व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

विवाहित व अविवाहित स्थितीविषयी सुज्ञ सल्ला

विवाहित व अविवाहित स्थितीविषयी सुज्ञ सल्ला

विवाहित व अविवाहित स्थितीविषयी सुज्ञ सल्ला

“हे मी . . . तुमच्या हातून उत्तम आचरण व प्रभूची सेवा एकाग्रतेने व्हावी म्हणून सांगतो.”—१ करिंथ. ७:३५.

१, २. एका व्यक्‍तीने, विवाहाविषयी व अविवाहित राहण्याविषयी बायबलमधील सल्ला का जाणून घेतला पाहिजे?

 एखाद्या विरुद्धलिंगी व्यक्‍तीसोबत व्यवहार करताना आपण सहसा आनंद, निराशा किंवा चिंता यांसारख्या भावना अनुभवतो. अशा निरनिराळ्या भावनांचा यशस्वी रीत्या सामना करण्यासाठी आपल्याला देवाच्या मार्गदर्शनाची गरज आहे. पण, केवळ या एकाच कारणामुळे आपल्याला देवाच्या मार्गदर्शनाची गरज नाही. एक ख्रिस्ती व्यक्‍ती अविवाहित राहण्यात समाधानी असेल; पण, आपले कुटुंबीय किंवा मित्र आपल्यावर विवाह करण्याचा दबाव आणत आहेत असे कदाचित तिला वाटेल. आणखी एखाद्या ख्रिस्ती व्यक्‍तीला कदाचित लग्न करायची इच्छा असेल; पण तिला सुयोग्य साथीदार मिळाला नसेल. तर इतर काहींना, लग्नानंतर पतीवर किंवा पत्नीवर येणाऱ्‍या जबाबदाऱ्‍या हाताळण्यासाठी मार्गदर्शनाची गरज असेल. शिवाय, विवाहित व अविवाहित अशा सर्व ख्रिश्‍चनांना लैंगिक नैतिकतेसंबंधी परीक्षांना तोंड द्यावे लागते.

या गोष्टींचा केवळ आपल्या आनंदावरच नव्हे, तर यहोवा देवासोबतच्या आपल्या नातेसंबंधावरही परिणाम होतो. करिंथकरांना लिहिलेल्या पहिल्या पत्रातील ७ व्या अध्यायात पौलाने विवाहित व अविवाहित स्थितीविषयी सल्ला दिला. यामागचा त्याचा उद्देश आपल्या वाचकांना “उत्तम आचरण” राखण्याचे व “प्रभूची सेवा एकाग्रतेने” करत राहण्याचे उत्तेजन देणे हा होता. (१ करिंथ. ७:३५) या महत्त्वाच्या गोष्टींविषयी पौलाने दिलेला सल्ला तुम्ही विचारात घेता, तेव्हा यहोवाची सेवा पूर्णार्थाने कशी करता येईल याचा विचार करा; मग तुम्ही विवाहित असोत अथवा अविवाहित.

एक महत्त्वपूर्ण वैयक्‍तिक निर्णय

३, ४. (क) एखाद्या अविवाहित मित्राविषयी किंवा नातेवाइकाविषयी लोक अवाजवी चिंता करतात तेव्हा काही वेळा कोणत्या समस्या निर्माण होतात? (ख) पौलाने दिलेला सल्ला, विवाहाविषयी संतुलित दृष्टिकोन बाळगण्यास एखाद्याला कशा प्रकारे उपयुक्‍त ठरू शकतो?

पहिल्या शतकातील यहुदी समाजाप्रमाणे, आजही अनेक संस्कृतींमध्ये, लग्न करण्यावर खूप भर दिला जातो. एका विशिष्ट वयापर्यंत मुलाचे किंवा मुलीचे लग्न झाले नाही, तर नातेवाईक किंवा मित्रमंडळी चिंतित होऊन त्यांना लग्न करण्याचा सल्ला देतात. सहज बोलता-बोलता ते कदाचित असे सुचवतील की साथीदार शोधण्यासाठी त्यांनी अधिक प्रयत्न करावा. ते कदाचित, त्यांच्या माहितीतील काही स्थळे त्यांना सुचवतील किंवा दोन अविवाहित व्यक्‍तींची धूर्तपणे भेट घडवून आणण्याचा प्रयत्न करतील. पण, अशा गोष्टींमुळे काही वेळा खजील होण्याची वेळ येऊ शकते; मैत्रीला तडा जाऊ शकतो आणि भावना दुखावल्या जाऊ शकतात.

