व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

‘अहाहा, देवाची बुद्धी किती अगाध आहे!’

‘अहाहा, देवाची बुद्धी किती अगाध आहे!’

‘अहाहा, देवाची बुद्धी किती अगाध आहे!’

“अहाहा, देवाच्या बुद्धीची व ज्ञानाची संपत्ति किती अगाध आहे! त्याचे निर्णय किती गहन आणि त्याचे मार्ग किती अगम्य आहेत!”—रोम. ११:३३.

१. बाप्तिस्माप्राप्त ख्रिश्‍चनांसाठी सगळ्यात मोठा विशेषाधिकार कोणता आहे?

 तुम्हाला आजवर बहाल करण्यात आलेला सगळ्यात मोठा विशेषाधिकार कोणता? सुरुवातीला कदाचित, मंडळीत तुम्हाला मिळालेल्या एखाद्या नेमणुकीचा किंवा शाळा-कॉलेजात अथवा नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला मिळालेल्या एखाद्या बक्षिसाचा तुम्ही विचार कराल. पण, बाप्तिस्माप्राप्त ख्रिश्‍चन या नात्याने, एकमेव खरा देव यहोवा याच्याशी एक घनिष्ठ नातेसंबंध जोडता येणे हा आपल्यासाठी सगळ्यात मोठा विशेषाधिकार आहे. परिणामस्वरूप, ‘देव आपल्याला ओळखतो’.—१ करिंथ. ८:३; गलती. ४:९.

२. आपण यहोवाला ओळखणे व त्याने आपल्याला ओळखणे हा इतका मोठा विशेषाधिकार का आहे?

आपण यहोवाला ओळखणे आणि त्याने आपल्याला ओळखणे हा इतका मोठा विशेषाधिकार का आहे? यहोवा या विश्‍वातील सगळ्यात महान व्यक्‍ती आहे केवळ यामुळेच नव्हे, तर तो ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांचे तो संरक्षण करतो यामुळेदेखील हा आपल्यासाठी सगळ्यात मोठा विशेषाधिकार आहे. नहूम संदेष्ट्याने देवाच्या प्रेरणेने असे लिहिले: “परमेश्‍वर चांगला आहे, विपत्काली तो शरणदुर्ग आहे; जे त्याजवर भाव ठेवितात त्यांस तो ओळखितो.” (नहू. १:७; स्तो. १:६) किंबहुना, अनंतकालिक जीवनाची आपली भावी आशा सत्य देवाला व त्याचा पुत्र, येशू ख्रिस्त याला ओळखण्यावरच अवलंबून आहे.—योहा. १७:३.

३. देवाला ओळखणे याचा काय अर्थ होतो?

देवाला ओळखणे याचा अर्थ केवळ त्याचे नाव माहीत असणे इतकाच होत नाही. तर आपण त्याला एका मित्राप्रमाणे ओळखले पाहिजे; त्याला काय आवडते व काय आवडत नाही हे जाणून घेतले पाहिजे व त्यानुसार जीवन व्यतीत केले पाहिजे. आपण देवाला अगदी जवळून ओळखतो हे दाखवण्यासाठी असे करणे अत्यावश्‍यक आहे. (१ योहा. २:४) पण, आपल्याला जर खऱ्‍या अर्थाने यहोवाला ओळखायचे असेल, तर आणखी एक गोष्ट आवश्‍यक आहे. ती म्हणजे, त्याने गतकाळात काय-काय केले एवढेच नव्हे, तर त्याने ते का व कसे केले हे जाणून घेणेदेखील गरजेचे आहे. आपण जितके अधिक यहोवाचे उद्देश समजून घेऊ तितकी अधिक ‘त्याची बुद्धी किती अगाध आहे’ हे जाणून आपण चकित होऊ.—रोम. ११:३३.

उद्देश राखणारा देव

४, ५. (क) बायबलमध्ये “उद्देश” हा शब्द ज्या अर्थाने वापरण्यात आला आहे तो कशास सूचित करतो? (ख) एखादा उद्देश अनेक मार्गांनी कसा साध्य केला जाऊ शकतो याचे एक उदाहरण द्या.

