व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुमच्या जीवनात सगळ्यात महत्त्वाची व्यक्‍ती कोण आहे?

तुमच्या जीवनात सगळ्यात महत्त्वाची व्यक्‍ती कोण आहे?

तुमच्या जीवनात सगळ्यात महत्त्वाची व्यक्‍ती कोण आहे?

‘केवळ तूच सर्व पृथ्वीवर परात्पर आहेस.’—स्तो. ८३:१८.

१, २. आपल्या वैयक्‍तिक तारणासाठी केवळ यहोवाचे नाव माहीत असणे पुरेसे का नाही?

 तुम्हाला स्तोत्र ८३:१८ या वचनात यहोवाचे नाव दाखवण्यात आले, तेव्हाच कदाचित तुम्हाला पहिल्यांदा देवाचे नाव माहीत झाले असावे. त्या वचनातील शब्द वाचून तुम्ही कदाचित आश्‍चर्यचकित झाला असाल: “म्हणजे तू, केवळ तूच, परमेश्‍वर [“याव्हे,” तळटीप] ह्‍या नावाने सर्व पृथ्वीवर परात्पर आहेस असे त्यांना कळून येईल.” तेव्हापासून, आपला प्रिय देव, यहोवा याची इतरांना ओळख करून देण्यासाठी तुम्ही याच वचनाचा उपयोग केला आहे यात शंका नाही.—रोम. १०:१२, १३.

लोकांना यहोवाचे नाव माहीत होणे महत्त्वाचे असले, तरी केवळ नाव माहीत असणे पुरेसे नाही. आपल्या तारणासाठी आवश्‍यक असलेल्या आणखी एका सत्यावर स्तोत्रकर्ता कशा प्रकारे भर देतो त्याची नोंद घ्या. तो म्हणतो: ‘केवळ तूच सर्व पृथ्वीवर परात्पर आहेस.’ होय, यहोवा अखिल विश्‍वातील सगळ्यात महत्त्वपूर्ण व्यक्‍ती आहे. सर्व गोष्टींचा निर्माणकर्ता असल्यामुळे सृष्टीतील सर्व प्राण्यांनी आपल्याला पूर्ण अधीनता दाखवावी अशी अपेक्षा करण्याचा त्याला हक्क आहे. (प्रकटी. ४:११) तेव्हा, आपण स्वतःला असे विचारले पाहिजे: ‘माझ्या जीवनात सगळ्यात महत्त्वाची व्यक्‍ती कोण आहे?’ या प्रश्‍नाचे उत्तर आपण काय देऊ याचे काळजीपूर्वक परीक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे!

एदेन बागेत उपस्थित केलेला वादविषय

३, ४. सैतान हव्वेला कसा फसवू शकला, आणि त्याचा काय परिणाम झाला?

‘माझ्या जीवनात सगळ्यात महत्त्वाची व्यक्‍ती कोण आहे?,’ या प्रश्‍नाचा आपण गांभीर्याने विचार का केला पाहिजे हे एदेन बागेत घडलेल्या घटनांवरून स्पष्टपणे दिसून येते. यहोवाने पहिल्या मानवी जोडप्याला, अमुक एका झाडाचे फळ खाऊ नये अशी आज्ञा दिली होती. पण, पुढे दियाबल सैतान म्हणून ओळखण्यात आलेल्या एका बंडखोर देवदूताने, पहिली स्त्री हव्वा हिला देवाच्या आज्ञेपेक्षा स्वतःच्या इच्छा-अभिलाषांना जास्त महत्त्व देण्यास भुलवले. (उत्प. २:१७; २ करिंथ. ११:३) या मोहाला हव्वा बळी पडली आणि असे करण्याद्वारे तिने यहोवाच्या सार्वभौमत्वाबद्दल अनादर दाखवला. आपल्या जीवनात यहोवा सगळ्यात महत्त्वाची व्यक्‍ती आहे हे हव्वेने मानले नाही. पण, सैतान हव्वेला कसा काय फसवू शकला?

