व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्ही यहोवाच्या प्रेमळ मार्गदर्शनावर चालणार का?

तुम्ही यहोवाच्या प्रेमळ मार्गदर्शनावर चालणार का?

तुम्ही यहोवाच्या प्रेमळ मार्गदर्शनावर चालणार का?

“प्रत्येक असत्य मार्गाचा मी द्वेष करितो.”—स्तो. ११९:१२८.

१, २. (क) इच्छित स्थळी पोहचण्यास मार्गदर्शन मिळवताना कशा प्रकारच्या ताकिदींबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्‍त कराल आणि का? (ख) यहोवा त्याच्या सेवकांना कोणत्या प्रकारच्या ताकिदी देतो आणि का?

 कल्पना करा: तुम्हाला एका इच्छित स्थळी जाण्यास प्रवास करायचा आहे. मार्गदर्शनाकरता तुम्ही तुमच्या अशा एका भरवशालायक मित्राची मदत घेता, ज्याला तो मार्ग चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. मार्गदर्शन देत असताना तो अगदी बारीकसारीक गोष्टींची माहितीही तुम्हाला देतो. उदाहरणार्थ तो कदाचित असे म्हणेल: “पुढचे वळण घेताना जरा सांभाळून, येथील सूचना फलक दिशाभूल करणारा आहे. यामुळे अनेक जण रस्ता चुकतात.” त्याने काळजीपूर्वक दिलेल्या मार्गदर्शनाप्रती तुम्ही कृतज्ञता दाखवून त्याचे पालन करणार नाही का? यहोवासुद्धा त्या भरवशालायक मित्रासारखाच आहे. तो आपल्याला अनंत जीवनाच्या इच्छित स्थळी पोहचण्यासाठी काळजीपूर्वक मार्गदर्शन देतो, पण त्याचबरोबर आपल्याला चुकीच्या मार्गाकडे नेऊ शकतील अशा वाईट प्रभावांपासून सावधगिरी बाळगण्याची ताकीदही तो देतो.—अनु. ५:३२; यश. ३०:२१.

या लेखात आणि पुढील लेखात, आपण अशा काही प्रभावांची चर्चा करणार आहोत ज्यांविषयी सावधगिरी बाळगण्याची ताकीद आपला प्रेमळ मित्र यहोवा देव आपल्याला देतो. आपल्याबद्दल काळजी वाटत असल्यामुळे व आपल्यावर प्रेम असल्यामुळे यहोवा अशी ताकीद आपल्याला देतो हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. आपण इच्छित स्थळी पोहचावे अशी त्याची इच्छा आहे. लोक वाईट प्रभावांच्या मागे लागून रस्ता चुकतात हे पाहून यहोवा खूप दुःखी होतो. (यहे. ३३:११) या लेखात आपण तीन नकारार्थी प्रभावांविषयी चर्चा करणार आहोत. यांपैकी पहिला, इतर लोकांमुळे, तर दुसरा आपल्या स्वतःमुळेच पडणारा प्रभाव आहे. आणि तिसरा अशा गोष्टींचा प्रभाव आहे ज्या मुळात वास्तविक नाहीत; पण तरीही तो खूप धोकेदायक आहे. हे प्रभाव काय आहेत आणि त्यांचा सामना करण्यास आपला स्वर्गीय पिता यहोवा कशी आपल्याला मदत करतो हे आपण जाणून घेतले पाहिजे. एका प्रेरित स्तोत्रकर्त्याने यहोवाला उद्देशून म्हटले: “प्रत्येक असत्य मार्गाचा मी द्वेष करितो.” (स्तो. ११९:१२८) तुम्हालाही असेच वाटते का? ही भावना आपण बळकट कशी करू शकतो आणि त्या प्रकारे कार्य कसे करू शकतो हे आता आपण पाहू या.

‘बहुजनसमाजाचे’ अनुकरण करू नका

३. (क) कोणत्या मार्गाने जावे याची खात्री नसल्यास इतर प्रवाशांच्या मागे जाणे धोक्याचे का आहे? (ख) निर्गम २३:२ मध्ये कोणते महत्त्वाचे तत्त्व दिसून येते?

