व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवावर पूर्ण भरवसा ठेवल्याने आपला आत्मविश्‍वास वाढतो

यहोवावर पूर्ण भरवसा ठेवल्याने आपला आत्मविश्‍वास वाढतो

यहोवावर पूर्ण भरवसा ठेवल्याने आपला आत्मविश्‍वास वाढतो

“मी परमेश्‍वराचा धावा करीन तेव्हा तो माझे ऐकेल.”—स्तो. ४:३.

१, २. (क) दाविदावर कोणते मोठे संकट ओढवले होते? (ख) आपण कोणत्या स्तोत्रांची चर्चा करणार आहोत?

 दावीद राजाने काही काळ इस्राएलवर राज्य केले आहे. पण, आता त्याच्यावर एक मोठे संकट ओढवले आहे. त्याचा पुत्र अबशालोम याने कट रचून स्वतःला राजा घोषित केले आहे आणि त्यामुळे दावीद राजाला जेरूसलेममधून पळून जाणे भाग पडले आहे. त्याच्या विश्‍वासातील एका व्यक्‍तीने त्याचा विश्‍वासघातदेखील केला आहे, आणि आता तो रडतरडत व अनवाणी, काही एकनिष्ठ लोकांसोबत जैतून पर्वतावरून चालत आहे. याशिवाय, शौल राजाच्या घराण्यातील एका कुळातला शिमी नावाचा एक मनुष्य दाविदाला शिव्याशाप देत त्याच्यावर दगड व धूळ फेकत आहे.—२ शमु. १५:३०, ३१; १६:५-१४.

या परीक्षेमुळे शोकाकूल व अपमानित होऊन दाविदाला मरण पत्करावे लागणार होते का? मुळीच नाही, कारण त्याचा यहोवावर भरवसा आहे. ही गोष्ट, तिसऱ्‍या स्तोत्रातून स्पष्टपणे दिसून येते. हे स्तोत्र, दावीद आपला जीव वाचवण्यासाठी अबशालोमापासून पळून जात होता त्यासंबंधी आहे. त्याने चौथ्या स्तोत्राचीदेखील रचना केली. या दोन्ही स्तोत्रांतून आपल्याला हा भरवसा मिळतो की देव आपल्या प्रार्थना ऐकतो व त्यांचे उत्तर देतो. (स्तो. ३:४; ४:३) या स्तोत्रांतून आपल्याला हे आश्‍वासन मिळते की यहोवा रात्रंदिवस आपल्या विश्‍वासू सेवकांसोबत असतो, आणि त्यांना आधार, शांती व सुरक्षा देऊन आशीर्वादित करतो. (स्तो. ३:५; ४:८) तेव्हा, आपण या स्तोत्रांची चर्चा करू या आणि पाहू या की कशा प्रकारे या स्तोत्रांमुळे देवावरील आपला भरवसा व आत्मविश्‍वास वाढतो.

जेव्हा पुष्कळ लोक ‘आपल्यावर उठतात’

३. स्तोत्र ३:१, २ या वचनांत सांगितल्यानुसार दाविदाची स्थिती कशी होती?

“इस्राएल लोकांची मने अबशालोमकडे वळली आहेत,” असे एक जण येऊन दाविदाला सांगतो. (२ शमु. १५:१३) अबशालोम इतक्या लोकांची मने स्वतःकडे कसे वळवू शकला याचे दाविदाला आश्‍चर्य वाटून तो यहोवाला असे विचारतो: “हे परमेश्‍वरा, माझे शत्रु कितीतरी झाले आहेत! माझ्यावर उठलेले पुष्कळ आहेत. ह्‍याला देवाच्या ठायी तारण नाही, असे माझ्याविषयी म्हणणारे पुष्कळ झाले आहेत.” (स्तो. ३:१, २) अनेक इस्राएली लोकांना वाटते, की यहोवा दाविदाला अबशालोमापासून व त्याच्या सैन्यापासून वाचवणार नाही.

४, ५. (क) दाविदाला कशाची खातरी होती? (ख) “तू माझे डोके वर करणारा आहेस,” या शब्दांचा काय अर्थ आहे?