पौलाने, इतरांवर लग्न करण्याचा किंवा अविवाहित राहण्याचा कधीही दबाव आणला नाही. (१ करिंथ. ७:७) तो अविवाहित राहून यहोवाची सेवा करण्यात आनंदी होता; पण त्याच वेळी, इतरांना लग्न करण्याचा हक्क आहे हे त्याने मान्य केले. आज प्रत्येक ख्रिश्‍चनालादेखील, लग्न करावे की नाही हे ठरवण्याचा हक्क आहे. त्यामुळे, या बाबतीत त्यांनी कोणता निर्णय घ्यावा याविषयी इतरांनी त्यांच्यावर दबाव आणू नये.

अविवाहित स्थितीचा पुरेपूर फायदा घ्या

५, ६. पौलाने अविवाहित राहण्याची शिफारस का केली?

पौलाने करिंथकरांना लिहिलेल्या शब्दांचे एक उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे, अविवाहित स्थितीविषयी त्याचा सकारात्मक दृष्टिकोन. (१ करिंथकर ७:८ वाचा.) पौल अविवाहित असला, तरी आज ख्रिस्ती धर्मजगतातील अविवाहित पाळक जसे स्वतःला विवाहित लोकांपेक्षा श्रेष्ठ समजतात तसे त्याने स्वतःला समजले नाही. त्याऐवजी, सुवार्तेचा प्रचार करणाऱ्‍यांकरता अविवाहित स्थिती कशी फायदेकारक असू शकते हे प्रेषित पौलाने ठळकपणे दाखवले. तो फायदा काय आहे?

एका अविवाहित ख्रिस्ती व्यक्‍तीला सहसा यहोवाच्या सेवेतील ज्या नेमणुका स्वीकारणे जमू शकते, त्या स्वीकारणे कदाचित एका विवाहित ख्रिस्ती व्यक्‍तीला जमणार नाही. पौलाला “परराष्ट्रीयांचा प्रेषित” होण्यासाठी एक खास विशेषाधिकार मिळाला होता. (रोम. ११:१३) प्रेषितांची कृत्ये पुस्तकातील १३ ते २० अध्याय वाचा आणि प्रेषित पौलाने व त्याच्या इतर मिशनरी सहकाऱ्‍यांनी कशा प्रकारे नवनवीन क्षेत्रांत प्रचार केला आणि एकापाठोपाठ एक नवीन मंडळ्या स्थापन केल्या ते पाहा. पौलाने आपल्या सेवेदरम्यान अशा समस्यांचा धीराने सामना केला, ज्यांचा आज खूप कमी लोकांना कदाचित सामना करावा लागेल. (२ करिंथ. ११:२३-२७, ३२, ३३) पण, येशूचे शिष्य बनण्यास अनेकांना मदत करण्यात त्याला जो आनंद मिळणार होता त्यासाठी तो या समस्यांचा सामना करण्यास तयार होता. (१ थेस्सलनी. १:२-७, ९; २:१९) पौल जर विवाहित असता किंवा त्याचे स्वतःचे कुटुंब असते, तर त्याला असे करणे जमले असते का? कदाचित नाही.

७. देवाच्या राज्याशी संबंधित कार्यांत अधिकाधिक सहभाग घेण्यासाठी आपल्या अविवाहित स्थितीचा उपयोग केलेल्या साक्षीदारांचे एक उदाहरण सांगा.

