व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुमच्याजवळ आनंदी होण्याचे कारण आहे

तुमच्याजवळ आनंदी होण्याचे कारण आहे

तुमच्याजवळ आनंदी होण्याचे कारण आहे

अति सूक्ष्म जिवंत पेशीपासून ते लहान-मोठ्या गुच्छांत संघटित असलेल्या विशाल तारामंडळांपर्यंत, सृष्टीत सुव्यवस्था दिसून येते. ही सुव्यवस्था पाहून आपल्याला आश्‍चर्य वाटू नये; कारण, सृष्टिकर्ता “अव्यवस्था माजविणारा” देव नाही. (१ करिंथ. १४:३३) देवाने त्याच्या उपासनेसाठी केलेली व्यवस्थादेखील विलक्षण आहे. यहोवाने काय केले आहे त्याकडे लक्ष द्या. त्याने इच्छास्वातंत्र्य असलेल्या कोट्यवधी बुद्धिमान प्राण्यांची—ज्यात मानवांचा व देवदूतांचा समावेश होतो—एक विश्‍वव्यापी संघटना स्थापन केली आहे. या संघटनेत सर्व जण ऐक्याने देवाची उपासना करतात. किती अद्‌भुत व्यवस्था!

प्राचीन इस्राएलमध्ये, जेरूसलेम शहर देवाच्या संघटनेच्या पृथ्वीवरील भागाचे प्रतीक होते. तेथे यहोवाचे मंदिर होते आणि देवाचा अभिषिक्‍त राजा तेथे राहायचा. बॅबिलोनमध्ये बंदिवान असलेल्या एका इस्राएली व्यक्‍तीने त्या पवित्र शहराविषयी आपल्या भावना अशा प्रकारे व्यक्‍त केल्या: “जर मी तुझी आठवण ठेविली नाही, जर मी यरुशलेमेला माझ्या आनंदाच्या मुख्य विषयाहून अधिक मानिले नाही, तर माझी जीभ माझ्या टाळूला चिकटो.”—स्तो. १३७:६.

आज देवाच्या संघटनेबद्दल तुम्हालादेखील असेच वाटते का? इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा देवाच्या संघटनेमुळे तुम्हाला जास्त आनंद होतो का? देवाच्या संघटनेच्या पृथ्वीवरील भागाचा इतिहास व कार्य यांच्याबद्दल तुमच्या मुलांना माहीत आहे का? ते यहोवाच्या साक्षीदारांच्या एका जगव्याप्त बंधुसमाजाचा भाग आहेत हे त्यांना माहीत आहे का व ते त्याची कदर करतात का? (१ पेत्र २:१७) यहोवाच्या संघटनेबद्दल तुमच्या कुटुंबाची समज व कृतज्ञता आणखी वाढवण्याकरता, तुम्हाला आपल्या कौटुंबिक उपासनेत पुढील सूचना लागू करता येतील का?

‘पुरातन काळच्या’ दिवसांचे वर्णन करा

इस्राएली कुटुंबे वल्हांडण सण साजरा करण्यासाठी दरवर्षी एकत्र यायची. या सणाची स्थापना करण्यात आली तेव्हा मोशेने लोकांना असे सांगितले: “पुढील काळी तुझा मुलगा तुला विचारील की हे काय आहे? तेव्हा त्याला सांग, मिसर देशातून, दास्यगृहातून परमेश्‍वराने आम्हाला आपल्या भुजबलाने बाहेर आणिले.” (निर्ग. १३:१४) यहोवाने इस्राएल लोकांशी केलेल्या व्यवहारांचा इतिहास त्यांनी कायम आठवणीत ठेवायचा होता. इस्राएलातील अनेक पित्यांनी मोशेच्या या आज्ञेचे पालन केले. याच्या अनेक पिढ्यांनंतर, एका इस्राएली व्यक्‍तीने अशी प्रार्थना केली: “हे देवा, आमच्या पूर्वजांच्या दिवसांत, पुरातन काळी, तू जे कार्य केले त्याचे वर्णन त्यांनी केले, व ते आम्ही आपल्या कानांनी ऐकले.”—स्तो. ४४:१.

