व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मृत्यूला भिणारा मी—आता ‘विपुल जीवनाची’ वाट पाहतो

मृत्यूला भिणारा मी—आता ‘विपुल जीवनाची’ वाट पाहतो

मृत्यूला भिणारा मी—आता ‘विपुल जीवनाची’ वाट पाहतो

पियेरो गाट्टी यांच्याद्वारे कथित

घरघरण्याचा मंद आवाज हळूहळू वाढून अधिकाधिक मोठा होत गेला. त्याच्या पाठोपाठ, लोकांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याची सूचना देणारे भोंगे वाजू लागले. मग, विध्वंसकारी बॉम्बवर्षाव सुरू झाला व भयभीत लोकांच्या कानठळ्या बसाव्यात इतका महाभयंकर आवाज झाला.

अशी, १९४३/१९४४ च्या काळात, इटलीतील मिलान शहराची अवस्था झाली होती. हवाई हल्ल्यांपासून संरक्षण देणारी आश्रयस्थाने बॉम्बवर्षावांमुळे उद्‌ध्वस्त झाली होती. त्यांत सापडलेल्या लोकांची छिन्‍नविच्छिन्‍न झालेली शरीरे ओळखण्यापलीकडे होती. एक तरुण सैनिक या नात्यानं तिथं नोकरीवर असताना मला अनेकदा, मृतदेहांचे अवशेष गोळा करण्याचा हुकूम दिला गेला. आणि मी केवळ इतरांनाच आपल्या डोळ्यांसमोर मरताना पाहिलं होतं असं नाही; तर, मी स्वतःदेखील काही वेळा मरता मरता वाचलो होतो. त्या प्रसंगी मी देवाला प्रार्थना करायचो व म्हणायचो, की मी जर या नरसंहारातून वाचलो, तर मी आजीवन तुझी सेवा करीन.

मृत्यूची भीती नाहीशी होते

इटलीतील कोमो शहरापासून १० किलोमीटर दूर, स्वित्झर्लंडच्या सीमेजवळ असलेल्या एका गावात मी लहानाचा मोठा झालो होतो. अगदी कोवळ्या वयातच मला दुःखाचा व मृत्यूच्या भीतीचा सामना करावा लागला. स्पॅनिश फ्लूनं माझ्या दोन बहिणींचा बळी घेतला होता. मग, १९३० मध्ये मी अवघा सहा वर्षांचा होतो तेव्हा माझी आई लूईजा हिचा मृत्यू झाला. लहानपणापासून माझ्यावर कॅथलिक धर्माचे संस्कार करण्यात आले होते. कॅथलिक या नात्यानं त्या धर्माचे धार्मिक विधी मी पाळायचो व साप्ताहिक मासला उपस्थित राहायचो. पण, मृत्यूबद्दल असलेली माझी भीती चर्चमध्ये नव्हे, तर अनेक वर्षांनंतर एका न्हाव्याच्या दुकानात नाहीशी झाली.

सन १९४४ मध्ये, दुसऱ्‍या महायुद्धात लोकांच्या रक्‍ताचे पाट वाहत होते. त्या वेळी स्वित्झर्लंड देश युद्धात गोवलेला नव्हता. त्यामुळे इटलीचे हजारो सैनिक युद्धभूमी सोडून तिथं पळून गेले. त्यांच्यापैकी मीदेखील एक होतो. तिथं पोहचल्यानंतर आम्हाला निर्वासितांच्या वेगवेगळ्या छावण्यांमध्ये नेण्यात आलं. मला त्या देशाच्या उत्तरपूर्व भागात असलेल्या स्टायनाक गावाजवळील छावणीत पाठवण्यात आलं. तिथं आम्हाला थोडीफार मोकळीक देण्यात आली. स्टायनाकमध्ये असलेल्या न्हाव्याला काही दिवस त्याच्या दुकानात काम करण्यासाठी एका मदतनीसाची गरज होती. त्यामुळे मी एक महिना त्याच्यासोबत राहून त्याच्या दुकानात काम केलं; त्या एका महिन्यात माझी एका व्यक्‍तीशी ओळख झाली आणि माझं जीवन पार बदलून गेलं.

