाशी संपर्क तुटल्यामुळे, बांधव तटस्थतेशी संबंधित बाबी हाताळण्याचा आपापल्या परीने शक्य तितका प्रयत्न करत होते. त्यामुळे, या विषयाकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा होता.
[१० पानांवरील चित्र]
सन १९३० मध्ये यॉपसोबत
[१० पानांवरील चित्र]
आमची मुलगी विली, सात वर्षांची असताना
[१२ पानांवरील चित्र]
सन १९९५ मध्ये पुनर्मिलनाच्या एका आनंददायक प्रसंगाला मी उपस्थित राहिले. मी समोरच्या रांगेत आहे, डावीकडून दुसरी