हव्वेशी बोलताना सैतानाने अनेक धूर्त युक्त्यांचा उपयोग केला. (उत्पत्ति ३:१-५ वाचा.) त्यांपैकी पहिली युक्‍ती म्हणजे, सैतानाने यहोवाच्या वैयक्‍तिक नावाचा उपयोग केला नाही. त्याने केवळ ‘देव’ असा उल्लेख केला. याच्या अगदी उलट, उत्पत्ति पुस्तकाच्या लेखकाने त्या अध्यायाच्या पहिल्याच वचनात यहोवाच्या वैयक्‍तिक नावाचा उल्लेख केला. * सैतानाने उपयोग केलेली दुसरी युक्‍ती म्हणजे, देवाची “आज्ञा” असे म्हणण्याऐवजी, देवाने काय “सांगितले” असे त्याने निव्वळ विचारले. (उत्प. २:१६) अशा धूर्त मार्गाने, सैतानाने त्या आज्ञेचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला असावा. तिसरी युक्‍ती म्हणजे, तो केवळ हव्वेशी बोलत असला, तरी त्याने “तुम्ही” या अनेकवचनी रूपाचा उपयोग केला. असे म्हणण्याद्वारे, सैतानाने कदाचित हव्वेच्या गर्वाला जागे करण्याचा प्रयत्न केला असावा; त्याने तिला असे भावसवण्याचा प्रयत्न केला असावा की ती खूप महत्त्वाची व्यक्‍ती आहे—जणू तिला आपल्या स्वतःच्या व आपल्या पतीच्या वतीने बोलण्याचा अधिकार आहे. याचा काय परिणाम झाला? आपल्याला दोघांच्या वतीने बोलण्याचा अधिकार आहे हे हव्वेने ठरवून टाकले असे दिसते. कारण ती सर्पाला म्हणाली: “बागेतल्या झाडांची फळे खाण्याची आम्हाला मोकळीक आहे.”

५. (क) सैतानाने हव्वेला कोणत्या गोष्टीवर आपले लक्ष केंद्रित करायला लावले? (ख) मना केलेले फळ खाण्याद्वारे हव्वेने काय दाखवले?

सैतानाने काही गोष्टींचा विपर्यासही केला. त्याने असे सुचवले, की आदाम व हव्वेने “बागेतल्या कोणत्याहि झाडाचे फळ खाऊ नये” अशी अवास्तव मागणी करून देव त्यांच्यावर अन्याय करत होता. नंतर, त्याने हव्वेला स्वतःचा विचार करण्यास व ती आपले जीवन सुधारून ‘देवासारखी’ कशी बनू शकते याचा विचार करण्यास प्रवृत्त केले. शेवटी, ज्याने हव्वेला सर्व काही दिले होते त्याच्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी, त्याने तिला आपले लक्ष त्या विशिष्ट झाडावर व त्याच्या फळावर केंद्रित करायला लावले. (उत्पत्ति ३:६ वाचा.) दुःखाची गोष्ट म्हणजे, हव्वेने ते फळ खाल्ले आणि असे करण्याद्वारे आपल्या जीवनात यहोवा सगळ्यात महत्त्वाची व्यक्‍ती नाही हे तिने दाखवले.

ईयोबाच्या दिवसांत उपस्थित केलेला वादविषय

६. सैतानाने ईयोबाच्या एकनिष्ठेवर कशा प्रकारे सवाल उपस्थित केला, आणि यामुळे ईयोबाला कोणती संधी देण्यात आली?

पुढे अनेक शतकांनंतर, विश्‍वासू पुरुष ईयोब याला आपल्या जीवनात सगळ्यात महत्त्वाची व्यक्‍ती कोण आहे हे दाखवून देण्याची संधी मिळाली. यहोवाने सैतानासमोर ईयोबाच्या एकनिष्ठेचे उदाहरण मांडले तेव्हा सैतानाने उत्तर दिले: “ईयोब देवाचे भय काय फुकट बाळगितो?” (ईयोब १:७-१० वाचा.) ईयोब देवाला आज्ञाधारक होता हे सैतानाने नाकारले नाही. तर त्याने ईयोबाच्या हेतूंवर सवाल उपस्थित केला. त्याने अगदी कावेबाजपणे ईयोबावर असा दोषारोप लावला, की ईयोब प्रेमापोटी नव्हे, तर स्वार्थापोटी यहोवाची सेवा करतो. हा दोषारोप केवळ ईयोबच खोडून काढू शकत होता आणि असे करण्याची संधी त्याला देण्यात आली.