लांब पल्ल्याचा प्रवास करत असताना कोणत्या मार्गाने जावे याची खात्री नसल्यास तुम्ही काय कराल? तुम्हाला कदाचित इतर प्रवाशांच्या मागे जाण्याचा मोह होईल. खासकरून, जेव्हा तुम्ही बऱ्‍याच जणांना एकाच मार्गाने जाताना पाहता. पण असे करणे खूप धोकेदायक ठरू शकते. कारण ते प्रवासी तुमच्या इच्छित स्थळी नाही, तर दुसऱ्‍याच ठिकाणी जात असतील. किंवा ते स्वतःच रस्ता चुकले असतील. याबाबतीत, प्राचीन इस्राएली लोकांना देण्यात आलेला एक नियम ज्या तत्त्वावर आधारित होता ते विचारात घ्या. न्यायालयीन बाबी हाताळणाऱ्‍या न्यायाधीशांना किंवा साक्षीदारांना ‘बहुजनसमाजाच्या’ अर्थात पुष्कळ लोकांच्या मागे जाण्याच्या धोक्यापासून सावध राहण्यास सांगण्यात आले होते. (निर्गम २३:२ वाचा.) अपरिपूर्ण मानव सहजपणे साथीदारांच्या दबावाला बळी पडून चुकीचा न्याय करू शकतात. पण, पुष्कळ लोकांच्या मागे न जाण्याविषयीचे हे तत्त्व फक्‍त न्यायालयीन बाबींपुरतेच मर्यादित आहे का? मुळीच नाही.

४, ५. यहोशवा आणि कालेब यांच्यावर लोकांचा दबाव कसा आला, आणि ते कशामुळे या दबावाचा प्रतिकार करू शकले?

खरे पाहता, पुष्कळ लोकांच्या मागे जाण्याचा दबाव आपल्यावर कधीही येऊ शकतो. असा दबाव अचानकपणे येऊ शकतो आणि त्याचा प्रतिकार करणे आपल्याला खूप कठीण जाऊ शकते. उदाहरणार्थ, यहोशवा आणि कालेब यांना एकदा साथीदारांच्या दबावाचा कशा प्रकारे सामना करावा लागला त्याचा विचार करा. ते प्रतिज्ञात देशाची पाहणी करायला गेलेल्या १२ हेरांपैकी होते. परत आल्यावर त्यांपैकी १० जणांनी खूपच नकारार्थी आणि निराशाजनक माहिती दिली. त्यांनी असाही दावा केला की त्या देशातील काही लोक अतिशय धिप्पाड व महाकाय असून विद्रोही देवदूत व मानवकन्या यांची संतती असलेल्या नेफिलीमांचे वंशज आहेत. (उत्प. ६:४) पण हा दावा अगदी निरर्थक होता. कारण, त्या नेफिलीमांचा शेकडो वर्षांपूर्वी जलप्रलयात नाश झाला होता, आणि त्यांच्यापैकी एकही जण उरला नव्हता. पण जे विश्‍वासात दृढ नसतात अशांवर अगदी निरर्थक दाव्यांचाही गहिरा परिणाम होऊ शकतो. दहा हेरांच्या नकारात्मक माहितीमुळे लोकांमध्ये घबराट पसरली. थोड्याच वेळात बहुतेक जणांची खात्री पटली की यहोवाच्या आज्ञेनुसार प्रतिज्ञात देशात प्रवेश करणे, चुकीचे ठरेल. अशा तणावपूर्ण परिस्थितीत यहोशवा आणि कालेब यांनी काय केले?—गण. १३:२५-३३.

