देवाची कृपापसंती प्राप्त केल्याने सार्वकालिक जीवन मिळते
देवाची कृपापसंती प्राप्त केल्याने सार्वकालिक जीवन मिळते
“तूच नीतिमानाला आशीर्वाद देतोस; हे परमेश्वरा, तू त्याच्याभोवती कवचाप्रमाणे कृपेचे वेष्टन घालितोस.”—स्तो. ५:१२.
१, २. एलीयाने सारफथच्या विधवेजवळ कोणती विनंती केली, आणि त्याने तिला कोणते आश्वासन दिले?
सारफथ येथील एक स्त्री आणि तिचा मुलगा भुकेले होते; देवाचा संदेष्टा एलीयादेखील भुकेला होता. ती विधवा स्त्री जेवण बनवण्यासाठी लाकडे गोळा करत असताना, एलीया संदेष्ट्याने तिला प्यायला पाणी व खायला अन्न मागितले. तिने त्याला पाणी देण्याची तयारी दाखवली. पण खाण्यासाठी तिच्याकडे केवळ “मडक्यात मूठभर पीठ आणि कुपीत थोडेसे तेल” होते. संदेष्ट्याला खाण्यासाठी आपण काहीच देऊ शकत नाही असे तिला वाटले, आणि तिने त्याला तसे सांगितलेदेखील.—१ राजे १७:८-१२.
२ असे असले, तरी त्याने तिला म्हटले, “तू जा आणि म्हणतेस त्याप्रमाणे कर पण त्यापूर्वी माझ्यासाठी एक लहानशी भाकर भाजून आण, नंतर आपल्यासाठी व आपल्या मुलासाठी भाज. इस्राएलांचा देव परमेश्वर म्हणतो, परमेश्वर पृथ्वीवर पर्जन्यवृष्टि करील त्या दिवसापर्यंत तुझे पिठाचे मडके रिकामे होणार नाही आणि तेलाची कुपी आटणार नाही.”—१ राजे १७:१३, १४.
३. कोणता महत्त्वाचा प्रश्न आज आपल्यासमोर आहे?
३ आपल्याजवळ असलेले थोडेसे अन्न त्या संदेष्ट्यासोबत वाटून खावे की नाही याहीपेक्षा अधिक महत्त्वाचा निर्णय त्या विधवा स्त्रीला घ्यायचा होता. यहोवा, आपला व आपल्या मुलाचा बचाव करेल यावर ती भरवसा ठेवणार होती का, की देवाची कृपापसंती मिळवणे व त्याच्यासोबत घनिष्ठ नातेसंबंध जोडणे यापेक्षा तिला आपल्या भौतिक गरजा पूर्ण करणे जास्त महत्त्वाचे वाटणार होते? आज आपल्या सर्वांसमोर असाच प्रश्न आहे. भौतिक किंवा आर्थिक सुरक्षा मिळवण्यास झटण्यापेक्षा यहोवाची कृपापसंती मिळवण्यास आपण जास्त महत्त्व देऊ का? देवावर भरवसा ठेवण्याची व त्याची सेवा करण्याची अनेक कारणे आपल्याजवळ आहेत. आणि त्याची कृपापसंती मिळवण्यास झटण्यासाठी व त्याची कृपापसंती मिळण्यासाठी आपण पावले उचलू शकतो.
उपासना “स्वीकार करावयास तू योग्य आहेस”
४. आपली उपासना स्वीकार करावयास यहोवा योग्य का आहे?
४ मानवांनी स्वीकारयोग्य पद्धतीने आपली उपासना करावी अशी अपेक्षा करण्याचा यहोवाला अधिकार आहे. या गोष्टीला स्वर्गातील त्याच्या सेवकांच्या एका गटाने एकमताने दुजोरा दिला. त्यांनी म्हटले: “हे प्रभो, आमच्या देवा, गौरव, सन्मान व सामर्थ्य ह्यांचा स्वीकार करावयास तू योग्य आहेस; कारण तू सर्व काही निर्माण केले; तुझ्या इच्छेने ते झाले व अस्तित्वात आले.” (प्रकटी. ४:११) यहोवा सर्व गोष्टींचा निर्माणकर्ता असल्याकारणाने आपली उपासना स्वीकार करावयास योग्य आहे.
५. देवाला आपल्याबद्दल असलेल्या प्रेमामुळे आपण त्याची उपासना करण्यास प्रवृत्त का झालो पाहिजे?