एका लहान मुलाच्या दृष्टीत, यहोवाच्या साक्षीदारांचा गेल्या १०० पेक्षा जास्त वर्षांचा इतिहास ‘पुरातन काळच्या’ दिवसांप्रमाणेच असू शकतो. या काळादरम्यान घडलेल्या घटना तुम्ही आपल्या मुलांकरता जिवंत कशा करू शकता? असे करण्यासाठी, काही पालक जेहोवास विटनेसेस—प्रोक्लेमर्स ऑफ गॉड्‌स किंगडम, ईयरबुक, आपल्या नियतकालिकांत प्रकाशित झालेल्या जीवनकथा, तसेच आधुनिक काळातील देवाच्या लोकांविषयी असलेल्या आपल्या नव्या डीव्हिडीसोबतच ईश्‍वरशासित इतिहासाविषयी असलेल्या इतर अहवालांचा वापर करतात. भूतपूर्व सोव्हियत संघ आणि नाझी जर्मनी येथे कशा प्रकारे आपल्या बांधवांचा छळ करण्यात आला हे दाखवणाऱ्‍या व्हीडिओंमुळे, कुटुंबांना संकटांच्या काळात यहोवावर भरवसा ठेवण्यास शिकायला मिळते. अशा प्रकारच्या साहित्याचा आपल्या कौटुंबिक उपासना संध्येत समावेश करा. तुमच्या मुलांच्या एकनिष्ठेची परीक्षा होत असल्यास, यामुळे त्यांचा विश्‍वास आणखी दृढ होईल.

पण, इतिहासावर लांबलचक भाषण दिल्यास मुलांना लगेच कंटाळा येऊ शकतो. म्हणून, तुमच्या मुलांनादेखील सहभागी करा. उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्या मुलाला त्याच्या आवडीच्या एखाद्या देशाची निवड करून त्या देशाच्या ईश्‍वरशासित इतिहासाविषयी संशोधन करण्यास आणि त्याने शिकलेल्या काही गोष्टी आपल्या कुटुंबापुढे सादर करण्यास सांगू शकता. कदाचित तुमच्या मंडळीत, अनेक वर्षांपासून विश्‍वासूपणे देवाची सेवा करणारे ख्रिस्ती असतील. तुम्ही त्यांना तुमच्या कौटुंबिक उपासनेत सहभागी होण्यासाठी एखाद्या संध्याकाळी घरी बोलावू शकता. तुमची मुलगी त्यांची मुलाखत घेऊ शकते आणि त्यांना आपले अनुभव सांगण्यास बोलते करू शकते. किंवा तुम्ही तुमच्या मुलांना ईश्‍वरशासित इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचे, जसे की एखाद्या शाखा कार्यालयाचे बांधकाम, आंतरराष्ट्रीय अधिवेशन, किंवा घरोघरच्या सेवाकार्यात केलेला फोनोग्राफचा वापर यांबद्दल चित्रे काढण्यास सांगू शकता.

कशा प्रकारे ‘प्रत्येक अंग आपआपले कार्य करते’ हे शिका

“सबंध शरीराची जुळवणूक व जमवाजमव होत असते, आणि प्रत्येक अंग आपआपल्या परिमाणाने कार्य करीत असता आपली रचना प्रीतीमध्ये होण्यासाठी शरीर आपली वृद्धि करून घेते,” असे म्हणून प्रेषित पौलाने ख्रिस्ती मंडळीची तुलना शरीराशी केली. (इफिस. ४:१६) मानवी शरीर कशा प्रकारे कार्य करते याविषयी शिकून घेतल्यास सृष्टिकर्त्याबद्दल आपल्याला असलेली कदर व आदर आणखी वाढतो. त्याचप्रमाणे, जगव्याप्त मंडळी कशा प्रकारे कार्य करते याचे परीक्षण केल्यास, “देवाचे नानाविध ज्ञान” पाहून आपण थक्क होतो.—इफिस. ३:१०.

यहोवाची संघटना, ज्यात संघटनेच्या स्वर्गीय भागाचाही समावेश होतो, कशा प्रकारे कार्य करते याचे वर्णन यहोवा करतो. उदाहरणार्थ, तो सांगतो की त्याने सर्वप्रथम येशू ख्रिस्ताला प्रकटीकरण दिले, ज्याने ते नंतर “आपल्या दूताला पाठवून त्याच्याकडून आपला दास योहान ह्‍याला कळविले. त्याने . . . त्याविषयी साक्ष दिली.” (प्रकटी. १:१, २) आपल्या संघटनेचा अदृश्‍य भाग कशा प्रकारे कार्य करतो हे जर देव प्रकट करतो, तर पृथ्वीवर ‘प्रत्येक अंग आपआपले कार्य’ कशा प्रकारे करते हे तो आपल्याला सांगणार नाही का?

