प्रलोभनांचा प्रतिकार करण्यास व निराशेवर मात करण्यास समर्थ केलेले
प्रलोभनांचा प्रतिकार करण्यास व निराशेवर मात करण्यास समर्थ केलेले
“पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल.” —प्रे. कृत्ये १:८.
१, २. येशूने आपल्या शिष्यांना कोणत्या मदतीचे अभिवचन दिले आणि या मदतीची त्यांना गरज का पडणार होती?
येशूला याची जाणीव होती, की त्याचे शिष्य स्वतःच्या बळावर त्याच्या आज्ञांचे पालन करू शकणार नाहीत. त्यांच्या प्रचार कार्याचा आवाका, विरोधकांचे बळ आणि मानवी शरीराची दुर्बलता लक्षात घेता हे स्पष्टच होते की त्यांना अलौकिक शक्तीची गरज होती. म्हणूनच, येशूने आपले स्वर्गारोहण होण्याच्या काही वेळाआधी आपल्या शिष्यांना असे आश्वासन दिले: “पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल, आणि यरुशलेमेत, सर्व यहूदीयात, शोमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल.”—प्रे. कृत्ये १:८.
२ या अभिवचनाची पूर्णता, इ.स. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या दिवसापासून होऊ लागली. त्या दिवशी पवित्र आत्म्याने, येशू ख्रिस्ताच्या अनुयायांना संपूर्ण जेरूसलेममध्ये आपले प्रचार कार्य करण्याचे सामर्थ्य दिले. ते कार्य करण्यापासून कोणताही विरोध त्यांना रोखू शकत नव्हता. (प्रे. कृत्ये ४:२०) देवाकडून मिळणाऱ्या त्याच सामर्थ्याची, येशूच्या सर्व विश्वासू अनुयायांना—ज्यात आपलाही समावेश होतो—‘युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस’ नितान्त गरज पडेल.—मत्त. २८:२०.
३. (क) पवित्र आत्मा आणि सामर्थ्य यांतील फरक सांगा. (ख) देवाकडून मिळणारे सामर्थ्य आपल्याला काय करण्यास मदत करू शकते?
३ येशूने आपल्या शिष्यांना असे अभिवचन दिले, की ‘पवित्र आत्मा त्यांच्यावर येईल तेव्हा त्यांना सामर्थ्य प्राप्त होईल.’ “आत्मा” आणि “सामर्थ्य” हे भिन्न अर्थाचे शब्द आहेत. देवाचा आत्मा, त्याची क्रियाशील शक्ती म्हणजे देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी लोकांवर किंवा वस्तूंवर प्रक्षेपित केलेली किंवा कार्य करत असलेली शक्ती. दुसरीकडे पाहता, सामर्थ्य या शब्दाची व्याख्या, “एखादे कार्य किंवा परिणाम घडवून आणण्याची क्षमता” अशी केली जाऊ शकते. इच्छित परिणाम घडवून आणण्यासाठी आवश्यक असलेले हे सामर्थ्य किंवा शक्ती एखाद्या व्यक्तीमध्ये किंवा वस्तूमध्ये सुप्त अवस्थेत राहू शकते. तर मग, पवित्र आत्म्याची तुलना, रिचार्ज करता येण्याजोग्या बॅटरीत उर्जा उत्पन्न करणाऱ्या विद्युत प्रवाहाशी केली जाऊ शकते; तर सामर्थ्य हे फारसे, बॅटरीत साठवलेल्या सुप्त उर्जेसारखे आहे. यहोवा पवित्र आत्म्याद्वारे आपल्या सेवकांना जे सामर्थ्य देतो त्यामुळे आपल्या प्रत्येकाला आपले ख्रिस्ती समर्पण पूर्ण करण्याची आणि गरज पडल्यास, आपल्यावर मारा करणाऱ्या नकारात्मक प्रभावांचा प्रतिकार करण्याची क्षमता प्राप्त होते.—मीखा ३:८; कलस्सैकर १:२९ वाचा.
४. या लेखात आपण कशाची चर्चा करणार आहोत, आणि का?
