व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

‘यहोवाच्या नावात आश्रय घ्या’

‘यहोवाच्या नावात आश्रय घ्या’

‘यहोवाच्या नावात आश्रय घ्या’

“मी . . . नम्र व दीन लोक राहू देईन, आणि ते यहोवाच्या नावात आश्रय घेतील.”—सफ. ३:१२, पं.र.भा.

१, २. मानवजातीला लवकरच कोणत्या लाक्षणिक वादळाचा तडाखा बसेल?

 तुम्हाला कधी वादळी पावसापासून किंवा गारांच्या पावसापासून संरक्षण मिळवण्यासाठी एखाद्या पुलाखाली आश्रय घ्यावा लागला का? वादळी पाऊस किंवा गारांचा पाऊस आल्यास बहुधा एखाद्या पुलाखाली तुम्हाला पुरेसे संरक्षण मिळू शकते. पण, एखादे झंझावात किंवा चक्रीवादळ आल्यास पुलाखाली पुरेसे संरक्षण मिळणे कदाचित शक्य नसेल.

आज ज्यामुळे मानवजातीचे अस्तित्वच मुळात धोक्यात आले आहे अशा प्रकारचे एक वादळ मोठ्या वेगाने येत आहे. ते म्हणजे एक लाक्षणिक वादळाचा “दिवस.” वेगाने येणाऱ्‍या या ‘परमेश्‍वराच्या मोठ्या दिवसाचा’ संपूर्ण मानवजातीला तडाखा बसेल. पण, आपण आवश्‍यक तो आश्रय मिळवू शकतो. (सफन्या १:१४-१८ वाचा.) लवकरच सुरू होणाऱ्‍या ‘परमेश्‍वराच्या क्रोधदिवसादरम्यान’ आपल्याला हा आश्रय कसा मिळवता येईल?

बायबल काळातील वादळाचे दिवस

३. इस्राएलच्या दहा वंशांच्या राज्यावर कोणते भयंकर ‘वादळ’ आले?

यहोवाचा तो मोठा दिवस उजाडेल तेव्हा पृथ्वीवरील सर्व खोट्या धार्मिक यंत्रणांचा नाश होईल. त्या वेळी आपल्याला आश्रय कसा मिळवता येईल याचे उत्तर पाहण्यासाठी आपण प्राचीन काळातील देवाच्या लोकांच्या इतिहासाचा आढावा घेऊ शकतो. इ.स.पू. आठव्या शतकात राहणाऱ्‍या यशयाने इस्राएलच्या धर्मत्यागी दहा वंशांच्या राज्यावर यहोवाने बजावलेल्या न्यायदंडाची तुलना, लोक रोखू शकले नसते अशा एका भयंकर ‘वादळाशी’ केली. (यशया २८:१, २ वाचा.) त्या भविष्यवाणीची पूर्णता इ.स.पू. ७४० मध्ये झाली, जेव्हा अश्‍शूरी सैन्याने त्या वंशांच्या देशावर कब्जा केला, ज्यांपैकी एफ्राइम हा सगळ्यात प्रमुख वंश होता.

४. इ.स.पू. ६०७ मध्ये ‘परमेश्‍वराच्या मोठ्या दिवसाचा’ तडाखा जेरूसलेमवर कसा बसला?

अविश्‍वासू इस्राएलवर यहोवाचा न्यायदंड बजावण्यात आला त्याच्या काही काळानंतर, म्हणजे इ.स.पू. ६०७ मध्ये, जेरूसलेमवर व यहूदाच्या राज्यावर ‘परमेश्‍वराचा मोठा दिवस’ आला. यहूदाचे लोक धर्मत्यागी बनले होते त्यामुळे त्यांच्यावर हा प्रसंग ओढवला होता. नबुखदनेस्सर राजाच्या नेतृत्वाखाली बॅबिलोन्यांनी यहूदावर व जेरूसलेम या राजधानी शहरावर हल्ला करण्याची धमकी दिली. त्या वेळी यहुदी लोक मदतीसाठी ‘लबाडीच्या आश्रयाकडे’ अर्थात इजिप्त या त्यांच्या मित्र राष्ट्राकडे वळाले. पण, गारांच्या विध्वंसकारी वृष्टीप्रमाणे बॅबिलोन्यांनी तो “आश्रय” जमीनदोस्त केला.—यश. २८:१४, १७.

