व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाचा विसावा काय आहे?

देवाचा विसावा काय आहे?

देवाचा विसावा काय आहे?

“देवाच्या लोकांसाठी शब्बाथाचा विसावा राहिला आहे.”—इब्री ४:९.

१, २. उत्पत्ति २:१-३ मधून आपण सातव्या दिवसाविषयी कोणता निष्कर्ष काढू शकतो आणि कोणते प्रश्‍न उपस्थित होतात?

 उत्पत्ति पुस्तकाच्या पहिल्या अध्यायातून आपण हे शिकतो, की देवाने सहा दिवसांदरम्यान पृथ्वी मानवांकरता राहण्याजोगी बनवली. हे सहा दिवस प्रत्येकी २४ तासांचे नव्हे, तर दीर्घ कालावधींचे होते. या प्रत्येक दिवसाच्या शेवटी, “संध्याकाळ झाली व सकाळ झाली” असे बायबल म्हणते. (उत्प. १:५, ८, १३, १९, २३, ३१) पण, सातव्या दिवसाविषयी अर्थात देवाच्या विसाव्याच्या दिवसाविषयी असे काहीच म्हटल्याचे उत्पत्ति २:१-३ मध्ये आढळत नाही.

यावरून हे सूचित होते, की सातवा दिवस अर्थात देवाच्या विसाव्याचा दिवस अद्यापही चालूच होता. देवाच्या विसाव्याचा हा दिवस अजूनही चालू आहे का? असल्यास, आज आपण त्यात प्रवेश मिळवू शकतो का? या प्रश्‍नांची उत्तरे मिळवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

यहोवा अजूनही विसावा घेत आहे का?

३. येशूच्या काळातसुद्धा सातवा दिवस चालू होता हे योहान ५:१६, १७ मधील येशूच्या शब्दांवरून कसे दिसते?

येशूच्या व सुरुवातीच्या ख्रिश्‍चनांच्या काळातसुद्धा सातवा दिवस चालूच होता असे म्हणण्यामागे दोन कारणे आहेत. पहिले कारण काय आहे ते येशूने आपल्या शत्रूंना जे म्हटले त्यावरून समजते. येशूने शब्बाथाच्या दिवशी लोकांचे रोग बरे केले याचा त्याच्या शत्रूंना खूप राग आला होता. शब्बाथाचा दिवस हा सर्व कामांपासून विसावा घेण्याचा दिवस असावा असे मोशेच्या नियमशास्त्रात सांगण्यात आले होते. त्यामुळे, शब्बाथाच्या दिवशी रोग बरे करणे चुकीचे आहे असे त्यांचे मत होते. त्यांना उत्तर देण्यासाठी येशूने म्हटले: “माझा पिता आजपर्यंत काम करीत आहे आणि मीहि काम करीत आहे.” (योहा. ५:१६, १७) त्याच्या म्हणण्याचा काय अर्थ होता? त्याच्या म्हणण्याचा अर्थ होता, की “मी व माझा पिता एकाच प्रकारचे काम करत आहोत. माझ्या पित्याने हजारो वर्षांच्या शब्बाथादरम्यान काम केले आहे, व तो अजूनही काम करत आहे; तेव्हा मीसुद्धा शब्बाथाच्या दिवशी काम करू शकतो.” येशूच्या शब्दांवरून दिसून येते, की सातवा दिवस म्हणजे पृथ्वीवरील निर्मितीकार्यांपासून विसावा घेण्याचा देवाचा दिवस येशूच्या काळातसुद्धा चालू होता. पण, मानव व पृथ्वी यांसंबंधी असलेला आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी देव अजूनही काम करत होता. *

४. पौलाने जे म्हटले त्यावरून आपण कसे म्हणू शकतो, की सुरुवातीच्या ख्रिश्‍चनांच्या काळातसुद्धा सातवा दिवस चालू होता?

येशूच्या व सुरुवातीच्या ख्रिश्‍चनांच्या काळातही सातवा दिवस चालू होता असे आपण का म्हणू शकतो याचे आणखी एक कारण आहे. प्रेषित पौलाने, इब्री लोकांस लिहिलेल्या आपल्या पत्रात देवाच्या विसाव्याविषयी लिहिले. त्या पत्राच्या चौथ्या अध्यायात, उत्पत्ति २:२ मधील शब्दांचा पुन्हा उल्लेख करण्याआधी पौलाने असे लिहिले: “ज्या ‘विसाव्याविषयी,’ त्याने सांगितलेले आहे त्यात, ज्या आपण विश्‍वास ठेविला आहे ते आपण प्रवेश करीत आहो.” (इब्री ४:३, ४, ६, ९) यावरून दिसून येते, की पौलाच्या काळातसुद्धा सातवा दिवस चालू होता. हा सातवा दिवस केव्हा संपतो?

