व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अप्रामाणिक जगात प्रामाणिक कसे राहावे?

अप्रामाणिक जगात प्रामाणिक कसे राहावे?

अप्रामाणिक जगात प्रामाणिक कसे राहावे?

आपण श्‍वासोच्छ्‌वास करत असलेल्या हवेप्रमाणे आज सर्वत्र बेइमानी पाहायला मिळते. लोक खोटे बोलतात, इतरांना लुबाडतात, घेतलेले कर्ज बुडवतात आणि व्यापारातील कुयुक्त्यांबद्दल फुशारकी मारतात. आपण अशा वातावरणात राहत असल्यामुळे, प्रामाणिक राहण्याच्या आपल्या निर्धाराची कसोटी पाहणारे प्रसंग अनेकदा आपल्यासमोर येतात. तर मग, अप्रामाणिकपणे वागण्याच्या प्रवृत्तीचा आपण सतत प्रतिकार कसा करू शकतो? या बाबतीत आपली मदत करतील अशा तीन प्रमुख गोष्टींची आपण चर्चा करू या. त्या तीन गोष्टी आहेत: यहोवाबद्दलचे भय, एक चांगला विवेक आणि आत्मसंतुष्टतेची भावना.

यहोवाबद्दल हितकारक भय

यशया संदेष्ट्याने लिहिले: “परमेश्‍वर आमचा न्यायाधीश आहे, परमेश्‍वर आमचा नियंता आहे, परमेश्‍वर आमचा राजा आहे.” (यश. ३३:२२) यहोवाचे अधिकारपद मान्य केल्याने त्याच्याबद्दल आपल्या मनात भय निर्माण होते. देवाबद्दलच्या या भयामुळेच, अप्रामाणिकपणे वागण्याच्या प्रवृत्तीचा निर्धाराने प्रतिकार करण्याची प्रेरणा आपल्याला मिळते. नीतिसूत्रे १६:६ म्हणते: “परमेश्‍वराचे भय बाळगिल्याने मनुष्ये दुष्कर्मांपासून दूर राहतात.” हे भय, एका क्रूर देवाबद्दल थरकाप उडवणारे भय नाही, तर आपल्या हिताची मनस्वी चिंता करणाऱ्‍या आपल्या स्वर्गीय पित्याचे मन न दुखावण्याची हितकारक चिंता आहे.—१ पेत्र ३:१२.

अशा हितकारक चिंतेचा किंवा भयाचा परिणाम किती सकारात्मक असतो हे एका सत्य घटनेवरून स्पष्ट होते. रीकार्डो आणि त्याची पत्नी फर्नान्डा यांनी आपल्या बँक खात्यातून सातशे डॉलर्स (जवळजवळ ३३,००० रुपये) काढले होते. * फर्नान्डाने पैसे न मोजताच नोटांची थप्पी पर्समध्ये टाकली. काही बिल्स भरून घरी परतल्यानंतर, त्यांनी बँकेतून जितके पैसे काढले होते तितकेच पैसे अजूनही फर्नान्डाच्या पर्समध्ये असल्याचे पाहून ते अवाक झाले. “कॅशियरनं चुकून आपल्याला जास्त पैसे दिले वाटतं,” असा अनुमान त्यांनी काढला. सुरुवातीला त्यांना ते पैसे ठेवून घेण्याचा मोह झाला, कारण त्यांना अजूनही बरेच बिल्स भरायचे होते. रीकार्डो म्हणतो: “ते पैसे परत करण्याची शक्‍ती यहोवानं आम्हाला द्यावी म्हणून आम्ही त्याला प्रार्थना केली. नीतिसूत्रे २७:११ मध्ये देवाने केलेल्या आर्जवानुसार त्याचे मन आनंदित करण्याच्या इच्छेने प्रवृत्त होऊन आम्ही ते पैसे परत केले.”

बायबल प्रशिक्षित विवेक

बायबलचा अभ्यास करण्याद्वारे आणि शिकलेल्या गोष्टी जीवनात लागू करण्याचा कसोशीने प्रयत्न करण्याद्वारे आपण एक संवेदनशील विवेक विकसित करू शकतो. परिणामस्वरूप, ‘देवाचे सजीव व सक्रिय वचन’ आपल्या अंतःकरणापर्यंत पोहचेल. त्यामुळे मग, “सर्व बाबतींत चांगले [“प्रामाणिकपणे,” NW] वागण्याची” प्रेरणा आपल्याला मिळेल.—इब्री ४:१२; १३:१८.