त्या न्हाव्याचा, अडॉल्फो टेलीनी नावाचा एक गिऱ्‍हाईक होता. तो इटलीचा रहिवासी असून स्वित्झर्लंडमध्ये राहत होता. तो एक यहोवाचा साक्षीदार होता. या समूहाविषयी मी पूर्वी कधीच ऐकलं नव्हतं. ऐकणारही कसं? त्या काळी संपूर्ण इटली देशात जेमतेम १५० साक्षीदार होते. अडॉल्फोनं मला बायबलमधील अद्‌भुत सत्यांविषयी, तसंच शांतीच्या व ‘विपुल जीवनाच्या’ अभिवचनांविषयी सांगितलं. (योहा. १०:१०; प्रकटी. २१:३, ४) युद्ध व मृत्यू नसलेल्या भवितव्याविषयी ऐकून मी भारावून गेलो. माझ्या छावणीतील जूझेप्पे ट्यूबीनी नावाच्या आणखी एका तरुण इटालियन व्यक्‍तीला मी या आशेबद्दल सांगितलं आणि तोदेखील प्रभावित झाला. अडॉल्फो व इतर साक्षीदार अधूनमधून आम्हाला भेटायला आमच्या छावणीत यायचे.

अडॉल्फोनं मला आर्बोन या ठिकाणी नेलं. आर्बोन हे स्टायनाकपासून १० किलोमीटर दूर असून तिथं इटालियन भाषेत साक्षीदारांच्या एका लहानशा गटाच्या सभा व्हायच्या. सभेत मी जे काही ऐकलं त्यामुळे मी इतका उत्साहित झालो होतो, की पुढच्या आठवडी मी पायीच तिथं गेलो. नंतर झ्यूरिकमधील अधिवेशन सभागृहात भरलेल्या साक्षीदारांच्या एका संमेलनाला मी उपस्थित राहिलो. छावण्यांतील लोकांचा संहार व मृतदेहांचे ढिगारे दाखवणारी सरकचित्रे (स्लाइड्‌स) पाहून मी सुन्‍न झालो. अनेक जर्मन साक्षीदारांना आपल्या धार्मिक विश्‍वासासाठी ठार मारण्यात आलं होतं हे मला समजलं. त्या संमेलनात मला मारीया पीट्‌साटो भेटली. साक्षीदार या नात्यानं ती करत असलेल्या कार्यांमुळे इटलीच्या फासीवादी अधिकाऱ्‍यांनी तिला ११ वर्षांचा तुरुंगवास ठोठावला होता.

युद्ध संपल्यानंतर, मी इटलीला परतलो आणि कोमोतील छोट्याशा मंडळीसोबत सहवास करू लागलो. माझ्यासोबत बायबलचा पद्धतशीर अभ्यास करण्यात आला नव्हता; पण, बायबलच्या मूलभूत सत्यांची मला स्पष्ट समज होती. मारीया पीट्‌साटोदेखील त्याच मंडळीत होती. तिनं मला बाप्तिस्मा घेण्याच्या गरजेबद्दल सांगितलं व सॉन्ड्रीओ प्रांतातील कास्टिओने आन्डेवेनो या शहरात राहणाऱ्‍या मार्चेलो मार्टीनेलीला भेटण्यास सांगितलं. मार्चेलो एक विश्‍वासू अभिषिक्‍त बंधू होते व त्यांनासुद्धा हुकूमशाही सरकारनं ११ वर्षांचा तुरुंगवास ठोठावला होता. त्यांना भेटायला जाण्यासाठी मला सायकलवरून ८० किलोमीटरचा प्रवास करावा लागला.

बाप्तिस्मा घेण्यास पात्र ठरण्यासाठी काय करणं जरुरीचं आहे हे मार्चेलोनं मला बायबलमधून स्पष्ट करून सांगितलं. त्यानंतर आम्ही प्रार्थना केली व आड्डा नदीवर गेलो जिथं माझा बाप्तिस्मा झाला. हे सप्टेंबर १९४६ मध्ये घडलं. तो दिवस माझ्यासाठी किती खास होता! यहोवाची सेवा करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल व भविष्याबद्दल एक पक्की आशा मिळाल्याबद्दल मी इतका आनंदी होतो की संध्याकाळ झाली तेव्हा, त्या दिवशी मी सायकलवरून चक्क १६० किलोमीटर प्रवास केला होता हे माझं मलाच समजलं नाही!

सन १९४७ च्या मे महिन्यात, इटलीत युद्धानंतर पहिलं संमेलन मिलानमध्ये भरवण्यात आलं होतं. या संमेलनाला सुमारे ७०० लोक उपस्थित होते. त्यात फासीवादी छळातून निभावलेले अनेक जण होते. या संमेलनात एक विलक्षण गोष्ट घडली. जूझेप्पे ट्यूबीनी, ज्याला निर्वासितांच्या छावणीत मी साक्ष दिली होती त्यानं बाप्तिस्म्याचं भाषण दिलं आणि त्यानंतर त्यानं स्वतःदेखील बाप्तिस्मा घेतला!

