व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुमच्या देखरेखीखाली असलेल्या देवाच्या कळपाचे पालन करा

तुमच्या देखरेखीखाली असलेल्या देवाच्या कळपाचे पालन करा

तुमच्या देखरेखीखाली असलेल्या देवाच्या कळपाचे पालन करा

“तुम्हामधील देवाच्या कळपाचे पालन करा; करावे लागते म्हणून नव्हे, तर देवाच्या इच्छेप्रमाणे संतोषाने त्याची देखरेख करा.”—१ पेत्र ५:२.

१. पेत्राने आपले पहिले पत्र लिहिले तेव्हा रोममधील ख्रिस्ती कोणत्या परिस्थितीला तोंड देत होते?

 रोमचा सम्राट नीरो, याने रोममधील ख्रिश्‍चनांचा छळ करायला सुरुवात करण्याच्या काही काळाआधी प्रेषित पेत्राने आपले पहिले पत्र लिहिले. पेत्राला आपल्या ख्रिस्ती बांधवांना बळकट करायची इच्छा होती. दियाबल सैतान ख्रिश्‍चनांना गिळंकृत करण्यासाठी ‘शोधत फिरत’ होता. त्याच्या विरुद्ध खंबीरपणे उभे राहण्यासाठी, ख्रिश्‍चनांनी ‘सावध असणे’ व ‘देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन होणे’ गरजेचे होते. (१ पेत्र ५:६, ८) तसेच, त्यांनी ऐक्याने राहणेदेखील गरजेचे होते. ते जर एकमेकांसोबत भांडत राहिले असते, तर ते त्यांच्यासाठी धोकेदायक ठरू शकले असते; असे करण्याद्वारे त्यांनी “एकमेकांचा संहार” केला असता.—गलती. ५:१५.

२, ३. आपले झगडणे कोणाविरुद्ध असले पाहिजे, आणि या लेखमालेत आपण कशाची चर्चा करणार आहोत?

आज आपणही तशाच परिस्थितीला तोंड देत आहोत. दियाबल आपल्याला गिळंकृत करण्याची संधी शोधत आहे. (प्रकटी. १२:१२) आणि ‘जगाच्या प्रारंभापासून आतापर्यंत आले नाही, असे मोठे संकट’ लवकरच येत आहे. (मत्त. २४:२१) पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांप्रमाणेच, आपणही एकमेकांसोबत भांडण करण्यापासून सावध असले पाहिजे. असे करण्यासाठी, काही वेळा आपल्याला ख्रिस्ती वडिलांच्या मदतीची गरज आहे.

मंडळीतील वडिलांना, ‘देवाच्या कळपाचे पालन करण्याचा’ जो विशेषाधिकार लाभला, त्याविषयी ते आपली कदर आणखी कशा प्रकारे वाढवू शकतात ते आपण पाहू या. (१ पेत्र ५:२) त्यानंतर, देखरेखीचे कार्य योग्यपणे कसे करावे याचा आपण विचार करू. मंडळीचे सदस्य, कळपाची देखरेख करण्यासाठी ‘श्रम करणाऱ्‍यांचा सन्मान’ कसा करू शकतात याचे परीक्षण आपण पुढच्या लेखात करू. (१ थेस्सलनी. ५:१२) या गोष्टींची चर्चा केल्याने, आपले झगडणे खरेतर आपला मुख्य शत्रू सैतान याच्या विरुद्ध आहे हे ओळखण्यास व त्याच्या विरुद्ध खंबीरपणे उभे राहण्यास आपल्याला मदत मिळेल.—इफिस. ६:१२.

देवाच्या कळपाचे पालन करा

४, ५. मंडळीतील वडिलांनी कळपाकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे? उदाहरण द्या.

पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांमध्ये असलेल्या वडिलांना पेत्राने प्रोत्साहन दिले की त्यांना सोपवलेल्या देवाच्या कळपाबद्दल त्यांनी देवाचा दृष्टिकोन बाळगला पाहिजे. (१ पेत्र ५:१, २ वाचा.) पेत्राला मंडळीचा आधारस्तंभ असे मानले जात असले, तरी तो त्या वडिलांना टाकून बोलला नाही. उलट, ते आपले सोबतीचे वडील आहेत असे समजून त्याने त्यांना बोध केला. (गलती. २:९) आज नियमन मंडळदेखील पेत्राच्या मनोवृत्तीचे अनुकरण करून मंडळीच्या वडिलांना बोध करते की त्यांनी देवाच्या कळपाची देखरेख करण्याची मोठी जबाबदारी पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा.