४ आपल्याला पवित्र आत्म्याद्वारे सामर्थ्य मिळते हे कशावरून दिसून येते? पवित्र आत्मा, आपल्याला निरनिराळ्या परिस्थितीत कशा प्रकारे वागण्यास किंवा प्रतिक्रिया दाखवण्यास प्रवृत्त करू शकतो? आपण विश्वासूपणे देवाची सेवा करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्यासमोर अनेक समस्या येतात. या समस्या एकतर सैतानामुळे, त्याच्या दुष्ट जगामुळे किंवा आपल्या अपरिपूर्ण स्थितीमुळे आपल्यावर येतात. ख्रिस्ती या नात्याने चिकाटीने देवाची सेवा करत राहण्यासाठी, नियमितपणे सेवाकार्यात सहभाग घेण्यासाठी आणि यहोवासोबतचा घनिष्ठ नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी या समस्यांवर मात करणे महत्त्वाचे आहे. पवित्र आत्मा कशा प्रकारे आपल्याला प्रलोभनांचा प्रतिकार करण्यास आणि थकव्यावर व निराशेवर मात करण्यास मदत करू शकतो ते आता आपण पाहू या.
प्रलोभनांचा प्रतिकार करण्यास समर्थ केलेले
५. प्रार्थना कशा प्रकारे आपल्याला सामर्थ्यवान करू शकते?
५ येशूने आपल्या अनुयायांना अशी प्रार्थना करण्यास शिकवले: “आम्हास परीक्षेत आणू नको; तर आम्हास वाइटापासून सोडीव.” (मत्त. ६:१३) अशी विनंती करणाऱ्या आपल्या विश्वासू सेवकांचा यहोवा कधीच त्याग करणार नाही. आणखी एका प्रसंगी येशूने असे म्हटले की, ‘स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यांस तो विशेषेकरून पवित्र आत्मा देईल.’ (लूक ११:१३) जीवनात योग्य ते करण्यासाठी यहोवा आपल्याला ही शक्ती देण्याचे अभिवचन देतो ही किती दिलासा देणारी गोष्ट आहे! पण याचा अर्थ, यहोवा आपल्यावर येणारी प्रलोभने रोखेल असा नाही. (१ करिंथ. १०:१३) पण, आपल्यावर प्रलोभने येतात तेव्हाच खरेतर आपण आणखी कळकळीने प्रार्थना केली पाहिजे.—मत्त. २६:४२.
६. सैतानाने आणलेल्या प्रलोभनांना येशूने कशाच्या आधारे प्रत्युत्तर दिले?
६ दियाबलाने येशूवर प्रलोभने आणली तेव्हा त्याला प्रत्युत्तर देताना येशूने शास्त्रवचनांचा उल्लेख केला. येशूने दियाबलाला म्हटले: “असा शास्त्रलेख आहे . . . आणखी असा शास्त्रलेख आहे की . . . अरे सैताना, चालता हो, कारण असा शास्त्रलेख आहे की, ‘परमेश्वर तुझा देव ह्याला नमन कर, व केवळ त्याचीच उपासना कर.’” यावरून दिसून येते, की दियाबलाला प्रत्युत्तर देताना येशूच्या मनात देवाचे वचन अगदी सुस्पष्ट होते. यहोवाबद्दल व त्याच्या वचनाबद्दल येशूला असलेल्या प्रेमानेच त्याला परीक्षकाकडून म्हणजे सैतानाकडून आलेल्या मोहांचा प्रतिकार करण्यास प्रवृत्त केले. (मत्त. ४:१-१०) येशूने प्रलोभनांचा वारंवार प्रतिकार केल्यानंतर सैतान त्याला सोडून गेला.
७. बायबल कशा प्रकारे आपल्याला प्रलोभनांचा प्रतिकार करण्यास मदत करते?
७ दियाबलाच्या प्रलोभनांचा प्रतिकार करण्यासाठी येशूला शास्त्रवचनांचा आधार घ्यावा लागला, तर आपण किती जास्त घेतला पाहिजे! होय, दियाबलाचा व त्याच्या प्रतिनिधींचा प्रतिकार करण्यासाठी सर्वात प्रथम आपण देवाचे स्तर जाणून घेण्याचा आणि त्यांचे काटेकोरपणे पालन करण्याचा दृढसंकल्प केला पाहिजे. अनेकांना शास्त्रवचनांचा अभ्यास केल्यामुळे आणि देवाच्या बुद्धीचे व नीतिमत्तेचे महत्त्व समजल्यामुळे बायबलच्या स्तरांनुसार जीवन जगण्याची प्रेरणा मिळाली आहे. होय, देवाच्या वचनात असे सामर्थ्य आहे जे आपल्या “मनातील विचार व हेतु” समजण्यास आपल्याला समर्थ करते. (इब्री ४:१२) एक व्यक्ती जितके अधिक शास्त्रवचनांचे वाचन करते व त्यावर मनन करते तितका अधिक तिला यहोवाच्या ‘सत्याचा उमज पडू’ शकतो. (दानी. ९:१३) तेव्हा, आपल्या विशिष्ट दुर्बलतांशी संबंधित असलेल्या शास्त्रवचनांवर आपण मनन केले पाहिजे.