त्या संमेलनात मला ब्रूकलीन बेथेलमधून आलेल्या बंधू नेथन नॉर यांना भेटण्याची सुसंधी मिळाली. त्यांनी मला व जूझेप्पेला देवाची सेवा करण्यासाठी आपल्या जीवनाचा उपयोग करण्याचं प्रोत्साहन दिलं. मी ठरवून टाकलं, की मी महिनाभरात पूर्ण वेळची सेवा सुरू करीन. घरी गेल्यानंतर मी घरच्यांना माझा निर्णय सांगितला तेव्हा त्या सगळ्यांनी माझं मन वळवण्याचा प्रयत्न केला. पण, मी माझ्या निर्णयावर ठाम होतो. म्हणून मग, एका महिन्यानंतर मी मिलानमधील बेथेलमध्ये सेवा करण्यास सुरुवात केली. तिथं चार मिशनरी सेवा करत होते: जूझेप्पे (जोसेफ) रोमानो आणि त्यांची पत्नी, ॲन्जेलीना; कारलो बेनान्टी आणि त्यांची पत्नी, कोस्टान्झा. जूझेप्पे ट्यूबीनी हा बेथेल कुटुंबाचा पाचवा सदस्य होता जो नुकताच बेथेलमध्ये आला होता व मी सहावा सदस्य होतो.

बेथेलमध्ये एक महिना सेवा केल्यानंतर, मला विभागीय पर्यवेक्षक म्हणून नेमण्यात आलं. त्या देशात, मूळचा इटालियन विभागीय पर्यवेक्षक असलेला मी पहिलाच होतो. बंधू जॉर्ज फ्रेडियानेली हे १९४६ मध्ये अमेरिकेतून इटलीला आलेले पहिले मिशनरी होते व इटलीमध्ये ते आधीपासूनच प्रवासी कार्य करत होते. त्यांनी काही आठवडे मला प्रशिक्षण दिलं आणि त्यानंतर मी एकट्यानं हे साहसी कार्य करण्यास सुरुवात केली. मी भेट दिलेली पहिली मंडळी—फाइन्झा मला विशेष आठवते. विचार करा! तोपर्यंत मी कोणत्याही मंडळीत कधी भाषणसुद्धा दिलं नव्हतं! तरीसुद्धा, उपस्थित असलेल्या सर्वांना मी पूर्ण वेळची सेवा सुरू करण्याचं प्रोत्साहन दिलं. उपस्थितांमध्ये अनेक तरुणही होते. यांच्यापैकी अनेक तरुणांवर पुढे इटालियन क्षेत्रात मोठ्या जबाबदारीची कार्ये सोपवण्यात आली.

एक प्रवासी पर्यवेक्षक या नात्यानं माझं जीवन अतिशय रोमांचक होतं. माझ्या जीवनात अनेक अनपेक्षित घटना घडल्या, मला जीवनात अनेक बदल करावे लागले, अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं व आनंदाचे अनेक क्षणही मी अनुभवले; सोबतच मला प्रिय बंधुभगिनींकडून भरभरून प्रेमही मिळालं.

युद्धानंतर इटलीतील धार्मिक स्थिती

त्या वेळी इटलीतील धार्मिक स्थिती कशी होती याविषयी मी तुम्हाला काही सांगू इच्छितो. सर्वत्र जणू कॅथलिक चर्चचंच साम्राज्य होतं. १९४८ मध्ये एक नवीन संविधान अस्तित्वात आलं असलं, तरी साक्षीदारांना मोकळेपणे प्रचार करण्यापासून रोखणारे फासीवादी कायदे १९५६ पर्यंत रद्द करण्यात आले नव्हते. पाळक वर्गाच्या दबावामुळे अनेकदा विभागीय संमेलनांमध्ये अडथळे निर्माण केले जायचे. पण, काही वेळा पाळकांचे प्रयत्न तोंडघशी पडायचे. नेमकी हीच गोष्ट १९४८ साली मध्य इटलीतील सूल्मोना नावाच्या एका छोट्याशा शहरात घडली.