पण, दाविदाचा यहोवावर पूर्ण भरवसा असल्यामुळे त्याला सुरक्षित वाटते. तो असे म्हणतो: “तरी हे परमेश्‍वरा, तू माझ्याभोवती कवच आहेस; तू माझा गौरव आहेस, तू माझे डोके वर करणारा आहेस.” (स्तो. ३:३) ज्याप्रमाणे एक कवच सैनिकाचे रक्षण करते, त्याचप्रमाणे यहोवा आपले संरक्षण करेल याची दाविदाला पक्की खातरी आहे. होय, वयोवृद्ध दावीद राजा आपले मस्तक झाकून व अपमानाने मान खाली घालून पळत आहे. पण सर्वसमर्थ देव दाविदाची स्थिती बदलून त्याचा गौरव करेल. यहोवा त्याला सरळ उभे राहण्यास, डोके वर करून पुन्हा एकदा ताठ मानेने चालण्यास साहाय्य करेल. देव आपले ऐकेल या आत्मविश्‍वासाने दावीद देवाला प्रार्थना करतो. तुम्हीदेखील यहोवावर असा भरवसा दाखवता का?

“तू माझे डोके वर करणारा आहेस,” या शब्दांवरून दिसून येते की यहोवा आपल्याला जरूर मदत करेल हे दावीद मान्य करतो. टुडेज इंग्लिश व्हर्शन म्हणते: “हे परमेश्‍वरा, तू सदैव माझी संरक्षक ढाल आहेस; तू मला विजयी करतोस आणि मला पुन्हा धैर्य देतोस.” “तू माझे डोके वर करणारा आहेस,” या वाक्यांशाबद्दल एक संदर्भग्रंथ असे म्हणतो: “देव जेव्हा एखाद्याचे ‘डोके’ वर करतो, तेव्हा तो त्याला आशा व सुरक्षिततेची भावना देतो.” दाविदाकडून इस्राएलचे राजासन बळकावले गेल्यामुळे त्याच्याजवळ निराश होण्याचे कारण आहे. पण, ‘त्याचे डोके वर केल्यामुळे’ त्याला पुन्हा धैर्य मिळेल, देवावरील त्याचा भरवसा व आत्मविश्‍वास वाढेल.

यहोवा “ऐकतो”!

६. यहोवा आपली प्रार्थना त्याच्या पवित्र डोंगरावरून ऐकतो असा उल्लेख दाविदाने का केला?

यहोवावरील पूर्ण भरवशाने आणि आत्मविश्‍वासाने दावीद पुढे म्हणतो: “मी मोठ्याने परमेश्‍वराचा धावा करितो, आणि तो आपल्या पवित्र डोंगरावरून माझे ऐकतो.” (स्तो. ३:४) दाविदाच्या आदेशावरून, देवाची उपस्थिती दर्शवणारा कराराचा कोश सीनाय पर्वतावर नेण्यात आला आहे. (२ शमुवेल १५:२३-२५ वाचा.) म्हणूनच, यहोवा आपली प्रार्थना त्याच्या पवित्र डोंगरावरून ऐकतो असा दावीद उल्लेख करतो.

७. दाविदाला कशाचीच भीती का वाटली नाही?

दाविदाला खातरी आहे की त्याने देवाला केलेली प्रार्थना व्यर्थ जाणार नाही, त्यामुळे त्याला कशाचीच भीती वाटत नाही. उलट, तो आपल्या स्तोत्रात म्हणतो: “मी अंग टाकिले व झोपी गेलो; मी जागा झालो, कारण मला परमेश्‍वराचा आधार आहे.” (स्तो. ३:५) एकाएकी हल्ला होण्याचा सगळ्यात जास्त धोका असतो तो रात्रीच्या वेळी. पण, तेव्हासुद्धा दावीद झोपी जाण्यास घाबरत नाही. आपण जागे होऊ याची त्याला खातरी आहे. कारण गतकाळातील अनुभवांमुळे त्याला याचा पूर्ण भरवसा आहे की देव त्याला नक्कीच आधार देईल. त्याचप्रमाणे, आपण “परमेश्‍वराचे मार्ग धरून राहिलो” व त्याला कधीही सोडले नाही, तर आपणदेखील तसाच भरवसा बाळगू शकतो.२ शमुवेल २२:२१, २२ वाचा.

