व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

इब्री शास्त्रवचनांत मशीहाशी संबंधित नेमक्या किती भविष्यवाण्या आहेत हे सांगणे शक्य आहे का?

इब्री शास्त्रवचनांचा काळजीपूर्वक अभ्यास केल्यास, त्यांत येशू ख्रिस्तामध्ये पूर्ण झालेल्या कितीतरी भविष्यवाण्या असल्याचे आपल्याला आढळून येईल. या भविष्यवाण्यांमध्ये मशीहाची पार्श्‍वभूमी, त्याच्या येण्याचा समय, त्याची कार्ये, त्याला दिली जाणारी वागणूक, आणि यहोवा देवाच्या व्यवस्थेतील त्याचे स्थान यांबद्दल तपशीलवारपणे सांगण्यात आले होते. या सर्व भविष्यवाण्यांचे मिळून एक मोठे चित्र तयार होते, ज्यावरून येशू हाच मशीहा असल्याचे आपण ओळखू शकतो. पण, इब्री शास्त्रवचनांत मशीहाशी संबंधित नेमक्या किती भविष्यवाण्या आहेत हे ठरवण्याचा प्रयत्न करताना आपण सावधगिरी बाळगली पाहिजे.

एखादी भविष्यवाणी मशीहाशी संबंधित आहे की नाही याबद्दल सर्वांचेच एकमत आहे असे नाही. द लाईफ ॲण्ड टाईम्स ऑफ जीझस द मसाया या पुस्तकात ऑल्फ्रेट एडरशाइम यांनी म्हटले, की इब्री शास्त्रवचनांतील ४५६ उतारे मशीहाशी संबंधित असल्याचे प्राचीन यहुदी रब्बींच्या लिखाणांत नमूद करण्यात आले आहे; पण यांपैकी कित्येक भविष्यवाण्यांमध्ये मशीहाचा स्पष्ट उल्लेख आढळत नाही. या ४५६ उताऱ्‍यांचे बारकाईने परीक्षण केल्यास, त्यांपैकी काही उतारे येशू ख्रिस्ताविषयी आहेत की नाही याबद्दल प्रश्‍न निर्माण होतात. उदाहरणार्थ, उत्पत्ति ८:११ हे वचन मशीहाशी संबंधित आहे असे यहुद्यांचे मत असल्याचे एडरशाइम यांनी म्हटले. यहुदी लोक असे मानत होते, की “कबुतराने मशीहाच्या डोंगरावरून जैतुनाचे पान आणले होते.” एडरशाइमने निर्गम १२:४२ या वचनाचादेखील उल्लेख केला. यहुद्यांनी या वचनाचा कशा प्रकारे चुकीचा अर्थ लावला त्याबद्दल लेखकाने असे लिहिले: “मोशे ज्या प्रकारे वाळवंटातून आला, त्याच प्रकारे मशीहादेखील रोममधून येईल.” म्हणूनच, वरील दोन वचनांचा आणि त्यांच्या चुकीच्या स्पष्टीकरणांचा संबंध येशू ख्रिस्ताशी जोडणे अनेक विद्वानांना व इतरांना कठीण वाटते याचे आपल्याला आश्‍चर्य वाटू नये.

ज्या भविष्यवाण्या खरोखर येशू ख्रिस्तामध्ये पूर्ण झाल्या होत्या केवळ त्यांवर जरी आपण आपले लक्ष केंद्रित केले, तरी त्या नेमक्या किती आहेत हे ठरवणे कठीण आहे. यशयाच्या ५३ व्या अध्यायाचेच उदाहरण घ्या, ज्यात मशीहासंबंधी कितीतरी भविष्यसूचक वैशिष्ट्ये आढळतात. यशया ५३:२-७ मध्ये अशी भविष्यवाणी करण्यात आली आहे: “त्याला रूप नव्हते, . . . तुच्छ मानिलेला, मनुष्यांनी टाकिलेला, . . . आमचे व्याधि त्याने आपल्यावर घेतले, . . . तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला, . . . वधावयास नेत असलेल्या कोकराप्रमाणे.” यशयाच्या ५३ व्या अध्यायातील या पूर्ण उताऱ्‍याला मशीहाशी संबंधित एक भविष्यवाणी समजली जावी, की या उताऱ्‍यात मशीहासंबंधी दिलेल्या प्रत्येक वैशिष्ट्याला एक वेगळी किंवा स्वतंत्र भविष्यवाणी समजली जावी?

यशया ११:१ यात असलेल्या भविष्यवाणीचाही विचार करा, जेथे म्हटले आहे: “इशायाच्या बुंधाला धुमारा फुटेल; त्याच्या मुळांतून फुटलेली शाखा फळ देईल.” हीच भविष्यवाणी १० व्या वचनातही आढळते व तेथेही असेच शब्द वापरण्यात आले आहेत. तर मग, ही दोन वचने दोन वेगवेगळ्या भविष्यवाण्या आहेत असे आपण समजावे का, की ती एकच भविष्यवाणी असून तिची पुनरावृत्ती करण्यात आली आहे असे आपण समजावे? यशयाच्या ५३ व्या व ११ व्या अध्यायांतील भविष्यवाण्यांविषयी आपण जो निष्कर्ष काढू त्याचा मशीहाविषयी असलेल्या एकूण भविष्यवाण्यांवर परिणाम होईल.

तेव्हा, इब्री शास्त्रवचनांत मशीहासंबंधी असलेल्या एकूण भविष्यवाण्यांची नेमकी संख्या किती आहे हे ठरवण्याचा आपण प्रयत्न करू नये. यहोवाच्या संघटनेने येशूविषयी असलेल्या कितीतरी भविष्यवाण्यांच्या व त्यांच्या पूर्णतेच्या याद्या प्रकाशित केल्या आहेत. * या याद्यांचा आपल्या वैयक्‍तिक व कौटुंबिक अभ्यासात, तसेच आपल्या सार्वजनिक सेवा कार्यात आपल्याला उपयोग होऊ शकतो व त्यांपासून आपल्याला प्रोत्साहन मिळू शकते. शिवाय, मशीहाशी संबंधित असलेल्या अनेक भविष्यवाण्या, मग त्यांची संख्या कितीही असो, येशू हाच ख्रिस्त किंवा मशीहा असल्याचा आपल्याला ठोस पुरावा देतात.

[तळटीप]

^ इंसाईट ऑन द स्क्रिपचर्स, खंड १, पृष्ठ १२२३; खंड २, पृष्ठ ३८७; “ऑल स्क्रिप्चर ईज इन्स्‌पायर्ड ऑफ गॉड ॲण्ड बेनिफिशल,” पृष्ठे ३४३-३४४; बायबल नेमके काय शिकवते? पृष्ठ २००.