प्रेषित पेत्राने लिहिले, की वडिलांनी ‘त्यांच्यामधील देवाच्या कळपाचे पालन करायचे’ होते. कळप हा यहोवाचा व येशू ख्रिस्ताचा आहे हे त्यांनी ओळखणे सगळ्यात महत्त्वाचे होते. वडील देवाच्या मेंढरांची देखभाल कशा प्रकारे करतात याचा त्यांना देवाला हिशोब द्यायचा होता. अशी कल्पना करा, की तुमच्या एका जवळच्या मित्राने तुम्हाला त्याच्या अनुपस्थितीत त्याच्या मुलांची देखभाल करायला सांगितले आहे. तर, तुम्ही त्यांचे चांगल्या प्रकारे पालनपोषण करणार नाही का? त्यांच्यापैकी एखादे मूल आजारी पडले, तर तुम्ही त्याच्या उपचाराची व्यवस्था करणार नाही का? त्याच प्रकारे, मंडळीतील वडिलांनीदेखील “देवाची जी मंडळी त्याने आपल्या [“पुत्राच्या,” NW] रक्‍ताने स्वतःकरिता मिळविली” तिचे पालन केले पाहिजे. (प्रे. कृत्ये २०:२८) वडील हे लक्षात ठेवतात, की प्रत्येक मेंढराला ख्रिस्त येशूच्या अमूल्य रक्‍ताद्वारे विकत घेण्यात आले आहे. वडिलांना मेंढरांची देखरेख करण्याच्या बाबतीत हिशोब द्यायचा असल्यामुळे, ते मेंढरांचे पोषण करतात, त्यांचे संरक्षण करतात, आणि त्यांचे पालन करतात.

६. प्राचीन काळातील मेंढपाळांची जबाबदारी काय होती?

बायबल काळातील खरोखरच्या मेंढपाळांवर किती जबाबदाऱ्‍या असायच्या याचा विचार करा. त्यांना भर उन्हातान्हात आणि रात्री थंडीवाऱ्‍यात कळपाची राखण करावी लागत असे. (उत्प. ३१:४०) मेंढरांसाठी त्यांना स्वतःचा जीवदेखील धोक्यात घालावा लागत असे. लहानपणी मेंढरांची राखण करत असताना, दाविदाने आपल्या कळपाला हिंस्र पशूंच्या—ज्यांत एका सिंहाचा व एका अस्वलाचा समावेश होता—तावडीतून सोडवले होते. त्या प्रत्येकाविषयी दाविदाने म्हटले, की त्याने “त्याची दाढी धरून त्याला हाणून ठार केले.” (१ शमु. १७:३४, ३५) किती धाडसी कृत्य! असे करताना तो त्या हिंस्र पशूच्या जबड्यांच्या किती जवळ आला असेल! तरीसुद्धा, आपल्या मेंढरांना वाचवण्यासाठी त्याने सर्वतोपरी प्रयत्न केला.

७. मंडळीतील वडील कशा प्रकारे लाक्षणिक अर्थाने मेंढरांना सैतानाच्या जबड्यांतून सोडवतात?

आज दियाबल सैतान, सिंहाप्रमाणे हल्ले करतो; त्यापासून मंडळीच्या वडिलांनी सावध राहणे गरजेचे आहे. यात लाक्षणिक अर्थाने मेंढराला दियाबलाच्या जबड्यांतून बाहेर काढण्यासारखे धाडसी कार्य सामील असू शकते. मंडळीतील वडील जणू जंगली पशूची दाढी धरून, मेंढरांची सुटका करू शकतात. ते सैतानाच्या पाशांना बळी पडलेल्या बेसावध बांधवांसोबत तर्क करू शकतात. (यहूदा २२, २३ वाचा.) अर्थात, यहोवाच्या मदतीविना वडिलांना हे साध्य करणे शक्य नाही. ते त्याच्या जखमांना देवाच्या वचनातील वेदनाशामक मलम लावतात व पट्टी बांधतात आणि अशा रीतीने ते जखमी झालेल्या मेंढराची कोमलतेने देखभाल करतात.

८. मंडळीचे वडील कळपाला कोठे मार्गदर्शित करतात, आणि कसे?

