ख्रिस्ती कुटुंबांनो—‘जागे राहा’
ख्रिस्ती कुटुंबांनो—‘जागे राहा’
‘आपण जागे व सावध राहावे.’—१ थेस्सलनी. ५:६.
१, २. आध्यात्मिक रीत्या शेवटपर्यंत जागृत राहण्यासाठी एका कुटुंबाने काय करणे गरजेचे आहे?
‘परमेश्वराच्या महान व भयंकर दिवसाविषयी’ बोलताना प्रेषित पौलाने थेस्सलनीका येथील ख्रिश्चनांना असे लिहिले: “बंधुजनहो, त्या दिवसाने चोरासारखे तुम्हास गाठावे असे तुम्ही अंधारात नाही. कारण तुम्ही सगळे प्रकाशाची प्रजा व दिवसाची प्रजा आहा. आपण रात्रीचे व अंधाराचे नाही.” पौलाने पुढे असे म्हटले: “ह्यावरून आपण इतरांसारखी झोप घेऊ नये, तर जागे व सावध राहावे.”—योए. २:३१; १ थेस्सलनी. ५:४-६.
२ पौलाने थेस्सलनीकाच्या ख्रिश्चनांना दिलेला सल्ला, ‘अंतसमयात’ राहणाऱ्या ख्रिश्चनांकरता विशेष महत्त्वाचा आहे. (दानी. १२:४) सैतानाच्या दुष्ट जगाचा अंत जसजसा जवळ येत आहे, तसतसा तो शक्य तितक्या अधिक खऱ्या उपासकांना देवाच्या उपासनेपासून परावृत्त करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. तेव्हा आध्यात्मिक रीत्या जागरूक राहण्यासाठी पौलाच्या सल्ल्याचे मनापासून पालन करणे बुद्धिमानीचे आहे. एका ख्रिस्ती कुटुंबाला शेवटपर्यंत जागृत राहायचे असेल, तर कुटुंबातील प्रत्येक सदस्याने आपापल्या शास्त्रवचनीय जबाबदाऱ्या पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. तर मग, ‘जागे राहण्यास’ आपल्या कुटुंबाला मदत करण्यासाठी पती, पत्नी, आणि मुले कोणती भूमिका बजावतात?
पतींनो—‘उत्तम मेंढपाळाचे’ अनुकरण करा
३. पहिले तीमथ्य ५:८ नुसार, कुटुंबप्रमुख या नात्याने एका पुरुषाची जबाबदारी काय आहे?
३ बायबल म्हणते: “स्त्रीचे मस्तक पुरुष आहे.” (१ करिंथ. ११:३) तर मग, कुटुंबप्रमुख या नात्याने एका पुरुषाची जबाबदारी काय आहे? मस्तकपदाच्या एका पैलूविषयी शास्त्रवचनांत असे म्हटले आहे: “जर कोणी स्वकीयांची व विशेषेकरून आपल्या घरच्यांची तरतूद करीत नाही, तर त्याने विश्वास नाकारला आहे; तो माणूस विश्वास न ठेवणाऱ्या माणसापेक्षा वाईट आहे.” (१ तीम. ५:८) हे खरे आहे, की एका पुरुषाने आपल्या कुटुंबाच्या भौतिक गरजा पूर्ण केल्या पाहिजेत. पण, त्याला जर आपल्या कुटुंबाला आध्यात्मिक रीत्या जागृत राहण्यास मदत करायची असेल, तर त्याने केवळ कर्ता पुरुष असणे पुरेसे नाही. त्याने आपल्या कुटुंबाची आध्यात्मिक रीत्या उभारणी केली पाहिजे, म्हणजेच त्याने कुटुंबातील सर्वांना, देवासोबतचा त्यांचा नातेसंबंध दृढ करण्यास मदत केली पाहिजे. (नीति. २४:३, ४) तो हे कसे करू शकतो?