झ्वाउन नावाच्या व्यक्‍तीचे उदाहरण विचारात घ्या. त्याने सुमारे पाच हजार डॉलर्सचे (जवळजवळ २,४०,००० रुपये) खूप मोठे कर्ज केले होते. मग, कर्जाची परतफेड न करताच तो दुसऱ्‍या एका गावात राहायला गेला. आठ वर्षांनंतर झ्वाउन सत्य शिकला, आणि त्याच्या बायबल प्रशिक्षित विवेकाने त्याला, ज्याच्याकडून कर्ज घेतले होते त्याच्याशी संपर्क साधून त्याचे कर्ज परत करण्यास प्रवृत्त केले! झ्वाउनला एका तुटपुंज्या मिळकतीवर आपल्या पत्नीचा व चार मुलांचा उदरनिर्वाह करावा लागत असल्यामुळे, तो दरमहा हप्तेवारीने पैसे परत करू शकतो असे कर्ज देणाऱ्‍या व्यक्‍तीने त्याला सांगितले.

आत्मसंतुष्टतेची भावना

प्रेषित पौलाने लिहिले: “चित्तसमाधानासह भक्‍ती हा तर मोठाच लाभ आहे. . . . आपल्याला अन्‍नवस्त्र असल्यास तेवढ्यात तृप्त असावे.” (१ तीम. ६:६-८) या सुज्ञ सल्ल्याचे मनापासून पालन केल्याने लोभाच्या व आक्षेपार्ह व्यापारपद्धतींच्या किंवा झटपट श्रीमंत होण्याच्या अव्यावहारिक योजनांच्या मोहजाळात अडकण्याचे आपण टाळू शकतो. (नीति. २८:२०) पौलाच्या सल्ल्याचे पालन केल्यास, आपल्या मूलभूत गरजा पुरवल्या जातील या भरवशाने जीवनात देवाच्या राज्याला प्रथमस्थानी ठेवण्यासही आपल्याला मदत मिळेल.—मत्त. ६:२५-३४.

आपण कधीच लोभाच्या किंवा हव्यासाच्या आहारी जाऊ शकत नाही असे आपण समजू नये. कारण पैशामध्ये माणसाला ‘मोह’ घालण्याची शक्‍ती असते. (मत्त. १३:२२) बायबलमधील आखान नावाच्या पुरुषाचा विचार करा. इस्राएल लोकांनी चमत्कारिक रीत्या यार्देन नदी पार केल्याचे त्याने स्वतः आपल्या डोळ्यांनी पाहिले होते. असे असले, तरी तो लोभाच्या आहारी गेला आणि यरीहो शहरातील लुटीतून काही सोने, चांदी आणि एक महागडा झगा चोरण्याच्या मोहाला तो बळी पडला. त्याच्या या कृत्यामुळे त्याला आपला जीव गमवावा लागला. (यहो. ७:१, २०-२६) म्हणूनच, या घटनेच्या अनेक शतकांनंतर येशूने जी ताकीद दिली त्याचे आपल्याला आश्‍चर्य वाटू नये. त्याने म्हटले: “संभाळा, सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा.”—लूक १२:१५.

कामाच्या ठिकाणी प्रामाणिक असा

आता आपण, सर्व बाबतींत प्रामाणिक असण्याच्या आपल्या निर्धाराची कसोटी पाहणाऱ्‍या काही प्रसंगांची चर्चा करू या. कामाच्या ठिकाणी प्रामाणिक असणे यात ‘चोरी न करणेदेखील’ सामील आहे; मग, चोरी करणे ही एक सर्वसामान्य बाब समजली जात असली तरी. (तीत २:९, १०, पं.र.भा.) एका सरकारी कार्यालयात काम करणाऱ्‍या ज्यूरांडीरचे उदाहरण विचारात घ्या. तो आपला प्रवास खर्च नेहमी प्रामाणिकपणे दाखवायचा. पण, त्याचे सहकर्मचारी मात्र त्यांचा प्रवास खर्च वाढवून दाखवायचे. ते असे करू शकत होते कारण त्या विभागाचा प्रमुख अधिकारी त्यांना तसे करण्याची मुभा देत होता. किंबहुना, याच प्रमुख अधिकाऱ्‍याने ज्यूरांडीरच्या प्रामाणिकपणाबद्दल त्याची खरडपट्टी काढली व त्याला नोकरीनिमित्त बाहेर पाठवण्याचेही बंद केले. काही काळानंतर मात्र, कार्यालयाच्या जमाखर्चाची अधिकृत तपासणी झाली तेव्हा ज्यूरांडीरची त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल प्रशंसा करण्यात आली व त्याला नोकरीत बढतीही मिळाली.