८. दाविदाचा देवावर भरवसा होता हे स्तोत्र २७:१-४ यातून कसे दिसून येते?

दाविदाचा देवावरील विश्‍वास आणि पूर्ण भरवसा त्याच्या आणखी एका स्तोत्रातून स्पष्टपणे दिसून येतो, ज्यात पुढील देवप्रेरित शब्द आहेत: “परमेश्‍वर माझा प्रकाश व माझे तारण आहे; मी कोणाची भीति बाळगू? परमेश्‍वर माझ्या जिवाचा दुर्ग आहे मी कोणाचे भय धरू? . . . सैन्याने माझ्यापुढे ठाणे दिले तरी माझे हृदय कचरणार नाही; . . . . परमेश्‍वराजवळ मी एक वरदान मागितले, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन; ते हे की, आयुष्यभर परमेश्‍वराच्या घरात माझी वस्ती व्हावी; म्हणजे मी परमेश्‍वराचे मनोहर रूप पाहत राहीन व त्याच्या मंदिरात ध्यान करीन.” (स्तो २७:१-४) तुमच्याही भावना अशाच असतील आणि तुमची परिस्थिती तुम्हाला साथ देत असेल, तर तुम्हीदेखील यहोवाच्या इतर उपासकांसोबत नियमितपणे मंडळीच्या सभांना उपस्थित राहाल.—इब्री १०:२३-२५.

९, १०. स्तोत्र ३:६, ७ या वचनांमध्ये दावीद सूड घेण्याविषयी बोलत असला, तरी त्याच्यात सूड घेण्याची भावना नव्हती असे का म्हणता येईल?

अबशालोमाने दाविदाचा विश्‍वासघात केला आणि इतर अनेकांनी त्याला दगा दिला, तरीसुद्धा दावीद आपल्या स्तोत्रात म्हणतो: “लाखो लोकांनी मला गराडा घातला आहे. मी त्यांस भिणार नाही. हे परमेश्‍वरा, ऊठ; माझ्या देवा, मला तार; तू माझ्या सर्व वैऱ्‍यांच्या तोंडात मारिले आहे; तू दुर्जनांचे दात पाडले आहेत.”स्तो ३:६, ७.

१० दाविदामध्ये सूड घेण्याची भावना नाही. शत्रूंच्या ‘तोंडात मारायचे’ झाल्यास, ते देव करणार होता. दावीद राजाने स्वतःकरता नियमशास्त्राची एक प्रत लिहिली आहे आणि त्यात यहोवा काय म्हणतो हे त्याला माहीत आहे: “सूड घेणे व उसने फेडणे हे माझ्याकडे आहे.” (अनु १७:१४, १५, १८; ३२:३५) ‘दुर्जनांचे दात पाडायचे’ झाल्यास, तेसुद्धा देवच करणार होता. त्यांचे दात पाडण्याचा अर्थ त्यांना दुबळे करणे असा होतो, जेणेकरून ते कोणालाही इजा पोहचवू शकणार नाहीत. दुर्जन किंवा दुष्ट कोण आहेत हे यहोवाला माहीत आहे, कारण तो “हृदय पाहतो.” (१ शमु १६:७) लवकरच प्रमुख दुष्टाला अर्थात सैतानाला अथांग डोहात टाकले जाईल. तो एका गर्जणाऱ्‍या, पण दात नसलेल्या सिंहासारखा असून केवळ नाशास पात्र आहे. त्याच्याविरुद्ध खंबीरपणे उभे राहण्यास देव आपल्याला सामर्थ्य देतो व आपला विश्‍वास मजबूत करतो याबद्दल आपण देवाचे किती आभारी आहोत!—१ पेत्र ५:८, ९; प्रक २०:१, २, ७-१०.

यहोवाच्या ‘हातून तारण होते’

११. आपण आपल्या बंधुभगिनींसाठी प्रार्थना का केली पाहिजे?

