व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पवित्र आत्मा —सृष्टिकार्यातील त्याची भूमिका

पवित्र आत्मा —सृष्टिकार्यातील त्याची भूमिका

पवित्र आत्मा —सृष्टिकार्यातील त्याची भूमिका

“परमेश्‍वराच्या शब्दाने आकाश निर्माण झाले; त्याच्या मुखश्‍वासाने आकाशातील सर्व सैन्य निर्माण झाले.”—स्तो. ३३:६.

१, २. (क) काळाच्या ओघात अवकाश व पृथ्वी यांबद्दलचे मानवाचे ज्ञान कसे वाढत गेले? (ख) कोणत्या प्रश्‍नाचे उत्तर मिळवणे आवश्‍यक आहे?

 सन १९०५ मध्ये, ॲल्बर्ट आइन्स्टाइन यांनी जगासमोर त्यांचा मर्यादित सापेक्षता सिद्धांत मांडला तेव्हा त्यांचा व इतर अनेक शास्त्रज्ञांचा असा विश्‍वास होता, की या विश्‍वात केवळ एकच तारामंडळ आहे. ते म्हणजे आपली आकाशगंगा. विश्‍वाच्या आकारासंबंधी त्यांनी बांधलेला हा अंदाज किती चुकीचा होता! आज असे मानले जाते, की अवकाशात १०,००० कोटींहून अधिक तारामंडळ असून त्यांपैकी काही तारामंडळांत अब्जावधी तारे आहेत. जसजसे अधिकाधिक शक्‍तीशाली दुर्बिणी वापरल्या जात आहेत किंवा त्या पृथ्वीच्या कक्षेत पाठवल्या जात आहेत तसतसा अधिकाधिक तारामंडळांचा शोध लागत आहे.

ज्याप्रमाणे १९०५ पर्यंत अवकाशाविषयीचे ज्ञान मर्यादित होते, त्याचप्रमाणे पृथ्वीविषयीचे ज्ञानदेखील मर्यादितच होते. हे कबूल आहे, की शंभर वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या लोकांना त्यांच्या पूर्वजांपेक्षा नक्कीच जास्त ज्ञान होते. पण आज जीवनाचे सौंदर्य व जटिलता यांविषयी आणि जीवनास साहाय्यकारी असणाऱ्‍या यंत्रणांविषयी मानवाला असलेले ज्ञान पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने अधिक वाढले आहे. आणि येणाऱ्‍या वर्षांत पृथ्वी व अवकाश यांबद्दल आपण आणखी बरेच काही शिकू यात शंका नाही. पण, आपण स्वतःला हा प्रश्‍न विचारणे विशेष महत्त्वाचे आहे की, मुळात हे सर्व अस्तित्वात आलेच कसे? या प्रश्‍नाचे उत्तर खुद्द निर्माणकर्त्याने पवित्र शास्त्रवचनांत प्रकट केले आहे, केवळ त्यामुळेच आपल्याला त्याचे उत्तर मिळू शकते.

सृष्टीची किमया

३, ४. देवाने विश्‍वाची निर्मिती कशी केली, आणि त्याची कार्ये त्याची महिमा कशी करतात?

हे विश्‍व अस्तित्वात कसे आले याचे स्पष्टीकरण बायबलच्या सुरुवातीच्या शब्दांत आढळते: “प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्‍न केली.” (उत्प. १:१) यहोवाने हे भौतिक विश्‍व निर्माण केले त्याआधी काहीच अस्तित्वात नव्हते. याचा अर्थ, ज्या द्रव्यापासून या विश्‍वाची निर्मिती करण्यात आली ते द्रव्य प्रथम त्याला तयार करावे लागणार होते. यहोवाने आपल्या पवित्र आत्म्याचा अर्थात आपल्या सामर्थ्यशाली क्रियाशील शक्‍तीचा उपयोग करून आकाश, पृथ्वी आणि विश्‍वातील इतर सर्व गोष्टी उत्पन्‍न केल्या. एखादी वस्तू बनवण्यासाठी एक मानवी शिल्पकार आपल्या हातांचा व हत्यारांचा उपयोग करतो. पण, देव मात्र आपली महान कार्ये साध्य करण्यासाठी आपला पवित्र आत्मा पाठवतो.

