व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे”

“यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे”

“यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे”

शौल हा प्राचीन इस्राएलचा पहिला राजा होता. त्याला खुद्द खऱ्‍या देवाने निवडले असले, तरी कालांतराने तो अवज्ञाकारी बनला.

शौलाने कोणत्या चुका केल्या? तो या चुका करण्याचे टाळू शकला असता का? त्याच्या उदाहरणावर विचार केल्याने आपल्याला काय फायदा होऊ शकतो?

यहोवा आपली निवड जाहीर करतो

शौल राजा बनण्याआधी, शमुवेल संदेष्टा देवाचा प्रतिनिधी म्हणून इस्राएलमध्ये सेवा करत होता. आता शमुवेल वृद्ध झाला होता आणि त्याची मुले अविश्‍वासू बनली होती. शिवाय, त्या देशातील लोकांना त्यांचे शत्रू घाबरवत होते. इस्राएलमधील वडील जनांनी शमुवेलास त्यांच्यावर असा एक राजा नियुक्‍त करण्याविषयी विचारले, जो त्यांचा न्याय करू शकेल व युद्धात पुढाकार घेऊ शकेल. त्या वेळी यहोवाने शौलाचा एक अधिपती म्हणून अभिषेक करण्यास शमुवेल संदेष्ट्यास सांगितले आणि म्हटले: “तो माझ्या लोकांस पलिष्ट्यांच्या हातातून सोडवील.”—१ शमु. ८:४-७, २०; ९:१६.

शौल “तरुण व देखणा” होता. पण, केवळ त्याच्या देखणेपणामुळे त्याला निवडण्यात आले नव्हते; तर तो नम्रही होता. उदाहरणार्थ, शौलाने शमुवेलास विचारले: “इस्राएल वंशातले सर्वांहून कनिष्ठ जे बन्यामिनी त्यातला मी ना? आणि बन्यामिनाच्या वंशातील सगळ्या कुळात माझे घराणे कनिष्ठ ना? तर मग तुम्ही मजशी असले भाषण का करिता?” शौलाचा पिता, कीश, “मोठा धनवान व प्रतिष्ठित” मनुष्य होता. असे असले, तरी शौलाचा स्वतःविषयी व आपल्या घराण्याविषयी नम्र दृष्टिकोन होता.—१ शमु. ९:१, २, २१, सुबोध भाषांतर.

यहोवाने इस्राएलचा राजा म्हणून शौलाची निवड केली आहे हे शमुवेलाने जाहीर केले, तेव्हा शौलाची प्रतिक्रिया काय होती याचाही विचार करा. शमुवेलाने प्रथम एकांतात शौलाचा अभिषेक केला आणि त्याला सांगितले: “तुला जे कर्तव्य करणे प्राप्त होईल ते तू करावे; कारण देव तुझ्याबरोबर आहे.” त्यानंतर देवाची निवड जाहीर करण्यासाठी शमुवेल संदेष्ट्याने लोकांना एकत्र बोलावले. यहोवाने निवडलेला राजा शौल आहे असे सांगण्यात आले, तेव्हा लोकांना तो सापडला नाही. कारण, तो लाजरा असल्यामुळे लपून बसला होता. तो कोठे लपून बसला आहे हे यहोवाने सांगितले, आणि शौलाला राजा म्हणून घोषित करण्यात आले.—१ शमु. १०:७, २०-२४.

युद्धभूमीवर

ज्यांनी शौलाच्या योग्यतेवर शंका घेतली होती, ते किती चुकीचे आहेत हे त्याने लवकरच सिद्ध करून दाखवले. अम्मोनी लोकांनी इस्राएलच्या एका नगराला धमकी दिली, तेव्हा शौलावर ‘देवाचा आत्मा जोराने आला.’ त्याने मोठ्या अधिकाराने इस्राएलातील योद्ध्‌यांना बोलावले, त्यांना संघटित केले आणि युद्धात पुढाकार घेऊन त्यांना विजय मिळवून दिला. पण, या विजयाचे श्रेय शौलाने देवाला दिले आणि म्हटले: “आज परमेश्‍वराने इस्राएलाचा उद्धार केला आहे.”—१ शमु. ११:१-१३.

शौलामध्ये चांगले गुण होते आणि त्याच्यावर देवाचा आशीर्वाद होता. त्याने यहोवाचे सामर्थ्यदेखील मान्य केले. पण, इस्राएल लोकांना व त्यांच्या राजाला निरंतर मिळणारे यश एका महत्त्वाच्या गोष्टीवर अवलंबून होते. शमुवेलाने इस्राएल लोकांना सांगितले: “तुम्ही परमेश्‍वराचे भय धरून त्याची भक्‍ति करीत राहाल, त्याची वाणी ऐकत राहाल, त्याच्या धर्मशास्त्राविरुद्ध बंडावा करणार नाही आणि तुमच्यावर राज्य करणारा हा राजा व तुम्ही आपला देव परमेश्‍वर याचे अनुसरण कराल तर बरे.” इस्राएल लोक देवाला विश्‍वासू राहिले असते, तर ते कोणत्या गोष्टीची खातरी बाळगू शकत होते? शमुवेल म्हणाला: “परमेश्‍वर आपल्या थोर नामास्तव आपल्या लोकांचा त्याग करणार नाही कारण परमेश्‍वराने कृपावंत होऊन तुम्हास आपले प्रजाजन केले आहे.”—१ शमु. १२:१४, २२.