५ यहोवाची उपासना करण्याचे आणखी एक कारण आपल्याजवळ आहे. ते म्हणजे त्याचे आपल्यावरील अपार प्रेम. बायबल म्हणते, की “देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला; देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला. नर व नारी अशी ती निर्माण केली.” (उत्प. १:२७) देवाची सेवा करायची की नाही हे ठरवण्याचा विशेषाधिकार आणि जबाबदारी देवाने मानवांना दिली आहे. आणि हा निर्णय घेण्याची क्षमतादेखील त्याने त्यांना दिली आहे. आपल्याला जीवन देण्याद्वारे, यहोवा मानवजातीचा पिता बनला. (लूक ३:३८) आपल्या मुलामुलींना जीवनाचा आनंद लुटता यावा म्हणून त्याने एका प्रेमळ पित्याप्रमाणे, त्यांना हव्या असलेल्या सर्व गोष्टींची तरतूद केली आहे. आपल्या पृथ्वी ग्रहाने सुंदर वातावरणात आपल्याकरता भरपूर अन्न उत्पन्न करावे म्हणून तो पृथ्वीवर “आपला सूर्य उगवितो” आणि “पाऊस पाडितो.”—मत्त. ५:४५.
६, ७. (क) आदामाने आपल्या सर्व वंशजांना कोणते नुकसान पोहचवले? (ख) देवाची कृपापसंती प्राप्त करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी ख्रिस्ताचे बलिदान काय करेल?
६ यहोवाने पापाच्या भयंकर परिणामांपासूनही आपली सुटका केली आहे. पाप करण्याद्वारे आदाम अशा एका जुगाऱ्याप्रमाणे बनला जो जुगार खेळण्यात आपली सर्व संपत्ती उधळून टाकतो. आदामाने यहोवाविरुद्ध बंड करून आपल्या मुलांचे भवितव्य अर्थात अनंतकाळचा आनंद हिरावून घेतला. त्याच्या स्वार्थामुळे मानव एका क्रूर धन्याचे म्हणजे अपरिपूर्णतेचे गुलाम बनले. त्यामुळे, सर्व मानव आजारी पडतात, दुःख अनुभवतात आणि कालांतराने मरतात. गुलामाला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी त्याचा मोबदला द्यावा लागतो. त्याचप्रमाणे यहोवानेसुद्धा मोबदला दिला आहे जेणेकरून अपरिपूर्णतेच्या त्या भयंकर परिणामांपासून आपली सुटका होऊ शकते. (रोमकर ५:२१ वाचा.) येशू ख्रिस्ताने आपल्या पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी “पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण” केला. (मत्त. २०:२८) लवकरच, या खंडणीचे पूर्ण फायदे, देवाची कृपापसंती प्राप्त करणाऱ्यांना मिळतील.
७ आपल्याला आनंदी व उद्देशपूर्ण जीवन देण्यासाठी आपल्या निर्माणकर्त्याने म्हणजे यहोवाने इतर कोणाहीपेक्षा जास्त केले आहे. आपल्यावर त्याची कृपापसंती असल्यामुळे, आतापर्यंत मानवजातीला झालेले नुकसान भरून काढण्यासाठी तो कशा प्रकारे कार्य करतो हे पाहण्याची संधी आपल्याला मिळेल. यहोवाचा “शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा” कसा बनतो हे तो आपल्यापैकी प्रत्येकाला पुढेही दाखवत राहील.—इब्री ११:६.
“तुझे लोक संतोषाने पुढे होतात”
८. देवाची सेवा करण्याबद्दल यशयाच्या उदाहरणावरून आपण काय शिकतो?
८ देवाची कृपापसंती प्राप्त करण्यासाठी आपण आपल्या इच्छास्वातंत्र्याचा उचितपणे वापर केला पाहिजे. कारण, यहोवा कोणालाही त्याची सेवा करण्याची जबरदस्ती करत नाही. यशयाच्या दिवसांत त्याने असे विचारले: “मी कोणाला पाठवू? आमच्यासाठी कोण जाईल?” यशयाला निर्णय घेण्याचा हक्क आहे याची जाणीव बाळगून यहोवाने त्याचा आदर केला. “हा मी आहे, मला पाठीव,” असे म्हणण्यात यशयाला किती आनंद झाला असेल याचा विचार करा.—यश. ६:८.
