व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाची सेवा करण्यात मला नेहमीच आनंद मिळाला

यहोवाची सेवा करण्यात मला नेहमीच आनंद मिळाला

यहोवाची सेवा करण्यात मला नेहमीच आनंद मिळाला

फ्रेड रस्क यांच्याद्वारे कथित

स्तोत्र २७:१० मध्ये असलेले दाविदाचे शब्द किती खरे आहेत हे मी लहान वयातच अनुभवलं: “माझ्या आईबापांनी मला सोडिले तरी परमेश्‍वर मला जवळ करील.” हे शब्द माझ्या बाबतीत कसे खरे ठरले ते मी तुम्हाला सांगू इच्छितो.

मी सन १९३० च्या दशकातील आर्थिक महामंदीच्या काळात, अमेरिकेतील जॉर्जिया राज्यात माझ्या आजोबांच्या कापसाच्या मळ्यावर लहानाचा मोठा झालो. माझ्या आईच्या व नुकत्याच जन्मलेल्या माझ्या भावाच्या मृत्यूमुळे माझे बाबा भावनिक रीत्या उद्‌ध्वस्त झाले होते. त्यामुळे, ते मला त्यांच्या विधूर बाबांजवळ म्हणजे माझ्या आजोबांजवळ सोडून एका दूरच्या शहरात कामाच्या निमित्तानं गेले. नंतर, त्यांनी मला त्यांच्याकडे बोलावून घेण्याचा अनेकदा प्रयत्न केला, पण ते कधीच शक्य झालं नाही.

आजोबांच्या थोरल्या मुली घर सांभाळायच्या. आजोबा धार्मिक वृत्तीचे नव्हते, पण त्यांच्या मुली सदर्न बॅप्टिस्ट चर्चचे कट्टर सदस्य होते आणि मी त्यांच्या विश्‍वासाचं पालन करावं असा त्यांचा आग्रह होता. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे न केल्यास ते मला मारण्याची धमकी द्यायचे. त्या भीतीमुळे, मी दर रविवारी चर्चला जायचो. त्यामुळे, धर्माविषयी मला लहानपणापासूनच आस्था नव्हती. पण, मला शाळेत जायला व खेळायला खूप आवडायचं.

एक भेट ज्यामुळे माझं जीवन पार बदलून गेलं

सन १९४१ ची गोष्ट आहे. एके दिवशी दुपारी एक वयस्कर गृहस्थ आणि त्यांची पत्नी आमच्या घरी आले. त्या वेळी मी १५ वर्षांचा होतो. “मी तुझा अंकल टालमाज रस्क आहे,” असं म्हणून त्या गृहस्थांनी मला स्वतःची ओळख करून दिली. मी त्यांच्याबद्दल कधीच ऐकलं नव्हतं. पण, ते व त्यांची पत्नी यहोवाचे साक्षीदार असल्याचं मला कळलं. त्यांनी आम्हाला सांगितलं की सर्व मानवांनी सदासर्वकाळ या पृथ्वीवर राहावं असा देवाचा उद्देश आहे. हे मी चर्चमध्ये कधीच ऐकलं नव्हतं. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी कुटुंबातील बहुतेकांनी नाकारल्या; इतकंच काय, त्यांनी त्यांचा तिरस्कारही केला. त्यांना पुन्हा कधीच आमच्या घरी येण्याची परवानगी नव्हती. पण, माझी धाकटी आत्या मेरी, जी वयानं माझ्यापेक्षा केवळ तीन वर्षांनी मोठी होती, तिनं त्यांच्याकडून एक बायबल आणि बायबलचं स्पष्टीकरण देणारी प्रकाशनं स्वीकारली.