यहोवा हा उद्देश राखणारा देव आहे आणि बायबल त्याच्या ‘युगादिकालाच्या संकल्पाचा [‘सार्वकालिक उद्देशाचा,’ NW]’ उल्लेख करते. (इफिस. ३:१०, ११) या वाक्यांशाचा नेमका अर्थ काय होतो? बायबलमध्ये “उद्देश” हा शब्द ज्या अर्थाने वापरण्यात आला आहे तो एका विशिष्ट ध्येयाला सूचित करतो जो अनेक मार्गांनी साध्य केला जाऊ शकतो.

उदाहरणार्थ, एका व्यक्‍तीला एका विशिष्ट ठिकाणी जायचे आहे. त्या ठिकाणी पोहचणे हे त्या व्यक्‍तीचे ध्येय किंवा उद्देश आहे असे आपण म्हणू शकतो. तेथे पोहचण्यासाठी कोणत्या वाहनाने व कोणत्या मार्गाने प्रवास करावा याचे अनेक पर्याय त्या व्यक्‍तीसमोर असतील. एका विशिष्ट मार्गावरून प्रवास करत असताना अचानक हवामान बदलल्यामुळे, वाहतूक कोंडी झाल्यामुळे किंवा रस्ते बंद करण्यात आल्यामुळे त्या व्यक्‍तीला कदाचित आपला रस्ता बदलून दुसऱ्‍या मार्गाने जावे लागते. वाटेत कोणतेही बदल करावे लागले असले, तरीही त्या व्यक्‍तीला ज्या ठिकाणी जायचे होते तेथे ती पोहचते तेव्हा तिने आपले ध्येय साध्य केलेले असते.

६. यहोवाने आपला उद्देश पूर्ण करण्याच्या बाबतीत कशा प्रकारे लवचीकपणा दाखवला आहे?

त्याचप्रमाणे, यहोवानेसुद्धा आपला सार्वकालिक उद्देश पूर्ण करण्याच्या बाबतीत बराच लवचीकपणा दाखवला आहे. आपल्या बुद्धिमान प्राण्यांचे इच्छा-स्वातंत्र्य लक्षात घेऊन तो आपला उद्देश साध्य करण्यासाठी बदल करण्यास तयार असतो. उदाहरणार्थ, प्रतिज्ञात संततीच्या बाबतीत तो आपला उद्देश कसा साध्य करतो ते आपण पाहू या. सुरुवातीला, यहोवाने पहिल्या मानवी दांपत्याला म्हटले: “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा.” (उत्प. १:२८) एदेन बागेत झालेल्या बंडाळीमुळे देवाचा हा उद्देश फोल ठरला का? मुळीच नाही! नव्याने उद्‌भवलेली परिस्थिती हाताळण्यासाठी यहोवाने त्वरित पाऊल उचलले; आपला उद्देश साध्य करण्यासाठी त्याने एक पर्यायी “मार्ग” निवडला. त्याने भाकीत केले, की एक “संतति” येईल, जी बंडाळी करणाऱ्‍यांनी केलेले नुकसान भरून काढेल.—उत्प. ३:१५; इब्री २:१४-१७; १ योहा. ३:८.

७. निर्गम ३:१४ यात यहोवाने स्वतःविषयी केलेल्या वर्णनावरून आपण काय शिकतो?