यहोशवा आणि कालेब पुष्कळ जणांच्या मागे गेले नाहीत. लोकांना आवडले नाही तरी त्यांनी सत्य सांगितले. लोकांनी त्यांना दगडमार करून ठार मारण्याची धमकी दिली तरीही ते ठाम राहिले. यहोशवा आणि कालेब यांना इतके धैर्य कोठून मिळाले? अर्थात, त्यांच्या विश्‍वासामुळे. ज्यांचा विश्‍वास दृढ असतो ते मनुष्यांचे निराधार दावे आणि यहोवा देवाची कधीही व्यर्थ न ठरणारी वचने यांतील फरक स्पष्टपणे पाहू शकतात. यहोशवा व कालेब या दोघांनीही नंतर, यहोवा आपली सर्व वचने पूर्ण करणारा देव आहे अशी साक्ष दिली. (यहोशवा १४:६, ८; २३:२, १४ वाचा.) त्या दोघांचा आपल्या विश्‍वासू देवाबरोबर जवळचा नातेसंबंध होता. अविश्‍वासी लोकांच्या मागे जाऊन देवाला दुखवण्याचा ते विचारही करू शकत नव्हते. त्यामुळे ते अगदी स्थिर राहिले आणि त्यांनी आज आपल्यासाठी एक उत्तम उदाहरण मांडले.—गण. १४:१-१०.

६. कोणकोणत्या बाबतीत आपल्यावर लोकांच्या मागे जाण्याचा दबाव येऊ शकतो?

तुमच्यावर कधी पुष्कळ लोकांच्या मागे जाण्याचा दबाव येतो का? जे यहोवापासून दूर आहेत आणि त्याच्या नैतिक स्तरांची निंदा करतात अशा लोकांची संख्या आज फार मोठी आहे. मनोरंजनाची गोष्ट येते तेव्हा बहुतेक लोक निराधार कल्पना सुचवतात. जसे की टीव्हीवरील कार्यक्रम, चित्रपट, व्हिडिओ गेम्स यांत सर्रासपणे दिसून येणारी अनैतिकता, हिंसाचार, आणि भूतविद्या हानिकारक नाही असे कदाचित ते म्हणतील. (२ तीम. ३:१-५) जेव्हा तुम्ही तुमच्यासाठी किंवा तुमच्या कुटुंबासाठी मनोरंजनाची निवड करता, तेव्हा इतरांच्या बेजबाबदार विवेकाचा प्रभाव तुम्ही तुमच्या निर्णयांवर किंवा तुमच्या विवेकावर पडू देता का? असे करणे हे पुष्कळ लोकांच्या मागे जाण्यासारखेच ठरणार नाही का?

७, ८. (क) आपण आपल्या समजशक्‍तीला कशा प्रकारे सराव देऊ शकतो, आणि हे कडक नियमांच्या यादीचे पालन करण्यापेक्षा जास्त फायदेकारक का आहे? (ख) आज तुम्हाला अनेक ख्रिस्ती तरुणांचे उदाहरण पाहून आनंद का वाटतो?

निर्णय घेण्यासाठी यहोवाने आपल्याला एक अनमोल देणगी दिली आहे. ती म्हणजे आपली ‘ज्ञानेंद्रिये’ किंवा समजशक्‍ती. पण, आपल्या समजशक्‍तीला “वहिवाटीने” म्हणजेच वारंवार उपयोग करण्याद्वारे सराव होण्याची गरज आहे. (इब्री ५:१४) लोकांचे अनुकरण केल्यास आपल्या समजशक्‍तीला सराव मिळणार नाही; तसेच, जे निर्णय विवेकबुद्धीनुसार घेतले पाहिजेत त्यांबाबतीत कडक नियमांची मोठी यादी दिल्यानेही आपल्या समजशक्‍तीला सराव मिळणार नाही. त्यामुळेच, यहोवाच्या लोकांनी कोणकोणते चित्रपट, पुस्तके व इंटरनेट साईट्‌स यांपासून दूर राहावे याची यादी देण्यात आलेली नाही. हे जग इतक्या लवकर बदलते, की अशी यादी बनवली तरीसुद्धा ती काही काळातच निरुपयोगी ठरेल. (१ करिंथ. ७:३१) शिवाय, बायबल तत्त्वांवर काळजीपूर्वक व प्रार्थनापूर्वक विचार करून स्वतः निर्णय घेण्याची महत्त्वाची जबाबदारी आपण पूर्ण करू शकणार नाही.—इफिस. ५:१०.