बायबलमध्ये पवित्र आत्म्याचा उल्लेख लाक्षणिक रीत्या देवाचे ‘बोट’ असा करण्यात आला आहे. (लूक ११:२०, पं.र.भा.; मत्त. १२:२८) आणि “त्याची हस्तकृति”—यहोवाने आपल्या पवित्र आत्म्याद्वारे जे काही निर्माण केले—त्याचा अमाप महिमा करते. स्तोत्रकर्ता दावीद याने असे गायिले: “आकाश देवाचा महिमा वर्णिते; अंतरिक्ष त्याची हस्तकृति दर्शविते.” (स्तो. १९:१) होय, भौतिक सृष्टी देवाच्या पवित्र आत्म्याच्या विलक्षण सामर्थ्याची साक्ष देते यात शंका नाही. (रोम. १:२०) सृष्टी हे कसे करते?

देवाचे अमर्याद सामर्थ्य

५. यहोवाच्या पवित्र आत्म्याचे सामर्थ्य सृष्टिकार्यांतून कसे दिसून येते हे उदाहरण देऊन सांगा.

यहोवाच्या सामर्थ्याचा व उर्जेचा साठा केव्हाही संपत नाही याचा पुरावा आपल्या कल्पनातीत अफाट विश्‍वातून आपल्याला मिळतो. (यशया ४०:२६ वाचा.) आधुनिक विज्ञानाने हे दाखवून दिले आहे, की वस्तुमानाचे रूपांतर उर्जेत व उर्जेचे रूपांतर वस्तुमानात करता येते. वस्तुमानाचे रूपांतर उर्जेत होते याचे एक उदाहरण म्हणजे आपला सूर्य जो एक तारा आहे. सूर्य प्रति सेकंदाला जवळजवळ चार दशलक्ष टन वस्तुमानाचे रूपांतर सूर्यप्रकाशात व इतर स्वरूपाच्या किरणोत्सर्गी उर्जेत करतो. त्या उर्जेचा केवळ एक छोटासा अंश पृथ्वीपर्यंत पोहचतो. तरीसुद्धा, पृथ्वीवरील जीवन टिकवून ठेवण्यास ती उर्जा पुरेशी आहे. तर मग यात शंकाच नाही, की केवळ सूर्याचीच नव्हे, तर इतर अब्जावधी ताऱ्‍यांची निर्मिती करण्यासाठी प्रचंड सामर्थ्याची व उर्जेची गरज होती. यासाठी आवश्‍यक असलेली उर्जा आणि इतकेच नव्हे, तर याहून कितीतरी पटीने अधिक उर्जा यहोवाजवळ आहे.

६, ७. (क) देवाने आपल्या पवित्र आत्म्याचा अगदी सुव्यवस्थितपणे उपयोग केला आहे असे का म्हणता येईल? (ख) विश्‍वाची निर्मिती योगायोगाने झाली नाही हे कशावरून दिसून येते?

देवाने आपल्या पवित्र आत्म्याचा अगदी सुव्यवस्थितपणे उपयोग केला याचा भरपूर पुरावा आपल्या अवतीभोवती आपल्याला पाहायला मिळतो. उदाहरणार्थ: असे समजा, की तुमच्याजवळ एक खोके आहे ज्यात वेगवेगळ्या रंगांचे अनेक चेंडू आहेत. चेंडू पूर्णपणे एकमेकांत मिसळावेत म्हणून तुम्ही ते खोके चांगले हालवता. मग, एकाच वेळी तुम्ही ते सर्व चेंडू मैदानावर फेकून देता. निळ्या रंगाच्या चेंडूंनी एकत्र यावे, पिवळ्या रंगाच्या चेंडूंनी एकत्र यावे, याप्रमाणे सर्व चेंडूंनी आपापल्या रंगानुसार एकत्र यावे अशी अपेक्षा तुम्ही कराल का? मुळीच नाही! सहसा सर्व अनियंत्रित कृतींचा परिणाम सुव्यवस्थेपेक्षा अव्यवस्थेतच होतो. हा निसर्गाचा मूलभूत नियम आहे असे मानले जाते. *

