व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तरुणांनी बाप्तिस्मा घ्यावा का?

तरुणांनी बाप्तिस्मा घ्यावा का?

तरुणांनी बाप्तिस्मा घ्यावा का?

“माझी मुलगी आता यहोवाची सेवक आहे याचा मला खूप आनंद होतो आणि मला माहीत आहे, की तीदेखील तितकीच आनंदी आहे,” असे फिलिपाईन्समधील कारलोस * नावाच्या एका ख्रिस्ती पित्याने म्हटले. ग्रीसमधील एका पित्याने लिहिले: “आमची तिन्ही मुलं मोठी होत होती तेव्हाच यहोवाचे साक्षीदार या नात्यानं त्यांचा बाप्तिस्मा झाला याचा मला आणि माझ्या पत्नीला फार आनंद होतो. ते आध्यात्मिक प्रगती करत आहेत आणि यहोवाची सेवा करत असल्याबद्दल ते आनंदी आहेत.”

आपल्या मुलांचा बाप्तिस्मा होतो तेव्हा ख्रिस्ती पालकांना नक्कीच खूप आनंद होतो. पण, काही वेळा आनंदासोबतच त्यांना एक प्रकारची भीतीसुद्धा वाटते. एक आई म्हणते: “मला आनंद तर वाटलाच, पण खूप भीतीसुद्धा वाटली.” या आईला असे का वाटले? ती म्हणते: “आता माझ्या मुलाला स्वतःच त्याच्या जीवनाचा यहोवाला हिशेब द्यावा लागेल हे मला ठाऊक होतं.”

यहोवाचे बाप्तिस्माप्राप्त साक्षीदार या नात्याने त्याची सेवा करणे हे सर्व मुलांचे ध्येय असले पाहिजे. पण, ख्रिस्ती पालकांना कदाचित प्रश्‍न पडेल, ‘माझ्या मुलानं चांगली प्रगती केली आहे हे मला माहीत आहे, पण अनैतिक दबावांचा प्रतिकार करण्याइतपत आणि यहोवाच्या नजरेत शुद्ध राहण्याइतपत तो खंबीर आहे का?’ इतर जण कदाचित स्वतःला विचारतील, ‘भरपूर पैसा व भौतिक वस्तू मिळवण्याची प्रलोभनं जगाकडून येत असतानाही आपलं मूल आनंदानं व आवेशानं देवाची सेवा करत राहील का?’ तर मग, आपली मुले बाप्तिस्मा घेण्यास तयार आहेत की नाही हे ठरवण्यासाठी बायबलमधील कोणती मार्गदर्शक माहिती पालकांना साहाय्य करू शकते?

सगळ्यात पहिली अट—येशूचे शिष्य बनणे

अमुक एका वयात बाप्तिस्मा घ्यावा असे बायबल सांगत नाही; तर बाप्तिस्म्याचे पाऊल उचलण्यास पात्र असलेल्यांची आध्यात्मिक स्थिती कशी असली पाहिजे हे बायबल सांगते. येशूने आपल्या अनुयायांना अशी सूचना दिली: “सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा; त्यांस . . . बाप्तिस्मा द्या.” (मत्त. २८:१९) यावरून दिसून येते, की जे आधीपासूनच ख्रिस्ताचे शिष्य आहेत तेच बाप्तिस्मा घेण्यास पात्र आहेत.

शिष्य या शब्दाचा काय अर्थ होतो? इन्साइट ऑन द स्क्रिप्चर्स याचे असे स्पष्टीकरण देते: “हा शब्द प्रामुख्याने त्यांना लागू होतो जे ख्रिस्ताच्या शिकवणींवर केवळ विश्‍वासच ठेवत नाहीत, तर त्यांचे काटेकोरपणे पालनही करतात.” वयाने लहान असलेली मुले ख्रिस्ताचे खरे शिष्य बनू शकतात का? लॅटीन अमेरिकेत ४० हून अधिक वर्षे मिशनरी म्हणून सेवा करणारी एक ख्रिस्ती बहीण आपल्याबद्दल व आपल्या दोन बहिणींबद्दल लिहिते: “आम्हाला यहोवाची सेवा करण्याची आणि नंदनवनात जीवन जगण्याची इच्छा आहे हे समजण्याइतके आम्ही मोठे होतो. यहोवाला केलेल्या समर्पणामुळे, तरुणपणात सामना कराव्या लागणाऱ्‍या प्रलोभनांचा प्रतिकार करण्याचं बळ आम्हाला मिळालं. आम्ही कोवळ्या वयातच देवाला आपलं जीवन समर्पित केलं याचा आम्हाला मुळीच पस्तावा होत नाही.”

