व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

शांती राखण्याचा प्रयत्न करा

शांती राखण्याचा प्रयत्न करा

शांती राखण्याचा प्रयत्न करा

‘आपण शांतीला पोषक होणाऱ्‍या गोष्टींच्या मागे लागावे.’—रोम. १४:१९.

१, २. यहोवाच्या साक्षीदारांमध्ये शांती का पाहायला मिळते?

 आज जगात खरी शांती पाहायला मिळत नाही. एकाच राष्ट्राच्या व एकच भाषा बोलणाऱ्‍या लोकांमध्येसुद्धा सहसा धार्मिक, राजनैतिक आणि सामाजिक मतभेद असल्याचे दिसून येते. याच्या अगदी उलट, यहोवाचे लोक “सर्व राष्ट्रे, वंश, लोक” यांतून आलेले असले व ते “निरनिराळ्या भाषा बोलणारे” असले, तरी त्यांच्यामध्ये ऐक्य आहे.—प्रकटी. ७:९.

आपल्यामध्ये सहसा पाहायला मिळणारे शांतीपूर्ण वातावरण आपोआप अस्तित्वात आले नाही. तर, ते प्रामुख्याने ‘देवाबरोबरच्या शांतीमुळे’ अस्तित्वात आले आहे. ही शांती त्याच्या पुत्रावरील आपल्या विश्‍वासामुळे निर्माण होते, ज्याने आपल्या पापांसाठी त्याचे जीवन बलिदान केले. (रोम. ५:१; इफिस. १:७) याशिवाय, खरा देव आपल्या एकनिष्ठ सेवकांना आपला पवित्र आत्मा देतो आणि त्या आत्म्याच्या फळाचा एक पैलू शांती आहे. (गलती. ५:२२) आपल्यामध्ये शांती असण्याचे आणखी एक कारण म्हणजे आपण या ‘जगाचे नाहीत.’ (योहा. १५:१९) आपण राजनैतिक गोष्टींच्या बाबतीत कोणाचाही पक्ष न घेता तटस्थ राहतो. आपण देशांतर्गत युद्धांत किंवा आंतरराष्ट्रीय युद्धांत भाग घेत नाही कारण आपण “आपल्या तरवारी मोडून त्यांचे फाळ” केले आहेत.—यश. २:४.

३. आपण जी शांती अनुभवतो त्यामुळे काय शक्य होते, आणि या लेखात कशाची चर्चा केली जाईल?

आपण विविध वांशिक समूहांचे आणि संस्कृतींचे लोक असलो, तरी आपण “एकमेकांवर प्रीति” करतो. (योहा. १५:१७) आपल्यामध्ये शांती असल्यामुळे आपण आपल्या बांधवांना हानी पोहचवत नाही. इतकेच नव्हे, तर आपल्यातील शांतीमुळे “आपण सर्वांचे व विशेषतः विश्‍वासाने एका घरचे झालेल्यांचे बरे” करतो. (गलती. ६:१०) आपले शांतीपूर्ण आध्यात्मिक नंदनवन आपल्याकरता अत्यंत अनमोल आहे. म्हणून, आपण मंडळीत कशा प्रकारे शांती राखू शकतो ते आता आपण पाहू या.

आपण चुका करतो तेव्हा . . .

४. आपण कोणाचे तरी मन दुखावले असल्यास शांती राखण्यासाठी आपण काय करू शकतो?

शिष्य याकोबाने असे लिहिले: “आपण सगळेच पुष्कळ चुका करितो. कोणी जर बोलण्यात चुकत नाही तर तो मनुष्य पूर्ण होय.” (याको. ३:२) तेव्हा, सहविश्‍वासू बांधवांमध्ये मतभेद व गैरसमज निर्माण होतीलच. (फिलिप्पै. ४:२, ३) तरीसुद्धा, मंडळीची शांती भंग न करता व्यक्‍तींमधील समस्या सोडवणे शक्य आहे. उदाहरणार्थ, आपण कोणाचे तरी मन दुखावले आहे याची आपल्याला जाणीव होते तेव्हा आपण कोणता सल्ला अंमलात आणला पाहिजे याचा विचार करा.मत्तय ५:२३, २४ वाचा.

५. कोणीतरी आपले मन दुखावल्यास आपण कशा प्रकारे शांती राखू शकतो?