९, १०. (क) आपण कोणत्या मनोवृत्तीने देवाची सेवा केली पाहिजे? (ख) यहोवाची सेवा पूर्ण मनाने करणे उचित का आहे?
९ देवाची सेवा करावी की नाही हे ठरवण्याचे स्वातंत्र्य मानवांना आहे. आपण स्वखुशीने यहोवाची सेवा करावी अशी त्याची इच्छा आहे. (यहोशवा २४:१५ वाचा.) जे रडतखडत देवाची उपासना करतात अशा लोकांची उपासना तो स्वीकारत नाही. तसेच, ज्यांचा मुख्य हेतू इतरांना खूश करणे हा असतो अशा लोकांची भक्तीदेखील तो स्वीकारत नाही. (कलस्सै. ३:२२) सांसारिक गोष्टींना आपल्या उपासनेच्या आड येऊ देऊन पवित्र सेवा करण्याच्या बाबतीत आपण “हयगय” केल्यास, आपल्यावर देवाची कृपापसंती होणार नाही. (निर्ग. २२:२९) पूर्ण मनाने यहोवाची सेवा करणे आपल्याच भल्यासाठी आहे हे त्याला माहीत आहे. मोशेने इस्राएलांना आर्जवले, की त्यांनी ‘आपला देव परमेश्वर ह्याच्यावर प्रीति करण्याद्वारे, त्याची वाणी ऐकण्याद्वारे व त्याला धरून राहण्याद्वारे’ जीवनाची निवड करावी.—अनु. ३०:१९, २०.
१० प्राचीन इस्राएलचा राजा दावीद याने एका स्तोत्रात असे गायिले: “तुझ्या पराक्रमाच्या दिवशी तुझे लोक संतोषाने पुढे होतात, पावित्र्याने मंडित झालेले तुझे तरुण तुला पहाटेच्या दहिवरासारखे आहेत.” (स्तो. ११०:३) आज पुष्कळ लोक आर्थिक सुरक्षा व ऐशआराम यांना जीवनात सगळ्यात जास्त महत्त्व देतात. पण, जे यहोवावर प्रेम करतात ते आपल्या जीवनात त्याच्या सेवेला सगळ्यात जास्त महत्त्व देतात. ते ज्या आवेशाने सुवार्तेचा प्रचार करतात त्यावरून हे स्पष्टपणे दिसून येते. यहोवा आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करेल यावर त्यांचा पूर्ण भरवसा आहे.—मत्त. ६:३३, ३४.
देवाला स्वीकारयोग्य अशी अर्पणे
११. यहोवाला बलिदाने अर्पण केल्याने इस्राएली लोकांना कोणता फायदा मिळण्याची आशा होती?
११ नियमशास्त्राच्या कराराधीन असल्यामुळे देवाची कृपापसंती प्राप्त करण्यासाठी देवाचे लोक त्याला स्वीकारयोग्य अशी बलिदाने अर्पण करायचे. लेवीय १९:५ मध्ये असे म्हटले आहे: “तुम्ही परमेश्वराप्रीत्यर्थ शांत्यर्पणाचा यज्ञ कराल तेव्हा तुम्ही मला मान्य व्हाल असा तो करा.” याच पुस्तकात आपल्याला असे वाचायला मिळते: “तुम्ही परमेश्वराप्रीत्यर्थ उपकारस्तुतीच्या बलीचा यज्ञ कराल तेव्हा तुमचा स्वीकार होईल अशा प्रकारे तो करा.” (लेवी. २२:२९) इस्राएली लोकांनी यहोवाच्या वेदीवर पशूंची योग्य बलिदाने अर्पण केली, तेव्हा हळूहळू वर जाणारा धूर खऱ्या देवाकरता “सुवासिक हव्य” असा होता. (लेवी. १:९, १३) देवाच्या लोकांनी त्याच्याबद्दल दाखवलेल्या अशा प्रेमळ अभिव्यक्तींमुळे त्याचे मन प्रसन्न व प्रफुल्लित व्हायचे. (उत्प. ८:२१) नियमशास्त्राच्या या पैलूंत आपल्याला एक तत्त्व सापडते, जे आजदेखील लागू होते. ते हेच, की जे लोक यहोवाला स्वीकारयोग्य बलिदाने अर्पण करतात, त्यांना त्याची कृपापसंती प्राप्त होते. तर मग, तो कोणत्या प्रकारची बलिदाने स्वीकार करतो? जीवनातील दोन पैलू विचारात घ्या: आपले आचरण व आपले बोलणे.