एक खरोखरचा मेंढपाळ आपल्या कळपाला हिरव्यागार कुरणाकडे व भरपूर पाणी असलेल्या ठिकाणाकडेही नेत असे. त्याचप्रमाणे, मंडळीचे वडील कळपाला मंडळीकडे मार्गदर्शित करतात, आणि नियमितपणे सभांना उपस्थित राहण्याचे प्रोत्साहन देतात, जेणेकरून कळपाला “यथाकाळी” अन्‍न मिळू शकेल व त्याचे चांगल्या प्रकारे पोषण होऊ शकेल. (मत्त. २४:४५) आध्यात्मिक रीत्या आजारी असलेल्या मेंढरांनी देवाच्या वचनातून मिळणारे पौष्टिक अन्‍न ग्रहण करावे म्हणून त्यांची मदत करण्यासाठी मंडळीच्या वडिलांना अतिरिक्‍त वेळ द्यावा लागू शकतो. एखादे भरकटलेले मेंढरू कदाचित कळपात परत येण्याचा प्रयत्न करत असेल. आपल्या बांधवाला घाबरवण्याऐवजी, वडील प्रेमळपणे त्याला शास्त्रवचनांतील तत्त्वे स्पष्ट करून सांगतात आणि तो कशा प्रकारे ही तत्त्वे आपल्या जीवनात लागू करू शकतो हे दाखवतात.

९, १०. मंडळीतील वडिलांनी आध्यात्मिक रीत्या आजारी असलेल्यांची काळजी कशा प्रकारे घेतली पाहिजे?

तुम्ही आजारी असता तेव्हा तुम्ही कोणत्या डॉक्टरकडे जाऊ इच्छिता? जो तुमचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी पुरेसा वेळ देत नाही आणि दुसऱ्‍या रुग्णाला तपासता यावे म्हणून तुम्हाला घाईघाईने औषधे लिहून देतो, अशा डॉक्टरकडे तुम्ही जाल का? की अशा डॉक्टरकडे जाल, जो तुमचे म्हणणे नीट ऐकून घेतो, तुम्हाला काय झाले आहे ते स्पष्ट करून सांगतो, आणि कोणता उपचार घेणे योग्य राहील हे सांगतो?

१० त्याचप्रमाणे, मंडळीतील वडील आध्यात्मिक रीत्या आजारी असलेल्या व्यक्‍तीचे म्हणणे ऐकून घेऊ शकतात आणि लाक्षणिक अर्थाने ‘प्रभूच्या नावाने तेल लावून’ तिची जखम भरून येण्यास तिला मदत करू शकतात. (याकोब ५:१४, १५ वाचा.) गिलादातील मलमाप्रमाणे, देवाचे वचन आध्यात्मिक रीत्या आजारी असलेल्या व्यक्‍तीच्या वेदना शमवू शकते. (यिर्म. ८:२२; यहे. ३४:१६) बायबलमधील तत्त्वे जीवनात लागू केली जातात तेव्हा आध्यात्मिक रीत्या आजारी व्यक्‍तीला पुन्हा आध्यात्मिक संतुलन साधण्यास मदत मिळू शकते. होय, वडील आजारी मेंढराच्या चिंता-विवंचना ऐकून घेऊन त्याच्यासोबत प्रार्थना करतात तेव्हा त्याचे अनेक चांगले परिणाम मिळतात.

करावे लागते म्हणून नव्हे, तर संतोषाने करा

११. कोणती गोष्ट वडिलांना आनंदाने देवाच्या कळपाची देखरेख करण्याची प्रेरणा देते?

११ पेत्राने पुढे, कळपाच्या देखरेखीचे कार्य कशा प्रकारे करावे व कशा प्रकारे करू नये याची वडिलांना आठवण करून दिली. वडिलांनी देवाच्या कळपाचे पालन ‘करावे लागते म्हणून नव्हे, तर संतोषाने’ केले पाहिजे. आपल्या बांधवांची सेवा स्वेच्छेने करण्यास कोणती गोष्ट वडिलांना प्रेरणा देते? विचार करा, कोणत्या गोष्टीने पेत्राला येशूच्या मेंढरांची देखरेख करण्यासाठी व त्यांचे पोषण करण्यासाठी प्रवृत्त केले होते? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रभूवर असलेले त्याचे प्रेम व जिव्हाळा. (योहा. २१:१५-१७) प्रेमामुळेच, मंडळीतील वडीलदेखील ‘स्वतःकरिता नव्हे तर त्यांच्यासाठी जो मेला त्याच्याकरिता जगतात.’ (२ करिंथ. ५:१४, १५) हे प्रेम आणि सोबतच देवाबद्दलचे व आपल्या बांधवांबद्दलचे प्रेम, वडिलांना देवाच्या कळपाच्या सेवेसाठी आपले श्रम, साधनसंपत्ती, आणि वेळ खर्च करण्यास प्रवृत्त करते. (मत्त. २२:३७-३९) ते कुरकुर करत नव्हे, तर आनंदाने या कार्यात स्वतःला झोकून देतात.

