व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्ही स्वैराचाराचा द्वेष करता का?

तुम्ही स्वैराचाराचा द्वेष करता का?

तुम्ही स्वैराचाराचा द्वेष करता का?

‘तुला [येशूला] स्वैराचाराचा वीट आहे.’—इब्री १:९.

१. येशूने प्रेमाबद्दल काय शिकवले?

 प्रेम किती महत्त्वाचे आहे यावर भर देताना येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना असे सांगितले: “मी तुम्हास नवी आज्ञा देतो की, तुम्ही एकमेकांवर प्रीति करावी; जशी मी तुम्हावर प्रीति केली तशी तुम्हीहि एकमेकांवर प्रीति करावी. तुमची एकमेकांवर प्रीति असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहा.” (योहा. १३:३४, ३५) येशूने आपल्या अनुयायांना, एकमेकांबद्दल निःस्वार्थ प्रेम दाखवण्याची आज्ञा दिली. हे प्रेम त्यांचे ओळखचिन्ह असणार होते. येशूने त्यांना असाही सल्ला दिला: “तुम्ही आपल्या वैऱ्‍यांवर प्रीति करा आणि जे तुमचा छळ करितात त्यांच्यासाठी प्रार्थना करा.”—मत्त. ५:४४.

२. ख्रिस्ताच्या अनुयायांनी कशाबद्दल द्वेष विकसित केला पाहिजे?

आपल्या शिष्यांना प्रेमाविषयी शिकवण्यासोबतच, त्यांनी कशाचा द्वेष केला पाहिजे हेदेखील येशूने त्यांना शिकवले. येशूच्या संदर्भात असे म्हणण्यात आले होते: “तुला न्यायाची चाड आणि स्वैराचाराचा [दुष्टाईचा] वीट आहे.” (इब्री १:९; स्तो. ४५:७) यावरून दिसून येते की आपण न्यायीपणाबद्दल आवड विकसित करण्यासोबतच, पापाबद्दल किंवा स्वैराचाराबद्दल द्वेष विकसित केला पाहिजे. प्रेषित योहानाने विशेषतः जे म्हटले होते त्याकडे आपण लक्ष देऊ शकतो. त्याने म्हटले: “जो कोणी पाप करितो तो स्वैराचार करितो; कारण पाप स्वैराचार आहे.”—१ योहा. ३:४.

३. दुष्टाईचा द्वेष करण्याबद्दल, जीवनातील कोणत्या पैलूंची चर्चा या लेखात केली जाईल?

तर मग, ख्रिस्ती या नात्याने आपण स्वतःला असे विचारले पाहिजे: ‘मी स्वैराचाराचा द्वेष करतो का?’ आपण कशा प्रकारे वाइटाचा द्वेष करू शकतो ते पुढील चार पैलूंत आपण पाहू या: (१) मद्याच्या दुरुपयोगाविषयी आपली मनोवृत्ती, (२) भूतविद्येबद्दल आपला दृष्टिकोन, (३) अनैतिकतेबद्दल आपली प्रतिक्रिया, आणि (४) ज्यांना स्वैराचार आवडतो अशांबद्दल आपला दृष्टिकोन.

मद्याचे गुलाम होऊ नका

४. अतिमद्यापानाविषयी येशू मोकळेपणाने इशारा का देऊ शकला?

द्राक्षारस ही देवाकडून मिळालेली एक देणगी आहे याची येशूला जाणीव असल्यामुळे, त्याने अधूनमधून द्राक्षारस घेतला. (स्तो. १०४:१४, १५) तरीसुद्धा, अतिमद्यपान करून त्याने या देणगीचा कधीच दुरुपयोग केला नाही. (नीति. २३:२९-३३) म्हणूनच, अतिमद्यपानाच्या बाबतीत तो मोकळेपणाने सल्ला देऊ शकला. (लूक २१:३४ वाचा.) अतिमद्यपान केल्याने गंभीर पाप घडण्याची शक्यता असते. म्हणूनच, प्रेषित पौलाने असे लिहिले: “द्राक्षारसाने मस्त होऊ नका, द्राक्षरसात बेतालपणा आहे, पण आत्म्याने परिपूर्ण व्हा.” (इफिस. ५:१८) त्यासोबतच त्याने मंडळीतील वृद्ध स्त्रियांना असा सल्ला दिला की त्यांनी ‘मद्यपानासक्‍त नसावे.’—तीत २:३.