तुमचे मूल ख्रिस्ताचा शिष्य आहे की नाही हे तुम्हाला कसे ओळखता येईल? बायबल म्हणते: “वृत्ति शुद्ध आहे की नाही, नीट आहे की नाही, हे मूलसुद्धा आपल्या कृत्यांनी उघड करिते.” (नीति. २०:११) अशी काही कार्ये विचारात घ्या ज्यांवरून एक मूल शिष्य या नात्याने “प्रगती” करत आहे हे दिसून येईल.—१ तीम. ४:१५.

शिष्यत्वाचा पुरावा

तुमचे मूल तुमचे ऐकते का? (कलस्सै. ३:२०) घरात नेमून दिलेली कामे ते करते का? १२ वर्षांच्या येशूविषयी बायबल म्हणते: ‘तो [आपल्या आईवडिलांच्या] आज्ञेत राहिला.’ (लूक २:५१) अर्थात, कोणतेही मूल येशूप्रमाणे आपल्या आईवडिलांच्या आज्ञांचे पूर्णपणे पालन करणार नाही. पण, खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी “[येशूच्या] पावलांवर पाऊल ठेवून चालावे” अशी अपेक्षा त्यांच्याकडून केली जाते. तेव्हा, बाप्तिस्मा घेऊ इच्छिणारी मुले आपल्या आईवडिलांना आज्ञाधारक आहेत हे दिसून आले पाहिजे.—१ पेत्र २:२१.

पुढील प्रश्‍न विचारात घ्या: तुमचे मूल आपल्या सेवाकार्याद्वारे ‘पहिल्याने देवाचे राज्य मिळविण्यास झटत’ आहे का? (मत्त. ६:३३) तुमचे मूल इतरांना सुवार्ता सांगण्यास उत्सुक असते का, की क्षेत्र सेवेत जाण्यासाठी व घरोघरच्या कार्यात घरमालकांशी बोलण्यासाठी तुम्हाला त्याला खूप उत्तेजन द्यावे लागते? एक बाप्तिस्मा न घेतलेला प्रचारक या नात्याने तो आपल्या जबाबदारीकडे गंभीरतेने पाहतो का? क्षेत्रात भेटलेल्या आस्थेवाईक लोकांना पुन्हा भेट देण्यास तो उत्सुक असतो का? आपण यहोवाचे एक साक्षीदार आहोत हे तो आपल्या शाळकरी मित्रांना व शिक्षकांना सांगतो का?

मंडळीच्या सभांना उपस्थित राहण्याला तो महत्त्व देतो का? (स्तो. १२२:१) टेहळणी बुरूज अभ्यास व मंडळीचा बायबल अभ्यास यांत उत्तरे देण्यास त्याला आवडते का? ईश्‍वरशासित सेवा प्रशालेत त्याने आपले नाव नोंदवले आहे का व त्यात तो उत्साहाने सहभाग घेतो का?—इब्री १०:२४, २५.

शाळेत किंवा इतर ठिकाणी वाईट मित्रांची संगत टाळण्याद्वारे तुमचे मूल नैतिकदृष्ट्या शुद्ध राहण्याचा प्रयत्न करते का? (नीति. १३:२०) संगीत, चित्रपट, टीव्ही कार्यक्रम, व्हिडिओ गेम्स आणि इंटरनेटचा वापर यांच्या बाबतीत त्याच्या आवडीनिवडी काय आहेत? त्याला बायबलच्या स्तरांचे पालन करण्याची इच्छा आहे हे त्याच्या बोलण्यातून व वागण्यातून दिसून येते का?