११ दाविदाला सुटकेची अत्यंत गरज आहे व ही सुटका केवळ यहोवाच देऊ शकतो याची त्याला जाणीव आहे. पण तो केवळ स्वतःचाच विचार करत नाही. ज्या लोकांवर यहोवाचा अनुग्रह आहे त्यांच्याबद्दल काय म्हणता येईल? दावीद आपल्या देवप्रेरित स्तोत्राची समाप्ती उचितपणे पुढील शब्दांनी करतो: “तारण परमेश्‍वराच्या हातून होते; तुझ्या लोकांना तुझा आशीर्वाद लाभो.” (स्तो. ३:८) हे खरे आहे, की दाविदापुढे अनेक मोठ्या समस्या आहेत; पण तो यहोवाच्या सर्व लोकांना आठवणीत ठेवतो व देव त्यांना आशीर्वादित करेल असा विश्‍वास बाळगतो. तर मग, आपणही आपल्या बंधुभगिनींना आठवणीत ठेवू नये का? आपण आपल्या प्रार्थनांमध्ये त्यांची आठवण करू या आणि यहोवाने त्यांना आपला पवित्र आत्मा द्यावा अशी विनंती करू या, जेणेकरून त्यांना सुवार्तेची घोषणा करण्याचे धैर्य व आत्मविश्‍वास मिळू शकेल.—इफिस. ६:१७-२०.

१२, १३. अबशालोमाचे काय झाले आणि दाविदाने कशी प्रतिक्रिया दाखवली?

१२ अबशालोमाचा अगदी अपमानास्पद रीतीने अंत होतो. इतरांशी दुर्व्यवहार करणाऱ्‍यांसाठी आणि खासकरून दाविदासारख्या देवाच्या अभिषिक्‍त जनांशी दुर्व्यवहार करणाऱ्‍यांसाठी ही एक चेतावणी आहे. (नीतिसूत्रे ३:३१-३५ वाचा.) एक युद्ध होते आणि त्यात अबशालोमाच्या सैन्याचा पराभव होतो. अबशालोम स्वतः एका खेचरावर बसून पळून जात असताना त्याचे लांब, घनदाट केस एका मोठ्या झाडाच्या वाकलेल्या फांद्यांत अडकतात. तेथे तो असहायपणे अधांतरी लटकतो. मग, यवाब तीन तीर अबशालोमाच्या छातीत भोसकून त्याला ठार मारतो.—२ शमु. १८:६-१७.

१३ आपल्या पुत्रासोबत जे घडले ते ऐकून दाविदाला आनंद होतो का? नाही. उलट, तो रडतो आणि हे उद्‌गार काढतो: “माझ्या पुत्रा अबशालोमा! हाय रे हाय! माझ्या पुत्रा! माझ्या पुत्रा अबशालोमा: तुझ्याबद्दल मी मेलो असतो तर बरे होते. हाय रे! अबशालोमा! माझ्या पुत्रा! माझ्या पुत्रा!” (२ शमु. १८:२४-३३) केवळ यवाबाचे शब्दच दाविदाला त्याच्या अतीव दुःखातून बाहेर काढतात. अतिशय स्वार्थी महत्त्वाकांक्षेने पेटून उठलेल्या अबशालोमाने, यहोवाच्या अभिषिक्‍ताविरुद्ध अर्थात आपल्या स्वतःच्या पित्याविरुद्ध लढण्याद्वारे स्वतःवर संकट ओढवून घेतले. खरेच, अबशालोमाचा किती दुःखद अंत झाला!—२ शमु. १९:१-८; नीति. १२:२१; २४:२१, २२.

दावीद पुन्हा देवावर भरवसा व्यक्‍त करतो

१४. चौथ्या स्तोत्राच्या रचनेविषयी काय म्हणता येईल?

१४ तिसऱ्‍या स्तोत्राप्रमाणेच, चौथे स्तोत्रदेखील दाविदाने देवाला केलेली कळकळीची प्रार्थना असून त्यातून यहोवावर त्याचा पूर्ण भरवसा असल्याचा पुरावा मिळतो. (स्तो. ३:४; ४:३) अबशालोमाचा कट फसल्यावर, दाविदाच्या जिवाला विसावा मिळाला आणि त्याबद्दल देवाचे आभार मानण्यासाठी त्याने कदाचित या स्तोत्राची रचना केली असावी. किंवा लेवी गायकांना लक्षात ठेवून त्याने हे स्तोत्र लिहिले असावे. ते काहीही असो, या स्तोत्रावर मनन केल्याने यहोवावरील आपला भरवसा आणखी मजबूत होऊ शकतो.