७, ८. ईयोबाला कोणत्या परीक्षांचा सामना करावा लागला आणि त्याने सर्व काही विश्‍वासूपणे सहन करून काय दाखवून दिले?

यहोवाने सैतानाला ईयोबावर एका पाठोपाठ एक, अनेक संकटे आणण्याची अनुमती दिली. (ईयो. १:१२-१९) एकाएकी बदललेल्या या परिस्थितीबद्दल ईयोबाची प्रतिक्रिया काय होती? बायबल आपल्याला सांगते, की त्याच्या “हातून पाप झाले नाही; व अनुचित कृत्य केल्याचा आरोप त्याने देवावर केला नाही.” (ईयो. १:२२) पण, सैतान एवढ्यावरच शांत बसला नाही. त्याने पुढे तक्रार केली: “त्वचेसाठी त्वचा! मनुष्य आपल्या प्राणासाठी आपले सर्वस्व देईल.” * (ईयो. २:४) सैतानाने असा दावा केला, की जर ईयोबाला स्वतःला हाल सोसावे लागले, तर त्याच्या जीवनात यहोवा सगळ्यात महत्त्वाची व्यक्‍ती नाही हे तो ठरवेल.

ईयोब एका किळसवाण्या आजारामुळे विद्रूप झाला होता आणि मग त्याच्या पत्नीने देवाला शाप देऊन मरून जाण्याचा दबाव त्याच्यावर आणला. नंतर, त्याचे खोटे सांत्वन करायला आलेल्या तिघांनी त्याच्यावर गैरवर्तनाचा आरोप लावला. (ईयो. २:११-१३; ८:२-६; २२:२, ३) पण, दुःखाच्या या सबंध काळात ईयोबाने आपली एकनिष्ठा सोडली नाही. (ईयोब २:९, १० वाचा.) त्याने सर्व काही विश्‍वासूपणे सहन करून दाखवून दिले, की त्याच्या जीवनात यहोवा सगळ्यात महत्त्वाचा होता. त्याने हेसुद्धा दाखवून दिले, की एका अपरिपूर्ण मानवाला काही प्रमाणात का होईना, दियाबलाच्या दोषारोपांना उत्तर देणे शक्य आहे.—नीतिसूत्रे २७:११ पडताळून पाहा.

येशूने दिलेले चोख उत्तर

९. (क) सैतानाने येशूच्या शारीरिक गरजेचा दुरुपयोग करून त्याच्यावर प्रलोभन आणण्याचा प्रयत्न कसा केला? (ख) या प्रलोभनाला येशूने कशी प्रतिक्रिया दाखवली?

येशूचा बाप्तिस्मा झाला त्याच्या काही समयानंतरच सैतानाने येशूवर प्रलोभने आणण्याचा प्रयत्न केला. येशूने आपल्या जीवनात यहोवाला सगळ्यात महत्त्वाची व्यक्‍ती न राखता, आपल्या स्वार्थी इच्छांचा पाठपुरावा करावा म्हणून सैतानाने त्याला भुलवण्याचा प्रयत्न केला. दियाबलाने येशूवर तीन प्रलोभने आणली. प्रथम, त्याने धोंड्यांचे रूपांतर भाकरीत करण्याचे प्रलोभन येशूवर आणले आणि असे करण्याद्वारे त्याने येशूच्या शारीरिक गरजेचा दुरुपयोग करण्याचा प्रयत्न केला. (मत्त. ४:२, ३) येशूने नुकताच ४० दिवस उपवास केला होता आणि त्याला खूप भूक लागली होती. म्हणून, दियाबलाने त्याला आपली भूक भागवण्यासाठी आपल्या चमत्कारिक शक्‍तीचा दुरुपयोग करण्यास आर्जवले. त्यावर येशूची काय प्रतिक्रिया होती? हव्वेने जे केले त्याच्या अगदी उलट येशूने यहोवाच्या वचनावर आपले लक्ष केंद्रित केले आणि ते प्रलोभन लगेच धुडकावून लावले.मत्तय ४:४ वाचा.

१०. सैतानाने येशूला मंदिराच्या शिरोभागावरून खाली उडी टाकण्याचे आव्हान का केले?

