व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“एक उत्तम पर्यवेक्षक आणि एक प्रिय मित्र”

“एक उत्तम पर्यवेक्षक आणि एक प्रिय मित्र”

“एक उत्तम पर्यवेक्षक आणि एक प्रिय मित्र”

यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाचे सदस्य या नात्याने सेवा करणारे जॉन (जॅक) बार यांचे पृथ्वीवरील जीवन शनिवारी सकाळी, ४ डिसेंबर २०१० रोजी समाप्त झाले. ते ९७ वर्षांचे होते. त्यांचे वर्णन, “एक उत्तम पर्यवेक्षक आणि एक प्रिय मित्र,” असे करण्यात आले आहे.

बंधू जॅक बार यांचा जन्म स्कॉटलँडमधील ॲबरडीन या ठिकाणी झाला होता. तीन भावंडांपैकी ते सगळ्यात लहान होते. त्यांचे आईवडील दोघेही अभिषिक्‍त जनांपैकी होते. बंधू बार आपल्या लहानपणाच्या दिवसांविषयी नेहमी खूप आपुलकीने बोलायचे; त्यांच्या प्रिय आईवडिलांनी त्यांच्यासमोर एक उत्तम आदर्श ठेवल्याबद्दल ते खूप कृतज्ञ होते.

बंधू बार यांनी किशोरवयात पदार्पण केले, तेव्हा अनोळखी लोकांशी बोलणे त्यांना अतिशय कठीण वाटू लागले. पण, या समस्येवर मात करण्यासाठी त्यांनी जिवापाड प्रयत्न केले आणि १९२७ मध्ये एका रविवारी दुपारी वयाच्या १४ व्या वर्षी, मी तुमच्यासोबत घरोघरच्या प्रचार कार्यास जायला तयार आहे असे त्यांनी आपल्या वडिलांना सांगितले. हीच त्यांच्या सेवेची सुरुवात होती. त्या दिवसापासून ते त्यांचा मृत्यू होईपर्यंत बंधू बार सुवार्तेचे आवेशी प्रचारक होते.

एकदा एका भयंकर अपघातातून त्यांची प्रिय आई मरता-मरता वाचली. त्या घटनेमुळे ते जीवनाच्या उद्देशाविषयी गांभीर्याने विचार करू लागले, आणि १९२९ मध्ये त्यांनी यहोवाला आपले जीवन समर्पित केले व १९३४ मध्ये संधी मिळताच, आपल्या समर्पणाचे प्रतिक म्हणून त्यांनी बाप्तिस्मा घेतला. मग १९३९ मध्ये, ते इंग्लंडमधील लंडन बेथेल कुटुंबाचे सदस्य बनले. अशा रीतीने, त्यांची ७१ वर्षांच्या पूर्ण-वेळ सेवेची कारकीर्द सुरू झाली.

२९ ऑक्टोबर १९६० मध्ये, दीर्घकाळापासून आवेशी पायनियर व मिशनरी असलेल्या मिल्ड्रेड विलेट यांच्याशी त्यांचा विवाह झाला. या नात्याला, “एक अतिशय मौल्यवान नातेसंबंध” असे ते म्हणायचे. बंधू बार व बहीण बार हे दोघेही एक आदर्श, एकनिष्ठ वैवाहिक जोडपे म्हणून ओळखले जायचे. ऑक्टोबर २००४ मध्ये मिल्ड्रेडचे पृथ्वीवरील जीवन समाप्त होईपर्यंत त्यांनी ही ओळख टिकवून ठेवली. बंधू बार व बहीण बार दररोज बायबलचा एक भाग एकत्र मिळून वाचायचे.

जे बंधू बार यांना ओळखायचे अशांना जॅक बार हे नाव विचारशील सल्ला देणारे गृहस्थ—नेहमी संतुलित, नेहमी प्रेमळ आणि शास्त्रवचनांत मुळावलेले म्हणून आठवतील. ते अतिशय परिश्रमी आणि इतरांचा विचार करणारे व प्रेमळ पर्यवेक्षकच नव्हे, तर एक विश्‍वासू मित्रदेखील होते. त्यांची उत्तरे, त्यांची भाषणे आणि त्यांच्या प्रार्थना यांतून सत्यावरील त्यांच्या गाढ प्रेमाची व यहोवासबोतच्या त्यांच्या निकट नातेसंबंधाची प्रचिती मिळायची.

आपले प्रिय बंधू बार आज आपल्यामध्ये नसले, तरी त्यांना अमरत्वाचे बक्षिस मिळाल्याबद्दल आपणही त्यांच्या आनंदात सहभागी होतो. यहोवासोबतच्या त्यांच्या नातेसंबंधाची व त्यांना बहाल करण्यात आलेल्या या आशेची त्यांनी नेहमी खूप कदर केली. त्यांचे संपूर्ण जीवन या अद्‌भुत आशेवर केंद्रित होते.—१ करिंथ. १५:५३, ५४. *

[तळटीप]

^ टेहळणी बुरूज १ जुलै १९८७ (इंग्रजी), पृष्ठे २६ ते ३१ वर जॉन ई. बार यांची जीवनकथा दिली आहे.