एखाद्या क्षुल्लक कारणावरून कोणीतरी आपले मन दुखावल्यास आपण काय केले पाहिजे? आपले मन दुखावणाऱ्‍याने आपल्याकडे येऊन आपली क्षमा मागावी अशी अपेक्षा आपण केली पाहिजे का? पहिले करिंथकर १३:५ मध्ये असे म्हटले आहे: “[प्रेम] अपकार स्मरत नाही.” आपले मन दुखावले जाते तेव्हा ‘अपकार न स्मरण्याद्वारे,’ म्हणजेच क्षमा करण्याद्वारे व ती गोष्ट विसरून जाण्याद्वारे आपण शांती राखण्याचा प्रयत्न करतो. (कलस्सैकर ३:१३ वाचा.) दैनंदिन जीवनातील लहानसहान चुका या मार्गाने हाताळणे सगळ्यात उत्तम. कारण, यामुळे आपल्या बांधवांसोबत शांतीचे संबंध राखण्यास हातभार लागतो आणि आपल्याला मनःशांती मिळते. एक नीतिसूत्र असे म्हणते: “अपराधाची गय करणे . . . भूषण आहे.”—नीति. १९:११.

६. एखाद्याने आपले मन दुखावल्यास त्याकडे आपण दुर्लक्ष करूच शकत नाही असे आपल्याला वाटत असल्यास आपण काय केले पाहिजे?

एखाद्याने आपले मन दुखावल्यास त्याकडे आपण दुर्लक्ष करूच शकत नाही असे आपल्याला वाटत असल्यास आपण काय केले पाहिजे? अशा वेळी, या विषयाबद्दल इतरांना सांगत फिरणे सुज्ञपणाचे ठरणार नाही. असे केल्याने मंडळीची शांती भंग होईल. ही समस्या शांतीने सोडवण्यासाठी काय करणे जरुरीचे आहे? मत्तय १८:१५ म्हणते: “तुझ्या भावाने तुझा अपराध केला, तर त्याच्याकडे जा, तुम्ही दोघे एकांती असताना त्याचा अपराध त्याला दाखीव; त्याने तुझे ऐकले तर तू आपला भाऊ मिळविलास असे होईल.” मत्तय १८:१५-१७ ही वचने गंभीर प्रकारच्या पापाला लागू होत असली, तरी १५ व्या वचनात दिलेल्या तत्त्वानुसार, आपण आपले मन दुखावणाऱ्‍याकडे जाऊन खासगीत त्याच्यासोबत शांतीचे संबंध प्रस्थापित करण्याचा प्रेमळपणे प्रयत्न केला पाहिजे. *

७. आपण समस्या ताबडतोब का सोडवल्या पाहिजे?

प्रेषित पौलाने असे लिहिले: “तुम्ही रागावा, परंतु पाप करू नका, तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये, आणि सैतानाला वाव देऊ नका.” (इफिस. ४:२६, २७) येशूने म्हटले: “वाटेवर तुझा वादी तुझ्याबरोबर आहे तोच त्याच्याशी सलोखा कर.” (मत्त. ५:२५) तर मग, शांती राखण्यासाठी ताबडतोब समस्या सोडवणे गरजेचे आहे. आपण तसे केले नाही, तर एखाद्या चिघळलेल्या जखमेप्रमाणे समस्या आणखी गंभीर होऊ शकते. तेव्हा, आपण गर्विष्ठपणा, मत्सर, किंवा धनसंपत्तीवरील आपले प्रेम अशा गोष्टींना आपल्यातील समस्या सोडवण्याच्या आड येऊ देऊ नये.—याको. ४:१-६.

एखाद्या समस्येत पुष्कळ जण गोवलेले असतात तेव्हा . . .

८, ९. (क) पहिल्या शतकात रोममधील मंडळीत कोणता वाद निर्माण झाला होता? (ख) पौलाने या वादासंबंधी रोमन ख्रिश्‍चनांना कोणता सल्ला दिला?

कधीकधी समस्या केवळ दोघांमध्ये नसते, तर त्यात मंडळीतील अनेक जण गोवलेले असतात. रोममधील ख्रिश्‍चनांची हीच समस्या होती, ज्यांना प्रेषित पौलाने एक देवप्रेरित पत्र लिहिले. तेथे यहुदी ख्रिश्‍चनांमध्ये व यहुदीतर ख्रिश्‍चनांमध्ये वाद निर्माण झाला होता. त्या मंडळीतील काही जणांचा विवेक दुर्बळ, किंवा संकुचित होता. अशांना मंडळीतील इतर जण तुच्छ लेखत होते. असे व्यक्‍ती, सर्वस्वी वैयक्‍तिक बाबींसंबंधी अनुचितपणे इतरांचा न्याय करत होते. तर मग, पौलाने त्या मंडळीला कोणता सल्ला दिला?—रोम. १४:१-६.