१२. आपण ‘आपली शरीरे यज्ञ म्हणून समर्पण केली’ तरी कोणत्या कृत्यांमुळे ती देवाला घृणास्पद वाटू शकतात?
१२ प्रेषित पौलाने रोमकरांना लिहिलेल्या आपल्या पत्रात असे म्हटले: “तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी.” (रोम. १२:१) देवाची कृपापसंती प्राप्त करण्यासाठी एका व्यक्तीने आपले शरीर देवाला स्वीकारयोग्य असे ठेवले पाहिजे. जर तिने तंबाखू, सुपारी, अंमली पदार्थ सेवन केले किंवा दारूची नशा केली, तर तिच्या अर्पणाला काहीही किंमत राहणार नाही. (२ करिंथ. ७:१) शिवाय, “जो जारकर्म करितो तो आपल्या शरीराबाबत पाप करितो;” त्यामुळे, कोणत्याही प्रकारचे अनैतिक कृत्य करणाऱ्या व्यक्तीचे बलिदान यहोवाला घृणास्पद वाटते. (१ करिंथ. ६:१८) देवाचे मन आनंदित करण्यासाठी, एका व्यक्तीने ‘सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र असले’ पाहिजे.—१ पेत्र १:१४-१६.
१३. आपण यहोवाची स्तुती करणे हे योग्य का आहे?
१३ आपण करत असलेल्या आणखी एका अर्पणामुळे यहोवाला आनंद होतो. ते म्हणजे, आपले बोलणे. यहोवावर प्रेम करणाऱ्यांनी आपल्या बोलण्याद्वारे सार्वजनिक रीत्या व एकांतात नेहमीच त्याची प्रशंसा केली आहे. (स्तोत्र ३४:१-३ वाचा.) स्तोत्रे १४८-१५० वाचा आणि या तीन स्तोत्रांत यहोवाची स्तुती करण्याचे उत्तेजन किती वेळा दिले आहे ते पाहा. खरेच, “सरळ माणसांना स्तुतिगान शोभते.” (स्तो. ३३:१) आणि आपला आदर्श, येशू ख्रिस्त याने सुवार्तेचा प्रचार करण्याद्वारे देवाची स्तुती करण्याच्या महत्त्वावर भर दिला आहे.—लूक ४:१८, ४३, ४४.
१४, १५. होशेयने इस्राएली लोकांना कोणत्या प्रकारची बलिदाने अर्पण करण्याची विनवणी केली, आणि त्याबद्दल यहोवाला कसे वाटले?
१४ आपण आवेशाने प्रचार करतो तेव्हा यहोवावर आपले किती प्रेम आहे आणि त्याची कृपापसंती प्राप्त करण्याची आपल्याला किती इच्छा आहे हे दिसून येते. उदाहरणार्थ, खोट्या उपासनेच्या मागे लागून देवाची कृपापसंती गमावलेल्या इस्राएली लोकांना होशेय संदेष्ट्याने कसे प्रोत्साहन दिले होते ते पाहा. (होशे. १३:१-३) होशेयने त्यांना अशी विनवणी करण्यास सांगितले: “तू [यहोवा] सर्व अन्याय दूर कर आणि जे चांगले आहे त्याचा स्वीकार कर; म्हणजे आम्ही आपले ओठ वासरे असे अर्पू.”—होशे. १४:१, २, पं.र.भा.
१५ इस्राएली लोक यहोवाला अर्पण करत असलेल्या पशूंपैकी वासरे सगळ्यात महाग होते. म्हणून, “आपले ओठ वासरे असे अर्पू” हा वाक्यांश, खऱ्या देवाची स्तुती करण्यासाठी मनापासून व विचारपूर्वक उच्चारलेल्या शब्दांना सूचित करतो. अशा प्रकारचे अर्पण करणाऱ्यांबद्दल यहोवाला कसे वाटले? त्याने म्हटले: ‘मी त्यांजवर मोकळ्या मनाने प्रीति करीन.’ (होशे. १४:४) अशी स्तुतीची बलिदाने अर्पण करणाऱ्यांना यहोवाने क्षमा केली, त्यांच्याबद्दल आपली कृपापसंती व्यक्त केली आणि तो त्यांचा मित्र बनला.
१६, १७. देवावरील विश्वासामुळे प्रवृत्त होऊन एक व्यक्ती सुवार्तेचा प्रचार करते, तेव्हा यहोवा तिची स्तुती कशा प्रकारे स्वीकारतो?