८. आपण कोणकोणत्या मार्गांनी पवित्र आत्मा मिळवू शकतो?
८ येशूला शास्त्रवचनांची चांगली माहिती होती व तो ‘पवित्र आत्म्याने परिपूर्णदेखील’ होता. त्यामुळे तो प्रलोभनांचा प्रतिकार करू शकला. (लूक ४:१) आपल्यालासुद्धा तेच सामर्थ्य व क्षमता मिळवायची असल्यास आपण यहोवाशी जवळचा नातेसंबंध जोडणे जरुरीचे आहे. असे करण्यासाठी, त्याने त्याच्या आत्म्याद्वारे पुरवलेल्या सर्व तरतुदींचा, जसे की बायबल अभ्यास, प्रार्थना आणि बंधुभगिनींचा सहवास यांचा आपण पुरेपूर फायदा घेतला पाहिजे. (याको. ४:७, ८) अनेकांनी ख्रिस्ती कार्यांत व्यस्त राहिल्याचे फायदेही अनुभवले आहेत. या कार्यांमुळे त्यांना आध्यात्मिक रीत्या उभारणीकारक असलेल्या विचारांवर आपले मन केंद्रित करण्यास मदत मिळते.
९, १०. (क) तुम्ही राहता त्या भागात सर्वसामान्यपणे कोणती प्रलोभने पाहायला मिळतात? (ख) तुम्हाला थकून गेल्यासारखे वाटते तेव्हासुद्धा मनन व प्रार्थना केल्यामुळे प्रलोभनांचा प्रतिकार करण्याचे सामर्थ्य तुम्हाला कसे मिळू शकते?
९ तुम्हाला कोणत्या प्रकारच्या प्रलोभनांचा प्रतिकार करावा लागतो? तुमचा विवाहसोबती नसलेल्या व्यक्तीशी प्रणयचेष्टा (फ्लर्टिंग) करण्याचा मोह कधी तुम्हाला झाला आहे का? तुमचे लग्न झालेले नसेल, तर सत्यात नसलेल्या एखाद्या व्यक्तीबरोबर डेटवर जाण्याचा (एकांतात भेटण्याचा) अनावर मोह कधी तुम्हाला झाला आहे का? टीव्ही पाहताना किंवा इंटरनेटचा वापर करताना ख्रिश्चनांना अचानक काहीतरी अश्लील पाहण्याचा मोह होऊ शकतो. असे कधी तुमच्याबाबतीत घडले का? घडल्यास, तुमची प्रतिक्रिया काय होती? चुकीचे एक पाऊल उचलल्यामुळे एकापाठोपाठ एक अशा अनेक चुका होऊन शेवटी गंभीर अपराध कसा होऊ शकतो याचा गांभीर्याने विचार करणे सुज्ञपणाचे ठरेल. (याको. १:१४, १५) तुम्ही एखादा गंभीर अपराध केल्यास यहोवाचे, मंडळीतील बंधुभगिनींचे आणि आपल्या कुटुंबीयांचे मन किती दुखावेल याचा विचार करा. याउलट, देवाच्या तत्त्वांचे एकनिष्ठपणे पालन केल्यामुळे तुमचा विवेक शुद्ध राहील. (स्तोत्र ११९:३७; नीतिसूत्रे २२:३ वाचा.) अशा प्रकारच्या परीक्षा तुमच्यासमोर येतात तेव्हा त्यांचा प्रतिकार करण्याचे सामर्थ्य देवाने तुम्हाला द्यावे म्हणून त्याला प्रार्थना करण्याचा निर्धार करा.