पौलाने दोन्ही पक्षांच्या लोकांना सल्ला दिला. आपण मोशेच्या नियमशास्त्राच्या अधीन नाहीत असे मानणाऱ्‍यांना पौलाने सांगितले की त्यांनी आपल्या बांधवांना तुच्छ लेखू नये. (रोम. १४:२, १०) ही मनोवृत्ती, मोशेच्या नियमशास्त्रात मनाई केलेले अन्‍नपदार्थ खाणे ज्या विश्‍वासू जनांना अजूनही किळसवाणे वाटत होते अशांना अडखळण ठरणार होती. पौलाने त्यांना असा सल्ला दिला: “अन्‍नाकरिता देवाचे कार्य ढासळून पाडू नको. मांस न खाणे, द्राक्षरस न पिणे, आणि जेणेकरून तुझा भाऊ ठेचाळतो [किंवा अडखळतो अथवा अशक्‍त होतो] ते न करणे हे चांगले.” (रोम. १४:१४, १५, २०, २१) दुसरीकडे, ज्या ख्रिश्‍चनांचा विवेक अधिक संकुचित होता अशांना पौलाने सल्ला दिला की त्यांनी ज्यांचा दृष्टिकोन व्यापक आहे अशांना अविश्‍वासू मानू नये. (रोम. १४:१३) पौलाने ‘त्यांच्यापैकी प्रत्येकाला सांगितले, की त्यांनी आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक मानू नये.’ (रोम. १२:३) या वादात गोवलेल्या दोन्ही पक्षांना सल्ला दिल्यावर पौलाने असे लिहिले: “तर मग शांतीला व परस्परांच्या बुद्धीला पोषक होणाऱ्‍या गोष्टींच्या मागे आपण लागावे.”—रोम. १४:१९.

१०. रोममधील ख्रिश्‍चनांप्रमाणेच, आज एखाद्या समस्येत गोवलेल्यांनी समस्या सोडवण्यासाठी काय केले पाहिजे?

१० पौलाने दिलेल्या सल्ल्याला रोमन ख्रिश्‍चनांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि आवश्‍यक बदल केले याची आपण खातरी बाळगू शकतो. आज ख्रिस्ती बांधवांमध्ये मतभेद निर्माण होतात, तेव्हा आपणही नम्रतेने शास्त्रवचनातील सल्ला लागू करण्याद्वारे प्रेमळपणे समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू नये का? आज एखाद्या समस्येत गोवलेल्या दोन्ही पक्षांच्या लोकांनी, ‘एकमेकांबरोबर शांतीने राहण्यासाठी’ रोममधील ख्रिश्‍चनांप्रमाणेच आवश्‍यक बदल करणे गरजेचे आहे.—मार्क ९:५०.

मदत मागितली जाते तेव्हा . . .

११. एखाद्या ख्रिस्ती व्यक्‍तीला एखाद्या बंधू अथवा भगिनीसोबत काही समस्या असेल, आणि त्याबद्दल तिला मंडळीतील एखाद्या वडिलांशी बोलायचे असेल, तर वडिलांनी कोणती काळजी घेतली पाहिजे?