५. जे मद्यपान करण्याचे ठरवतात ते स्वतःला कोणते प्रश्‍न विचारू शकतात?

तुम्ही मद्यपान करण्याचे ठरवता तेव्हा तुम्ही स्वतःला हे प्रश्‍न विचारले पाहिजेत: ‘अतिमद्यपानाच्या बाबतीत मी येशूची मनोवृत्ती बाळगतो का? याबाबतीत मला इतरांना सल्ला द्यायचा झाल्यास, मी तो मोकळेपणाने देऊ शकतो का? मी चिंता किंवा तणाव यांतून मुक्‍त होण्यासाठी मद्यपान करतो का? दर आठवडी मी किती मद्य सेवन करतो? मी कदाचित अतिमद्यपान करत आहे असे कोणी म्हटल्यास, मी कशी प्रतिक्रिया दाखवतो? मी स्वतःचा बचाव करू पाहतो का, किंवा मला रागसुद्धा येतो का?’ आपण मद्याचे गुलाम बनल्यास, आपल्या तर्कशक्‍तीवर व सुज्ञतेने निर्णय घेण्याच्या आपल्या क्षमतेवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. ख्रिस्ताचे अनुयायी आपल्या विचारशक्‍तीचे संरक्षण करण्याचा अतोनात प्रयत्न करतात.—नीति. ३:२१, २२.

भूतविद्या टाळा

६, ७. (क) येशूने सैतानाशी व दुरात्म्यांशी कसा व्यवहार केला? (ख) आज इतक्या मोठ्या प्रमाणात भूतविद्या का पाहायला मिळते?

येशू पृथ्वीवर होता तेव्हा त्याने सैतानाचा व त्याच्या दुरात्म्यांचा खंबीरपणे विरोध केला. येशूची एकनिष्ठा भंग करण्यासाठी सैतानाने केलेले प्रत्यक्ष हल्ले त्याने हाणून पाडले. (लूक ४:१-१३) त्याच्या विचारशक्‍तीवर व कृत्यांवर प्रभाव पाडू शकतील असे सैतानाचे अप्रत्यक्ष प्रयत्नसुद्धा त्याने ओळखले व त्यांचा प्रतिकार केला. (मत्त. १६:२१-२३) जे लोक अशुद्ध आत्म्यांच्या कब्जात यातना भोगत होते अशांना येशूने मुक्‍त केले.—मार्क ५:२, ८, १२-१५; ९:२०, २५-२७.

सन १९१४ मध्ये राजा या नात्याने स्वर्गात सिंहासनारूढ झाल्यावर, येशूने सैतानाला व त्याच्या दुरात्म्यांना स्वर्गातून हाकलून त्यांच्या दूषित प्रभावांपासून स्वर्ग शुद्ध केले. परिणामस्वरूप, आज सैतान आधीपेक्षा कितीतरी मोठ्या प्रमाणात ‘सर्व जगाला ठकविण्याचा’ प्रयत्न करत आहे. (प्रकटी. १२:९, १०) म्हणूनच, आज लोक मोठ्या प्रमाणात भूतविद्येच्या मोहात पडलेले आहेत आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे हे पाहून आपल्याला आश्‍चर्य वाटू नये. तर मग, भूतविद्येपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आपण कोणती पावले उचलू शकतो?