संमेलन एका नाट्यगृहात भरवण्यात आलं होतं. रविवारी सकाळी, कार्यक्रमाचा अध्यक्ष मी होतो आणि जूझेप्पे रोमानो यांनी जाहीर भाषण दिलं. त्या काळी संमेलनांना श्रोत्यांची अलोट गर्दी असायची. त्या वेळी संपूर्ण देशात ५०० प्रचारकसुद्धा नव्हते; तरीसुद्धा, नाट्यगृह २,००० लोकांनी खचाखच भरलं होतं. भाषणाच्या शेवटी एक तरुण, श्रोत्यांमध्ये असलेल्या दोन पाळकांच्या सांगण्यावरून एकाएकी व्यासपीठावर चढला. गोंधळ घालण्याच्या उद्देशानं तो आरडाओरड करू लागला. मी लगेच त्याला म्हटलं, “तुला जर काही बोलायचं असेल, तर एखादं सभागृह भाड्यानं घे आणि तिथं तुला वाटेल ते तू बोलू शकतोस.” श्रोत्यांनाही त्याचं ते वागणं आवडलं नाही व त्यांनी त्याच्याविरुद्ध आरडाओरड करून त्याचं तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला. ते पाहून तो तरुण व्यासपीठावरून उतरला व पळून गेला.

त्या काळी, प्रवास करणं खरंच सोपं नव्हतं. एका मंडळीतून दुसऱ्‍या मंडळीत मी कधी पायी जायचो, तर कधी सायकलवरून, मोडक्यातोडक्या व खच्चून भरलेल्या बसमधून किंवा ट्रेननं प्रवास करायचो. काही वेळा तबेल्यात किंवा अवजार ठेवण्याच्या कोठीत माझ्या राहण्याची सोय केली जायची. युद्ध नुकतंच संपलं होतं, शिवाय इटलीचे अनेक लोक गरीब होते. हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच बंधुभगिनी तिथं होते व त्यांचीही आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची होती. अशा परिस्थितीतसुद्धा यहोवाची सेवा करणं फार आनंददायक होतं.

गिलियड प्रशिक्षण

सन १९५० मध्ये, मला व जूझेप्पे ट्यूबीनीला गिलियड मिशनरी प्रशालेच्या १६ व्या वर्गाला उपस्थित राहण्याचं आमंत्रण मिळालं. इंग्रजी शिकणं मला फार कठीण जाईल हे मला सुरुवातीपासूनच माहीत होतं. मी इंग्रजी शिकण्याचा जीव तोडून प्रयत्न केला, तरीसुद्धा माझ्यासाठी ते खूप कठीण होतं. आम्हाला संपूर्ण बायबल इंग्रजीत वाचून काढायचं होतं. त्यासाठी मी काही वेळा दुपारी जेवायला न जाता मोठमोठ्यानं वाचायचा सराव करायचो. शेवटी, भाषण देण्याची माझी पाळी आली. माझ्या भाषणानंतर प्रशिक्षकानं जे म्हटलं ते मला अजूनही चांगलं आठवतं, जणू ही गोष्ट कालपरवाच घडली असावी. त्यांनी म्हटलं, “तुझे हावभाव व तुझा उत्साह वाखणण्याजोगा आहे, पण तुझी इंग्रजी बिलकुल समजण्याजोगी नाही!” असं असलं, तरी मी हा अभ्यासक्रम यशस्वी रीत्या पूर्ण करू शकलो. त्यानंतर मला व जूझेप्पेला पुन्हा इटलीत सेवा करण्यास पाठवण्यात आलं. आम्हाला गिलियड प्रशालेत मिळालेल्या अतिरिक्‍त प्रशिक्षणामुळे आम्ही दोघं अधिक चांगल्या प्रकारे बांधवांची सेवा करण्यास सज्ज झालो.

सन १९५५ मध्ये मी लीडियाशी लग्न केलं. सात वर्षांपूर्वी तिच्या बाप्तिस्म्याचं भाषण मीच दिलं होतं. तिचे वडील डॉमेनिको एक प्रेमळ बंधू होते. फासीवादी सरकारनं त्यांचा छळ केला व त्यांना तीन वर्षांकरता इटलीतून हद्दपार केलं होतं; तरीसुद्धा, त्यांनी आपल्या सातही लेकरांना सत्य स्वीकारण्यास मदत केली होती. लीडियादेखील सत्यासाठी लढणारी होती. इटलीत सरतेशेवटी यहोवाच्या साक्षीदारांना घरोघरचं प्रचार कार्य करण्याचा कायदेशीर हक्क मिळाला त्याआधी तिनं तीन न्यायालयीन खटल्यांचा सामना केला होता. आमच्या लग्नाच्या सहा वर्षांनंतर आम्हाला एक मुलगा झाला; त्याचं नाव बेन्यामीनो. १९७२ मध्ये आम्हाला दुसरा मुलगा झाला; त्याचं नाव मारको. मला सांगण्यात आनंद होतो, की माझी दोन्ही मुलं व त्यांचे कुटुंबीय आवेशानं यहोवाची सेवा करत आहेत.