उदाहरणार्थ, जर विभागीय पर्यवेक्षक लवकरच तुमच्या मंडळीला भेट देणार असतील, तर त्यांच्या जबाबदाऱ्‍यांबद्दल व विशेषाधिकारांबद्दल तुम्ही आपल्या कुटुंबासोबत चर्चा करू शकता. विभागीय पर्यवेक्षक प्रत्येकाला कशी मदत करतात? याशिवाय, इतर काही प्रश्‍नांची चर्चादेखील तुम्ही करू शकता. जसे की, क्षेत्र सेवेचा अहवाल देणे का महत्त्वाचे आहे? देवाच्या संघटनेचा खर्च कसा भागवला जातो? नियमन मंडळ कशा प्रकारे संघटित आहे आणि ते कशा प्रकारे आध्यात्मिक अन्‍नाची तरतूद करते?

यहोवाचे लोक कशा प्रकारे संघटित आहेत हे आपल्याला समजते, तेव्हा आपल्याला कमीत कमी तीन प्रकारे फायदा होतो: जे आपल्यासाठी परिश्रम घेतात त्यांच्याबद्दल आपली कदर आणखी वाढते. (१ थेस्सलनी. ५:१२, १३) ईश्‍वरशासित व्यवस्थेला पाठिंबा देण्याची प्रेरणा आपल्याला मिळते. (प्रे. कृत्ये १६:४, ५) शेवटी, जे काही निर्णय घेतले जातात किंवा जी काही व्यवस्था केली जाते ती शास्त्रवचनांवर आधारित आहे हे आपण पाहतो तेव्हा पुढाकार घेणाऱ्‍यांवरील आपला भरवसा आणखी वाढतो.—इब्री १३:७.

“तिच्या कोटांकडे लक्ष द्या”

“सीयोनेसभोवती फिरा, तिला फेरा घाला; तिचे बुरूज मोजा; तिच्या कोटांकडे लक्ष द्या, तिच्या प्रासादांमधून फिरा, म्हणजे पुढील पिढीला तिच्याविषयी तुम्हाला सांगता येईल.” (स्तो. ४८:१२, १३) स्तोत्रकर्त्याने इस्राएली लोकांना जेरूसलेमला जवळून पाहण्यास आर्जवले. वार्षिक सणांकरता या पवित्र शहरात गेलेल्या आणि तेथील भव्य मंदिर पाहिलेल्या इस्राएली लोकांच्या आठवणी किती मौल्यवान होत्या याची तुम्ही कल्पना करू शकता का? यामुळे त्यांना ‘पुढील पिढ्यांना तिच्याविषयी सांगण्याची’ प्रेरणा मिळाली असावी.

शबाच्या राणीचा विचार करा. तिने शलमोनाच्या वैभवशाली शासनाबद्दल व त्याच्या अमाप बुद्धीबद्दल ऐकले तेव्हा सुरुवातीला तिचा विश्‍वास बसला नाही. मग, तिने ऐकलेल्या गोष्टी अगदी खऱ्‍या होत्या यावर तिचा भरवसा कसा बसला? तिने म्हटले: “मी येऊन प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्याशिवाय या गोष्टीचा मला विश्‍वास येईना.” (२ इति. ९:६) होय, आपण आपल्या “प्रत्यक्ष डोळ्यांनी” जे पाहतो त्याचा आपल्यावर गहिरा परिणाम होऊ शकतो.