१० दियाबलाच्या प्रलोभानांसंबंधी आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. येशूने अरण्यात ४० दिवस उपास केल्यानंतर सैतानाने त्याची परीक्षा घेतली. येशूच्या सचोटीची परीक्षा घेण्याची हीच योग्य “संधि” आहे असा विचार दियाबलाने केला असावा यात शंका नाही. (लूक ४:१३) आपल्या सचोटीची परीक्षा घेण्यासाठीदेखील सैतान योग्य संधीची वाट पाहतो. तेव्हा, आपण स्वतःला आध्यात्मिक रीत्या सुदृढ ठेवणे खूप जरुरीचे आहे. आपली शिकार सगळ्यात दुर्बल अवस्थेत असल्याचे सैतान पाहतो तेव्हाच तो सहसा हल्ला करतो. त्यामुळे, ज्या ज्या वेळी आपल्याला थकून गेल्यासारखे किंवा निराश झाल्यासारखे वाटते, त्या त्या वेळी यहोवाकडे आपल्या संरक्षणासाठी व त्याच्या पवित्र आत्म्याच्या साहाय्यासाठी विनंती करण्यास आपण पूर्वीपेक्षा अधिक निश्चयी असले पाहिजे.—२ करिंथ. १२:८-१०.
थकव्यावर व निराशेवर मात करण्यास समर्थ केलेले
११, १२. (क) आज अनेक जण निराश का होतात? (ख) निराशेचा प्रतिकार करण्याचे सामर्थ्य आपल्याला कसे मिळू शकते?
११ अपरिपूर्ण असल्यामुळे आपण अधूनमधून निराश होतो. ही गोष्ट खासकरून आजच्या काळात खरी असू शकते, कारण आपण सध्या ज्या काळात जगत आहोत तो प्रचंड ताणतणावाचा काळ आहे. आपण कदाचित, मानवजातीने आजवर अनुभवलेल्या सगळ्यात खडतर अशा काळातून वाटचाल करत आहोत. (२ तीम. ३:१-५) जसजसे हर्मगिदोन जवळ येत आहे तसतसे आर्थिक, भावनिक आणि इतर स्वरूपाचे दबाव झपाट्याने वाढत आहेत. तेव्हा, काहींना आपल्या कुटुंबाचा सांभाळ व उदरनिर्वाह करणे अधिकाधिक कठीण वाटते याचे आपल्याला आश्चर्य वाटू नये. ते थकतात, भारावून जातात, त्यांची दमछाक होते व ते अगदीच गळून जातात. तुम्हालाही असे वाटत असल्यास, अशा दबावांचा सामना तुम्ही कसा करू शकता?
१२ येशूने आपल्या शिष्यांना एक साहाय्यक अर्थात देवाचा पवित्र आत्मा देण्याचे आश्वासन दिले होते हे आठवा. (योहान १४:१६, १७ वाचा.) पवित्र आत्मा, विश्वातील सगळ्यात सामर्थ्यशाली शक्ती आहे. या शक्तीद्वारे यहोवा, कोणत्याही परीक्षेत टिकून राहण्यास आवश्यक असलेले सामर्थ्य आपल्याला “अधिक्याने” देऊ शकतो. (इफिस. ३:२०) “आम्हावर चोहोकडून संकटे आली तरी” त्या शक्तीवर विसंबून राहिल्यामुळे आपल्याला ‘पराकोटीचे सामर्थ्य’ प्राप्त होते असे प्रेषित पौलाने म्हटले. (२ करिंथ. ४:७, ८) यहोवा आपल्या जीवनातून तणाव नाहीसा करण्याचे वचन देत नाही. पण, तणावाचा सामना करण्यासाठी आपल्याला हवे असलेले सामर्थ्य आपल्या आत्म्याद्वारे देण्याचे आश्वासन तो नक्कीच देतो.—फिलिप्पै. ४:१३.
१३. (क) एका तरुण व्यक्तीला आपल्या कठीण परिस्थितीवर मात करण्याचे सामर्थ्य कसे मिळाले? (ख) अशी काही उदाहरणे तुम्हाला माहीत आहेत का?