आपल्या बायबल आधारित निर्णयांमुळे आपली नेहमीच प्रशंसा होईल असे नाही. ख्रिस्ती तरुणांवर, त्यांच्या शाळेतील इतर सर्व मुले जे पाहतात व करतात त्याचे अनुकरण करण्याचा तीव्र दबाव येऊ शकतो. (१ पेत्र ४:४) पण, ख्रिस्ती तरुण आणि वृद्ध अनेक लोकांच्या मागे न जाता, यहोशवा आणि कालेब यांच्या विश्‍वासाचे अनुकरण करतात ही किती आनंदाची गोष्ट आहे!

“तुमचे हृदय व तुमची दृष्टी” यांच्यामागे जाऊ नका

९. (क) प्रवास करताना आपल्याच मनाच्या लहरीनुसार जाणे धोक्याचे का ठरेल? (ख) गणना १५:३७-३९ या वचनांत असलेला नियम देवाच्या प्राचीन लोकांसाठी महत्त्वाचा का होता?

ज्या दुसऱ्‍या नकारार्थी प्रभावाची चर्चा आपण करणार आहोत तो आपल्या स्वतःमुळेच पडणारा प्रभाव आहे. हे समजण्यासाठी एक उदाहरण लक्षात घेऊ या: तुम्ही तुमच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी प्रवास करत असताना, नकाशा बाजूला ठेवून तुमच्या मनाच्या लहरीनुसार वाटेल तिकडे जाल का? सुंदर देखावे दिसतील या आशेने, जी वाट दिसेल त्या वाटेने तुम्ही जाल का? अशा प्रकारे मनाच्या लहरीनुसार वागल्यास तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहचणार नाही. याबाबतीत, प्राचीन इस्राएली लोकांना देण्यात आलेल्या आणखी एका नियमाचा विचार करा. कपड्यांना झालर आणि निळी दोरी लावण्याचा जो नियम त्यांना देण्यात आला होता तो आज बऱ्‍याच जणांना समजण्यास कठीण वाटेल. (गणना १५:३७-३९ वाचा. *) हा नियम महत्त्वाचा का होता हे तुम्हाला माहीत आहे का? या नियमाचे पालन केल्यामुळे, देवाच्या लोकांना त्यांच्या आसपास असणाऱ्‍या मूर्तिपूजक राष्ट्रांपासून वेगळे राहण्यास मदत मिळाली. यहोवाची पसंती मिळवण्यासाठी व ती टिकवून ठेवण्यासाठी त्यांना असे करणे खूप गरजेचे होते. (लेवी. १८:२४, २५) पण, हा नियम आपल्या स्वतःमुळे पडणाऱ्‍या एका नकारार्थी प्रभावावरही प्रकाश टाकतो जो आपल्याकरता धोकेदायक ठरू शकतो आणि अनंत जीवनाच्या ध्येयापासून आपल्याला दूर नेऊ शकतो. ते कसे?

१०. यहोवा मनुष्याचा स्वभाव जाणतो हे कशावरून दिसून येते?

१० यहोवाने त्याच्या लोकांना हा नियम दिला तेव्हा त्यामागे हे कारण असल्याचे सांगितले: “तुमचे हृदय व तुमची दृष्टी, ज्यांच्यामागे जाऊन तुम्ही व्यभिचारी होत असा, त्यांच्यामागे तुम्ही जाऊ नये.” यहोवा मनुष्याचा स्वभाव अगदी चांगल्या प्रकारे जाणतो. त्याला माहीत आहे की आपण जे डोळ्यांनी पाहतो त्यामुळे आपले हृदय म्हणजेच आपल्यातील आंतरिक व्यक्‍ती सहज मोहात पडू शकते. त्यामुळे बायबल आपल्याला ताकीद देते: “हृदय सर्वात कपटी आहे; ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे, त्याचा भेद कोणास समजतो?” (यिर्म. १७:९) तर मग, यहोवाने इस्राएली लोकांना दिलेली ती ताकीद योग्यच होती असे तुम्हाला वाटत नाही का? यहोवा हे जाणून होता की इस्राएली लोकांना, त्यांच्या आसपास असणाऱ्‍या मूर्तिपूजक लोकांना पाहून त्यांच्यासारखेच दिसण्याचा व वागण्याचा मोह होईल.—नीति. १३:२०.