आपल्याला बायबलचं सत्य सापडलं आहे याची मेरीला लवकरच खातरी पटली. तिनं १९४२ मध्ये बाप्तिस्मा घेतला आणि ती एक यहोवाची साक्षीदार बनली. पण, येशूनं आधीच जे सांगितलं होतं ते तिनं अनुभवलं: “मनुष्याच्या घरचेच लोक त्याचे वैरी होतील.” (मत्त. १०:३४-३६) होय, कुटुंबाकडून तिचा खूप विरोध झाला. मेरीच्या एका थोरल्या बहिणीचा त्या प्रदेशातील राजकारणात दबदबा असल्यामुळे तिनं तिथल्या महापौरासोबत कट रचून अंकल टालमाज यांना अटक केली. अंकल टालमाज यांच्यावर, विनापरवाना घरोघर जाऊन वस्तू विकण्याचा आरोप लावण्यात आला होता. या आरोपावर त्यांना तुरुंगात पाठवण्यात आलं.

तो महापौर न्यायाधीशदेखील होता आणि शहर न्यायालयात त्यानं जे म्हटलं त्याबद्दलची बातमी आमच्या शहरातील वर्तमानपत्रात छापून आली. त्यानं म्हटलं: “हा माणूस ज्या साहित्याचं वाटप करतो . . . ते जीवघेण्या विषासारखं आहे.” माझ्या अंकलनं कोर्टात अपील केली आणि ते खटला जिंकले; पण, त्यादरम्यान त्यांना दहा दिवस तुरुंगात घालवावे लागले होते.

माझ्या आत्यानं मला मदत केली

माझी आत्या मेरी ही तिच्या नवीन विश्‍वासांबद्दल मला सांगू लागली; सोबतच ती शेजाऱ्‍यांनादेखील याविषयी साक्ष देऊ लागली. नवे जग (इंग्रजी) * हे पुस्तक स्वीकारलेल्या एका माणसासोबत मेरी बायबल अभ्यास चालवायची. मी तिच्यासोबत त्या अभ्यासाला गेलो तेव्हा त्या माणसाच्या पत्नीनं आम्हाला सांगितलं की तिच्या पतीनं संपूर्ण रात्र जागून ते पुस्तक वाचलं होतं. मला कोणत्याही धार्मिक गोष्टीत स्वतःला इतक्या लवकर गोवून घ्यायची इच्छा नसली, तरी मी जे शिकत होतो ते मला आवडलं. पण, साक्षीदार हे देवाचे लोक आहेत याची खातरी मला प्रथम बायबल शिकवणींमुळे नव्हे, तर साक्षीदारांना लोकांकडून जी वागणूक मिळत होती त्यावरून पटली.

उदाहरणार्थ, एके दिवशी आम्ही शेतात काम करून घरी परत येत होतो तेव्हा कचरा जाळण्याच्या भट्टीतून निघणारा धूर पाहून आम्हाला समजलं, की मेरीच्या थोरल्या बहिणींनी तिचं साहित्य, एक फोनोग्राफ व बायबल संदेश असलेले काही रेकॉर्ड जाळून टाकले होते. मला याचा खूप राग आला, पण माझ्या एका थोरल्या आत्यानं मला फटकारलं. तिनं म्हटलं: “आम्ही जे केलं त्याबद्दल नंतर तू आमचे उपकार मानशील.”

मेरीनं आपल्या नवीन विश्‍वासाचा त्याग करण्यास व शेजाऱ्‍यांना प्रचार करण्याचं थांबवण्यास नकार दिल्यामुळे, १९४३ मध्ये तिला नाइलाजानं घर सोडावं लागलं. त्या वेळेपर्यंत, देवाचं नाव यहोवा आहे हे मी शिकलो होतो; इतकंच नाही, तर यहोवा एक प्रेमळ, करुणामय देव आहे आणि तो लोकांना अग्नीत यातना देत नाही हेसुद्धा मी शिकलो होतो आणि त्याबद्दल मी खूप आनंदी होतो. मी अजूनपर्यंत एकदाही सभेला गेलो नव्हतो, तरी यहोवाची एक प्रेमळ संघटना आहे हेदेखील मी शिकलो.