५. सर्व खोट्या धर्मांचा नाश केला जाईल तेव्हा समूह या नात्याने देवाच्या लोकांचे काय होईल?

जेरूसलेमवर बजावण्यात आलेला हा न्यायदंड, आपल्या काळात धर्मत्यागी ख्रिस्ती धर्मजगतावर येणाऱ्‍या न्यायदंडाची पूर्वझलक होती. ख्रिस्ती धर्मजगताच्या नाशासोबतच खोट्या धर्माचे जागतिक साम्राज्य असलेल्या ‘मोठ्या बाबेलीच्या’ उरलेल्या भागाचादेखील नाश केला जाईल. त्यानंतर, सैतानाच्या दुष्ट जगाच्या उरलेल्या भागाचा नायनाट केला जाईल. पण, देवाचे लोक यहोवाच्या नावात आश्रय घेत असल्यामुळे एक समूह या नात्याने त्यांचा बचाव होईल.—प्रकटी. ७:१४; १८:२, ८; १९:१९-२१.

आध्यात्मिक आणि शारीरिक आश्रय

६. यहोवाचे लोक आश्रय कसा मिळवू शकतात?

देवाचे लोक या अंतसमयात जगत असूनही ते आजदेखील आश्रय कसा मिळवू शकतात? “[देवाच्या] नामाचे” प्रार्थनापूर्वक ‘चिंतन करण्याद्वारे’ व आवेशाने त्याची सेवा करण्याद्वारे आपण आध्यात्मिक आश्रय मिळवू शकतो. (मलाखी ३:१६-१८ वाचा.) पण, आपण हे लक्षात घेतले पाहिजे, की देवाच्या नावाचे केवळ चिंतन करणे पुरेसे नाही. बायबलमध्ये आपण असे वाचतो: “जो कोणी प्रभूचे [यहोवाचे] नाव घेऊन त्याचा धावा करील त्याचे तारण होईल.” (रोम. १०:१३) यहोवाच्या नावाचा धावा करणे याचा व त्यामुळे देवाकडून आपल्याला मिळणारे तारण याचा एकमेकांशी फार जवळचा संबंध आहे. आदरभावाने ‘त्याच्या नामाचे चिंतन करणाऱ्‍या’ व त्याचे साक्षीदार या नात्याने सेवा करणाऱ्‍या खऱ्‍या ख्रिश्‍चनांमध्ये आणि त्याची सेवा न करणाऱ्‍या मानवजातीमध्ये किती फरक आहे हे नम्र अंतःकरणाचे अनेक लोक आज पाहू शकतात.

७, ८. पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांनी कशा प्रकारे शारीरिक तारण अनुभवले व कोणती समान गोष्ट आधुनिक काळात घडेल?

पण, आपले तारण केवळ आध्यात्मिक आश्रय मिळवण्यापुरतेच मर्यादित नाही. तर, देवाच्या लोकांना शारीरिक संरक्षणाचेदेखील आश्‍वासन देण्यात आले आहे. ही गोष्ट, इ.स. ६६ मध्ये रोमी सैन्याने सेस्टियस गॅलसच्या नेतृत्वाखाली जेरूसलेमवर चढाई केली त्या वेळी जे काही घडले त्यावरून सूचित होते. त्या संकटाचे दिवस “कमी” केले जातील असे येशूने भाकीत केले होते. (मत्त. २४:१५, १६, २१, २२) जेरूसलेम शहराला वेढा घातलेल्या रोमी सैन्याने एकाएकी माघार घेतली तेव्हा हे घडले. त्यामुळे काही ‘मनुष्यांचा’ म्हणजे खऱ्‍या ख्रिश्‍चनांचा “निभाव” लागणे शक्य झाले. त्यांना जेरूसलेम शहरातून व आसपासच्या परिसरातून पळ काढता आला. काही जण यार्देन नदी पार करून गेले व त्यांनी नदीच्या पूर्वेकडील डोंगराळ भागात आश्रय घेतला.