८. मनोरंजनाची निवड करताना आपण कोणते काही प्रश्‍न स्वतःला विचारले पाहिजेत?

बायबल आपल्याला भूतविद्येशी संबंधित असलेल्या धोक्यांविषयी स्पष्ट शब्दांत सावध करते. (अनुवाद १८:१०-१२ वाचा.) आज, सैतान आणि त्याचे दुरात्मे भूतविद्येला चालना देणारे चित्रपट, पुस्तके, इलेक्ट्रॉनिक गेम्स यांच्याद्वारे लोकांच्या विचारशक्‍तीवर प्रभाव पाडत आहेत. म्हणून, मनोरंजनाची निवड करताना आपल्यापैकी प्रत्येकाने स्वतःला असे विचारले पाहिजे: ‘ज्यांमध्ये भूतविद्येशी संबंधित गोष्टी दाखवल्या आहेत असे फिल्म्‌स, टीव्ही कार्यक्रम गेल्या काही महिन्यांत मी पाहिले आहेत का, इलेक्ट्रॉनिक गेम्स खेळले आहेत का, किंवा रहस्यमयी गोष्टींवर आधारित पुस्तके किंवा कॉमिक्स वाचले आहेत का? भूतविद्येशी संबंधित गोष्टींच्या प्रभावाचा प्रतिकार करण्याचे महत्त्व मला समजले आहे का, की मी त्याच्याशी संबंधित धोक्यांकडे दुर्लक्ष करतो? मी कोणत्या प्रकारच्या मनोरंजनाची निवड करतो याबद्दल यहोवाला कसे वाटेल याचाही मी विचार केला आहे का? सैतानाच्या अशा प्रकारच्या प्रभावांचा मी माझ्यावर परिणाम होऊ दिला असेल, तर यहोवाबद्दल आणि त्याच्या नीतिमान तत्त्वांबद्दल असलेले माझे प्रेम मला लगेच निर्णय घेऊन अशा प्रभावांचा प्रतिकार करण्यास मला प्रवृत्त करेल का?’—प्रे. कृत्ये १९:१९, २०.

अनैतिकतेबद्दल येशूच्या इशाऱ्‍याचे पालन करा

९. एक व्यक्‍ती कशा प्रकारे स्वैराचाराची आवड धरू शकते?

येशूने लैंगिक गोष्टींच्या बाबतीत यहोवाच्या स्तरांचे समर्थन केले. त्याने म्हटले: “तुम्ही वाचले नाही काय की, उत्पन्‍नकर्त्याने सुरुवातीलाच नरनारी अशी ती निर्माण केली, व म्हटले, ‘ह्‍याकरिता पुरुष आईबापास सोडून आपल्या बायकोशी जडून राहील आणि ती दोघे एकदेह होतील’? ह्‍यामुळे ती पुढे दोन नव्हत तर एकदेह अशी आहेत. म्हणून देवाने जे जोडले आहे ते माणसाने तोडू नये.” (मत्त. १९:४-६) आपण डोळ्यांनी जे पाहतो त्याचा आपल्या हृदयावर प्रभाव पडू शकतो हे येशूला माहीत होते. म्हणून, आपल्या डोंगरावरील प्रवचनात त्याने असे म्हटले: “‘व्यभिचार करू नको’ म्हणून सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे.” (मत्त. ५:२७, २८) जे लोक येशूने दिलेल्या या धोक्याच्या इशाऱ्‍याकडे दुर्लक्ष करतात, ते खरेतर स्वैराचाराची आवड धरत असतात.

१०. एक व्यक्‍ती पोर्नोग्राफीच्या सवयीपासून मुक्‍त होऊ शकते हे दाखवणारा एक अनुभव सांगा.