५. यहोवाने सातव्या दिवशी काय करण्याचे ठरवले होते? तो आपला उद्देश केव्हा पूर्ण करेल?

सातवा दिवस केव्हा संपतो याचे उत्तर पाहण्यासाठी आपण हे लक्षात ठेवले पाहिजे, की यहोवाने एका खास गोष्टीसाठी सातवा दिवस निवडला होता? उत्पत्ति २:३ म्हणते: “देवाने सातवा दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला.” यहोवाने हा दिवस पवित्र केला कारण पृथ्वीसंबंधी असलेला आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी त्याने हा दिवस निवडला होता. आज्ञाधारक स्त्री-पुरुषांनी पृथ्वीवर जीवन जगावे आणि पृथ्वीची व पृथ्वीवरील सर्व गोष्टींची देखभाल करावी असा देवाचा उद्देश आहे. (उत्प. १:२८) पृथ्वीसंबंधी असलेला देवाचा हा उद्देश पूर्ण व्हावा म्हणूनच यहोवा देव व “शब्बाथाचा धनी” असलेला येशू ख्रिस्त ‘आजपर्यंत काम करत आहेत.’ (मत्त. १२:८) तेव्हा, विसावा घेण्याचा देवाचा दिवस त्याचा उद्देश पूर्ण होईपर्यंत चालू राहील. देवाचा हा उद्देश ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या राजवटीच्या शेवटी पूर्ण होईल.

‘अवज्ञेच्या उदाहरणाप्रमाणे पतित होऊ’ नका

६. आपल्यासमोर कोणती इशारेवजा उदाहरणे आहेत? या उदाहरणांवरून आपण कोणता धडा शिकू शकतो?

पृथ्वीसंबंधी आपला उद्देश काय आहे हे देवाने आदाम व हव्वेला अगदी स्पष्टपणे सांगितले होते, पण ते त्या उद्देशाच्या विरोधात वागले. आदाम व हव्वा यांच्यानंतर इतर कोट्यवधी लोकदेखील अवज्ञाकारी बनले आहेत. देवाच्या लोकांनी अर्थात इस्राएल लोकांनीदेखील वारंवार त्याच्या आज्ञांचे उल्लंघन केले. आणि पौलाने त्याच्या काळातील ख्रिश्‍चनांना इशारा दिला, की इस्राएल लोकांप्रमाणे त्यांच्यापैकी काही जण अवज्ञाकारी बनतील. त्याने लिहिले: “म्हणून त्या ‘विसाव्यात येण्याचा’ आपण होईल तितका प्रयत्न करावा. ह्‍यासाठी की, त्यांच्या अवज्ञेच्या उदाहरणाप्रमाणे कोणी पतित होऊ नये.” (इब्री ४:११) पौलाने जे म्हटले त्यावरून दिसून येते, की अवज्ञाकारी लोक देवाच्या विसाव्यात प्रवेश करू शकत नाहीत. याचा आपल्यासाठी काय अर्थ होतो? आपण एखाद्या मार्गाने देवाच्या उद्देशाच्या विरोधात वागलो, तर आपण देवाच्या विसाव्यात प्रवेश करू शकणार नाही असा याचा अर्थ होतो का? या प्रश्‍नाचे उत्तर जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, आणि याच विषयावर या लेखात आपण अधिक चर्चा करणार आहोत. पण, प्रथम आपण इस्राएल लोकांच्या वाईट उदाहरणाची व त्यांनी देवाच्या विसाव्यात प्रवेश का केला नाही याची चर्चा करू या.

“हे माझ्या विसाव्यात निश्‍चित येणार नाहीत”

७. देवाने इजिप्तमधून इस्राएल लोकांची सुटका केली तेव्हा त्यांच्यासंबंधी त्याचा काय उद्देश होता? इस्राएल लोकांनी काय करणे गरजेचे होते?