आपला उद्देश पूर्ण करत असताना नवीन परिस्थितीशी जुळवून घेण्याची यहोवाची क्षमता त्याने स्वतःबद्दल केलेल्या एका वर्णनाच्या सामंजस्यात आहे. देवाने मोशेला दिलेल्या नेमणुकीत अडथळे येण्याची संभावना आहे असे मोशेने म्हटले तेव्हा यहोवाने पुढील शब्दांत त्याला आश्‍वासन दिले: “मी आहे तो आहे; तू इस्राएलवंशजांस सांग ‘मी आहे’ याने मला तुम्हाकडे पाठविले आहे.” (निर्ग. ३:१४) मूळ भाषेत, “मी आहे तो आहे” या वाक्यांशाचा अर्थ असा होतो, की यहोवा आपला उद्देश पूर्णपणे साध्य करण्यासाठी हवी ती भूमिका घेऊ शकतो! ही गोष्ट, प्रेषित पौलाने एका उदाहरणाद्वारे रोमकरांस पत्राच्या ११ व्या अध्यायात अतिशय सुंदर रीतीने स्पष्ट केली आहे. त्या ठिकाणी तो एका लाक्षणिक जैतुनाच्या झाडाविषयी बोलतो. या उदाहरणाचे परीक्षण केल्याने यहोवाची बुद्धी किती अगाध आहे याबद्दलची आपली समज आणखी वाढेल; मग, आपल्याला स्वर्गीय जीवनाची आशा असो अथवा पृथ्वीवरील सार्वकालिक जीवनाची.

भाकीत केलेल्या संततीविषयी यहोवाचा उद्देश

८, ९. (क) कोणत्या चार मूलभूत गोष्टी आपल्याला जैतुनाच्या झाडाचे उदाहरण समजून घेण्यास मदत करतील? (ख) यहोवा आपला उद्देश पूर्ण करण्याच्या बाबतीत लवचीक आहे हे कोणत्या प्रश्‍नाच्या उत्तरावरून दिसून येते?

जैतुनाच्या झाडाचे उदाहरण समजून घेण्याआधी, भाकीत केलेल्या संततीविषयी असलेल्या यहोवाच्या उद्देशाच्या पूर्णतेसंबंधी आपण चार गोष्टी जाणून घेतल्या पाहिजे. पहिली गोष्ट, यहोवाने अब्राहामाला अभिवचन दिले की, त्याच्या संततीद्वारे किंवा वंशजांद्वारे “पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे आशीर्वादित [होणार होती].” (उत्प. २२:१७, १८) दुसरी गोष्ट, अब्राहामापासून आलेल्या इस्राएल राष्ट्राला “याजकराज्य” उत्पन्‍न करण्याची संधी देण्यात आली होती. (निर्ग. १९:५, ६) तिसरी गोष्ट, स्वाभाविक इस्राएल राष्ट्रातील बहुतेकांनी मशीहाला स्वीकारले नाही, तेव्हा “याजकराज्य” उत्पन्‍न करण्यासाठी यहोवाने इतर पावले उचलली. (मत्त. २१:४३; रोम. ९:२७-२९) शेवटी, येशू हा अब्राहामाच्या संततीचा प्रमुख भाग असला, तरी इतरांनासुद्धा त्या संततीचा भाग बनण्याचा विशेषाधिकार देण्यात आला आहे.—गलती. ३:१६, २९.

या चार मूलभूत गोष्टींच्या आधारावर, प्रकटीकरण पुस्तकातून आपण हे शिकतो, की एकूण १,४४,००० जण येशूसोबत राजे व याजक या नात्याने स्वर्गात राज्य करतील. (प्रकटी. १४:१-४) यांना ‘इस्राएल लोक’ असेही म्हणण्यात आले आहे. (प्रकटी. ७:४-८) पण, १,४४,००० जणांपैकी सगळे स्वाभाविक इस्राएली किंवा यहुदी आहेत का? या प्रश्‍नाच्या उत्तरावरून, यहोवा आपला उद्देश पूर्ण करण्याच्या बाबतीत किती लवचीक आहे हे दिसून येते. प्रेषित पौलाने रोमकरांस लिहिलेल्या पत्रात वरील प्रश्‍नाचे उत्तर कसे देण्यात आले आहे ते आता आपण पाहू या.

“याजकराज्य”

१०. कोणती सुसंधी केवळ इस्राएल राष्ट्राला देण्यात आली होती?