त्या ख्रिश्‍चनांमध्ये व आधुनिक काळातील देवाच्या लोकांमध्ये आपण एक साम्य पाहू शकतो. गतकाळात, पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांनी आश्रयाचा शोध घेतला आणि आजच्या काळातील देवाचे सेवकसुद्धा तेच करतील. पण, या वेळी मात्र त्यांना आश्रयासाठी एखाद्या विशिष्ट ठिकाणी पलायन करावे लागणार नाही, कारण खरे ख्रिस्ती संपूर्ण जगभरात पसरलेले आहेत. पण, देवाचे लोक या नात्याने, ‘निवडलेल्यांचा’ व त्यांच्या एकनिष्ठ साथीदारांचा धर्मत्यागी ख्रिस्ती धर्मजगताच्या अंतातून शारीरिक बचाव होईल. तो कसा? यहोवाच्या नावात व त्याच्या डोंगरासमान संघटनेत आश्रय घेण्याद्वारे त्यांचा बचाव होईल.

९. यहोवाच्या नावाचे विस्मरण होण्यासाठी कोणी प्रयत्न केले आहेत? एक उदाहरण द्या.

दुसरीकडे पाहता, ख्रिस्ती धर्मजगताचा न्याय होणे आवश्‍यक आहे. कारण ख्रिस्ती धर्मगुरूंनी, चर्चला जाणाऱ्‍या लोकांमध्ये सर्वसामान्यपणे पाहायला मिळणाऱ्‍या आध्यात्मिक अज्ञानाला हातभार लावला आहे व देवाच्या नावाचा उघडपणे द्वेष केला आहे. खरेतर, मध्ययुगात देवाच्या वैयक्‍तिक नावाचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जात होता. हे नाव चार हिब्रू अक्षरांनी सूचित केले जाते, ज्याला टेट्राग्रॅमटन असे म्हटले जाते व त्याचे सहसा यहवह (इंग्रजीत YHWH किंवा JHVH) असे लिप्यंतर करण्यात येते. त्या काळात, हे नाव नाण्यांवर, घरांच्या दर्शनी भागांवर, अनेक पुस्तकांमध्ये व बायबलमध्ये, इतकेच नव्हे, तर काही कॅथलिक व प्रोटेस्टंट चर्चेसमध्येदेखील आढळत असे. पण, अलीकडच्या काळात, बायबलच्या अनेक भाषांतरांमधून व इतर प्रयोगांतून देवाचे नाव काढून टाकण्याकडे अनेकांचा कल आहे. याचे एक उदाहरण म्हणजे, ‘देवाचे नाव’ यासंबंधी २९ जून २००८ च्या एका अधिकृत पत्राद्वारे रोमन कॅथलिक चर्चने बिशपांच्या परिषदेला दिलेली सूचना. त्यात असे सांगण्यात आले होते, की टेट्राग्रॅमटन याचे ज्या निरनिराळ्या पद्धतीने भाषांतर करण्यात आले आहे ते काढून त्याऐवजी “प्रभू” हा शब्द वापरण्यात यावा. वॅटिकन चर्चने अशीही सूचना दिली, की कॅथलिक चर्चच्या प्रार्थनासभेत गायिल्या जाणाऱ्‍या स्तुतिगीतांमध्ये व प्रार्थनेमध्ये देवाच्या वैयक्‍तिक नावाचा उपयोग किंवा उच्चार केला जाऊ नये. आणि ख्रिस्ती धर्मजगताच्या व इतर धर्मांच्या धर्मगुरूंनी सत्य देवाच्या ओळखीसंबंधी कोट्यवधी उपासकांना अंधारात ठेवले आहे.