होय, देवाची कृपापसंती प्राप्त करण्यासाठी आज्ञाधारक असणे सगळ्यात महत्त्वाचे होते; आणि आजही ते तितकेच महत्त्वाचे आहे. यहोवाचे सेवक त्याच्या आज्ञांचे पालन करतात तेव्हा तो त्यांना आशीर्वाद देतो. पण त्यांनी त्याच्या आज्ञांचे उल्लंघन केले तर काय?

“तू मूर्खपणा केला”

शौलाने पुढे पलिष्ट्यांच्या विरोधात केलेल्या कारवाईमुळे ते अतिशय संतप्त झाले. “समुद्रकिनाऱ्‍यावरील वाळूइतके विपुल” सैन्य शौलाविरुद्ध उभे राहिले. “आपण पेचात सापडलो आहो असे इस्राएल लोकांनी पाहिले, (खरोखरच त्या लोकांस संकट प्राप्त झाले होते,) तेव्हा ते गुहा, झुडपे, खडक, दुर्ग व विवरे यात लपले.” (१ शमु. १३:५, ६) आता शौल काय करणार होता?

शमुवेलाने शौलाला गिलगालमध्ये भेटावयास सांगितले जेथे शमुवेल यज्ञार्पण करणार होता. शौलाने त्याची वाट पाहिली; पण शमुवेलाला येण्यास उशीर झाला होता आणि शौलाचे सैन्य त्याच्यापुढून निघून पांगू लागले. म्हणून, शौलाने स्वतः यज्ञार्पण करण्याचे ठरवले. त्याने यज्ञार्पण केले नेमके तेव्हाच शमुवेल तेथे पोहचला. शौलाने जे काही केले ते ऐकल्यानंतर शमुवेल त्याला म्हणाला: “तू मूर्खपणा केला; तुझा देव परमेश्‍वर याने तुला केलेली आज्ञा तू मानिली नाही; मानिली असती तर परमेश्‍वराने इस्राएलावर तुझे राज्य निरंतरचे स्थापिले असते; पण आता तुझे राज्य कायम राहावयाचे नाही. परमेश्‍वराने आपल्यासाठी आपल्या मनासारखा मनुष्य धुंडून त्यास आपल्या लोकांचा अधिपति नेमिले आहे; कारण परमेश्‍वराने तुला केलेली आज्ञा तू पाळिली नाही.”—१ शमु. १०:८; १३:८, १३, १४.

शमुवेलाची वाट पाहण्यासंबंधी देवाने दिलेल्या आज्ञेचे शौलाने उद्धामपणे उल्लंघन केले, तेव्हा त्याने दाखवून दिले की त्याच्यामध्ये विश्‍वासाचा अभाव होता. शौलाने जे केले आणि एके काळी इस्राएलच्या सैन्याचा अधिकारी असलेला गिदोन याने जे केले यात किती मोठा फरक होता! गिदोनाचे सैन्य ३२,००० वरून ३०० पर्यंत आणण्याची आज्ञा यहोवाने त्याला दिली, तेव्हा त्याने त्याचे पालन केले. का? कारण, यहोवावर त्याचा विश्‍वास होता. देवाच्या मदतीने त्याने १,३५,००० शत्रू सैनिकांचा पराभव केला. (शास्ते ७:१-७, १७-२२; ८:१०) यहोवाने शौलालाही मदत केली असती. पण, शौलाने देवाच्या आज्ञेचे उल्लंघन केल्यामुळे पलिष्ट्यांनी इस्राएलवर चढाई करून त्यांची लुटालूट केली.—१ शमु. १३:१७, १८.

आपल्यासमोर समस्या येतात तेव्हा आपण कसे निर्णय घेतो? ज्यांच्यामध्ये विश्‍वासाचा अभाव आहे अशा लोकांना देवाच्या तत्त्वांचे उल्लंघन करणे कदाचित व्यावहारिक वाटेल. शमुवेलाच्या अनुपस्थितीत, आपण जे केले ते योग्यच होते असे शौलाला वाटले असावे. पण, जे देवाची कृपापसंती मिळवण्यास दृढनिश्‍चयी आहेत त्यांच्याकरता एकच मार्ग सुज्ञतेचा आहे; तो म्हणजे ते जे काही निर्णय घेतात त्याच्याशी संबंधित असलेल्या बायबल तत्त्वांचे पालन करणे.