आन्ड्रे नावाच्या एका सेल्समॅनला त्याच्या मालकाने असे सांगितले होते, की ग्राहकांना दिलेल्या सेवेबद्दल त्याने त्यांना दुप्पट फी आकारावी. या बाबतीत असलेल्या बायबल तत्त्वांचे पालन करण्याचे धैर्य यहोवाने आपल्याला द्यावे म्हणून आन्ड्रेने प्रार्थना केली. (स्तो. १४५:१८-२०) आपण मालकाच्या सांगण्यानुसार का करू शकत नाही हे त्याने आपल्या मालकाला सांगण्याचा प्रयत्नही केला. पण, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. म्हणून मग आन्ड्रेने आपली चांगल्या पगाराची नोकरी सोडून देण्याचा निर्णय घेतला. पण, सुमारे एक वर्षानंतर त्याच मालकाने त्याला पुन्हा कामावर रुजू होण्यास सांगितले आणि ग्राहकांना आता दुप्पट फी आकारली जात नसल्याचे आश्‍वासनही त्याला दिले. नंतर, आन्ड्रेला एक मॅनेजर म्हणून बढती मिळाली.

उसने घेतलेले पैसे परत करा

प्रेषित पौलाने ख्रिश्‍चनांना असा सल्ला दिला: “कोणाच्या ऋणात राहू नका.” (रोम. १३:८) एखाद्याकडून उसने घेतलेले पैसे आपण का परत करत नाही याची अनेक कारणे देण्याचा कदाचित आपण प्रयत्न करू. आपल्याला असे वाटेल की आपण ज्याच्याकडून पैसे घेतले होते तो चांगला श्रीमंत आहे, तेव्हा त्याला पैशांची काय गरज? पण, बायबल आपल्याला अशी ताकीद देते: “दुर्जन उसने घेतो आणि परत करीत नाही.”—स्तो. ३७:२१.

पण मग, एखादा अनपेक्षित “प्रसंग” घडल्यामुळे, आपण उसने घेतलेले पैसे परत करू शकत नसलो तेव्हा काय? (उप. ९:११, पं.र.भा.) फ्रान्सीसकोचे उदाहरण लक्षात घ्या. आपली गहाण ठेवलेली वस्तू सोडवण्यासाठी त्याने अल्फ्रेडोकडून सात हजार डॉलर्स (जवळजवळ ३,३०,००० रुपये) उसणे घेतले होते. पण, व्यवसायातील काही अडचणींमुळे फ्रान्सीसको ठरलेल्या तारखेला पैसे परत करू शकला नाही. याबद्दल तो स्वतःहून अल्फ्रेडोशी बोलला. त्यावर अल्फ्रेडोने त्याला हप्तेवारीने पैसे परत करण्यास सांगितले.

खोटी छाप पाडण्याचे टाळा

पहिल्या शतकातील ख्रिस्ती मंडळीतील हनन्या व सप्पीरा या जोडप्याचे वाईट उदाहरण आठवा. आपली शेतजमीन विकून त्यांना जितके पैसे मिळाले होते त्यापैकी केवळ काही पैसे त्यांनी प्रेषितांना दिले आणि विक्रीतून मिळालेले सर्व पैसे आपण देत आहोत असा दावा त्यांनी केला. आपण किती उदार मनाचे आहोत याची त्यांना इतरांवर छाप पाडायची होती. पण, देवाच्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने प्रेषित पेत्राने त्यांच्या लबाडीचा पर्दाफाश केला आणि यहोवाने त्यांना जिवे मारले.—प्रे. कृत्ये ५:१-११.