इ.स.पू. १५१३ मध्ये यहोवाने आपला सेवक मोशे याला इस्राएल लोकांसंबंधी असलेल्या आपल्या उद्देशाविषयी सांगितले. देवाने म्हटले: “त्यांस मिसऱ्‍यांच्या हातातून सोडवावे, आणि त्या देशातून चांगल्या व मोठ्या देशात, दुधामधाचे प्रवाह जेथे वाहत आहेत अशा देशात, म्हणजे कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबूसी यांच्या देशात त्यांस घेऊन जावे म्हणून मी उतरलो आहे.” (निर्ग. ३:८) यहोवाने अब्राहामाला अभिवचन दिले होते त्यानुसार त्याने इजिप्तमधून इस्राएल लोकांची सुटका केली. (उत्प. २२:१७) इस्राएल लोकांना देवासोबत शांतीचे संबंध राखण्यास व त्याच्याशी मैत्री करण्यास मदत करू शकतील असे नियम देवाने त्यांना दिले. (यश. ४८:१७, १८) त्याने त्यांना म्हटले: “तुम्ही खरोखर माझी वाणी ऐकाल आणि माझा करार पाळाल तर सर्व लोकांपेक्षा माझा खास निधि व्हाल, कारण सर्व पृथ्वी माझी आहे.” (निर्ग. १९:५, ६) होय, इस्राएल लोकांनी देवाचे नियम पाळले तरच ते त्याचे लोक होऊ शकत होते.

८. इस्राएल लोकांनी देवाच्या आज्ञा पाळल्या असत्या, तर त्यांना कोणत्या सुसंधी मिळाल्या असत्या?

इस्राएल लोकांसमोर कोणकोणत्या सुसंधी होत्या त्याचा विचार करा! यहोवाने त्यांना अभिवचन दिले, की त्यांनी त्याच्या आज्ञा पाळल्या तर तो त्यांच्या शेतांवर, त्यांच्या द्राक्षाच्या मळ्यांवर आणि त्यांच्या गुराढोरांवर आशीर्वाद देईल. त्याने त्यांच्या शत्रूंपासून त्यांचे संरक्षण करण्याचेही आश्‍वासन त्यांना दिले. (१ राजे १०:२३-२७ वाचा.) त्यांना इतर राष्ट्रांच्या वर्चस्वाखाली न येण्याची संधी होती; येशूच्या काळात रोमी लोक बहुतेक राष्ट्रांवर राज्य करत होते, अगदी तेव्हासुद्धा इस्राएल लोकांना रोमी शासनापासून मुक्‍त राहण्याची संधी होती. इस्राएल राष्ट्राने इतर राष्ट्रांसमोर एक उत्तम उदाहरण मांडावे अशी यहोवाची इच्छा होती. जे लोक त्याच्या अर्थात खऱ्‍या देवाच्या आज्ञा पाळतात त्यांना त्याच्याकडून अनेक आशीर्वाद लाभतील हे सर्वांनी स्पष्टपणे समजून घ्यावे अशी त्याची इच्छा होती.

९, १०. (क) इजिप्तला परतण्याची इच्छा बाळगणे हे इस्राएल लोकांसाठी चुकीचे का होते? (ख) इस्राएल लोक इजिप्तला परतले असते, तर त्यांना यहोवाच्या इच्छेप्रमाणे त्याची उपासना करता आली असती का?

यहोवाचा उद्देश पूर्ण करण्यास त्याच्याद्वारे उपयोग केले जाण्याची एक खास संधी इस्राएल लोकांना होती. त्यामुळे त्यांना व पृथ्वीवरील सर्व कुटुंबांना यहोवाचे आशीर्वाद मिळणार होते. (उत्प. २२:१८) पण, देवाचे राष्ट्र बनण्याच्या व इतर राष्ट्रांसमोर एक उत्तम उदाहरण मांडण्याच्या सुसंधीला बहुतेक इस्राएल लोकांनी महत्त्व दिले नाही. त्यांनी इजिप्तला परतण्याची इच्छाही व्यक्‍त केली! (गणना १४:२-४ वाचा.) पण, ते जर इजिप्तला परतले असते, तर यहोवाच्या इच्छेप्रमाणे ते त्याची उपासना करू शकले नसते व इतर राष्ट्रांसाठी आदर्शसुद्धा बनू शकले नसते. ते जर इजिप्तमध्ये पुन्हा गुलाम बनले असते, तर त्यांना देवाचे नियमशास्त्र पाळण्याची मोकळीक मिळाली नसती व त्यांच्या पापांची क्षमाही झाली नसती. त्यांनी इजिप्तला परतण्याची इच्छा व्यक्‍त केली तेव्हा ते केवळ स्वतःचाच विचार करत होते; देवाचा व त्याच्या उद्देशाचा विचार करत नव्हते. त्यामुळे यहोवाने त्यांच्याबद्दल असे म्हटले: “त्या ‘पिढीवर संतापून मी म्हणालो, हे सतत भ्रमिष्ट अंतःकरणाचे लोक आहेत, ह्‍यांनी माझे मार्ग जाणिले नाहीत; म्हणून मी रागाने शपथ वाहून म्हणालो, हे माझ्या विसाव्यात निश्‍चित येणार नाहीत.’”—इब्री ३:१०, ११; स्तो. ९५:१०, ११.