१६ सार्वजनिक रीत्या यहोवाची स्तुती करणे हे नेहमीच खऱ्या उपासनेचे महत्त्वाचे अंग राहिले आहे. खऱ्या देवाची महिमा करणे स्तोत्रकर्त्याला इतके महत्त्वाचे वाटले की त्याने देवाला अशी विनवणी केली: “हे परमेश्वरा, माझ्या तोंडची वचने ही स्वखुशीची अर्पणे समजून मान्य कर.” (स्तो. ११९:१०८) आजच्याबद्दल काय? आज आपल्या काळातील एका मोठ्या लोकसमुदायाबद्दल बोलताना, यशयाने अशी भविष्यवाणी केली: ‘ते परमेश्वराचा आनंदभराने गुणानुवाद करितील. ते [त्यांच्या भेटवस्तू] मला पसंत पडून माझ्या [देवाच्या] वेदीवर चढतील.’ (यश. ६०:६, ७) या भविष्यवाणीच्या पूर्ततेत, आज लाखो लोक ‘देवाचे नाव पत्करणाऱ्या ओठांचे फळ असा स्तुतीचा यज्ञ त्याला नित्य अर्पण करत’ आहेत.—इब्री १३:१५.
१७ तुमच्याबद्दल काय? तुम्ही देवाला स्वीकारयोग्य अशी बलिदाने अर्पण करत आहात का? नसाल, तर तुम्ही आवश्यक ते बदल करून यहोवाची सार्वजनिक रीत्या स्तुती करण्यास सुरुवात कराल का? देवावरील विश्वासामुळे प्रेरित होऊन तुम्ही सुवार्तेचा प्रचार करण्यास सुरुवात करता, तेव्हा तुमचे अर्पण बैलांच्या अर्पणापेक्षा जास्त “परमेश्वराला आवडेल.” (स्तोत्र ६९:३०, ३१ वाचा.) तुम्ही याची खातरी बाळगू शकता की तुमच्या स्तुतीच्या अर्पणांचा ‘सुगंध’ यहोवापर्यंत पोहचेल आणि तो तुमच्या अर्पणांचा स्वीकार करेल. (यहे. २०:४१) तुमच्या आनंदाला तेव्हा पारावार उरणार नाही.
यहोवा स्वतः ‘नीतिमानाला आशीर्वाद देईल’
१८, १९. (क) आज देवाची सेवा करण्याबद्दल अनेक लोकांचा काय दृष्टिकोन आहे? (ख) देवाची कृपापसंती गमावल्याचा परिणाम काय होतो?
१८ मलाखीच्या दिवसांतील काही लोकांनी काढला तसाच निष्कर्ष आज पुष्कळ लोक काढतात, की “देवाची सेवा करणे व्यर्थ आहे; त्याने आज्ञापिल्याप्रमाणे आम्ही केले व सेनाधीश परमेश्वरापुढे आम्ही शोकवस्त्रे धारण करून चाललो यापासून लाभ काय?” (मला. ३:१४) भौतिकवादाच्या मागे लागल्यामुळे, त्यांना असे वाटते की देवाचा उद्देश कधीही पूर्ण होणार नाही आणि त्याचे नियम आपल्या काळाला लागू होत नाहीत. त्यांच्या मते, सुवार्तेचा प्रचार करणे म्हणजे निव्वळ वेळ वाया घालवणे आणि डोकेदुखी आहे.
१९ अशा प्रवृत्तीची सुरुवात एदेन बागेत झाली होती. सैतानाने हव्वेला यहोवाने दिलेल्या अद्भुत जीवनाच्या खऱ्या किंमतीचा अनादर करण्यास आणि देवाच्या कृपापसंतीला तुच्छ लेखण्यास प्रवृत्त केले होते. आजही, सैतान लोकांना असे मानण्यास प्रवृत्त करतो की देवाच्या इच्छेप्रमाणे केल्याने काहीही प्राप्त होणार नाही. पण, हव्वा आणि तिचा पती आदाम यांना कळून चुकले की देवाची कृपापसंती गमावणे म्हणजे आपला जीव गमावणे. आज जे लोक त्यांच्या वाईट उदाहरणाचे अनुकरण करतात, त्यांनादेखील लवकरच त्याच कटू सत्याचा अनुभव येईल.—उत्प. ३:१-७, १७-१९.