अनेक अविवाहित ख्रिस्ती देवाच्या राज्याशी संबंधित कार्यांत अधिकाधिक सहभाग घेण्यासाठी आपल्या स्थितीचा उपयोग करतात. बोलिव्हियातील सेरा आणि लिंबानिया या दोन अविवाहित पायनियर बहिणींचे उदाहरण विचारात घ्या. त्या अशा एका गावात राहायला गेल्या जेथे कितीतरी वर्षांपासून प्रचार कार्य करण्यात आले नव्हते. त्या गावात वीज नव्हती. मग ही त्यांच्याकरता समस्या ठरणार होती का? त्यांनी म्हटले: “इथं रेडिओ किंवा टीव्ही नाही, त्यामुळे वाचन करणं हेच इथल्या लोकांचं विरंगुळ्याचं साधन आहे.” काही गावकऱ्‍यांनी या पायनियर बहिणींना ते वाचत असलेली यहोवाच्या साक्षीदारांची काही प्रकाशने दाखवली. ही प्रकाशने अतिशय जुनी असून ती आता छापलीदेखील जात नाहीत. जवळजवळ प्रत्येक घरात बहिणींना आस्थेवाईक लोक भेटल्यामुळे, त्यांना या क्षेत्रातील प्रत्येक घरी भेट देणे शक्य नव्हते. एका वयस्कर स्त्रीने त्यांना म्हटले: “यहोवाचे साक्षीदार शेवटी आमच्यापर्यंत पोहचले आहेत, त्यामुळे जगाचा अंत नक्कीच जवळ असला पाहिजे.” त्या गावातील काही जण लवकरच मंडळीच्या सभांना उपस्थित राहू लागले.

८, ९. (क) पौल अविवाहित स्थितीबद्दल सकारात्मक रीतीने बोलला तेव्हा त्याच्या मनात काय होते? (ख) अविवाहित ख्रिश्‍चनांना कोणते फायदे मिळतात?

अर्थात, विवाहित ख्रिश्‍चनांनादेखील कठीण क्षेत्रांत प्रचार कार्य केल्यामुळे चांगले परिणाम मिळतात. पण, अविवाहित ख्रिश्‍चनांना ज्या नेमणुका स्वीकारणे सोपे असते, त्या नेमणुका स्वीकारणे कदाचित विवाहित ख्रिश्‍चनांना किंवा मुले असलेल्या जोडप्यांना जमणार नाही. सुवार्तेचा प्रसार करण्यासाठी स्थानिक मंडळ्यांमध्ये किती वाव आहे हे पौलाने पाहिले. सुवार्तेचा प्रचार करण्यात त्याला जो आनंद मिळत होता, तोच आनंद मंडळीतील इतरांनीही अनुभवावा अशी त्याची इच्छा होती. म्हणूनच, अविवाहित राहून यहोवाची सेवा करण्याबद्दल तो सकारात्मक रीतीने बोलला.

अमेरिकेतील एका अविवाहित पायनियर बहिणीने असे लिहिले: “काही लोकांना असं वाटतं की अविवाहित लोक जीवनात कधीच आनंदी असू शकत नाहीत. पण, मी हे अनुभवलं आहे की खरा आनंद यहोवासोबतच्या नातेसंबंधावर अवलंबून असतो. अविवाहित असणं हा एक त्याग असला, तरी तुम्ही या स्थितीचा फायदा घेतला, तर ती तुमच्याकरता एक अद्‌भुत देणगी ठरू शकते.” आनंद मिळवण्याविषयी त्या बहिणीने म्हटले, की अविवाहित असल्यामुळे एक व्यक्‍ती आनंदित असू शकत नाही असे नाही. उलट, आनंद प्राप्त करण्याची ही एक संधी आहे. तिने पुढे म्हटले: “मला माहीत आहे की यहोवा सर्वांवर मनस्वी प्रेम करतो; तो आपल्या प्रेमातून कोणालाही वगळत नाही, मग ते विवाहित असोत अथवा अविवाहित.” ही बहीण आता, राज्य प्रचारकांची जास्त गरज असलेल्या एका देशात आनंदाने सेवा करत आहे. तुम्ही जर अविवाहित असाल, तर इतरांना बायबलमधील सत्ये शिकवण्यातील आपला सहभाग आणखी वाढवण्यासाठी तुम्ही आपल्या स्वातंत्र्याचा उपयोग करू शकता का? असे केल्यास, अविवाहित स्थिती ही यहोवाकडून मिळालेली एक अनमोल देणगी आहे हे तुम्हालाही दिसून येईल.