नंतर, एकदा मी अंगणातील गवत कापत असताना एक कार तिथं आली आणि त्यात बसलेल्या दोघांपैकी एकानं मी फ्रेड आहे का असं मला विचारलं. ते यहोवाचे साक्षीदार आहेत हे मला समजलं तेव्हा मी त्यांना म्हणालो, “आपण एका सुरक्षित ठिकाणी जाऊ या आणि तिथं निवांतपणे बोलू या.” माझी आत्या मेरी हिनं त्या दोघांना माझी भेट घेण्यासाठी पाठवलं होतं. त्या दोघांपैकी एकाचं नाव होतं शील्ड टूट्‌जीअन, जो एक प्रवासी सेवक होता. त्यानं मला प्रोत्साहन व आध्यात्मिक मार्गदर्शन दिलं ज्याची मला त्या वेळी सर्वात जास्त गरज होती. मी यहोवाच्या साक्षीदारांच्या शिकवणींचं समर्थन करत असल्यामुळे कुटुंबातील लोक आता माझा विरोध करू लागले.

मेरी व्हर्जिनियामध्ये राहत होती. तिथून तिनं मला एक पत्र लिहिलं. त्यात तिनं म्हटलं की मी जर यहोवाची सेवा करण्याचा निर्धार केला असेल, तर मी तिच्याकडे राहायला जाऊ शकतो. मी लगेच तिच्याकडे जाण्याचा निर्णय घेतला. ऑक्टोबर १९४३ मध्ये एका शुक्रवारी मी काही गरजेच्या वस्तू एका खोक्यात भरल्या आणि घरापासून काही अंतरावर असलेल्या एका झाडाला ते खोकं बांधलं. शनिवारी मी ते खोकं तिथून काढलं व लोकांचं लक्ष चुकवत मी एका शेजाऱ्‍याच्या घरी गेलो. तिथून मी रोआनोक शहरात गेलो आणि त्या शहरात गेल्यानंतर, मला माझी आत्या भेटली जी एडना फौल्स यांच्या घरी राहत होती.

आध्यात्मिक प्रगती, बाप्तिस्मा, बेथेल सेवा

एडना एक सहानुभूतीशील अभिषिक्‍त ख्रिस्ती होती. ती बायबलमध्ये उल्लेख केलेल्या लुदियासारखी होती. तिनं एक मोठं घर भाड्यानं घेतलं होतं व माझी आत्या मेरी हिच्याव्यतिरिक्‍त तिनं आपल्या वहिनीला व तिच्या दोन मुलींना आपल्या घरात आसरा दिला होता. या दोन मुली, ग्लॅडिस आणि ग्रेस ग्रेगरी, नंतर मिशनरी बनल्या. ग्लॅडिस आता नव्वदीत आहे आणि अजूनही ती विश्‍वासूपणे जपान शाखा कार्यालयात सेवा करत आहे.

एडनाच्या घरी राहताना मी नियमितपणे सभांना उपस्थित राहू लागलो व सेवाकार्य कसं करायचं याविषयी मला प्रशिक्षण मिळालं. देवाच्या वचनाचा अभ्यास करण्याचं आणि ख्रिस्ती सभांना जाण्याचं स्वातंत्र्य मिळाल्यामुळे माझी वाढती आध्यात्मिक भूक तृप्त होऊ लागली. १४ जून १९४४ रोजी मी बाप्तिस्मा घेतला. माझी आत्या मेरी आणि ग्लॅडिस व ग्रेस ग्रेगरी या दोघ्या बहिणींनी पायनियर सेवा करायला सुरुवात केली आणि त्यांना उत्तर व्हर्जिनियामध्ये नेमणूक मिळाली. व्हर्जिनियातल्या लीसबर्ग नगरात एका मंडळीची स्थापना करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. १९४६ च्या सुरुवातीला, तिथून जवळच असलेल्या एक प्रदेशात मी पायनियर सेवा करू लागलो. त्या वर्षीच्या उन्हाळ्यात, ओहायो राज्यातील क्लिव्हलँड इथं ४-११ ऑगस्ट दरम्यान भरलेल्या एका अविस्मरणीय आंतरराष्ट्रीय अधिवेशनाला आम्ही सगळे एकत्र गेलो.