१० इजिप्तला परतण्याच्या त्यांच्या इच्छेवरून त्यांनी दाखवले, की यहोवाकडून मिळालेल्या आशीर्वादांची त्यांना किंमत नव्हती. त्याऐवजी, त्या अवज्ञाकारी इस्राएल लोकांनी इजिप्तमध्ये मिळणाऱ्‍या चविष्ट अन्‍नाची हाव बाळगली. (गण. ११:५) ते एसावासारखे होते, ज्याने आपल्या ज्येष्ठत्वाच्या हक्काची किंमत केली नाही व केवळ एक वेळच्या अन्‍नासाठी आपला ज्येष्ठत्वाचा हक्क विकून टाकला.—उत्प. २५:३०-३२; इब्री १२:१५, १६.

११. इजिप्तमधून बाहेर पडलेल्या इस्राएल लोकांनी यहोवावर विश्‍वास असल्याचे दाखवून दिले नाही, त्यामुळे यहोवाचा उद्देश बदलला का?

११ इजिप्तमधून बाहेर पडलेल्या त्या इस्राएल लोकांनी यहोवावर विश्‍वास असल्याचे दाखवून दिले नाही, तरीसुद्धा यहोवाने इस्राएलसंबंधी असलेला आपला उद्देश बदलला नाही. त्यांच्यापेक्षा त्यांची मुले अधिक आज्ञाधारक होती. त्यांनी, प्रतिज्ञात देशात प्रवेश करून तो हस्तगत करण्याच्या यहोवाच्या आज्ञेचे पालन केले. यहोशवा २४:३१ म्हणते: “यहोशवाच्या हयातीत आणि त्याच्या मरणानंतर जिवंत राहिलेल्या ज्या वडील लोकांना परमेश्‍वराने इस्राएलासाठी काय कार्ये केली हे माहीत होते त्यांच्या हयातीत इस्राएल लोकांनी परमेश्‍वराची सेवा केली.”

१२. आज खरे ख्रिस्तीसुद्धा देवाच्या विसाव्यात प्रवेश करू शकतात असे आपण का म्हणू शकतो?

१२ पण, कालांतराने हे आज्ञाधारक इस्राएल लोक वृद्ध होऊन मरण पावले. त्यांच्यानंतर हयात असलेल्या इस्राएल लोकांना “परमेश्‍वराची आणि त्याने इस्राएलासाठी केलेल्या कार्यांची ओळख राहिली नव्हती.” त्यामुळे ते ‘परमेश्‍वराच्या दृष्टीने वाईट ते करू लागले,’ व खोट्या दैवतांची उपासना करू लागले. (शास्ते २:१०, ११) हे इस्राएली अवज्ञाकारी असल्यामुळे देवासोबत आता त्यांचे शांतीचे संबंध राहिले नाहीत. त्यामुळे, प्रतिज्ञात देश त्यांच्यासाठी ‘विसाव्याचे’ स्थान नव्हते. या इस्राएल लोकांबद्दल पौलाने लिहिले: “यहोशवाने त्यांना विसावा दिला असता तर त्यानंतर तो (देव) दुसऱ्‍या दिवसाविषयी बोलला नसता.” पुढे त्याने म्हटले: “म्हणून देवाच्या लोकांसाठी शब्बाथाचा विसावा राहिला आहे.” (इब्री ४:८, ९) ‘देवाचे लोक’ असे जे पौलाने म्हटले ते ख्रिश्‍चनांविषयी म्हटले होते. यात, ख्रिस्ती बनण्याआधी ज्यांनी मोशेच्या नियमशास्त्राचे पालन केले होते त्यांचा व ज्यांनी मोशेच्या नियमशास्त्राचे केव्हाही पालन केले नव्हते त्यांचा समावेश होता. पौलाने जे म्हटले त्याचा अर्थ, आज खरे ख्रिस्तीसुद्धा देवाच्या विसाव्यात प्रवेश करू शकतात असा होतो.