११. आपल्याला कशा प्रकारे आपल्या हृदयाच्या आणि दृष्टीच्या मागे जाण्याचा मोह होऊ शकतो?

११ आजच्या काळात, डोळ्यांना दिसणाऱ्‍या गोष्टींमुळे आपले हृदय मोहित होणे आणखीनच सोपे झाले आहे. आज जगात प्रत्येक गोष्टींत शारीरिक इच्छा चेतवली जाते. अशा वातावरणात जगत असताना आपण गणना १५:३९ या वचनात दिलेल्या तत्त्वाचे पालन कसे करू शकतो? विचार करा: जर तुमच्या शाळेतील, कामाच्या ठिकाणी असणारे, किंवा तुमच्या आसपास राहणारे लोक चुकीच्या भावना मनात उत्तेजित करणारा पेहराव करत असतील तर त्याचा तुमच्यावर परिणाम होऊ शकतो का? तुम्हाला तुमच्या हृदयाच्या आणि दृष्टीच्या मागे जाण्याचा मोह होऊ शकतो का? त्यांचे पाहून तुम्हाला ख्रिस्ती व्यक्‍तीला शोभेल असा पेहराव करण्याऐवजी त्यांच्याचसारखा पेहराव करण्याचा मोह होईल का?—रोम. १२:१, २.

१२, १३. (क) आपले डोळे भरकटू लागल्यास आपण काय केले पाहिजे? (ख) दुसऱ्‍यांना वाईट गोष्टी करण्याचा मोह होईल अशा प्रकारे आपण का वागू नये?

१२ आजच्या काळात आत्मसंयम बाळगण्याची नितांत गरज आहे. आपण आपल्या डोळ्यांना कधीही भरकटू देऊ नये. यासाठी आपण विश्‍वासू ईयोबाचा ठाम निश्‍चय आठवणीत ठेवला पाहिजे, ज्याने स्वतःच्या पत्नीशिवाय इतर कोणत्याही स्त्रीला कामुक नजरेने न पाहण्याचा आपल्या डोळ्यांशी करार केला होता. (ईयो. ३१:१) त्याच प्रकारे, दावीद राजाने निश्‍चय केला होता: “मी अनुचित गोष्ट आपल्या नेत्रांसमोर येऊ देणार नाही.” (स्तो. १०१:३) आपला शुद्ध विवेक ज्यांमुळे अशुद्ध होऊ शकतो आणि यहोवाशी असलेल्या आपल्या नातेसंबंधाला ज्यांमुळे तडा जाऊ शकतो अशा सर्व गोष्टी आपल्याकरता “अनुचित” आहेत. आपल्या डोळ्यांना आकर्षक वाटणाऱ्‍या आणि आपल्या हृदयाला वाईट काम करण्यास प्रवृत्त करणाऱ्‍या सर्व गोष्टींचा यांत समावेश होतो.

१३ दुसरीकडे पाहता, इतरांना वाईट कृत्य करण्याचा मोह होईल अशा प्रकारे वागून आपण कधीही त्यांच्याकरता एक “अनुचित गोष्ट” बनू इच्छित नाही. म्हणूनच, मर्यादशील व सभ्य पेहराव करण्याबाबत बायबलमधील प्रेरित सल्ल्याचे आपण मनापासून पालन करतो. (१ तीम. २:९) सभ्यतेचा आपण आपल्या मनानुसार अर्थ लावू शकत नाही. आपल्या सभोवती असणाऱ्‍या लोकांच्या विवेकाचा व भावनांचा आपण विचार केला पाहिजे. स्वतःच्या आवडीनिवडींपेक्षा आपण दुसऱ्‍यांच्या हिताचा विचार केला पाहिजे. (रोम. १५:१, २) याबाबतीत ख्रिस्ती मंडळीतील हजारो तरुण उत्तम उदाहरण मांडतात ही किती आनंदाची गोष्ट आहे! पेहरावाच्याच नव्हे तर सर्वच बाबतींत, ते आपल्या ‘हृदयाच्या आणि दृष्टीच्या’ मागे न जाता, यहोवाचे मन आनंदित करण्याचे निवडतात यामुळे आपल्याला त्यांचा खरोखर अभिमान वाटतो!

