व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाने तुमच्यासाठी जे काही केले आहे त्यावर मनन करा

यहोवाने तुमच्यासाठी जे काही केले आहे त्यावर मनन करा

यहोवाने तुमच्यासाठी जे काही केले आहे त्यावर मनन करा

येशूचे पुनरुत्थान झाल्याच्या काही काळानंतर येशूचे दोन शिष्य जेरूसलेमहून अम्माऊस नावाच्या गावाला चालले होते. लूकच्या शुभवर्तमानातील अहवाल म्हणतो, की “ते संभाषण व चर्चा करीत असताना, येशू स्वतः जवळ येऊन त्यांच्याबरोबर चालू लागला; परंतु त्यांनी त्याला ओळखू नये म्हणून त्यांचे डोळे जणू काय बंद करण्यात आले होते.” मग, येशूने त्यांना म्हटले: “तुम्ही चालताना ज्या गोष्टी एकमेकांबरोबर बोलत आहा त्या कोणत्या? तेव्हा ते म्लानमुख होऊन उभे राहिले.” शिष्य दुःखी का होते? कारण येशूच्या शिष्यांना असे वाटत होते की, त्याच काळात येशू विदेशी लोकांच्या वर्चस्वातून इस्राएलची सुटका करणार होता. पण तसे काहीच झाले नव्हते. उलट येशूलाच मारून टाकण्यात आले होते. त्यामुळे ते शिष्य दुःखी होते.—लूक २४:१५-२१; प्रे. कृत्ये १:६.

येशू शिष्यांशी तर्क करू लागला. “त्याने मोशे व सर्व संदेष्टे ह्‍यांच्यापासून आरंभ करून संपूर्ण शास्त्रांतील आपणाविषयीच्या गोष्टींचा अर्थ त्यांना सांगितला.” खरेतर, येशूच्या सेवाकार्यादरम्यान अनेक उल्लेखनीय व विश्‍वास बळकट करणाऱ्‍या घटना घडल्या होत्या! येशू त्यांना ज्या काही गोष्टी सांगत होता त्या ऐकून त्यांच्या दुःखाचे रूपांतर आनंदात झाले. नंतर त्याच दिवशी संध्याकाळी ते एकमेकांस म्हणाले: “तो वाटेने आपल्याबरोबर बोलत होता व शास्त्राचा उलगडा करीत होता तेव्हा आपल्या अंतःकरणाला आतल्या आत उकळी येत नव्हती काय?” (लूक २४:२७, ३२) येशूच्या शिष्यांच्या प्रतिक्रियेवरून आपण कोणता धडा शिकू शकतो?

अपेक्षाभंगाचा आपल्यावर काय परिणाम होतो?

अम्माऊस गावाकडे जाणाऱ्‍या त्या दोन शिष्यांना दुःख वाटले होते कारण त्यांनी अपेक्षा केल्याप्रमाणे घटना घडल्या नव्हत्या. नीतिसूत्रे १३:१२ मध्ये जे सांगितले आहे ते त्यांनी अनुभवले: “आशा लांबणीवर पडली असता अंतःकरण कष्टी होते.” त्याचप्रमाणे, अनेक वर्षे विश्‍वासूपणे यहोवाची सेवा केलेल्या आपल्यापैकी काहींच्या मनात असा विचार आला, की आतापर्यंत “मोठे संकट” यायला हवे होते. (मत्त. २४:२१; प्रकटी. ७:१४) अशा पूर्ण न झालेल्या अपेक्षांमुळे आपणही काही काळ दुःखी होऊ शकतो हे समजण्याजोगे आहे.

पण एक गोष्ट लक्षात घ्या, की येशूने त्या दोघा शिष्यांना पूर्ण झालेल्या भविष्यवाण्यांवर—ज्यांपैकी काही भविष्यवाण्या त्यांच्या जीवनकाळात पूर्ण झाल्या होत्या—मनन करण्यास मदत केल्यानंतर त्यांच्या दुःखाचे रूपांतर आनंदात झाले. त्याचप्रमाणे आपणही आपला आंतरिक आनंद टिकवून ठेवू शकतो आणि नैराश्‍याच्या भावनांवर मात करू शकतो. मायकल नावाच्या एका अनुभवी ख्रिस्ती वडिलांनी असे म्हटले: “यहोवानं आतापर्यंत जे केलं नाही त्यावर लक्ष केंद्रित करू नका. त्याऐवजी, त्यानं आजवर जे काही केलं आहे त्यावर मनन करा.” खरोखर, किती उत्तम सल्ला!