तुमच्या मुलाला बायबलचे किती ज्ञान आहे? तुमच्या कौटुंबिक उपासनेतून तो जे काही शिकतो ते तो स्वतःच्या शब्दांत सांगू शकतो का? त्याला बायबलची मूलभूत सत्ये स्पष्ट करून सांगता येतात का? (नीति. २:६-९) त्याला बायबलचे वाचन करण्याची आणि विश्‍वासू व बुद्धिमान दासाद्वारे मिळणाऱ्‍या प्रकाशनांचा अभ्यास करण्याची आवड आहे का? (मत्त. २४:४५) बायबलच्या शिकवणींबद्दल व बायबलमधील वचनांबद्दल तो प्रश्‍न विचारतो का?

या प्रश्‍नांवरून तुम्हाला आपल्या मुलाच्या आध्यात्मिक प्रगतीची कल्पना येऊ शकते. वरील प्रश्‍न विचारात घेतल्यानंतर, तुम्हाला कदाचित असे वाटेल की आपल्या मुलाने अमुक एका क्षेत्रात प्रगती करावी आणि मग बाप्तिस्मा घ्यावा. पण, त्याच्या एकंदरित जीवनक्रमावरून शिष्यत्वाचा पुरावा मिळत असेल आणि त्याने खरोखर देवाला आपले जीवन समर्पित केले असेल, तर त्याने बाप्तिस्मा घेण्यात काहीच हरकत नाही असे तुम्हाला वाटू शकते.

मुले यहोवाची स्तुती करू शकतात

देवाच्या अनेक सेवकांनी, तरुण असताना किंवा अगदी लहान वयातच यहोवाला विश्‍वासू व एकनिष्ठ असल्याचा पुरावा दिला. योसेफ, शमुवेल, योशीया आणि येशू यांचा विचार करा. (उत्प. ३७:२; ३९:१-३; १ शमु. १:२४-२८; २:१८-२०; २ इति. ३४:१-३; लूक २:४२-४९) आणि फिलिप्पाच्या चार मुली, ज्या संदेश देणाऱ्‍या होत्या, त्यांना अगदी कोवळ्या वयापासूनच उत्तम तालीम मिळाली असेल.—प्रे. कृत्ये २१:८, ९.

ग्रीसमधील एका साक्षीदाराने म्हटले: “मी १२ वर्षांचा होतो तेव्हा माझा बाप्तिस्मा झाला. त्या निर्णयाचा मला कधीच पस्तावा झाला नाही. तेव्हापासून, २४ वर्षं उलटली आहेत, ज्यांपैकी २३ वर्षं मी पूर्ण-वेळची सेवा केली आहे. तरुणपणात तोंड द्याव्या लागणाऱ्‍या समस्यांचा सामना करण्यास यहोवावरील माझ्या प्रेमानं मला नेहमी मदत केली. मला बायबलचं आत्ता जेवढं ज्ञान आहे, तेवढं मी १२ वर्षांचा असताना मला नव्हतं. पण, माझं यहोवावर प्रेम आहे आणि मला सदासर्वकाळ त्याची सेवा करायची इच्छा आहे हे मला माहीत होतं. त्यानं मला त्याची सेवा करत राहण्यास मदत केली याचा मला आनंद होतो.”

ख्रिस्ताचा खरा शिष्य असल्याचा पुरावा देणाऱ्‍या प्रत्येक व्यक्‍तीने, मग ती लहान असो अथवा मोठी, बाप्तिस्मा घेतला पाहिजे. प्रेषित पौलाने लिहिले: “जो अंतःकरणाने विश्‍वास ठेवतो तो नीतिमान ठरतो व जो मुखाने कबूल करितो त्याचे तारण होते.” (रोम. १०:१०) ख्रिस्ताचा एक तरुण शिष्य बाप्तिस्म्याचे महत्त्वपूर्ण पाऊल उचलतो तेव्हा त्याने व त्याच्या पालकांनी जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा गाठलेला असतो. या विलक्षण आनंदापासून तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना कोणतीही गोष्ट वंचित न करो.