१० आधी उल्लेख केल्याप्रमाणे, केवळ इस्राएल राष्ट्रालाच “याजकराज्य” व “पवित्र राष्ट्र” तयार करण्यासाठी सदस्य पुरवण्याची सुसंधी लाभली होती. (रोमकर ९:४, ५ वाचा.) पण, प्रतिज्ञात संतती आल्यानंतर काय घडणार होते? स्वाभाविक इस्राएल राष्ट्र, सर्व १,४४,००० आध्यात्मिक इस्राएली लोकांना उत्पन्‍न करू शकणार होते का, जे पुढे अब्राहामाच्या संततीचा दुय्यम भाग बनणार होते?

११, १२. (क) ज्यांचे मिळून स्वर्गीय राज्य होणार होते त्यांची निवड केव्हा सुरू झाली, आणि त्या काळी राहणाऱ्‍या बहुतेक यहुद्यांची प्रतिक्रिया काय होती? (ख) जे अब्राहामाची संतती बनणार होते त्यांची एकूण संख्या यहोवाने कशा प्रकारे पूर्ण केली?

११ रोमकर ११:७-१० वाचा. पहिल्या शतकातील यहुद्यांनी, एक राष्ट्र या नात्याने येशूला नाकारले. त्यामुळे अब्राहामाची संतती उत्पन्‍न करण्याची जी सुसंधी केवळ इस्राएल राष्ट्राला होती ती त्यांनी गमावली. पण, इ.स. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या दिवसापासून स्वर्गीय “याजकराज्य” होण्यासाठी सदस्यांची निवड करण्यास सुरुवात झाली, तेव्हा असे काही प्रामाणिक अंतःकरणाचे यहुदी होते ज्यांनी ते आमंत्रण स्वीकारले. यांची संख्या केवळ काही हजार असल्यामुळे, संपूर्ण यहुदी राष्ट्राच्या तुलनेत ते केवळ “शेष” असे होते.—रोम. ११:५.

१२ तर मग, जे अब्राहामाची संतती बनणार होते त्यांची एकूण संख्या यहोवा कशा प्रकारे पूर्ण करणार होता? (रोम. ११:१२, २५) प्रेषित पौलाने याचे उत्तर काय दिले त्याकडे लक्ष द्या: “देवाचे वचन व्यर्थ झाले असे नाही; कारण [स्वाभाविक] इस्राएल वंशातले ते सर्व इस्राएल आहेत असे नाही. आणि ते अब्राहामाचे संतान [वंशज] आहेत म्हणून ते सर्व त्याची मुले [अब्राहामाच्या संततीचा भाग] आहेत असे नाही, . . . म्हणजे देहद्वारे झालेली मुले देवाची मुले आहेत असे नाही तर अभिवचनानुसार जन्मलेली मुलेच संतान अशी गणण्यात येतात.” (रोम. ९:६-८) म्हणून, संततीचा भाग बनणाऱ्‍यांनी अब्राहामाचे शारीरिक वंशज असलेच पाहिजे अशी अपेक्षा यहोवाने केली नाही.

लाक्षणिक जैतुनाचे झाड

१३. (क) जैतुनाचे झाड, (ख) त्याचे मूळ, (ग) त्याचा बुंधा, आणि (घ) त्याच्या फांद्या कशास सूचित करतात?

१३ प्रेषित पौल, अब्राहामाच्या संततीचा भाग होणाऱ्‍यांची तुलना एका लाक्षणिक जैतुनाच्या झाडाच्या फांद्यांशी करतो. * (रोम. ११:२१) हे बागायती जैतुनाचे झाड, देवाने अब्राहामासोबत केलेल्या करारासंबंधी असलेल्या त्याच्या उद्देशाच्या पूर्णतेला सूचित करते. या झाडाचे मूळ, पवित्र असून आध्यात्मिक इस्राएलला जीवनदान देणाऱ्‍या यहोवाला ते सूचित करते. (यश. १०:२०; रोम. ११:१६) झाडाचा बुंधा, अब्राहामाच्या संततीचा प्रमुख भाग असलेल्या येशूला सूचित करतो. झाडाच्या फांद्या, अब्राहामाच्या संततीच्या दुय्यम भागात समाविष्ट असलेल्यांच्या एकूण संख्येला सूचित करतात.