४. कोणती गोष्ट एका पुरुषाला यशस्वी रीत्या आपल्या कुटुंबाची आध्यात्मिक रीत्या उभारणी करण्यास साहाय्य करू शकते?
४ “जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे तसा पति पत्नीचे मस्तक” आहे; त्यामुळे येशू ज्या प्रकारे मंडळीवर मस्तकपद चालवतो त्याचे एका विवाहित पुरुषाने निरीक्षण व अनुकरण केले पाहिजे. (इफिस. ५:२३) येशूने आपल्या अनुयायांसोबत असलेल्या त्याच्या नातेसंबंधाचे वर्णन कसे केले ते विचारात घ्या. (योहान १०:१४, १५ वाचा.) कोणते सूत्र एका पुरुषाला यशस्वी रीत्या आपल्या कुटुंबाची आध्यात्मिक उभारणी करण्यास साहाय्य करू शकते? ते सूत्र म्हणजे: येशूने “उत्तम मेंढपाळ” या नात्याने जे म्हटले व केले त्याचा अभ्यास करणे आणि त्याच्या “पावलांवर पाऊल ठेवून” चालणे.—१ पेत्र २:२१.
५. उत्तम मेंढपाळाला मंडळीविषयी कोणती माहिती आहे?
५ लाक्षणिक अर्थाने बोलायचे झाल्यास, एक मेंढपाळ व त्याची मेंढरे यांच्यामधील नातेसंबंध ओळखीवर व भरवशावर आधारित असतो. मेंढपाळाला आपल्या मेंढरांविषयी सर्व काही माहीत असते, आणि मेंढरे आपल्या मेंढपाळाला ओळखतात व त्याच्यावर भरवसा ठेवतात. ते त्याचा आवाज ओळखतात व त्याला प्रतिसाद देतात. येशूने म्हटले: “मी माझ्या मेंढरांना ओळखतो व ती मला ओळखतात.” (योहा. १०:१४, १५, सुबोध भाषांतर) येशूला आपल्या मंडळीविषयी केवळ वरवरचे ज्ञान नाही. या ठिकाणी ‘ओळखणे’ असे भाषांतर केलेल्या ग्रीक शब्दातून “वैयक्तिकपणे, जवळून ओळखणे” असा अर्थ सूचित होतो. होय, उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढरांना व्यक्तिशः ओळखतो. त्याला प्रत्येकाच्या गरजांची, दुर्बलतांची व सकारात्मक गोष्टींची माहिती असते. आपल्या मेंढरांविषयी कोणतीच गोष्ट आपला आदर्श असलेल्या मेंढपाळाच्या नजरेतून सुटत नाही. आणि मेंढरेसुद्धा आपल्या मेंढपाळाला पूर्णपणे ओळखतात व त्याच्या नेतृत्वावर भरवसा ठेवतात.
६. ख्रिस्ती पती कशा प्रकारे उत्तम मेंढपाळाचे अनुकरण करू शकतात?
६ ख्रिस्ताप्रमाणे आपले मस्तकपद चालवण्यासाठी एका पतीने, आपण एक मेंढपाळ आहोत व आपल्या देखरेखीखाली असलेले कुटुंबातील सदस्य मेंढरे आहेत या दृष्टिकोनातून पाहण्यास शिकले पाहिजे. त्याने आपल्या कुटुंबाला चांगल्या प्रकारे जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पतीला असे करणे खरोखर शक्य आहे का? एक पती आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांशी मनमोकळा संवाद साधत असेल, त्यांच्या समस्या ऐकून घेत असेल, कुटुंब मिळून केल्या जाणाऱ्या गोष्टींत पुढाकार घेत असेल, तसेच कौटुंबिक उपासना, सभांमध्ये उपस्थित राहणे, क्षेत्र सेवा, करमणूक व मनोरंजन यांसारख्या गोष्टींविषयी विवेकी निर्णय घेत असेल, तर त्याला आपल्या कुटुंबाला चांगल्या प्रकारे जाणून घेणे नक्कीच शक्य होईल. एक ख्रिस्ती पती देवाच्या वचनातील ज्ञानासोबतच आपल्या देखरेखीखाली असलेल्यांना चांगल्या प्रकारे ओळखून कुटुंबात पुढाकार घेतो, तेव्हा त्याच्या कुटुंबातील सदस्य त्याच्या नेतृत्वावर भरवसा ठेवण्याची जास्त शक्यता आहे. तसेच, आपले कुटुंब एकजुटीने यहोवाची उपासना करत आहे हे पाहून त्यालाही समाधान मिळण्याची शक्यता आहे.