त्या अधिवेशनात, त्या वेळी संघटनेत पुढाकार घेणारे नेथन नॉर यांनी ब्रुकलिन बेथेलच्या विस्तार योजनेबद्दल सांगितलं. या योजनेत, राहण्यासाठी एक नवीन इमारत बांधणं व छापखान्याचा विस्तार करणं या गोष्टी समाविष्ट होत्या. त्यासाठी अनेक तरुण बांधवांची गरज होती. मी ठरवून टाकलं की मी इथंच यहोवाची सेवा करेन. म्हणून मी बेथेल सेवेसाठी अर्ज भरला आणि काही महिन्यांतच म्हणजे १ डिसेंबर १९४६ मध्ये मी बेथेलला गेलो.

त्याच्या सुमारे एका वर्षानंतर, मी पत्रव्यवहार विभागात काम करत असताना छापखान्याचे पर्यवेक्षक मॅक्स लार्सन हे माझ्याकडे आले. मला सेवा विभागात नेमण्यात आलं असल्याचं त्यांनी मला सांगितलं. त्या नेमणुकीत असताना आणि खासकरून त्या विभागाचे पर्यवेक्षक टी. जे. (बड) सलिवन यांच्यासोबत काम करताना, बायबलची तत्त्वं लागू करण्याबद्दल आणि देवाची संघटना कशा प्रकारे काम करते त्याबद्दल मी खूप काही शिकलो.

माझे बाबा अनेकदा मला भेटायला बेथेलमध्ये आले. त्यांच्या जीवनाच्या शेवटच्या काळात ते काहीसे धार्मिक बनले होते. १९६५ मध्ये ते मला शेवटच्या वेळी भेटायला आले तेव्हा त्यांनी मला म्हटलं: “तू मला भेटायला येऊ शकतोस, पण मी तुला भेटायला पुन्हा कधीच इथं येणार नाही.” त्यांच्या मृत्यूच्या आधी मी त्यांना काही वेळा जाऊन भेटलो. आपण नक्कीच स्वर्गात जाऊ असं त्यांना वाटायचं. पण, मी आशा करतो की ते यहोवाच्या स्मरणात आहेत, आणि असं असल्यास, जेव्हा त्यांचं पुनरुत्थान होईल तेव्हा त्यांनी आशा केल्याप्रमाणे ते स्वर्गात नव्हे, तर या पृथ्वीवर पुनःस्थापित केलेल्या नंदनवनात सदासर्वकाळ जगतील.

इतर अविस्मरणीय अधिवेशनं व बांधकाम

आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी अधिवेशनांनी नेहमीच खूप महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. खासकरून, १९५० च्या दशकात न्यू यॉर्कच्या यांकी स्टेडियममध्ये भरलेल्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनांबद्दल असे म्हणता येईल. १९५८ मध्ये यांकी स्टेडियम व पोलो ग्राऊंडस ही दोन ठिकाणं एका सत्राच्या वेळी १२३ देशांतून आलेल्या २,५३,९२२ जणांनी खचाखच भरली होती. त्या अधिवेशनात घडलेली एक घटना मी कधीच विसरणार नाही. मी अधिवेशन कार्यालयात मदत करत होतो त्या वेळी बंधू नॉर लगबगीनं माझ्याजवळ आले. ते मला म्हणाले: “फ्रेड, जवळच्याच एका सभागृहात काही पायनियर जमले आहेत. पण, त्यांना भाषण देण्यासाठी कोणा बांधवाला नेमण्याचं माझ्याकडून राहूनच गेलं. तू लगेच तिथं जा आणि जाताना वाटेत तुझ्या मनात जो विषय येईल त्याच्यावर आधारित एक चांगलं भाषण दे.” मी धापा टाकत तिथं पोहचलो; वाटेत मी देवाला खूप प्रार्थना केली.