१४, १५. बागायती जैतुनाच्या झाडावरून कोणाला “तोडून टाकण्यात” आले आणि त्यांच्या जागी कोणाचे कलम लावण्यात आले?

१४ जैतुनाच्या झाडाच्या उदाहरणामध्ये, येशूला नाकारणाऱ्‍या स्वाभाविक यहुद्यांची तुलना “तोडून टाकण्यात” आलेल्या जैतुनाच्या फांद्यांशी करण्यात आली आहे. (रोम. ११:१७) अशा रीतीने, अब्राहामाच्या संततीचा भाग बनण्याची सुसंधी ते गमावून बसले. पण, त्यांची जागा कोण घेणार होते? आपण अब्राहामाचे वंशज आहोत असा गर्व करणाऱ्‍या स्वाभाविक यहुद्यांच्या दृष्टिकोनातून पाहता या प्रश्‍नाचे उत्तर कल्पनेपलीकडे असणार होते. पण, बाप्तिस्मा देणाऱ्‍या योहानाने त्यांना आधीच इशारा दिला होता, की यहोवाची इच्छा असल्यास तो दगडांपासून अब्राहामासाठी मुले निर्माण करू शकतो.—लूक ३:८.

१५ तर मग, यहोवाने आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी काय केले? पौल म्हणतो, की बागायती जैतुनाच्या झाडाच्या ज्या फांद्या तोडून टाकण्यात आल्या होत्या, त्यांच्या जागी रानटी जैतुनाच्या झाडाच्या फांद्यांचे कलम लावण्यात आले. (रोमकर ११:१७, १८ वाचा.) अशा प्रकारे, परराष्ट्रांतील आत्म्याने अभिषिक्‍त असलेल्या ख्रिश्‍चनांचे—असे काही ख्रिस्ती रोमच्या मंडळीतही होते—लाक्षणिक रीत्या या जैतुनाच्या झाडाला कलम लावण्यात आले. अशा रीतीने ते अब्राहामाच्या संततीचे भाग बनले. मुळात, ते रानटी जैतुनाच्या फांद्यांसारखे होते, म्हणजे त्यांना या खास कराराचा भाग बनण्याची कोणतीही संधी नव्हती. पण, यहोवाने त्यांच्यासाठी आध्यात्मिक यहुदी बनण्याचा मार्ग मोकळा केला.—रोम. २:२८, २९.

१६. प्रेषित पेत्राने नव्या आध्यात्मिक राष्ट्राच्या स्थापनेचे स्पष्टीकरण कसे दिले?

१६ प्रेषित पेत्र या स्थितीचे स्पष्टीकरण अशा प्रकारे देतो: “म्हणून तुम्हा विश्‍वास ठेवणाऱ्‍यांना [आध्यात्मिक इस्राएलांना, ज्यात विदेशी ख्रिश्‍चनांचाही समावेश होतो] तो [येशू ख्रिस्त] मूल्यवान आहे; परंतु जे विश्‍वास ठेवीत नाहीत त्यांना, ‘बांधणाऱ्‍यांनी नापसंत केलेला धोंडा तोच कोनशिला झाला;’ आणि ‘ठेच लागण्याचा धोंडा व अडखळण्याचा खडक असा झाला;’ . . . पण तुम्ही तर ‘निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहा; ह्‍यासाठी की, ज्याने तुम्हास अंधकारातून काढून आपल्या अद्‌भुत प्रकाशात पाचारण केले त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे;’ ते तुम्ही पूर्वी लोक नव्हता, आता तर देवाचे लोक आहा; तुम्हास दया मिळाली नव्हती, आता तर दया मिळाली आहे.”—१ पेत्र २:७-१०.

१७. यहोवाने जे केले ते कोणत्या अर्थी “सृष्टिक्रम सोडून” होते?