देवाचे नाव पवित्र करणाऱ्‍यांचे संरक्षण

१०. आज देवाच्या नावाचा सन्मान कसा होत आहे?

१० इतर धर्म जे करत आहेत त्याच्या अगदी उलट यहोवाचे साक्षीदार देवाच्या नावाचा सन्मान व गौरव करतात. देवाच्या नावाचा आदरपूर्वक उपयोग करण्याद्वारे ते हे नाव पवित्र करतात. जे यहोवावर भरवसा ठेवतात अशांविषयी त्याला मनस्वी आनंद वाटतो, आणि आपल्या लोकांना आशीर्वादित करण्यासाठी व त्यांचे संरक्षण करण्यासाठी तो हवी ती भूमिका घेऊ शकतो. “जे त्याच्याठायी आश्रय घेतात त्यांना तो जाणतो.”—नहू. १:७, पं.र.भा.; प्रे. कृत्ये १५:१४.

११, १२. प्राचीन यहूदामध्ये यहोवाच्या नावाचे समर्थन कोणी केले आणि आधुनिक काळात तसे कोणी केले आहे?

११ प्राचीन यहूदातील बहुतेक जण धर्मत्यागी बनले असले, तरी असेही काही जण होते ज्यांनी “यहोवाच्या नावात आश्रय घेतला होता.” (सफन्या ३:१२, १३ वाचा. *) यहूदाच्या अविश्‍वासूपणाबद्दल यहोवाने बॅबिलोन्यांकरवी यहूदाला शिक्षा दिली. बॅबिलोन्यांनी यहूदा देशावर विजय मिळवला व त्यातील लोकांना बंदी करून नेले. पण यिर्मया, बारूख व एबद-मलेख यांसारख्या काही व्यक्‍तींचा मात्र बचाव झाला. ते धर्मत्यागी राष्ट्राच्या ‘मध्ये’ राहिले होते. इतर जण बंदिवासात असताना विश्‍वासू राहिले. इ.स.पू. ५३९ मध्ये कोरेश राजाच्या नेतृत्वाखाली मेदी व पारसी लोकांनी बॅबिलोनवर विजय मिळवला. त्यानंतर लवकरच कोरेश राजाने एक हुकूमनामा जाहीर केला ज्यामुळे यहुदी शेषजनांना आपल्या मायदेशी परतणे शक्य झाले.

१२ त्या खऱ्‍या उपासनेच्या पुनःस्थापनेचा आनंद घेणाऱ्‍यांविषयी सफन्याने भाकीत केले, की यहोवा त्यांचा बचाव करेल व त्यांच्याविषयी आनंदोत्सव करेल. (सफन्या ३:१४-१७ वाचा.) हीच गोष्ट, आपल्या काळातही घडली आहे. देवाचे राज्य स्वर्गात स्थापन झाल्यानंतर यहोवाने मोठ्या बाबेलीच्या आध्यात्मिक बंदिवासातून अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांच्या विश्‍वासू शेषजनांची सुटका केली आणि आजसुद्धा तो त्यांच्याविषयी आनंदोत्सव करतो.

१३. सर्व राष्ट्रांतील लोक कोणती मुक्‍ती अनुभवत आहेत?