खोटे बोलणाऱ्‍या हनन्या व सप्पीरा यांच्या अगदी उलट बायबलचे लेखक निष्कपट व प्रामाणिक होते. उदाहरणार्थ, आपल्या रागावर ताबा न ठेवल्यामुळे मोशेला प्रतिज्ञात देशात जाण्याची संधी नाकारण्यात आली हे त्याने अगदी प्रामाणिकपणे नमूद केले. (गण. २०:७-१३) त्याचप्रमाणे, योनाने निनवेकरांना प्रचार करण्याआधी व त्याच्यानंतर प्रदर्शित केलेल्या आपल्या दुर्बलतांवर पांघरूण घातले नाही. उलट, त्याने त्या नमूद केल्या.—योना १:१-३; ४:१-३.

खरे बोलण्यासाठी निश्‍चितच धैर्याची गरज असते; मग, त्यासाठी तुम्हाला काही किंमत मोजावी लागली तरी. ही गोष्ट, १४ वर्षांच्या नटालिया नावाच्या एका शाळकरी मुलीच्या उदाहरणावरून स्पष्ट होते. तिने एक परीक्षा दिली होती. शिक्षकाने पेपर तपासून बरोबर अशी खूण केलेले एक उत्तर खरेतर चुकीचे आहे हे तिच्या लक्षात आले. नटालियाला माहीत होते, की तिने याबद्दल शिक्षकांना सांगितले तर तिच्या गुणांवर त्याचा विपरित परिणाम होईल. तरीसुद्धा, ती ही गोष्ट शिक्षकांना सांगण्यास कचरली नाही. तिने म्हटले: “यहोवाचं मन आनंदी करायचं असेल तर आपण प्रामाणिक असलं पाहिजे हे माझ्या आईवडिलांनी नेहमीच मला शिकवलं आहे. मी माझ्या शिक्षकांना सांगितलं नसतं तर माझं मन मला खात राहिलं असतं.” नटालियाच्या प्रामाणिकतेबद्दल तिच्या शिक्षकाने तिचे कौतुक केले.

प्रामाणिकपणा—यहोवाचा सन्मान करणारा गुण

जीझेल नावाच्या एका तरुणीला पैशाचे एक पाकीट सापडले, ज्यात काही कागदपत्रे व ३५ डॉलर्स (जवळजवळ १,६०० रुपये) होते. तिने आपल्या शाळेतील अधिकाऱ्‍यांमार्फत ते पाकीट त्याच्या मालकाला परत करण्याची व्यवस्था केली. याच्या एक महिन्यानंतर, शाळेच्या उप-मुख्याध्यापकांनी, जीझेलच्या प्रामाणिकतेची प्रशंसा करणारे एक पत्र संपूर्ण वर्गाला वाचून दाखवले आणि तिच्या कुटुंबाने तिच्यावर केलेल्या चांगल्या संस्कारांबद्दल व तिला धार्मिक शिक्षण दिल्याबद्दल तिच्या कुटुंबाची प्रशंसा केली. तिच्या ‘सत्कर्मांमुळे’ यहोवाचा गौरव झाला.—मत्त. ५:१४-१६.

आज आपण “स्वार्थी, धनलोभी, बढाईखोर, गर्विष्ठ” व “अपवित्र” लोकांमध्ये राहत असल्यामुळे, प्रामाणिक राहण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात. (२ तीम. ३:२) तरीसुद्धा, यहोवाबद्दलचे हितकारक भय, बायबल प्रशिक्षित विवेक, व आत्मसंतुष्टतेची भावना आपल्याला या अप्रामाणिक जगात प्रामाणिक राहण्यास मदत करतात. शिवाय, यहोवा जो ‘न्यायी आहे; व ज्याला नीतिमत्त्व प्रिय आहे,’ त्याच्यासोबत आपला नातेसंबंधदेखील यामुळे आणखी घनिष्ठ होतो.—स्तो. ११:७.

[तळटीप]

^ काही नावे बदलण्यात आली आहेत.

[७ पानांवरील चित्रे]

यहोवाबद्दलच्या हितकारक भयामुळे प्रामाणिक राहण्याचा आपला निर्धार आणखी पक्का होतो

[८ पानांवरील चित्र]

आपल्या प्रामाणिक आचरणामुळे यहोवाचा गौरव होतो