१५. आपण यहोवाला त्याच्या पुत्राद्वारे आत्मविश्‍वासाने प्रार्थना का करू शकतो?

१५ दावीद पुन्हा एकदा दाखवून देतो की देवावर त्याचा पूर्ण भरवसा आहे आणि देव नक्कीच प्रार्थना ऐकतो यावर त्याचा विश्‍वास आहे. तो स्तोत्रात म्हणतो: “हे माझ्या न्यायदात्या देवा, मी तुझा धावा करितो तेव्हा माझे ऐक; मला तू पेचातून मोकळे केले आहे; माझ्यावर कृपा कर, माझी प्रार्थना ऐक.” (स्तो. ४:१) आपण नीतीने वागलो, तर आपणदेखील असाच आत्मविश्‍वास व्यक्‍त करू शकतो. ‘न्यायदाता देव’ यहोवा आपल्या नीतिमान लोकांना आशीर्वाद देतो याची जाणीव असल्यामुळे, आपण देवाचा पुत्र येशू याच्या खंडणी बलिदानावर विश्‍वास बाळगून त्याच्याद्वारे देवाला आत्मविश्‍वासाने प्रार्थना करू शकतो. (योहा. ३:१६, ३६) असे केल्यामुळे खरोखर किती मनःशांती मिळते!

१६. दावीद कशामुळे निराश झाला असावा?

१६ कधीकधी एखाद्या निराशाजनक परिस्थितीमुळे आपला आत्मविश्‍वास खचू शकतो. थोड्या वेळासाठी दाविदाच्या बाबतीत नेमके हेच घडले असावे, कारण तो स्तोत्रात म्हणतो: “अहो मनुष्यांनो, माझ्या गौरवाची अप्रतिष्ठा कोठवर चालणार? तुम्हाला निरर्थक गोष्टी कोठवर आवडणार! तुम्ही लबाडीची कास कोठवर धरणार?” (स्तो. ४:२) येथे “मनुष्यांनो” हा शब्द वाईट मनुष्यांना सूचित करण्यासाठी बहुधा वापरला आहे. दाविदाच्या शत्रूंना ‘निरर्थक गोष्टींची आवड’ होती. न्यू इंटरनॅशनल व्हर्शन बायबलमध्ये या वचनाचे भाषांतर असे करण्यात आले आहे: “तुम्ही कोठवर भ्रामक गोष्टींवर प्रेम कराल व खोट्या दैवतांच्या मागे लागाल?” इतरांच्या कृतींमुळे आपण निराश झालो, तरीसुद्धा आपण निरंतर कळकळीने प्रार्थना करू या आणि एकमेव खऱ्‍या देवावर आपला पूर्ण भरवसा असल्याचे दाखवू या.

१७. स्तोत्र ४:३ मध्ये जे म्हटले आहे त्यानुसार आपण कसे वागू शकतो हे स्पष्ट करा.

१७ दाविदाचा देवावरील भरवसा पुढील शब्दांतून स्पष्टपणे दिसून येतो: “तरी हे ध्यानात ठेवा की, परमेश्‍वराने आपणासाठी भक्‍तिमान [“निष्ठावान,” NW] मनुष्य निवडून काढिला आहे; मी परमेश्‍वराचा धावा करीन तेव्हा तो माझे ऐकेल.” (स्तो. ४:३) यहोवाला एकनिष्ठ राहण्यासाठी धैर्याची व त्याच्यावर पूर्णपणे भरवसा ठेवण्याची गरज आहे. उदाहरणार्थ, पश्‍चात्ताप न दाखवणाऱ्‍या एखाद्या नातलगाला बहिष्कृत केले जाते तेव्हा ख्रिस्ती कुटंबातील सदस्यांनी हे गुण दाखवण्याची गरज आहे. जे देवाला एकनिष्ठ राहतात व त्याच्या मार्गांवर चालतात त्यांना तो आशीर्वाद देतो. यहोवाला एकनिष्ठ असल्यामुळे व त्याच्यावर पूर्णपणे भरवसा ठेवल्यामुळे देवाच्या लोकांमध्ये आनंद वाढीस लागतो.—स्तो. ८४:११, १२.