११ एखाद्या ख्रिस्ती व्यक्‍तीला आपल्या एखाद्या नातेवाइकासोबत किंवा बंधू अथवा भगिनीसोबत काही समस्या असेल, आणि त्याबद्दल जर तिला मंडळीतील एखाद्या वडिलांशी बोलायचे असेल तर काय? नीतिसूत्रे २१:१३ म्हणते: “गरिबाची आरोळी ऐकून जो कानांत बोटे घालितो तोहि आरोळी करील पण कोणी ऐकणार नाही.” तेव्हा, एक वडील त्यांच्या बोलण्याकडे नक्कीच दुर्लक्ष करणार नाही. पण, आणखी एक नीतिसूत्र अशी ताकीद देते: “सुरुवातीला बोलणारा माणूस नेहमी बरोबर आहे असे तोपर्यंत वाटत असते, जोपर्यंत कुणीतरी येऊन त्याला प्रश्‍न विचारीत नाही.” (नीति. १८:१७, इझी-टू-रीड व्हर्शन) वडिलांनी प्रेमळपणे ऐकून घेतले पाहिजे, पण जी व्यक्‍ती प्रथम त्यांना समस्या कळवते तिची बाजू न घेण्याविषयी त्यांनी काळजी घेतली पाहिजे. तिची समस्या ऐकून घेतल्यावर, ती याबद्दल आपले मन दुखावणाऱ्‍या व्यक्‍तीशी बोलली की नाही, हे वडील तिला विचारू शकतात. आपल्या बंधुभगिनींसोबत शांती राखण्यासाठी आपण काय केले पाहिजे याविषयी शास्त्रवचनांत जे सांगितले आहे त्याची चर्चादेखील वडील तिच्यासोबत करू शकतात.

१२. एखाद्या तक्रारीविषयी ऐकून तडकाफडकी निर्णय घेणे धोकेदायक ठरू शकते याची उदाहरणे सांगा.

१२ एखाद्या समस्येची केवळ एक बाजू ऐकून तडकाफडकी निर्णय घेणे किती धोकेदायक आहे हे बायबलमधील तीन उदाहरणांवरून दिसून येते. योसेफाने आपल्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला असे पोटीफरच्या बायकोने सांगितलेल्या खोट्या कहाणीवर पोटीफरने विश्‍वास ठेवला. पोटीफर इतका संतापला की त्याने योसेफाला तुरुंगात टाकले. (उत्प. ३९:१९, २०) आपला स्वामी मफीबोशेथ याने दाविदाच्या शत्रूंचा पक्ष घेतला आहे असे सीबाने दावीद राजाला खोटे सांगितले तेव्हा दाविदाने त्याच्यावर विश्‍वास ठेवला. दाविदाने लगेच त्याला म्हटले: “मफीबोशेथाचे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे.” (२ शमु. १६:४; १९:२५-२७) यहुदी लोक जेरूसलेमच्या तटांची पुनर्बांधणी करत आहेत आणि ते पारस साम्राज्याविरुद्ध बंड करणार आहेत असे अर्तहशश्‍त राजाला सांगण्यात आले, तेव्हा राजाने या खोट्या बातमीवर विश्‍वास ठेवला आणि जेरूसलेममधील पुनर्बांधणीची सर्व कामे थांबवण्याचा हुकूम दिला. परिणामस्वरूप, यहुद्यांनी देवाचे मंदिर बांधण्याचे थांबवले. (एज्रा ४:११-१३, २३, २४) एखादी समस्या पूर्णपणे जाणून घेण्याआधीच निर्णय न घेण्याचा जो सल्ला पौलाने तीमथ्याला दिला त्याचे ख्रिस्ती वडिलांनी सुज्ञपणे पालन केले पाहिजे.१ तीमथ्य ५:२१ वाचा.

१३, १४. (क) दोन व्यक्‍तींमध्ये समस्या निर्माण होतात, तेव्हा आपण काय लक्षात ठेवले पाहिजे? (ख) बांधवांमधील समस्यांसंबंधी योग्य निर्णय देण्याकरता कोणती गोष्ट वडिलांना मदत करू शकते?

१३ दोन व्यक्‍तींमध्ये निर्माण झालेल्या समस्येविषयी आपल्याला सर्व काही माहीत आहे असे आपल्याला वाटू शकते. तरीसुद्धा, बायबलमध्ये जे म्हटले आहे ते लक्षात ठेवणे जरुरीचे आहे. ते म्हणते: “जर कोणाला वाटत असेल की, आपल्याला एखादी गोष्ट कळते तर ज्याप्रमाणे कळले पाहिजे त्याप्रमाणे त्याला अद्याप कळत नाही.” (१ करिंथ. ८:२) एखादी समस्या का निर्माण झाली याविषयी खरोखर आपल्याला सर्व काही माहीत आहे का? ज्यांच्यामध्ये ही समस्या निर्माण झाली त्या व्यक्‍तींच्या पार्श्‍वभूमींबद्दल आपण पूर्णपणे जाणून घेऊ शकतो का? एखादी समस्या सोडवण्यासाठी वडिलांना मदत मागितली जाते, तेव्हा त्यांनी खोट्या माहितीवर किंवा अफवांवर विश्‍वास न ठेवणे किती गरजेचे आहे! देवाचा नियुक्‍त न्यायाधीश, येशू ख्रिस्त, नीतिमत्तेने न्याय करतो. तो ‘डोळ्यांनी पाहतो तेवढ्यावरूनच न्याय करत नाही. कानांनी ऐकतो तेवढ्यावरूनच न्याय करत नाही.’ (यश. ११:३, ४) त्याउलट, तो यहोवाच्या आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार चालतो. त्याच प्रकारे, ख्रिस्ती वडिलांनीदेखील देवाच्या पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन स्वीकारले पाहिजे.