‘अवास्तविक गोष्टींच्या’ मागे जाऊ नका

१४. ‘अवास्तविक गोष्टींच्या’ मागे न जाण्याच्या बाबतीत शमुवेलाने काय ताकीद दिली?

१४ कल्पना करा की तुमच्या प्रवासात तुम्ही एका मोठ्या वाळवंटातून जात आहात. अचानक तुम्हाला पाणी दिसल्याचा भास होतो. पण वास्तविक तेथे काहीच नसते! जर तुम्ही रस्ता सोडून, त्या पाण्यामागे गेला तर काय होण्याची शक्यता आहे? त्या वाळवंटात तुम्ही रस्ता चुकून जीवही गमावू शकता. अवास्तविक गोष्टींवर भरवसा ठेवणे किती धोकेदायक आहे हे यहोवा जाणतो. एकदा त्याला इस्राएली लोकांना या धोक्याविषयी ताकीद द्यावी लागली. आसपासच्या सर्व राष्ट्रांमध्ये मानवी राजे असल्यामुळे इस्राएली लोकांनीही राजाची मागणी केली. अशी मागणी करण्याद्वारे त्यांनी एक गंभीर पाप केले, कारण यहोवा आपला राजा असल्याचे त्यांनी नाकारले. यहोवाने त्यांची मागणी तर मान्य केली, पण त्याने शमुवेल संदेष्ट्याद्वारे त्यांना ‘अवास्तविक गोष्टींच्या’ मागे न जाण्याची स्पष्ट ताकीद दिली.१ शमुवेल १२:२१ वाचा. *

१५. इस्राएली लोक कशा प्रकारे अवास्तविक गोष्टींच्या मागे लागले?

१५ मानवी राजा यहोवापेक्षा जास्त खरा व भरवशालायक असेल असा त्या लोकांनी विचार केला असावा का? असे असल्यास ते एका ‘अवास्तविक गोष्टीच्या’ मागे जात होते! आणि यामुळे सैतानापासून असणाऱ्‍या इतर अनेक ‘अवास्तविक गोष्टींच्या’ मागे लागण्याचा त्यांना धोका होता. मानवी राजे त्यांना सहजपणे मूर्तींची पूजा करायला लावू शकत होते. मूर्तिपूजक असा चुकीचा विचार करतात की, लाकूड किंवा दगडांपासून बनवलेल्या मूर्ती, सर्व काही निर्माण करणाऱ्‍या अदृश्‍य यहोवा देवापेक्षा जास्त खऱ्‍या व भरवशालायक आहेत. पण प्रेषित पौलाने सांगितल्याप्रमाणे मूर्ती ही “काहीच नाही.” (१ करिंथ. ८:४, पं.र.भा.) मूर्ती पाहू शकत नाहीत, बोलू शकत नाहीत किंवा काहीही करू शकत नाहीत. आपण त्यांना पाहू शकतो व स्पर्श करू शकतो हे खरे आहे, पण त्यांची उपासना केल्यास आपण एका अवास्तविक गोष्टीच्या मागे जात असू ज्यामुळे आपल्यावर संकट ओढवेल.—स्तो. ११५:४-८.

१६. (क) आज सैतान कशा प्रकारे अनेक लोकांना अवास्तविक गोष्टींच्या मागे जाण्यास प्रवृत्त करतो? (ख) खासकरून यहोवाच्या तुलनेत, भौतिक गोष्टी अवास्तविक आहेत असे आपण का म्हणू शकतो?