[तळटीप]

^ काही नावे बदलण्यात आली आहेत.

[५ पानांवरील चौकट]

बाप्तिस्म्याबद्दल योग्य दृष्टिकोन

काही पालकांना वाटते, की आपल्या मुलांनी बाप्तिस्मा घेणे हे ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्याप्रमाणे एक फायदेकारक, पण धोकेदायक पाऊल आहे. पण, बाप्तिस्मा व पवित्र सेवा एका व्यक्‍तीचे जीवन कधी धोक्यात घालू शकते का? नाही, असे बायबल याचे उत्तर देते. नीतिसूत्रे १०:२२ म्हणते: “परमेश्‍वराचा आशीर्वाद समृद्धि देतो, तिच्याबरोबर तो आणखी कष्ट देत नाही.” आणि प्रेषित पौलाने तरुण तीमथ्याला असे लिहिले: “चित्तसमाधानासह भक्‍ती हा तर मोठाच लाभ आहे.”—१ तीम. ६:६.

यहोवाची सेवा करणे सोपे नाही, हे खरे आहे. यिर्मयाला देवाचा संदेष्टा या नात्याने कार्य करत असताना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. तरीसुद्धा, खऱ्‍या देवाच्या उपासनेसंबंधी त्याने असे लिहिले: “तुझी वचने माझा आनंद, माझ्या जिवाचा उल्लास अशी होती; कारण हे परमेश्‍वरा, सेनाधीश देवा, तुझे नाम घेऊन मी आपणास तुझा म्हणवितो.” (यिर्म. १५:१६) यिर्मयाला माहीत होते, की देवाची सेवा हीच त्याच्या आनंदाचे उगमस्थान आहे. याच्या अगदी उलट, सैतानाचे जग समस्यांचे उगमस्थान आहे. हा फरक ओळखण्यास, पालकांनी आपल्या मुलांना मदत केली पाहिजे.—यिर्म. १:१९.

[६ पानांवरील चौकट/चित्र]

माझ्या मुलानं बाप्तिस्म्याचा निर्णय लांबणीवर टाकावा का?

काही वेळा, मुले बाप्तिस्मा घेण्यास पात्र असली, तरी त्यांनी आणखी थोडा वेळ थांबावे असा निर्णय कदाचित पालक घेतील. याची कारणे काय असू शकतात?

माझ्या मुलानं बाप्तिस्मा घेतला आणि नंतर जर त्याच्या हातून गंभीर पाप घडलं, तर त्याला बहिष्कृत केलं जाईल याची मला भीती वाटते. पण, जे मूल बाप्तिस्मा घेण्याचे लांबणीवर टाकते त्याला आपल्या आचरणाबद्दल देवाला हिशेब द्यावा लागणार नाही असा विचार करणे तर्कशुद्ध आहे का? शलमोनाने मुलांना उद्देशून पुढील शब्द लिहिले: “[तुझ्या कृत्यांबद्दल] देव तुझा झाडा घेईल हे तुझ्या लक्षात असू दे.” (उप. ११:९) तसेच, पौलानेसुद्धा विशिष्ट वयाचा उल्लेख न करता आपल्याला याची आठवण करून दिली, की “आपणातील प्रत्येक जण आपआपल्यासंबंधी देवाला हिशेब देईल.”—रोम. १४:१२.