काही ख्रिश्‍चनांनी देवाच्या विसाव्यात प्रवेश केला नाही

१३, १४. (क) मोशेच्या काळात, देवाच्या विसाव्यात प्रवेश करण्यासाठी इस्राएल लोकांना काय करायचे होते? (ख) पौलाच्या काळात, देवाच्या विसाव्यात प्रवेश करण्यासाठी ख्रिश्‍चनांना काय करायचे होते?

१३ पौलाने इब्री ख्रिश्‍चनांना लिहिले कारण त्यांच्यापैकी काही जण देवाच्या उद्देशाच्या विरुद्ध वागत होते. (इब्री लोकांस ४:१ वाचा.) ते काय करत होते? ते अजूनही, मोशेच्या नियमशास्त्रात सांगितलेल्या काही गोष्टी पाळत होते. हे खरे आहे, की सुमारे १,५०० वर्षांपर्यंत, देवाच्या लोकांना मोशेच्या नियमशास्त्राचे पालन करायचे होते. पण, येशूच्या मृत्यूनंतर त्यांना मोशेच्या नियमशास्त्राचे पालन करण्याची गरज नव्हती. ही गोष्ट, काही ख्रिश्‍चनांना समजली नव्हती आणि त्यामुळे आपण अजूनही नियमशास्त्रातील काही गोष्टींचे पालन करणे जरुरीचे आहे असा त्यांचा विश्‍वास होता. *

१४ या इब्री ख्रिश्‍चनांना पौलाने सांगितले, की कोणत्याही अपरिपूर्ण महायाजकापेक्षा येशू एक उत्तम महायाजक होता. त्याने दाखवले, की इस्राएल राष्ट्रासोबत केलेल्या करारापेक्षा नवा करार उत्तम होता. त्याने हेसुद्धा दाखवले, की यहोवाचे श्रेष्ठ मंदिर, ‘हातांनी केलेल्या’ मंदिरापेक्षा “अधिक श्रेष्ठ व पूर्ण” होते. (इब्री ७:२६-२८; ८:७-१०; ९:११, १२) खरे ख्रिस्ती, यहोवाच्या विसाव्यात कसा प्रवेश करू शकतात हे स्पष्ट करून सांगण्यासाठी पौलाने मोशेच्या नियमशास्त्रातील शब्बाथाच्या उदाहरणाचा उपयोग केला. त्याने लिहिले: “देवाच्या लोकांसाठी शब्बाथाचा विसावा राहिला आहे. कारण जो ‘कोणी त्याच्या विसाव्यात आला आहे’ त्यानेहि, जसा ‘देवाने आपल्या कृत्यांपासून विसावा घेतला’ तसा, ‘आपल्या कृत्यांपासून विसावा घेतला आहे.’” (इब्री ४:८-१०) एक व्यक्‍ती ‘आपल्या कृत्यांद्वारे’ म्हणजे मोशेच्या नियमशास्त्राचे पालन करण्याद्वारे देवाची कृपापसंती प्राप्त करू शकते असा विचार करणे इब्री ख्रिश्‍चनांनी सोडून द्यायचे होते. जे येशू ख्रिस्तावर विश्‍वास असल्याचे दाखवतात अशांवर इ.स. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या दिवसापासून, यहोवा देव आपल्या कृपापसंतीच्या दानाचा मोठ्या औदार्याने वर्षाव करतो.

१५. यहोवाच्या विसाव्यात प्रवेश करण्यासाठी आपण त्याला आज्ञाधारक राहिले पाहिजे हे कशावरून म्हणता येईल?

१५ मोशेच्या काळातील इस्राएल लोकांनी प्रतिज्ञात देशात प्रवेश का केला नाही? कारण ते देवाला आज्ञाधारक राहिले नाहीत. पौलाच्या काळातील काही ख्रिश्‍चनांनी देवाच्या विसाव्यात प्रवेश का केला नाही? त्याच कारणासाठी. तेसुद्धा यहोवाला आज्ञाधारक राहिले नाहीत. आपल्या लोकांनी आता एका वेगळ्या मार्गाने आपली उपासना करावी व मोशेच्या नियमशास्त्राचे पालन करण्याचे सोडून द्यावे अशी अपेक्षा यहोवा आपल्याकडून करतो हे त्यांनी मानले नाही.

आपण देवाच्या विसाव्यात कसा प्रवेश करू शकतो?