१७ यहोवाने असे काहीतरी केले जे अनेकांच्या दृष्टीने सर्वस्वी अनपेक्षित होते. यहोवाने जे केले होते ते “सृष्टिक्रम सोडून” होते असे पौल त्याचे वर्णन करतो. (रोम. ११:२४) कोणत्या अर्थी ते “सृष्टिक्रम सोडून” होते? एका बागायती झाडाला रानटी झाडाच्या फांदीचे कलम लावणे असामान्यच नव्हे, तर अनैसर्गिकही वाटेल. पण, पहिल्या शतकातील काही शेतकऱ्‍यांनी नेमके हेच केले. * त्याचप्रमाणे, यहोवानेसुद्धा अतिशय असाधारण असे काहीतरी केले. यहुदी लोकांच्या दृष्टीने विदेशी लोकांमध्ये चांगले फळ उत्पन्‍न करण्याची क्षमता नव्हती. पण, यहोवाने त्यांनाच राज्याचे फळ उत्पन्‍न करणाऱ्‍या एका ‘राष्ट्राचा’ भाग बनवले. (मत्त. २१:४३, पं.र.भा.) इ.स. ३६ मध्ये, सुंता न झालेला व ख्रिस्ती धर्म स्वीकारणारा पहिला विदेशी, कर्नेल्य याला अभिषिक्‍त करण्यात आले आणि तेव्हापासून या लाक्षणिक जैतुनांच्या झाडावर सुंता न झालेल्या गैर-यहुदी लोकांचे कलम लावण्याचा मार्ग मोकळा झाला.—प्रे. कृत्ये १०:४४-४८. *

१८. स्वाभाविक यहुद्यांना इ.स. ३६ नंतरही कोणती संधी होती?

१८ याचा अर्थ, इ.स. ३६ नंतर स्वाभाविक यहुद्यांना अब्राहामाच्या संततीचा भाग बनण्याची कोणतीच संधी नव्हती असा होतो का? नाही. पौल म्हणतो: “ते [स्वाभाविक यहुदी] अविश्‍वासात न राहिले तर तेहि कलमरूपे लावण्यात येतील; कारण त्यांचे पुन्हा कलम लावण्यास देव समर्थ आहे. जे मूळचे रानटी जैतुनाचे झाड त्यातून तुला कापून तुझे कलम सृष्टिक्रम सोडून चांगल्या जैतुनात लावले, तर ह्‍या ज्या त्याच्या मूळच्याच फांद्या त्यांचे कलम आपल्या जैतुनात किती विशेषेकरून लावण्यात येईल?”—रोम. ११:२३, २४.

“सर्व इस्राएल लोकांचे तारण होईल”

१९, २०. लाक्षणिक जैतुनाच्या झाडाच्या उदाहरणावरून दिसते त्याप्रमाणे यहोवा काय साध्य करतो?

१९ होय, ‘देवाच्या इस्राएलासंबंधी’ असलेला यहोवाचा उद्देश एका अद्‌भुत मार्गाने पूर्ण होत आहे. (गलती. ६:१६) पौलाने म्हटले त्याप्रमाणे, “सर्व इस्राएल लोकांचे तारण होईल.” (रोम. ११:२६) यहोवाच्या नियुक्‍त वेळी, ‘सर्व इस्राएल लोक,’ म्हणजे आध्यात्मिक इस्राएलांची पूर्ण संख्या, राजे व याजक या नात्याने स्वर्गात सेवा करतील. कोणतीही गोष्ट यहोवाचा उद्देश फोल ठरवू शकत नाही!

२० पूर्वभाकीत केल्याप्रमाणे, अब्राहामाची संतती, म्हणजेच येशू ख्रिस्त व त्याच्यासोबतचे १,४४,००० जण ‘परराष्ट्रीयांवर’ आशीर्वादांचा वर्षाव करतील. (रोम. ११:१२; उत्प. २२:१८) अशा रीतीने, देवाच्या सर्व लोकांना या व्यवस्थेपासून लाभ होतो. खरेच, यहोवा आपला सार्वकालिक उद्देश कशा प्रकारे पूर्ण करतो याचा आपण विचार करतो, तेव्हा ‘देवाची बुद्धी व ज्ञान किती अगाध आहे’ हे पाहून आपण अवाक झाल्याशिवाय राहत नाही.—रोम. ११:३३.