पण, आपण वर आकाशात पाहतो किंवा दुर्बिणीच्या साहाय्याने आकाशाचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला काय दिसते? आपल्याला ग्रह, तारे, तारामंडळ यांच्यात कमालीची व उच्च प्रतीची सुव्यवस्था तर दिसतेच, शिवाय ते सर्व विलक्षण अचूकतेने भ्रमण करत असल्याचेही दिसते. हा नक्कीच योगायोग असू शकत नाही किंवा एक आकस्मिक, अनियंत्रित वैश्‍विक अपघात असू शकत नाही. तेव्हा, आपण स्वतःला विचारले पाहिजे, की आपले हे सुव्यवस्थित विश्‍व निर्माण करण्यासाठी मुळात कोणत्या शक्‍तीचा उपयोग करण्यात आला होता? या विश्‍वाच्या निर्मितीमागे मुळात कोणत्या शक्‍तीचा हात आहे हे आपण मानव निव्वळ वैज्ञानिक संशोधनाच्या व प्रयोगाच्या बळावर जाणू शकत नाही. पण, बायबल आपल्याला सांगते की ती शक्‍ती देवाचा पवित्र आत्मा असून ती विश्‍वातील सगळ्यात सामर्थ्यशाली शक्‍ती आहे. स्तोत्रकर्त्याने असे गायिले: “परमेश्‍वराच्या शब्दाने आकाश निर्माण झाले; त्याच्या मुखश्‍वासाने आकाशातील सर्व सैन्य निर्माण झाले.” (स्तो. ३३:६) रात्रीच्या वेळी आपण आकाशात पाहतो तेव्हा ताऱ्‍यांच्या त्या ‘सैन्याचा’ केवळ एक अत्यल्प भाग आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो!

पवित्र आत्मा आणि पृथ्वी

८. यहोवाच्या कार्यांबद्दल आपल्याला वास्तवात कितपत माहीत आहे?

निसर्गाबद्दल आणखी इतके काही जाणून घेण्यासारखे आहे, की त्याच्या तुलनेत सध्या आपल्याला जितके माहीत आहे ते काहीच नाही. देवाच्या सृष्टिकार्यांबद्दल सध्याचे आपले ज्ञान किती आहे याबद्दल विश्‍वासू पुरुष ईयोब याने असे म्हटले: “पाहा; ह्‍या त्याच्या कार्यक्षेत्राच्या केवळ सीमा आहेत; त्याची केवळ चाहूल आपल्या कानी येते.” (ईयो. २६:१४) याच्या अनेक शतकांनंतर, देवाच्या सृष्टीचे बारकाईने निरीक्षण करणाऱ्‍या शलमोन राजाने असे म्हटले: “आपआपल्या समयी होणारी हरएक वस्तु [देवाने] सुंदर बनविली आहे; त्याने मनुष्याच्या मनात अनंतकालाविषयीची कल्पना उत्पन्‍न केली आहे; तरी देवाचा आदिपासून अंतापर्यंतचा कार्यक्रम मनुष्याला उमगत नाही.”—उप. ३:११; ८:१७.

९, १०. पृथ्वीची निर्मिती करण्यासाठी देवाने कोणत्या शक्‍तीचा उपयोग केला, आणि निर्मितीच्या पहिल्या तीन दिवसांदरम्यान कोणत्या काही घडामोडी घडल्या?

पण, यहोवाने त्याच्या कार्यांबद्दलची आवश्‍यक माहिती आपल्याला सांगितली आहे. उदाहरणार्थ, बायबल आपल्याला सांगते, की असंख्य युगांपूर्वी देवाचा आत्मा पृथ्वीवर कार्यरत होता. (उत्पत्ति १:२ वाचा.) त्या वेळी कोरडी भूमी नव्हती, की प्रकाश नव्हता आणि श्‍वासोच्छ्‌वास करण्यासाठी आवश्‍यक असलेली हवादेखील बहुधा पृथ्वीच्या पृष्ठभागावर नव्हती.

