इंटरनेट याचा सुज्ञपणे उपयोग करा
इंटरनेट याचा सुज्ञपणे उपयोग करा
इंटरनेटमुळे आपल्याला कोणत्याही गोष्टीविषयी, कोठेही, आणि केव्हाही माहिती मिळवणे शक्य झाले आहे. तेव्हा, जगभरातील लोक एकमेकांशी संवाद साधण्यासाठी इंटरनेटचा वापर करतात याचे आपल्याला आश्चर्य वाटत नाही.
एकमेकांसोबत संवाद साधण्याची क्षमता आपल्या निर्माणकर्त्याकडून आपल्याला मिळालेली एक अद्भुत देणगी आहे. त्यामुळे विचारांची आणि माहितीची देवाणघेवाण करणे शक्य होते. सर्वात प्रथम यहोवाने मानव कुटुंबाशी संवाद साधला होता. अर्थपूर्ण जीवन कसे जगावे याविषयीची स्पष्ट माहिती यहोवाने त्यांना दिली. (उत्प. १:२८-३०) पण, एकमेकांशी संवाद साधण्याच्या या देणगीचा आपण दुरुपयोग करण्याची शक्यता आहे. नेमकी हीच गोष्ट, मानव इतिहासाच्या सुरुवातीला घडली. सैतानाने हव्वेला खोटी माहिती दिली. सैतानाने तिला जे काही सांगितले त्यावर तिने विश्वास ठेवला आणि आदामालाही ते सांगितले. आदामाने या खोट्या माहितीवर विश्वास ठेवून कार्य केले आणि त्याचे परिणाम सर्व मानव भोगत आहेत.—उत्प. ३:१-६; रोम. ५:१२.
इंटरनेटमुळे आपल्याला महत्त्वाची माहिती मिळू शकते आणि एखादी गोष्ट पटकन करण्यास मदत मिळते. पण, त्याच वेळी इंटरनेटमुळे आपल्याला खोटी माहितीही मिळू शकते, आपला बराचसा वेळ वाया जाऊ शकतो, आणि अनैतिक गोष्टी पाहणे सहज शक्य होऊ शकते. तेव्हा, आपण इंटरनेटचा वापर सुज्ञपणे कसा करू शकतो याची चर्चा करू या.
माहिती—खरी की खोटी?
इंटरनेटवरील सगळीच माहिती चांगली असते असा विचार करू नका. आपण इंटरनेटवर माहिती शोधतो तेव्हा आपल्याला एकतर सर्वात चांगली माहिती मिळू शकते किंवा सर्वात वाईट माहिती मिळू शकते. अशा वेळी आपण सुज्ञ असले पाहिजे आणि बऱ्यावाइटातला फरक जाणला पाहिजे.
आज, इंटरनेट कनेक्शन असलेला कोणीही, आपण तज्ज्ञ आहोत आणि आपल्याजवळ खूप ज्ञान आहे असा आव आणू शकतो. शिवाय, इंटरनेटचा वापर करणाऱ्या लोकांना आपले नाव वापरण्याचीसुद्धा गरज नाही. इंटरनेटवर कोणीही आपली मते, माहिती, फोटो, आणि सूचना प्रकाशित करू शकतो.
तेव्हा, इंटरनेटवरील माहितीवर लगेच विश्वास ठेवू नका. त्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी स्वतःला असे विचारा: (१) ही माहिती कोणी प्रकाशित केली? त्या १ तीम. ६:२०.
लेखकावर आपण भरवसा ठेवू शकतो का? (२) ही माहिती का प्रकाशित करण्यात आली होती? का लिहिण्यात आली होती? लेखक एक सभ्य व्यक्ती आहे का, की तो फक्त स्वतःच्या विचारांना चालना देत आहे? (३) त्याला ही माहिती कोठून मिळाली? त्याला ही माहिती जेथून मिळाली त्याचा उल्लेख तो करतो का, जेणेकरून वाचक ते तपासून पाहू शकतील? (४) दिलेली माहिती अद्ययावत आहे का? पहिल्या शतकात, प्रेषित पौलाने तीमथ्याला दिलेला सल्ला आज आपल्याकरताही तितकाच महत्त्वाचा आहे. पौलाने लिहिले: “तुझ्या स्वाधीन केलेली ठेव संभाळ; अधर्माच्या रिकाम्या वटवटीपासून आणि जिला विद्या हे नाव चुकीने दिले गेले आहे तिच्या विरोधी मतापासून दूर राहा.”—इंटरनेटमुळे आपला वेळ वाचतो की वाया जातो?