१० सैतान पोर्नोग्राफीचा (अश्‍लील साहित्याचा) वापर करून लैंगिक अनैतिकतेला उत्तेजन देतो. सध्याचे हे जग पोर्नोग्राफीने भरलेले आहे. जे पोर्नोग्राफी पाहतात, त्यांना आपल्या मनातून अनैतिक दृश्‍ये पुसून टाकणे कठीण जाते. त्यांना पोर्नोग्राफीचे व्यसनदेखील जडू शकते. एका ख्रिस्ती बांधवासोबत काय घडले ते पाहा. तो म्हणतो: “मी लपूनछपून पोर्नोग्राफी पाहायचो. मी माझं स्वतःचं एक कल्पनाविश्‍व तयार केलं होतं. मी करत असलेल्या यहोवाच्या सेवेशी याचा काहीएक संबंध नाही असं मला वाटलं होतं. ही सवय वाईट आहे हे मला माहीत होतं, तरीही मी करत असलेली देवाची सेवा त्याला मान्य आहे असं मी स्वतःला समजावलं होतं.” या बांधवाची विचारसरणी कशामुळे बदलली? तो म्हणतो: “माझ्या वाईट सवयीबद्दल मंडळीतील वडिलांना सांगणं माझ्याकरता सर्वात कठीण होतं. तरीसुद्धा, माझ्या समस्येबद्दल त्यांना सांगण्याचा मी निर्णय घेतला.” हा बांधव कालांतराने त्या घाणेरड्या सवयीपासून मुक्‍त झाला. तो म्हणतो: “या पापापासून स्वतःला मुक्‍त केल्यावर, मला एक शुद्ध विवेक प्राप्त झाला आहे असं मला सरतेशेवटी वाटलं.” जे स्वैराचाराचा द्वेष करतात, त्यांनी पोर्नोग्राफीचा द्वेष करण्यास शिकले पाहिजे.

११, १२. संगीताची निवड करण्याच्या बाबतीत आपण कसे दाखवू शकतो की आपण स्वैराचाराचा द्वेष करतो?

११ संगीताचा आणि त्याच्यासोबत जुळलेल्या गीतांच्या बोलांचा आपल्या भावनांवर, आणि म्हणूनच आपल्या लाक्षणिक हृदयावर जोरदार प्रभाव पडू शकतो. संगीत ही देवाकडून मिळालेली एक देणगी आहे आणि कितीतरी काळापासून संगीताचे खऱ्‍या उपासनेत महत्त्वाचे स्थान आहे. (निर्ग. १५:२०, २१; इफिस. ५:१९) पण, सैतानाचे दुष्ट जग अनैतिकतेचा गौरव करणाऱ्‍या संगीताला उत्तेजन देते. (१ योहा. ५:१९) तर मग, जे संगीत तुम्ही ऐकता त्याच्यामुळे तुमचे मन भ्रष्ट होत आहे की नाही हे तुम्ही कसे सांगू शकता?

१२ तुम्ही स्वतःला हे प्रश्‍न विचारण्याद्वारे असे करू शकता: ‘मी जी गाणी ऐकतो ती खून, व्यभिचार, जारकर्म, आणि ईशनिंदा यांचा गौरव करतात का? जर मी एखाद्या गाण्याचे बोल कोणाला वाचून दाखवले, तर मी स्वैराचाराचा द्वेष करणारा आहे असे माझ्याबद्दल त्या व्यक्‍तीचे मत बनेल का, की गाण्याच्या शब्दांतून माझे हृदय भ्रष्ट झाले असल्याचे दिसून येईल?’ आपण एकीकडे स्वैराचाराचा द्वेष करण्याचा दावा केला, पण दुसरीकडे स्वैराचाराचा गौरव करणारी गाणी ऐकत राहिलो, तर आपण स्वैराचाराचा द्वेष करत नसू. येशूने म्हटले: “जे तोंडातून निघते ते अंतःकरणातून येते व माणसाला विटाळविते. कारण अंतःकरणातूनच दुष्ट कल्पना, खून, व्यभिचार, जारकर्मे, चोऱ्‍या, खोट्या साक्षी, शिव्यागाळी ही निघतात.”—मत्त. १५:१८, १९; याकोब ३:१०, ११ पडताळून पाहा.