१९५० आणि १९६० च्या दशकांत न्यू यॉर्क सिटीतील मंडळ्यांची संख्या उल्लेखनीय रीतीनं वाढत असल्यामुळे, भाड्यानं घेतलेली राज्य सभागृहं अपुरी पडू लागली. म्हणून, १९७० ते १९९० या काळात, सभांसाठी उचित सभागृहं उपलब्ध करून देण्यासाठी मॅनहट्टनमध्ये तीन इमारती विकत घेण्यात आल्या आणि त्यांच्या रचनेत फेरफार करून त्यांची पुनर्बांधणी करण्यात आली. या बांधकाम प्रकल्पांसाठी असलेल्या बांधकाम समित्यांचा मी अध्यक्ष होतो. खऱ्‍या उपासनेची केंद्रे असलेल्या या इमारतींच्या बांधकामासाठी मंडळ्यांनी पैशाची व्यवस्था केली व इमारतींच्या बांधकामात मदत केली. या सर्व मंडळ्यांना यहोवानं कशा प्रकारे आशीर्वाद दिले याच्या अनेक गोड आठवणी माझ्याजवळ आहेत.

जीवनात बदल

सन १९५७ मध्ये एके दिवशी, बेथेलमध्ये मी ज्या इमारतीत राहत होतो त्याच्या व छापखाण्याच्या मध्ये असलेल्या बागेतून मी कामावर चालत जात होतो, तेव्हा पाऊस सुरू झाला. बेथेलमध्ये नवीनच आलेली एक सुंदर मुलगी माझ्यापुढे चालताना मला दिसली. तिच्याजवळ छत्री नव्हती, म्हणून मी तिला माझ्या छत्रीखाली यायला सांगितलं. अशा प्रकारे मी मार्जोरीला पहिल्यांदा भेटलो. आणि १९६० मध्ये आम्ही लग्न केलं. तेव्हापासून आम्ही दोघं, ऊन असो, पाऊस असो, यहोवाच्या सेवेत आनंदानं एकत्र चालत आहोत. सप्टेंबर २०१० मध्ये आम्ही आमच्या लग्नाचा ५० वा वाढदिवस साजरा केला.

आम्ही नुकतंच आमच्या हनीमूनवरून परतलो होतो. बंधू नॉर यांनी मला सांगितलं की मला गिलियड प्रशालेचा प्रशिक्षक म्हणून नेमण्यात आलं आहे. तो किती खास विशेषाधिकार होता! १९६१ ते १९६५ या दरम्यान पाच दीर्घकालीन वर्ग भरवण्यात आले होते, ज्यांत प्रामुख्यानं शाखा कार्यालयात काम करणाऱ्‍या बांधवांचा समावेश होता. या बांधवांना शाखा व्यवस्थापनाविषयी खास प्रशिक्षण देण्यात आलं. १९६५ च्या शरदऋतूत, नेहमीचे पाच महिन्यांचे वर्ग सुरू झाले आणि पुन्हा एकदा मिशनऱ्‍यांना प्रशिक्षण देण्यावर भर देण्यात आला.

सन १९७२ पर्यंत मी गिलियड प्रशालेचा प्रशिक्षक म्हणून सेवा केली. मग त्या वर्षी मला लेखन पत्रव्यवहार विभागात काम करण्यासाठी पाठवण्यात आलं, जिथं मी त्या विभागाचा पर्यवेक्षक म्हणून सेवा केली. निरनिराळ्या प्रश्‍नांची उत्तरे देण्यासाठी व निरनिराळ्या समस्या हाताळण्यासाठी संशोधन केल्यामुळे, देवाच्या वचनातील शिकवणी चांगल्या प्रकारे समजण्यास व इतरांना साहाय्य करण्यासाठी देवाची उच्च तत्त्वं लागू करण्यास मला मदत मिळाली.