१३ स्टेफनी नावाच्या एका १९ वर्षीय सामान्य पायनियर बहिणीचे उदाहरण विचारात घ्या. ती १२ वर्षांची असताना तिला पक्षाघात झाला व तिच्या मेंदूत एक गाठ असल्याचे निदान करण्यात आले. त्यानंतर तिच्यावर दोन वेळा शस्त्रक्रिया करण्यात आली, तिला रेडिएशनचा उपचार देण्यात आला आणि आणखी दोन वेळा तिला पक्षाघात झाला. यामुळे तिच्या शरीराच्या डाव्या बाजूच्या हालचालींवर मर्यादा आल्या व तिची दृष्टीही कमजोर झाली. स्टेफनीला ख्रिस्ती सभा व क्षेत्र सेवा या गोष्टी अधिक महत्त्वपूर्ण वाटतात. त्यामुळे या गोष्टींसाठी तिला आपली शक्ती राखून ठेवावी लागते. असे असले, तरी यहोवाचा आत्मा अनेक मार्गांनी आपल्याला सहन करण्याची शक्ती देत असल्याचे तिला जाणवते. ती निराश होते तेव्हा बायबल आधारित प्रकाशनांतील बंधुभगिनींचे अनुभव वाचून तिच्या मनाला उभारी मिळते. बंधुभगिनींनी तिला पत्रे लिहिण्याद्वारे किंवा सभांच्या आधी व नंतर तिच्याशी उत्तेजनपर शब्द बोलण्याद्वारे तिला बळ दिले आहे. आस्थेवाईक लोकांनीही, बायबलचा अभ्यास करण्यासाठी स्वतः स्टेफनीच्या घरी जाऊन ती शिकवत असलेल्या गोष्टींबद्दल कदर दाखवली आहे. या सगळ्याबद्दल आपण यहोवाचे खूप खूप ऋणी आहोत असे स्टेफनीला वाटते. तिचे आवडते शास्त्रवचन स्तोत्र ४१:३ असून हे वचन तिच्या बाबतीत अगदी खरे ठरले आहे असे ती मानते.
१४. आपण निराश होतो तेव्हा काय करण्याचे टाळले पाहिजे आणि का?
१४ आपण थकून जातो किंवा दबावाखाली असतो तेव्हा आपल्या आध्यात्मिक कार्यांत काट-छाट करून आपण तणावाचा सामना करू शकतो असा तर्क आपण केव्हाही करू नये. असे करून आपण खूप मोठी चूक करत असू. का? कारण वैयक्तिक व कौटुंबिक बायबल अभ्यास, क्षेत्र सेवा आणि ख्रिस्ती सभा यांद्वारेच आपल्याला नवचैतन्य देणारा पवित्र आत्मा मिळत असतो. ख्रिस्ती कार्ये नेहमीच तजेला देणारी असतात. (मत्तय ११:२८, २९ वाचा.) कितीतरी वेळा असे पाहायला मिळते की आपले बंधुभगिनी अगदी थकूनभागून सभांना आलेले असतात, पण सभा संपल्यानंतर घरी जाण्याची वेळ येते तेव्हा जणू त्यांना आपली आध्यात्मिक बॅटरी रिचार्ज झाल्यासारखी अर्थात नवचैतन्य प्राप्त झाल्यासारखे वाटते!
१५. (क) एका ख्रिस्ती व्यक्तीचे जीवन अगदी आरामदायी असेल असे अभिवचन यहोवा देतो का? बायबलच्या आधारे स्पष्टीकरण द्या. (ख) यहोवा आपल्याला कोणते अभिवचन देतो आणि त्यामुळे कोणता प्रश्न निर्माण होतो?
१५ पण याचा अर्थ, ख्रिस्ताचे अनुयायी या नात्याने आपली जबाबदारी हलकी आहे असे नाही. एक विश्वासू ख्रिस्ती असण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. (मत्त. १६:२४-२६; लूक १३:२४) असे असले, तरी यहोवा आपल्या पवित्र आत्म्याद्वारे थकलेल्यांना सामर्थ्य देऊ शकतो. यशया संदेष्ट्याने लिहिले: “परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ति संपादन करितील; ते गरुडांप्रमाणे पंखांनी वर उडतील; ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत.” (यश. ४०:२९-३१) त्यामुळे आपण स्वतःला विचारले पाहिजे, की मुळात कशामुळे आपल्याला आपली ख्रिस्ती कार्ये थकवून टाकणारी वाटतात?
१६. थकव्याची व निराशेची संभाव्य कारणे दूर करण्यासाठी आपण काय करू शकतो?