१२. कळपाची देखरेख करण्यासाठी प्रेषित पौलाने स्वतःला कितपत झोकून दिले होते?

१२ कळपाची देखरेख करण्यासाठी वडिलांनी स्वतःला कितपत झोकून दिले पाहिजे? मेंढरांची देखरेख करण्याच्या बाबतीत ते प्रेषित पौलाचे अनुकरण करतात, ज्याने स्वतः येशूचे अनुकरण केले होते. (१ करिंथ. ११:१) पौल व त्याच्या सोबत्यांना थेस्सलनीका मंडळीतील बांधवांविषयी कळकळ वाटत असल्यामुळे ते त्यांच्यासाठी केवळ ‘देवाकडून येणारी सुवार्ताच नव्हे, तर स्वतःचे जीवनसुद्धा देण्यास तयार’ होते. असे करत असताना, एक “आई जशी प्रेमाने तिच्या मुलाला स्वतःचे दूध पाजते आणि काळजी घेते” तसे ते त्यांच्यामध्ये सौम्य झाले. (१ थेस्सलनी. २:७, ८, ईझी-टू-रीड व्हर्शन) दूध पाजणाऱ्‍या आईला आपल्या मुलाबाळांविषयी कसे वाटते हे पौलाला माहीत होते. एक आई आपल्या मुलांसाठी काहीही करायला तयार असते; आपल्या बाळाला दूध पाजण्यासाठी ती रात्री-अपरात्रीही झोपेतून उठण्यास तयार असते.

१३. ख्रिस्ती वडिलांनी कोणत्या बाबतीत संतुलन राखले पाहिजे?

१३ ख्रिस्ती वडिलांनी कळपाची देखरेख करण्याच्या जबाबदाऱ्‍यांमध्ये आणि कुटुंबाप्रती असलेल्या आपल्या कर्तव्यांमध्ये संतुलन राखण्याची काळजी घेतली पाहिजे. (१ तीम. ५:८) मंडळीसाठी वडील जो वेळ खर्च करतात तो अमूल्य वेळ ते आपल्या कुटुंबासोबत खर्च करू शकले असते. या बाबतीत समतोल राखण्याचा एक मार्ग म्हणजे ते अधूनमधून आपल्या कौटुंबिक उपासनेला इतरांना बोलावू शकतात. जपानमधील मासानाओ नावाच्या ख्रिस्ती वडिलांनी कित्येक वर्षे, अविवाहित व आध्यात्मिक दृष्टीने अनाथ असलेल्या बंधुभगिनींना आपल्या कौटुंबिक अभ्यासाला आमंत्रित केले होते. कालांतराने, त्यांनी ज्यांना मदत केली होती त्यांच्यापैकी काही जण मंडळीत ख्रिस्ती वडील बनले आणि त्यांनी मासानाओच्या उत्तम उदाहरणाचे अनुकरण केले.

द्रव्यलोभ टाळा—उत्सुकतेने कळपाची देखरेख करा

१४, १५. ख्रिस्ती वडिलांनी ‘द्रव्यलोभापासून’ सावध का असले पाहिजे, आणि या बाबतीत ते पौलाचे अनुकरण कसे करू शकतात?