१६ सैतान आजही लोकांना अवास्तविक गोष्टींच्या मागे जाण्यास प्रवृत्त करण्यात पटाईत आहे. उदाहरणार्थ, तो असंख्य लोकांना असा विचार करायला लावतो की पैसा, महागड्या वस्तू, चांगल्या पगाराची नोकरी यांसारख्या गोष्टी आपल्याला जीवनात सुरक्षा देऊ शकतात. पण जेव्हा आजारपण, आर्थिक अस्थिरता किंवा नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा भौतिक गोष्टी साहाय्य करू शकतात का? आपल्या जीवनाला काही अर्थ नाही असे लोकांना वाटते तेव्हा या गोष्टी कितपत मदत करू शकतात? त्या जीवनाबद्दलच्या महत्त्वपूर्ण प्रश्‍नांची उत्तरे देऊ शकतात का? मृत्यू अगदी आपल्या डोळ्यांसमोर असतो तेव्हा या गोष्टी काही मदत देऊ शकतात का? जर आपण आपली आध्यात्मिक गरज भागवण्यासाठी भौतिक गोष्टींकडे वळलो, तर आपल्या हाती निराशाच लागेल. भौतिक गोष्टी आपल्याला जीवनात आनंद देऊ शकत नाहीत आणि आजारपण व मृत्यूपासूनही आपला बचाव करू शकत नाहीत. (नीति. २३:४, ५) त्याउलट, आपला देव यहोवा हा किती खरा आहे! त्याच्याबरोबर असणाऱ्‍या अतूट नातेसंबंधामुळेच केवळ, आपल्याला खरी सुरक्षा मिळू शकते. आपल्यासाठी हा किती मौल्यवान आशीर्वाद आहे! अवास्तविक गोष्टींच्या मागे लागून आपण कधीही यहोवाला त्यागू नये.

१७. आपण चर्चा केलेल्या नकारार्थी प्रभावांबद्दल तुम्ही काय निर्धार केला आहे?

१७ यहोवा आपला मित्र व जीवनाच्या प्रवासात आपले मार्गदर्शन करणारा आहे हा आपल्यासाठी एक आशीर्वादच नाही का? आपण पुष्कळ लोकांच्या, आपल्या हृदयाच्या, आणि अवास्तविक गोष्टींच्या वाईट प्रभावांपासून सावध राहण्याविषयी यहोवाच्या प्रेमळ ताकिदींचे पालन करत राहिल्यास, अनंत जीवनाच्या आपल्या ध्येयापर्यंत आपण पोहचू. पुढील लेखात, यहोवा देत असलेल्या आणखी तीन ताकिदींची आपण चर्चा करणार आहोत, ज्या चुकीच्या मार्गांचा द्वेष करण्यास व ते नाकारण्यास आपली मदत करतात.—स्तो. ११९:१२८.

[तळटीपा]

^ गणना १५:३७-३९ (पंडिता रमाबाई भाषांतर): “३७ आणि यहोवा मोशेशी बोलला, तो म्हणाला, ३८ इस्राएलाच्या संतानांशी बोल आणि त्यांना सांग की त्यांनी आपल्या पिढ्यानपिढ्या आपणांसाठी आपल्या वस्त्रांच्या काठांस झालरी कराव्या, आणि त्यांनी प्रत्येक काठाच्या झालरीस निळी दोरी लावावी. ३९ आणि ती तुम्हांस झालर अशी व्हावी, यासाठी की तुम्ही ती पाहून यहोवाच्या सर्व आज्ञा आठवाव्या आणि त्या आचराव्या, आणि तुमचे हृदय व तुमची दृष्टी, ज्यांच्यामागे जाऊन तुम्ही व्यभिचारी होत असा, त्यांच्यामागे तुम्ही जाऊ नये.”

^ १ शमुवेल १२:२१ (NW): “ज्या अवास्तविक गोष्टींपासून तुम्हाला काही लाभ होणार नाही व तुमचा उद्धार होणार नाही त्यांच्या मागे लागू नका कारण त्या अवास्तविक आहेत.”

तुम्हाला काय वाटते?

पुढील वचनांत दिलेल्या तत्त्वांना तुम्ही आपल्या जीवनात कसे लागू करू शकता?

निर्गम २३:२

गणना १५:३७-३९

१ शमुवेल १२:२१

स्तोत्र ११९:१२८

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[११ पानांवरील चित्र]

पुष्कळ लोकांच्या मागे जाण्याचा तुम्हाला कधी मोह होतो का?

[१३ पानांवरील चित्र]

मनाच्या लहरीनुसार वागणे का धोकेदायक आहे?

[१४ पानांवरील चित्र]

तुम्ही अवास्तविक गोष्टींच्या मागे जात आहात का?