७, ८. आपल्या देखरेखीखाली असलेल्यांवर प्रेम करण्याच्या बाबतीत एक पती उत्तम मेंढपाळाचे अनुकरण कसे करू शकतो?
७ एक चांगला मेंढपाळ आपल्या मेंढरांवर प्रेमसुद्धा करतो. शुभवर्तमानांत दिलेल्या येशूच्या जीवनाच्या व सेवाकार्याच्या अहवालांचा आपण अभ्यास करतो, तेव्हा येशूने आपल्या शिष्यांप्रती दाखवलेले प्रेम पाहून आपल्या मनात कृतज्ञता दाटून येते. त्याने आपल्या ‘मेंढरांसाठी आपला प्राणदेखील दिला.’ पतींनी त्यांच्या देखरेखीखाली असलेल्यांना प्रेम दाखवण्याच्या बाबतीत येशूचे अनुकरण केले पाहिजे. देवाचा अनुग्रह प्राप्त करण्याची इच्छा बाळगणारा पती, आपल्या पत्नीवर निष्ठुरपणे वर्चस्व गाजवत नाही, तर “जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीति केली तशी” तो तिच्यावर सदैव प्रीती करतो. (इफिस. ५:२५) ती आदरास पात्र असल्यामुळे, त्याने तिच्याशी प्रेमळपणे व विचारशीलपणे बोलले पाहिजे.—१ पेत्र ३:७.
८ आपल्या मुलांवर संस्कार करताना, कुटुंबप्रमुखाने बायबलमधील तत्त्वांचे पालन करण्याच्या बाबतीत खंबीर असले पाहिजे. पण, त्याच वेळी त्याने आपल्या मुलांवर प्रेमसुद्धा केले पाहिजे. शिस्त लावण्याची गरज असेल, तर ती प्रेमळपणे लावावी. आपल्याकडून काय अपेक्षिले जाते हे समजण्यास काही मुलांना कदाचित इतर मुलांपेक्षा जास्त वेळ लागेल. अशा वेळी, पित्याने त्यांच्याशी अधिक सबुरीने वागले पाहिजे. पुरुष जेव्हा येशूच्या उदाहरणाचे निरंतर अनुसरण करतात, तेव्हा ते आपल्या कुटुंबात निश्चिंत व सुरक्षित वातावरण निर्माण करतात आणि त्यांची कुटुंबे, स्तोत्रकर्त्याने आपल्या स्तोत्रात उल्लेख केलेली आध्यात्मिक सुरक्षा अनुभवतात.—स्तोत्र २३:१-६ वाचा.
९. कुलपिता नोहाप्रमाणे, ख्रिस्ती पतींवर कोणती जबाबदारी आहे, आणि ती पूर्ण करण्यास कोणती गोष्ट त्यांना मदत करेल?
९ कुटुंबप्रमुखांसाठी नोहानेदेखील एक उत्तम उदाहरण मांडले. कुलपिता नोहा त्याच्या काळातील जगाच्या शेवटल्या दिवसांत राहत होता. पण यहोवाने “अभक्तांच्या जगावर जलप्रलय आणिला” तेव्हा त्याने “नोहा ह्याचे सात जणांसह रक्षण केले.” (२ पेत्र २:५) नोहावर, आपल्या कुटुंबाला जलप्रलयातून वाचण्यास मदत करण्याची जबाबदारी होती. तशीच जबाबदारी या शेवटल्या दिवसांत ख्रिस्ती कुटुंबप्रमुखांवर आहे. (मत्त. २४:३७) तेव्हा, कुटुंबप्रमुखांनी ‘उत्तम मेंढपाळाच्या’ उदाहरणाचा अभ्यास आणि अनुकरण करणे किती गरजेचे आहे!