१८. आपले मन दुखावेल असे काहीतरी कोणी बोलले किंवा केले, तर स्तोत्र ४:४ मध्ये सांगितल्यानुसार आपण काय केले पाहिजे?

१८ कोणी आपल्या वागण्या-बोलण्याद्वारे आपले मन दुखावल्यास काय? दावीद आपल्या स्तोत्रात जे म्हणतो त्यानुसार केल्यास आपण आपला आनंद टिकवून ठेवू शकतो: “त्याची भीति बाळगा [“अस्वस्थ व्हा,” NW], पाप करू नका; अंथरुणात पडल्यापडल्या आपल्या मनाशी विचार करा; स्तब्ध राहा.” (स्तो. ४:४) कोणी आपल्या मनाला झोंबणारे शब्द बोलले किंवा आपले मन दुखावेल असे काहीतरी केले, तर आपण जशास तशी वागणूक देण्याद्वारे पाप करू नये. (रोम. १२:१७-१९) आपण आपल्या भावना अंथरुणात असताना म्हणजे आपल्या खासगी प्रार्थनेत व्यक्‍त करू शकतो. आपण त्या गोष्टीविषयी प्रार्थना केल्याने आपला दृष्टिकोन बदलण्याची आणि आपले मन दुखावणाऱ्‍या व्यक्‍तीला आपण क्षमा करण्याची जास्त शक्यता आहे. (१ पेत्र ४:८) या बाबतीत प्रेषित पौलाने दिलेला सल्ला लक्षात घेण्याजोगा आहे जो बहुधा स्तोत्र ४:४ वर आधारित आहे: “तुम्ही रागावा, परंतु पाप करू नका, तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये, आणि सैतानाला वाव देऊ नका.”—इफिस. ४:२६, २७.

१९. आपली आध्यात्मिक अर्पणे देवाला स्वीकारयोग्य असण्यासाठी स्तोत्र ४:५ कशा प्रकारे आपल्याला साहाय्य करू शकते?

१९ देवावर भरवसा ठेवण्याच्या गरजेवर भर देत दावीद आपल्या स्तोत्रात असे म्हणतो: “नीतिमत्त्वपूर्वक यज्ञ करा; परमेश्‍वरावर भाव ठेवा.” (स्तो. ४:५) इस्राएल लोकांनी मनात योग्य हेतू बाळगून बलिदान अर्पण केले, तरच त्यांच्या बलिदानांना मोल होते. (यश. १:११-१७) आपली आध्यात्मिक अर्पणे देवाला स्वीकारयोग्य असावीत म्हणून आपले हेतूदेखील उचित असले पाहिजेत आणि आपणही देवावर पूर्णपणे भरवसा ठेवला पाहिजे.नीतिसूत्रे ३:५, ६; इब्री लोकांस १३:१५, १६ वाचा.

२०. ‘परमेश्‍वराचे मुखतेज’ हा वाक्यांश कशाला सूचित करतो?

२० दावीद पुढे म्हणतो: “आमचे कल्याण कोण करील असे म्हणणारे पुष्कळ आहेत; हे परमेश्‍वरा तू आपले मुखतेज आम्हावर पाड.” (स्तो. ४:६) ‘परमेश्‍वराचे मुखतेज’ हा वाक्यांश देवाच्या अनुग्रहाला सूचित करतो. (स्तो. ८९:१५) म्हणूनच, “तू आपले मुखतेज आम्हावर पाड,” अशी जी प्रार्थना दावीद करतो, त्याचा अर्थ ‘आम्हावर अनुग्रह कर’ असा होतो. आपण यहोवावर भरवसा ठेवत असल्यामुळे, आपल्यावर त्याचा अनुग्रह असतो आणि आपण जेव्हा विश्‍वासाने त्याच्या इच्छेनुसार करतो तेव्हा आपल्याला खूप आनंद होतो.