१३ पृथ्वीवर सदासर्वकाळ जीवन जगण्याची आशा असणारेदेखील मोठ्या बाबेलीतून बाहेर पडले आहेत आणि खोट्या धार्मिक शिकवणींतून आध्यात्मिक रीत्या मुक्‍त झाल्याबद्दल ते आनंदी आहेत. (प्रकटी. १८:४) आणि अशा प्रकारे सफन्या २:३ ची आपल्या काळात मोठ्या प्रमाणात पूर्णता होत आहे: “देशांतील सर्व नम्र जनांनो, . . . [यहोवाचा] आश्रय करा.” सर्व राष्ट्रांतील नम्र जन, मग त्यांना स्वर्गीय जीवनाची आशा असो अथवा पृथ्वीवरील जीवनाची, सध्या यहोवाच्या नावात आश्रय घेत आहेत.

देवाच्या नावात चमत्कारिक शक्‍ती नाही

१४, १५. (क) काहींनी स्वतःचे संरक्षण करण्यासाठी कशाचा उपयोग केला आहे? (ख) संरक्षणासाठी कोणत्या वस्तूंचा उपयोग केला जाऊ नये?

१४ काही इस्राएल लोक असे मानायचे की जेरूसलेममधील मंदिरात चमत्कारिक शक्‍ती आहे ज्यामुळे शत्रूंपासून त्यांचे संरक्षण होईल. (यिर्म. ७:१-४) यापूर्वीदेखील, इस्राएल लोकांची समजूत होती, की कराराच्या कोशामध्ये चमत्कारिक शक्‍ती असून त्यामुळे रणभूमीवर त्यांचे रक्षण होईल. (१ शमु. ४:३, १०, ११) कॉन्स्टंटाइन बादशहाने आपल्या सैनिकांच्या ढालींवर ग्रीक भाषेतील “ख्रिस्त” या पदवीची खीरो ही पहिली दोन ग्रीक अक्षरे रंगवली होती. त्याला आशा होती की यामुळे युद्धभूमीवर त्याच्या सैनिकांचे संरक्षण होईल. तसेच असे म्हटले जाते, की युरोपमध्ये तीस वर्षे चालेलल्या युद्धात लढलेला स्वीडनचा राजा गुस्ताव ॲडॉल्फ दुसरा याने पृष्ठ ७ वर दाखवण्यात आलेले शस्त्र धारण केले होते. त्या सुरक्षा कवचावर Iehova (येहोवा) हे नाव अगदी ठळकपणे कोरण्यात आले आहे हे लक्षात घ्या.

१५ देवाच्या काही लोकांवर दुरात्म्यांनी हल्ला केला तेव्हा यहोवाच्या नावाचा मोठ्याने धावा केल्यामुळे त्यांचे संरक्षण झाले आहे. असे असले तरी, देवाचे नाव असलेल्या एखाद्या वस्तूत आपले संरक्षण करण्याची चमत्कारिक शक्‍ती आहे असे मानून तिचा दैनंदिन जीवनात आपण उपयोग करू नये. यहोवाच्या नावात आश्रय घेण्याचा हा अर्थ होत नाही.

आज आपण आश्रय कसा मिळवू शकतो?

१६. आज आपण आध्यात्मिकदृष्ट्या आश्रय कसा मिळवू शकतो?

१६ देवाचे लोक एक समूह या नात्याने अनुभवत असलेल्या सुरक्षित आध्यात्मिक वातावरणात आज आपल्याला आश्रय मिळतो. (स्तो. ९१:१) आपली ही आध्यात्मिक सुरक्षा धोक्यात येऊ शकते अशा जगाच्या काही प्रवृत्तींविषयी आपल्याला ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाद्वारे’ तसेच मंडळीतील वडिलांद्वारे जागृत केले जाते. (मत्त. २४:४५-४७; यश. ३२:१, २) आपल्याला भौतिकवादासंबंधी किती वेळा इशारा देण्यात आला आहे आणि अशा इशाऱ्‍यांमुळे आध्यात्मिक रीत्या संकटात येण्यापासून आपले संरक्षण कसे झाले आहे त्याचा विचार करा. तसेच, ज्यामुळे आपण यहोवाच्या सेवेत निष्क्रीय होऊ शकतो अशी निश्‍चिंत मनोवृत्ती विकसित करण्याच्या धोक्याविषयी काय म्हणता येईल? देवाचे वचन म्हणते: “मूर्खांचे स्वस्थपण त्यांचा नाश करील; परंतु जो माझे ऐकतो तो सुरक्षित वसेल, आणि अरिष्टाच्या भयावाचून स्वस्थ राहील.” (नीति. १:३२, ३३, पं.र.भा.) नैतिकदृष्ट्या शुद्ध राहण्याचा प्रयत्न केल्यानेसुद्धा आपल्याला आपली आध्यात्मिक सुरक्षा टिकवून ठेवणे शक्य होते.