१४ पौलाने ख्रिस्ती वडिलांना असेही प्रोत्साहन दिले, की त्यांनी “द्रव्यलोभाने नव्हे तर उत्सुकतेने” कळपाची देखरेख करावी. आपली कर्तव्ये पार पाडण्यासाठी ख्रिस्ती वडील बराच वेळ खर्च करतात. पण त्याबद्दल ते कोणत्याही आर्थिक मोबदल्याची अपेक्षा करत नाहीत. पेत्राला आपल्या सोबतच्या वडिलांना, ‘द्रव्यलोभासाठी’ कळपाची देखरेख करण्याच्या धोक्यासंबंधी सावध करण्याची गरज भासली. हा धोका, आज अधिकाधिक लोक अत्यंत हलाखीचे जीवन जगत असताना ‘मोठ्या बाबेलीचे’ धर्मगुरू जगत असलेल्या ऐशआरामाच्या जीवनातून स्पष्टपणे दिसून येतो. (प्रकटी. १८:२, ३) आपल्यात अशी प्रवृत्ती येऊ नये म्हणून आज ख्रिस्ती वडिलांनी नेहमी जागरूक असले पाहिजे.

१५ या बाबतीत पौलाने ख्रिस्ती वडिलांसाठी एक उत्तम उदाहरण मांडले. तो एक प्रेषित होता आणि प्रेषित या नात्याने तो ख्रिश्‍चनांवर “भार” घालू शकला असता. पण, त्याने “कोणाचे अन्‍न फुकट खाल्ले नाही.” उलट, त्याने “रात्रंदिवस श्रम व कष्ट करून काम केले.” (२ थेस्सलनी. ३:८) या बाबतीत आज आपल्या काळातील अनेक ख्रिस्ती वडील व प्रवासी कार्य करणारे वडील एक उत्तम उदाहरण मांडतात. ते ख्रिस्ती बांधवांचा पाहुणचार स्वीकारत असले, तरी ते ‘कोणावरही भार’ घालत नाहीत.—१ थेस्सलनी. २:९.

१६. कळपाचे पालन “उत्सुकतेने” करण्याचा काय अर्थ होतो?

१६ ख्रिस्ती वडील “उत्सुकतेने” कळपाचे पालन करतात. कळपाला मदत करण्यासाठी ते जो निःस्वार्थ आत्मा दाखवतात त्यातून त्यांची उत्सुकता दिसून येते. पण, याचा अर्थ ते कळपाला यहोवाची सेवा करण्याची जबरदस्ती करतात असे नाही; किंवा स्पर्धात्मक वृत्तीने देवाची सेवा करण्याचे उत्तेजनही प्रेमळ वडील इतरांना देत नाहीत. (गलती. ६:४) प्रत्येक मेंढरू वेगळे आहे याची ख्रिस्ती वडील जाणीव राखतात. आपल्या बांधवांनी आनंदाने यहोवाची सेवा करावी म्हणून त्यांना मदत करण्यास ते उत्सुक असतात.

कळपावर धनीपण गाजवू नका, तर कळपाला कित्ते व्हा

१७, १८. (क) येशूने नम्रतेविषयी जो धडा शिकवला होता तो समजणे काही वेळा प्रेषितांना कठीण का गेले? (ख) आज आपणही अशाच स्थितीत कसे येऊ शकतो?

१७ आपण आतापर्यंत चर्चा केल्याप्रमाणे, ख्रिस्ती वडिलांनी हे लक्षात ठेवले पाहिजे, की ते स्वतःच्या नव्हे, तर देवाच्या कळपाचे पालन करतात. त्यांच्या ‘हाती सोपविलेल्या लोकांवर ते धनीपण करत नाहीत’ याची ते काळजी घेतात. (१ पेत्र ५:३ वाचा.) काही वेळा, येशूच्या प्रेषितांनी चुकीच्या हेतूने मोठे पद मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यांनादेखील आपल्या सभोवतालच्या राष्ट्रांवर शासन करणाऱ्‍यांप्रमाणेच अधिकारपद हवे होते.मार्क १०:४२-४५ वाचा.

१८ आज, ‘अध्यक्षाचे [“पर्यवेक्षकाचे,” NW] काम करू पाहणाऱ्‍या’ बांधवांनी आपण पर्यवेक्षकाचे काम का करू इच्छितो याविषयी आत्मपरीक्षण केले पाहिजे. (१ तीम. ३:१) जे बांधव सध्या मंडळीत वडील म्हणून सेवा करत आहेत ते स्वतःला असा प्रामाणिक प्रश्‍न विचारू शकतात की येशूच्या काही प्रेषितांप्रमाणे आपल्यामध्येसुद्धा अधिकारपद किंवा प्रतिष्ठा मिळवण्याची इच्छा आहे का? प्रेषितांसाठी ही एक समस्या होती. तेव्हा, इतरांवर अधिकार गाजवण्याची जगाची वृत्ती टाळण्यासाठी आपणही प्रयत्न करणे गरजेचे आहे हे वडिलांनी जाणले पाहिजे.