१० सैतानाने येशूला स्वार्थीपणे वागण्यास प्रवृत्त करण्याचाही प्रयत्न केला. त्याने येशूला मंदिराच्या शिरोभागी उभे केले व तेथून खाली उडी टाकण्याचे आव्हान केले. (मत्त. ४:५, ६) असे करून सैतान काय साध्य करू इच्छित होता? सैतानाने असा दावा केला, की येशूने खाली उडी टाकली व त्याला काहीच इजा झाली नाही, तर त्यावरून येशू “देवाचा पुत्र” असल्याचे सिद्ध होईल. स्पष्टच आहे, की येशूने आपल्या नावलौकिकाची इतकी चिंता करावी की तो सिद्ध करण्यासाठी त्याने मोठा दिखावा करण्यासही तयार असावे अशी दियाबलाची इच्छा होती. सैतानाला हे माहीत होते, की एक व्यक्‍ती आपल्या गर्वापोटी व चार लोकांत आपली नाचक्की होऊ नये म्हणून एक जीवघेणे धाडस करण्याचे आव्हानही स्वीकारू शकते. सैतानाने या ठिकाणी एका शास्त्रवचनाचा दुरुपयोग केला. पण, येशूने दाखवून दिले की त्याला यहोवाच्या वचनाची पूर्ण समज होती. (मत्तय ४:७ वाचा.) सैतानाचे आव्हान नाकारण्याद्वारे येशूने पुन्हा एकदा हे सिद्ध केले, की त्याच्या जीवनात यहोवा सगळ्यात महत्त्वाचा होता.

११. दियाबलाने येशूला जगातील सर्व राज्ये देऊ केली तेव्हा येशूने ती धुडकावून का लावली?

११ शेवटी, तिसऱ्‍या प्रलोभनाच्या वेळी सैतानाने पूर्वीपेक्षा अधिक जोरदार प्रयत्न करून येशूवर सर्वात मोठे प्रलोभन आणले. त्याने येशूला जगातील सर्व राज्ये देऊ केली. (मत्त. ४:८, ९) पण, येशूने एका क्षणाचाही विचार न करता सैतानाचा प्रस्ताव धुडकावून लावला. येशूला माहीत होते, की तो प्रस्ताव स्वीकारणे म्हणजे यहोवाचे सार्वभौमत्व—परात्पर असण्याचा देवाचा अधिकार—नाकारणे असा होईल. (मत्तय ४:१० वाचा.) प्रत्येक प्रलोभनाच्या वेळी, येशूने यहोवाचे वैयक्‍तिक नाव असलेल्या शास्त्रवचनांचा उपयोग करून सैतानाला प्रत्युत्तर दिले.

१२. येशूच्या पृथ्वीवरील जीवनाच्या शेवटी-शेवटी त्याच्यासमोर कोणता कठीण निर्णय घेण्याची वेळ आली, आणि त्या निर्णयाला त्याने ज्या प्रकारे प्रतिक्रिया दाखवली त्यावरून आपण काय शिकू शकतो?

१२ येशूच्या पृथ्वीवरील जीवनाच्या शेवटी-शेवटी त्याच्यासमोर एक अतिशय कठीण निर्णय घेण्याची वेळ आली. त्याने आपल्या सबंध सेवाकार्यादरम्यान आपले जीवन बलिदान करण्याची तयारी दाखवली होती. (मत्त. २०:१७-१९, २८; लूक १२:५०; योहा. १६:२८) पण, येशूला याचीही जाणीव होती, की यहुदी न्याय व्यवस्थेच्या अधीन त्याच्यावर खोटा आरोप लावून त्याला दोषी ठरवले जाईल आणि देवाची निंदा करणारा म्हणून त्याला मृत्यूदंड दिला जाईल. हीच गोष्ट त्याच्या मनाला खूप सलत राहिली. त्याने प्रार्थना केली: “हे माझ्या बापा, होईल तर हा प्याला माझ्यावरून टळून जावो.” पण, पुढे त्याने असे म्हटले: “तथापि माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.” (मत्त. २६:३९) होय, येशूने अगदी आपल्या मृत्यूपर्यंत विश्‍वासू राहून आपल्या जीवनात सगळ्यात महत्त्वाची व्यक्‍ती कोण आहे हे सिद्ध केले यात कोणतीच शंका नाही!

सैतानाच्या प्रश्‍नाला आपण काय उत्तर देऊ?