[तळटीपा]

^ पौलाने जैतुनाच्या झाडाचे उदाहरण, स्वाभाविक इस्राएलला सूचित करण्यासाठी दिले नाही. स्वाभाविक इस्राएल राष्ट्रात अनेक राजे व याजक असले, तरी त्यांचे याजकराज्य बनले नाही. कारण मोशेच्या नियमशास्त्रानुसार, इस्राएलमधील राजे याजक बनू शकत नव्हते. त्यामुळे, जैतुनाचे झाड या राष्ट्राला सूचित करू शकत नाही. “याजकराज्य” उत्पन्‍न करण्याचा देवाचा उद्देश, आध्यात्मिक इस्राएलांच्या बाबतीत कशा रीतीने पूर्ण होतो हे दाखवण्यासाठी पौलाने जैतुनाच्या झाडाचे उदाहरण दिले. सदर विषयावर या आधी देण्यात आलेले स्पष्टीकरण, १५ ऑगस्ट १९८३ च्या टेहळणी बुरूज (इंग्रजी) अंकातील पृष्ठे १४-१९ वर आढळते.

^ “रानटी जैतुनाच्या फांद्यांचे कलम का लावले जाते?” ही चौकट पाहा.

^ स्वाभाविक यहुद्यांना, नव्या आध्यात्मिक राष्ट्राचा भाग बनण्याची साडेतीन वर्षांची संधी देण्यात आली त्याच्या शेवटी हे घडले. असे घडेल हे ७० सप्तकांच्या वर्षांविषयी असलेल्या भविष्यवाणीत भाकीत करण्यात आले होते.—दानी. ९:२७.

तुम्हाला आठवते का?

• यहोवा ज्या प्रकारे आपला उद्देश पूर्ण करतो त्यावरून आपण त्याच्याबद्दल काय शिकतो?

• रोमकरांस पत्र ११ व्या अध्यायात, पुढील गोष्टी कशास सूचित करतात?

जैतुनाचे झाड

त्याचे मूळ

त्याचा बुंधा

त्याच्या फांद्या

• कलम करण्याची पद्धत “सृष्टिक्रम सोडून” होती असे का म्हणता येईल?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२४ पानांवरील चौकट/चित्र]

रानटी जैतुनाच्या फांद्यांचे कलम का लावले जाते?

▪ लूशिअस जून्यस मॉडरेटस कॉल्यमेला हा, इ.स. पहिल्या शतकातील एक रोमन सैनिक व शेतकरी होता. ग्रामीण जीवन व शेतीवाडी यांबद्दल १२ पुस्तके लिहिणारा म्हणून तो प्रसिद्ध आहे.

आपल्या पाचव्या पुस्तकात तो या प्राचीन म्हणीचा उल्लेख करतो: “जो आपली जैतुनाची बाग नांगरतो तो फळाची अपेक्षा करतो; जो झाडांस खतपाणी घालतो तो फळ मिळवण्यास आतुर असतो; जो त्यांची छाटणी करतो तो त्यांना फळ देण्यास भाग पाडतो.”

जी झाडे जोमाने वाढतात, पण फळे देत नाहीत अशा झाडांच्या बाबतीत तो पुढील उपाय सुचवतो: “अशा झाडांवर गिरमिटाने (एक हत्यार) भोक पाडावा व त्यात रानटी जैतुनाच्या झाडाची एक फांदी घट्ट बसवावी. याचा परिणाम असा होईल, की त्या झाडात फळ उत्पन्‍न करण्याची क्षमता येईल व ते जास्त फळ देऊ लागेल.

[२३ पानांवरील चित्र]

लाक्षणिक जैतुनाच्या झाडाचे उदाहरण तुम्हाला समजते का?