आपण इंटरनेटचा सुज्ञपणे वापर केला, तर त्यामुळे आपला बराच वेळ, शक्ती आणि पैसा वाचेल. आपण घरबसल्या एखादी गोष्ट विकत घेऊ शकतो. वस्तूंचे किफायतशीर दर आपल्याला समजू शकतात. बँकेत जाण्याऐवजी लोक घरबसल्या बिल्स भरू शकतात, पैसे ट्रान्सफर करू शकतात, आणि अशा अनेक गोष्टी करू शकतात. आपण प्रवास योजना करू शकतो आणि तिकिटे विकत घेऊ शकतो. इंटरनेटमुळे फोन नंबर, पत्ते आणि मार्ग शोधणेही सोपे झाले आहे. जगभरातील यहोवाच्या साक्षीदारांची शाखा कार्यालये यांपैकी अनेक सेवांचा वापर करतात व त्याचा त्यांना खूप फायदा होतो.
पण इंटरनेटचे काही धोकेही आहेत. उदाहरणार्थ, आपण इंटरनेटवर किती वेळ खर्च करतो याचा आपण विचार केला पाहिजे. काही जण इंटरनेटवर गेम्स खेळण्यात, खरेदी करण्यात, चॅटिंग करण्यात, ई-मेल पाठवण्यात, माहिती शोधण्यात किंवा सर्फिंग करण्यात बराच वेळ खर्च करतात. आणि अशात कधीकधी ते आपल्या कुटुंबाला, मित्रांना आणि ख्रिस्ती मंडळीला विसरून जातात. त्यांना इंटरनेटचे व्यसन जडू शकते.
स्वतःला इंटरनेटचा व्यसनी म्हणणाऱ्या एका व्यक्तीने यहोवाच्या साक्षीदारांच्या एका शाखा कार्यालयाला एक पत्र लिहिले. काही-काही दिवस तो चक्क दहा तास इंटरनेटचा उपयोग करायचा. त्याने म्हटले: “सुरुवातीला त्यात चुकीचं असं काहीच वाटलं नाही.” पण, नंतर तो सभा चुकवू लागला आणि त्याने प्रार्थना करण्याचे सोडून दिले. तो तयारी न करताच सभांना जायचा आणि सभांना गेल्यानंतरही आपण कधी एकदाचे घरी जातो व इंटरनेटवर बसतो याचाच तो विचार करायचा. पण, काही काळानंतर त्याला समजले की ही एक गंभीर समस्या आहे आणि त्याने स्वतःमध्ये आवश्यक बदल केले. तेव्हा, आपल्याला इंटरनेटचे व्यसन लागेल इतका वेळ आपण इंटरनेटवर कधीही खर्च करू नये.
इंटरनेटवर तुम्ही कोणती माहिती पाहता?
पहिले थेस्सलनीकाकर ५:२१, २२ मध्ये असे लिहिले आहे: “सर्व गोष्टींची पारख करा; चांगले ते बळकट धरा; वाइटाच्या प्रत्येक प्रकारापासून दूर राहा.” आपण इंटरनेटवर जे पाहतो त्याबद्दल यहोवाचा दृष्टिकोन काय आहे हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. आपण जे पाहतो ते नैतिकदृष्ट्या शुद्ध आणि एका ख्रिस्ती व्यक्तीसाठी उचित असले पाहिजे. इंटरनेट पोर्नोग्राफी ही एक सर्वसामान्य गोष्ट बनली आहे. आपण सावधगिरी बाळगली नाही, तर ती सहजपणे आपल्यासाठी एक समस्या बनू शकते.