पत्नींनो—आपल्या कुटुंबाची उभारणी करा
१०. पतीच्या अधीन असणे याचा एका पत्नीकरता काय अर्थ होतो?
१० प्रेषित पौलाने लिहिले: “स्त्रियांनो, तुम्ही जशा प्रभूच्या अधीन तशा आपआपल्या पतीच्या अधीन असा.” (इफिस. ५:२२) या विधानातून असे मुळीच सूचित होत नाही की पत्नींचा दर्जा खालचा आहे. देवाने पहिली स्त्री हव्वा हिला निर्माण करण्याआधी असे म्हटले: “मनुष्य एकटा असावा हे बरे नाही, तर त्याच्यासाठी अनुरूप साहाय्यक मी करीन.” (उत्प. २:१८) एक पती कुटुंबातील जबाबदाऱ्या पूर्ण करत असताना पत्नी त्याला पाठिंबा देते. त्याअर्थी, “अनुरूप साहाय्यक” या नात्याने पत्नीची भूमिका खरोखरच आदरणीय आहे.
११. एक आदर्श पत्नी कशा प्रकारे आपल्या कुटुंबाची उभारणी करते?
११ एक आदर्श पत्नी आपल्या कुटुंबाच्या कल्याणाकरता झटते. (नीतिसूत्रे १४:१ वाचा.) एक मूर्ख स्त्री मस्तकपदाच्या व्यवस्थेचा अनादर करते. पण त्याच्या अगदी उलट, एक बुद्धिमान स्त्री त्या व्यवस्थेचा गाढ आदर करते. या जगात सर्रासपणे दिसून येणारी अवज्ञाकारी व मनमानी वृत्ती ती दाखवत नाही, तर त्याऐवजी ती आपल्या विवाहसोबत्याच्या अधीन असते. (इफिस. २:२) एक मूर्ख स्त्री आपल्या पतीविषयी वाईट बोलण्यास मागेपुढे पाहत नाही, पण एक बुद्धिमान स्त्री आपल्या पतीबद्दल मुलांना व इतरांना असलेला आदर आणखी वाढवण्याचा प्रयत्न करते. अशी पत्नी आपल्या पतीला टाकून बोलण्याद्वारे किंवा त्याच्यासोबत वाद घालण्याद्वारे त्याच्या मस्तकपदाचा अपमान न करण्याची काळजी घेते. काटकसर करण्याच्या बाबतीत काय म्हणता येईल? एक मूर्ख स्त्री सहसा कुटुंबाने कठोर परिश्रम करून मिळवलेला पैसा उधळून टाकते. पण, कुटुंबाच्या भल्याचा विचार करणारी पत्नी तशी नसते. आर्थिक गोष्टींच्या बाबतीत ती आपल्या पतीला सहकार्य करते. ती ज्या प्रकारे कार्य करते त्यातून तिची चांगली निर्णयशक्ती व काटकसर करण्याची मनोवृत्ती दिसून येते. पतीने जास्त पैसा मिळवण्यासाठी आणखी जास्त काम करावा असा दबाव ती त्याच्यावर आणत नाही.
१२. आपल्या कुटुंबाला ‘जागे राहण्यास’ मदत करण्यासाठी एक पत्नी काय करू शकते?