१४ आपल्या बांधवांच्या समस्यांसंबंधी कोणताही निर्णय देण्याआधी, ख्रिस्ती वडिलांनी यहोवाच्या आत्म्याकरता प्रार्थना करणे गरजेचे आहे. तसेच, देवाच्या वचनातील सल्ल्याचा आणि विश्‍वासू व बुद्धिमान दासाने पुरवलेल्या प्रकाशनांतील सल्ल्याचा उपयोग करण्याद्वारे त्यांनी पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन स्वीकारले पाहिजे.—मत्तय २४:४५.

कोणत्याही परिस्थितीत शांती राखावी का?

१५. आपल्याला एखाद्या गंभीर पापाबद्दल कळले असेल, तर त्याबद्दल आपण वडिलांना केव्हा सांगितले पाहिजे?

१५ ख्रिस्ती या नात्याने आपल्याला शांती राखण्याचे प्रोत्साहन देण्यात आले आहे. पण बायबल असेही म्हणते: ‘वरून येणारे ज्ञान हे मुळात शुद्ध असते; शिवाय ते शांतिप्रिय असते.’ (याको. ३:१७) आपण शांतिप्रिय असण्याआधी शुद्ध असले पाहिजे, म्हणजे आपण देवाच्या शुद्ध नैतिक स्तरांचे व अपेक्षांचे पालन केले पाहिजे. एखाद्या बंधू किंवा भगिनीने गंभीर पाप केले आहे असे एका ख्रिस्ती व्यक्‍तीला समजते, तेव्हा तिने पाप करणाऱ्‍या व्यक्‍तीला आपले पाप वडिलांजवळ कबूल करण्याचे प्रोत्साहन दिले पाहिजे. (१ करिंथ. ६:९, १०; याको. ५:१४-१६) तिने तसे केले नाही, तर ज्या व्यक्‍तीला या पापाबद्दल माहीत झाले आहे तिने ख्रिस्ती वडिलांना त्याबद्दल कळवले पाहिजे. पण, आपण पाप करणाऱ्‍या व्यक्‍तीसोबत शांती राखू इच्छितो असा विचार करून जर त्या व्यक्‍तीने वडिलांना सांगितले नाही, तर तीदेखील तिच्या पापात सहभागी होते.—लेवी. ५:१; नीतिसूत्रे २९:२४ वाचा.

१६. येहू आणि योराम राजा एकमेकांना भेटले तेव्हा जे घडले त्याच्यावरून आपण काय शिकू शकतो?

१६ अपराध करणाऱ्‍या व्यक्‍तीसोबत शांतीचे संबंध राखण्यापेक्षा देवाच्या नीतिमत्तेचे पालन करणे सगळ्यात महत्त्वाचे आहे हे येहूबद्दलच्या एका अहवालातून दिसून येते. देवाने येहूला अहाब राजाच्या घराण्यावर न्यायदंड बजावण्यासाठी पाठवले. अहाब आणि ईजबेल यांचा पुत्र अर्थात दुष्ट राजा योराम आपल्या रथात बसून येहूला भेटायला गेला तेव्हा त्याने येहूला विचारले: “येहू तू शांततेसाठीच आला आहेस ना?” येहू म्हणाला: “तुझी आई ईजबेल हिचे व्यभिचार आणि चेटके चालू असेपर्यंत कसली आली आहे शांतता?” (२ राजे ९:२२, ईझी-टू-रीड व्हर्शन) असे म्हणून येहूने धनुष्य ओढून बाण मारला आणि तो योरामच्या हृदयाच्या आरपार गेला. त्याचप्रमाणे, ख्रिस्ती वडिलांनीसुद्धा शांती राखण्याच्या उद्देशाने, जाणूनबुजून व अपश्‍चात्तापीपणे पाप करणाऱ्‍यांशी समझोता करू नये. ख्रिस्ती वडील, अपश्‍चात्तापी व्यक्‍तीला मंडळीतून बहिष्कृत करतात, जेणेकरून देवासोबत असलेली मंडळीची शांती टिकून राहते.—१ करिंथ. ५:१, २, ११-१३.