आपण इंटरनेटवर काय पाहावे आणि काय पाहू नये हे ठरवण्यासाठी या प्रश्नाचा विचार करा: ‘जर माझा पती (किंवा माझी पत्नी), माझे पालक किंवा माझे ख्रिस्ती बांधव माझ्या खोलीत आले तर इंटरनेटवर मी जे पाहत आहे, ते मी पटकन त्यांच्यापासून लपवेन का?’ या प्रश्नाचे उत्तर ‘हो’ असे असेल, तर इतर जण सोबत असतात तेव्हाच इंटरनेटचा वापर करणे उचित ठरेल. इंटरनेटमुळे एकमेकांशी संवाद साधण्याच्या आणि खरेदी करण्याच्या लोकांच्या पद्धतीत आज पूर्णपणे बदल झाला आहे. पण, त्याच वेळी इंटरनेटने लोकांना एका नवीन पद्धतीने आपल्या मनांत व्यभिचार करण्यास शिकवले आहे.—मत्त. ५:२७, २८.
आपण इतरांना कोणती माहिती पाठवली पाहिजे?
आपण इंटरनेटचा वापर करतो तेव्हा आपण लोकांसोबत माहितीची देवाणघेवाण करतो. आपण जी माहिती लिहितो किंवा इतरांना पाठवतो ती खरी आहे, ती अनैतिक नाही आणि ती माहिती इतरांना पाठवण्याची आपल्याला परवानगी आहे याची आपण खातरी केली पाहिजे. * आपण याचा विचार केला पाहिजे: या माहितीचा इतरांना फायदा होईल का? आपण इतरांना ती का सांगू इच्छितो? केवळ इतरांवर छाप पाडण्यासाठी आपण त्यांना ती सांगू इच्छितो का?
आपण ई-मेलचा योग्य वापर केला, तर त्याचा आपल्याला खूप फायदा होऊ शकतो. पण त्याच वेळी आपल्याला नको ती माहितीसुद्धा मिळू शकते. आपण इतरांना खंडीभर माहिती पाठवून त्यांचा वाजवीपेक्षा जास्त वेळ घेतो का? एखादी ई-मेल पाठवण्याआधी आपण ही मेल का पाठवत आहोत याचा आपण विचार करू नये का? पूर्वी लोक त्यांच्या कुटुंबांना व मित्रांना त्यांच्या जीवनात काय चालले आहे ते सांगण्यासाठी पत्र लिहायचे. आपल्या ई-मेलचासुद्धा हाच उद्देश असला पाहिजे. एखादी माहिती खरी आहे हे जर आपल्याला सिद्ध करता येत नसेल, तर मुळात ती माहिती इतरांना पाठवावीच कशाला?
तर मग, इंटरनेट वापरण्याच्या बाबतीत तुम्ही काय निर्णय घ्यावा? तुम्ही त्याचा उपयोगच करू नये का? काहींना कदाचित असे करावे लागेल. उदाहरणार्थ, ज्या इंटरनेट व्यसनीची आपण याआधी चर्चा केली त्याला असे करावे लागले. तुम्ही तुमच्या विवेकबुद्धीचा वापर केला व त्यास आपले ‘रक्षण करू दिले,’ तर इंटरनेट तुमच्यासाठी एक वरदान ठरेल.—नीति. २:१०, ११.
[तळटीप]
^ हीच गोष्ट फोटोच्या बाबतीतही लागू होऊ शकते. आपण कदाचित आपल्या स्वतःसाठी इतरांचे फोटो घेऊ. पण, इंटरनेटवर ते फोटो कोणालाही दाखवण्याचा, किंवा फोटोमध्ये असलेल्या लोकांची नावे किंवा त्यांचा पत्ता सांगण्याचा हक्क आपल्याला नाही.
[४ पानांवरील चित्र]
तुम्हाला जी माहिती मिळते ती खरी आहे याची खातरी तुम्ही कशी करू शकता?
[५ पानांवरील चित्र]
इतरांना माहिती पाठवण्याआधी तुम्ही कशाचा विचार केला पाहिजे?