१० निर्मितीच्या सहा दिवसांदरम्यान देवाने काय काय केले त्याचे वर्णन बायबल करते. निर्मितीचा प्रत्येक दिवस २४ तासांचा नसून, महत्त्वाच्या घडामोडींचा दीर्घ कालावधी आहे. निर्मितीच्या पहिल्या दिवशी यहोवाने पृथ्वीच्या पृष्ठभागावर प्रकाश पाडण्यास सुरुवात केली. पृथ्वीवरून नंतर सूर्य व चंद्र स्पष्टपणे दिसू लागले तेव्हा ही प्रक्रिया संपली. (उत्प. १:३, १४) दुसऱ्‍या दिवशी, देवाने पृथ्वीभोवतीच्या वातावरणाची निर्मिती करायला सुरुवात केली. (उत्प. १:६) आता पृथ्वीवर पाणी, प्रकाश आणि हवा होती. पण, अद्याप कोरडी जमीन नव्हती. तिसऱ्‍या दिवसाच्या सुरुवातीला यहोवाने आपल्या पवित्र आत्म्याचा उपयोग करून कोरडी जमीन तयार केली. जगव्याप्त समुद्रातून भूखंड तयार करण्यासाठी देवाने कदाचित भूगर्भातील जबरदस्त नैसर्गिक शक्‍तींचा उपयोग केला असावा. (उत्प. १:९) तिसऱ्‍या दिवशी व त्यानंतरच्या निर्मितीच्या काळादरम्यान आणखी बऱ्‍याच स्तिमित करणाऱ्‍या घडामोडी घडणार होत्या.

पवित्र आत्मा आणि जीवसृष्टी

११. जीवधारी प्राण्यांमधील जटिलता, प्रमाणबद्धता आणि सौंदर्य यांतून काय दिसून येते?

११ देवाच्या पवित्र आत्म्याने अतिशय सुसंघटित जीवसृष्टीदेखील उत्पन्‍न केली आहे. निर्मितीच्या तिसऱ्‍या ते सहाव्या दिवसापर्यंत देवाने आपल्या पवित्र आत्म्याद्वारे, आपल्याला थक्क करतील इतक्या विविध जातीची झाडे व प्राणी निर्माण केले. (उत्प. १:११, २०-२५) त्यामुळेच जीवधारी प्राण्यांमध्ये आपल्याला जटिलता, प्रमाणबद्धता आणि सौंदर्य यांची अगणित उदाहरणे पाहायला मिळतात, ज्यांतून अतिशय उच्च प्रतीच्या रचनेची ग्वाही मिळते.

१२. (क) डीएनए कोणती कार्ये पार पाडतो? (ख) डीएनए यशस्वीपणे सतत आपली कार्ये पार पाडतो यावरून आपण काय शिकतो?

१२ ‘डीएनए’ (डीऑक्सिरायबोन्यूक्लिइक ॲसिड) याचाच विचार करा. एका पिढीची गुणलक्षणे दुसऱ्‍या पिढीत उतरवणारी सजीवांमधील ही एक रासायनिक प्रक्रिया आहे. पृथ्वीवरील सर्व सजीव—मग ते सूक्ष्म जीव असोत, गवत असो, हत्ती असोत, देवमासे असोत किंवा मानव असोत—डीएनएद्वारेच पुनरुत्पादन करतात. पृथ्वीवरील सर्व सजीव एकमेकांपासून कमालीचे वेगळे असले, तरी त्यांची अनेक आनुवंशिक गुणलक्षणे नियंत्रणात ठेवणारा डीएनए व त्याचा वापर करणाऱ्‍या जैविक यंत्रणा अतिशय स्थिर असून यांमुळे युगानुयुग सजीवांमधील मूळ जाती इतर जातींपासून वेगळ्या राहण्यास शक्य झाले आहे. म्हणूनच, यहोवा देवाच्या उद्देशानुसार, पृथ्वीवरील निरनिराळे सजीव जीवनाच्या गुंतागुंतीच्या जाळ्यातील आपापली कार्ये सतत पार पाडत असतात. (स्तो. १३९:१६) विलक्षण परिणामकारक असलेल्या या सुव्यवस्थेवरून याचा आणखीनच पुरावा मिळतो की देवाच्या ‘बोटाने,’ किंवा पवित्र आत्म्याच्या साहाय्याने सृष्टी अस्तित्वात आली.