१७, १८. आज कोणती गोष्ट लक्षावधी लोकांना यहोवाच्या नावात आश्रय घेण्यास मदत करत आहे?

१७ येशूने सर्व राष्ट्रांत राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्याची आज्ञा आपल्याला दिली आहे. त्या आज्ञेचे पालन करण्याचे उत्तेजन विश्‍वासू दास आपल्याला देतो त्याचाही विचार करा. (मत्त. २४:१४; २८:१९, २०) सफन्याने, लोकांना देवाच्या नावात आश्रय घेण्यास साहाय्य करेल अशा एका परिवर्तनाचा उल्लेख केला. आपण असे वाचतो: “मी राष्ट्रांस शुद्ध वाणी देईन, व परमेश्‍वराची सेवा घडावी म्हणून ते सर्व त्याच्या नामाचा धावा एकचित्ताने करितील.”—सफ. ३:९.

१८ ही शुद्ध वाणी काय आहे? ही वाणी यहोवा देवाबद्दल व त्याच्या उद्देशांबद्दल त्याच्या प्रेरित वचनात दिलेल्या सत्याला सूचित करते. तुम्ही इतरांना देवाच्या राज्याविषयी व ते राज्य कशा प्रकारे देवाचे नाव पवित्र करेल याविषयी अचूक माहिती देता, देवाचे सार्वभौमत्व उंचावले जाईल यावर जोर देता आणि विश्‍वासू मानवांना मिळणाऱ्‍या सार्वकालिक आशीर्वादांविषयी आनंदाने बोलता तेव्हा एका अर्थी तुम्ही त्या शुद्ध वाणीचाच उपयोग करत असता. अनेक जण ही लाक्षणिक भाषा बोलत असल्यामुळे आज अधिकाधिक लोक ‘यहोवाच्या नावाचा धावा’ करत आहेत व ‘एकचित्ताने’ त्याची सेवा करत आहेत. होय, जगभरातील लक्षावधी लोक आज यहोवाच्या नावात आश्रय घेत आहेत.—स्तो. १:१, ३.

१९, २०. बायबलच्या काळात ‘लबाडीच्या आश्रयावर’ भरवसा ठेवणाऱ्‍यांची कशी फजिती झाली?

१९ आज जगातील लोकांना डोंगरासमान वाटणाऱ्‍या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. कसेही करून आपल्या समस्या सोडवण्यास उतावळे झालेले अनेक जण साहाय्याकरता अपरिपूर्ण मानवांकडे वळतात. किंवा मग, ज्याप्रमाणे प्राचीन इस्राएल राष्ट्राने काही वेळा साहाय्यासाठी शेजारच्या राष्ट्रांकडे डोळे लावले व त्यांच्याशी मैत्रीसंबंध जोडले, त्याचप्रमाणे आज राजकीय संघटना आपल्या समस्या सोडवतील या आशेने जगातील लोक त्यांच्याकडे पाहतात. पण, सभोवतालच्या राष्ट्रांकडून प्राचीन इस्राएल राष्ट्राला काहीच साहाय्य मिळाले नाही हे तर आपण जाणतोच. त्याचप्रमाणे, आज कोणताही देश किंवा संयुक्‍त राष्ट्र संघ मानवजातीच्या समस्यांचे पूर्णपणे निरसन करू शकणार नाही. तर मग, आपण राज्यकीय संघटनांना व मित्र राष्ट्रांना आपले आश्रय का मानावे? बायबल भविष्यसूचकपणे त्यांचे वर्णन “लबाडीचा आश्रय” असे करते. त्यांच्याकडे तुम्ही त्याच दृष्टिकोनातून पाहू शकता, कारण त्यांच्यावर आशा ठेवणाऱ्‍या सर्व लोकांची शेवटी घोर निराशा होईल.यशया २८:१५, १७ वाचा.