१७. मंडळीत शांती राखण्यासाठी सर्व ख्रिश्‍चनांनी काय केले पाहिजे?

१७ बरेचदा, बांधवांमधील समस्या किरकोळ स्वरूपाच्या असतात. तेव्हा, आपल्या बंधुभगिनींच्या चुकांकडे दुर्लक्ष करणे सगळ्यात चांगले. बायबल म्हणते: “जो अपराध झाकतो तो प्रीती हुडकतो, परंतु जो गोष्ट घोकतो तो जिवलग मित्रांस वियुक्‍त करतो.” (नीति. १७:९, पं.र.भा.) बायबलमधील या शब्दांनुसार आपण करतो, तेव्हा मंडळीत शांती राखण्यास व यहोवासोबत चांगला नातेसंबंध टिकवून ठेवण्यास आपल्याला मदत मिळेल.—मत्त. ६:१४, १५.

शांती राखल्याने आशीर्वाद मिळतात

१८, १९. शांती राखल्याने कोणकोणते आशीर्वाद मिळतात?

१८ आपण ‘शांतीला पोषक होणाऱ्‍या गोष्टींच्या’ मागे लागतो तेव्हा आपल्याला भरपूर आशीर्वाद मिळतात. आपण यहोवाच्या मार्गांचे अनुकरण करतो तेव्हा आपण त्याच्यासोबत एक घनिष्ठ नातेसंबंध जोडतो, आणि आपल्या आध्यात्मिक नंदनवनातील शांतीपूर्ण ऐक्याला हातभार लावतो. मंडळीमध्ये शांती राखण्याचा प्रयत्न केल्यामुळे, आपण ज्यांना ‘शांतीची सुवार्ता’ सांगतो त्यांच्यासोबतही शांतीने वागण्यास आपल्याला मदत मिळते. (इफिस. ६:१५) आपण ‘सर्वांबरोबर सौम्यतेने’ व ‘सहनशीलतेने’ वागण्यास तयार असतो.—२ तीम. २:२४.

१९ हेदेखील आठवणीत ठेवा की “नीतिमानांचे व अनीतिमानांचे पुनरुत्थान होईल.” (प्रे. कृत्ये २४:१५) या पृथ्वीवर ही आशा पूर्ण होईल येईल, तेव्हा विविध पार्श्‍वभूमी, स्वभाव व व्यक्‍तिमत्त्वाच्या लाखो लोकांना—अगदी “जगाच्या स्थापनेपासून” होऊन गेलेल्या लोकांनासुद्धा पुनरुत्थित केले जाईल! (लूक ११:५०, ५१) या पुनरुत्थित लोकांना शांतीचे मार्ग शिकवणे हा खरोखर एक मोठा सुहक्क असेल. शांती राखणारे या नात्याने आपल्याला आता जे प्रशिक्षण मिळत आहे त्याचा त्या वेळी आपल्याला किती मोठा फायदा होईल!

[तळटीप]

^ बदनामी आणि फसवणूक यांसारखे गंभीर प्रकारचे पाप कसे हाताळावेत याविषयीच्या शास्त्रवचनीय मार्गदर्शनासाठी टेहळणी बुरूज, १५ ऑक्टोबर १९९९, पृष्ठे १७-२२ पाहा.

तुम्हाला काय शिकायला मिळाले?

• आपण एखाद्याचे मन दुखावले असेल, तर आपण कशा प्रकारे त्याच्यासोबत शांती प्रस्थापित करू शकतो?

• एखाद्याने आपले मन दुखावले असेल, तर त्याच्यासोबत शांती प्रस्थापित करण्यासाठी आपण काय केले पाहिजे?

• बांधवांमध्ये समस्या निर्माण होतात तेव्हा एकाचा पक्ष घेणे सुज्ञपणाचे का ठरणार नाही?

• आपण सर्व परिस्थितींत शांती राखण्याचा प्रयत्न करावा का? स्पष्ट करा.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२९ पानांवरील चित्रे]

जे इतरांना मनापासून क्षमा करतात त्यांच्यावर यहोवा प्रेम करतो