पृथ्वीवरील सृष्टीचा शिरोमणी

१३. देवाने मानवाची निर्मिती कशी केली?

१३ अनेक युगे उलटल्यानंतर आणि देवाने असंख्य सजीव व निर्जीव गोष्टी निर्माण केल्यानंतर, पृथ्वी आता “आकारविरहित व शून्य” राहिली नव्हती. (उत्प. १:२) तरीसुद्धा, सृष्टीसंबंधी असलेले आपले उद्देश पूर्ण करण्यासाठी यहोवा अजूनही आपल्या आत्म्याचा उपयोग करत होता. तो आता पृथ्वीवरील सगळ्यात अप्रतिम गोष्ट निर्माण करण्याच्या बेतात होता. निर्मितीच्या सहाव्या दिवसाच्या शेवटी देवाने मानवाची निर्मिती केली. यहोवाने मानवाची निर्मिती कशी केली? आपल्या पवित्र आत्म्याचा व पृथ्वीवरील घटकांचा उपयोग करण्याद्वारे.—उत्प. २:७.

१४. मानव कोणत्या प्रमुख मार्गाने प्राण्यांपेक्षा वेगळा आहे?

१४ उत्पत्ति १:२७ म्हणते: “देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला; देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला. नर व नारी अशी ती निर्माण केली.” मानवाला देवाच्या प्रतिरूपात बनवण्यात आले याचा अर्थ यहोवाने आपल्याला प्रेम दाखवण्याच्या, स्वतंत्र इच्छेचा उपयोग करण्याच्या आणि इतकेच नव्हे, तर आपल्या निर्माणकर्त्यासोबत एक वैयक्‍तिक नातेसंबंध जोडण्याच्या क्षमतेसह निर्माण केले. म्हणूनच, आपल्या व प्राण्यांच्या मेंदूत कमालीचा फरक दिसून येतो. यहोवाने मानवाच्या मेंदूची रचना एका खास कारणासाठी केली आहे. ते म्हणजे, आपण त्याच्याविषयी व त्याच्या कार्यांविषयी सदासर्वकाळ आनंदाने शिकत राहावे.

१५. आदाम व हव्वा यांच्यासमोर कोणते भवितव्य होते?

१५ देवाने मानवाची निर्मिती केली तेव्हा पृथ्वी व पृथ्वीवरील सर्व अद्‌भुत कार्ये त्याने आदाम व त्याची पत्नी हव्वा यांच्या स्वाधीन केली, जेणेकरून ते त्यांचा अभ्यास करू शकत होते व त्यांचा आनंद घेऊ शकत होते. (उत्प. १:२८) यहोवाने त्यांच्यासाठी मुबलक अन्‍नाची व त्यांच्या राहण्यासाठी एका नंदनवनाची सोय केली. त्यांना सदासर्वकाळ जगण्याची व अब्जावधी परिपूर्ण वंशजांचे प्रिय आईवडील बनण्याची सुसंधी होती. पण, तसे घडले नाही.

पवित्र आत्म्याची भूमिका स्वीकारणे

१६. पहिल्या मानवांनी देवाविरुद्ध बंड केले असले तरी आपल्याला कोणती आशा आहे?

१६ कृतज्ञ अंतःकरणाने आपल्या निर्माणकर्त्याचे आज्ञापालन करण्याऐवजी आदाम व हव्वा स्वार्थी बनले व त्यांनी देवाविरुद्ध बंड केले. परिणामस्वरूप, त्यांच्यापासून सर्व अपरिपूर्ण मानव जन्माला येत आहेत व ते दुःख भोगत आहेत. पण, आपल्या पहिल्या पालकांच्या पापामुळे झालेले सर्व नुकसान देव कसे भरून काढेल याचा खुलासा बायबल करते. यहोवा आपला मूळ उद्देश नक्कीच पूर्ण करेल हेदेखील बायबल आपल्याला सांगते. पृथ्वीचे रूपांतर नंदनवनात केले जाईल आणि त्यात आनंदी, निरोगी लोक राहतील ज्यांना सार्वकालिक जीवनाचा आशीर्वाद मिळेल. (उत्प. ३:१५) त्या प्रोत्साहनदायक भवितव्यावरील आपला विश्‍वास टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला देवाच्या पवित्र आत्म्याच्या साहाय्याची गरज आहे.