लग्न करण्याची इच्छा बाळगणाऱ्‍या अविवाहित व्यक्‍ती

१०, ११. लग्न करण्याची इच्छा असलेल्या, पण योग्य विवाहसोबती न मिळालेल्या व्यक्‍तींना यहोवा कशा प्रकारे आधार देतो?

१० काही काळ अविवाहित राहिल्यानंतर, यहोवाचे अनेक विश्‍वासू सेवक लग्न करण्याचा निर्णय घेतात. या बाबतीत मार्गदर्शनाची गरज आहे याची जाणीव असल्यामुळे, यहोवाने आपल्याला एक योग्य विवाहसोबती शोधण्यात मदत करावी म्हणून ते त्याला प्रार्थना करतात.१ करिंथकर ७:३६ वाचा. *

११ तुम्हाला जर तुमच्याप्रमाणेच यहोवाची जिवेभावे सेवा करण्याची इच्छा बाळगणाऱ्‍या व्यक्‍तीशी लग्न करायचे असेल, तर त्याबद्दल यहोवाला प्रार्थना करा. (फिलिप्पै. ४:६, ७) तुम्हाला कितीही वेळ वाट पाहावी लागली, तरी निराश होऊ नका. आपला प्रेमळ देव तुम्हाला मदत करेल असा भरवसा बाळगा. आणि तो नक्कीच तुम्हाला तुमच्या गरजेनुरूप भावनिक आधार देईल.—इब्री १३:६.

१२. एका ख्रिस्ती व्यक्‍तीने लग्नाच्या प्रस्तावाचा काळजीपूर्वक विचार का केला पाहिजे?

१२ लग्न करण्याची इच्छा असलेल्या एका ख्रिस्ती व्यक्‍तीला सत्यात नसलेल्या व्यक्‍तीकडून अथवा जिच्या आध्यात्मिकतेची खातरी नाही अशा एखाद्या व्यक्‍तीकडून लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. अशा वेळी, हे आठवणीत असू द्या की चुकीचा विवाहसोबती निवडल्यामुळे तुम्हाला जे दुःख होईल, ते अविवाहित असताना तुम्हाला वाटत असलेल्या एकटेपणाच्या भावनांपेक्षा कितीतरी पटीने जास्त असेल. आणि एकदा का लग्न झाले, की तुम्हाला आयुष्यभर त्या व्यक्‍तीला जडून राहावे लागेल. (१ करिंथ. ७:२७) तेव्हा, उतावीळपणे लग्नाचा निर्णय घेऊ नका, ज्याचा नंतर तुम्हाला पस्तावा होईल.१ करिंथकर ७:३९ वाचा.

लग्नाच्या जबाबदाऱ्‍या हाताळण्याची तयारी करा

१३-१५. लग्नाचा विचार करणाऱ्‍या मुलामुलीने लग्नाआधीच कोणत्या संभाव्य हालअपेष्टांविषयी एकमेकांशी चर्चा केली पाहिजे?

१३ पौलाने, अविवाहित राहून यहोवाची सेवा करण्याची शिफारस केली असली, तरी ज्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला त्यांना त्याने तुच्छ लेखले नाही. त्याउलट, त्याने देवाच्या प्रेरणेने दिलेला सल्ला लग्नाचा विचार करणाऱ्‍या जोडप्यांना वैवाहिक जीवनातील जबाबदाऱ्‍या हाताळण्यास व आपले वैवाहिक बंधन आणखी मजबूत करण्यास सहायक ठरतो.