नंतर, १९८७ मध्ये मला इस्पितळ माहिती सेवा नावाच्या एका नवीन विभागात नेमण्यात आलं. रक्‍ताबद्दल असलेल्या आपल्या शास्त्रवचनीय भूमिकेविषयी डॉक्टर, न्यायाधीश आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी, इस्पितळ संपर्क समितीवर सेवा करणारे वडील कशा प्रकारे त्यांच्याशी संपर्क साधू शकतात हे शिकवण्यासाठी चर्चासत्रं आयोजित करण्यात आली होती. कारण, अनेक डॉक्टर यहोवाच्या साक्षीदारांच्या मुलांना, त्यांच्या आईवडिलांना न विचारता परस्पर रक्‍त देत होते आणि यासाठी बरेचदा ते कोर्टाचा आदेश मिळवत होते.

रक्‍त संक्रमणाऐवजी पर्यायी औषधं वापरण्याविषयी डॉक्टरांना सुचवलं जायचं, तेव्हा डॉक्टरांचं उत्तर असायचं की ही औषधं उपलब्ध नाहीत किंवा ती खूप महाग आहेत. असं म्हणणाऱ्‍या डॉक्टरला मी विचारायचो: “जरा आपला हात पुढं करा.” ते आपला हात पुढं करायचे, तेव्हा मी म्हणायचो: “तुम्हाला माहीतंय का, रक्‍ताचा सगळ्यात चांगला पर्याय तुमच्या या हातातच आहे?” अशा प्रकारे डॉक्टरचं कौतुक केल्यानं, डॉक्टरला आधीपासूनच माहीत असलेल्या एका गोष्टीची, म्हणजे शस्त्रक्रियेच्या वेळी कमीत कमी रक्‍तस्राव होईल अशा रीतीनं शस्त्रक्रियेच्या चाकूचा वापर करण्याची त्यांना जाणीव व्हायची.

मागील दोन दशकांत, रक्‍ताच्या पर्यायांबद्दल डॉक्टरांना व न्यायाधीशांना माहिती देण्याच्या कार्यावर यहोवानं भरपूर आशीर्वाद दिले आहेत. आपल्या भूमिकेविषयी त्यांनी चांगल्या प्रकारे जाणून घेतलं, तेव्हा त्यांच्या मनोवृत्तीत विलक्षण बदल घडून आला. रक्‍ताचे पर्याय जास्त परिणामकारक आहेत हे वैद्यकीय संशोधनातून सिद्ध झाल्याचं त्यांना समजलं आहे. तसेच, सहकार्य करणारे अनेक डॉक्टर उपलब्ध असल्याचं व रुग्णाला हलवता येईल अशी इस्पितळं असल्याचंदेखील त्यांना समजलं आहे.

सन १९९६ पासून मी आणि मार्जोरी, ब्रुकलिनच्या उत्तरेला ११० किलोमीटर अंतरावर न्यू यॉर्कमधील पॅटरसन इथं असलेल्या वॉचटावर शैक्षणिक केंद्रात (वॉचटावर एज्यूकेशनल सेंटर) सेवा करत आहोत. इथं मी काही काळ सेवा विभागात काम केलं आणि नंतर काही काळ, शाखा कार्यालयात काम करणाऱ्‍यांना आणि प्रवासी पर्यवेक्षकांना प्रशिक्षण देण्याचं काम केलं. मागील १२ वर्षांपासून मी पुन्हा, ब्रुकलिनवरून पॅटरसन इथं हलवण्यात आलेल्या लेखन पत्रव्यवहार विभागात पर्यवेक्षक म्हणून सेवा करत आहे.