१७. आपण कोणती विचारसरणी टाळली पाहिजे?

१७ आपण पवित्र आत्मा मिळवण्यासाठी यहोवाला प्रार्थना केली पाहिजे. (लूक ११:१३) असे केल्यास सृष्टी ही खरोखर देवाची हस्तकृती आहे यावरील आपला विश्‍वास आणखी पक्का होईल. आज चुकीच्या व बिनबुडाच्या तर्कावर आधारलेल्या नास्तिकवादाच्या व उत्क्रांतिवादाच्या मतप्रणालीला एकाएकी ऊत आला आहे. अशा चुकीच्या विचारसरणीमुळे आपण गोंधळून किंवा घाबरून जाऊ नये. उलट, अशा वैचारिक हल्ल्यांचा व त्याच्या समर्थकांच्या दबावाचा प्रतिकार करण्यास सर्व ख्रिश्‍चनांनी सज्ज असले पाहिजे.—कलस्सैकर २:८ वाचा.

१८. विश्‍वाच्या व मानवजातीच्या अस्तित्वामागे एका बुद्धिमान निर्माणकर्त्याचा हात आहे हा विचार धुडकावून लावणे चुकीचे का ठरेल?

१८ सर्व गोष्टी देवाने निर्माण केल्या आहेत याच्या पुराव्याचे आपण प्रामाणिकपणे परीक्षण केल्यास बायबलवरील व खुद्द देवावरील आपला विश्‍वास नक्कीच आणखी दृढ होईल. विश्‍वाच्या व मानवजातीच्या उगमाचा विचार करता, यांच्या निर्मितीमागे एका अलौकिक शक्‍तीचा हात आहे ही गोष्ट अनेकांना पटणार नाही. पण, आपण जर या दृष्टीने विचार केला, तर कोणताही पूर्वग्रह न बाळगता आपण सर्व पुरावे तोलून पाहत नसू. शिवाय असे करण्याद्वारे आपण सृष्टीतील “अगणित” अशा सुव्यवस्थित, उद्देशपूर्ण कार्यांचे ढळढळीत अस्तित्व नाकारत असू. (ईयो. ९:१०; स्तो. १०४:२५) ख्रिस्ती या नात्याने आपल्याला याची खातरी आहे, की सर्व सृष्टिकार्ये अस्तित्वात आणण्यात गोवलेली क्रियाशील शक्‍ती म्हणजे बुद्धिमान देव, यहोवा याच्या निर्देशनाखाली कार्य करणारा पवित्र आत्मा.

पवित्र आत्मा व देवावरील आपला विश्‍वास

१९. देवाच्या अस्तित्वाचा व त्याच्या पवित्र आत्म्याच्या कार्याचा कोणता वैयक्‍तिक पुरावा आपल्याला मिळतो?