२१. सध्या चालू असलेल्या आध्यात्मिक कापणीच्या कार्यात पूर्णपणे सहभाग घेतल्यास आपण कशाची खातरी बाळगू शकतो?

२१ कापणीचा काळ हा सहसा आनंदाचा काळ असतो. पण, देवाकडून मिळणारा आनंद त्याहून कितीतरी श्रेष्ठ असतो. अशा आनंदाची आशा बाळगून दावीद यहोवाला असे म्हणतो: “धान्याची व द्राक्षारसाची समृद्धि झाली म्हणजे लोकांस जो आनंद होतो त्यापेक्षा अधिक आनंद तू माझ्या मनात उत्पन्‍न केला आहे.” (स्तो. ४:७) सध्या चालू असलेल्या आध्यात्मिक कापणीच्या कार्यात आपण पूर्णपणे सहभाग घेतला, तर आपल्यालाही मनस्वी आनंद होईल याची आपण खातरी बाळगू शकतो. (लूक १०:२) कापणीच्या या कार्यात अभिषिक्‍त जनांचे मोठे “राष्ट्र” पुढाकार घेत असल्यामुळे, कापणी करणाऱ्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे पाहून आज आपल्याला अत्यानंद होतो. (यश. ९:३) तर मग, कापणीच्या या आनंददायक कार्यात तुम्ही खरोखर पुरेसा सहभाग घेत आहात का?

देवावर पूर्ण भरवसा ठेवून आत्मविश्‍वासाने चाला

२२. इस्राएल लोकांनी देवाच्या नियमशास्त्राचे पालन केले, तेव्हा त्यांनी कशा प्रकारे स्तोत्र ४:८ मध्ये सांगितलेल्या गोष्टी अनुभवल्या?

२२ दावीद पुढील शब्दांनी चौथ्या स्तोत्राचा समारोप करतो: “मी स्वस्थपणे पडून लागलाच झोपी जातो, कारण हे, परमेश्‍वरा, तूच मला एकांतात निर्भय ठेवितोस.” (स्तो. ४:८) इस्राएल लोकांनी यहोवाच्या नियमशास्त्राचे पालन केले, तेव्हा त्यांनी त्याच्यासोबत शांतीचा नातेसंबंध अनुभवला व त्यांना सुरक्षित वाटले. उदाहरणार्थ, शलमोनाच्या शासन काळात ‘यहूदी व इस्राएल निर्भय राहिले.’ (१ राजे ४:२५) सभोवताली शत्रू राष्ट्रे असूनही देवावर भरवसा ठेवणाऱ्‍यांनी शांती अनुभवली. आपणही दाविदाप्रमाणे स्वस्थपणे किंवा शांतीने झोपतो कारण देव आपल्याला सुरक्षित ठेवतो.

२३. आपण देवावर पूर्ण भरवसा ठेवला, तर आपण काय अनुभवू?

२३ तेव्हा, आपण आत्मविश्‍वासाने यहोवाची सेवा करत राहू या. तसेच, देव आपली प्रार्थना ऐकेल या विश्‍वासाने आपण प्रार्थना करू या आणि असे करण्याद्वारे “सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांति” अनुभवू या. (फिलिप्पै. ४:६, ७) यामुळे आपल्याला किती आनंद मिळतो! आणि आपण यहोवावर पूर्ण भरवसा ठेवला, तर आपण नक्कीच आत्मविश्‍वासाने भविष्याला सामोरे जाऊ शकतो.

तुमचे उत्तर काय असेल?

• अबशालोमामुळे दाविदाला कोणत्या समस्यांचा सामना करावा लागला?

• तिसऱ्‍या स्तोत्रामुळे कशा प्रकारे आपला आत्मविश्‍वास बळावतो?

• चौथ्या स्तोत्रामुळे कशा प्रकारे यहोवावरील आपला भरवसा आणखी मजबूत होऊ शकतो?

• देवावर पूर्ण भरवसा ठेवल्याने आपल्याला काय फायदा होऊ शकतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२९ पानांवरील चित्र]

दावीद अबशालोमाच्या भीतीने पळून गेला, तरी त्याचा यहोवावर भरवसा होता

[३२ पानांवरील चित्रे]

तुम्ही यहोवावर पूर्ण भरवसा ठेवता का?