१४ लग्नाचा विचार करणाऱ्‍या काही जोडप्यांना वैवाहिक जीवनाविषयी असलेल्या आपल्या अपेक्षांमध्ये तडजोड करण्याची गरज आहे. ते लग्नाआधी एकमेकांना भेटतात तेव्हा कदाचित त्यांना वाटेल की त्यांचे एकमेकांवरील प्रेम अद्‌भुत व खास आहे आणि वैवाहिक जीवनात ते परमसुख अनुभवतील. अशी स्वप्ने रंगवून ते लग्न करतात व आपल्या वैवाहिक सुखाच्या आड कोणतीही गोष्ट कधीच येणार नाही असा विश्‍वास बाळगतात. पण, अशी विचारसरणी वास्तवाला धरून नाही. वैवाहिक जीवनातील प्रणय भावना नक्कीच आनंददायी असतात, पण केवळ या भावनांच्या आधारावर एक वधू किंवा वर, विवाहासोबत येणाऱ्‍या हालअपेष्टांचा सामना करण्यास सज्ज नसतात.१ करिंथकर ७:२८ वाचा. *

१५ अनेक नवविवाहितांच्या जेव्हा हे लक्षात येते की महत्त्वाच्या गोष्टींविषयी आपल्या विवाहसोबत्याचे मत आपल्यापेक्षा वेगळे आहे तेव्हा त्यांना आश्‍चर्य व निराशही वाटते. पैसा खर्च करण्याच्या बाबतीत, विरंगुळ्याच्या बाबतीत, आणि कोठे राहणार व किती वेळा आपल्या कुटुंबीयांना भेटायला जाणार या बाबतींत दोघांची मते अगदी वेगळी असतील. शिवाय, त्या प्रत्येकामध्ये काही ना काही उणिवा असतात ज्यांमुळे त्यांना एकमेकांची चीड येऊ शकते. लग्नाआधी मुलगा-मुलगी एकमेकांना भेटतात तेव्हा अशा महत्त्वाच्या गोष्टींकडे सहसा गांभीर्याने पाहिले जात नाही, पण लग्नानंतर या गोष्टी विवाहात ताणतणाव निर्माण करू शकतात. तेव्हा, मुलामुलीने लग्नाआधीच अशा महत्त्वाच्या गोष्टींविषयी एकमेकांशी चर्चा करणे गरजेचे आहे.

१६. वैवाहिक जीवनातील समस्यांचा सामना करण्याविषयी पती-पत्नीमध्ये एकमत का असले पाहिजे?

१६ आपले वैवाहिक जीवन यशस्वी व आनंदी बनवण्यासाठी पती-पत्नीने मिळून समस्यांचा सामना केला पाहिजे. मुलांना कशा प्रकारे शिस्त लावावी व वयोवृद्ध आईवडिलांची कशा प्रकारे काळजी घ्यावी याविषयी त्यांचे एकमत असले पाहिजे. कुटुंबातील समस्यांच्या तणावामुळे त्यांच्यात दुरावा निर्माण होऊ नये. जीवनात बायबलमधील सल्ला लागू केल्याने, त्यांच्या अनेक समस्यांचे निरसन होईल, ते समस्यांचा धीराने सामना करू शकतील आणि वैवाहिक जीवनाचा आनंद अनुभवू शकतील.—१ करिंथ. ७:१०, ११.

१७. विवाहित जोडपे “जगाच्या गोष्टींविषयीची चिंता” का करतात?

१७ पहिले करिंथकर ७:३२-३४ (वाचा.) या वचनांमध्ये पौल विवाहाच्या आणखी एका वास्तवाविषयी सांगतो. विवाहित जोडप्यांना “जगाच्या गोष्टींविषयीची चिंता” करावी लागते, जसे की, अन्‍न, वस्त्र, निवारा व इतर सांसारिक गोष्टी. असे का? लग्नाआधी एका बांधवाने कदाचित सेवाकार्यात स्वतःला झोकून दिले असेल; पण लग्नानंतर, त्याला आपल्या पत्नीची देखभाल करण्यासाठी व तिला आनंदी ठेवण्यासाठी त्या वेळातील काही वेळ व शक्‍ती खर्च करावी लागते. हीच गोष्ट पत्नीलादेखील आपल्या पतीसाठी करावी लागते. पती-पत्नीने एकमेकांना आनंदी ठेवणे गरजेचे आहे याची यहोवाला जाणीव आहे. त्याला माहीत आहे की लग्नाआधी ते त्याच्या सेवेत जो वेळ व शक्‍ती खर्च करायचे, त्यापैकी काही वेळ व शक्‍ती आता त्यांनी आपल्या विवाहाला यशस्वी करण्यासाठी खर्च करणे गरजेचे आहे.