यहोवाच्या सेवेत आवेशी असणं

इतरांची आनंदानं सेवा करत असताना मला असे अनेक अनुभव आले जे मी कधीच विसरू शकत नाही. उदाहरणार्थ, १९८० च्या दशकाच्या सुरुवातीला माझ्या सासऱ्‍यांनी त्या वेळी इटलीचे राष्ट्राध्यक्ष असलेले सान्ड्रो पर्टीनी यांना पत्र लिहिलं. फासीवादी हुकूमशाहीच्या काळात त्या दोघांना इटलीतून हद्दपार करून वेन्टोटेने या बेटावर पाठवण्यात आलं होतं. सरकार ज्यांना आपला शत्रू मानत असे अशा लोकांना या बेटावर हद्दपार केलं जायचं. पत्रात, माझ्या सासऱ्‍यांनी इटलीच्या राष्ट्राध्यक्षांना साक्ष देण्याच्या हेतूनं त्यांची मुलाखत घेण्याची विनंती केली. त्यांची विनंती मान्य करण्यात आली तेव्हा मीही त्यांच्यासोबत गेलो. आमचं मोठ्या सन्मानानं स्वागत करण्यात आलं. इतकी चांगली वागणूक आम्हाला पूर्वी कधीच मिळाली नव्हती. राष्ट्राध्यक्षांनी माझ्या सासऱ्‍यांना मिठी मारून मोठ्या आपुलकीनं त्यांचं स्वागत केलं. मग आम्ही आपल्या विश्‍वासाबद्दल बोललो व त्यांना काही साहित्य दिलं.

प्रवासी पर्यवेक्षक या नात्यानं ४४ वर्षं सेवा केल्यानंतर, १९९१ मध्ये मी विभागीय कार्य सोडून दिलं. त्या वर्षांदरम्यान मी देशभर फिरून मंडळ्यांना भेटी दिल्या होत्या. पुढील चार वर्षं, म्हणजे एका गंभीर आजारामुळे माझ्या हालचालींवर मर्यादा येईपर्यंत मी संमेलन सभागृह पर्यवेक्षक या नात्यानं सेवा केली. गंभीर स्वरूपाचा आजार असूनही यहोवाच्या कृपेनं मी अजूनही पूर्ण वेळच्या सेवेत आहे याबद्दल मी त्याचे आभार मानतो. मी सुवार्तेचा प्रचार करण्याचा व शिक्षण देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतो, आणि सध्या मी काही बायबल अभ्यासही चालवत आहे. बांधव अजूनही म्हणतात, की मी भाषण देतो तेव्हा माझ्यात “जबरदस्त” उत्साह असतो. माझा उत्साह अजूनही टिकून आहे याबद्दल मी यहोवाचा आभारी आहे.

मी तरुण असताना मृत्यूच्या भीतीनं मला पूर्णपणे ग्रासून टाकलं होतं. पण, बायबलच्या अचूक ज्ञानामुळे मला सार्वकालिक जीवनाची, म्हणजे येशूनं म्हटल्याप्रमाणं ‘विपुल’ जीवनाची शाश्‍वत आशा मिळाली आहे. (योहा. १०:१०) त्याच जीवनाची, म्हणजे शांती, सुरक्षा, आनंद व यहोवाच्या भरपूर आशीर्वादांनी समृद्ध असलेल्या जीवनाची मी आता वाट पाहत आहे. आपल्याला ज्याचे नाव धारण करण्याचा विशेषाधिकार मिळाला आहे त्या आपल्या प्रेमळ सृष्टिकर्त्याचा गौरव असो.—स्तो. ८३:१८.

[२२, २३ पानांवरील नकाशा]

(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)

स्वित्झर्लंड

बर्न

झ्यूरिक

आर्बोन

स्टायनाक

इटली

रोम

कोमो

मिलान

आड्डा नदी

कास्टिओने आन्डेवेनो

फाइन्झा

सूल्मोना

वेन्टोटेने

[२२ पानांवरील चित्र]

गिलियडला जाताना

[२२ पानांवरील चित्र]

जूझेप्पेसह गिलियडमध्ये

[२३ पानांवरील चित्र]

आमच्या लग्नाच्या दिवशी

[२३ पानांवरील चित्र]

माझी प्रिय पत्नी ५५ पेक्षा अधिक वर्षांपासून मला साथ देत आली आहे