१२ पती, मुलांना आध्यात्मिक शिक्षण देत असताना, एक आदर्श पत्नी आपल्या पतीला सहकार्य करते आणि अशा प्रकारे ती आपल्या कुटुंबाला ‘जागे राहण्यास’ मदत करते. (नीति. १:८) ती कौटुंबिक उपासनेच्या कार्यक्रमाला उत्साहाने पाठिंबा देते. शिवाय, पती मुलांना सल्ला देतो व शिस्त लावतो तेव्हा ती त्याला सहकार्य करते. आपल्या पतीला सहकार्य न करणाऱ्या स्त्रीच्या मुलांचे सहसा भौतिक व आध्यात्मिक रीत्या हाल होतात. अशा स्त्रीपेक्षा, पतीला सहकार्य करणारी पत्नी किती वेगळी असते!
१३. एक पती ईश्वरशासित कार्यांमध्ये क्रियाशीलपणे सहभाग घेतो तेव्हा पत्नीने त्याला पाठिंबा देणे का महत्त्वाचे आहे?
१३ आपला पती ख्रिस्ती मंडळीत एक क्रियाशील भूमिका पार पाडत आहे हे पाहून त्याला सहकार्य करणाऱ्या पत्नीला कसे वाटते? शंकाच नाही, तिला खूप आनंद होतो! तिचा पती सेवा सेवक असो, वडील असो, किंवा इस्पितळ संपर्क समितीचा वा प्रादेशिक बांधकाम समितीचा सदस्य असो, त्याला मिळालेल्या विशेषाधिकाराबद्दल तिला आनंद होतो. बोलण्याद्वारे व कार्यांद्वारे आपल्या पतीला क्रियाशीलपणे पाठिंबा देण्यासाठी तिला नक्कीच त्याग करावे लागतील. पण, तिला याची जाणीव असते की तिचा पती ईश्वरशासित कार्यांमध्ये सहभाग घेत असल्यामुळे संपूर्ण कुटुंबाला आध्यात्मिक रीत्या जागे राहण्यास साहाय्य मिळते.
१४. (क) पतीला सहकार्य करणाऱ्या पत्नीला कोणती गोष्ट कठीण जाऊ शकते, आणि त्यावर ती कशी मात करू शकते? (ख) आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या कल्याणाला एक पत्नी कशा प्रकारे हातभार लावते?
१४ पतीने घेतलेल्या एखाद्या निर्णयाशी पत्नी सहमत नसते, तेव्हा आपल्या पतीला सहकार्य करण्याच्या बाबतीत आदर्श राखणे तिला कठीण जाऊ शकते. असे असले, तरीही ती “सौम्य व शांत आत्मा” प्रदर्शित करते आणि पतीने घेतलेला निर्णय अंमलात आणण्यासाठी त्याला सहकार्य करते. (१ पेत्र ३:४) एक चांगली पत्नी प्राचीन काळातील सारा, रूथ, अबीगईल आणि येशूची आई मरीया यांसारख्या देवभीरू स्त्रियांच्या उत्तम उदाहरणांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करते. (१ पेत्र ३:५, ६) तसेच, “चालचलणुकीत आदरणीय” असलेल्या आधुनिक काळातील वृद्ध स्त्रियांचेही ती अनुकरण करते. (तीत २:३, ४) आपल्या पतीला प्रेम आणि आदर दाखवण्याद्वारे, एक आदर्श पत्नी वैवाहिक जीवनातील यशाला व संपूर्ण कुटुंबाच्या कल्याणाला मोठ्या प्रमाणात हातभार लावते. तिचे घर आनंदाचे व सुरक्षेचे आश्रयस्थान असते. एका आध्यात्मिक मनोवृत्तीच्या पुरुषाच्या नजरेत, सहकार्य करणारी पत्नी अनमोल असते!—नीति. १८:२२.
मुलांनो—आपले ‘लक्ष अदृश्य गोष्टींकडे लावा’
१५. आपल्या कुटुंबाला ‘जागे राहण्यास’ मदत करण्यासाठी मुले पालकांसोबत मिळून कसे कार्य करू शकतात?