१३. आपण आतापर्यंत हव्वा, ईयोब आणि येशू ख्रिस्त यांच्या उदाहरणांवरून काय शिकलो आहोत?

१३ आतापर्यंत आपण काय शिकलो आहोत? हव्वेच्या उदाहरणावरून आपण हे शिकतो, की जे आपल्या स्वार्थी इच्छांना किंवा आपण कोणीतरी महत्त्वाचे आहोत या भावनेला बळी पडतात, ते हेच दाखवतात, की त्यांच्या जीवनात यहोवा सगळ्यात महत्त्वाची व्यक्‍ती नाही. पण, याच्या अगदी उलट, ईयोबाच्या एकनिष्ठ जीवनक्रमावरून आपण हे शिकतो, की अपरिपूर्ण मानवदेखील विश्‍वासाने हालअपेष्टांचा सामना करून—मग अशा समस्यांचे कारण त्यांना पूर्णपणे माहीत नसले तरीही ते आपल्या जीवनात यहोवाला प्राधान्य देत असल्याचे दाखवून देऊ शकतात. (याको. ५:११) शेवटी, येशूच्या उदाहरणावरून आपण हे शिकतो, की आपण अपमान सहन करण्यास तयार असले पाहिजे आणि आपल्या स्वतःच्या नावलौकिकाला आपण अवाजवी महत्त्व देऊ नये. (इब्री १२:२) पण, आपण हे धडे आपल्या जीवनात कसे लागू करू शकतो?

१४, १५. हव्वेने प्रलोभनाला जी प्रतिक्रिया दाखवली त्यापेक्षा येशूची प्रतिक्रिया वेगळी कशी होती, आणि आपण येशूचे अनुकरण कसे करू शकतो? (पृष्ठ १८ वरील चित्रावर टिपणी द्या.)

१४ प्रलोभनांमुळे केव्हाही यहोवाला विसरू नका. हव्वेने तिच्यासमोर असलेल्या प्रलोभनावर आपले लक्ष केंद्रित केले. तिने पाहिले, की “त्या झाडाचे फळ खाण्यास चांगले, दिसण्यास मनोहर आणि शहाणे करण्यास इष्ट आहे.” (उत्प. ३:६) येशूने मात्र त्याच्यावर आलेल्या प्रलोभनांना किती वेगळी प्रतिक्रिया दाखवली! त्याने प्रत्येक वेळी, त्याच्यासमोर असलेल्या प्रलोभनावर नव्हे, तर आपल्या कृत्यांमुळे कोणते परिणाम उद्‌भवतील यावर आपले लक्ष केंद्रित केले. तो देवाच्या वचनावर विसंबून राहिला आणि त्याने यहोवाच्या नावाचा उपयोगही केला.

१५ यहोवाला नाखूश करणाऱ्‍या गोष्टी करण्याचे प्रलोभन आपल्यावर येते, तेव्हा आपण कोणत्या गोष्टीवर आपले लक्ष केंद्रित करतो? आपण जितके अधिक त्या प्रलोभनावर आपले लक्ष केंद्रित करू तितकी अधिक चुकीचे कृत्य करण्याची आपली इच्छा प्रबळ होईल. (याको. १:१४, १५) त्या इच्छेचे, आपल्या मनातून समूळ उच्चाटन करण्यासाठी आपण त्वरित पाऊल उचलले पाहिजे; मग, त्यासाठी आपल्या शरीराचा एखादा अवयव काढून टाकण्यासारखे कठोर पाऊल आपल्याला उचलावे लागले तरी. (मत्त. ५:२९, ३०) येशूप्रमाणे, आपण आपल्या कृत्यांच्या परिणामांवर म्हणजे आपल्या कृत्यांचा यहोवासोबतच्या आपल्या नातेसंबंधावर काय परिणाम होईल यावर आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे. देवाचे वचन, बायबल काय म्हणते त्याचे आपण स्मरण केले पाहिजे. असे केल्यानेच, आपल्या जीवनात यहोवा सगळ्यात महत्त्वाची व्यक्‍ती आहे हे आपण सिद्ध करू शकू.

१६-१८. (क) आपण कशामुळे खचून जाऊ शकतो? (ख) कोणती गोष्ट आपल्याला दुःखद परिस्थितींचा सामना करण्यास मदत करू शकते?