१८. लग्नानंतर काहींना करमणुकीच्या बाबतीत कोणते फेरबदल करावे लागू शकतात?

१८ पण, आणखीनही एक गोष्ट शिकण्यासारखी आहे. एक विवाहित जोडपे एकमेकांची देखभाल करण्यासाठी जर देवाच्या सेवेतील काही वेळ व शक्‍ती खर्च करत असेल, तर अविवाहित असताना ते करमणुकीसाठी किंवा मौजमजेसाठी जो वेळ व शक्‍ती खर्च करायचे त्यातूनही थोडा वेळ व शक्‍ती एकमेकांची देखभाल करण्यासाठी त्यांनी खर्च करू नये का? एक पती जर आपला जास्तीत जास्त वेळ आपल्या मित्रांसोबत खेळक्रीडेत घालवत असेल, तर याचा त्याच्या पत्नीवर काय परिणाम होईल? किंवा एक पत्नी जर आपला जास्तीत जास्त वेळ छंद जोपासण्यात किंवा मैत्रिणींसोबत घालवत असेल, तर पतीला कसे वाटेल? अशा वेळी, एका पतीला किंवा पत्नीला एकाकी व दुःखी वाटू शकते आणि आपला विवाहसोबती आपल्यावर प्रेम करत नाही असे वाटू शकते. पती-पत्नीने आपले वैवाहिक बंधन मजबूत करण्यासाठी सर्वतोपरी मेहनत घेतली, तर हे टाळता येऊ शकते.—इफि. ५:३१.

यहोवा नैतिक शुद्धतेची अपेक्षा करतो

१९, २०. (क) विवाहित लोकदेखील अनैतिक कृत्य करण्याच्या प्रलोभनाला बळी पडू शकतात असे आपण का म्हणू शकतो? (ख) विवाहसोबती एकमेकांपासून दीर्घ काळ वेगळे राहतात तेव्हा कोणता धोका पत्करतात?

१९ यहोवाचे सेवक नैतिक रीत्या शुद्ध राहण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतात. नैतिकतेच्या बाबतीत समस्या उद्‌भवू नयेत म्हणून काही जण लग्न करण्याचे ठरवतात. पण, लग्न केल्याने लैंगिक अनैतिकतेपासून आपोआप संरक्षण होत नाही. बायबलच्या काळात, लोक तटबंदी नगराच्या आत राहिले तरच शत्रूंपासून त्यांचे संरक्षण व्हायचे. नगराच्या बाहेर दरोडेखोर किंवा लुटारू फिरत असताना एखादी व्यक्‍ती नगराच्या बाहेर गेल्यास, ती लुटली जाण्याची किंवा तिचा खून होण्याची शक्यता असायची. त्याचप्रमाणे, विवाहाच्या संस्थापकाने विवाहित जोडप्यांसाठी लैंगिकतेच्या बाबतीत मर्यादा घालून दिल्या आहेत, आणि विवाहित जोडप्यांनी जर या मर्यादांचे पालन केले तरच त्यांचे संरक्षण होते.

२० या मर्यादा काय आहेत याचे वर्णन पौलाने १ करिंथकर ७:२-५ मध्ये केले. पतीला केवळ आपल्या पत्नीसोबत लैंगिक संबंध ठेवण्याचा, तसेच पत्नीलादेखील केवळ आपल्या पतीसोबत लैंगिक संबंध ठेवण्याचा हक्क आहे. पती-पत्नीने एकमेकांना वैवाहिक “हक्क” द्यावा म्हणजे लैंगिक संबंधाचा अधिकार द्यावा अशी देव त्यांच्याकडून अपेक्षा करतो. पण, काही पती-पत्नी एकत्र सुटीला जाण्याऐवजी स्वतंत्रपणे सुटीला जातात. तर, इतर काही जण कामानिमित्ताने कितीतरी दिवस किंवा महिने एकमेकांपासून वेगळे राहतात. अशा प्रकारे, ते एकमेकांना त्यांच्या ‘हक्कापासून’ वंचित ठेवतात. पण, एक व्यक्‍ती “असंयमामुळे” सैतानाच्या दबावाला बळी पडून व्यभिचार करते तेव्हा किती मोठा अनर्थ ओढवू शकतो याची कल्पना करा. जे कुटुंबप्रमुख आपल्या विवाहाला धोक्यात न घालता आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करतात अशांना यहोवा आशीर्वादित करतो.—स्तो. ३७:२५.