१५ मुलांनो, आपल्या कुटुंबाला आध्यात्मिक रीत्या ‘जागे राहण्यास’ मदत करण्यासाठी तुम्ही आपल्या पालकांसोबत मिळून कुटुंबातील तुमची भूमिका कशी पार पाडू शकता? यहोवाने तुमच्याकरता राखून ठेवलेल्या बक्षिसाचा विचार करा. कदाचित तुमच्या बालपणापासूनच तुमच्या आईवडिलांनी नंदनवनातील जीवनाची चित्रे तुम्हाला दाखवली असतील. मग, तुम्ही मोठे होत होता तेव्हा, नवीन जगात सार्वकालिक जीवन कसे असेल याचे चित्र तुमच्या डोळ्यांपुढे उभे करण्यासाठी त्यांनी बहुधा बायबलचा व ख्रिस्ती प्रकाशनांचा वापर केला असेल. तुम्ही आपले लक्ष यहोवाच्या सेवेवर केंद्रित केले आणि त्यानुसार आपल्या जीवनाची आखणी केली, तर तुम्हाला ‘जागे राहण्यास’ मदत होईल.
१६, १७. जीवनाच्या शर्यतीत यशस्वीपणे धावण्यासाठी मुले काय करू शकतात?
१६ पहिले करिंथकर ९:२४ वाचा. या वचनात प्रेषित पौलाने दिलेल्या सल्ल्याचे मनापासून पालन करा. येथे प्रेषित पौल यहोवाच्या सेवेची तुलना धावण्याच्या शर्यतीशी आणि सार्वकालिक जीवनाची तुलना बक्षिसाशी करतो. तेव्हा, बक्षिस जिंकण्याच्या उद्देशानेच जीवनाच्या शर्यतीत धावा. ज्यामुळे शेवटी सार्वकालिक जीवन प्राप्त होईल असाच जीवनक्रम निवडा. भौतिक गोष्टी मिळवण्याच्या मागे लागल्यामुळे अनेकांचे बक्षिसावरील लक्ष विकर्षित झाले आहे. असे करणे किती मूर्खपणाचे आहे! धनसंपत्ती मिळवण्यावरच आपले लक्ष केंद्रित केल्याने, आपण खऱ्या अर्थाने सुखी होणार नाही. पैशाने मिळणाऱ्या गोष्टी तात्पुरत्या असतात. पण, तुम्ही आपले लक्ष “अदृश्य गोष्टींकडे” लावा. का? कारण, “अदृश्य गोष्टी सार्वकालिक आहेत.”—२ करिंथ. ४:१८.
१७ ‘अदृश्य गोष्टींमध्ये’ राज्याशी संबंधित आशीर्वादांचा समावेश होतो. तेव्हा, अशा प्रकारे आपले जीवन जगण्याची योजना करा जेणेकरून तुम्हाला ते आशीर्वाद प्राप्त होतील. यहोवाची सेवा करण्यात आपले आयुष्य घालवल्यानेच खरा आनंद प्राप्त होतो. खऱ्या देवाची सेवा केल्याने छोटी-छोटी तसेच दीर्घ पल्ल्याची ध्येये गाठण्याच्या अनेक संधी मिळतात. * तुम्हाला पूर्ण करता येतील अशी आध्यात्मिक ध्येये ठेवल्याने, सार्वकालिक जीवनाचे बक्षिस मिळवण्याच्या उद्दिष्टाने यहोवाची सेवा करण्यावर तुमचे लक्ष केंद्रित करण्यास तुम्हाला मदत मिळेल.—१ योहा. २:१७.
१८, १९. आपण देवासोबत एक वैयक्तिक नातेसंबंध जोडला आहे याची एक मूल कशी खातरी करू शकते?