स्वैराचाराची आवड दाखवणाऱ्‍यांबद्दल येशूसारखा दृष्टिकोन बाळगा

१३. जे लोक सतत पाप करत राहिले अशांबद्दल येशूने कोणता दृष्टिकोन बाळगला?

१३ आपण पापी लोकांना किंवा स्वैराचार करणाऱ्‍यांना पश्‍चात्ताप करण्यासाठी बोलावण्यास आलो आहोत असे येशूने म्हटले. (लूक ५:३०-३२) पण, जे पाप करत राहतात अशांना त्याने कोणत्या दृष्टिकोनाने पाहिले? येशूने अशा लोकांच्या प्रभावापासून दूर राहण्याविषयी कडक इशारा दिला. (मत्त. २३:१५, २३-२६) त्याने स्पष्ट शब्दांत असेदेखील म्हटले: “मला ‘प्रभुजी, प्रभुजी,’ असे म्हणणाऱ्‍या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही; तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. त्या दिवशी [जेव्हा देव न्यायदंड बजावेल] पुष्कळ जण मला म्हणतील, ‘प्रभो, प्रभो, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने भुते घालविली, व तुझ्या नावाने पुष्कळ महत्कृत्ये केली नाहीत काय?’” पण, जे अपश्‍चात्तापीपणे स्वैराचार करत राहतात त्यांना झिडकारून तो म्हणेल: “माझ्यापुढून निघून जा.” (मत्त. ७:२१-२३) या लोकांचा अशा प्रकारे का न्याय केला जाईल? कारण, असे लोक देवाचा अपमान करतात आणि आपल्या स्वैराचारी कृत्यांनी इतरांना हानी पोहचवतात.

१४. पश्‍चात्ताप न करणाऱ्‍या पापी लोकांना मंडळीतून बाहेर का काढून टाकले जाते?

१४ पश्‍चात्ताप न दाखवता पाप करत राहणाऱ्‍यांना मंडळीतून बाहेर काढले जावे अशी आज्ञा देवाच्या वचनात दिली आहे. (१ करिंथकर ५:९-१३ वाचा.) कमीत कमी तीन कारणांसाठी असे करणे गरजेचे आहे: (१) यहोवाचे नाव निष्कलंक ठेवण्यासाठी, (२) दूषित होण्यापासून मंडळीचे संरक्षण करण्यासाठी, आणि (३) शक्य झाल्यास पाप करणाऱ्‍याला पश्‍चात्ताप करण्यास मदत करण्यासाठी.

१५. यहोवाला एकनिष्ठ राहण्याची आपली इच्छा असल्यास, आपण स्वतःला कोणते गंभीर प्रश्‍न विचारले पाहिजेत?

१५ जे लोक स्वैराचारी जीवन जगतात अशांबद्दल आपण येशूसारखा दृष्टिकोन बाळगतो का? आपण या प्रश्‍नांवर विचार करणे गरजेचे आहे: ‘एखाद्या बहिष्कृत व्यक्‍तीसोबत किंवा स्वतःहून मंडळीसोबत संबंध तोडलेल्या व्यक्‍तीसोबत नियमितपणे सहवास करण्याची मी निवड करेन का? ती व्यक्‍ती सध्या आपल्या घरात राहत नसली, तरी जवळच्या नात्यातली असते, तेव्हा काय?’ अशा परिस्थितीमुळे नीतिमत्त्वाबद्दल आपल्या प्रेमाची आणि देवाप्रती असलेल्या आपल्या एकनिष्ठेची खरोखर परीक्षा होऊ शकते. *

१६, १७. एका ख्रिस्ती आईला कोणत्या कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला, आणि अपश्‍चात्तापीपणे पाप करणाऱ्‍यांना बहिष्कृत करण्याच्या व्यवस्थेचे समर्थन करण्यास कोणत्या गोष्टीने तिला मदत केली?