१६ तुमच्यावर येणाऱ्‍या संकटांमुळे यहोवावर रुष्ट होऊ नका. (नीति. १९:३) जसजसा या दुष्ट जगाचा अंत जवळ येत आहे तसतसा यहोवाच्या अधिकाधिक लोकांना आपत्तींचा व दुःखद घटनांचा सामना करावा लागत आहे. यहोवाने चमत्कारिक रीत्या आपले संरक्षण करावे अशी अपेक्षा आज आपण करत नाही. तरीसुद्धा, आपल्या प्रिय व्यक्‍तीचा मृत्यू होतो किंवा व्यक्‍तिगतपणे आपल्याला समस्यांचा सामना करावा लागतो तेव्हा ईयोबाप्रमाणे आपणही खचून जाऊ शकतो.

१७ यहोवाने काही गोष्टी का घडू दिल्या हे ईयोबाला समजले नाही. तसेच, आज वाईट गोष्टी का घडतात हे काही वेळा आपल्यालाही समजणार नाही. उदाहरणार्थ, हैटीमध्ये झालेल्या भूकंपात किंवा अशा इतर आपत्तीमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या आपल्या विश्‍वासू बांधवांविषयी आपण कदाचित ऐकले असावे. किंवा सचोटी राखणाऱ्‍या अशा एखाद्या व्यक्‍तीला आपण ओळखत असू जी एखाद्या हिंसक कृत्याला बळी पडली आहे अथवा एखाद्या भयंकर अपघातात मृत्यूमुखी पडली आहे. किंवा मग, काही दुःखद परिस्थितींमुळे अथवा आपल्यावर अन्याय होत आहे असे वाटून आपण त्रस्तही झालो असू. आपले दुःखी मन आपल्याला असा विचार करायला लावेल: ‘का यहोवा का, मलाच हे दुःख का? माझं कुठं चुकलं?’ (हब. १:२, ३) अशा वेळी, कोणती गोष्ट आपल्याला संकटांचा सामना करण्यास मदत करू शकते?

१८ आपल्यावर अशी संकटे ओढवतात तेव्हा आपण कधीच असे समजू नये, की यहोवा आपल्यावर नाखूश आहे. येशूने त्याच्या काळात घडलेल्या दोन दुःखद घटनांचा उल्लेख करून या गोष्टीवर भर दिला. (लूक १३:१-५ वाचा.) बऱ्‍याच दुर्घटना, “समय व प्रसंग” यामुळे घडतात. (उप. ९:११, पं.र.भा.) पण, आपल्या दुःखाचे कारण काहीही असो, आपण जर “सांत्वनदाता देव” याच्यावर आपले लक्ष केंद्रित केले तर आपण संकटांचा सामना करू शकतो. तो आपल्याला विश्‍वासू राहण्यास आवश्‍यक असलेले बळ नक्कीच देईल.—२ करिंथ. १:३-६.

१९, २०. कोणत्या गोष्टीने येशूला अपमानित करणाऱ्‍या प्रसंगांचा सामना करण्यास मदत केली, आणि कोणती गोष्ट आपल्यालाही तसे करण्यास मदत करू शकते?

१९ केव्हाही गर्वावर किंवा अपमानित होण्याच्या भीतीवर आपले लक्ष केंद्रित करू नका. येशू नम्र होता; त्यामुळे तो स्वतःला रिक्‍त करू शकला व दासाचे स्वरूप धारण करू शकला. (फिलिप्पै. २:५-८) तो नेहमी यहोवावर विसंबून राहिला. म्हणूनच, अपमानित करणाऱ्‍या प्रसंगांचा तो सामना करू शकला. (१ पेत्र २:२३, २४) असे करण्याद्वारे, येशूने आपल्या जीवनात यहोवाच्या इच्छेला प्राधान्य दिले. परिणामस्वरूप, देवाने त्याला अत्युच्च केले. (फिलिप्पै. २:९) येशूने आपल्या शिष्यांना अशाच प्रकारचे जीवन जगण्यास सांगितले.—मत्त. २३:११, १२; लूक ९:२६.