तुम्ही तुमच्या मुलांना यहोवाच्या संघटनेतील अद्‌भुत गोष्टी “प्रत्यक्ष डोळ्यांनी” पाहण्यास कशी मदत करू शकता? तुम्ही राहता त्या ठिकाणी जवळपास यहोवाच्या साक्षीदारांचे शाखा कार्यालय असल्यास, त्यास भेट देण्याचा प्रयत्न करा. उदाहरणार्थ, मँडी आणि बेथनी ज्या ठिकाणी लहानाचे मोठे झाले, तेथून त्यांच्या देशातील बेथेल गृह सुमारे १,५०० किलोमीटर अंतरावर होते. तरीसुद्धा, त्यांचे आईवडील वारंवार शाखा कार्यालयाला भेट देण्याची योजना करायचे, खासकरून मँडी आणि बेथनी लहानाचे मोठे होत होते तेव्हा. मँडी आणि बेथनी म्हणतात: “बेथेलला भेट देण्याआधी आम्हाला वाटलं होतं की बेथेल फक्‍त वयस्कर लोकांसाठी आहे आणि तिथलं वातावरण अगदी धीरगंभीर आहे. पण, तिथं आम्हाला तरुण लोक भेटले जे आनंदाने यहोवाची सेवा करत होते! आम्हाला असं दिसून आलं की यहोवाची संघटना आम्ही राहतो केवळ त्या छोट्याशा क्षेत्रापुरतीच मर्यादित नाही, तर त्यापेक्षा कितीतरी मोठी आहे. आम्ही जितक्यांदा बेथेलला भेट दिली तितक्यांदा आम्ही यहोवाच्या आणखी जवळ आलो आणि त्याच्या सेवेत आणखी जास्त करण्याची प्रेरणा आम्हाला मिळाली.” यहोवाच्या संघटनेला जवळून पाहिल्याने मँडी आणि बेथनीला पायनियर सेवा करण्याची प्रेरणा मिळाली, आणि त्यांना तात्पुरते स्वयंसेवक म्हणून बेथेलमध्ये सेवा करण्यासाठीदेखील बोलावण्यात आले.

यहोवाच्या संघटनेला जवळून ‘पाहण्याचा’ आणखी एक मार्ग आहे, जो प्राचीन इस्राएली लोकांना उपलब्ध नव्हता. अलीकडच्या वर्षांत, देवाच्या संघटनेची विविध वैशिष्ट्ये दाखवणारे व्हीडिओ आणि डीव्हिडी देवाच्या लोकांकरता उपलब्ध करून देण्यात आले आहेत, जसे की: जेहोवास विटनेसेस—ऑर्गनाइझ्ड टू शेअर द गुड न्यूज, आवर होल असोसिएशन ऑफ ब्रदर्स, टू दी एंड्‌स ऑफ दी अर्थ, आणि युनायटेड बाय डिव्हाईन टीचिंग. बेथेलमध्ये सेवा करणारे, संकट काळी मदत कार्य पुरवणारे, मिशनरी सेवा करणारे, आणि अधिवेशनांची योजना व संघटना करणारे बांधव या सर्वांचे परिश्रम तुम्ही पाहता तेव्हा आपल्या जगव्याप्त बंधुसमाजाबद्दल तुमची कदर नक्कीच वाढेल.

सुवार्तेचा प्रचार करण्यात व स्थानिक ख्रिस्ती बांधवांना साहाय्य करण्यात देवाच्या लोकांची प्रत्येक मंडळी एक महत्त्वपूर्ण भूमिका निभावते. तरीसुद्धा, आपल्या कुटुंबासोबत ‘जगातील तुमच्या बंधुवर्गाचे’ स्मरण करण्यास वेळ काढा. यामुळे तुमच्याजवळ आनंदी होण्याचे कारण आहे या जाणिवेने तुम्हाला व तुमच्या मुलांना “विश्‍वासांत दृढ” राहण्यास मदत मिळेल.—१ पेत्र ५:९.

[१८ पानांवरील चौकट/चित्र]

देवाची संघटना अभ्यासाकरता एक उत्तम विषय

यहोवाच्या संघटनेच्या इतिहासाविषयी व कार्याविषयी शिकण्यास आपल्याला मदत करतील अशी मुबलक साधने आपल्याजवळ आहेत. या बाबतीत पुढील प्रश्‍न तुम्हाला मदत करतील:

आधुनिक काळातील प्रवासी पर्यवेक्षकांच्या कार्याची सुरुवात कशी झाली?टेहळणी बुरूज, १५ नोव्हेंबर १९९६, पृष्ठे १०-१५.

सन १९४१ मध्ये झालेल्या ईश्‍वरशासित संमेलनात “मुलांसाठी खास दिवस” याचे काय वैशिष्ट्य होते?टेहळणी बुरूज, १५ जुलै २००१, पृष्ठ ८.

नियमन मंडळ कशा प्रकारे निर्णय घेते?“बेअरिंग थरो विटनेस” अबाऊट गॉड्‌स किंग्डम, पृष्ठे १०८-११४.