१६ एका ख्रिस्ती बहिणीचा अनुभव विचारात घ्या. तिचा प्रौढ मुलगा एके काळी यहोवावर प्रेम करायचा. पण, काही काळाने तो अपश्‍चात्तापीपणे स्वैराचारी जीवन जगू लागला. त्यामुळे, त्याला मंडळीतून बहिष्कृत करण्यात आले. आपल्या या बहिणीचे यहोवावर प्रेम होते; पण तिचे आपल्या मुलावरही प्रेम होते. म्हणून, आपल्या मुलासोबत सहवास न ठेवण्याबद्दल बायबलच्या आज्ञेचे पालन करणे तिला खूप कठीण वाटत होते.

१७ तुम्हाला जर त्या बहिणीला सल्ला द्यायचा असता, तर तुम्ही तिला कोणता सल्ला दिला असता? तिला होत असलेल्या वेदनेची यहोवाला जाणीव आहे हे समजायला एका वडिलांनी तिला मदत केली. यहोवाच्या काही आत्मिक पुत्रांनी त्याच्याविरुद्ध बंड केला तेव्हा त्याला किती दुःख झाले असेल याबद्दल विचार करायला त्या बांधवाने तिला सांगितले. त्या वडिलांनी तिच्याशी तर्क केला, की अशी परिस्थिती किती वेदनादायक असू शकते हे यहोवाला माहीत असूनही, अपश्‍चात्तापी पापी लोकांना बहिष्कृत केले जावे अशी अपेक्षा तो करतो. तिने या सल्ल्याचे मनापासून पालन केले आणि बहिष्कृत करण्याबद्दलच्या व्यवस्थेचे एकनिष्ठपणे समर्थन केले. * अशा प्रकारच्या एकनिष्ठेमुळे यहोवाचे मन आनंदित होते.—नीति. २७:११.

१८, १९. (क) स्वैराचार करणाऱ्‍या व्यक्‍तीशी संपर्क तोडण्याद्वारे आपल्याला कशाचा द्वेष वाटत असल्याचे आपण दाखवतो? (ख) आपण देवाला व त्याच्या व्यवस्थेला एकनिष्ठ असतो तेव्हा काय निष्पन्‍न होते?

१८ तुम्हाला अशा परिस्थितीला तोंड द्यावे लागल्यास, कृपया लक्षात असू द्या की तुमच्याबद्दल यहोवाला सहानुभूती वाटते. बहिष्कृत व्यक्‍तीशी किंवा स्वतःहून मंडळीशी संबंध तोडलेल्या व्यक्‍तीशी संपर्क न ठेवण्याद्वारे तुम्ही दाखवत असता की तिच्या ज्या मनोवृत्तीमुळे आणि कृत्यांमुळे असे घडले त्यांचा तुम्हाला द्वेष वाटतो. पण, त्याच वेळी तुम्ही हेसुद्धा दाखवत असता की पाप करणाऱ्‍या व्यक्‍तीवर तुमचे प्रेम आहे आणि त्यामुळेच तुम्ही तिच्या भल्याकरता जे सर्वोत्तम आहे ते करू इच्छिता. तुम्ही यहोवाला एकनिष्ठ असता तेव्हा ताडन मिळालेली व्यक्‍ती पश्‍चात्ताप करण्याची आणि यहोवाकडे परत येण्याची शक्यता वाढू शकते.