२० काही वेळा, आपल्या विश्‍वासाच्या काही परीक्षा आपल्याला लज्जित करणाऱ्‍या असू शकतात. तरीसुद्धा, आपण प्रेषित पौलासारखा भरवसा बाळगला पाहिजे, ज्याने म्हटले: “ह्‍या कारणाने ही दुःखे मी सोशीत आहे, तरी मी लाज धरीत नाही. कारण मी ज्याच्यावर विश्‍वास ठेविला आहे, त्याला मी जाणतो आणि तो माझी ठेव त्या दिवसासाठी राखावयास शक्‍तिमान आहे असा माझा भरवसा आहे.”—२ तीम. १:१२.

२१. जगाच्या स्वार्थी प्रवृत्तीच्या उलट आपला दृढनिश्‍चय काय असला पाहिजे?

२१ बायबलमध्ये पूर्वभाकीत करण्यात आले होते, की आपल्या काळात लोक “स्वार्थी” असतील. (२ तीम. ३:२) तेव्हा, आपल्या सभोवताली, ‘मीच सगळ्यात महत्त्वाचा’ असे समजणारे लोक आपल्याला पाहायला मिळतात याचे आपल्याला आश्‍चर्य वाटू नये. अशा स्वार्थी प्रवृत्तीचा आपण केव्हाही स्वतःवर प्रभाव पडू देऊ नये! त्या उलट, आपल्यावर प्रलोभने आली, आपल्या जीवनात दुःखद घटना घडल्या किंवा इतरांनी आपल्याला अपमानित करण्याचा प्रयत्न केला, तरी आपण प्रत्येक जण हे सिद्ध करण्याचा दृढनिश्‍चय करू या, की आपल्या जीवनात यहोवा खरोखर सगळ्यात महत्त्वाची व्यक्‍ती आहे!

[तळटीपा]

^ उत्पत्ति ३:१ आणि इतर शास्त्रवचनांत ज्या-ज्या ठिकाणी “परमेश्‍वर” असे म्हटले आहे, त्या-त्या ठिकाणी मूळ इब्री भाषेत यहोवा हे देवाचे नाव वापरण्यात आले आहे.

^ काही बायबल विद्वानांना असे वाटते, की “त्वचेसाठी त्वचा” या वाक्यांशाचा अर्थ, ईयोब आपली स्वतःची कातडी किंवा जीव वाचवण्यासाठी आपल्या मुलाबाळांची व प्राण्यांची कातडी किंवा जीव स्वार्थीपणे धोक्यात घालण्यास तयार होईल असा होऊ शकतो. तर इतर काहींच्या मते, हा वाक्यांश यावर भर देतो, की एक व्यक्‍ती आपला जीव वाचवण्यासाठी काही प्रमाणात आपली कातडी गमावण्यास तयार होईल. उदाहरणार्थ, एक व्यक्‍ती हात वर करून डोक्याला लागणारा मार हुकवू शकते आणि अशा रीतीने आपला जीव वाचवण्यासाठी ती काही प्रमाणात आपली कातडी गमावते. या वाक्यांशाचा अर्थ काहीही असो, त्यातून असे सूचित केले जात होते, की आपला जीव वाचवण्यासाठी ईयोब सर्वकाही आनंदाने देण्यास तयार होईल.

आपण काय शिकू शकतो?

• सैतानाने ज्या प्रकारे हव्वेला फसवले त्यावरून आपण काय शिकू शकतो?

• ईयोबावर आलेल्या संकटांप्रती त्याने दाखवलेल्या प्रतिक्रियेवरून आपण काय शिकू शकतो?

• येशूने ज्यावर आपले लक्ष केंद्रित केले होते त्यावरून आपण काय शिकू शकतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१७ पानांवरील चित्र]

हव्वेने यहोवासोबतच्या आपल्या नातेसंबंधावर लक्ष केंद्रित केले नाही

[१८ पानांवरील चित्र]

येशूने सैतानाच्या प्रलोभनांचा प्रतिकार केला आणि यहोवाची इच्छा पूर्ण करण्यावर आपले लक्ष केंद्रित केले

[२० पानांवरील चित्रे]

हैटीमध्ये भूकंपानंतर उभारलेल्या तंबूंतून साक्षकार्य करत असताना

दुःखाच्या काळात, आपण “सांत्वनदाता देव” याच्यावर आपले लक्ष केंद्रित करू शकतो