२०, २१. (क) सारफथच्या विधवेने काय केले, आणि त्याचा काय परिणाम झाला? (ख) आपण सारफथच्या विधवेचे अनुकरण का केले पाहिजे आणि आपण ते कसे करू शकतो?
२० आदाम व हव्वा यांचा दुःखद अंत आणि एलीया व सारफथची विधवा यांच्याविषयी याआधी उल्लेख केलेल्या घटनांच्या शेवटी जे घडले याची तुलना करा. एलीयाचे प्रोत्साहनदायक शब्द ऐकल्यानंतर त्या विधवा स्त्रीने तिच्याजवळ जे काही अन्न होते ते शिजवून आधी एलीयाला खायला दिले. मग, यहोवाने एलीयाद्वारे दिलेले आपले वचन पूर्ण केले. बायबलमधील अहवाल म्हणतो: “तो, ती व तिचे कुटुंब यांचा त्यावर पुष्कळ दिवस निर्वाह झाला. परमेश्वर एलीयाच्या द्वारे जे वचन बोलला त्याप्रमाणे तिचे ते पिठाचे मडके रिकामे झाले नाही आणि तेलाची कुपीहि आटली नाही.”—१ राजे १७:१५, १६.
२१ सारफथच्या विधवेने असे काहीतरी केले जे आज हयात असलेल्या अब्जावधी लोकांपैकी केवळ मोजकेच लोक करायला तयार होतील. तिने तारण करणाऱ्या देवावर पूर्ण भरवसा ठेवला, आणि देवाने तिचा भरवसा तोडला नाही. या व बायबलमधील अशा इतर अहवालांवरून सिद्ध होते की यहोवावर आपण पूर्णपणे भरवसा ठेवू शकतो. (यहोशवा २१:४३-४५; २३:१४ वाचा.) यहोवाची कृपापसंती असलेल्यांना तो कधीही त्यागणार नाही याचा आणखी पुरावा आधुनिक काळातील त्याच्या साक्षीदारांच्या जीवनावरून आपल्याला मिळतो.—स्तो. ३४:६, ७, १७-१९. *
२२. विलंब न करता देवाची कृपापसंती प्राप्त करण्याचा प्रयत्न करणे का निकडीचे आहे?
२२ देवाच्या न्यायदंडाचा दिवस “अवघ्या पृथ्वीच्या पाठीवर राहणाऱ्या सर्व लोकांवर” येऊन ठेपलेला आहे. (लूक २१:३४, ३५) त्यातून कोणीही सुटणार नाही. धनसंपत्ती किंवा ऐशआरामाच्या गोष्टी त्या दिवशी कवडीमोलाच्या ठरतील. त्या वेळी, देवाचा नियुक्त न्यायाधीश म्हणेल: “अहो, माझ्या पित्याचे आशीर्वादितहो, या; जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुम्हाकरिता सिद्ध केले आहे ते वतन घ्या.” (मत्त. २५:३४) होय, यहोवा ‘नीतिमानाला आशीर्वाद देतो; तो त्याच्याभोवती कवचाप्रमाणे कृपेचे वेष्टन घालितो.’ (स्तो. ५:१२) तर मग, आपण देवाची कृपापसंती प्राप्त करण्याचा प्रयत्न करू नये का?
[तळटीप]
^ टेहळणी बुरूज, १ एप्रिल २००५, पृष्ठ ११, परिच्छेद १५; १ ऑगस्ट १९९७, पृष्ठे २०-२५ पाहा.
तुम्हाला आठवते का?
• यहोवा आपली उपासना स्वीकारण्यास योग्य का आहे?
• आज यहोवा कोणती बलिदाने स्वीकारतो?
• “आपले ओठ वासरे असे अर्पू” हा वाक्यांश कशाला सूचित करतो, आणि आपण यहोवाला त्यांचे अर्पण का केले पाहिजे?
• आपण देवाची कृपापसंती प्राप्त करण्याचा प्रयत्न का केला पाहिजे?
[अभ्यासाचे प्रश्न]
[१३ पानांवरील चित्र]
देवाच्या संदेष्ट्याने एका गरजू मातेला कोणता महत्त्वाचा निर्णय घेण्यास लावले?
[१५ पानांवरील चित्र]
यहोवाला स्तुतीची बलिदाने अर्पण केल्याने आपल्याला कोणता फायदा होतो?
[१७ पानांवरील चित्र]
तुम्ही यहोवावर पूर्णपणे भरवसा ठेवल्यास, तो तुम्हाला निराश करणार नाही