१९ देवावर विश्‍वास ठेवण्यासाठी, त्याच्यावर प्रेम करण्यासाठी व त्याचा मनापासून आदर करण्यासाठी आपल्याला सृष्टिकार्याविषयी प्रत्येक गोष्ट माहीत असण्याची गरज नाही. ज्याप्रमाणे मानवांमधील मैत्री केवळ वस्तुस्थितीवर आधारित नसते, त्याचप्रमाणे यहोवावरील विश्‍वासदेखील केवळ वस्तुस्थितीवर अवलंबून नसतो. दोन मित्र एकमेकांना जितके अधिक ओळखू लागतात तितकी अधिक त्यांच्यातील मैत्री बहरत जाते. त्याचप्रमाणे देवाविषयी आपण जितके अधिक शिकतो तितका अधिक त्याच्यावरील आपला विश्‍वास वाढतो. देव आपल्या प्रार्थनांचे उत्तर देतो व जीवनात त्याचे तत्त्व लागू केल्याचे चांगले परिणाम आपण पाहतो तेव्हा तो खरोखर अस्तित्वात आहे हे आपल्या मनावर ठसवले जाते. तो पावलोपावली आपले मार्गदर्शन करतो, आपले संरक्षण करतो, त्याच्या सेवेतील आपले प्रयत्न आशीर्वादित करतो आणि आपल्याला सर्व आवश्‍यक गोष्टी पुरवतो याचा भरघोस पुरावा आपण पाहतो तेव्हा आपण त्याच्या अधिक जवळ जातो. या सर्व गोष्टींमधून आपल्याला देवाच्या अस्तित्वाचा आणि त्याच्या पवित्र आत्म्याच्या कार्याचा सबळ पुरावा मिळतो.

२०. (क) देवाने या विश्‍वाची व मानवाची निर्मिती का केली? (ख) देवाच्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार सतत चालत राहण्याचा काय परिणाम होईल?

२० यहोवा आपल्या क्रियाशील शक्‍तीचा उपयोग करतो याचे एक उल्लेखनीय उदाहरण म्हणजे बायबल. कारण बायबलच्या लेखकांनी ‘पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन देवापासून आलेला संदेश सांगितला.’ (२ पेत्र १:२१) आपण बायबलचा काळजीपूर्वक अभ्यास केल्यास देवानेच सर्वकाही निर्माण केले आहे यावरील आपला विश्‍वास दृढ होऊ शकतो. (प्रकटी. ४:११) प्रेम हा यहोवाचा प्रिय गुण असून, प्रेम व्यक्‍त करण्यासाठीच तो निर्माणकर्ता बनला. (१ योहा. ४:८) तेव्हा, आपला प्रेमळ स्वर्गीय पिता आणि मित्र याविषयी जाणून घेण्यास इतरांना मदत करण्यासाठी आपण होईल तितका प्रयत्न करू या. आपल्या स्वतःविषयी बोलायचे झाल्यास, आपण सतत देवाच्या आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार चालत राहिलो, तर सदासर्वकाळ त्याच्याविषयी शिकत राहण्याचा विशेषाधिकार आपल्याला लाभेल. (गलती. ५:१६, २५) तर मग, आपण सर्व जण सतत यहोवाविषयी व त्याच्या महान कृत्यांविषयी शिकत राहू या आणि आकाश, पृथ्वी व मानवजात यांची निर्मिती करण्यासाठी त्याने आपल्या पवित्र आत्म्याचा उपयोग करून आपल्यावर केलेल्या अपार प्रेमावर मनन करत राहू या.

[तळटीप]

^ इज देअर अ क्रिएटर हू केअर्स अबाउट यू? या पुस्तकातील पृष्ठे २४ व २५ पाहा.

तुम्ही स्पष्ट करू शकता का?

• आकाश व पृथ्वीच्या अस्तित्वातून आपण देवाच्या पवित्र आत्म्याच्या कार्याविषयी काय शिकतो?

• आपल्याला देवाच्या प्रतिरूपात निर्माण करण्यात आले असल्यामुळे आपल्याला कोणकोणत्या संधी आहेत?

• निर्मितीच्या पुराव्याचे परीक्षण करणे गरजेचे का आहे?

• यहोवासोबतचा आपला नातेसंबंध अधिकाधिक मजबूत कसा होऊ शकतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[७ पानांवरील चित्र]

विश्‍वातील सुव्यवस्था आपल्याला सृष्टीविषयी काय शिकवते?

[चित्राचे श्रेय]

Stars: Anglo-Australian Observatory/David Malin Images

[८ पानांवरील चित्रे]

या सर्व सजीवांमध्ये डीएनए एकसारखाच आहे तो कोणत्या अर्थी?

[१० पानांवरील चित्र]

तुमच्या विश्‍वासाचे समर्थन करण्यास तुम्ही सज्ज आहात का?