यहोवाने आजपर्यंत काय साध्य केले आहे?

यहोवाने आजपर्यंत साध्य केलेल्या काही उल्लेखनीय गोष्टींचा विचार करा. येशूने म्हटले: “मी तुम्हाला खचित खचित सांगतो, मी जी कृत्ये करितो, ती माझ्यावर विश्‍वास ठेवणाराहि करील, आणि त्यापेक्षा मोठी करील.” (योहा. १४:१२) आज, देवाचे सेवक इतिहासातील सगळ्यात श्रेष्ठ ख्रिस्ती कार्ये साध्य करत आहेत. सात लाखांहून अधिक जण मोठ्या संकटातून वाचण्याची आशा बाळगत आहेत. विचार करा, याआधी केव्हाही यहोवाचे विश्‍वासू सेवक इतक्या मोठ्या संख्येने व जगातील इतक्या देशांत कार्यरत नव्हते! होय, येशूने भाकीत केल्याप्रमाणे यहोवाने आपल्या सेवकांना ‘त्यापेक्षा मोठी कृत्ये करण्यास’ मदत केली आहे.

यांव्यतिरिक्‍त, यहोवाने आपल्यासाठी आणखी काय केले आहे? त्याने नम्र अंतःकरणाच्या लोकांना लाक्षणिक अर्थाने या दुष्ट जगातून बाहेर पडून त्याने निर्माण केलेल्या आध्यात्मिक नंदनवनात प्रवेश करण्यास मदत केली आहे. (२ करिंथ. १२:१-४) त्या आध्यात्मिक नंदनवनात आपल्याला उपलब्ध असलेल्या काही खास गोष्टींवर मनन करण्यास वेळ काढा. उदाहरणार्थ, तुमच्या घरातील किंवा राज्य सभागृहातील ग्रंथालयावरून एक नजर फिरवा. वॉच टावर पब्लिकेशन्स इंडेक्स चाळण्याचा प्रयत्न करा किंवा वॉच टावर लायब्ररी ब्राउझ करा. बायबलवर आधारित असलेले एखादे ध्वनिमुद्रित नाटक ऐका. अलीकडच्या एखाद्या अधिवेशनात तुम्ही पाहिलेल्या व ऐकलेल्या गोष्टी पुन्हा डोळ्यांसमोर उभ्या करा. याशिवाय, आपल्या बंधुभगिनींसोबत आपण अनुभवत असलेल्या उभारणीकारक सहवासाचाही विचार करा. खरोखर, यहोवाने आपल्यासाठी आध्यात्मिक नंदनवनाची—मुबलक आध्यात्मिक अन्‍नाची व एका प्रेमळ बंधुसमाजाची तरतूद करून किती उदारता दाखवली आहे!

स्तोत्रकर्ता दावीद याने म्हटले: “हे परमेश्‍वरा, माझ्या देवा, तू आम्हासाठी केलेली अद्‌भुत कृत्ये व आमच्याविषयीचे तुझे विचार पुष्कळ आहेत.” (स्तो. ४०:५) होय, यहोवाने आजपर्यंत आपल्यासाठी केलेल्या अद्‌भुत गोष्टींवर व आपल्याबद्दल असलेल्या त्याच्या प्रेमळ विचारांवर मनन केल्याने, आपला स्वर्गीय पिता यहोवा याची मनापासून व विश्‍वासूपणे सेवा करत राहण्याचे बळ आपल्याला पुन्हा प्राप्त होईल.—मत्त. २४:१३.

[३१ पानांवरील चित्र]

यहोवाने शिष्यांसाठी जे काही केले होते त्यावर मनन करण्यास येशूने त्यांना मदत केली

[३२ पानांवरील चित्रे]

अलीकडच्या एखाद्या अधिवेशनात तुम्ही पाहिलेल्या व ऐकलेल्या गोष्टी पुन्हा डोळ्यांसमोर उभ्या करा