१९ एक व्यक्‍ती जिला बहिष्कृत करण्यात आले आणि कालांतराने पुन्हा मंडळीत स्वीकारण्यात आले तिने असे लिहिले: “यहोवाचे आपल्या लोकांवर प्रेम असल्यामुळे आपली संघटना शुद्ध ठेवण्याची तो व्यवस्था करतो हे पाहून मला आनंद होतो. ही व्यवस्था बाहेरच्या लोकांना कठोर वाटू शकते, पण असे करणे आवश्‍यक व खरोखर प्रेमळपणाचे आहे.” तुम्हाला काय वाटते, ही स्त्री बहिष्कृत असताना जर मंडळीच्या सदस्यांनी—ज्यात तिचे कौटुंबिक सदस्यही होते—तिच्यासोबत नियमितपणे संपर्क ठेवला असता, तर तिला या निष्कर्षावर पोहचणे शक्य झाले असते का? बहिष्कृत करण्याच्या व्यवस्थेला पाठिंबा देण्याद्वारे आपण दाखवून देतो की नीतिमत्त्वाबद्दल आपल्याला प्रेम आहे आणि आचरणाच्या बाबतीत स्तर ठरवण्याचा हक्क यहोवाला आहे हे आपण मान्य करतो.

“वाइटाचा द्वेष करा”

२०, २१. स्वैराचाराचा द्वेष करण्यास शिकणे का महत्त्वाचे आहे?

२० “सावध असा, जागे राहा,” अशी ताकीद प्रेषित पेत्र देतो. का? कारण, “तुमचा शत्रु सैतान हा गर्जणाऱ्‍या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधीत फिरतो.” (१ पेत्र ५:८) तो तुम्हालासुद्धा गिळंकृत करेल का? तुम्ही स्वैराचाराचा किती चांगल्या प्रकारे द्वेष करता याच्यावर ते अवलंबून आहे.

२१ जे वाईट आहे त्याचा द्वेष करण्यास शिकणे खरेच सोपे नाही. आपण जन्मतःच पापी आहोत आणि आपण अशा एका जगात राहतो जेथे आपल्या शारीरिक इच्छा पूर्ण करण्याचे उत्तेजन आपल्याला दिले जाते. (१ योहा. २:१५-१७) तरीसुद्धा, येशू ख्रिस्ताचे अनुकरण करण्याद्वारे आणि यहोवा देवाबद्दल गाढ प्रेम वाढवण्याद्वारे आपण यशस्वीपणे स्वैराचाराबद्दल द्वेष विकसित करू शकतो. तर मग, यहोवा “आपल्या भक्‍तांच्या जीवांचे रक्षण करितो तो त्यांस दुर्जनांच्या हातांतून सोडवितो,” हा भरवसा मनापासून बाळगून आपण ‘वाइटाचा द्वेष करण्याचा’ पक्का निर्धार करू या.—स्तो. ९७:१०.

[तळटीपा]

^ या विषयाच्या तपशीलवार माहितीसाठी, देवाच्या प्रेमात टिकून राहा या पुस्तकातील पृष्ठे २३७-२३९ पाहा.

^ टेहळणी बुरूज, १ फेब्रुवारी २००१ या अंकातील पृष्ठे २८-२९ देखील पाहा.

तुमचे उत्तर काय असेल?

• मद्यपानाबद्दल आपल्या मनोवृत्तीचे परीक्षण करण्यास आपल्याला काय मदत करेल?

• भूतविद्येपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आपण कोणती पावले उचलू शकतो?

• पोर्नोग्राफी घातक का आहे?

• आपल्या एखाद्या प्रिय व्यक्‍तीला बहिष्कृत केले जाते तेव्हा आपण स्वैराचाराचा द्वेष करतो हे आपण कसे दाखवतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२९ पानांवरील चित्र]

तुम्ही मद्यपान करण्याचे ठरवल्यास, तुम्ही काय विचारात घेतले पाहिजे?

[३० पानांवरील चित्र]

मनोरंजनाच्या बाबतीत सैतानाच्या प्रभावापासून सावध असा

[३१ पानांवरील चित्र]

पोर्नोग्राफी पाहणारी व्यक्‍ती कशाबद्दल प्रेम विकसित करते?