यहोवा शौलाला नाकारतो

अमालेकी लोकांविरुद्धच्या मोहिमेदरम्यान शौलाने आणखी एक गंभीर चूक केली. इस्राएली लोक मिसर देशातून बाहेर पडल्यानंतर, अमालेकी लोकांनी काहीएक कारण नसताना इस्राएल लोकांवर हल्ला केल्याबद्दल देवाने त्यांचा धिक्कार केला होता. (निर्ग. १७:८; अनु. २५:१७, १८) शिवाय, शास्त्यांच्या काळात देवाच्या निवडलेल्या लोकांवर हल्ला करण्यासही अमालेकी लोक इतरांना सामील झाले. (शास्ते ३:१२, १३; ६:१-३, ३३) त्यामुळे, या सर्व गोष्टींकरता यहोवाने अमालेकी लोकांना जबाबदार धरले आणि त्यांच्यावर न्यायदंड बजावण्याची शौलाला आज्ञा दिली.—१ शमु. १५:१-३.

यहोवाने शौलाला दुष्ट अमालेकी लोकांचे नामोनिशाण मिटवून त्यांची सर्व मालमत्ता नष्ट करण्याची आज्ञा दिली होती. पण, या आज्ञेचे पालन करण्याऐवजी शौलाने त्यांच्या राजाला ताब्यात घेतले आणि सर्वात उत्तम प्रतीचे जनावर ठेवून घेतले. शमुवेलाने याबद्दल शौलाला प्रश्‍न केला तेव्हा काय झाले? शौलाने आपला दोष दुसऱ्‍यांवर ढकलण्याचा प्रयत्न करत म्हटले: “आपला देव परमेश्‍वर याच्या प्रीत्यर्थ बलि अर्पण करण्यासाठी त्यांनी [लोकांनी] उत्तम उत्तम मेंढरे व गुरे राखून ठेविली आहेत.” जनावरे अर्पण करण्याचा शौलाचा खरोखरच हेतू असो अगर नसो, एक गोष्ट मात्र खरी होती; ती म्हणजे त्याने देवाच्या आज्ञेचे उल्लंघन केले होते. शौल आता “आपल्या दृष्टीने क्षुद्र” राहिला नव्हता. त्यामुळे, देवाच्या संदेष्ट्याने दाखवून दिले की शौलाने देवाची अवज्ञा केली होती. नंतर शमुवेल म्हणाला: “परमेश्‍वराचा शब्द पाळिल्याने जसा त्याला संतोष होतो तसा होमांनी व यज्ञांनी होतो काय? पाहा, यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे; . . . तू परमेश्‍वराचा शब्द मोडिला आहे म्हणून त्यानेहि तुला राज्यपदावरून झुगारून दिले आहे.”—१ शमु. १५:१५, १७, २२, २३.

यहोवाने शौलावरून आपला पवित्र आत्मा आणि आशीर्वाद काढून घेतला, तेव्हा इस्राएलच्या या पहिल्या राजावर “एक दुरात्मा” वर्चस्व गाजवू लागला. दाविदाप्रती अर्थात यहोवा नंतर ज्याला राजपद देणार होता त्या मनुष्याप्रती शौलाची मनोवृत्ती संशयास्पद आणि द्वेषपूर्ण बनली. कितीतरी वेळा शौलाने दाविदाला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. बायबल म्हणते, की “परमेश्‍वर दाविदाच्या बरोबर आहे” हे पाहून “तो दाविदाचा कायमचा वैरी बनला.” शौलाने दाविदाला मारून टाकण्याचा प्रयत्न केला, इतकेच नव्हे, तर ८५ याजकांना व इतर लोकांना मारून टाकण्याची आज्ञाही त्याने दिली. त्यामुळे, यहोवाने शौलाला सोडून दिले याचे आपल्याला नवल वाटू नये!—१ शमु. १६:१४; १८:११, २५, २८, २९; १९:१०, ११; २०:३२, ३३; २२:१६-१९.

पलिष्ट्यांनी पुन्हा एकदा इस्राएलवर हल्ला केला, तेव्हा मदतीसाठी शौल भूतविद्येकडे वळाला, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. दुसऱ्‍याच दिवशी, युद्धात तो गंभीरपणे जखमी झाला आणि त्याने आत्महत्या केली. (१ शमु. २८:४-८; ३१:३, ४) इस्राएलच्या अवज्ञाकारी पहिल्या राजाबद्दल बोलताना बायबल म्हणते: “शौलाने परमेश्‍वराचा अपराध केला, परमेश्‍वराचा शब्द मानिला नाही आणि परमेश्‍वरास प्रश्‍न करण्याऐवजी भूतविद्याप्रवीण स्त्रियेचा त्याने सल्ला घेतला, या सर्वांमुळे तो मेला.”—१ इति. १०:१३, १४.

शौलाच्या वाईट उदाहरणावरून एक गोष्ट स्पष्ट होते; ती म्हणजे, यज्ञापेक्षा यहोवाची आज्ञा पाळणे बरे. प्रेषित योहानाने लिहिले: “देवावर प्रीति करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय; आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहीत.” (१ योहा. ५:३) यहोवासोबतची आपली अतूट मैत्री त्याच्या आज्ञांचे पालन करण्यावर अवलंबून आहे: या मूलभूत सत्याकडे आपण केव्हाही दुर्लक्ष करू नये.

[२१ पानांवरील चित्र]

सुरुवातीला शौल एक नम्र पुढारी होता

[२३ पानांवरील चित्र]

“यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे,” असे शमुवेल शौलाला का म्हणाला?