२० लवकरच, पृथ्वीला यहोवाच्या दिवसाच्या लाक्षणिक वादळाचा तडाखा बसणार आहे. त्या वेळी कोणतीही मानवी योजना, आण्विक शस्त्रांचा आश्रय किंवा धनधौलत लोकांचे रक्षण करू शकणार नाही. यशया २८:१७ सूचित करते: “लबाडीचा आश्रय गारांनी वाहून जाईल, व दडण्याची जागा जलाचे ओघ बुडवून टाकितील.”

२१. आपल्याला २०११ च्या वार्षिक वचनाचे पालन केल्याने काय फायदा होऊ शकतो?

२१ आता आणि भविष्यात घडणाऱ्‍या घडामोडींदरम्यान देवाच्या लोकांना आपला देव यहोवा याच्या नावात खरे संरक्षण मिळेल. सफन्याच्या नावाचा अर्थ, “यहोवाने सुरक्षित ठेवले” असा होतो. त्यावरून, यहोवाच आपल्या सुरक्षेचा खरा स्रोत आहे हे सूचित होते. म्हणूनच, २०११ च्या वार्षिक वचनात आपल्याला असा सुज्ञ सल्ला देण्यात आला आहे: ‘यहोवाच्या नावात आश्रय घ्या.’ (सफ. ३:१२, पं.र.भा.) आपण आजसुद्धा यहोवावर पूर्णपणे भरवसा ठेवून त्याच्या नावात आश्रय घेऊ शकतो. किंबहुना, आपण तो घेतलाच पाहिजे. (स्तो. ९:१०) तेव्हा, आपण दररोज हे ईश्‍वरप्रेरित आश्‍वासन लक्षात ठेवू या: “परमेश्‍वराचे नाम बळकट दुर्ग आहे, त्यांत धार्मिक धावत जाऊन निर्भय राहतो.”—नीति. १८:१०.

[तळटीप]

^ सफन्या ३:१२, १३ (पंडिता रमाबाई भाषांतर): “आणि मी तुझ्यामध्ये नम्र व दीन लोक राहू देईन, आणि ते यहोवाच्या नावात आश्रय घेतील. इस्राएलाचे उरलेले अन्याय करणार नाहीत व लबाड्या बोलणार नाहीत, आणि त्यांच्या मुखांत कपटी जीभही सापडणार नाही; कारण ते चरतील व आडवे पडून राहतील, आणि कोणी त्यांना भेवडावणार नाही.”

तुम्हाला आठवते का?

• आज आपण यहोवाच्या नावात आश्रय कसा घेऊ शकतो?

• आपण ‘लबाडीच्या आश्रयावर’ भरवसा का ठेवू नये?

• आपल्याला कोणत्या भावी आश्रयाचे आश्‍वासन देण्यात आले आहे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[६ पानांवरील संक्षिप्त आशय]

२०११ चे वार्षिक वचन: ‘यहोवाच्या नावात आश्रय घ्या.’—सफन्या ३:१२, पं.र.भा.

[७ पानांवरील चित्राचे श्रेय]

Thüringer Landesmuseum Heidecksburg Rudolstadt, Waffensammlung “Schwarzburger Zeughaus”