१८ मुलांनो, सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी सर्वात प्रथम यहोवासोबत वैयक्तिक नातेसंबंध जोडणे जरुरीचे आहे. असा वैयक्तिक नातेसंबंध तुम्ही जोडला आहे का? स्वतःला विचारा: ‘मी एक आध्यात्मिक व्यक्ती आहे का, की आध्यात्मिक कार्यांतील माझा सहभाग माझ्या आईवडिलांवर अवलंबून आहे? ज्या गुणांमुळे देव आनंदी होतो असे गुण मी विकसित करत आहे का? नियमित प्रार्थना करणे, अभ्यास करणे, सभांना उपस्थित राहणे व क्षेत्र सेवेत सहभाग घेणे यांसारख्या खऱ्या उपासनेशी संबंधित कार्यांत नित्यनियमाने सहभाग घेण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील असतो का? देवासोबत वैयक्तिक नातेसंबंध जोपासण्याद्वारे मी देवाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहे का?’—याको. ४:८.
१९ मोशेचाच विचार करा. तो एका परकीय देशाच्या संस्कृतीत मोठा झाला असला, तरी त्याने स्वतःला फारोच्या मुलीचा मुलगा म्हणून नव्हे, तर यहोवाचा उपासक म्हणून ओळखले जाणे पसंत केले. (इब्री लोकांस ११:२४-२७ वाचा.) ख्रिस्ती मुलांनो, यहोवाची सेवा विश्वासूपणे करण्यासाठी तुम्हीदेखील दृढनिश्चयी असले पाहिजे. असे केल्याने, तुम्हाला खरा आनंद, सध्याच्या काळात एक उत्तम जीवन, आणि ‘खरे जीवन बळकट धरण्याची’ आशा प्राप्त होईल.—१ तीम. ६:१९.
२०. सार्वकालिक जीवनाच्या शर्यतीत, बक्षिस कोणाला मिळते?
२० प्राचीन काळातील धावण्याच्या शर्यतींत केवळ एकच व्यक्ती जिंकत असे. पण, सार्वकालिक जीवनाच्या शर्यतीच्या बाबतीत तसे नाही. “सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहचावे,” अशी देवाची इच्छा आहे. (१ तीम. २:३, ४) तुमच्या आधी अनेक जण जीवनाच्या शर्यतीत यशस्वीपणे धावले आहेत, आणि अनेक जण तुमच्या सोबतीने धावत आहेत. (इब्री १२:१, २) या शर्यतीत जे हार मानत नाहीत त्या सर्वांना बक्षिस मिळेल. तेव्हा, शर्यत जिंकण्याचा दृढ निर्धार करा!
२१. पुढील लेखात कोणत्या गोष्टींची चर्चा केली जाईल?
२१ “परमेश्वराचा मोठा व भयंकर दिवस” नक्कीच येईल. (मला. ४:५) त्या दिवसाने ख्रिस्ती कुटुंबांना अचानक गाठू नये म्हणून त्यांनी जागे राहिले पाहिजे. म्हणून कुटुंबातील सर्वांनी आपापल्या शास्त्रवचनीय जबाबदाऱ्या पूर्ण करणे अतिशय महत्त्वाचे आहे. आध्यात्मिक रीत्या जागरूक राहण्यासाठी आणि देवासोबतचा नातेसंबंध अधिक मजबूत करण्यासाठी तुम्ही आणखी काय करू शकता? पुढील लेखात, अशा तीन गोष्टींची चर्चा केली जाईल ज्यांचा संपूर्ण कुटुंबाच्या आध्यात्मिक कल्याणावर प्रभाव पडतो.
[तळटीप]
तुम्हाला काय शिकायला मिळाले?
• ख्रिस्ती कुटुंबांनी ‘जागे राहणे’ का अत्यावश्यक आहे?
• एक पती कशा प्रकारे उत्तम मेंढपाळाचे अनुकरण करू शकतो?
• आपल्या पतीला सहकार्य करण्यासाठी एक आदर्श पत्नी काय करू शकते?
• आपल्या कुटुंबांना आध्यात्मिक रीत्या जागृत ठेवण्यासाठी मुले काय करू शकतात?
[अभ्यासाचे प्रश्न]
[९ पानांवरील चित्र]
आध्यात्मिक पुरुषाच्या नजरेत, सहकार्य करणारी पत्नी अनमोल असते