बायबलमधील सल्ल्याचे पालन करण्याचे फायदे

२१. (क) विवाह करावा की नाही हा निर्णय घेणे कठीण का आहे? (ख) पहिले करिंथकर ७ व्या अध्यायातील सल्ला उपयुक्‍त का आहे?

२१ विवाह करावा की नाही हा निर्णय घेणे एका व्यक्‍तीकरता अतिशय कठीण असू शकते. आपल्या अपरिपूर्णतेमुळे आपल्या सर्वांनाच—मग आपण विवाहित असू अथवा अविवाहित—समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे, ज्यांच्यावर यहोवाची कृपापसंती व आशीर्वाद आहे असे लोकसुद्धा निराशेपासून पूर्णपणे मुक्‍त होऊ शकत नाही. १ करिंथकरच्या ७ व्या अध्यायातील सुज्ञ सल्ल्याचे पालन केल्यास, तुम्ही अनेक समस्या टाळू शकता. तसेच, यहोवाच्या दृष्टीने तुम्ही ‘चांगले कराल,’ मग तुम्ही विवाहित असोत अथवा अविवाहित. (१ करिंथकर ७:३७, ३८ वाचा. *) देवाची कृपापसंती मिळवणे हा तुमच्याकरता सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे. यामुळे देवाच्या नवीन जगातील जीवन मिळवण्याकरता प्रगती करत राहणे तुम्हाला शक्य होईल. त्या नवीन जगात स्त्री-पुरुषांमध्ये आजच्यासारख्या समस्या मुळीच नसतील.

[तळटीपा]

^ १ करिंथकर ७:३६ (सुबोध भाषांतर): “तथापि आपल्या वासना काबूत ठेवण्यास आपण असमर्थ असल्यामुळे आपण विवाह करावा, असे जर कोणाला वाटत असेल, तर हरकत नाही, ते पाप नाही. त्याने विवाह करावा.”

^ १ करिंथकर ७:३७, ३८ (सुबोध भाषांतर): “३७ पण एखाद्या माणसाने विवाह न करण्याचा दृढनिश्‍चय केला असेल, आणि आपल्याला विवाह करण्याची गरज नाही असा निर्णय घेऊन तो विवाह करीत नसेल, तर त्याने घेतलेला निर्णय शहाणपणाचा आहे. ३८ म्हणून मग जो पुरुष विवाह करतो, तो चांगले करतो. पण जो पुरुष विवाह करीत नाही, तो अधिक चांगले करतो.”

तुम्ही उत्तर देऊ शकता का?

• इतरांनी एखाद्या अविवाहित व्यक्‍तीवर लग्न करण्याचा दबाव का आणू नये?

• यहोवाचे अविवाहित सेवक या नात्याने तुम्ही आपल्या वेळेचा सर्वोत्तम उपयोग कसा करू शकता?

• लग्नाचा विचार करणारे, लग्नानंतर येणाऱ्‍या जबाबदाऱ्‍या हाताळण्यास कसे सज्ज होऊ शकतात?

• लग्न केल्यामुळे लैंगिक अनैतिकतेपासून आपोआप संरक्षण का होत नाही?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१४ पानांवरील चित्रे]

जे अविवाहित ख्रिस्ती आपला जास्तीत जास्त वेळ सेवाकार्यात खर्च करतात ते आनंदी असतात

[१६ पानांवरील चित्र]

काहींना विवाहानंतर कोणत्या तडजोडी कराव्या लागतात?