१६ यहोवाचे वचन आपल्याला असा आर्जव करते, की जे अधिक महत्त्वाचे आहे ते आपण पसंत करावे. (फिलिप्पै. १:१०) ख्रिस्ती जीवनाची तुलना एका दीर्घ पल्ल्याच्या धावण्याच्या शर्यतीशी करत प्रेषित पौलाने पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने असा सल्ला दिला: “आपणहि सर्व भार . . . टाकून, आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे.” (इब्री १२:१) त्याच्या म्हणण्याचा अर्थ असा होता, की आपल्याला थकवून टाकेल असा अनावश्यक भार आपण टाळला पाहिजे. दुसऱ्या शब्दांत, आपण अनावश्यक गोष्टींचा पाठलाग करण्याचे टाळले पाहिजे. आपल्यापैकी काही जण कदाचित, आधीच व्यस्त असलेल्या जीवनात आणखीही खूप काही साध्य करण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतील. म्हणून, तुम्हाला जर नेहमीच थकून गेल्यासारखे किंवा दबावाखाली असल्याचे जाणवत असेल, तर प्रापंचिक नोकरीसाठी तुम्ही किती वेळ देता, सुटी घालवण्यासाठी तुम्ही कितीदा प्रवास करता व खेळक्रीडेसाठी किंवा इतर विरंगुळ्याच्या गोष्टींसाठी तुम्ही किती वेळ खर्च करता याचा आढावा घेतल्याने तुम्हाला फायदा होऊ शकतो. समजबुद्धी व नम्रता बाळगल्यास आपण आपल्या मर्यादा ओळखू व अनावश्यक गोष्टींत कमीतकमी वेळ खर्च करू.
१७. काही जण कशामुळे निराश होतात, पण याबाबतीत यहोवा आपल्याला कोणते आश्वासन देतो?
१७ या दुष्ट जगाचा अंत आपल्या अपेक्षेप्रमाणे लवकर झाला नाही या कारणामुळेसुद्धा आपल्यापैकी काही जण कदाचित निराश होत असतील. (नीति. १३:१२) पण, ज्यांना असे वाटते ते हबक्कूक २:३ मधील शब्दांमधून सांत्वन मिळवू शकतात, जे म्हणते: “हा दृष्टांत नेमिलेल्या समयासाठी आहे आणि तो शेवटास जाण्यास आपणच नेट करीत आहे, तो फसवावयाचा नाही; त्यास विलंब लागला तरी त्याची वाट पाहा; तो येईलच, त्याला विलंब लागावयाचा नाही.” होय, खुद्द यहोवा आपल्याला आश्वासन देतो, की या दुष्ट जगाचा अंत अगदी ठरलेल्या वेळी येईल!
१८. (क) तुम्हाला कोणत्या अभिवचनांमुळे सामर्थ्य मिळते? (ख) पुढील लेख कोणत्या अर्थी आपल्याला फायदेकारक ठरेल?
१८ खरेच, यहोवाचे सर्व विश्वासू सेवक मोठ्या आतुरतेने त्या दिवसाची वाट पाहत आहेत जेव्हा थकवा व निराशा या गोष्टी कायमच्या नाहीशा होतील आणि सर्वांना ‘तारुण्याचे दिवस पुन्हा प्राप्त होतील.’ (ईयो. ३३:२५) किंबहुना, आजसुद्धा आपण उत्साहवर्धक आध्यात्मिक कार्यांत हिरिरीने सहभाग घेतो तेव्हा पवित्र आत्म्याच्या कार्याद्वारे आपल्याला आंतरिक बळ मिळू शकते. (२ करिंथ. ४:१६; इफिस. ३:१६) म्हणून, अनावश्यक गोष्टींमुळे थकून जाऊन अनंत आशीर्वादांना मुकू नका. प्रत्येक परीक्षा—मग ती प्रलोभनामुळे, थकव्यामुळे किंवा निराशेमुळे आलेली असो—लगेच नाहीशी झाली नाही, तरी देवाच्या नवीन जगात नक्कीच नाहीशी होईल. पवित्र आत्मा कशा प्रकारे ख्रिश्चनांना छळाचा सामना करण्याचे, मित्रांच्या घातक दबावाचा प्रतिकार करण्याचे आणि इतर अनेक संकटे सहन करण्याचे सामर्थ्य देऊ शकतो याचे परीक्षण आपण पुढील लेखात करणार आहोत.
तुमचे उत्तर काय असेल?
• बायबलचे वाचन केल्याने आपल्याला सामर्थ्य कसे प्राप्त होते?
• प्रार्थना व मनन आपल्याला सामर्थ्यवान कसे करू शकतात?
• निराशेची संभाव्य कारणे तुम्ही कशी दूर करू शकता?
[अभ्यासाचे प्रश्न]
[२४ पानांवरील चित्र]
ख्रिस्ती सभा आपल्याला आध्यात्मिक तजेला देऊ शकतात