व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

वार्षिक सेवा अहवालातील माहितीचा काय अर्थ होतो?

दर वर्षी, ईयरबुक व फेब्रुवारी महिन्याची आमची राज्य सेवा यांत आपल्या प्रचार कार्याचा अहवाल छापला जातो. जगभरात यहोवाचे लोक, देवाच्या राज्याचा प्रचार करण्याकरता आणि इतरांना त्याबद्दल शिकवण्याकरता जे काही करत आहेत त्याबद्दल जाणून आपल्याला आनंद होतो. पण, या अहवालाचा नेमका अर्थ काय होतो हे समजण्यासाठी, त्यातील काही शीर्षके आणि संख्या कशाला सूचित करतात हे समजणे गरजेचे आहे. याची काही उदाहरणे खाली दिली आहेत.

सेवा वर्ष. सेवा वर्ष हे सप्टेंबरमध्ये सुरू होते आणि ऑगस्टमध्ये संपते. ईयरबुक व फेब्रुवारी महिन्याची आमची राज्य सेवा यांत नेहमी आधीच्या सेवा वर्षाचा अहवाल दिला जातो. उदाहरणार्थ, २०११ ईयरबुक व फेब्रुवारी महिन्याची आमची राज्य सेवा यांत १ सप्टेंबर २००९ ते ३१ ऑगस्ट २०१० या सेवा वर्षाचा अहवाल दिलेला आहे.

प्रचारकांचा उच्चांक व सरासरी प्रचारक. ज्यांचा बाप्तिस्मा झाला आहे अशांना व ज्यांना राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्याची संमती आहे अशा इतरांना “प्रचारक” म्हटले जाते. सेवा वर्षातील ज्या महिन्यात अहवालांची संख्या सगळ्यात जास्त असते ती ‘प्रचारकांच्या उच्चांकाची’ संख्या असते. काही अहवाल खूप उशिरा मिळाले असतील आणि त्यामुळे आधीच्या महिन्यात त्यांची मोजणी झाली नसेल, असे अहवालसुद्धा ‘प्रचारकांच्या उच्चांकात’ समाविष्ट असू शकतात. ‘सरासरी प्रचारकांची’ संख्या अशा प्रचारकांच्या संख्येला सूचित करते, जे प्रचार कार्यात खर्च केलेल्या वेळेचा दर महिना नियमितपणे अहवाल देतात.

एकूण तास. २०११ ईयरबुक व फेब्रुवारी महिन्याची आमची राज्य सेवा यांतील अहवाल दाखवतो, की यहोवाच्या साक्षीदारांनी प्रचार कार्यात एकूण १६० कोटींहून अधिक तास खर्च केले. पण या एकूण तासांमध्ये, यहोवाची उपासना करण्यासाठी आपण जो वेळ खर्च करतो तो मोजला जात नाही. उदाहरणार्थ, मेंढपाळ भेटी घेण्यासाठी म्हणजे मंडळीच्या सदस्यांना मदत करण्यासाठी व प्रोत्साहन देण्यासाठी वडीलजन जो वेळ खर्च करतात तो यात मोजला जात नाही. तसेच, सभांना उपस्थित राहण्यासाठी, बायबलचा अभ्यास करण्यासाठी आणि शिकलेल्या गोष्टींवर मनन करण्यासाठी आपण जो वेळ खर्च करतो तोदेखील यात मोजला जात नाही.

खर्च. सन २०१० च्या सेवा वर्षादरम्यान यहोवाच्या साक्षीदारांनी खास पायनियरांच्या, मिश्‍नऱ्‍यांच्या, आणि प्रवासी पर्यवेक्षकांच्या गरजा भागवण्यासाठी १५ कोटी ५० लाखांपेक्षा अधिक डॉलर खर्च केले. पण यात बायबल, पुस्तके व मासिके छापण्यासाठी केलेला खर्च समाविष्ट नाही. तसेच, जगभरातील बेथेल गृहांत स्वयंसेवक म्हणून काम करणाऱ्‍या २०,००० पेक्षा जास्त बंधुभगिनींची काळजी घेण्यासाठी जो खर्च केला जातो तोदेखील यात समाविष्ट नाही.

स्मारक विधीचे सहभागी. ही संख्या, स्मारक विधीच्या वेळी भाकर व द्राक्षारसाचे सेवन करणाऱ्‍या सर्व बाप्तिस्माप्राप्त साक्षीदारांना सूचित करते. पण ही संख्या, पृथ्वीवरील अभिषिक्‍त जणांच्या संख्येइतकीच असेल असे नाही. उदाहरणार्थ, काही जण पूर्वी बाळगत असलेल्या विश्‍वासांमुळे किंवा काही मानसिक अथवा भावनिक समस्यांमुळे आपल्याला स्वर्गीय जीवनाची आशा आहे असा चुकीचा विचार कदाचित करतील. त्यामुळे, पृथ्वीवरील अभिषिक्‍त जणांची अचूक संख्या जाणणे शक्य नाही, आणि ती जाणून घेण्याची आपल्याला गरजही नाही. स्मारक विधीच्या वेळी ज्यांनी भाकर व द्राक्षारसाचे सेवन केले त्या सर्वांच्या नावाची यादी नियमन मंडळ ठेवत नाही. *

पण, एक गोष्ट आपल्याला माहीत आहे; ती म्हणजे मोठे संकट सुरू होईल तेव्हा ‘आमच्या देवाचे दास’ अर्थात अभिषिक्‍त जणांपैकी काही जण पृथ्वीवर असतील. (प्रकटी. ७:१-३) ते पृथ्वीवर आहेत तोपर्यंत ते प्रचाराच्या व शिष्य बनवण्याच्या कार्यात खूप मेहनत घेतात. यहोवाचे लोक, मानव इतिहासातील हे सर्वात महत्त्वाचे कार्य कशा प्रकारे पूर्ण करत आहेत ते या वार्षिक अहवालातून आपल्याला समजते.

[तळटीप]

^ अधिक माहितीसाठी १५ जून २००९ च्या टेहळणी बुरूज अंकात पृष्ठ २४ वरील, “विश्‍वासू कारभारी व त्याचे प्रतिनिधित्व करणारे नियमन मंडळ” हा लेख पाहा.