देवाच्या बाप्तिस्माप्राप्त व बाप्तिस्मा न घेतलेल्या सर्व उपासकांना आपल्या जीवनाबद्दल देवाला जाब द्यायचा आहे. हे नेहमी लक्षात असू द्या, की यहोवा कधीही आपल्या सेवकांची ‘परीक्षा त्यांच्या शक्‍तीपलीकडे होऊ देत नाही.’ असे करण्याद्वारे तो त्यांचे संरक्षण करतो. (१ करिंथ. १०:१३) देवाचे सेवक जोपर्यंत ‘सावध असतात’ व प्रलोभनांचा प्रतिकार करतात, तोपर्यंत ते देवाकडून आधार मिळण्याची खातरी बाळगू शकतात. (१ पेत्र ५:६-९) एक ख्रिस्ती आई असे लिहिते: “ज्या मुलांचा बाप्तिस्मा झाला आहे अशांसाठी जगातल्या वाईट गोष्टींपासून दूर राहण्याची अनेक चांगली कारणे आहेत. माझा मुलगा १५ वर्षांचा असताना त्याचा बाप्तिस्मा झाला होता आणि त्याच्यासाठी बाप्तिस्मा एक संरक्षण आहे असे त्याला वाटते. ‘यहोवाच्या नियमांचे उल्लंघन करण्याचा विचारसुद्धा तुम्ही करू शकत नाही,’ असे तो म्हणतो. बाप्तिस्मा घेतल्यामुळे तुम्हाला नीतीने वागण्याची प्रबळ प्रेरणा मिळते.”

तुम्ही जर आपल्या स्वतःच्या वागण्याबोलण्याद्वारे आपल्या मुलांना यहोवाच्या आज्ञा पाळण्याचे प्रशिक्षण दिले असेल, तर बाप्तिस्मा घेतल्यानंतरही मुले यहोवाच्या आज्ञांचे पालन करत राहतील याची खातरी तुम्ही बाळगू शकता. नीतिसूत्रे २०:७ म्हणते: “जो धार्मिक मनुष्य सात्विकपणे चालतो, त्याच्यामागे त्याची मुले धन्य होतात.”

माझ्या मुलानं बाप्तिस्मा घेण्याआधी काही विशिष्ट ध्येयं गाठावीत अशी माझी इच्छा आहे. मुलांनी पुढे स्वतःच्या पायांवर उभे राहावे म्हणून त्यांनी नक्कीच काम करायला शिकले पाहिजे. पण, त्यांना खऱ्‍या उपासनेऐवजी शिक्षण व आर्थिक सुरक्षा यांवर केंद्रित असलेल्या जीवनशैलीचा पाठपुरावा करण्याचे प्रोत्साहन देणे धोकेदायक आहे. जे “बी” किंवा राज्याचे वचन वाढत नाही त्याविषयी येशूने म्हटले: “काटेरी झाडांमध्ये पेरलेला तो हा आहे की, तो वचन ऐकतो, परंतु संसाराची चिंता व द्रव्याचा मोह ही वचनाची वाढ खुंटवितात आणि तो निष्फळ होतो.” (मत्त. १३:२२) पालकांनी आपल्या मुलांना आध्यात्मिक गोष्टींपेक्षा जगातील ध्येयांना प्राधान्य देण्याचे प्रोत्साहन दिले, तर देवाची सेवा करण्याची मुलांची इच्छा नष्ट होऊ शकते.

जी मुले बाप्तिस्मा घेण्यास पात्र असूनही त्यांचे पालक त्यांना बाप्तिस्मा घेऊ देत नाहीत अशा मुलांविषयी बोलताना एका अनुभवी ख्रिस्ती वडिलांनी असे म्हटले: “एखाद्या मुलाला बाप्तिस्मा घेण्यापासून रोखले, तर त्याची आध्यात्मिक प्रगती खुंटू शकते व तो निराश होऊ शकतो.” तसेच, एका प्रवासी पर्यवेक्षकाने लिहिले: “आध्यात्मिकदृष्ट्या एका मुलाला असुरक्षित व कमीपणा वाटू शकतो आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी तो जगाकडे वळू शकतो.”

[चित्र]

उच्च शिक्षणाला प्राधान्य द्यावे का?

[३ पानांवरील चित्र]

एक मूल आपल्या शिष्यत्वाचा पुरावा देऊ शकते

[३ पानांवरील चित्रे]

सभांची तयारी करणे व सभांमध्ये सहभाग घेणे

[४ पानांवरील चित्र]

पालकांच्या आज्ञेत राहणे

[४ पानांवरील चित्र]

सेवाकार्यात सहभाग घेणे

[४ पानांवरील चित्र]

वैयक्‍तिक प्रार्थना