उतरत्या वयातील आव्हानं

आता मी वयाची ८० वर्षं पार केली आहेत, त्यामुळे बेथेलमधील माझ्या नेमणुका पूर्ण करणं मला जास्त कठीण जातं. मागील दहा वर्षांपासून मी कर्करोगाशी झुंजत आहे. मला प्राचीन काळच्या हिज्कीयासारखंच वाटतं, ज्याचं आयुष्य यहोवानं वाढवलं होतं. (यश. ३८:५) माझ्या पत्नीचंदेखील आरोग्य दिवसेंदिवस ढासळत आहे, आणि तिला असलेल्या अल्झायमर्स या आजाराचा आम्ही सोबत मिळून सामना करत आहोत. मार्जोरीनं यहोवाच्या सेवेत खूप परिश्रम केले, ती तरुणांची उत्तम सल्लागार राहिली आहे. तिनं विश्‍वासूपणे मला साहाय्य केलं व ती माझी एकनिष्ठ साथीदार राहिली आहे. ती नेहमीच बायबलची एक चांगली विद्यार्थी व शिक्षिका राहिली आहे, आणि आमची अनेक आध्यात्मिक मुलं आजदेखील आमच्याशी संपर्क ठेवतात.

माझी आत्या मेरी ही मार्च २०१० मध्ये वयाच्या ८७ व्या वर्षी वारली. ती देवाच्या वचनाची एक उत्तम शिक्षिका होती व तिनं इतरांना खऱ्‍या उपासनेसाठी खंबीर भूमिका घेण्यास मदत केली. तिनं अनेक वर्षं पूर्ण-वेळच्या सेवेत खर्च केली. तिनं मला देवाच्या वचनाविषयी सत्य शिकवलं व तिच्यासारखं बनवलं, म्हणजे आपला प्रेमळ देव यहोवा याचा एक सेवक बनवलं याबद्दल मी तिचा आभारी आहे. माझ्या आत्याला तिच्या पतीच्या कबरेच्या बाजूला दफन करण्यात आलं. तिच्या पतीनं मिशनरी या नात्यानं इस्राएलमध्ये सेवा केली होती. मला भरवसा आहे की ते दोघंही यहोवाच्या स्मृतीत आहेत आणि आपल्या पुनरुत्थानाची वाट पाहत आहेत.

मी यहोवाच्या सेवेत खर्च केलेल्या ६७ पेक्षा अधिक वर्षांचा विचार करतो तेव्हा त्यानं मला दिलेल्या अनेक आशीर्वादांसाठी मी त्याचे आभार मानतो. यहोवाच्या इच्छेप्रमाणं करण्यात मला नेहमीच आनंद मिळाला आहे! येशू ख्रिस्तानं अभिवचन दिलं: “ज्या कोणी घरे, भाऊ, बहिणी, बाप, आई, मुले किंवा शेते माझ्या नावाकरिता सोडिली आहेत त्याला अनेकपटीने मिळून सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल.” (मत्त. १९:२९) यहोवाच्या अपात्र कृपेवर भरवसा ठेवून, त्याच्या पुत्रानं दिलेल्या या अभिवचनात सहभागी होण्याची मीदेखील आशा बाळगतो.

[तळटीप]

^ १९४२ मध्ये प्रकाशित, पण सध्या छापले जात नाही.

[१९ पानांवरील चित्र]

अमेरिकेच्या जॉर्जिया राज्यात माझ्या आजोबांच्या कापसाच्या मळ्यावर, १९२८

[१९ पानांवरील चित्र]

माझी आत्या मेरी आणि अंकल टालमाज

[२० पानांवरील चित्र]

माझी आत्या मेरी, ग्लॅडिस आणि ग्रेस

[२० पानांवरील चित्र]

माझा बाप्तिस्मा, १४ जून १९४४

[२० पानांवरील चित्र]

बेथेलमध्ये सेवा विभागात

[२१ पानांवरील चित्र]

१९५८ मध्ये यांकी स्टेडियममध्ये भरलेल्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनात माझी आत्या मेरी हिच्यासोबत

[२१ पानांवरील चित्र]

मार्जोरीसोबत आमच्या लग्नाच्या दिवशी

[२१ पानांवरील चित्र]

मी आणि मार्जोरी, २००८ मध्ये