१६, १७. (क) आज खरे ख्रिस्ती देवाच्या विसाव्यात कसा प्रवेश करू शकतात? (ख) पुढच्या लेखात कशाची चर्चा केली जाईल?

१६ तारण प्राप्त करण्यासाठी ख्रिश्‍चनांनी मोशेच्या नियमशास्त्राचे पालन केले पाहिजे असे आज आपल्यापैकी कोणीच मानत नाही. पौलाने इफिसकरांस लिहिलेले शब्द अगदी सुस्पष्ट आहेत. त्याने म्हटले: “कृपेनेच विश्‍वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे, कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही.” (इफिस. २:८, ९) तर मग, आज खरे ख्रिस्ती देवाच्या विसाव्यात कसा प्रवेश करू शकतात, म्हणजे त्याच्या विसाव्यात ते कसे सहभागी होऊ शकतात? हे आठवणीत आणा, की यहोवाने पृथ्वी व आज्ञाधारक मानव यांसंबंधी असलेला आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी सातवा दिवस अर्थात आपल्या विसाव्याचा दिवस निवडला. त्याच्या या उद्देशाबद्दल व तो आपल्याकडून काय अपेक्षितो याबद्दल तो आपल्याला त्याच्या संघटनेद्वारे कळवतो. आपण यहोवाला आज्ञाधारक राहिलो व त्याच्या संघटनेसोबत कार्य करत राहिलो, तर आपण त्याच्या विसाव्यात प्रवेश करू शकतो.

१७ पण, आपण विश्‍वासू व बुद्धिमान दासाला आज्ञाधारक राहिलो नाही किंवा आपल्याला जे महत्त्वाचे वाटते त्याचेच जर आपण पालन केले, तर आपण यहोवाच्या उद्देशाच्या विरोधात वागत असतो. आणि आपण जर यहोवाच्या उद्देशाच्या विरुद्ध वागलो, तर आपण त्याचे मित्र बनू शकत नाही. पुढच्या लेखात आपण अशा काही परिस्थितींची चर्चा करू ज्यांमुळे आपण आज्ञाधारक आहोत की नाही हे दाखवण्याची आपल्याला संधी मिळेल. या परिस्थितींत आपण जे काही निर्णय घेतो त्यांवरून आपण देवाच्या विसाव्यात प्रवेश केला आहे की नाही हे दिसून येईल.

[तळटीपा]

^ शब्बाथाच्या दिवशी याजक व लेवी मंदिरात काम करत असत आणि असे करणे मोशेच्या नियमशास्त्राविरुद्ध नव्हते. देवाने येशूला आपला महायाजक म्हणून निवडले आहे. तेव्हा, यहोवाने येशूला नेमून दिलेले काम शब्बाथाच्या दिवशी करणे चुकीचे नव्हते.—मत्त. १२:५, ६.

^ इ.स. ३३ च्या पेन्टेकॉस्टनंतरसुद्धा, काही इब्री ख्रिश्‍चन प्रायश्‍चित्ताच्या दिवशी म्हणजे पापांची क्षमा होण्याच्या दिवशी बलिदाने अर्पण करत होते की नाही हे आपल्याला माहीत नाही. पण, जर त्यांनी तसे केले असेल, तर त्यांनी येशूच्या बलिदानाबद्दल आदर नसल्याचे दाखवले. पण, काही इब्री ख्रिश्‍चन अजूनही मोशेच्या नियमशास्त्रातील परंपरांचे पालन करत होते हे मात्र आपल्याला माहीत आहे.—गलती. ४:९-११.

मनन करण्यासाठी प्रश्‍न

• यहोवाला सातव्या दिवशी काय करायचे होते?

• सातवा दिवस अजूनही चालू आहे असे आपण कशावरून म्हणू शकतो?

• मोशेच्या काळातील इस्राएल लोकांनी व पौलाच्या काळातील काही ख्रिश्‍चनांनी देवाच्या विसाव्यात प्रवेश का केला नाही?

• आज आपण देवाच्या विसाव्यात कसा प्रवेश करू शकतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२७ पानांवरील संक्षिप्त आशय]

आपण यहोवाला आज्ञाधारक राहिलो व त्याच्या संघटनेसोबत कार्य करत राहिलो, तर आपण त्याच्या विसाव्यात प्रवेश करू शकतो

[२६ पानांवरील चित्रे]

देवाच्या विसाव्यात प्रवेश करण्यासाठी आज त्याच्या लोकांनी काय करणे गरजेचे आहे?