अब्राहामाजवळ खरोखरच उंट होते का?
अब्राहामाजवळ खरोखरच उंट होते का?
बायबल सांगते, की अब्राहामाला फारोकडून मिळालेल्या गुराढोरांत उंटदेखील होते. (उत्प. १२:१६) अब्राहामाचा सेवक मेसोपोटेमियाच्या दूर देशी जाताना, “आपल्या धन्याच्या उंटांपैकी दहा उंट घेऊन निघाला.” त्याअर्थी, आजपासून जवळजवळ ४,००० वर्षांपूर्वी अब्राहामाजवळ उंट होते असे बायबलमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.—उत्प. २४:१०.
पण, काही जण याविषयी आक्षेप घेतात. न्यू इंटरनॅशनल व्हर्शन आर्किओलॉजिकल स्टडी बायबल यात असे म्हटले आहे: “उंटांविषयी आलेल्या या संदर्भांच्या ऐतिहासिक अचूकतेविषयी बऱ्याच काळापासून विद्वानांमध्ये एकमत नाही. कारण यांपैकी बहुतेकांचे असे मानणे आहे की सुमारे ३,२०० वर्षांपूर्वी, म्हणजे अब्राहामाच्या बऱ्याच काळानंतर, उंट माणसाळले गेले होते.” तेव्हा, ३,२०० वर्षांपूर्वीचे उंटांविषयी असलेले
बायबलमधील उल्लेख ऐतिहासिक दृष्ट्या चुकीचे ठरतील, कारण बायबलमधील अहवाल ज्या कालखंडातील आहेत त्या काळात उंटांचा अशा प्रकारे उपयोग केला जात नव्हता.इतर विद्वान मात्र असा दावा करतात, की उंट सुमारे ३,००० वर्षांपूर्वी माणसाळले गेले असले, तरीपण त्याआधी त्यांचा उपयोग केला जात नव्हता असे नाही. सिव्हिलायझेशन्स ऑफ दी एन्शियन्ट नियर ईस्ट या पुस्तकात असे म्हटले आहे: “अलीकडील संशोधनावरून असे दिसून येते, की दक्षिणपूर्व अरेबियात ४,००० वर्षांपेक्षाही जास्त काळापूर्वी उंट माणसाळले गेले होते. सुरुवातीला कदाचित दूध, केस, कातडी आणि मांस या गोष्टींसाठीच या प्राण्यांचा उपयोग केला जात असावा. पण हे प्राणी ओझी लादण्यासाठी उपयोगी आहेत हे लक्षात येण्यास फार काळ लागला नसेल.” अब्राहामाच्या काळापूर्वीच उंटांचा उपयोग केला जात होता या गोष्टीला काही हाडांचे अवशेष व इतर पुरातत्त्वीय पुरावेदेखील दुजोरा देत असल्याचे दिसते.
ऐतिहासिक लिखाणांतही या गोष्टीचा पुरावा आढळतो. वरती उल्लेख केलेल्या पुस्तकातच असेही म्हटले आहे: “मेसोपोटेमियातील कील लिपीत लिहिलेल्या काही यादींत या प्राण्याचा [उंटाचा] उल्लेख आढळतो आणि अनेक शिक्क्यांवर उंटांचे चित्र आढळते. यावरून असे दिसून येते की सुमारे ४,००० वर्षांपूर्वी,” म्हणजे, अब्राहामाच्या काळाच्या आसपास, “मेसोपोटेमियात या प्राण्याचा उपयोग प्रचलित झाला असावा.”
काही विद्वान असे मानतात की दक्षिण अरेबियातील उदाचे व्यापारी वाळवंटातून उत्तरेकडे ईजिप्त व सिरिया येथे आपला माल नेण्याकरता उंटांचा उपयोग करायचे आणि अशा रीतीने त्यांनी या ठिकाणीही उंटांचा उपयोग करण्याचा प्रघात सुरू केला. हा व्यापार कदाचित ४,००० वर्षांपूर्वीच प्रचलित झाला असावा. विशेष म्हणजे, उत्पत्ति ३७:२५-२८ यांत अब्राहामाच्या काळानंतर जवळजवळ शंभर वर्षांनंतर, उंटांवरून ईजिप्तला ऊद नेत असलेल्या इश्माएली व्यापाऱ्यांचा उल्लेख आढळतो.
कदाचित प्राचीन काळातील पूर्वेकडील देशांत ४,००० वर्षांपूर्वी उंटांचा तितका सर्रासपणे उपयोग केला जात नसेलही; पण पुराव्यांवरून दिसते की लोकांसाठी हा प्रकार अगदीच नवीन नव्हता. म्हणूनच, दी इन्टरनॅशनल स्टॅन्डर्ड बायबल एन्सायक्लोपिडिया अशा निष्कर्षावर येते की बायबलमधील उंटांचा उल्लेख ऐतिहासिक दृष्ट्या चुकीचा आहे असे समजण्याची आता गरज नाही. कारण अब्राहामाच्या काळाआधीही उंट माणसाळले गेले होते हे दाखवणारे भरपूर पुरातत्त्वीय पुरावे अस्तित्वात आहेत.