१९. कळपाचे रक्षण करण्यासाठी पाऊल उचलताना ख्रिस्ती वडिलांनी कोणती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे?

१९ हे मान्य आहे, की काही वेळा वडिलांना खंबीर भूमिका घेण्याची गरज आहे, जसे की ‘क्रूर लांडग्यांपासून’ कळपाचे रक्षण करावे लागते तेव्हा. (प्रे. कृत्ये २०:२८-३०) पौलाने तीताला म्हटले की “बोध कर आणि अधिकारपूर्वक दोष पदरी घाल.” (तीत २:१५) पण, एखाद्या बंधू किंवा भगिनीविरुद्ध असे एखादे पाऊल उचलतानासुद्धा ख्रिस्ती वडील त्यांच्याशी आदराने वागण्याचा प्रयत्न करतात. ते याची जाणीव बाळगतात, की एखाद्याची कठोरपणे टीका करण्याऐवजी त्याच्या अंतःकरणापर्यंत पोहचण्यासाठी आणि उचित मार्ग अनुसरण्यास त्याला प्रवृत्त करण्यासाठी सौम्यतेने त्याचे मन वळवणे सहसा अधिक परिणामकारक ठरते.

२०. उत्तम उदाहरण मांडण्याच्या बाबतीत ख्रिस्ती वडील येशूचे अनुकरण कसे करू शकतात?

२० ख्रिस्ताचे उत्तम उदाहरण वडिलांना कळपावर प्रेम करण्याची प्रेरणा देते. (योहा. १३:१२-१५) येशूने आपल्या शिष्यांना प्रचाराचे व शिष्य बनवण्याचे कार्य कशा प्रकारे शिकवले याविषयी वाचून आपल्याला किती आनंद होतो! नम्रतेच्या बाबतीत त्याने घालून दिलेला नमुना त्याच्या शिष्यांच्या अंतःकरणाला भिडून गेला आणि त्यांना ‘लीनतेने एकमेकांना आपणापेक्षा श्रेष्ठ मानणारा’ जीवनक्रम अनुसरण्याची प्रेरणा मिळाली. (फिलिप्पै. २:३) त्याचप्रमाणे आज ख्रिस्ती वडीलसुद्धा येशूच्या उदाहरणाचे अनुकरण करण्यास प्रवृत्त होतात आणि “कळपाला कित्ते” होण्याची इच्छा बाळगतात.

२१. ख्रिस्ती वडील कोणते प्रतिफळ मिळण्याची आशा बाळगू शकतात?

२१ पेत्राने वडिलांना बोध केला त्याच्या शेवटी त्याने भविष्याबद्दलच्या एका अभिवचनाचा उल्लेख केला. (१ पेत्र ५:४ वाचा.) जे अभिषिक्‍त पर्यवेक्षक आहेत त्यांना स्वर्गात ख्रिस्तासोबत “गौरवाचा न कोमेजणारा हार [“मुकुट,” NW] प्राप्त होईल.” (१ पेत्र ५:४) ‘दुसऱ्‍या मेंढरांपैकी’ असलेल्या मेंढपाळांना ‘मुख्य मेंढपाळाच्या’ शासनाधीन पृथ्वीवरील देवाच्या कळपाचे पालन करण्याचा विशेषाधिकार प्राप्त होईल. (योहा. १०:१६) मंडळीचे नेतृत्व करणाऱ्‍या बांधवांना मंडळीचे सदस्य कोणकोणत्या मार्गांनी सहकार्य करू शकतात याची चर्चा पुढील लेखात केली जाईल.

उजळणी

• पेत्राला आपल्या सहवडिलांच्या देखरेखीखाली असलेल्या देवाच्या कळपाचे पालन करण्याचा बोध करणे का उचित वाटले?

• वडिलांनी आध्यात्मिक रीत्या आजारी असलेल्यांची देखरेख कशी केली पाहिजे?

• कोणती गोष्ट ख्रिस्ती वडिलांना देवाच्या कळपाचे पालन करण्यास प्रवृत्त करते?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२१ पानांवरील चित्र]

प्राचीन काळातील मेंढपाळांप्रमाणेच आज ख्रिस्ती वडिलांनीसुद्धा त्यांच्या देखरेखीखाली असलेल्या ‘मेंढरांचे’ रक्षण केले पाहिजे